Monday, July 24, 2017

सृष्टीला पाचवा महिना...

श्रावण महिना अगदी आवडता, म्हणजे बारा महिन्यांची नावं माहित नव्हती तेव्हापासून तो भरपूर फुलं, देवाची पूजा , प्रसाद मिळतो तो महिना आवडायचा. तशी आई रोजच साडी नेसायची, पण तेव्हा मस्त फुलं माळायची, गजरे करायची. मोठ्ठी एकादशी नंतर आईची, आज्जीची गडबड धांदल सुरु व्हायची. फुलवाती कर, वस्त्र माळ कर, सगळी पितळ्याची, तांब्याची भांडी चिंचेनी, लिंबानी घासून चक्क करायची, देवाचं तेल वेगळं ठेवायचं. फुलवाल्या मावशींना आधीपासूनच सांगून ठेवायची, कोणत्या कोणत्या दिवशी गजरे, हार हवेत ते. कालनिर्णय मधले ते अबोली रंगाचे दिवस कधी सुरु होतात याकडे घरातल्या बायकांचेच नव्हे तर पुरुषांचं पण लक्ष असायचं.
दिव्याच्या अमावास्येच्या आदल्या दिवशीच आजी सगळ्या ट्यूब लाईट, दिवे पुसायला लावायची, मग माळ्यावरचे जुने कंदील पण याच सुमाराला दर वर्षी उन्हं खायला बाहेर पडायचे. घरात असतील नसतील तेवढ्या समया, निरांजनी, कंदील सारे न्हाऊन माखून नव्याने चमकायचे. मग दुसऱ्या दिवशी आजी आई मस्त आंघोळ करून पाटावर त्या मांडून ठेवून, रांगोळीनी ते सजवून फुलं वाहून, त्याची पूजा करायच्या, मग दिव्यांचा नैवेद्य झाला का पुरणावरणाचा महिना सुरु झाला अशी वर्दी मेंदू तावड्तोब पोटाला, जिभेला द्यायचा. ते सारे शांत तेवणारे दिवे, त्यावर लावलेल्या वस्त्र माळा, रंगीबेरंगी फुलं पाहून खरंच आपोआप हात जोडले जायचे. आजी नेहेमी म्हणायची हे दिवे आपल्याला प्रकाश दाखवतात, त्यांचे ऋण मान्य करण्यासाठी हा अदिवास दरवर्षी साजरा करायचा. आजच्या जमानातल्या, अमुक डे, तमुक डे च्याच पंथातला हा ही एक डे. पण तो ज्या पद्धतीने साजरा व्हायचा ते पाहून हा दिवस वर्षभर व्हावा असं वाटायचं.
दुसऱ्या दिवसापासून घरात जणू एखादा पाहुणा आला असावा असंच वाटायचं. श्रावणी सोमवारी बेलाची पानं, मंगळवारी घरी, किंवा शेजारी, आजूबाजूला कुठे तरी नक्कीच मंगळागौर असायची, त्यामुळे फुलं, पत्री गोळा करायच्या असायच्या, बुधवार, गुरुवार  जरा निवांत गेले की परत शुक्रवारच्या जीवंतिका पूजा, हळदी कुंकुवाच्या तयारी साठी फुलं आणायची जबाबदारी अंगावर पडायचीचच. घरातली, शेजारची, मागच्या गल्लीतली, रस्त्यावरची फुलं शोधणं, तोडणं हा आमचा तेव्हाचा मुख्य उद्योग होता, आमच्या सुदैवाने १०, १५ पानं भरून गृहपाठ आम्हाला कधीच करावे लागले नाहीत, कधी कधी तर शाळेचा गृहपाठ आम्ही मधल्या सुट्टीत, किंवा एखाद्या रटाळ शिकवणाऱ्या मास्तर मास्तरणीच्या तासालाच करून मोकळे व्हायचो. म्हणजे ही अशी सगळी कामं करायला पूर्ण वेळ देता यायचा.
एखाद्या शेजारच्या काकू खडूस पाने फुलं तोडू द्यायच्या नाहीत, पण मग त्यांच्या बागेतली फुलं तोडण्यातच आम्हाला खरा आनंद मिळायचा. देवासाठी, पूजेसाठी फुलं तोडताना सुद्धा आमचे काही नियम होते, मुक्या कळ्या तोडायच्या नाहीत, (श्यामच्याआईसारखी आमच्या आईची शिकवण ती.) सगळी फुलं आपण नाही तोडायची, घरच्या लोकंसाठी, झाडासाठी काही फुलं ठेवायची, ओकं बोकं झाड आजही मला बघवत नाही. दिवेलागणीनंतर फुलं, कळ्या तोडायच्या नाहीत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही झाडाला, अपाय होईल, फांदी तुटेल असं काहीही करायचं नाही. आजूबाजूच्या सगळ्या जणी मिळून फुलं गोळा करायचो आणि मग सगळी फुलं तोडून झाल्यावर त्याच्या वाटण्या पण मस्त व्हायच्या. देवाला वाहून उरलेल्या फुलांमधून गाजरे ओवणं हे एक आवडीचं काम होतं. मोगरा, जाई, जुई, साईली, शेवंती, तगर, कण्हेरी, गणेशवेल, गोकर्णाची फुलं, जास्वंदी, अबोली, गुलाब, मधुमालती, पारिजात, कित्ती कित्ती रंग, त्यांच्या छटा, वास सगळं कसं एखादं चित्र वाटायचं.
या महिन्यात असा बहरलेला निसर्ग बघून साठवू किती या डोळ्यात व्हायचं. निसर्ग आपल्यापुढं असे दोन्ही हात पसरून उभा असतो आणि आपल्याच ओंजळी कमी पडत असतात त्याला झेलण्यासाठी. त्या सौंदर्यात एक नजाकत असते, एक अवघडलेपण असतं, एक सुप्त चाहूल असते. उन पावसाचा खेळ रंगवणारा हा श्रावण हा एकाच वेळी अल्लड पण असतो आणि पोक्त पण! ‘समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पाचवा महिना’ ही बोरकरांची कविता नंतर जेव्हा केव्हा ऐकली तेव्हा ती अशी कशी रुतली आतमध्ये आणि श्रावण नव्यानं कळला असं वाटलं. पाचवा महिना म्हणजे गर्भानी केलेली हालचाल मातेला कळायला सुरुवात झालेली असते, आईपणाच्या वाटेची हलकीशी चाहूल लागलेली असते, चेहऱ्यावर एक तेज आलेलं असतं, आईपणाचा एक सुप्त आनंद, अहंकाराचा गंध निराळाच असतो. गर्भाशी जुळलेल्या नाळेचा रंग मुखावर उठून दिसत असतो. धरणीची गोष्टही अशीच काहीशी असावी ना? आत रुजलेलं बीज हळू हळू वाढत असतं, अजून एक दोन चार महिन्यात सारी शेतं तरारून निघतील, मोत्याच्या दाण्यांनी शेतं भरून जातील. आणि ही भू माता आपल्याला सुपूर्द करेल तिची बाळं!
श्रावण रंगवला, बालकवींनी पण समजावला बोरकरांनी असं मला दर श्रावणात वाटतं. आणि त्यामुळेच श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ओठ गुणगुणत असतात, आणि डोळे पाचव्या महिन्यातल्या तेजानं भारलेल्या गर्भिणीच्या श्रावणमासाची दृष्ट उतरवून टाकत असतात!!!
मानसी होळेहोन्नुर

   

1 comment:

  1. Instead of remembering my "baalpan" I was enjoying your "baalpan " I felt it more interesting ..I could see your Ajji doing samai puja .wonderful write up .

    ReplyDelete