Sunday, February 21, 2010

शिल्लक कांजिणी

मीशरद आठवले. स्टेट बँक ऑफ इंडियाचा निवृत्त कारकून. दोनच दिवसांपूर्वी माझी एकसष्टी माझ्या तिन्ही मुलांनी झोकात साजरी केली. माझी लेक खास त्यासाठी अमेरिकेतून आली, तर मुलगा दिल्लीहून कुटुंबाला घेऊन आला. मी सहसा भावनिक होत नाही, पण परवा तो सगळा कार्यक्रम बघून मलाही गदगदून आलं. पण त्यानंतर माझ्या मुलांनी मला जे गिफ्ट दिलं, ते मात्र द्यायला नको होतं. त्यांच्या त्या प्रेमाच्या भेटीमुळे माझी स्वत:ची ओळख पुसली गेली. गेली पन्नास वर्षे मी जपून ठेवलेली किंवा नकळत जपली गेलेली माझी स्वतंत्र आयडेंटिटी संपून गेली. मला काय वाटतंय हे मला अजूनही कळत नाहीये. तुम्हाला मी माझी कथा सांगतो, कदाचित तुम्हाला सांगता सांगताच मलाही ठरवता येईल मला नक्की काय वाटतं!

नावासारखाच मी साधा, सरळ नाकासमोर चालणारा मुलगा होतो, तेव्हाची गोष्ट आहे ही. निसर्गनियमानुसार मला वयाच्या ११ व्या वर्षी कांजिण्या आल्या. आता काहीजणांना त्या वयाच्या दुसऱ्या वर्षी येत असतील तर काहींना वयाच्या ५० व्या वर्षी. कांजिण्या येण्याबद्दल माझी काही तक्रार नव्हती. उलट मी खूश झालो, कारण आमच्या आठवले कुळात सर्वाना म्हणजे मुले, मुली सगळ्यांनाच १० व्या वर्षांच्या वाढदिवसाच्या आधीच कांजिण्या येऊन गेल्या होत्या, त्यामुळे मी सर्वामध्ये चेष्टेचा विषय झालो होतो. तर त्यामुळेच कांजिण्या आल्यावर खूश होऊन मी माझ्या मोठय़ा भावाला म्हणालो, ‘‘बघ, उशिरा तर उशिरा, पण माझ्या कांजिण्यामुळे माझी परीक्षा बुडाली, किती छान झाले!’’

दोन-तीन दिवसांनंतर कांजिण्या कमी व्हायला लागल्या. बहुधा नेहमीपेक्षा उशिरा आल्यामुळे की काय, पण मला भरपूर कांजिण्या आल्या होत्या. म्हणजे ‘शरीरावर बोट ठेवायलाही जागा नाही’ असं माझी नमू आत्या म्हणाली होती. माझ्या आईला तर भयंकर भीती वाटली होती, मी जगतो की नाही अशी! त्यामुळे तिने आमच्या गावच्या भैरोबाला नवस केला होता, माझ्या कांजिण्या बऱ्या झाल्या की २१ नारळ वाहीन म्हणून! मला काही आठवत नाही, पण सगळे म्हणतात त्या दोन-तीन दिवसांत मी झोपेतच होतो आणि काय काय बरळायचो! आमच्या मास्तरांना मी यथेच्छ शिव्या देऊन घेतल्या. गणिताचा पेपर बुडल्यामुळे मी कांजिण्यांना धन्यवाद देत होतो. माझा सदरा लपवून ठेवणाऱ्या माझ्या आत्येबहिणीबद्दलही मी काहीतरी बरळलो म्हणे. त्यानंतर ती आमच्या घरी आली ती थेट लग्नानंतर नवऱ्याला घेऊनच! तर माझ्या कांजिण्या कमी कमी होत होत्या, म्हणजे फुललेले फोड बसत होते किंवा फुटत होते, दुखत होते, पण तरीही मला छान वाटत होते. सगळीकडचे फोड जात होते. अनुभवी मार्गदर्शक भावा-बहिणींनी सल्ले देऊन सावध केलेले होते त्यामुळे मी हाताने एकही फोड फोडला नव्हता, कारण त्याचा म्हणे डाग राहतो. माझ्या सगळ्यात मोठय़ा चुलत भावाने असेच काही फोड फोडले होते आणि त्याचा पुरावा त्याच्या हातावर होता. (त्याला सांगायला कोणी नव्हते, म्हणून उत्साहाने पुढच्या पिढीचा मार्गदर्शक होण्याची जबाबदारी त्याने स्वेच्छेने घेतली होती.)

यथावकाश माझ्या अंगावरच्या साऱ्या कांजिण्या गेल्या, फक्त एक सोडून! आमच्या मार्गदर्शकांनी तेही सांगितले होते की, एक कांजिणी राहते आणि मग स्वत:च्या पाश्र्वभागावरची कांजिणी दाखविली होती. पाठोपाठ एकेक करत प्रत्येकाने स्वत:ची दाखवली, फक्त आमच्या नमू आत्याच्या कमूने सोडून. तिची कांजिणी कुठे होती हे आम्हाला आजवर कळलेच नाही. पण माझी शिल्लक कांजिणी मात्र अशी लपून ठेवण्याच्या जागी नव्हती, उलट मला बघितल्याक्षणी आधी कांजिणीच दिसत असे. नाकाच्या शेंडय़ावर त्या ‘स्पेशल’ कांजिणीने मुक्काम ठोकला होता. खरं तर तिने त्या जागेवर थांबावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. मी प्रयत्न केला की हातावर कुठं तरी एखादी कांजिणी थांबून राहावी, पण माझ्या प्रयत्नांना, इच्छेला मान न देता ती अखेर नाकावरच टिच्चून पाय रोवून उभी होती!

इथूनच खरी गोष्ट सुरू झाली. एक चित्पावन गोरा रंग सोडला तर मी वर्गात चटकन लक्षात यावा असा विशेष काही नव्हतो. पुढच्या बाकावर बसून हात वर करून उत्तर देणारा, परीक्षेत उत्तम गुण मिळविणारा वगैरे पण नव्हतो. मात्र अचानक माझ्या कांजिण्यांनंतर माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जाऊ लागलं. एक वेगळीच ओळख मला माझ्या शिल्लक कांजिणीने दिली होती. सहसा कोणाच्या लक्षात न राहणारा मी अचानक विविध नावांनी वर्गात प्रसिद्ध झालो होतो. फोडेल्या, नाकफोडय़ा, नाकोडय़ा, पोपट आठवले, चोचवाला आठवले आणि काय काय. खरं तर पाच भावांमधला मी तिसरा, म्हणजे इकडेही नाही आणि तिकडेही नाही. वर्गात पण पहिलाही नाही आणि शेवटचाही नाही. माझं अस्तित्व हे तसं अदखलपात्रच होतं, पण त्या कांजिणीमुळे जणू माझा नवा जन्म झाला. मुलां-मुलांमधलं हेच नाव शिक्षकांमध्येही पसरलं आणि मी शरद आठवलेचा नाकोडय़ा आठवले झालो!

यथावकाश तारुण्यपिटिका येऊ लागल्या, तेव्हा हीच कांजिणी मला माझा चेहरा विद्रूप करत आहे, असं वाटू लागलं. विशेषत: तारुण्यपिटिका येऊन जायच्या तेव्हा मनात विचार यायचाही कांजिणी पण अशीच निघून जावी. मी काही नाकोडय़ा आठवले नाही, मी शरद रामचंद्र आठवले आहे. सगळे साले मनाचे खेळ, नाकावरची कांजिणी हवीशी पण होती आणि नकोशी पण!

नाकोडय़ा आठवले नावानेच कॉलेजातही मुलं ओळखू लागली आणि ‘नाकोडय़ा आठवले’ या पदवीसह ‘पदवी’ घेऊनच कॉलेज सोडलं! कॉलेजमध्ये जास्त जाणवलं माझं वेगळेपण! आता खरं तर आपण जसे असतो तसे का असतो याला उत्तर नसतं, म्हणजे एखाद्याचं नाक बसकं का असतं? एखाद्याचे कान लांब का असतात? किंवा एखादा तिरळा का असतो? कॉलेजमध्ये जेव्हा दरवर्षी माझ्या नाकावर, कांजिणीवर फिशपाँड पडले, तेव्हा मलाच कळेना, हे हसून एन्जॉय करावं की चिडावं.
x
‘नाकोडय़ाच्या नाकावरची कांजिणी
म्हणजे आठवणीत राहिलेली मैत्रीण जुनी’
x
‘राणीनं भरून ठेवल्या प्रेमाच्या रांजणी
राजा मात्र म्हणतो, मला प्यारी माझी कांजिणी’
x
‘प्रेमाच्या प्रवासात ते करत होते मजल दरमजल
ओठांवर ओठ ठेवून ती म्हणाली, तुझे नाक मात्र बदल’
x
कॉलेजमधले असे काही फिशपाँड्स मला अजूनही आठवतात, कारण दरवर्षी त्यांना ‘बेस्ट फिशपाँड्सचं’ बक्षीस मिळायचं आणि मग सगळेजण एकमेकांना तेच ऐकवायचे। यावर वैतागून एकदा मी सरळ कांजिणी फोडायचं ठरवलं, पण जेव्हा जेव्हा मी ती कांजिणी फोडायला जायचो, आईची आठवण यायची. कारण आई म्हणायची, ‘‘शरदा, तुझ्या सगळ्या कांजिण्या बऱ्या झाल्या की मी गावातल्या भैरोबाला जाऊन २१ नारळ वाहणार आहे.’’ कित्येक दिवस नाकावरची कांजिणी जात नव्हती म्हणून एकदा मी आईला म्हणालो, ‘‘का गं, तुझ्या भैरोबाने माझ्या कांजिण्या बऱ्या केल्या, मग ही एकटीच कशी राहिली?’’ त्यावर ती म्हणाली होती, ‘‘तुझी ही कांजिणी जेव्हा बरी होईल तेव्हाच माझा नवस पूर्ण होईल. माझा माझ्या देवावर विश्वास आहे, तू काही करू नकोस तिला!’’ १५ वर्षांपूर्वी आई गेली, पण तेव्हाही ती जाता जाता सांगून गेली, ‘‘तुझी कांजिणी आपोआप बरी होईल आणि जेव्हा ती बरी होईल, तेव्हा माझा नवस पूर्ण कर!’’

पुढे बँकेत नोकरी मिळाली आणि ‘नाकोडय़ा आठवले’चा ‘फोडवाले साहेब’, ‘कांजिण्या आठवले’ वगैरे झाला. बाकी माझी आयुष्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. कांजिणी हीसुद्धा तक्रार नव्हती, उलट माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस तिच्यामुळे अनेकांच्या लक्षात राहिला होता. बँकेमध्ये १० ते ५ कारकुनी करणारा मी, माझ्यात चारचौघांहून वेगळं होण्याची इतर कोणतीही क्षमता नव्हती आणि महत्त्वाकांक्षाही नव्हती, पण अशी एक वेगळी ओळख नाकावरच्या कांजिणीने मला सहजगत्या दिली होती.

लग्नाच्या बाजाराने मात्र माझे विमान खाली आणले. तब्बल तीन मुलींनी ‘नाही’ म्हटल्यावर चौथी मुलगी माझी बायको झाली. तिन्ही मुलींनी, त्यांच्या पालकांनी, फोडवाला मुलगा आपल्याला, आपल्या मुलीला शोभणार नाही, असाच विचार केला असणार बहुधा! म्हणून मग शोभाला, माझ्या बायकोला, जी माझ्यासारखीच सर्वसामान्य चारचौघींसारखीच होती, तिला मी विचारलं, ‘‘मला हो का म्हणालीस?’’ त्यावर तिनं जे उत्तर दिलं ते ऐकून मला पटलं ही माझ्याच सारखी आहे! माझं आणि हिचं जमणार! शोभा म्हणाली, ‘‘मला चारचौघांपेक्षा वेगळा नवरा हवा होता. तुमच्या त्या नाकावरच्या फोडामुळं तुम्ही किनई वेगळेच दिसता, म्हणून मी हो म्हणाले.’’

त्या क्षणापासून आजपर्यंत मी माझ्या नाकावरच्या कांजिणीसह शोभाबरोबर संसार केला, अगदी सुखानं. तीन मुले झाली, तिघांचं शिक्षण व्यवस्थित करून दिलं। संसार मांडून दिले, भरून पावल्यासारखं वाटत होतं. यथावकाश बढत्या वगैरे होऊन बँकेतून निवृत्तही झालो. शेवटच्या दिवशी भाषण करताना सगळेजण प्रयत्नपूर्वक ‘शरद आठवले’ असं म्हणत होते. शेवटी आमच्या सखारामनं न राहवून विचारलं, ‘‘कांजिण्या आठवले साहेबांचं नाव शरद आहे, हे कधी कळलंच नाही!’’ आणि सगळेच मुक्त हसले!

एक छोटासा फोड, फुटकळी.. नाकाच्या शेंडय़ावर ५० वर्षे तिने मला सोबत केली. नुसतीच सोबत केली नाही तर ओळखही दिली. १०० पैकी ९० जण हे सो सो कॅटेगरीतले असतात, म्हणजे ते असून कळत नाहीत आणि नसून फरक पडत नाही. मी पण त्याच वर्गातला होतो, पण माझ्या नाकावरच्या कांजिणीनं मला एक ओळख दिली. आयुष्यातले सगळे चढ-उतार, यश-अपयश मी पचवले या शिल्लक कांजिणीच्या साथीनं.

आणि माझ्या मुलांनी ६१ व्या वाढदिवसाची भेट म्हणून मला दिली प्लॅस्टिक सर्जनची अपॉइंटमेंट! जो काढून टाकणार होता माझ्या नाकावरची कांजिणी, पुसून टाकणार होता माझी ओळख!

माझा होकार, नकार न विचारताच दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांकडे घेऊन गेले. सर्व सोपस्कार होऊन डॉक्टरांनी ऑपरेशन करून ती कांजिणी काढली. त्यानंतर त्यांनी जेव्हा मला आरसा दाखवला, तेव्हा मी दोन मिनिटं डोळे बंद करून घेतले. ५० वर्षे जिची मला सवय झाली होती, ती दिसणार नव्हती. मलाच माझा चेहरा अनोळखी वाटणार होता. आयुष्याच्या या वळणावर मला माझी ही ओळख खरं तर पुसायची नव्हती. माझ्याही नकळत ती कांजिणी माझा, माझ्या अस्तित्वाचा भाग झाली होती. मला तिला माझ्यापासून तोडायचं नव्हतं. मनाचा धीर करून मी डोळे उघडले. ते डबडबलेलेच होते. तशाच ओलसर डोळ्यांनी मी ‘शरद आठवले’चा चेहरा पाहिला. मलाच माझी ओळख पटायला बराच वेळ लागत होता. नकळत माझा हात नाकाकडे गेला!

xxx
माझी ओळख पुसली गेली आणि माझा पुन्हा एक जन्म झाला. आणि हा जो कोणी शरद आठवले आहे, त्याला मी ओळखतच नाही. आता मला प्रश्न पडलाय, तो प्लास्टिक सर्जन म्हणजे काही भैरोबा नव्हता, मग आईनं केलेला नवस फेडावा की फेडू नये?