Thursday, March 25, 2010

सांस्कृतिक कट्टा : मंद सुगंधी फुलोरा..

कित्येक वेळा आपल्याला कविता माहीत असतात, आपण आपल्या परीने त्यांचा अर्थही लावलेला असतो. स्वत:च स्वत:ला ती कविता समजावून सांगितलेली असते. परंतु अचानक एखादे वेळी कोणीतरी आपला हात धरतं आणि त्याच कवितेचा एका नवा चेहरा दाखवतं; तिचं नवं सौंदर्य दृष्टीसमोर उलगडवून अर्थाचे, शब्दांचे नवे पदर दाखवतो. मग आपण स्वत:च स्वत:ला म्हणतो, ‘अरे! हे आधी का दिसलं नाही आपल्याला?

‘चतुरंग’मध्ये गेल्या वर्षी अरुणा ढेरे यांचे ‘कवितेच्या वाटेवर’ हे सदर वाचताना वारंवार हा अनुभव आला. संपताना एक हूरहूर लावून संपलेल्या या सदराचे आता ‘पुस्तकरूप’ आले असून तोच अनुभव वाचकांना आता समग्रपणे घेता येणार आहे. या सदरासाठी केवळ मराठी कवितांच्या प्रांतातच मुशाफिरी करण्याचे बंधन न
स्वीकारता अरुणाताईंनी संस्कृत, इंग्रजी, हिंदी कविता, विविध प्रांतातील लोकगीते अशा विविध माध्यमातून रसिकांना कवितांच्या वाटेवर नेले. ‘पुसी कॅट, पुसी कॅट’ची गंमत सांगतानाच त्या लंडनला जाऊन आलेल्या, राणीच्या सिंहासनाखालच्या उंदराला घाबरवणाऱ्या मांजराची गंमत सांगतात. ‘ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, त्यांच्या सम्राज्ञीच्या सिंहासनाला एक उंदीर खालून कुरतडू शकतो’ अशी मार्मिक टिप्पणीही त्याच वेळी करतात. लाला टांगेवाला आणि लीलाची कविता सांगत अगदी शिशूवर्गाचीही आठवण करून देतात. ‘चाफ्याच्या झाडा’, ‘मधुघट’ आणि ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ या कवितांवरील लेख वाचताना हे सर्व ओळखीचे होते तरी किती अनोळखी होते हे लक्षात येते. असाच एक प्रत्यय ज्ञानेश्वरांच्या ‘विरहणी’ वरचा! ‘घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा। भवतारक वो कान्हा, वेगी भेटवा का। अनेकदा ऐकलेली, वाचलेली ही विराणी, पण अरुणा ढेरेंनी जेव्हा त्यावर लिहिताना त्याला ‘मिनीएचर पेंटिंग’ची उपमा दिली होती तेव्हा मात्र इतके दिवस, वर्षे न दिसलेले मिनीएचर पेंटिंग, ज्ञानेश्वरांचे स्त्री मन, सगळे लख्ख दिसू लागलं. लोकगीतं हा तर या पुस्तकाचा आत्मा म्हणावा लागेल. अनेकवेळा संदर्भासाठी किंवा सहज त्या विषयाच्या वाटेवर जाता जाता अरुणा ढेरेंनी दोन-दोन ओळी लोकगीतांच्या वापरल्या आहेत. मग तुकाराम जिजाबद्दल असो, गंगेची कहाणी असो, सीतेच्या दुसऱ्या वनवासाची कथा असो किंवा सवतीमत्सराची कथा असो. विशेषत: सवतीमत्सराबद्दल बोलताना त्या लिहून गेल्या की, रुक्मिणी-सत्यभामा, रुक्मिणी-जनी- तुळशीच्या निमित्ताने लिहिताना स्त्रियांनी स्वत:च्या दु:खालाच वाचा फोडली आहे. किती वेगळे निरीक्षण आहे हे!

लेखिकेनं लोकगीतांचे संदर्भ घेतानाही भिल्ल लोकगीते ज्यांचा अनुवाद रणधीर खरेंनी केलाय ती किंवा माळवा प्रांतातल्या लोकगीतांचेही उल्लेख केलेत। नवरात्राच्या वेळेस खेळल्या जाणाऱ्या भोंडला, हादगा किंवा विदर्भातल्या
भुलाबाईबद्दल आपल्याला माहिती असते. पण तशाच पद्धतीच्या मध्य प्रदेश, माळवा प्रांतातल्या ‘सांझी’बद्दल त्यांनी ‘सांझी’मध्ये लिहिलं आहे. इंदिरा संतांची ‘कुब्जा’ असो किंव ना. घ. देशपांडेंची ‘अजून’ कविता असो. मुळातूनच त्या कविता सुंदर आहेत; पण अचानक कागदावर जेव्हा त्या भेटतात तेव्हा खरोखरच त्यांना कडकडून मिठी मारावीशी वाटली. मीरेच्या भजनांबद्दल लिहिताना अरुण ढेरेंची त्या भजनांच्या सौंदर्यापेक्षा मीरेतलं सौंदर्य दाखवताना लिहिलं आहे, ‘मीरेने केलेला स्थैर्याचा त्याग हा खरा त्याग! सगळं सुस्थित असूनही अदृश्याच्या मागे
जाणं हे मीरेचं वेगळेपण!’ कवितेबद्दल लिहितानाच त्यांनी कृष्णा जे. कुलकर्णी या अकाली मिटलेल्या कवीबद्दलही लिहिलं आहे.

शाळेच्या दिवसांत किंवा कॉलेजमध्ये सुटलेला कवितेचा हात आपण मध्येच कधीतरी धरतो, मासिकांतून, दिवाळी अंकामधून, पण जेव्हा एखादा मर्मज्ञ मार्गदर्शक आपल्याला त्या प्रदेशातून पुन्हा फिरवून आणतो तेव्हा खरी त्या खजिन्याची ओळख होते. गोडी लागते. कवितांच्या आशयापलीकडचा आशय समजून घेण्यासाठी तरी ‘कवितेच्या वाटेवर’ जायलाच हवे! बहुधा दरम्यानच्या काळात आपल्याही जाणिवा अधिक समृद्ध होतात त्यामुळे हे सदर अधिक भावले असावे. सर्वोत्तम लेख लेखिकेने निरोपासाठी राखून ठेवला होता. हे सदर संपविताना अरुणा ढेरेंनी लिहिलेला ‘निरोप’ हा जसा वाचकांचा होता, तसाच तो कवितेच्या वाटेवरच्या आनंदयात्री सुनीताबाईंसाठीही होता. स्वत: कविता न लिहिताही कविता हा सुनीताबाईंचा श्वास होता आणि कदाचित त्यामुळेच या लेखात कुठेतरी सुनीताबाईंचे अस्तित्वही जाणवून जातं. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूएवढीच त्याला वाहिलेली श्रद्धांजली चटका लावून जाणारी असू शकते हे हा लेख वाचल्यावर प्रकर्षांने जाणवले, आरती प्रभूंच्या या ओळी सुनीताबाईंसाठी आणि त्या सर्वासाठी ज्यांचा ‘निरोप’ घेता येत नाही,

‘अखेरच्या वळणावर यावा, मंद सुगंधी फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे, आणि सरावा प्रवास सारा..’

असे हे पुस्तक ‘मंदी सुगंधी फुलोरा’ फुलविणारे! रविमुकुल यांच्या देखण्या मुखपृष्ठासह.