Tuesday, June 22, 2010

पुस्तकाचा कोपरा : पावसाच्या मैफलीत.. गावझुला

पाऊस जेव्हा संततधार लावून काहीतरी सांगत असतो तेव्हा आपण मूकपणे ते ऐकण्याचे काम करायचे असते. सोबतीला फक्त घ्यायचे असते एक जीवाभावाचे पुस्तक आणि मग ऐटीत जमवायची असते मैफल तिघांची, पुस्तक आपण आणि पाऊस! या अशा मैफिलीसाठी सोबत लागते ती जरा वेगळ्या पुस्तकांची, म्हणजे जीवनानुभव सांगणारे लघुनिबंध, कविता तत्सम पुस्तकांची. कारण एका पानावरून दुसऱ्या पानाकडे वळताना क्षणभर आपल्याला एका सरीवरून दुसऱ्या सरीकडे जाणाऱ्या पावसालाही सोबत करायची असते. श्याम पेठकरांचे ‘गावझुला’ हे पुस्तक अशी मैफल जमण्याची खात्री देणारे पुस्तक आहे.

साप्ताहिक ‘लोकप्रभा’मधल्या सदराचे हे पुस्तकरुप. त्यातील लेख हे सारे आहेत ललितबंध. (या ललित निबंधासाठी लेखकानेच ललीतबंध हा सुंदर शब्द वापरलेला आहे) कधीकधी पूर्ण पुस्तक सलगपणे वाचायला वेळही नसतो आणि इच्छाही. कुठलेही पान काढून स्वत:ला त्या पानांमध्ये बुडवायचे असते. ‘गावझुला’ ती गरज पूर्ण करतं. हे पुस्तक, यातले ललितबंध हे मुळीच हलकेफुलके, वाऱ्याच्या झुळकीसारखे उडून जाणारे नाहीत. ते वाचून विरून जात नाहीत, ते उद्युक्त करतात याचा विचार करायला. किंबहुना गोष्टींचा सुसंगतपणे विचार करायला भाग पाडतात. गावागावातून प्रवास करणाऱ्या बैराग्याचे अनुभव हे फक्त त्याचेच राहात नाहीत ते वैश्विक होऊन जातात. कित्येकवेळा लेखकाने बैराग्याच्यामाध्यमातून रुपककथाही मांडल्या आहेत. इतिहास, पुराणकथांचाही सर्वसामान्यांच्या नजरेतून दिसणारा आकृतीबंध मांडून मग वाचकांनाच पेचात टाकले आहे, वेगळा विचार करण्यास भाग पाडले आहे। नावावरून जाणवतं तसं यात गाव आहे किंवा असंही म्हणात येईल की अनेक गावे आहेत.

वाचताना अनेकवेळा प्रश्नही पडून जातो; बैराग्याचा हा प्रवास दोन गावांमधला आहे की, दोन मनांमधला? ‘पावलं नेहमीच प्रश्नात अडकलेली असतात, म्हणून त्यांचा आकार प्रश्नचिन्हासारखा असतो’ हे अफलातून निरीक्षण. किंवा ‘सुरक्षेच्या परिघातले जगणे म्हणजे स्वातंत्र्य समजतो आपण किंवा ‘या जगातली सगळीच नाती शरीरसंबंधातून किंवा शरीरसंबंधांसाठी निर्माण झालेली असतात. मित्र हे एकमेव मनाचं मनाशी असलेलं नातं आहे,’ ही वाक्ये फक्त पुस्तकातली राहात नाहीत, ती मनाचा ठाव घेऊन आत आत रुंजी घालत राहातात. त्यांना प्रतिभेचा स्पर्श आहे. यासारखी अनेक वाक्ये, अनेक विचार या पुस्तकात भेटतात, पण तरीही जाणवतं की हे पुस्तक आडवळणाने जरासे अध्यात्माच्या वाटेकडे जाणारे आहे. हे पुस्तक पूर्णपणे वैचारिकही म्हणता येत नाही आणि पूर्णपणे तत्वज्ञानात्मकही म्हणता येत नाही.

प्रत्येकाला ते वेगळं भासू शकतं. कोणाला ते जडही वाटू शकतं तर कोणाला ते आत्मसंवादाचे माध्यम वाटू शकतं. वस्तुत: यातल्या सगळ्या लेखांना ललितबंध असं नाव दिलेलं आहे. ललितलेख हे सहज-सरळ दीर्घ रस्त्यासारखे असतात, त्यात एखाद-दुसरं वळण असू शकतं आणि ते आजुबाजूच्या सर्वाचा, निसर्गाचा हात हातात घेऊन चालतात. या पुस्तकातले लेख हे मात्र सरळ रस्त्यासारखे नाहीत ते आहेत घाटातल्या वळणावळणाच्या रस्त्यांसारखे. काहींना त्यात रोमांचक अनुभव येतील तर काहींना शांतपणे डोळे मिटून हा प्रवास करावासा वाटेल.

लेखकाच्या अनुभवाच्या मर्यादांची कुंपणे अशा लेखांना आपसूकच पडतात, तशीच विषयांचीही. अनेकवेळा लेखांमधला शाब्दिक फुलोरा बाजूला सारला तर तेच ते परत वाचल्यासारखे वाटते. त्याचे कारण हेच असावे. विदर्भातले असल्यामुळे नकळत काही लोभस वैदर्भीय शब्द येऊन जातात, ते मात्र घाटात अचानक पिसारा फुलवून सामोऱ्या येणाऱ्या मोरासारखे मोहक वाटतात. ग्रामीण भागाचे झपाटय़ाने शहरीकरण होते आहे. शहरीकरणाच्या या प्रक्रियेत ‘गावातील’ अनेक गोष्टी गडप होताना दिसतात. जगण्याची निवांत लय. समाजाकडे पाहण्याचा एक निरागस दृष्टिकोन, हिरव्या निसर्गाची बदलती रुपे आणि त्या बदलत्या रुपाशी जडणारे नाते, गावरहाटीचा भाग असलेले अनेक घटक हळूहळू ‘विस्मरणा’च्या तिजोरीत बंद होत आहेत। अशावेळी ‘गावझुल्या’वर बसून निवांत झोके घ्यावेत. हरवत चाललेल्या गोष्टींविषयीची ही खंत भाबडेपणाची असली तरी
त्याचे शब्दवेल्हाळ रुप वाचकांना धरून ठेवते.