Sunday, September 25, 2016

आणि कपाट हसलं......

कपाट उघडल्याबरोबर कपडे खाली पडले की समजायचं कपाट लावण्याची वेळ आली आहे, मग काही दिवस चालढकल करून शेवटी तो दिवस उजाडतोच. आणि मग सगळ्या कपड्यांचा एका ढिगाऱ्यात आपण बसलेलो असतो. सारे आजू बाजूला पडलेले, कुर्ते, पंजाबी ड्रेसेस, जीन्स, लेगीन्स, स्कर्टस, नशिबानं साड्या वेगळ्या ठेवलेल्या असतात त्यामुळे त्या या सगळ्या गोंधळापासून दूर दुसऱ्या गोंधळात विसावलेल्या  असतात. जेव्हा आपण त्या कपड्यांच्या समुद्रात हरवलेले असतो, त्यावेळी अनेक नवीन नवीन शोध लागत असतात.

खरं तर कपडे ही माणसाची प्राथमिक गरज, पण आता कपडे, अन्नापेक्षाही स्वस्त झाल्यामुळे घरटी कपड्यांची दुकानं निघाली आहेत. पूर्वी कारणासाठी, सणावारी होणारी खरेदी आता सेल साठी, डिस्काऊंटसाठी होत असते. मग आपल्याला हवंय का पेक्षाही आत्ता मिळतंय, स्वस्त आहे, अगं ऑफर होती, परत परत काय अशी ऑफर नाही मिळणार , सणाला , वाढदिवसाला नवीन कपडे पाहिजेतच ना, एक कारणं, पण या कारणांची फळ निष्पत्ती म्हणजे कपाटात भर पडलेले नवीन कपडे. बर परत लग्न कार्य, भेटवस्तू म्हणून मिळालेलं कपड्यांचं वाण वेगळंच. आजकाल आहेर नसला तरी चालेल पण परतीचा आहेर झालाच पाहिजे, त्यामुळे अशा रिटर्न गिफ्ट मध्ये मिळालेले कपडे देखील बऱ्याच वेळा रीरिटर्न करायचेच असतात.

कपड्यांच्या त्या डोंगरातच अनेक दिवस सापडत नसलेलं कपडे सापडतात. आणि मग घडी घालता घालता आपण त्या कपड्यांच्या आठवणीत हरवून जात असतो. असं वाटत असतं जणू आपण आठवणींच्या प्रवासालाच निघालो आहोत. एक हिरव्या रंगाचा कुर्ता पहिल्या पगारातून दादानी आणलेला, आता थोडा विरलाय पण तरीही टाकवत नाही, अरे तो जांभळा बांधणीचा पंजाबी ड्रेस रूममेटच्या आईनी खास दिलेला, तिच्या आळशी मुलीला वर्षभर सांभाळले म्हणून, पांढऱ्या रंगाचा दोन तीन कुर्ते चुरगळलेले होते एका कोपऱ्यात, एकेका वेळेला आपल्याला वेड लागायचे एकेका रंगाचे, आणि मग आपण त्याच रंगाचे कपडे विकत घायायला सुरु करायचो,  सध्या जसं सध्या हिरव्या रंगाचं झालं आहे, त्याआधी निळा, त्याआधी किरमिजी, काळा असे किती तरी रंग आयुष्यात येऊन गेले होते. मग त्या रंगवेडाच्या वेळी घेतलेले एकाच रंगाचे पण वेगळ्या रंगछटांचे कुर्ते, मग त्याच कपड्यांच्या धबडग्यात तिनी त्यांची अजून काही बहिण भावंड शोधली, आणि सारी रंगावली एका बाजूला ठेवली. मग त्यातल्या प्रत्येकाच्या खरेदीच्या जन्माच्या आठवणींनी हसता हसता पुरेवाट झाली, एक कुठे अगदी फुटपाथवर घेतलेला, तर दुसरा फॅब इंडिया च्या वातानुकुलीत ठिकाणी घेतलेला, काही परदेशात घेतलेले तर काही घराजवळच्या छोटाशा दुकानात, पण बिचारे सगळे कपाटात शेजारी शेजारी सुखानं नांदत होते.

मग घड्या करत असताना एकदम घबाड लागल्यासारखं अगदी जुने कॉलेज मध्ये घालत असलेले काही कपडे मिळाले, आणि ती  तशीच उठून ते मापाला लावायला लागली, काही येत होते, काही वयाबरोबर अंगही सोडून गेले होते, मग न येणाऱ्या कपड्यांचा एक वेगळा कप्पा करायला सुरु केला.  एक भडक लाल रंगाचा आरसे लावलेला एक पंजाबी ड्रेस त्यानी अगदी प्रेमानी आणला होता, पण त्याच दिवशी त्यांचं काही तरी भांडण झालं होतं, त्यामुळे तो ड्रेस तिनी अंगाला देखील लावला नव्हता, आज तो ड्रेस हातात घेतल्यावर तिला त्यातली उब जाणवत होती. अशी अंगाची उब न लागलेलं कपड्डे तिनी पहिले वापरायचे ठरवलं. डोळ्यासमोर असणारे कपडे सारखेच वापरले जात होते, आणि मागे पडलेले कपडे, विस्मृतीत गेलेल्या लोकांसारखे मागेच पडत होते, त्या स्मृती परत जागवायच्या ठरवल्या. आयुष्य आणि कपडे असे हातात हात घालूनच जगतात, किमान माणसांच्या बाबतीत तरी.

एक जुना पिवळ्या रंगाचा ड्रेस पाहून तिला आठवलं, ह्या महागड्या ड्रेस वरून आईशी भांडण केलं होतं, कारण त्याच्या दोन दिवस आधीच एक ड्रेस घेतला होता, आणि आईचं म्हणणं होतं, असे सारखे सारखे पैसे कपड्यांवर काय उधळतेस, त्यावर माझे पैसे आहेत, मला करू देत ना हवे तसे खर्च म्हणत ती धुमसतच होती, आणि मग आईचा अबोला, मग माफीनामा, तिला खरंच वाटलं, तेव्हा तो ड्रेस खरच त्या मानाने महागच होता, आई म्हणाली, ते खरंही होतं, पण आई वडिलांचं म्हणणं पटायला कधी कधी वर्ष जाऊ द्यावी लागतात. मग एकदा अगदी शोधून शोधून घेतलेला चटणी रंगाचा चिकनचा ड्रेस, आणि मग त्याच प्रकारचे वेगवेगळे रंग गोळा करायचा जणू छंदच लागला होता, ते सारे लखनवी ड्रेस, कुर्ते एकत्र ठेवता ठेवता १० पेक्षा जास्त रंग आपल्या जवळ जमा झालेत, आणि आता पुढचे कोणते घेता येतील याचाच विचार मनात सुरु झाला होता.
आत्ता येणारे कपडे, आपले आवडते कपडे, घालता न येणारे पण तरीही आठवणी जपणारे कपडे, कडवट आठवणींचा माग ठेवणारे कपडे, जुने अंगाला न येणारे पण चांगले कपडे, खास प्रसंगांचे कपडे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कपडे नीट घड्या घालून झाल्यावर, कामवालीला द्यायचे कपडे वेगळे वेगळे काढता काढता, तिनी त्यात एक दोन चांगले कपडे देखील घातले, कायम थोडेसे, उसवलेले, फाटलेले, विरलेले कपडे द्यायचे आणि दान केल्याचा आव आणण्यापेक्षा यावेळी चांगले, नवीन कपडे देऊन तिच्याही चेहऱ्यावर हसू फुलवूयात असं तिला वाटलं. आणि मग तिनी फाटलेले, विरलेले कपडे वेगळेच ठेवले, यावेळी ते कोणाला देण्याऐवजी त्याची दुसरी काही तरी सोय लावावी, आणि काही तरी वेगळ्या आठवणी तयार कराव्यात दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात असं तिला प्रकर्षानं जाणवलं.

जेव्हा कपाटात सारे घालत्या येण्याजोगे कपडे लावून झाले, आठवणींचे कपडे वेगळे काढून झाले, द्यायचे कपडे वेगळे ठेवून झाले, तरी सुद्धा कपाट भरून कपडे दिसत होते, अगदी लिंबू रंगाचा, फिरोझी रंगाचा, जो एके काळी तिचा जीव की प्राण होता त्या रंगाचा एकही कुर्ता, ड्रेस नसला तरी तिला तो खरेदी करावा असं त्या क्षणी तरी वाटत नव्हतं, स्वस्त आहे, घेऊ शकतंय म्हणून काही घेण्यापेक्षा आपण खरच आपल्याला गरज आहे का बघून घेतलं तर आपलेच प्रश्न किती सोपे होतील, किमान हे कपड्यांचे कपाट लावणं म्हणजे मोठ्ठा पेचप्रसंग सोडवणं वाटणार नाही असा स्वतःलाच बजावत तिनी मोठा निःश्वास सोडला.


कपडे शरीर रक्षण करतात, कपड्यांनीच चारित्र्य ठरतं, कपड्यांनीच रामायण , महाभारत घडतं, काळ बदलला तसे कपडेही बदलले, कपड्यांची लांबी रुंदी ,नक्षी, पोत बदलले, नवीन नवीन जे काही येऊ शकत होत ते सगळं कपड्यांच्या दुनियेत येतच असतं, आणि त्या सृष्टीचा पसाऱ्यातला एक छोटासा भाग असतो प्रत्येकाच्या कपाटात! कपडे येतात, जातात, वापरलेले कपडे, न वापरलेले कपडे, आवडते कपडे, नावडते कपडे, खास कपडे, कंटाळा आलेले कपडे, आठवणींचे कपडे, विरलेले कपडे जग कपड्यात लपेटून गेलेलं असतं तरी कपड्यांचं कपाट उघडल्या बरोबर आज काय घालावं? माझ्याकडे आज घालायला काहीच नाही ? हा प्रश्न मात्र आदिकाळापासून तसाच राहिलेला आहे!!!!!!!   

Thursday, September 22, 2016

आई गं ची जागा...


एका भारतीय पद्धतीचे पुरुषांचे कपडे बनवणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत बाप आणि मुलगा दाखवले होते. स्वातंत्रदिनासाठी मुलाला झब्बा घालायचा होता, आई कुठेतरी दुसरीकडे गेली होती, अशी काहीशी जाहिरात होती ती. मुळात पुरुषांसाठीच्या कपड्यांच्या जाहिराती मध्ये बाईचे नसणं हाच एक सुखद धक्का होता, त्यात वडील मुलाची काळजी घेत आहेत हे पाहणं म्हणजे सोनेपे सुहागा होतं. जाहिराती ह्या समाजमनाचा आरसा समजल्या जातात. त्यामुळे आईच्या अनुपस्थितीत मुलाला सांभाळणारे, त्याला तयार करून देणारे बाबा आजूबाजूला वाढले असणार अशी एक खात्री झाली.

मुलांचे संगोपन ही जणू निसर्गानेच मादी जमातीवर सोपवलेली जबाबदारी आहे असं फक्त मनुष्य प्राण्यातच नव्हे इतर प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये देखील समजलं जातं.  अर्थात नियमाला अपवाद असतात तसेच पेंग्विन, rhea प्रकारचे शहामृग, समुद्री घोडे, काही प्रकारचे मासे, बेडूक, असे काही बाबा लोक आहेत जे मुलांचे संगोपन करतात, यातले काही जण तर चक्क पिल्लांची अंडी त्यांच्या, पोटात, तोंडात, अंगावर ठेवतात. हे सारे जणू अपवादाने नियम सिद्ध होतो अशा पंथातले. पण मनुष्य प्राण्यांमध्ये हे चित्र थोडे थोडं बदलताना दिसतंय. म्हणून तर सरकारी नोकरीतल्या कर्मचाऱ्यांना १५ दिवसाची पितृत्व रजा मिळते जी बाळहोण्याआधी पासून ते  झाल्यापासून सहा महिन्यापर्यंत कधीही घेता येते. सरकरी तजवीज झाली, पण या सोयीचा उपयोग किती बाबांनी खरोखरीच मुलांच्या गरजेसाठी करून घेतला हा ही एक संशोधनाचा विषय आहे.

पुरुषाने घराबाहेर ची कामं करायची, आणि बाईनी घराच्या चार भिंतींच्या आतली, हा समज आता बर्यापैकी मोडीत निघतोय, त्यामुळे चित्रपटातही घरबशा  नवरा, आणि नोकरी करणारी बायको असं बघायला मिळतंय. तसंच शहरांमध्ये कित्येक हॉस्पिटलमध्ये आता आईच्या शेजारी उभं राहून बाळांना नॅपी घालणारे, त्यांचे कपडे बदलणारे बाबा दिसायला लागलेत. हे चित्र अगदी प्रातिनिधीक नसलं तरी मनोवृत्तीतला बदल टिपणार नक्की आहे. मुलांसोबत डॉक्टर कडे जाणारे बाबा देखील आता नवीन राहिले नाहीत. पाश्चात्य देशांमधल्या काही चांगल्या गोष्टी आपल्याकडे रुजतात आहेत. आई वडील दोघांनी अगदी समसमान जबाबदारी नाही पण जबाबदारी वाटून घेतली जात आहे.

अगदी तान्हं मुल असो वा शाळा, कॉलेज मध्ये जाणारी मुलं त्यांच्या परीक्षा, आजारपण यावेळी आईची हमखास सुट्टी पडते, किंबहुना ती आईनीच घेतली पाहिजे असा मानसिक, सामाजिक दबाव स्त्रियांवर असतो. चुकून एखाद्या पुरुषाने अशी रजा घेतली तर त्याच्या बायकोला मुलांकडे दुर्लक्ष करते असं ऐकावं लागतं. खरं पाहिलं तर मुलांचे संगोपन ही आई वडील दोघांची जबाबदारी असते, त्यामुळे मुलांच्या प्रत्येक गरजेच्या वेळी आईनीच घरी थांबलं पाहिजे असं नसतं. खास करून नोकरी करणाऱ्या आयांमध्ये तर हा खूप मोठा गंड असतो, जणू आपण नोकरी करतो त्यामुळेच मुलं आजारी पडतात, किंवा त्यांच्या शाळा, त्यांच्या शाळाबाह्य गोष्टी जपणं, जोपासणं ही जणू फक्त आईचीच जबाबदारी असते. नोकरी न करणाऱ्या ऐअला तर बिचारीला कोणतीच सबब नसते. घरातल्या बाकीच्या साऱ्यांचे करायचे, आजारी मुलाबरोबरच, दुसरं मूल असेल तर त्याला बघायचं, अशा वेळी खरंच जोडीदाराकडून मदतीची अपेक्षा असते. कधी कधी अशा वेळी मनात विचार देखील येतो, मुलाच्या जन्माचे कारण झालं की पुरुष मोकळेच असतात. मुलाला नाव वडिलांचं लागतं, नावं ठेवताना मात्र आईचे नाव पुढे येते.

परदेशात पितृत्वाची राजा ही हक्काची मानली जाते, कारण तिथं आपल्यासारखी बळकट कुटुंबव्यवस्था किंवा समाजसंस्था नाही. त्यामुळे ओघानं वडिलांवर देखील बाळाची जबाबदारी येते. स्वीडन मधेय ही पितृत्व राजा सुरु केल्यापासून घटस्फोटाच प्रमाण कमी झालं, यावरून तिथल्या समाजरचनेचा अंदाज येऊ शकतो. आपल्या देशात स्त्रियांसाठी १२ आठवड्याची मातृत्व रजा असते, मात्र सरकारी कर्मचारी वगळता खाजगी कंपन्यांमध्ये पितृत्व रजेची तरतूद फारशी आढळत नाही, आणि याचं एक कारण म्हणजे आपली मानसिकता! पुरुषांनी घराची कामं, स्वैपाक (हॉटेल मध्ये पुरुष आचारी चालतो मात्र घरात नाही ), मुलांचे संगोपन करणं या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक बघितलं जात नाही, आणि कित्येक पुरुषांनाही ह्या सगळ्या गोष्टी करताना कमीपणा वाटतो. जेव्हा आपण कारण ठरलेल्या जीवाची जबाबदारी घेणं म्हणजे फक्त त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करणं इतकाच नसतं हे समाजात मान्य होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आई बाबा दोघंही मुलांच्या जडण घडणीला हातभार लावतील. पुरुषांना या गोष्टी जमणारच नाहीत, त्यांना आवडत नाहीत, ही त्यांची कामं नाहीत हे असे सगळे समाज पुसले जातील तेव्हा कदाचित मातृत्व रजा सारखी पितृत्व रजेची गरज भासेल, कोणी सांगाव त्यासाठी एखादं आंदोलनही भविष्यात उभं राहू शकतं.   

एखादा नवीन बाबा हौसेनं मुलाचं काही करायला घेतो तेव्हा त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया येते ती त्याच्या आईकडून, कधी त्यात कौतुक असतं, तर कधी असूया! आताच्या पेरेंटिंगच्या क्लास ला जाणाऱ्या, जग निम्मं फिरलेल्या, किंवा बघितलेल्या बाबा लोकांना देखील मुलाची दुपटी बदलावीशी वाटतात, आपल्यामुळे या जगात आलेल्या जीवाला अंगा खांद्यावर खेळवता खेळवता खायला प्यायला घालावंसं वाटतं. आणि जेव्हा खरंच असं घडतं तेव्हा नकळत स्पर्शातून बाळापर्यंत ते प्रेम पोहोचत असतं. आणि असं जेव्हा सगळीकडे व्हायला लागेल, प्रत्येक बाबा रजा मिळू, ना मिळू, पण वेळ काढून मुलांना वेळ देईल तेव्हा काहीही लागलं, दुखलं खुपलं तर सहज तोंडातून बाहेर पडणारं ‘आई ग’ ची जागा ‘ए/ओ बाबा’ घ्यायला वेळ लागणार नाही.

Monday, September 19, 2016

ओळखीचं अनोळखीपण

ते गाव सोडूनच आता कित्येक वर्ष झाली होती, आयुष्यातली सर्वात सुंदर १०, १२ वर्ष त्या गावात घातली होती. स्वतःचे घर ही केलं होतं, अगदी छानसा छोटासा बंगला, मग काय आमची शिक्षणं, नोकरी, लग्न यानंतर त्या गावातलं वास्तव्य कमी कमी होत गेलं, मग कधीतरी ते घरच विकायचा निर्णय घेतला. तसा तो निर्णय कोणालाच फारसा पटला नव्हता, पण दुसरा उपायही नव्हता. तिनी आणि तिच्या बहिणींनी एक जग तयार केलं होतं त्या गावात, घरात. बांच्या फिरत्या नोकरीमुळे कुठे एका गावात राहता येईल असं वाटलंच नव्हतं. पण या गावात ते काही काळासाठी का होईना पण स्थिरावले. बदली झाली पण जवळपासच्याच गावांमध्येच झाली. प्रवासाची दगदग सोसली, पण गाव बदलावसा नाही वाटलं. एक प्रकारचा आराम, निवांत आपलेकपणा होता गावात. म्हणलं तर शहर म्हणलं तर गाव असं काहीसं आडनिड होतं ते. तसंच काहीसं लोकांबाबत सगळेच चांगले होते असे नाही, पण उडदामाजी काळे गोरे सारखे चालवून गेले, कोनाताय्ही नातेवाईकाशिवाय १०, १२ वर्ष सगळं निभावून गेलं. काही जवळचे ऋणानुबंध जुळले, काही नवीन अनुभव आले, बरंच काही शिकायला मिळालं, त्यामुळं गाव सोडताना कोणीच खुश नव्हतं.

१२ वी नंतर ताई लांब दुसऱ्या कॉलेजात गेली, मग वर्षभरात तिची १० वी झाल्यावर सगळाच गाशा गुंडाळून सगळेच दुसऱ्या गावाला गेले होते. आज इतक्या वर्षांनी देखील तिला त्या गावाबद्दल तेवढेच प्रेम होतं. त्याच गावात ती पहिल्यांदा सायकल सायकल होती, त्याच गावात पहिल्यांदा न्हाण आलं होतं, त्याच गावात स्वैपाक करायला शिकली होती, घट्ट मैत्रिणी जमवायला सुरुवात तिथेच झाली होती, आई बाबांशी वाद घालायला त्याच गावातून सुरु केलं होतं, शिकणं फक्त पुस्तकात नसतं तिथेच कळल होतं, अठरापगड जाती, त्यांचे सामाजिक जीवन प्रत्यक्ष बघायला मिळत होतं. शिक्षक हे शाळेच्या वेळेपुरते मर्यादित नसतात हे प्रत्यक्ष अनुभव होती. घरात केलेलं काहीही हे फक्त घरापुरत नसतं, ते शेजार पाजारच्या ओळखीच्या पाळखीच्या साऱ्यांमध्ये वाटायचं असतं. घरात काही नसलं तर खालच्या मानेनं नव्हे तर हक्कानं शेजारी मागायचं असतं, एक ना अनेक किती गोष्टी ती अनुभव होती, शिकत होती. त्यामुळे एकदम गाव बदललं तरी गावात शिकलेल्या गोष्टी विसरल्या गेल्या नव्हत्या, गावातून थेट आजी आजोबांच्या घरी जाण्याचा एक वेगळा आनंद होता. बाबा तर म्हणाले पण सगळं फिरून शेवटी इथंच आलो. बालपण गेलं त्या घरात परत राहायला जायचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे तर तिला तिचं बालपण गेलेल्या घराची अजूनच आठवण यायची. लहानपणी कधी तरी ती म्हणायची, आपण नं उडतं घर बनवलं पाहिजे म्हणजे आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे हे घर पण नेता नेईल.

प्रत्येक गावाची एक संस्कृती असते, तुमच्याही कळत नकळत तुम्ही त्याचा भाग बनत असता, तुम्ही ते गाव सोडा, नका सोडू पण ती संस्कृती कुठे तरी आत मध्ये टिकून असते. त्या गावाचं नाव काढलं तरी पुढचे कित्येक वर्ष तिच्या डोळ्यातून पाणी टिपकायच. त्या गावातला अल्लडपणा, बालीशपणा जणू तिनी त्या गावच्या वेशीतच ठेवला होता. गाव सोडलं आणि ती ही बदलली होती. लग्नानंतर तर देशच बदलला, त्यामुळे आसव गाळायला अजून कारण मिळाली होती, कधी तरी त्या गावात, देशात रुळून गेली, आपल्या माणसांची आठवण काढणं सवयीचं झालं, वर्षाकाठी एक मायदेशी ट्रीप काढून काही आठवड्यात कौटुंबिक, मैत्रीक नाती जोपासून परत जाताना पुढचे काही दिवस सगळ्यांनाच अवघड जायचे. परदेशातही काही गावं बदलून झाली, घरं तर इतकी बदलली की नंतर घरामध्ये जीव अडकवायचीच भीती वाटायची, असं वाटायचं, आपण घर सोडताना आपल्या आयुष्याचा एक भागच जणू तिथं सोडून जातोय असं वाटायचं. आपण म्हणजे आपण आज असतो तेवढेच नसतो ना, जिथं राहतो, ज्या लोकांबरोबर राहतो, वाढतो, चुकतो, शिकतो, ते सगळं असतं ना. एका दिवसाची गोष्ट नसते ही काही, त्यामुळेच जुन्या दिवसांची किंमत जास्त असते, प्रत्येक गावात घरात आपण आपल्या आयुष्याच्या काही सावल्या सोडलेल्या असतात. मग या गावाला, घराला विसरून कसं चालेल, तिथं विसरलेल्या सावल्यांना भेटलंच पाहिजे ना.  तिला परत त्या आयुष्यात जावसं वाटलं. 

मग एका भारतातल्या भेटीत तिनी मनाचा हिय्या केला आणि गावाला जाऊन घर बघायचं ठरवलं. खरतर असं कित्येक दिवसांत एकटीनं प्रवास केलेलाच तिला आठवत नव्हता. सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता तिनं एकटीनच जायचं ठरवलं होतं. खरंतर ते गाव माहेरच्या गावापासून जेमतेम ४ तासाच्या अंतरावर पण तरीही ते ४ तासांचे अंतर  कापायला तिला जवळ जवळ २० वर्ष लागली होती. आपण आपलं घर बघून येऊया ह्या विचारानं मनाचा ताबा घेतल्यापासून ती जणू झपाटूनच गेली होती, तिला या भारताच्या भेटीत ही बालपणाची भेट घ्यायचीच होती.
अगदी ठरवून तिनी कार नाकारली होती, जणू तिला तो सगळा काळ परत अनुभवायचा होता म्हणून तिला राज्य परिवहन मंडळाच्या गाडीतूनच जायचं होतं. लहानपण अनुभवायचा एक मार्ग असतो, तेव्हा जे जे केलं ते ते परत कोणाच्याही भितीशिवाय करणं. ती जेव्हा त्या बस मध्ये बसली तेव्हा तिला ती पिचकाऱ्यांनी रंगलेली, सीटमधला स्पंज बाहेर येणारी, खिडक्या अर्धवट उघडणारी गच्च भरलेली बस सुद्धा आरामदायक वाटायला लागली, तेव्हा तिला खरंच मधली वर्ष गळून पडल्यासारखी वाटली. अगदी सहजतेनं ती शेजारच्या आजीशी गप्पा मारायला लागली, थोडं सरकून घ्या म्हणत तिघांच्या जागेवर त्या तीन बायका आणि एक मुलगा असे साडे तीन जण आरामात सुखानी बसले होते. बाहेरचं काही खायचा मोह तिनी टाळला पण घरून आणलेलं डब्यातलं खाताना तिला पिक्चर ला सुद्धा डबा बांधून देणाऱ्या मैत्रिणीच्या आईची आठवण आली. सारंच काही बदललं होतं, रस्ते, रस्त्यावरची गावं, लोकं ही थोड्याफार प्रमाणात बदलले होतेच. ४० रुपयाच तिकीट १३० रुपये झालं होतं, पण तेव्हा जशी लोकं किती महाग आहे म्हणायचे तसंच आजही म्हणत होते. मोबाईलमुळे जगभर संवाद होत होता पण शेजारच्या माणसाकडे बघायला वेळ नव्हता. तिचीच माणसं ती जणू पुन्हा नव्यानं पाहत होती.

गावात उतरल्यावर कोणतीही ओळखीची खुण सापडेना तेव्हा तिला क्षणभर आपण एकटीनं येऊन चूक केली की काय वाटायला लागलं. पण वेड अंगावर स्वार असलं तर शरीर मन क्षमतेपेक्षा जास्त कामं पार पाडून दाखवतात. बस स्थानकापासून थोडं लांबच होतं त्याचं घर, गुगल वर तसा तिनी रस्ता सारं पाहून ठेवलं होतं. त्यावेळी गावाबाहेर असणारं त्याचं घर आता गावाच्या हद्दीत काय मध्यवर्ती वस्तीत आलं होतं. रिक्षानीच जावं म्हणत तिनी चेहेऱ्यावरचा गोंधळलेला भाव जरा पुसला, आणि चक्क एका रिक्षावाल्याशी भाव करत मी काही नवीन नाही हे दाखवून दिलं, तिच्याच वयाचा होता अतो रिक्षावाला, कोण जाणे कदाचित आपलाच एखादा वर्गमित्र असायचा, उगाच तिला योगायोगांचे योग यावेत वाटायला लागलं, इमारती उंच होत होत्या, मोठी मोठी दुकान येत होती, आणि जुनं गाव हरवत होतं. रस्त्यावरच्या एक दोन खुणा सोडल्या तर सारंच काही वेगळ होतं. तिला रिक्षावाल्याशी स्नावाद साधायचा मोह होत होता, कधी काही काही मोहांना शरण जाणं चांगल असतं, त्यामुळ तिलाही कळलं नाही कधी तिनी गप्पा मारायला सुरुवात केली. पूर्वी शहर म्हणाल्यावर एक अन्तर जाणवायचं, आणि गाव म्हणाल्यावर एक आपुलकी, आता प्रत्येक गावाला शहर बनायची घाई झालेली असल्यामुळं प्रत्येक जण जगायचं सोडून पळायचं शिकलाय. जेव्हा ती पत्त्यापाशी आली तेव्हा आळीतली दोन चार घर सोडली तर साऱ्या इमारतीच दिसत होत्या. त्या रिक्षावाल्याला तिथेच ५ मिनिटं थांबायला सांगून ती त्यांच्या घरापाशी गेली. साधं चार खोल्यांचं, आजूबाजूला बाग असलेलं घर त्याचं आता चांगल दुमजली झालं होतं, काळाबरोबर झाडही हरवली होती, इंच न इंच सिमेंट चं साम्राज्य दिसत होतं. एकदा आत जाऊन बघावं का? परत एकदा झालेल्या मोहावर विजय मिळवणं अशक्य आहे कळल्यावर तिनी बेधडकपणे दारात जाऊन आल्याची वर्दी दिली. खिडकीतून डोकावणाऱ्या आवाजाला सांगितलं, जरा दोन मिनिटं दरवाजा उघडता का, पूर्वी आम्ही इथं राहायचो, म्हणून खास घर बघायला आले मी. थांबा जरा, मग तो खिडकीतला आवाज आत जाऊन कोणाला काही तरी विचारून आला, दरवाजा जरा किलकिला झाला, परत एक प्रश्नतपासणी झाली, आणि मगच ती आत गेली, त्यांनी ज्यांना घर विकलं होतं, त्या लोकांकडून या लोकांनी १० वर्षापूर्वी घर विकत घेतलं होतं, त्यामुळे त्यांना ही जरा आगाव आगंतुकच वाटत होती. आपलच घर दुसऱ्या लोकांनी सजवल्यावर किती अपरिचित भासतं. पूर्वी फक्त रात्री बंद होणारी दारं आणि आताच्या दिवस रात्र बंद असणाऱ्या खिडक्या तिला आयुष्याचं प्रतिक वाटत होत्या. त्या अनोळखी माणसांच्यामध्ये सुद्धा तिला तिचं बालपण, तिच्या आठवणी साऱ्या दिसत होत्या, स्वतःलाच ती पुन्हा नव्यानं भेटत होती. निघताना तिचे डोळे परत भरून आले होते. ती रिक्षात बसता बसता, त्या घरात राहणारी मुलगी आली आणि शांत घर परत गजबजून गेलं होत जसं ती असताना व्हायचं तसंच.

परतीच्या प्रवासात डोळे बंद करून ती आठवत होती, विसरलेल्या आठवणी, शाळेचा गृहपाठ, फुलांच्या वेण्या, टिपऱ्या, लगोरीचा खेळ, शेजारच्या काकूंची घरून येणारी अळू वडी, आळीतला भोंडला, गणपतीमध्ये पहिल्यांदा केलेलं नाटकात काम, शेजारच्या ताईचा तिच्या मित्राला हळूच पोहोचवलेला निरोप, दिवाळीला केलेला मोठा किल्ला, नरकचतुर्दशीला पहिल्यांदा फटके फोडायची स्पर्धा, मागच्या घरातल्या काकांनी अंगचटीला यायचा केलेला प्रयत्न, त्यानंतर त्या घरी कधी गेलीच नाही ती. सायकल शिकताना फुटलेले गुडघे, दोन वेण्यांमध्ये दोन गजरे माळायचा वेड्चापपणा, चोरून आई काकूंच्या गप्पा ऐकून त्याचं केलेलं गॉसिप, भारत पाकिस्तान च्या सामन्याच्या वेळी केलेला कल्ला. आपणच जगलेलं आयुष्य ती परत एकदा जागून घेत होती, स्वतःच स्वतःला भेटत होती, गावामधली ती आणि आता जग फिरलेली ती या प्रवासातून आयुष्याचा एक सांधा जोडू पाहत होत्या. निसटलेलं निरागसपण मिळवू पाहत होती. विसरलेल्या सावल्यांना परत भेटत ती चालत होती.  इतके दिवस आरशात बघताना जाणवणारं एक अनोळखीपण पुसू पाहत होती!!!   

Thursday, September 15, 2016

माहेरीचा भोपळा मज कलिंगड भासे



लग्न झाल्यावर मुलगी फक्त घर बदलत नाही, तर तिचं नाव, कधी कधी शहर , देश सुद्धा, नोकरी, सवयी थोडक्यात काय तर स्वतःचे आयुष्य बदलवून टाकत असतात. वर्षानुवर्षे जे नाव लावत आलो, ते सोडायचे (अलिकडे ही प्रथा कमी होत चालली आहे.) त्याही पेक्षा ज्या पद्धतीचं आपण जेवण खात आलो, ते सोडून अचानक काही तरी वेगळंच आपल्या पुढ्यात येत असतं. नवीन घर, नवीन माणसं, नवीन अन्न कशालाच काही बोलता येत नाही. क्वचित प्रसंगी, नवऱ्याला काही आवडी निवडी माहित असतात, मग तो सांभाळून घेतो. जसं प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येक घर वेगळ असतं तसंच प्रत्येक घराची खाद्यसंस्कृतीही वेगळी असते. अगदी एकाच गावातली दोन घरं असली, नात्यातले असले तरी थोडे फार फरक जाणवतातच. मग आंतरजातीय, आंतरधर्मीय, किंवा आंतरराष्ट्रीय लग्न असली तर विचारायलाच नको. आपण म्हणतो १२ मैलावर पाणी आणि वाणी बदलते. तसंच खायच्या चवी सुद्धा बदलतात आणि या चवीपांयी अनेकदा नात्यांची चव जाऊ शकते किंवा नाती अधिक चवदारही होऊ शकतात.

घाटावरची मुलगी सून म्हणून  विदर्भात येते आणि सासू तिला विचारते, उपासाला उसळ चालेल ना?’ ती ओरडायच्याच बेतात असते, परंतु सावरून विचारते, उसळ? मग सासू पण लक्षात येऊन म्हणते, अग तुम्ही साबुदाण्याची खिचडी म्हणताना? तेच गं, त्यालाच इकडे, उसळ म्हणतात. ती नवीन सून हसू दाबत म्हणते, बरं बरं यापुढे लक्षात ठेवेन. मग अशातच कधी कधी तरी दक्षिणेकडे इडली सोबत खातात तो सांबार वेगळा, आणि विदर्भाकडे भाजीवालीकडे मिळणारा सांबार म्हणजे कोथिंबीर वेगळी, हे तिच्या लक्षात येतं. जेवतानाही अशीच गंमत उडते. कधीतरी सासू म्हणते चटणी दे आणि सून आणून देते तिखट. कधी दक्षिणेकडची सून म्हणते आज मी नाश्त्याला केशरी भात करते सगळे अरे बापरे सक्काळी सक्काळी भात?’ म्हणेपर्यंत समोर येतो शिरा. आलू बोंडा आणि बटाटेवडा एकंच, हे खाल्ल्यावर कळतं. ही तर फक्त नावांची हेराफेरी आहे, कृतीमधल्या वैविध्यांवर आपली भारतीय खाद्यसंस्कृती टिकून आहे हे खरं असलं तरी त्या वैविध्यांसह नाती टिकवून ठेवणं हे सासुरवाशींनीपुढे मोठं आव्हान असतं.

नवीन घरात गेल्यागेल्या स्वैपाकघराचा ताबा सुनेकडे लगेच न देण्याचं एक कारण हेही असतं, की वर्षानुवर्षे त्या घरातल्या लोकांची एक चव ठरलेली असते. तिखटाचं प्रमाण, मिठाची रुची, स्वैपाक करायची पद्धत ही सवयीनुसार आखली गेलेली असते. नवीन आलेल्या सुनेच्या खाण्याच्या सवयी, स्वैपाक(येत असल्यास ) करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, काही घरात कांद्याशिवाय भाजी केलीच जात नाही, तर काही घरात  ज्यात त्यात चिंच वापरली जाते, काही घरात गूळ/साखरेशिवाय स्वैपाक पूर्ण होत नाही. दुधी भोपळ्याची भाजी फक्त चना डाळ घालून खाणारी माणसं एकदम दुधी भोपळा मुगाच्या डाळीसोबत बघून गोंधळतात. त्यामुळे अल्पमतातल्या सूनबाईना एकदम बहुमत तरी मिळतं किंवा त्यांना  प्रशिक्षणासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी दिला पाहिजे,असं ठरतं.

आपल्या तिखट मिठाच्या कल्पना, जिभेचं वळण हे वर्षानुवर्षे एकाच प्रकारचं खाल्यामुळे ठरत असतात. त्यामुळे मुलगी लग्नानंतर एका रात्रीत त्या घरातले मसाले, स्वैपाक आपलासा करू शकत नाही तशीच  त्या घरातली माणसंही नवी चव एक रात्रीत आपलीसी करू शकत नाहीत. मोजून मापून स्वैपाक करणाऱ्या असतात तसाच अंदाजाने स्वैपाक करणाऱ्या देखील असतात. एखाद्या घरात आयत्यावेळी आलेला पाहुणा सपादला जावा (म्हणजे समाविष्ट करया यायला हवा) या बेतानं थोडा जास्त स्वैपाक केला जातो तर एखाद्या घरात पोळीचा (पोळी म्हणावं की चपाती!) तुकडाही शिल्लक राहू नये असा दंडक असतो. प्रत्येक घरात काळा, गोडा मसाला वापरत जात असला  तरी त्याचं प्रमाण बदलत असतं. त्यामुळं अनेकदा, सासूच्या हाताची चव अगदी  तश्शीच्या तशीच कृती करणाऱ्या सुनेच्या हाताला येत नाही. पण मग त्या प्रयत्नात एखादी नवीन चव जन्माला येते, जी, कदाचित आधीच्या चवीपेक्षाही सरस असते. कधी सासू सुनेकडून काही शिकते, तर कधी सून सासूच्या हाताखाली अगदी तयार होऊन जाते. स्वैपाकाच्या या आदानप्रदानामुळे कित्येदा नव्या पदार्थांचा शोध लागतो. इतिहासात अनेक नवे पदार्थ कदाचित असेच जन्माला आले असावेत.


आपण घरात रुळतो म्हणजे खरं तर त्या घरातल्या चवीला सवयीचे होतो, किंवा त्या चवीत आपली चव मिसळून देऊन त्या घराच्या खाद्यसंस्कृतीचा भाग होऊन जातो. हे रुपांतर कधी दर्शनीय असतं तर कधी अदृश्य असतं. जसं दुध एकच असतं, पण त्याच दुधाचं, दही, ताक, श्रीखंड, तूप, खवा, पनीर, बासुंदी सगळं कसं वेगवेगळ्याच चवीचं असतं. तसचं आहे आपल्या स्वैपाकाचं. हळू हळू नव्या मसाल्यांची, नव्या चवीची सवय होते, मग ते ही आवडायला लागतं. आपण काय शेवटी जिभेचे चोचले पुरवले गेले की खुश असतो, पण ज्या घरात नव्या जुन्या चवींची सरमिसळ समजूतीनं आणि उत्तम रितीनं होते, तिथं आनंद फुलतो. त्या घरात सासू सुना एकाच स्वैपाकघरात भांड्याला भांड लागूनही आवाज येऊ न देता काम करत नवी खाद्यसंस्कृती जन्माला घालत असतात. मात्र काहीही झालं तरी सासूरवाशीणीच्या मनात माहेराची चव ठाण मांडून बसलेली असतेच आणि माहेरी आल्या आल्या ती आईला, आई तुझ्या हातची अळूची भाजी करना गं..असा लाडिक आदेश देते. माहेरीचा भोपळा मज कलिंगड भासे...म्हणतात ते काय उगीच? परतुं दरम्यान तिच्या माहेरीही नवी सून आलेली असते आणि तिथंही चवींची सरमिसळ सुरू झालेली असते. ही सरमिसळ हेच तर आपल्या जगण्याचं रसायन आहे.

Monday, September 12, 2016

अक्षय पात्र

आम्ही शाळू मैत्रिणी खूप दिवसांनी भेटत होतो. खर तर खूप वर्षांनी. एका मैत्रिणीच्या घरीच भेटत होतो, त्या काकूंनी साऱ्या माहेर वाशिणींसाठी म्हणून खास भरल्या ढोबळी मिरचीची भाजी केली होती. बाकी दोन भाज्या, आमटी कोशिंबीर, लोणची होतीच पण ती  भाजी खाता खाता जणू  परत शाळेत गेल्यासारखं वाटत होतं. त्या मैत्रिणीनी एकदा डब्यात ती भाजी आणली होती, आणि तेव्हा हायजेनिटी शब्द फक्त उत्तरांमध्ये वापरला जायचा, त्यामुळे दुपारचा डबा एकत्रच खाल्ला जायचा, रोज वाटावाटी व्हायची. त्यामुळे प्रत्येकीच्या घरच्या चवीची ओळख होती. आणि मग काही जणींच्या घराच्या ठराविक भाज्या हिट्ट असायच्या, एका मैत्रिणीच्या आईच्या हाताची मटकीची उसळ आम्हाला सगळ्यांना आवडते म्हणून ती उसळ नेहेमी जास्त घेऊन यायची. आमच्या घरचं भरलं वांगं, दुसऱ्या एकीच्या घराची पीठ पेरून दुधी भोपळ्याची भाजी, तर एकीच्या घरच्या गुळपोळ्या, एकीच्या घरातलं लिंबाचं लोणचे (जे आम्ही तोंडात ठेवून चघळत चघळत खायचो). असे काय काय तरी आजही आठवतंय. काकूंना  अगदी आठवणींनं भाजीची पध्दत विचारली, त्यांनी पण आढेवेढे न घेता, लगेच सगळी कृती सांगितली. कोणत्याही वेबसाईट वरच्या पदार्थांच्या कृती करून बघण्याची सवय असलेली आमची एक मैत्रीण मधेच बोलली, काकू टीस्पून, टेबल स्पून मध्ये सांगा ना. काकू लगेच म्हणाल्या, अग मला असे मोजमापात सांगता नाही येत बाई, मी आपलं सगळं अंदाजानीच घालते. आता इतक्या वर्षांची सवय झालीये की झोपेत सुद्धा स्वैपाक करता येतो गं.
आई , आजी, ला स्वैपाक करत बघतच वाढले, आईनी कधी हाताला धरून आता हे असं करायचं असे शिकवलं नाही, मात्र वेगवेगळे प्रयोग करायला मात्र भरपूर मुभा दिली. चिमूटभर मीठ, रंग येईलाशी हळद, बेताचं किंवा झणझणीत जसं हवं तसं तिखट. आलं लसूण पेस्ट घायायची असेल तर आल्याचा जेवढा तुकडा हातात येतो  तेवढा किंवा आधीचा वापरून झाल्यावर उरला तेवढा आलं वापरायची सवय हाताला लागलेली. मग कधी घरात लसूण आवडत नाही म्हणून किंवा टोमॅटो एकच आहे म्हणून तेवढाच वापरला असं करत स्वैपाक करत गेलेलं. त्यामुळे अगदी ठरवून सुद्धा फारच क्वचित तीच चव दरवेळी येते. कित्येक वेळा अगदी सगळं तसंच घेतलं तरी चवीत किंचित फरक जाणवतोच. तो फरक कधी हातांचा तर कधी वापरलेल्या जिन्नसांचा. ताज्या मसाल्याचा वास पदार्थ ताटात यायच्या आधीच दरवळतो, तर ताजी खुडून आणलेली भाजी तशीच खाल्ली तरी चवदार लागते. प्रत्येकाच्या हाताची चव हा जागतिक संशोधनाचा विषय आहे खरं तर! आपल्याकडं जसं आजीच्या हाताच्या कुरड्या, पापड्या, लोणची या साऱ्याची एक विशेष गोडी असते तशीच पाश्चात्य देशात मुरब्बे, जॅम, कुकीज च्या बद्दल म्हणलं जातं. कित्येक घरांमध्ये आजीने केलेले हे सारे पदार्थ वर्षभर जपून ठेवले जातात, त्या कृती तंतोतंत पाळल्या जातात तरी ती चव येत नाही. आपण कोणतीही गोष्ट करताना मनात काय विचार करत होतो, मूड कसा होता यावर सुद्धा त्या पदार्थाची चव जमून येत असते.
भात लावताना काही ठिकाणी तांदुळाच्या प्रमाणात पाणी घातले जाते, तर काही ठिकाणी बोटाच्या पेराच्या हिशोबाने, तर कधी निव्वळ डोळ्यांच्या अंदाजाने. मीठ कधी चिमूटभर घातलं जातं, तर कधी चमच्याच्या हिशोबानं. कधी चार माणसांच्या स्वीप्कात पाचवा, सहावा माणूस सहज खपून जातो, तर कधी चार माणसांचं स्वैपाकातून तिसरा माणूस सुद्धा निसटू शकतो. स्वैपाक ही खरोखरीच एक कला आहे. जसा प्रत्येकाचा आयुष्याचा दृष्टीकोन वेगळा असतो तसच या कलेचे देखील आहे. रोज करत करत सरावाने अंदाजाचा देखील अंदाज येतो. पण तरीही कोणत्याही बाईला, किंवा स्वैपाक करणाऱ्या माणसाला चहाची कृती किंवा प्रमाण विचारलं तर ते सांगतील अंदाजाने. जेव्हा हा अंदाज अंगवळणी पडतो तेव्हा शिकावू श्रेणी मधून हळू हळू सराईत गटाकडे वाटचाल सुरु झालेली असते.
कृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं. त्यामध्ये जोवर अन्नाचा एक कण जरी असेल तरी अन्न कमी पडणार नाही असा आशीर्वाद कृष्णानी त्याच्या प्रिय सखीला पांचालीला दिला होता. कधी कधी मला वाटतं हे अक्षय पात्र म्हणजे स्त्रियांना किंवा स्वैपाक करणाऱ्या बल्लवांना मिळालेलं अंदाजाचं वरदान असणार. अंदाजपंचे पदार्थ करून त्यात रुची उतरून अंदाजानेच  जेवणाऱ्या साऱ्या लोकांना पुरणं हेच असू शकतं अक्षयपात्राचे रहस्य. कदाचित द्रौपदीकडून ती थाळी पुढे पुढे सरकत गेली असणार, किंवा या थाळीचं गुपित तिनी फक्त तिच्यापर्यंत न ठेवता साऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा अंदाजाचा घाट घातला असणार. शेवटी काय अंदाजानेच सारे शोध लागत गेले, नंतर त्यांची प्रमेय मांडली गेली, ती सिद्ध झाली. अंदाजाने केलेला स्वैपाक हे रोजचं प्रमेय असतं आणि तृप्त होऊन जेवून उठणारी लोकं ही त्याची सिद्धता असते. त्या सगळ्याला चमचे, इंच, वाट्या, यांच्या प्रमणात अडकवून ते सिद्ध करता येतं किंवा वय, हात, चिमुट, मुठ, डोळे यांचं अंदाजाने ते सिद्ध करता येतं, शेवटी काय अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणत तृप्त होणे महत्वाचे !!!!!!!!!!!   




Sunday, September 4, 2016

प्राणप्रतिष्ठापना

लहानपणी त्याला घरी येणाऱ्या गणपतीचं खूप कौतुक असायचं. मूर्ती घ्यायला बाबांबरोबर जाताना, त्यांच्यासारखी टोपी त्याला हवी असायची. मग नेहेमीच्या काकांच्या दुकानात गेल्यावर याच रंगाचे धोतर घातलेला, त्याच रंगाचं कद घातलेला, गणपती हवा असायचा. नंतर नंतर कमळात बसलेला काय , पगडी घातलेला काय, अशा काही तरी त्याच्या अटी. दरवर्षी त्याच्याच आवडीचा गणपती यायचा, यायचा याचा त्याला कोण आनंद व्हायचा. एकदा तर त्याला संगणकासमोर बसलेला गणपती पूजेला म्हणून आणायचा होता, बाबांनी तेव्हा कशी तरी समजूत काढून त्याला तसे चित्र काढायला सांगितलं आणि मग पूजेच्या वेळी ते पण मांडलं. आपले आई वडील आपल्याला समजून घेतात याचा आनंद न सांगता येणारा होता. आमच्या घरी दहा दिवस बसतो म्हणून त्याला कोण अप्रूप होतं. त्या दहा दिवसात त्याचा सारा अभ्यास गणपतीच्या सोबतीनच व्हायचा. पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापणा करताना मी पण बाबांसारख धोतर नेसणार म्हणून तो हट्टान धोतर नेसवून घ्यायचा. मग ते सारे मंत्र भारल्यागत ऐकत राहायचा. बाबा पूजा करताना त्याला दुसरेच कोणी तरी भासायचे. घरात फुलांचा दरवळ आणि मोदकांचा वास भरलेला असायचा. त्यातलं जास्त काय आवडायचं हे तेव्हा सांगणं त्याला कधीच जमायचं नाही. आईनी गणेश चतुर्थीला केलेल्या मोदकांची चव वर्षभरात कधीही केलेल्या मोदकांना यायचीच नाही. आरती ची वेळ येता येता आई उकडलेल्या मोदकांच ताट घेऊन यायची तेव्हा त्याला आई बाबांना फक्त बघत राहावसं वाटायचं. हा क्षण कधीच संपू नये म्हणून तो मनात थांबवून ठेवायचा, पण मग आरतीच्या घंटेनी परत या जगात यायचा. सुखकर्ता दुःखहर्ता आरती १०*२  वेळा म्हणून म्हणून इतकी सवय झालेली असायची की अनंत चतुर्दशीच्या नंतर दोन चार दिवस तो एकटाच देवापाशी जाऊन आरती म्हणत राहायचा. १०, १२ वर्षांचा होईपर्यंत यात काहीच खंड नव्हता. दर वर्षी त्याच उत्साहानं गणपतीची वाट बघायचा, आरास काय करायची  याचा वर्षभर विचार करत बसायचा.
मग काही वर्ष हीच पोरं कॉलनीचा गणपती बसवायला लागली होती. dj ची गाणी लावून नाचायचा काळ अजून यायचा होता, त्यामुळे थोड्या फार लिंबू टिंबू स्पर्धा, गाणी, नाटक असलं काही तरी असायचं. पण एक जिवंत पणा आसमंतात भरून वाहायचा. जणू प्राण प्रतिष्ठा झालेल्या गणपतीच्या श्वासात साऱ्यांचे श्वास मिळून जायचे आणि खरंच सुख मिळायचं, दुःख विसरलं जायचं. गणपतीत जमा झालेल्या वर्गणी पेक्षा आरतीला येणारा प्रसाद जास्त असायचा. विसर्जनाच्या मिरवणुकीत बाप्पा जातोय याचे दुःख असायचं पण आपणा दहा दिवस त्याला छान सांभाळल याचं समाधान जास्त असायचं, परत येणारच की हा पुढच्या वर्षी ही खात्री देखील असायची.
मग काय दहावी, बारावी, दुसऱ्या गावातलं कॉलेज, हॉस्टेल सगळी गणितंच बदलत चालली होती. घराचा गणपती त्याच डौलात बसायचा, पण त्याचा सोबती दुसरीकडे कुठे तरी असायचा. नवीन काही शिकता शिकता धारणाही बदलत होत्या. देव संकल्पनेपासून फारकत व्हायला सुरुवात झाली होती. शास्त्र प्रमाण तर देव  कल्पना, साऱ्या कल्पना खुळचट वाटायचं वयचं होतं ते. देवांचे अस्तित्व नाकारत असतानाही गणपती ला कुठेतरी तो शास्त्रा जवळ आणायचा प्रयत्न करायचा, त्याचे वाहन मूषक, तेच आपण संगणकवापरताना वापरतो, गणपती ६४ कलांचा अधिपती आणि ६४ म्हणजे २चा ६ वा वर्ग , किंवा कॉम्पुटर शास्त्रातही हा नंबर महत्वाचा समजला जातो, बुद्धिबळ हा देखील ६४ घरांचा खेळ आहे म्हणजे गणपती हा देव नसून ज्ञानाची संकल्पना आहे, तो घरीदारी सगळीकडे सांगत राहायचा.
मी देव मानत नाही, मी धर्म मानत नाही म्हणत मोदकांना मानत तो गणेश चतुर्थी मात्र साजरी करायचा. आयुष्यात कधी तरी जेव्हा आपल्या धारणा तपासाव्या लागतात तेव्हाही तो त्याच्या धारणांवर ठाम होता. गणपती देव म्हणून नको, मित्र म्हणून असेल तर चालेल.
त्यानी खो दिला तरी बाबांनी गणपती बसवणं सोडलं नव्हतं, मात्र आता त्यांच्या मदतीला त्यांचा नातू होता. त्याचाच मुलगा तो, वडिलांसारखाच  सारं काही कुतूहलानं बघत राहायचा. त्याला त्याचाच भूतकाळ असा समोर उभा राहिलेला दिसायचा. स्वतःच्या प्रतिमेला हसत तो एक मोदक जास्त घ्यायचा. एका वर्षी त्याच्या मुलानी हट्ट धरला, हातात मोबाईल धरलेला गणपती आणायचा, कुठेही शोधून तसा गणपती कुठे मिळेना तेव्हा, त्यानी मुलाच्याच खेळण्यातली प्ले डो घेतली, आणि त्याच्या मुलाला हवा तसा मोबाईल धरलेला गणपती तयार केला. तो गणपती करता करता त्यालाच जाणवलं, बाबा जेव्हा ते सारे मंत्र म्हणायचे, आणि आपल्याला खरंच वाटायचं की बाबा मूर्तीत प्राण घालतात, त्या क्षणी ते कोणी तरी वेगळेच वाटायचे, आपले वडील असे काही करू शकतात याचा एक अभिमान त्याला वाटायचा, आज जेव्हा तोच अभिमान त्याला त्याच्या मुलाच्या डोळ्यात दिसला तेव्हा त्याला जणू एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं.
देव मूर्तीत आहे, की माणसात आहे, धर्म मानावा की कल्पना म्हणावी या पलीकडे जाऊन आई वडिलांवरचा विश्वास ही काही तरी आयुष्य बदलवणारी धारणा असते, हे जेव्हा कळत तेव्हा आपल्याही नकळत आपल्या मनात जगण्याच्या इच्छेची प्राणप्रतिष्ठापना झालेली असते.