Monday, November 15, 2010
प्लीज साइन इन!
काही वर्षांपूर्वी एका गाजलेल्या चित्रपटात संवाद होता, ‘इस वल्र्ड में दो ही
टाईप के लोग होते है, एक ‘बनाने’वाले और दुसरे ‘बिगाडने’वाले. आता हाच संवाद थोडासा बदलून म्हणता येईल, ‘इस वल्र्ड में दो ही टाईप के लोग होते है, एक ‘सोशल नेटवर्किंग साइट्स’ देखनेवाले और दुसरे ‘सोशल नेटवर्किंग साइट्स नहीं देखनेवाले.’
पूर्वी चार लोक जमले की चर्चा व्हायची ती हवा-पाण्याची. वयोमानानुसार किंवा स्त्री-पुरुष अशा फरकाने शाळा, कॉलेज, राजकारण, घर-संसार, सासू असे विषय चर्चेत असायचे. पण आता मात्र चार लोक भेटले की आधी चौकशी करतात ती facebook, orkut बद्दल. किंबहुना दोन बिल्डिंगपलीकडच्या घरात आज ‘भरले वांगे’ आहे किंवा ‘आत्याच्या दिराच्या मुलाचे लफडे आहे’ किंवा ‘शाळेतल्या वर्गमैत्रिणीला मुलगा झाला’ अशा बातम्या पूर्वी गप्पांमधून कळायच्या, आता मात्र त्या कळतात facebook वरच्या वॉलवरून किंवा orkut वरच्या स्टेटस अपडेटवरून! Twitter हाही त्यातलाच एक प्रकार, फक्त थोडय़ाशा वेगळ्या वळणावरचा!
‘सोशल नेटवर्किंग साइट्स’ या गोंडस नावाखाली अमेरिकेमध्ये या वेगवेगळ्या प्रयोगांना सुरुवात झाली. या दशकाच्या सुरुवातीला ‘फ्रेडस्टर ही सोशल नेटवर्किंग साइट गुगलला विकत घ्यायची होती, पण तो सौदा फसला म्हणून ‘ऑर्कुट’ जन्माला आले. ही गोष्ट २००२ सालातली. ३० जानेवारी २००४ पासून आजतागायत ‘ऑर्कुट’ आपली लोकप्रियता टिकवून आहे. सुरुवातीला फक्त ‘आमंत्रण’ असेल तरच तुम्ही सभासद होऊ शकत होता. आता मात्र तशी काही अट नाही, पण वयाचे बंधन नक्कीच आहे. ऑर्कुटचे सभासद होण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे. (किमान आपली जन्मतारीख ‘त्या पद्धतीने’ सांगणे गरजेचे आहे!) भारतामध्ये ऑर्कुट येऊन चार-पाच वर्षे होऊन गेली असल्यामुळे त्याने चांगलेच बाळसे धरले आहे. किंबहुना ऑर्कुटवर ओळख होऊन लग्न ठरणे, हीदेखील आता कुतूहलाची बाब राहिली नाही.
खरं तर स्क्रॅप म्हणजे कचरा! परंतु ऑर्कुटवर स्क्रॅप म्हणजे एकमेकांना संदेश पाठवणे. ऑर्कुटवर आपण आपल्या ‘प्रोफाईल’मध्ये आपले स्क्रॅप सगळ्यांना दिसावेत की नाही हे ठरवू शकतो, पूर्वी मात्र कोणीही कोणाचेही स्क्रॅप वाचू शकायचे. ऑर्कुट काय किंवा फेसबुक, Hi5, ट्विटर काय सगळीकडे जे ‘प्रोफाईल’ असते, ते म्हणजे आपली ओळख जगासमोर मांडणे! आपल्या स्वत:च्या आयुष्यातला झरोकाच म्हणता येईल त्याला. म्हणजे जे पहिल्यापासून ओळखतात त्यांना ओळख पटावी आणि जे कोणी नवे मित्र-मैत्रिणी असतील त्यांना ओळख व्हावी हा उद्देश. मग त्यात स्वत:चा फोटो, आवडीनिवडी, शाळा, कॉलेज, नोकरीचे ठिकाण इ. माहिती टाकून स्वत:च्या प्रोफाईलमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणता येते. आता ही माहिती किती खरी, खोटी हा पूर्णत: वैयक्तिक प्रश्न आहे. माहितीची पडताळणी शक्य नसल्याने फसवणुकीचे प्रकार ऑर्कुटवर सर्रास आढळून येतात. फेक प्रोफाईल तयार करणे, चुकीची माहिती देणे, दिशाभूल करणे, फसवणूक करणे याबाबत ऑर्कुटवर भारतात कायदेशीर खटलेदेखील भरले आहेत. ऑर्कुटवर वेगवेगळ्या ‘कम्युनिटीज’ असतात. ज्यांचा साधा अर्थ विशिष्ट विषयाशी संबंधित गप्पा मारण्याची, अधिक माहिती मिळवण्याची जागा, असा होतो. ब्राझिलखालोखाल भारतात सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जात असलेल्या ऑर्कुटची लोकप्रियता सध्या भारतातही उतरणीला लागली आहे. त्यामुळे 'Bye Bye Orkut, Welcome facebook' हे अनेकांचे ऑर्कुटवरचे ‘स्टेटस’ सध्या बघायला मिळते. वरवर बघायला गेले तर ऑर्कुटवर मित्र-मैत्रिणींशी संबंध हे जास्त वैयक्तिक पातळीवर ठेवता येतात. मित्र-मैत्रिणींमध्ये जवळचे, ओळखीचे, नातेवाईक अशी वर्गवारी करता येते. एखाद्याबद्दल आपल्याला काय वाटते ते सांगता येते; परंतु मोबाइलचा जमाना आल्यावर पेजर जसे मागे पडले, तसेच facebook आल्यावर ऑर्कुट मागे पडले आहे.
काही दिवसांपूर्वी एक विनोद सगळीकडे लोकप्रिय होत होता. एक मरणासन्न आजी आपल्या नातीला जवळ बोलावून सांगते, ‘पोरी, मी आता मरायला टेकली आहे, पण मरण्यापूर्वी तुला सांगायचे होते, मी मेल्यावर माझं शेत, बैल, गाई, म्हशी यांची काळजी घेशील ना? थोडीबहुत पिकेही मी काढली आहेत!’ नातीला भयंकर धक्का बसतो, ‘पण आजी, आहे कुठे तुझी जागा? आम्हाला कोणालाच याबद्दल माहीत नाही, नात विचारते. त्यावर ती म्हातारी म्हणते, ‘अगं फेसबुकवरच्या फार्मव्हिलेमधल्या माझ्या शेतीविषयी बोलत आहे मी.’ फेसबुक, आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय होण्याचे एक महत्त्वाचे कारण, त्यावरचे ‘गेम्स’ आणि ‘अॅप्लिकेशन्स’ आहेत. (मुद्दाम गेम्स आणि अॅप्लिकेशन्स ठेवले आहे, नाहीतर साराच ‘खेळखंडोबा’ व्हायचा.) फार्मव्हिले, फिशव्हिले, व्हॅम्पायर वॉर, आयटी गर्ल्स, माऊसहंट असे अनेक वेगवेगळे खेळ तिथे खेळता येतात. ‘सोशल नेटवर्किंग’ म्हणजे फक्त मनातले बोलायचेच नसते तर दोन-चार मौजेचे क्षण, निवांत क्षणही हवे असतात. कधी अशा व्हर्चुअल खेळांमधून पुन्हा बालपणीचा, तरुणपणीच्या आठवणी ताज्या होतात. तरीही फेसबुक ही मूलत: सोशल नेटवर्किंग साइटच, एखाद्या चाळीप्रमाणे! चाळीत कोणाकडे कोण येतो-जातो, काय स्वयंपाक होतो, भांडणे होतात हे जसे सगळ्यांना कळते तसेच फेसबुकवर तुमचे मित्र-मैत्रिणी काय करत आहेत, म्हणत आहेत. कुठे जाणार आहेत, त्यांनी कुठे फोटो काढले. अशी सगळी माहिती (फोटोंसह) तुम्हाला मिळते. तुमच्या स्वत:च्या भिंतीवर (wall) तुम्हाला हवं ते खरडू शकता, मनातला सल, आयुष्यातला आनंद, प्रतिक्रिया काहीही लिहू शकता. जगातल्या दर चौदा माणसांमधला एक फेसबुकवर असतो, इतक्या मोठय़ा प्रमाणात हे जाळं जगभर पसरलेलं आहे. यावर जसे जुने मित्र-मैत्रिणी भेटू शकतात तसेच सेलेब्रिटी आपले मित्र-मैत्रिणीसुद्धा होऊ शकतात. पाकिस्तान, चीन, व्हिएतनाम, इराण, उत्तर कोरिया या देशांनी मात्र फेसबुकला हद्दपार केले आहे. फेसबुकबद्दल बोलताना असे नेहमीच म्हटले जाते, ‘जे तुम्हाला बोलायचे आहे, पण बोलता येत नाही किंवा कुठे बोलावे हे उमगत नाही, त्यांच्यासाठीचे ते व्यासपीठ आहे.’ प्रत्येकाला याच्या वर्तुळातील मित्र-मैत्रिणींची माहिती देण्याच्या सुविधेचे ‘पेटंटही’ फेसबुकने मिळवलेले आहे. कदाचित भविष्यात त्यावरून फेसबुक, ट्विटर आणिोत्सम साइट्समध्ये वादही होतील!
सध्या चलती असलेलं दुसरं नाणं आहे ‘ट्विटर’. मुळात त्याची संकल्पना ही काही मित्रांच्या एसएमएस ग्रुपमधून जन्माला आली. ‘सोशल नेटवर्किंग’पेक्षाही ट्विटर प्रसिद्ध आहे ती मायक्रोब्लॉकिंगसाठी! फेसबुक, ऑर्कुटवर लिहिण्यासाठी शब्दसंख्येचे बंधन नाही. मात्र, ट्विटरची मूळ संकल्पनाच रटर मधून आलेली असल्याकारणाने तिथे आपले म्हणणे १४० अक्षरांमध्ये मांडण्याचे बंधन असते. त्यामुळे त्याचा वेग आणि सहजता जास्त आहे, असे अनेक ट्विटकरांना वाटते. मुळात ट्विटरवर असणे, ट्विट करणे हे आपल्याकडे गरजेपेक्षा फॅशन झाली आहे. आवडत्या नट- नटींना, राजकीय नेत्यांना follow करायचे या भावनेनेही अनेक जण ट्विटरवर असतात. मुळात भारतातच नव्हे तर जगभरात सगळ्यांनाच इतरांबद्दल, त्यातही प्रसिद्ध लोकांच्या खाजगी आयुष्याबद्दल चघळून बोलायला आवडते. ट्विटरवर जेव्हा कोंकणा सेन-शर्मा आपल्या लग्नाबद्दल सांगते किंवा अमिताभ एखाद्या विषयावर प्रतिक्रिया देतो; तेव्हा ही माणसे हे आपल्याला सांगताहेत किंवा जगाला कळण्याआधी हे मला माहिती होते आहे, असा एक सुप्त आनंद होतो. ट्विटर हे संवाद वाढवण्यापेक्षा बोलण्याला, माहिती सांगण्याला जास्त महत्त्व देते.
प्रस्तुत लेखात जरी मुख्यत: ऑर्कुट, फेसबुक, ट्विटरविषयी सांगितले असले तरी याव्यतिरिक्त Hi5 (हायफाईव्ह), फ्रेडस्टर, मायस्पेस, निंग अशा अनेक सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत. प्रामुख्याने या तीन साईट्स विषयीच बोलण्याचे कारण म्हणजे या तीन चांगल्या पक्क्या रुजल्या आहेत. मुळात संवाद ही माणसांची प्राथमिक गरज आहे. संवाद साधण्यासाठी भाषेचा शोध लागला, मग तेही पुरेसे वाटले नाही म्हणून नंतर लिपी आली. आणि मग संपर्काची, संदेशवहनाची वेगवेगळी माध्यमे शोधून काढली गेली. पत्र, ई-मेल, पेजर, मोबाइल, एसएमएस असे किती वेगवेगळे मार्ग, पण ईप्सित एकच, एकमेकांशी संवाद!
‘तुका म्हणे आम्हावरी जो रुसला,
त्याचा अबोला आकाशासी!’
संवादाशिवाय माणूस जगू शकत नाही. आपण समाजात एकमेकांना ‘धरून राहतो’ कारण कितीही एकटेपणाची ओढ असली तरीही त्या एकटेपणाचे मूक साक्षीदार तरी हवेच असतात. पुलं म्हणाले होते त्याप्रमाणे मुंबई, पुणे, नागपूर ही तीनच गावे अशी आहेत ज्यांच्यापुढे कर जोडून विचारावे, ‘तुम्हाला कोण व्हायचे’ मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?’ तसेच या इंटरनेटच्या जमान्यात ऑर्कुट, फेसबुक की ट्विटर यापैकी कोणाचे ‘साईन इन’ करायचे हे मात्र शेवटी तुम्हीच ठरवायचे आहे!
Subscribe to:
Posts (Atom)