Friday, October 28, 2016

दिवा जळो, पीडा टळो...

आजच सगळ्या क्लाएंटला दिवाळीच्या  भेटवस्तू द्यायच्याच होत्या, तर मग ती तिची दिवाळी आनंदात साजरी करू शकणार होती. तिची नुसती धावपळ उडाली होती. कितीही ठरवलं, तरी कुठे तरी दोन पाच मिनिटं निसटतात, आणि मग पुढचा सगळा हिशोब कोलमडायचा. तिनी खरंतर निम्म्याहून जास्त भेटवस्तू द्यायचं काम हाताखालच्या लोकांवर सोडलं होतं, पण अशी काही जण होती ज्यांना प्रत्यक्ष भेटून ह्या वस्तू देणं गरजेचं होतं. सकाळी ९ ला जेव्हा ती घरातून बाहेर पडली होती तव्हा तिनी सगळा वेळेचा हिशोब मांडून आपण ६ पर्यंत मोकळे होऊ असा अंदाज केला होता. पण पहिल्याच ठिकाणी तासभर थांबावं लागलं आणी मग तिची आतल्या आत चिडचिड सुरु झाली. आज लवकर जाऊन किमान लाडू तरी करूयात असं अगदी मनापासून ठरवलं होतं. किती दिवसात तिनी स्वतःला आवडत असूनही बेसन लाडू केले नव्हते. स्वैपाकवाल्या काकूच स्वैपाक करायच्या. रविवारी मात्र ती अगदी ठवून एखादा तरी पदार्थ करायचीच.

विकत आणलेल्या फराळ कदाचित घरच्या पेक्षा जास्त चांगला असेल, पण घरी फराळ करताना जो वेळ, प्रयत्न, प्रेम घातलं जातं त्यामुळे त्या फराळाची चव बाहेरच्या अगदी घरच्या सारख्या लागणाऱ्या फराळाला कधीच येत नाही. कितीही कामा असलं, तरी ती दर दिवाळीला लाडू चिवडा तरी घरी करायचीच. वेळ असला तर चकली, करंज्या. तासभर वाट बघता बघता ती दोन चार खाद्य पदार्थांचे ब्लॉग चाळत होते. फेसबुकवरचे फोटो पाहून आपण केलेच पाहिजे मन अजून ठामपणे सांगत होतं. एका ठिकाणहून दुसरीकडे पळत पळत ती तिचं दिवाळीच टारगेट पूर्ण करत होती. जेवण ही असंच एका टॅक्सीमध्ये बसून तिनं संपवलं होतं. तशी तर मुंबई रोजच पळत असते, पण दिवाळीच्या दोन चार दिवस आधी ती उसेन बोल्टच्या वेगानं धावते असं तिला वाटायचं.

दिवाळी एका नाही दोन नाही तब्बल पाच दिवसांचा सण! निवांत साजरे करा तुमच्या कुटुंबीयांसोबतचे क्षण. आपण पैसे कमावतो ते जगण्यासाठी, आणि जगतो ते जीवाच्या माणसांसोबत, दिवाळी असते ती याचीच जाणीव करून द्यायला. एकत्र राहणं, मिठाई तयार करणं, खाणं, गप्पा मारणं ही खरी दिवाळी असते. मनाच्या गप्पा रंगल्या की समाधानाचे दिवे आपोआपच लागतात. ह्या भेटवस्तू देणं घेणं एक निमित्त भेटण्याचं, आपले संबंध असेच राहोत, आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत सांगण्याचं एक निमित्त. दर वर्षी या भेटवस्तू निवडायचं काम तिनी तिच्याकडे ओढून घेतलं होतं. तिला आवडायचं ते. दर वेळी काही तरी वेगळा विचार करून कुठून कुठुन काय काय शोधून काढायची. या वेळी तिनी पूर्वी घरी बनवायचे तसे कापडाचे मोर चिमण्या,वेगवेगळे पक्षी एका आश्रमातून मिळवले होते. हातांमधली कला हृदयाला साद घालायची. जुनं सारं काही फिरून परत येतंच असतं. घरात, दारावर, गाडीत कुठेही टांगता येतील असे ते हँगिंग होते.

शेवटची भेट आटोपता आटोपता सात वाजून गेले होते, परत लोकल, बस पकडणं तिच्या अगदी जीवावर आलं होतं. तसे घर जास्त लांबही नव्हतं. एक्सप्रेस वे नि गेलं तर जेमतेम ३०, ३५ मिनिटात घरी पोहोचली असती, म्हणून तिनी सरळ उबर बोलावली. दोन मिनिटात ड्रायव्हर आला देखील. गाडीत बसल्यावर एक दोन चार मिनिटं बोलून ती नेहेमी ड्रायव्हर चा अंदाज घ्यायची. हा पठ्ठ्या विदर्भातला एका छोट्या गावातला होता. गावाकडं तशी फारशी शेती नव्हतीच. बापानी आत्महत्यांचं पीक यायच्या कैक वर्ष आधीच आत्महत्या केली होती. एक छोटी बहिण आणि आई गावाकडे होते. तू दिवाळीला गेला नाहीस घरी. तिनी सहज विचारलं. जरा भरल्या डोळ्यानीच त्यांनी सांगितलं बहिणीचं लग्न आहे, पुढच्या महिन्यात, तेव्हा पैसे लागतील आणि रजा सुद्धा म्हणून आत्ता नाही गेलो. त्याच्या आवाजात विषादही होता, आनंदही होता. पुढंच संभाषण तो बोलत होता आणि ती ऐकत होते. तिला माहित असलेलं पण तिनी कधी न पाहिलेलं जग तो तिला दाखवू पाहत होता.


उतरताना एक जादाचं असलेलं मोराचं हँगिंग आणि तिला मिळालेला मिठाईचा एक बॉक्स तिनी जेव्हा त्याच्या हातात ठेवला तेव्हा त्यानी मनापासून धन्यवाद देऊन घ्यायला नकार दिला, पण मग जेव्हा ही एका बहिणीकडून दिवाळीची भेट म्हणल्यावर त्याला तिचा आग्रह मोडवेना, तिथं भर रस्त्यात त्यानी भरल्या डोळ्यांनी मला वाकून नमस्कार केला तेव्हा उगाचच आपण दुसरे कोणी तरी आहोत असं तिला वाटलं. दिवाळी चा दिवा अजून घरी लावला नसला तरी तिच्या आतला दिवा आपोआप लागला होता. ही दिवाळी नक्कीच आठवणीतली दिवाळी ठरणार होती. 

Thursday, October 27, 2016

दिन दिन दिवाळी....

त्यांच्या भावकीतलं कोणीतरी गेलं म्हणून त्यांच्या घरी यंदा दिवाळी नव्हती एवढंच त्याला कळल होतं. तसंही दिवाळीला बापाकड पैसा असला, तो प्यायला नसला , त्याचा मूड बरा असला तर नवा कपडा यायचा, नाहीतर मामा शहरातल्यांचे कपडे आणायचे तेच त्याचे नवीन कपडे. आई चिवडा, लाडू क्वचित शंकरपाळे करायची, पण गावभर उंडारायला मिळायचं, कोणाच्याही घरी गेलं तर काही तरी खायला नक्की मिळायचं त्यामुळं त्याला दिवाळी आवडायची. त्यात किल्ला करण्यात त्याचा कोणी हात धरायचं नाही. प्रत्येकाला वेगळ काही तरी तो करून द्यायचा त्यामुळे त्याला खास भाव होता. मग त्या बदल्यात कधी दोन चार टिकल्यांची बंडल, नाग गोळ्याचं पाकीट, फराळाचा जादा खाऊ असं काही काही तो वसूल करायचा. बघून बघून आकाश कंदील पण करायला शिकला होता, यावर्षी त्यांच्या घरावर तो स्वतःच केलेला आकाशकंदील लावणार होता, पण सगळंच फिस्कटल होतं.

गणपतीत त्याला १३ पूर्ण झाली होती. मामाकडे शहरात जायची त्याला खूप इच्छा होती. मामा दर वेळी त्याच्या सोसायटीच्या गंमती सांगायचा, तिथल्या मुलांबद्दल सांगायचा तेव्हा त्याला कित्येकदा वाटायचं, मामा ढील सोडतोय. पण मग मामा जुने कपडे, पुस्तक आणायचं तेव्हा त्याचा विश्वास बसायचा. त्याला ते जगच वेगळ वाटायचं. या सुट्टीत तरी मामाकडे जायचंच त्यानी मनाशी खुणगाठ बांधली होती. आणि आत्ता दिवाळीच्या निमित्ताने ती संधी पण चालून आली होती.
शहरात पैसे कमवायला गेलेला त्याचा मामा मुंबईमध्ये  एका सोसायटीमध्ये कामाला होता. एक छोटीशी खोली पण दिली होती त्या लोकांनी त्याला राहायला. गावात छोटी मोठी कामं करून साचवलेल्या पैशातून या सुट्टीत मुंबईला जायचंच त्यानी पक्क केलं होतं, त्यामुळे सण नाही हे त्याच्या पथ्यावर पडलं होतं. आईचा प्रश्न नव्हता, बापाला कसं पटवायचं हा खरा प्रश्न होता. नशेत असलेल्या बापाचे पाय दाबून त्यानी हळूच प्रश्न सोडून दिला होता, बाप आपण कशाला हो म्हणतोय हे कळण्याच्या धुंदीतच नव्हता. सकाळी त्यानी बापाला आठवण करून दिली त्याच्या शब्दाची तेव्हा चक्क तो शुद्धीत असूनही हो म्हणाला तेव्हा त्याच्या त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता.

जेव्हा त्यानी मुंबईचे मोठे रस्ते, लोकच लोकं पाहिली तेव्हा त्याला अगदी सशासारख वाटलं. तो भांबावलेल्या नजरेनीच सगळं पाहत होता. आपण इथं हरवलो तर त्यांनी मामाचा हात अजून घट्ट पकडून ठेवला. मामाच्या कामाच्या ठिकाणी तर त्या मोठ्या इमारती , मोठ्या गाड्या पाहून त्याला आपण दुसऱ्याच कुठल्या जगात आलो की काय असे भास होत होते.  सगळ्यांच्या घराची रोषणाई, झगमगणारे दिवे, आकाशकंदील त्याला प्रत्येक गोष्टीचं अप्रूप वाटत होतं. रात्री जेव्हा सारे जण फटाके उडवायला खाली आले तेव्हा तर त्याला वाटलं सगळ्या गावातले फटाके इथे आलेत की काय.

फटाक्यांचे इतके प्रकार त्यानी कधीच पाहिले नव्हते. दिवाळीला शकून म्हणून फटके उडवायचे, शहरातलं पाहून पाहून भुईनळी, भुईचक्र, बाण असे काय काय मिळायचं. पण इथं तर बघावा तो प्रत्येक फटका त्याला नवीन वाटत होता. त्याला हे सारं कधी घरी जाऊन सांगेन सगळ्या मित्रांना सांगेन असं झालं होतं. ती फटाक्यांची रोषणाई बघत बघत तो कधी पुढे गेला होता त्यालाच कळलं नव्हतं. मामानी फटके लांबून बघ सांगितलं होतं, पण संमोहित झाल्यासारखा तो वर बघत समोर बघत फटाके उडवतात त्या जागेपाशी जाऊन पोहोचला होता. खरं तर ती जागा मोठ्या माणसांची, त्यांच्यासारख्या नोकर माणसांची नाही, मामानी सांगितलं होतं, पण ते फटाक्यांच्या आवाजात कुठेच विरून गेलं होतं. त्याला तिथल्या काही फटाक्यांना हात लावायचा मोह होत होता. मामानी फटाके आणून देईन सांगितलं होतं पण मनाला धीर कुठे असतो, आकाशात जाऊन वेगवेगळ्या रंगाची उधळण करणारा बाण असतो तरी कसा बघावा म्हणून त्यानी बिचकत बिचकत तिथल्या एका लांब नळीच्या बाणाला हात लावला.

‘कोण रे तू?’ कोणीतरी हटकलेच.
‘मी ..’ त्याची बोलतीच बंद होत होती. खरं बोलावं की खोटं बोलावं संभ्रम सुटता सुटत नव्हता. तो मान खाली घालून मामाचा धावा करत होता.
धावा ऐकल्यासारखं मामा तिथं पळत आला.
‘ माफ करा हा माझा भाचा आजच गावावरून आलाय. त्यांनी कधी हे असे मोठे फटाके पाहिले नाहीत म्हणून चुकून हात लावला असेल.’
‘लेका अरे आणतो म्हणालो होतो ना मी, आधी त्यांना सॉरी म्हण. परत असं नाही ना करणार?‘
तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो सॉरी म्हणाला आणि मान खाली घालून तिथेच उभा राहिला.
‘बाबा माझे हे रॉकेट मी याला देऊ, आम्हाला शाळेत सांगितलंय, you should spread happiness by giving. मी खुप फटाके उडवलेत, यानी अजून काहीच उडवले नाहीत ना.’


ते वाक्य ऐकून त्याच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद पसरला होता. जेव्हा त्यानी पहिल्यांदा त्या नवीन दोस्ताच्या मदतीने पहिल्यांदा तो मोठ्ठा बाण आकाशात सोडला तेव्हा त्याला सगळं आकाश त्याच्या आनंदात न्हाहून निघाल्यासारखं वाटतं होतं. त्या नवीन दोस्तानी आणि यानी मिळून अजून काही फटाके उडवले आणि दिवाळीचे दिवे एकमेकांच्या हृदयात लावले होते.       

Sunday, October 23, 2016

पणतीचं वलय

माईंनी मुलांना त्यांच्या खोलीत बोलावलं तेव्हा सारेच जरा गोंधळले होते. आता काय सांगायचं असेल माईला? आपलं कोणाचं काही चुकलं तर नाही ना? सगळेच जण दोन चार दिवसात आपण कोणाला काही बोललो नाही ना आठवत होते. नाना अचानक गेले म्हणून सगळेच धावत घरी आले होते. असे खूप वर्षांनी तिन्ही भाऊ आणि बहिण घरी जमले होते. चालते बोलते नाना गेले याचे दुःख तर होतेच पण स्वाभिमानी नानांना जर दुसऱ्या कोणाकडून सेवा करून घ्यावी लागली असती तर मारान यातनांपेक्षा जड गेले असतं, त्यामुळे आलं ते मरण चांगलंच आलं असं सगळ्यांना वाटत होतं. माई पण शांत स्थिर होत्या. नानांच्या इच्छेनुसार कोणतेही विधी करायचे नव्हते. त्यामुळे एक दोन दिवसात सगळेच आपापल्या घरी जायचं ठरवत होते. अशात माईंनी कशाला बोलावलं असेल, सगळ्यानांच प्रश्न पडला होता.

तिघा भावांपैकी एक जण माई नानांबरोबर राहायचा तर दुसरा त्याच गावाच्या दुसऱ्या बाजूला राहायचा. धाकटा असूनही सर्वात श्रीमंत असलेला भाऊ जरा लांबच होता, फारसा यायचा नाही, बहिण जवळच्या गावात दिलेली होती. माईच्या एका फोन सरशी सारे बायको मुलांसह आले होते. नाना माई मध्ये नाना कायम कर्मवादी होते. देव धर्म या निव्वळ संकल्पना आहेत म्हणायचे. त्या उलट माई कायम देव सण वारात बुडलेली.  नाना रागीट तापट तर माई एकदम शांत. नाना बोलघेवडे तर माई जरा घुमीच. दोघे दोन वेगळ्या पध्दतीचे होते, पण तरीही त्यांचे वाद मुलांनी कधी पाहिले नव्हते. नानांची इच्छा म्हणून माईंनी मंगळसूत्र देखील उतरवलं नव्हतं.
तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाय की मी असं तुम्हाला माझ्या खोलीत का बोलावलं म्हणून ना. माईनी बोलायला सुरुवात केली.

आमच्या दोघांपैकी कोणी तरी आधी जाणार हे नक्कीच होते. माझी खूप इच्छा होती सवाष्ण जाण्याची पण नानांची कर्मश्रद्धा माझ्या श्रद्धेपेक्षा वरचढ ठरली. जशी जन्म ही नैसर्गिक गोष्ट आहे तशीच मृत्यू देखील. मी काय नाना काय आम्ही अगदी समृद्ध आयुष्य जगलो. समाधानी आहोत आम्ही. आमची मुलं व्यवस्थित धडधाकट आहेत. आई वडील म्हणून पार पाडायच्या कोणत्याही कर्तव्यात आम्ही कमी पडलो नाही असं आम्हाला तरी वाटतं. त्यांची इच्छा म्हणून आपण कोणतेही विधी केले नाहीत. आणि दुखवटा पण नाही पाळणार. मुलांनो खरंच आत्ताही आणि मी गेल्यावरही दुःख करू नका. आमची कोणतीही आशा अपेक्षा तुमच्याकडून आयुष्याकडून उरलेली नाही. दिवाळी तोंडावर आलेली आहे. तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी सण साजरा करा. केवळ हाच नाही तर इतर सारे सण समारंभ देखील साजरे करा.

‘माई अग पण लोकं काय म्हणतील, अजून पंधरा दिवस पण झाले नाहीत आणि आम्ही सण साजरा कसा करायचा ‘ भीत भीत लेक म्हणाली.

‘ तुझ्या प्रेमविवाहाच्या वेळी जर नाना असंच वाक्य बोलले असते तर तुझं लग्न झालं असतं का? हे बघा मुलांनो काही रूढी परंपरा चालत आल्या म्हणून आंधळ्या सारख्या पाळू नका. नाना ८० वर्ष जगले, आता ते गेले तर तर आपण वर्षभर शोक म्हणून सण करायचे नाहीत, अमकं करायचं नाही वगैरे मलाही पटत नाही. जर नानांची तुम्हाला आठवणच ठेवायची असेल तर त्यांना आवडायच्या त्या गोष्टी करा, त्यांच्या नावानी गरजूंना मदत करा. आठवण ही सहज आली पाहिजे, त्यागातून, काही गोष्टी सोडण्यातून आली तर तो जबरदस्तीचा राम राम असतो. दिवाळीचा सण हा तर खरा अंधारातून रस्ता काढण्याचा. आपल्या दुर्गुणांवर विजय मिळवण्याचा उत्सव! आपल्या घरात मुलबाळ आहेत, त्यांना नाराज ठेवून नानांची आठवण काढलेली नानांनाही चालणार नाही आणि मलाही. आयुष्याचा जोडीदार गमावल्याच दुःख मलाही आहे, पण ते दुःख सतत उगाळल्याने कमी होणार नाही. शरीराने गेले तरी नाना आपल्यातच आहेत, त्यांच्या आठवणी, विचार शिकवण आपल्या सोबत कायम असणार आहेत.’


माई बोलत होती, अगदी मनापासून बोलत होती. आणि मुलांना तिच्या आवाजात, तिच्या चेहऱ्यात नानांचा आभास होत होता. तिच्या चेहऱ्यावर दिवाळीतल्या पणतीचे तेज पसरलं होतं. 

Thursday, October 20, 2016

निखळ आनंदाचा मंत्र

दसरा आणि दिवाळी मधल्या पंधरा दिवसांची मजाच वेगळी असते. एकीकडे नवरात्र, दसऱ्यातून मोकळं होता होता वेध लागत असतात, फटाके, आकाशकंदील, पणत्या, किल्ला, फराळ, नवीन कपड्यांचे. पूर्वी फराळाचे सगळं दिवाळी सोडून क्वचितच वर्षाकाठी केलं जायचं, त्यामुळे दिवाळीला ते करण्यातलं आणी खाण्यातलं नावीन्य टिकून राहिलेलं असायचं. आता वर्षभर दिवाळी असल्यामुळे नवीन कपडे आणि लाडू, चिवडा, चकली, अनारसं चं फारसं कौतुक उरतच नाही. नशिबानं रोजच आकाशकंदील लावत नाही किंवा पणत्या लावत नाहीत म्हणून त्याचं तर ओत्सुक्य अजून टिकून आहे. किल्ला देखील अनेक प्रशिक्षित बालसंगोपनतज्ञांच्या मुलांनी मातीत, पाण्यात खेळल्यामुळे त्यांची मानसिक जडण घडण नीट होण्यास मदत होते  असं ठासून सांगितल्यामुळ परत ‘डिमांड’ मध्ये आले. तरीही माती कुठून मिळणार, सगळं घाण होईल त्यापेक्षा आपण विकत किल्ला आणूया म्हणणारे ही असतातच.

दिवाळी साठी घर साफसूफ करताना अगदी माळे सुद्धा आवरायला काढले. या माळ्यांमध्ये एक जादूची पोतडी असते. अनेक आठवणी, अडगळी, मोसमी सामान शेजारी शेजारी दाटीवाटीन गुण्यागोविंदान राहत असतं. कधी खोक्यात कधी गाठोड्यात असलेल्या या सामानात अनेक तुटक्या, फाटक्या वस्तू असतात. खरंतर आठवणी पुसता येत नाहीत, विसरता येत नाहीत पण आपल्याला उगाच वाटत असतं या गोष्टींशी निगडीत आठवणी विरून जातील, हरवून जातील जर आपण हे टाकून दिलं तर... मग जुनी सांगाडा उरलेली बाहुली, कुठल्यातरी मैत्र दिनाला मिळालेली छोटेशी पोर्सेलीनची भेट वस्तू,  कुठल्यातरी प्रदर्शनातून आणलेल्या काही शोभेच्या वस्तू, जुनी हस्तलिखित, आजीच्या, आजोबांच्या जपून जपून ठेवलेल्या गोष्टी, जुन्या पाईपचा एक तुकडा, कुठला तरी बॉक्सचा उरलेला थर्माकोलचा तुकडा, एक्स्ट्रा म्हणून वर ठेवलेली बादली, फिरायला गेल्यावर तिकडून कोणी तरी आणून दिलेले शंख, आणि असंच काय काय, अजून जपून ठेवलेली शाळेतली कंपासपेटी, भेट म्हणून मिळालेल्या देवी देवतांच्या मुर्त्या, कशाकशावर फ्री म्हणून मिळालेल्या टिनपाट गोष्टी सारी अडगळ दर वर्षी उघडली जाते, प्रत्येक गोष्टीवरून हात फिरवला जातो, काही आठवणींचा उजाळा केला जातो, आणि मग नावापुरत्या दोन चार गोष्टी बाहेर काढून टाकून, झाडू फिरवून घेऊन , आवश्यक तिथं पुसून घेऊन उठत असताना, लेक आला. त्याच्या दृष्टीने हा सारा खजिनाच होता. आजवर त्याला या साऱ्या पसाऱ्या पासून लांब ठेवलं होतं. पण आज त्यांनी घुसखोरी करून प्रवेश मिळवला होता. आणि हा हल्ला परतवण अवघडच नव्हे तर अशक्य होतं. त्याच्या छोट्या डोळ्यात मला जणू विश्वाचं दार उघडल्याचा आनंद दिसत होता. तिथला रिकामं खोकं, पाण्याचा पाईपचा तुकडा, मुर्त्या, काही डबे, काठी, थर्माकोल जुने तुटके आकाशकंदीलकाय काय तरी त्यांनी उचललं त्यानी आणि मी नको नको म्हणत असताना खेळायला घेतलं. खरं तर तो कचराच पण मला टाकवत नव्हता आणि ठेववत ही नव्हतं. पण मुलानी तो प्रश्न काही सेकंदात सोडवला होता. मुलांसाठी आयुष्य किती साधं सरळ असतं. त्यांना कधीच कुठे कचरा दिसत नाही. जे काही मिळेल त्यातून ते नवा खेळ मांडतात. महाग मोलाची खेळणी त्यांना जेवढी प्रिय असतात तेवढीच ही टाकाऊ खेळणी.

थोड्यावेळानी मुलांनी त्या कचऱ्यातून वसवलेलं एक गाव बघून वाटलं. आपल्या मनातल्या कचऱ्यातून, द्वेषातून, रागातून आपण असंच काही का नाही करू शकत? किती गोष्टी धरून ठेवतो. मनाचा माळा भरून वाहत असतो, आपण उगाचच अपमानाचे, भांडणाचे क्षण मनात धरून ठेवून बसलेलो असतो. कधी तरी ते साफ करावे लागतात, नाहीतर जाळी जळमट साचून, धूळ बसून मनाचा पोट माळा भरून रहाटू, तिथे मग चांगल्या आठवणी, भारलेले क्षण, कौतुकाची फुलं काही काही ठेवायला जागाच शिल्लक राहत नसते. मग या दिवाळीला हा मनाचा माळा साफ करायला सुरुवात करूया? कदाचित ही अशी साफसफाई केल्यावर मिळणारा दिवाळीचा आनंद हा निखळ आनंद असू शकेल.  


Monday, October 17, 2016

चौथा कोन

‘दुसऱ्या वेळी आई होण्याचा आनंद वेगळाच असतो, अजून एक जीव पोटात वाढवण्याचा आनंद वेगळाच असतो.’ जाहिरातीमधील ती एकदाच आई झालेली प्रसिद्ध अभिनेत्री सांगत होती. पण खरेच जर अस असेल तर ही बयाच दुसरा चान्स का घेत नाही? रामा रामा हिला काय जातंय सांगायला, पोरं सांभाळायला बायका असतील. हिनं पोरासाठी एक तरी रात्र जागवली असेल का? आमच्या मेल्या ३६५*२ रात्री फक्त पोरांच्या रडण्यात, चड्ड्या बदलण्यात, आणि पोरगं उठणार तर नाही ना या धास्तीत झटपट उरकून टाकण्यातच गेल्या. आता सवय झाली म्हणा किंवा पोरगं जरा मोठं झालंय त्यामुळे रात्री बर झोपते, पण तरीही मध्ये मध्ये एखादी रात्र निघतेच, पोरगं जागवतच.
हिला काय जातंय म्हणायला सेकंड चान्स घ्या म्हणून, सगळी सुखं असून ही एकातच गार!
‘अग पण एकाला दोन असलेली बरी, एकमेकांच्या नादानी खेळतात, आणि पुढ मागं एकमेकांना साथही देतात.’
-आणि नसलेल्या संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठली तर?
‘पण मुलांना सोबत लागते ना? खेळायला कोणीतरी लागतं, किती वेळा मुलं जाणार दुसर्यांच्या घरी  खेळायला?’
-वेळ आहे कुठं आताच्या मुलांकडे, शाळा, बाकीच्या अॅक्टीव्हिटीज. एकवेळ झोपले नाहीत तरी चालेल, पण मुलांना डान्स, गाणं, स्केटिंग, स्विमिंग, बॅडमिंटन , पेंटिंग, योगा आणि अम आणि तम आलंच पाहिजे
‘आपल्यासारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांची संख्या वाढली पाहिजे, ते *** धर्माचे लोक बघा, एकेका घरात चार चार पाच पाच मुलं जन्माला घालतात, बाईच्या हातात एक, कडेवर एक, आणि पोटात एक असतं. अशानं आपला, धर्म, जात संकटात येईल.’
-या असल्या झ्याट समजुतींपायी आम्ही आमची परवड का करायची? धर्म जात टिकतात ते त्यांच्या मूल्यांमुळे, लोकांमुळे नाही, आमचा नाही बाई विश्वास या असल्या कश्याकश्यावर.
‘म्हातारपणाची काठी म्हणून अजून एक मूल असू द्यावं, काय सांगावं एकानी नाही बघितलं तर दुसरा बघेल, किंवा एकावरच का भार टाकायचा? दोघं आलटून पालटून बघतील.’
-झालंच बाजारात तुरीची गत, आणि कशावरून दोघंही बघणार नाहीत, ती ही एक शक्यता आहेच ना, आम्ही काही पोरांवर अबलंबून राहणार नाही, आम्ही त्याला वाढवलं म्हणून त्यानं आम्हाला म्हातारपणी बघायचं असं काही कॉन्ट्रॅक्ट आम्ही जन्माच्यावेळी केल नव्हत.
‘अय्या एकाच मुलगा, पण घरात मुलगी हवीच, दुसरा चान्स घ्या की घराला कसं घरपण येतं.
-म्हणजे आपल्याला हवं ते अपत्य ठरवून जन्माला घालता येत? कित्ती छान पण जर चुकून परत मुलगाच झाला तर? आणि घराला घरपण द्यायला फर्निचर पुरत असं मला वाटत होतं.
‘एकाला दोन पाहिजेतच, उद्या देव न करो पण जर तुमच्या एकुलत्या एका मुलाला काही झालं तर? दुसरं मूल तरी सोबत असले ना? त्यासाठीच पूर्वीची लोकं भरपूर मुलं होऊ द्यायची. एक दोन तरी धडधाकट जगातील म्हणून.
-हम्म्म्म जे जेव्हा व्हायचं ते तेव्हा होणारच आहे, आणि जर या दुसऱ्या मुलाला जन्म देताना काही कॉम्पलीकेशन्स होऊन  मी मेले तर? दोन्ही पोरं किंवा एक पोर तर नक्कीच अनाथ होईल ना.
‘पहिल्यावेळी पहिलेपणाचा आनंद असतो, पण दुसऱ्यावेळी डोळस पालकत्व करता येतं.’
-आणि मग जर मुलांनी आमच्यावर भेदभाव केल्याचा आरोप केला तर?
या सगळ्यावर कडी करणारी एक जमात असते, जे शास्त्र, वैद्यक शास्त्राच्याही पल्याड पोहोचलेले असतात.
तुम्ही ते चायनीज कॅलेंडर का नाही बघत? त्यात वय घालत की कोणत्या महिन्यात मुलगा, मुलगी होऊ शकतात हे कळत. म्हणजे कसं तुम्हाला प्लॅन करून कुटुंब चौकोनी करता येतं.’
-अरे वाः हे म्हणजे शेताले पीक काढण्यासारखच झालं की, आम्ही पहिले मोत्याची शेती करून बघतो, आणि मग या माणसांच्या शेतीकडे वळतो. चायनीज लोकं हेच वापरून मुलं जन्माला घालतात का?
‘मग अजून एकांनी ‘योगा’योगाची गोष्ट सांगितली. तुम्ही अमुक स्थितीत करून बघा, नक्की इच्छित फळ प्राप्ती होईल.’
या अशा सगळ्या सूचना ऐकून तिला वाटायचं खरंच घेरी येईल आता.
आई, सासू दोघींनी कधी आडून, कधी प्रत्यक्ष सुचवून झालं होतं, सगळी शक्य तेवढी कारण, समजुती सांगून झाल्या होत्या.
आपण एक आई वडील, एक नवरा, त्याचे एकच  आई वडील, एक मूल यात खुश असताना लोकांना काय पडलं आहे माझ्या न जन्मलेल्या मुलाबद्दल, असं तिला प्रत्येक सल्लाळूना विचारावंसं वाटायचं.
चौकोन कसा सम असतो, त्रिकोणापेक्षा चौकोन बरा आता तर लोकांनी सुखी संसाराचं गणितही मांडायला सुरुवात केली होती.

आजी आईपासून सुरु झालेली ही साखळी एखादा संसर्ग लागावा तशी बायकांमध्ये सहज लागत जाते. पण त्यातच एखादी ही साखळी तोडणारीही भेटते, कशाला हवं दुसरं मुल, एक झालं बास की. तर एखादी म्हणते बाई आम्ही पडलो फशी सल्ल्यांना तू  काठावर आहेस तेच बरंय. तेव्हा तिला सांगावस वाटतं, मी काही नाही काठावर या लोकांनी आभास केलास माझ्या काठावर असण्याचा.
पण मग कधीतरी घरातलं पात्र बोलायला लागात, त्या अमक्या तमक्याला भाऊ झाला, त्या अलाणी फलाणीला बहिण झाली, चेहऱ्यावर मग चा प्रश्न ठेवून मी बघते, पण मग तोच बघतो, पण आपल्याला तर बाळ नकोय ना, मी होतो ना बाळ, मग कशाला हवंय बाळ परत. सुटकेच्या निःश्वासाने मी माझं लेकरू ते म्हुणुन घट्ट मिठी मारते.

प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याची घडी बसवण्यापेक्षा दुसर्याचे आयुष्य मार्गी लावण्यात खासा रस असतो. शाळेत जा, शिका, नोकरी करा, लग्न करा, मूल काढा, एक पुरेसं नाही दोन काढा, जणू काही आखलेला अल्गोरिदम. पण हा अल्गोरिदम नाकारता नाकारता जेव्हा ती प्रतिबिंब होऊन आरशात उमटते आणि  विचारते पण तुला खरच हा मातृत्वाचा आनंद परत नको आहे? ते टवारलेल पोट, ती जुळलेली नाळ, स्वतःविषयी जास्तच वाटणारी आस्था, आपल्यातून प्रगटणारी आपलीच मूर्ती स्तन लुचणारे पिटुकले ओठ, तो नव्हाळ्या देहाचा स्पर्श खरंच हवा आहे ना तुला?
तो जगस्त्रीचा संसर्ग देहाला लागतोय की काय अशी शंका येताच मनातली स्त्री सांगते हा अनुभव काय फक्त देहातूनच घ्यायचा असतो का? आणि अनुभव घेण्यासाठी जबाबदारीही घ्यावी लागते त्याचे काय? हे पलायन नाही हा तर सुटकेचा मार्ग आहे.

त्याच वेळी अजून एक कुठली तरी विचार करत असते, पण गर्भाशयातून एक असो, दोन असो अनेक असो,  मूल काढण म्हणजेच स्त्री जन्माची इतिकर्तव्यता असते का? हा जिचा तिचा प्रश्न असायला हवा ना? हा तिचा प्रश्न तिच्यापर्यतच असला तर कधी आरशातली स्वप्नाळू प्रतिमा जिंकते तर कधी आरशाबाहेरची व्यवहारी, कठोर जिंकते पण अनेकदा तिचा प्रश्न तिच्यापर्यंत येईपर्यंत मधल्या अनेक सल्ल्यांनी त्याचे उत्तर दिलेलं असतं आणि जीव जन्माला आलेला असतो. हारलेल्या स्वप्नाळू जमतात अशा यशस्वी जीवांच्या स्वागताला आणि सरकवू पाहतात पुढे त्यांची अपूर्ण स्वप्ने, पसरवत राहतात सल्ले वाट पाहत राहतात कुठेतरी त्यांना वाट सापडल्याची आणि शोधात राहतात आरसे तिला तिच्या नैसर्गिक प्रेरणा दाखवणारे.... !!!!!!!!!!!!!!!!

लिहिलेलं तिनं परत वाचलं, त्यात काही नवीन नव्हत, म्हणजे स्वतः लिहिलेलं ते परत एकदा वाचायची. पण ते आवडेल याची खात्री नसायची म्हणून कधी कधी वाचण टाळायची, पण आज परत वाचल्यावरही तिला वाटलं, हे मुद्दे झाले, बाकीचे कुठे आहे? मग तिनं ती फाईल अर्धवट म्हणून नाव घालून ठेवली.

रात्री झोपेमध्ये अचानक तिला काहीतरी आठवलं, काय आठवलं ते आठवण्यासाठी ती उठून बसली, आणि चालत चालत आरशासमोर जाऊन बसली, खरतर तिला जायचं होतं लॅपटॉपसमोर. पण आत्ता तिला एकदम मनात काय चाललाय बघण्यापेक्षा चेहऱ्यावर काय दिसतं ते बघावसं वाटलं. अर्धवट झोपेतून उठल्यावर आपण अशा दिसतो तर, आपल्या रोजच्या चेहर्यापेक्षा यावर एक वेगळा भाव दिसतो, प्रेम, राग, मोह, हेवा, आनंद, किळस यापेक्षाही वेगळंच काहीतरी, अभावीन भाव, कित्येकवेळा त्याने हा भाव बघितला असणार, तिला गादीवर घोरत झोपलेल्या त्याचा हेवा वाटला, अशा अर्धवट झोपेत कित्येक वेळा त्यानं करून घेतलं पण सांगितलं नाही आपल्या चेहऱ्यावरच्या त्या भावाबद्दल, तिच्या चेहऱ्यावर एकदम हेवा दाटून आला, पण तो वर बघतो तरी कुठे, गळ्याच्या खालीच तर त्याची नजर घसरत असते, एकदम उपहासाचे हास्य जिवणीवर पसरलं, तिला एकदम कुतूहल वाटलं हा कसा दिसत असेल अशा अर्धवट झोपेत? ती लगबगीनं त्याला बघायला गेली, त्या वेळी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर बेफिकिरीचा पुरुषी भाव होता, म्हणजे पुरुषी बेफिकीरीत एक मग्रुरीचा आवेश, आग्रह असतो, तर बायकी बेफिकीरीत जिंकल्याचा, आवेश, सिद्ध केल्याचा भाव असतो. मग ती त्या दोघांच्या बाळाच्या चेहऱ्यावरचा भाव पाहायला गेली. तिथे तिला दिसला जग समजून घेण्याचा भाव, त्यात प्रेम होतं, हेवा, मत्सर, राग आनंद सगळच होतं. मग ती परत मनाच्या आरशात डोकावण्यासाठी लॅपटॉपसमोर बसली. बघू काय लिहायचंय असं स्वतःलाच विचारायला लागली, मग तिनी न ठरवूनही अर्धवट ची फाईल उघडली, आणि विचार करत बसली, कोण असेल ही, हिला खरंच हवं असेल का दुसरं मूल? आणि मूल देणाऱ्या तिच्या नवऱ्याला काय वाटत असेल? एक मूल देऊन वंशसातत्य केल्याचा  समाधान त्या दोघांना असेल तर मग खरेच कशाला हवं असेल दुसरं मूल. दमून गेलीही असू शकेल त्या एकाच मूलात. पण जर ती समाजाचा विचार करणारी भित्री सशीण असेल तर मग घालेल अजून एक जीव जन्माला, असे पहिल्यांदाच होत होतं की तिला लिहिताना असे प्रश्नांचे अडथळे समोर येत होते. छे आपण नेहमीसारखं तो ती आणि त्यांच्या आयुष्यातला तिसरा यांच्या गोड गुलाबी कथा, नाहीतर सासू आणि सून यांचे दळण दळाव, या असल्या भुक्कड, प्रश्न पाडणाऱ्या कथांच्या गावाला जाउच नये असे ठरवत तिनं एक नवीनच फाईल उघडली आणि लिहायला सुरुवात केली,

किती छान असतं, चौकोनी कुटुंब असणं, तिच्या मांडीतल्या चिमुकलीचा हात हातात घेऊन झोपलेल्या तिच्या मोठ्या मुलाकडे बघून तिला अगदी कृतकृत्य वाटत होतं....
आणि मग सराईतपणे तिची गोष्ट झरझर फाईल मध्ये उतरत होती, तिच्या चेहऱ्यावरचा अभावीत भाव गळून पडून तिथ वात्स्यलाचा समुद्र जमला होता, त्याच समुद्रात थोडा वेळ तरी बाकीचे सगळे भाव बेटासारखे तरंगणार होते!!!!!!  






Monday, October 10, 2016

तू झाली आकाशाएवढी....

ती जन्मली तीच विमानाच्या आवाजात, घड्याळ बघण्यापेक्षा त्यांना आकाशातल्या विमानांनीच वेळ कळायची. उठता बसता ऐकू येणारे ते विमानांचे आवाज त्यांच्या आयुष्याचा जणू भाग होते. ते आवाज नसले तर त्यांना काही तरी चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं. लहानपणाचा त्यांचा आवडता खेळ होता विमानाच्या आवाजावरून कोणते विमान असेल हे ओळखायचं. मग खेळ खेळताना सुद्धा ते सगळे वेगवेगळ्या विमानाच्या कंपन्यांच्या नावानीच खेळायचे. तिला विमान बघण्याचं कुतूहल आता उरलं नव्हतं. विमानं बघणं सरावाचं झालं होतं. आकाश व्यापून राहणारी विमानंच तिच्या स्वप्नात यायची. 

आई जवळच्या टॉवर मध्ये कामाला जायची. बाप शुद्धीवर असला तर विमानतळावर जायचा कामाला साफसफाईच्या, ती आईसोबत कधी कधी जायची कामाला, तेव्हा वरून सगळं खालचं इतकं छोटं छोटं दिसायचं की तिला ते सगळं एखाद्या खेळण्याचा भाग वाटायचा. आई ला शाळेचं महत्व माहीत होतं, त्यामुळे ती मारून मुटकून तिला शाळेत पाठवायची. बाप दिसायला अगदी गोरागोमटा पण तिची आई मात्र जरा सावळेपणाकडे झुकलेली. तिनी बापाचा रंगही घेतला नव्हता आणि स्वभावही नाही. त्यामुळे आईचं सांगणं पटायचं पण कधी कधी वस्तीतल्या मुलांबरोबर खेळावस वाटायचं. पण मग आईनी पाठीवरून हात फिरवला नीट समजून सांगितलं की ते ही पटायचं.

सगळ्यांच्याच घरासारखं त्यांच्या घरातही अधूनमधून भांडणं व्हायचीच. महिन्याच्या अखेरीला ओढ गस्ती असायचीच. तिची आई शाळेच्या पायऱ्या चढली होती, लग्न झालं नसतं तर ती देखील अजून काही तरी आयुष्यात बरं करू शकली असती. पण आई वडिलांच्या हट्टापुढे काही चाललं नाही तिचं. लग्न झालं, दारुडा नवरा गळ्यात पडला, त्याला सुधरवायचा तिनी लाख प्रयत्न केला पण सारे प्रयत्न पाण्यातच जात होते. कसं तरी करून तिनी या एका मुलीवर थांबवलं होतं. एकाच मुलाला व्यवस्थित शिक्षण द्यावं, उगाच मुलांची भाऊ गर्दी काय कामाची. तसंही तो घरी काही पैसे देतच नव्हता त्यामुळे त्याला तर बरंच वाटत होतं. नशिबानं त्याला मुलगा मुलगी असं काही वाटत नव्हतं. त्यामुळे त्यानी कधीही तिला त्यावरून बोल लावला नव्हता. तसा तो ही बरा होता, पण आयुशायातल्या नकोशा गोष्टी विसरण्यासाठी त्याल दारूचा आधार घ्यावासा वाटत होता. आणि आधी थोडी कधी माद्धी लागणारी दारू नंतर सवयीची कधी झाली होती, त्यालाच कळलं नव्हतं. मग त्याच नशेत मारलेलं त्याला दुसऱ्या दिवशी आठवलं की वाईट वाटायचं मग तो बायकोला मुलीला सुधारण्याची स्वप्न दाखवायचा, आकाशाएवढी.

ती ७, ८ वी मध्ये असताना कधी तरी बाप गेला, पण आई होतीच खंबीर, तिनी तिची स्वप्न रुजवली होती पोरीच्या डोळ्यांमध्ये. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा आत्मविश्वासही मिळवून दिला होता आईनी. रंग रूपापेक्षा शिक्षण महत्वाचं, शिक्षणाच्या जोरावर काय वाट्टेल ते मिळवता येतं. तिला कायम विमानांचा आवाज भुरळ पाडायचा. तिला कायम वाटायचं विमान आतून कसे दिसत असतील. विमानात बसल्यावर आपण जेव्हा आकशात उडत असू तेव्हा पक्ष्यांसारखं मोकळं, स्वतंत्र वाटत असणार. जग अगदी छोटं इवलालं वाटतं असणार. विमानातून उडणाऱ्या माणसांबद्दल तिला कायम हेवा वाटायचा. कसे नशीबवान असतील हे लोक. मोठ्ठी मोठ्ठी श्रीमंत लोकच जातच असतील अशा विमानांमधून. आपण एकदा तरी विमानातून प्रवास करावा वाटायचं तिला. आणि गंमत म्हणजे हेच स्वप्न तिची आईपण बघायची.

आई कष्ट घेत होती, आणि ती शिकत होती. आईचं आणि तिचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं, आकाशाला साद घालायची होती. जेव्हा स्वप्न मनापासून बघितलं जात, जोपासलं जातं, त्तेव्हा त्याच्या वाटा माहीत नसल्या तरी वाटाडे मिळून जातात, स्वप्न कधी एकाचं नसतं, त्याच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, वातावरणामध्ये, घरादारात सगळे मिळून ते स्वप्न बघत असतात. त्यामुळे स्वप्न पूर्ण होताना आधार असतो या साऱ्यांचाच. आत्मविश्वासाच्या जोरावर तिनी शिक्षण पूर्ण केलं आणि आकाशाला गवसणी घालण्यासाठी तिनी तिचे प्रयत्न सुरु केले, विमानतळाच्या शेजारच्या झोपडपट्टीतली एक मुलगी जेव्हा विमानतळावर हवाईसुंदरी म्हणून जाते, तेव्हा तिनी आधीच जग जिंकलेलं असतं. आकाशाचा रंग तिच्या डोळ्यात उतरलेला असतो. ती एक मुक्त पक्षी झालेली असते. जगण्यातला खरा आनंद तिला उमगलेला असतो, आयुष्याची सार्थकता तिला कोणत्याही पुस्तकात वाचल्याशिवाय माहित झालेली असते.


सारं आकाश व्यापून अवकाशाएवढा झालेला आकाशी रंग म्हणजे स्वप्नपूर्तीचा रंग. आत्मविश्वासाचा रंग, जग जिंकल्याचा रंग असतो.   

Sunday, October 9, 2016

मन जाम्भूळले......

तू गेलास तेव्हा कलती उन्ह होती, आणि मी खिडकीपाशी बसलेली होते,
तू काहीच बोलला नाहीस, भांडला पण नाहीस, साधा फोन पण केलास नाहीस
खरं तर आपलं भांडण मुळी झालंच नव्हतं,
अबोला कोणी धरलाच नव्हता, तरी सगळे संवाद गळून पडले.
पूर्णविराम ना तू दिलास ना मी दिला तरी वाक्य संपूनच गेली
मला तुला सांगायचं होतं आपल्या घरात व्यालेल्या मांजरीच्या पिल्लांबाबत,
दाखवायची होती गुलाबाला आलेली कळी,
पाठवायचे होते माझे मीच काढलेले फोटो,
घालायचा होता वाद अनंतातल्या अणुरेणूंचा,
पुरणपोळीची पैज तू विसरला असलास तरी मी नव्हते विसरले,
पुढच्या वेळी करू म्हणून करायच्या कित्येक गोष्टी राहिल्या की रे तशाच...
तरी मी प्रत्येक वेळी सांगायचे असं उद्यावर काही ढकलू नाही
पण तू उद्यालाच उद्यावर ढकलणारा
तुला कधीच फिकीर नव्हती परवा काय होईल याची
आताचा क्षण ताबडतोब जगणारा तू,
आणि मी पुढच्या कित्येक जन्मांचे आराखडे बांधणारी
मी मुळातून, जन्मजात घाबरट आणि तू शूर वीर सीमेवर जाऊन लढणारा.
मी भाळले तुझ्यावर, तुझ्या शौर्यावर, तुझ्या मोकळ्या हसण्यावर,
तुझ्या प्रेमावर, तुझ्या गालावरच्या खळीवर, तुझ्या रुबाबदार युनिफॉर्मवर
कशावर मी भाळले मला आजपर्यंत कळलंच नाही.
अशाच एका सरत्या संध्याकाळी याच खिडकीत बसून,
फुलत्या जॅकरँडाच्या साक्षीनं आपण वचनं दिली होती एकमेकांना
मी आहे, खिडकी आहे ,आणि रस्त्यावर पसरलेला आहे
जॅकरँडाच्या फुलांचा गालीचा..

मी नाही ढाळले अश्रू, अगदी तू असा समोर शांत झोपलेला होतास,
मी तुझ्याकडे एकटक बघत होते पण तरीही पाण्याचा एक थेंबही नाही पडू दिला.
तू आहेसच अरे इथे माझ्यासोबत, माझं अस्तित्व नाही तुझ्याखेरीज
खिडकीत बसून मी न गाळलेले अश्रुकढ ऐकले जॅकरँडानी
तेव्हापासून तो दर वर्षी वसंतात फुलतो, झुरतो आणि
मग रस्त्यावर जांभळे अश्रू सांडतो...

लाल आणि निळा रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा जन्मतो जांभळा रंग. लाल रंग उष्ण आणि निळा रंग शीत रंग समजले जातात. आधुनिक समजानुसार पुरुषांसाठी निळा रंग तर स्त्रियांसाठी गुलाबी रंग समजला जातो, जांभळा रंग आहे या दोन्ही रंगांचे बेमालूम झालेले मिश्रण. म्हणजे या जांभळ्या रंगाला साऱ्या मानव जातीचा रंग म्हणलं तरी चालेल.


Saturday, October 8, 2016

मनमोराचा पिसारा फुलला...

एकेक करत सगळे मित्र मैत्रिणी उठून गेले आणि ते दोघेच राहिले होते. तशा गप्पा संपतच नव्हत्या. पण असे सगळे एकामागे एक निघून जात होते, तिला जरा विचित्र वाटत होतं, पण तो एकदम कूल होता. आतापर्यंत तिच्या दोन कॉफी आणि त्याचे तीन चहा पिऊन झाले होते. सगळे असे एकदम गेल्यामुळे जरा गप्पांना ब्रेक लागला होता. त्याला काहीच त्यात गैर वाटत नव्हतं. तिनी आपलं दोनदा आटोपतं घ्यायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी अजून एक चहा मागवून तिला थांबवून घेतलं होतं.
तो: बस ना ग काय घाई आहे जायची?
ती: तशी घाई काही नाही, पण असे आपण दोघंच काय गप्पा मारायच्या.
तो: का मी इतका बोअरिंग आहे. बाई मला उत्तम गप्पा मारता येतात हे तुला गेल्या ४ वर्षात कळलं नाही का?
ती: अरे तसं नाही काही पण आपण दोघेच असे गप्पा मारत कधी बसलो नाही ना त्यामुळे म्हणलं तसं. आणि तू तर आपल्या ग्रुपचा CG आहेस.
तो: CG? हे काय नवीन
ती: चीफ गप्पाड्या
तो अगदी खळखळून हसला, की त्याला ठसकाच लागला. तेव्हा तिनी त्याच्या पाठीवर हात फिरवला तेव्हा त्याला अगदी मोरपीस फिरवल्यासारख वाटलं.
ती: मग आता काय पुढच्या महिन्यात ट्रेनिंग सुरु ना?
तो: हो ना आजवर कधी घर सोडून राहिलो नाही आणि आता एकदम नवीन नोकरी, नवीन गाव नवीन माणसं कसं होईल काय माहिती.
ती: तुला काहीच प्रश्न येणार नाही रे, तू असा मित्र जमा करून तिथेही तुझे जग तयार करशील.
तो: तू किती सहज या नव्या गावात आमच्यात मिक्स झालीस. आम्हाला कळलंच नाही, खरंतर तुझी बहिण आमची मैत्रीण पण तू कधी आमच्यात आलीस आमची मैत्रीण झालीस कळलंच नाही.
ती: बर बर. आता मग मैत्रीण म्हणूनच सांगते हा चहा संपला की निघुयात.
जरा इकडे तिकडे बघत चहाचा घोट घेत त्यानी घसा खाकरला आणि शेवटी हिम्मत केलीच,
“ चहाला सोबत दिलीस तशीच सोबत आयुष्यभर देशील का?”
एकदम एखादा बॉम्ब गोळा पडावा तसे त्याचे शब्द तिच्या कानावर आदळले,
“क्काय?” खुर्चीतूनच ती ओरडली.
तो: अग हळू लोकांना वाटेल बिल मी तुला द्यायला सांगितलं आहे.
ती: अरे काहीही काय.
तो: म्हणजे हे माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की दुसऱ्या?
त्याच्या हृदयातली धडधड तिला शब्दातही जाणवत होती. पाण्याचा एक घोट घेत ती त्याच्या नजरेला नजर लावत होती.
ती: अरे म्हणजे तू इतकं अनपेक्षित विचारलं आहेस की मला काहीच उत्तर आत्ता सुचत नाहीये. तुला उत्तर लगेच हवं आहे का?
तो: नाही काही हरकत नाही, तू विचार करायला १० मिनिटं घे, तोवर माझा चहा देखील संपेल.
तिनी जरा वैतागानीच त्याच्याकडे पाहिलं, आणि म्हणाली,
“अरे दहा मिनिटं काय? हा काय शाळेतला एखादा प्रश्न आहे का? सांगेन ना दोन दिवसात?”
“क्काय? दोन दिवसात?” आता ओरडायची पाळी त्याची होती.
कसे बसे दोन दिवसातले ४८ तास त्यानी काढले, आणि त्याच ठिकाणी, तयच टेबलवर तिची वाट पहात बसला होता.
सुरेखसा मोरपिशी रंगाचा कुर्ता घालून, कानात मोरपिसाचे कानातले घालून ती अगदी ठरल्या वेळेला आली होती. त्या दिवशी तिला बघून आपल्या निर्णयाची खात्री त्याला पटत होती, आता ती काय म्हणेल याची त्याला खूप भीती वाटत होती. आयुष्यात आजवरचे कोणतेही निर्णय चुकले नव्हते, शिक्षण ,मग नोकरी सारं कसं आखल्या सारखं चाललं होतं. घरच देखील सारं व्यवस्थित होतं, नाही म्हणण्यासारखं काहीच कारण नव्हतं, पण तरीही पोरींचा काही भरवसा नाही म्हणून तो काळजीत होता.  
नेहेमीसारखा तो चहाचा कप घेत बसलाच होता.
ती: अरे वाह
तो: आता यात वाह काय? मग काय ठरवलास? एकटाच चहा घेऊ कि?
ती: फक्त एका अटीवर की तू चहा पीत असताना मी कॉफी पिईन चालेल ना?
तिचा हात हातात घेतला तेव्हा तिच्या ड्रेसवरच्या मोरपिशी रंगातले मोर त्याच्या डोळ्यात उतरले होते. आता आयुष्यभर प्रेमाचा मनमोर त्याचे रंग त्या दोघांच्या आयुष्यात खुलवत राहणार होता.

मन प्रसन्न असलं की मनमोर फुलतोच, मोराचा पिसारा फुलला की सारे रंग आसमंतात उधळले जातात. जेव्हा लांडोरीला साद घालायची असते तेव्हा मोराला माहित असतं कोणालाही भुरळ घालायची तर पाहिजेत अस्सल रंग, हा घेऊ की तो घेऊ असंच लांडोरीच होत असणार. आयुष्य तरी काय असतं , हे करू की ते करू या प्रश्नांची उत्तरं शोधण तर असतं. रंग तर निमित्त असतात आपल्या भावना दाखवणारे. मोराच्या पिसाऱ्यावर एक रंग नसतो, ती असते रंगाची बेमालूम रंगारंग, म्हणून मोरपंखी रंग हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, तसाही प्रत्येकाचा मनमोर वेगळा असतो.. आजचा मोरपंखी रंग अशा साऱ्या मोरपिशी आठवणींसाठी...    

Friday, October 7, 2016

हळवा हिरवा

मस्त मनासारखी हिरवी गर्द इरकल  साडी नेसून गळ्यात सासू बाईंनी खास घालायला दिलेली मोहनमाळ, आईनी दिलेली ठुशी, इकडच्या स्वारीनी आणलेली नथ, मनसोक्त घातलेलं गजरे, कपाळावर लावलेली चंद्रकोर, कानात सोन्याची कुडी  कशी अगदी दृष्ट लागावी अशी दिसत होती ती. कौतुकाच्या सोहळ्यात ती तर अगदी गुंगून गेली होती. त्या क्षणी जगातली सर्वात सुखी स्त्री तीच होती. सजवलेल्या झोपाळ्यावर बसून परडी भरवून घेताना तिला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं होतं. हलकेच पोटात होणाऱ्या गुदगुल्यांनी चेहऱ्यावरचं तेज अजूनच वाढत होतं. हातात परडी घेऊन जेव्हा ती टवरलेल्या पोटानी ओटी भरायला बसली होती तेव्हा एखाद्या देवीचं तेजच तिच्या चेहऱ्यावर होतं. नवव्या महिन्यातली भरल्या दिवसांची गर्भारशी ही एक वेगळीच स्त्री असते. ओटी भरायला आलेल्या प्रत्येकिनी आईला, सासूला तिची दृष्ट काढायला सांगितली होती.  

तशी ती सुखीच होती, बाकीच्या मैत्रिणीसारखा तिला सासुरवास काही खास नव्हता, अगदी सासुरवास म्हणावा असं काहीच नव्हत. सासरी कोणी मुलगीच नव्हती त्यामुळे मुलीशी कसं वागायचं ते सासूबाई सोडून कोणाला माहीतच नव्हतं, त्यामुळे लाड ही भरपूर झाले आणि कुचंबणाही बऱ्याच वेळा झाल्या. पण सगळं तसं चांगलच होतं. मग त्यात हे सुख दाराशी आलं, दिवस गेले हे कळल्यापासून तर घरीदारी निव्वळ कौतुक सोहळाच होता. मागच्या दोन पिढ्यात कोणी मुलगीच नव्हती आणि सासूबाईच्या लग्नाआधीच त्यांची सासू गेली होती त्यामुळे सासूचे डोहाळे जेवण काही झाले नव्हते. म्हणूनच त्यांनी सुनेच्या डोहाळजेवणाचा घाट घातला होता. स्त्री मुळातच हौशी असते, त्यात संसाराला फुटणाऱ्या नव्या पालवीचे कौतुक करण्यात कोणत्याही नात्याचे अडसर येत नाहीत. पहिलेपणा असेल तर साऱ्या कुरबुरी , हेवे दावे देखील विसरले जातात. कोंबाला फुटणारी कोवळी पानं मातीतून जेव्हा डोकं वर काढतात तेव्हा तो हिरवा रंग आयुष्यातल्या संघर्षातून उभं राहण्याची प्रेरणा देत असतो.

डोहळेजेवणाचा सगळा सोहळा संपून दुसरा दिवस सुरु होण्याच्या आधीच तिला कळा सुरु झाल्या, आणि सुरु झाला एका नव्या जीवाच्या जन्माचा सोहळा. पण ते बाळ रडलंच नाही आणि त्यामुळे नंतर सारे रडले. ते बाळ रडलं असतं तरी सारं घरदार त्याला शांत करायला धावलं असतं पण काही क्षणासाठी देखील ते बाळ रडलंच नाही आणि जीवनाच्या सोहळ्याला मुकलं. मग सारे तिचं रडणं थांबवायला धावले. पहिल्या गोष्टीचं अप्रूप जास्त असतं, इथं तर पहिलं मातृत्वचं गळून पडलं होतं. नंतर सुद्धा कित्येक दिवस तिच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. नंतर काही महिन्यानंतर निसर्गधर्मानी त्याचं काम चोख केलं होतं, दुसरा डाव तिच्या ओटीत पडला होता. पण यावेळी सासुबाईनी सारी सूत्र हातात घेऊन पाच महिन्यापर्यंत कोणालाच कळू दिलं नव्हतं. दुसऱ्या डोहाळेजेवणाची पद्धत नसल्यामुळे यावेळी ते ही करण्याचा प्रश्न नव्हता. घरीच ओटी भरताना त्यांनी सक्त ताकीद दिली होती, हिरव्या रंगाची साडी, चोळी काहीच नको. यावेळी मातृत्व, नशीब जे काही असेल ते बलवत्तर होतं, त्यामुळे मूल रडलं आणि सारं घरदार हसलं.  त्यानंतर घरात अजून दोन मुलं आणि शेवटी घरपण पूर्ण करणारी मुलगी देखील झाली. पण सासुबाईनी तिची ती हिरवी इरकल आतच ठेवून दिली, आणि सक्त हुकुम दिला, यापुढे या घरात ना मुलीचं, ना सुनेचं डोहाळेजेवण होणार. हिरवी साडी कोणीही विकत घेणार नाही, आली तर नऊ महिने कोणीही घालणार नाही. प्रत्येक वेळी विषाची परीक्षा घ्यायची गरज नसते, आधीच्यांनी घेतलेल्या परीक्षेतून आपण शिकायचं असतं.

ती हिरवी रेशमी इरकल कपाटातून काही काळ उन खाण्यासाठी तेवढी बाहेर याची, त्याच्यासोबत जागायच्या तिच्या आठवणी. मुलं मोठी झाली, सुना आल्या, लेकही लग्नकरून  तिच्या घरी गेली पण घरात हिरवी साडी, कापड कधी घेतलं नाही. मुलांना मुलं झाली पण डोहाळेजेवण नाही झालं, मुलीच्या वेळीस तिला लेकीचा कौतुक करावं खूप आतून वाटलं, पण तिच्याबरोबर जे काही झालं ते आठवून ती शांतच बसली. नंतर कधीतरी तिनी ती हिरवी साडीच लेकीला देऊन टाकली, नकोच ती साडी घरात, नकोच त्या आठवणी आणि आतून एक खोटं समाधान आपण लेकीला हिरवी साडी देऊन तिची ओटी भरल्याचं. लेकीनीही आई आजीचा मान ठेवत ती साडी तशीच कपाटात ठेवली होती. आईसारखं ती देखील कधीतरी ती साडी उन्ह दाखवायला बाहेर काढायची, आणि न जगलेल्या भावासाठी भावूक व्हायची आणि ती साडी परत आत ठेवून द्यायची. चांगल्या रेशमी साड्यांना कधीही मरण नसतं. त्या विस्मृतीत जातात, विरतात पण मरत नाहीत. आजीची साडी नातीपर्यंत प्रवास करून आली होती. तशीही ती साडी नेसली गेली होती एकदाच, तिच्यावरचं हळदी कुंकू तसाच होतं, अगदी ५०,५५ वर्षानंतरही त्या नऊवारी साडीची शान टिकून होती.


नातीनं हट्ट केला मी माझ्या डोहाळजेवणाला नेसणार तर हीच साडी. आईनी परोपरीनं विनवलं नको पण ती नव्या काळाची बाप दाखव नाही तर श्राद्ध दाखव मताची. तिनी हट्टानी तीच साडी अगदी आजी सारखीच नेसली, चार ठसठशीत दागिने घातले, तशीच चंद्रकोर लावली, नाकात नथ घातली, अंबाडा बांधून त्यावर वेण्या गुंफल्या. अगदी बघत राहावंसं वाटत होतं, आईनं डोळ्यात काजळ भरताना मुद्दाम विस्कटवलं होतं, आणि एक मोठा काळा ठिपका मानेवर ही ठेवला होता. सगळा सोहळा कौतुकात न्हाहून निघत होता. आजीच्या साडीनी जणू समारंभ जिंकून घेतला होता. तिला मात्र ते आजीचे आशीर्वाद वाटत होते. तिला खात्री होती, कोणत्याही रंगात उद्ध्वस्त करण्याची ताकद नसते, आणि त्यातही हिरव्या रंगात तर शक्यच नाही. सृष्टीतला सगळ्यात अभिजात रंग वाटायचा तिला हिरवा! साऱ्या सृष्टीच्या सृजनाचा रंग. त्यामुळेच नव्या जन्माचा सोहळा साजरा करताना मुद्दाम हा रंग निवडला असणार, अन कधी तरी आपण एखादा प्रसंग त्या रंगाशी जोडतो आणी त्या रंगाशी कायमची कट्टी, किंवा बट्टी करून टाकतो. लेकीची नीट सुटका होऊन बाळ रडेपर्यंत आईच्या जीवात जीव नव्हता. पण यावेळी हिरव्या रंगानी त्याचं निरागसत्व सिद्ध केलं. बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप होते, तेव्हा ती साडी हातात घेऊन नवीन आजी तिच्या आईच्या आठवणीनं रडली. तिच्या आईचं अस्तित्व अजूनही त्या साडीत होतं, एकदाच अंगाला लागलेल्या त्या हिरव्या साडीत तिला आई परत भेटत होती. त्या नऊवारीची सहावारी करून तिनी उरलेल्या कापडाची हौशीनं दुपटी केली आणि त्या बाळाला पणजीच्या प्रेमात घट्ट लपेटून घेतलं...!!!!!!!!!!!!!!    

Thursday, October 6, 2016

कथा एका रंगाची...

तिला कायम प्रश्न पडायचा आपल्या आईला माहेर कसं नाही. लहानपणी मामाच्या गावाला जाऊ या हे गाणं ऐकताना तिनी विचारलं होतं, आई माझ्या मामाचं गाव कोणतं? आई काहीच बोलली नव्हती पण तिच्या डोळ्यातला लपलेला अश्रू मात्र तिला आज इतक्या वर्षानंतरही आठवतो. मग कधी तरी एका निबंधात तिनी मला मामा नाहीत आणि माझ्या आईला माहेर नाही असं लिहिलं होतं, तेव्हा बसवून आईनी सांगितलं होतं की तिला पण माहेर आहे, तिलाही भाऊ बहिण आहेत फक्त ते सारे आता दुरावलेत, परत असं कधी लिहू पण नकोस आणि त्या बद्दल विचारू पण नकोस, मला जेव्हा वाटेल की तुला सगळं समजेल तेव्हा मी स्वतःच तुला सांगेन.

बाकीच्या मुलांसारखे आपल्या घरी जास्त नातेवाईक येत नाहीत, क्वचित कधी आले तर वडिलांचेच, बाकी घरी जास्त राबता असायचा मित्र मैत्रीणींचाच, हे जेव्हा तिला आणि तिच्या भावाला लक्षात यायला लागलं तेव्हा ही ते गप्प राहिले होते, कारण त्यांचे आई बाबा बाकीच्या आई बाबांसारखे नव्हतेच. घरात कोणाला कोणाचीही चूक दाखवायचा हक्क होता, लहान मोठे पणा प्रत्येक गोष्टींबाबत केला जात नव्हता. आई बाबाला नावानी हाक मारत होती, आई वर मंगळसूत्र घालायची सक्ती नव्हती, बाबानीच किती तरी वेळा त्यांना अंघोळी घातल्या होत्या, आणि हो आईपेक्षा तोच स्वैपाक चांगला करायचा. आई साड्या, पंजाबी ड्रेस घालायची पण चुकूनही कधी आईकडे पिवळ्या रंगाचे काही नसायचं.

मग आता मुलांना समजेल असं जेव्हा आईला वाटलं तेव्हा आईनी सांगितलं होतं, तिचा आणि बाबाचा प्रेम विवाह होता. दोघांच्याही घरून विरोध होता, पण बाबानी स्पष्टच सांगितलं होतं, तुम्हाला जर हे मान्य नसेल तर तुम्ही अंतर ठेवू शकता, पण बाबाची आर्थिक मदत त्या घराला हवी असल्यामुळे त्यांनी अप्रत्यक्ष अंतर ठेवलं होतं, आईचे मात्र माहेर या लग्नामुळे पूर्णच तुटलं होतं. दोन भावांची लाडकी बहिण होती ती, वडिलांची सगळ्यात लाडकी लेक होती, तिच्या दोन बहिणीपेक्षा हिला कायम प्रत्येक गोष्टीत झुकतं माप मिळायचं, त्यामानाने श्रीमंतीतच वाढली होती, आणि कॉलेज मध्ये बाबा भेटला आणि त्याच्या प्रेमात पडली, प्रेमात पडताना जात, श्रीमंती थोडीच बघितली जाते. तिला वाटलं होतं, तिचे पारंपारिक बाबा तिच्यासाठी बदलतील, पण तिच्या एका निर्णयानी तिचं आयुष्य बदललं पण बाबा नाही बदलले.

लग्नात पिवळी साडी मामा कडून येते, पण तिच्या आई बाबांच्या लग्नात असल्या साऱ्या प्रथा पाळायला कोणीच नव्हतं, तिच्या हट्टाखातर त्याचा विश्वास नसतानाही त्यानी विधी केले होते, पण तेव्हाही त्यांचे काही मित्र मैत्रिणी त्याची आई , आणि लग्न लावणारे गुरुजी इतकेच लोक होते. मग आयुष्यभर आई बाबांची आठवण म्हणून अग्नी सारखाच धगधगता जिवंत असा पिवळा रंग नेसायाचाच तिनी सोडला. आई वडिलांची आठवण विसरली जात नाही पण तरीही आपण आपल्या आनंदासाठी त्यांना दुखावलं याची बोच सलत राहावी म्हणून तिनी स्वतःलाच शिक्षा दिली होती. आईला तिच्या निर्णयाचा कधी पश्चाताप बाबानी होऊ दिला नव्हता पण तरीही एक घर आपल्यामुळे तुटलं याचा त्यालाही त्रास व्हायचा.

तिचं लग्न तिनीच ठरवलं होतं, समाज २०,२५ वर्ष पुढे गेला होता, घरातून विरोधाची शक्यता नव्हतीच बाहेरून कुठून पण तिला फारसे काही ऐकावं लागलं नव्हतं. त्याच्या घरून फक्त एकच अट होती लग्न विधीवत झालं पाहिजे. आपल्याला पटत नाही म्हणून कोणावर आपलं म्हणणं लादणं तिच्या घरी कोणालाच मान्य नव्हतं, त्यामुळे तिच्या बाबानी याहीवेळी माघार घेतली. बायकोला जो त्रास झाला तो लेकीला होऊ नये म्हणून ते जपत होते. तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. आपण लग्नाला पिवळ्या साडीत उभ्या राहू तेव्हा आईच्या जखमेवरची खपली निघेल असं तिला वाटता होतं, तर आईनी एका मानलेल्या भावाला सांगूनही ठेवलं होतं, लेकीला पिवळ्या साडी घेण्यासाठी, आपल्याला जे मिळालं नाही ते लेकीला मिळावं म्हणून.
तिनी जुनं पानं शोधून काढून मामाचा पत्ता मिळवला, मग काहीतरी कारण सांगून त्या गावाला गेली, आणि दत्त म्हणून दारात उभी राहिली. काळ सगळ्या जखमा भरून काढतो, इथं तर व्याज आजीच्या समोर उभं राहिलं होतं. सारं काही विसरायला सगळे तयार होते फक्त प्रश्न होता पुढच्या पावलाचा, जे तिनी तिच्या आईसाठी उचललं होतं. आजोबादेखील मावळले होते. लेकीला भेटायला उत्सुक होते, तिच्या नावाने सोडलेलं तर्पण विसरले होते. मामांच्या घराचा पहिला पाहुणचार घेवून ती तिच्या घरी गेली ती मामाला घरी गेली. आई तर किती तरी वेळ निःशब्द दारातच उभी होती. तिला सुचतच नव्हतं काय बोलावं. ओळख पटली होती पण सुरुवात कुठून करावी हेच माहित नव्हतं.

मग तिच्या लग्नासाठी म्हणून दोन पिवळ्या रंगाच्या साड्या घरात आल्या. आईचा मामा नव्हता पण माहेरची साडी तिनी घेतली आणि त्या धगधगत्या पिवळ्या रंगात तिला सोन्याचं झळाळत सुख मिळालं. बोहोल्यावर जेव्हा ती पिवळ्या साडीत उभी होती तेव्हा तिची आई देखील पिवळ्या साडीत दिमाखात तिच्या आईचा हात हातात धरून उभी होती. एका लग्नात सारं तुटलं होतं, तर दुसऱ्या लग्नात सारं जुळून येत होतं. आयुष्यभर पिवळ्या रंगाची धग आईनी डोळ्यांनी अनुभवली होती, आता पिवळ्या रंगाची उब अंगावर अनुभवत होती.


जाळणारा देखील पिवळा रंगच असतो, आणि सृष्टीचा रथ हाकणाऱ्या सूर्याचा रंग देखील पिवळाच, झळाळणाऱ्या सोन्याचा रंगही पिवळा, पिकल्या गळणाऱ्या पानाचा रंगही पिवळा, हळद ही इवली, डाळही पिवळी, सुर्यफुलही पिवळ, मोहरीचं फुलही पिवळ , पिवळ्या रंगाच्या छटांनी व्यापून राहिलंय आपलं आयुष्य. प्रत्येकीच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सोनेरी होवो असं सांगणारा पिवळा.... !!!!!!!!!!!!!! 

Wednesday, October 5, 2016

निळवाणी

आकाशापासून ते पाण्यापर्यंत व्यापून राहिलेला निळा रंग म्हणजे जगनरंग. डोळ्यांना एक सुखद जाणीव करून देणारा निळा रंग. त्याच्या छटा त्या किती. प्रत्येक निळा दुसऱ्यापेक्षा वेगळा. प्राचीन काळापासून माणसांना सोबत करत आलाय हा रंग... इतका उतरलाय हा रंग जनामनात की कृष्णाला, रामाला देखील रंगलेत निळाईत. सायंकाळ झुकता झुकता घेऊन येणारा निळा रंग, पहाटेला सोबत करणारा निळा रंग, आकाशाच्या अधे मध्ये डोकावणारा निळा रंग, शब्दांना रंगवणारा शाई निळा, मोरापिसातला निळयाचा पसारा सौंदर्य भरून वाहणारा निळा रंग.
निळ्या रंगावर मी बापुडी काय बोलणार, आज केवळ निळ्या रंगाच्या सुरेख कविता...

निळीये मंडळी निळवर्ण सावळी
तेथे वेधलीसे बाळी ध्यानरुपा!
वेधू वेधला निळा पाहे घन निळा
विरहिणी केवळ रंग रसने!
निळवर्ण अंभ, निळवर्ण स्वयंभ
वेधे वेधू न लाभे वैकुंठीचा!
ज्ञानदेव निळी हृदयी सावळी
प्रेमरसे कल्लोळी बुडी देत!
ज्ञानेश्वर

आज ही ज्ञानदेवांच्या शब्दांमधली जादू कमी झालेली नाही.

एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनीळातला एक गोड राजबिंड निळा
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा,

असे नानागुणी निळे किती सांगू त्याचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे,
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग!!
बा भ बोरकर

बोरकर इतक्या सहजतेनं आयुष्यातला निळा रंग समोर आणतात की परत एकदा त्यांच्या कवितेच्या आणि निळ्या रंगाच्या प्रेमात पडतो आपण. त्या निळ्या शब्दांच्या जादूतून बाहेर पडता पडता ग्रेसचे हे शब्द भूल घालतात.

असे रंग आणि ढगांच्या किनारीनिळे उन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचेकिती अर्ध्य देऊ निळ्या अस्तकालीन नारायणा?
निळे गार वारे जळाची शिराणी, निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेऊन आली निळ्या पाखरांची निळी पाउले
निळे सूर आणि निळी गीतशाळा निळाईत आली सखीची सखी
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची भिजेना परी ही निळी पालखी
किती खोल आणि किती ओल वक्षी, तुझा सूर्य आणि तुझे चांदणे
प्राणातले ऊन प्राणात गेले तुझ्या सागराची निळी तोरणे....
ग्रेस   

आज सर्वव्यापी निळा रंग जाणीव करून देतो एकाच आभाळाखाली अथांग पसरलेल्या पाण्यासारख्या प्रवाही आयुष्याची.. आयुष्य चालतच असतं, ते काही थांबत नसत, त्यात सोबत करायला सारे भाव, रंग, शब्द असतातच. त्याच शब्दांचे प्रतिबिंब म्हणजे या कविता.

तुमच्याही काही आवडत्या निळ्या रंगात न्हाहिलेल्या कविता असतील तर नक्की टाका प्रतिक्रियेत.