Friday, October 7, 2016

हळवा हिरवा

मस्त मनासारखी हिरवी गर्द इरकल  साडी नेसून गळ्यात सासू बाईंनी खास घालायला दिलेली मोहनमाळ, आईनी दिलेली ठुशी, इकडच्या स्वारीनी आणलेली नथ, मनसोक्त घातलेलं गजरे, कपाळावर लावलेली चंद्रकोर, कानात सोन्याची कुडी  कशी अगदी दृष्ट लागावी अशी दिसत होती ती. कौतुकाच्या सोहळ्यात ती तर अगदी गुंगून गेली होती. त्या क्षणी जगातली सर्वात सुखी स्त्री तीच होती. सजवलेल्या झोपाळ्यावर बसून परडी भरवून घेताना तिला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं होतं. हलकेच पोटात होणाऱ्या गुदगुल्यांनी चेहऱ्यावरचं तेज अजूनच वाढत होतं. हातात परडी घेऊन जेव्हा ती टवरलेल्या पोटानी ओटी भरायला बसली होती तेव्हा एखाद्या देवीचं तेजच तिच्या चेहऱ्यावर होतं. नवव्या महिन्यातली भरल्या दिवसांची गर्भारशी ही एक वेगळीच स्त्री असते. ओटी भरायला आलेल्या प्रत्येकिनी आईला, सासूला तिची दृष्ट काढायला सांगितली होती.  

तशी ती सुखीच होती, बाकीच्या मैत्रिणीसारखा तिला सासुरवास काही खास नव्हता, अगदी सासुरवास म्हणावा असं काहीच नव्हत. सासरी कोणी मुलगीच नव्हती त्यामुळे मुलीशी कसं वागायचं ते सासूबाई सोडून कोणाला माहीतच नव्हतं, त्यामुळे लाड ही भरपूर झाले आणि कुचंबणाही बऱ्याच वेळा झाल्या. पण सगळं तसं चांगलच होतं. मग त्यात हे सुख दाराशी आलं, दिवस गेले हे कळल्यापासून तर घरीदारी निव्वळ कौतुक सोहळाच होता. मागच्या दोन पिढ्यात कोणी मुलगीच नव्हती आणि सासूबाईच्या लग्नाआधीच त्यांची सासू गेली होती त्यामुळे सासूचे डोहाळे जेवण काही झाले नव्हते. म्हणूनच त्यांनी सुनेच्या डोहाळजेवणाचा घाट घातला होता. स्त्री मुळातच हौशी असते, त्यात संसाराला फुटणाऱ्या नव्या पालवीचे कौतुक करण्यात कोणत्याही नात्याचे अडसर येत नाहीत. पहिलेपणा असेल तर साऱ्या कुरबुरी , हेवे दावे देखील विसरले जातात. कोंबाला फुटणारी कोवळी पानं मातीतून जेव्हा डोकं वर काढतात तेव्हा तो हिरवा रंग आयुष्यातल्या संघर्षातून उभं राहण्याची प्रेरणा देत असतो.

डोहळेजेवणाचा सगळा सोहळा संपून दुसरा दिवस सुरु होण्याच्या आधीच तिला कळा सुरु झाल्या, आणि सुरु झाला एका नव्या जीवाच्या जन्माचा सोहळा. पण ते बाळ रडलंच नाही आणि त्यामुळे नंतर सारे रडले. ते बाळ रडलं असतं तरी सारं घरदार त्याला शांत करायला धावलं असतं पण काही क्षणासाठी देखील ते बाळ रडलंच नाही आणि जीवनाच्या सोहळ्याला मुकलं. मग सारे तिचं रडणं थांबवायला धावले. पहिल्या गोष्टीचं अप्रूप जास्त असतं, इथं तर पहिलं मातृत्वचं गळून पडलं होतं. नंतर सुद्धा कित्येक दिवस तिच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. नंतर काही महिन्यानंतर निसर्गधर्मानी त्याचं काम चोख केलं होतं, दुसरा डाव तिच्या ओटीत पडला होता. पण यावेळी सासुबाईनी सारी सूत्र हातात घेऊन पाच महिन्यापर्यंत कोणालाच कळू दिलं नव्हतं. दुसऱ्या डोहाळेजेवणाची पद्धत नसल्यामुळे यावेळी ते ही करण्याचा प्रश्न नव्हता. घरीच ओटी भरताना त्यांनी सक्त ताकीद दिली होती, हिरव्या रंगाची साडी, चोळी काहीच नको. यावेळी मातृत्व, नशीब जे काही असेल ते बलवत्तर होतं, त्यामुळे मूल रडलं आणि सारं घरदार हसलं.  त्यानंतर घरात अजून दोन मुलं आणि शेवटी घरपण पूर्ण करणारी मुलगी देखील झाली. पण सासुबाईनी तिची ती हिरवी इरकल आतच ठेवून दिली, आणि सक्त हुकुम दिला, यापुढे या घरात ना मुलीचं, ना सुनेचं डोहाळेजेवण होणार. हिरवी साडी कोणीही विकत घेणार नाही, आली तर नऊ महिने कोणीही घालणार नाही. प्रत्येक वेळी विषाची परीक्षा घ्यायची गरज नसते, आधीच्यांनी घेतलेल्या परीक्षेतून आपण शिकायचं असतं.

ती हिरवी रेशमी इरकल कपाटातून काही काळ उन खाण्यासाठी तेवढी बाहेर याची, त्याच्यासोबत जागायच्या तिच्या आठवणी. मुलं मोठी झाली, सुना आल्या, लेकही लग्नकरून  तिच्या घरी गेली पण घरात हिरवी साडी, कापड कधी घेतलं नाही. मुलांना मुलं झाली पण डोहाळेजेवण नाही झालं, मुलीच्या वेळीस तिला लेकीचा कौतुक करावं खूप आतून वाटलं, पण तिच्याबरोबर जे काही झालं ते आठवून ती शांतच बसली. नंतर कधीतरी तिनी ती हिरवी साडीच लेकीला देऊन टाकली, नकोच ती साडी घरात, नकोच त्या आठवणी आणि आतून एक खोटं समाधान आपण लेकीला हिरवी साडी देऊन तिची ओटी भरल्याचं. लेकीनीही आई आजीचा मान ठेवत ती साडी तशीच कपाटात ठेवली होती. आईसारखं ती देखील कधीतरी ती साडी उन्ह दाखवायला बाहेर काढायची, आणि न जगलेल्या भावासाठी भावूक व्हायची आणि ती साडी परत आत ठेवून द्यायची. चांगल्या रेशमी साड्यांना कधीही मरण नसतं. त्या विस्मृतीत जातात, विरतात पण मरत नाहीत. आजीची साडी नातीपर्यंत प्रवास करून आली होती. तशीही ती साडी नेसली गेली होती एकदाच, तिच्यावरचं हळदी कुंकू तसाच होतं, अगदी ५०,५५ वर्षानंतरही त्या नऊवारी साडीची शान टिकून होती.


नातीनं हट्ट केला मी माझ्या डोहाळजेवणाला नेसणार तर हीच साडी. आईनी परोपरीनं विनवलं नको पण ती नव्या काळाची बाप दाखव नाही तर श्राद्ध दाखव मताची. तिनी हट्टानी तीच साडी अगदी आजी सारखीच नेसली, चार ठसठशीत दागिने घातले, तशीच चंद्रकोर लावली, नाकात नथ घातली, अंबाडा बांधून त्यावर वेण्या गुंफल्या. अगदी बघत राहावंसं वाटत होतं, आईनं डोळ्यात काजळ भरताना मुद्दाम विस्कटवलं होतं, आणि एक मोठा काळा ठिपका मानेवर ही ठेवला होता. सगळा सोहळा कौतुकात न्हाहून निघत होता. आजीच्या साडीनी जणू समारंभ जिंकून घेतला होता. तिला मात्र ते आजीचे आशीर्वाद वाटत होते. तिला खात्री होती, कोणत्याही रंगात उद्ध्वस्त करण्याची ताकद नसते, आणि त्यातही हिरव्या रंगात तर शक्यच नाही. सृष्टीतला सगळ्यात अभिजात रंग वाटायचा तिला हिरवा! साऱ्या सृष्टीच्या सृजनाचा रंग. त्यामुळेच नव्या जन्माचा सोहळा साजरा करताना मुद्दाम हा रंग निवडला असणार, अन कधी तरी आपण एखादा प्रसंग त्या रंगाशी जोडतो आणी त्या रंगाशी कायमची कट्टी, किंवा बट्टी करून टाकतो. लेकीची नीट सुटका होऊन बाळ रडेपर्यंत आईच्या जीवात जीव नव्हता. पण यावेळी हिरव्या रंगानी त्याचं निरागसत्व सिद्ध केलं. बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप होते, तेव्हा ती साडी हातात घेऊन नवीन आजी तिच्या आईच्या आठवणीनं रडली. तिच्या आईचं अस्तित्व अजूनही त्या साडीत होतं, एकदाच अंगाला लागलेल्या त्या हिरव्या साडीत तिला आई परत भेटत होती. त्या नऊवारीची सहावारी करून तिनी उरलेल्या कापडाची हौशीनं दुपटी केली आणि त्या बाळाला पणजीच्या प्रेमात घट्ट लपेटून घेतलं...!!!!!!!!!!!!!!    

No comments:

Post a Comment