Sunday, July 14, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा १४'

कार्यालयीन पार्टीत मुद्दाम जास्त खाद्यपदार्थ मागवून नंतर घरी घेऊन जाणारे किती तरी महाभाग असतात. ‘ऑफिसच्या बिलांमध्ये घरच्या खर्चाची एखाद् दोन बिले घुसवली तर काय मोठा फरक पडणार आहे?’ असे म्हणणारेही  बरेच असतात. असेच काहीसे सारा नेत्यानाहू अर्थात इस्रायलच्या पंतप्रधानांच्या पत्नीला देखील वाटले असावे. त्यामुळे त्यांनी घरी स्वयंपाकी असतानाही बाहेरून जेवण मागवले आणि त्याचे बिल इस्रायलच्या सरकारी बिलांमध्ये लावून टाकले. घरी जेऊन खोटी हॉटेलची बिले सादर केली. त्यांचा पती,  बेंजामिन नेत्यानाहू हा इस्रायलचा पंतप्रधान म्हणजे देशाची जबाबदारी पूर्ण त्यांच्यावर, त्यामुळे थोडे फार लोकांचे पैसे घेतले तर त्यात काय चूक? असे मानत सारा नेत्यानाहू वागल्या. पण नुकताच तिथल्या न्यायालयाने हा सरकारी पैशांचा गैरवापर आहे असे सांगून  पंतप्रधानांच्या या पत्नीलाच आर्थिक दंड सुनावला. सरकारी पैशांतूनच नेमलेला स्वयंपाकी घरी असताना सारा यांनी अनेक वेळा घरगुती पाटर्य़ासाठी बाहेरून खाणे मागवले आणि स्वयंपाकी गैरहजर आहे, असे सांगून ती बिले सरकारी पैशांनी भरली. ही प्रकरणे बाहेर आली तेव्हा त्यांनी यावर सोयीस्कर मौन धारण केले, जेव्हा सखोल चौकशी झाली आणि पुरावे मिळाले तेव्हा त्यांनी त्याचे खापर हिशोब ठेवणाऱ्या लोकांवर फोडले. जवळपास एक लाख अमेरिकन डॉलरचा (६९ लाख ४ हजार रुपये ) हा घोटाळा होता, पण प्रकरण दाखल होई होईतो ५० हजार डॉलरवर येऊन पोहोचला आणि शिक्षा सुनावता सुनावताना जेमतेम १५,३०० डॉलरचा आर्थिक दंड सारा नेत्यानाहू यांना सुनावला गेला. अर्थात त्याआधी त्यांनी न्यायालयात आपली चूक मान्य केली होतीच. सप्टेंबरमध्ये इस्रायलमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच वेळी नेत्यानाहू यांच्यावरदेखील लाच घेतल्याचे, पदाचा गैरवापर केल्याचे आरोप झालेले आहेत. ते पंतप्रधान असतानाही आणि वेळोवेळी ‘माझी पत्नी निरपराधी आहे,’ असे ठासून सांगूनही त्यांच्या पत्नीला न्यायालयाने दोषी ठरवले हा तसा त्यांनाही एक धक्काच असणार. यानिमित्ताने एक गोष्ट समोर आली की इस्रायलमधली न्यायव्यवस्था इतकी निष्पक्ष आहे, की सत्तेत असणाऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील त्यांच्या चुकीबद्दल शिक्षा सुनावली गेली. सरकारी मालमत्तेचा उपयोग सत्तेत असतानाच नव्हे तर सत्ता सोडतानादेखील करणारे आपल्याकडे भरपूर आहेत, न करणारा एखादा विरळाच. पण इस्रायलमध्ये होऊ शकते तर आपल्याकडे का नाही या हेतूने जर कोणी जनहित याचिका केली तर कोणा कोणाची नावे पुढे येतील हे बघावे लागेल.
नावाच्या पलीकडे
‘मेरीजुअना पेप्सी’ म्हटल्यावर डोळ्यांसमोर मादक पदार्थ किंवा कोल्ड ड्रिंक येते, पण अशा नावाची एखादी व्यक्ती असू शकेल असे चुकूनही वाटत नाही. अमेरिकेत शिकागोमध्ये अशी व्यक्ती आहे आणि तिने नुकतीच ‘नेम्स इन व्हाइट क्लासरूम्स : टीचर बिहेवियर्स अ‍ॅण्ड स्टुडन्ट परसेप्शन्स’ असा प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली आहे. त्यासाठी कारणीभूत ठरलं ते तिचं बालपण. लहानपणापासून सगळीकडे तिच्या नावाची थट्टाच केली गेली. एकदा तर शिक्षिकेने तिचे नाव बदलून मेरी ठेवले आणि त्याच नावाने तयार केलेलं प्रमाणपत्र ती घरी घेऊन आली. त्याबद्दल आईने विचारताच आपल्याला या नावाने चिडवत असल्याचे तिने सांगितले. त्यावेळी आईने तिला सांगितले, ‘‘तुझे नाव मेरीजुअना आहे, मेरी नाही. हेच नाव तुझी ओळख आहे, लोक हसतात म्हणून वेगळे नाव घेण्याची गरज नाही. हेच नाव तुला पुढे घेऊन जाईल.’’ त्या दिवसापासून ती लोकांना तिचे नाव ठासून सांगायला लागली.
तिच्या आईप्रमाणेच अमेरिकेत अनेकदा कृष्णवर्णीय किंवा रेड इंडियन समाजातल्या मुला-मुलींची नावे वेगळी असतात, अगदी सर्वसामान्य, मेरी, जेन, क्रिस, बॉब यापेक्षा वेगळी. त्यामुळे अनेकदा नाव ऐकूनच हा मुलगा किंवा मुलगी गोरी नसणार असा अंदाज लावला जातो. स्वत: शिक्षिकेची नोकरी केलेल्या मेरीजुअनानेही हा अनुभव घेतला. तिच्या सहशिक्षिका वर्गात जायच्या आधीच मुलांची नावे बघून त्यातल्या अशा वेगळ्या नावांची टिंगल करायच्या. त्या मुलांबरोबरच्या वागण्यात देखील हा टिंगलीचा सूर कायम असायचा. अनेक जण तो विद्यार्थी कसा आहे हे जाणून घ्यायच्या ऐवजी केवळ त्याच्या नावामुळे त्याला वेगळी वागणूक द्यायच्या. पण या सगळ्याचा त्या विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो हे त्यांच्या खिजगणतीतही नसायचे. त्यामुळे जेव्हा पीएच.डी.ची संधी मिळाली तेव्हा तिने हाच विषय निवडला. जेव्हा एखादा शिक्षक/ शिक्षिका नावामुळे मुलांना वेगळी वागणूक देतात तेव्हा तो त्या शिक्षकांचा पराभव असतो. कोणालाही त्यांच्या नावामुळे वेगळी वागणूक देण्याऐवजी त्या नावामागचा अर्थ, त्याचं कारण समजून घेतले पाहिजे. जसे मेरीजुअनाच्या आईने केले आणि तिनेही स्वत:च्या आईचा हा विश्वास सार्थ ठरवत स्वत:चे नाव जगभर पोहोचले.
लोकसत्ता, पृथ्वी प्रदक्षिणा, चतुरंग ६ जुलै २०१९
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे.)

पृथ्वी प्रदक्षिणा १३

कोणत्याही गोष्टीची सक्ती झाली की त्याचे बंधन वाटायला लागते आणि जेव्हा या बंधनाची जाणीव होते तेव्हा ते झुगारावेसे वाटते. असेच काहीसे जपानी स्त्रियांच्या बाबतीत होत आहे. कामावर येताना उंच टाचेच्या चपला वा बूट घालणे सक्तीचे आहे. त्याविरुद्ध तिथल्याच एका अभिनेत्रीने, युमी इशिकावा हिने #KuToo असा हॅशटॅग वापरत आवाज उठवला आहे. #MeToo वरून प्रेरित होऊन #KuToo सुरू केले असले तरी त्यातला #Ku हा कुत्सू या शब्दावरून आला आहे. जपानी भाषेत कुत्सू म्हणजे शूज. आपल्याकडेदेखील उंच टाचेचे बूट हे अभिमानाने मिरवले जातात. मॉडेल्स, चित्रतारका, उच्चपदस्थ स्त्री अधिकारी या सगळ्यांमध्ये देखील उंच टाचेची पादत्राणे घालणे हा जणू अलिखित नियम असतो. केवळ उंची वाढवण्यासाठी म्हणून उंच टाचा वापरल्या जात असतील तर पाश्चिमात्य जगात देखील स्त्रियांनी उंच टाचेच्या चपला, बूट घालणे हा एक सामाजिक संकेतच समजला जातो.
इंग्लंडमध्ये तीन वर्षांपूर्वी निकोला थॉर्प हिला उंच टाचेच्या चपला न घातल्यामुळे नोकरीला मुकावे लागले होते. मग ज्या ठिकाणी जिने चढा-उतरायचे असतात, सामान खाली-वर करायचे असते अशा ठिकाणी देखील स्त्रियांना उंच टाचेच्या चपला घालाव्याच लागतात. २०,००० स्त्रियांनी निकोलाला पाठिंबा देऊनही तिथल्या सरकारने याविषयी काही करण्याचे टाळले.
त्यांचे म्हणणे आहे २०१० मध्ये झालेल्या कायदा बदलात या गोष्टीचा समावेश केला जाऊ शकतो, त्यासाठी वेगळ्या कायदा बदलाची गरज नाही. पण आज तीन वर्षांनंतरही अशा अनेक निकोला असूच शकतात ज्यांची नोकरी केवळ उंच टाचेच्या चपला घातल्या नाहीत म्हणून गेली आहे.
‘कान्स’ या चित्रपटांची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठिकाणीसुद्धा २०१५ पर्यंत उंच टाचेची पादत्राणे न घातलेल्या स्त्रियांना प्रवेश दिला जात नव्हता. त्याबद्दलची नाराजी दाखवण्यासाठी पुढच्या वर्षी, २०१६ ला ज्युलिया रॉबर्ट रेड काप्रेटवर चक्क अनवाणी चालत गेली होती. मुळात ज्या गोष्टी आरामदायक नाहीत त्या वापरण्याचा खटाटोप का करावा? गबाळे राहणे वेगळे आणि सामाजिक संकेत आहे म्हणून न साजेसे, न सांभाळता येणारे कपडे, पोशाख करणे वेगळे. वैद्यकीयदृष्टय़ा उंच टाचेच्या चपला घालणे स्त्रियांच्या आरोग्याला घातक आहे हे अनेक डॉक्टर सांगतात. पण तरीही सौंदर्य आणि सामाजिक प्रतिष्ठेचे मानक बनलेल्या उंच टाचेच्या चपलांना खाली खेचण्याच्या प्रयत्नांना अजून तरी यश आलेले नाही हेच खरे.
भगिनीभाव
गोष्ट २०१७ मधली गोष्ट. नाओमी ही पश्चिम ऑस्ट्रेलियामधली एक सर्वसामान्य स्त्री. नियम तोडला म्हणून तिला दंड झाला होता. पण तिच्याकडे दंड भरायला पैसेच नव्हते. त्यामुळे तुरुंगात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच तिच्याकडे नव्हता. ती सांगते, ‘‘ते तीन दिवस तिच्या आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस होते.’’ नाओमी ही त्या भागातली ‘अ‍ॅबओरिजिनल’ म्हणजे मूळ रहिवासी आहे. नाओमीसारख्या अनेकजणी पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे ठोस साधन नाही, पदरी मुलेच नव्हे तर नातवंडेदेखील आहेत. अशा वेळी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न निर्माण होतो. पश्चिम ऑस्ट्रेलियात आजही आर्थिक दंड न भरल्यास तुरुंगवासाची तरतूद आहे.
नाओमीसारख्या अनेक जणींचे तुरुंगवास वाचवण्यासाठी ‘सिस्टर्स इनसाइड’ ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने लोकांमधून पैसे जमवायला सुरू केले आणि ते पैसे अशा गरजू स्त्रियांचे दंड भरण्यासाठी वापरले जातात. आजवर या संस्थेने ४ लाख डॉलर्सहून अधिक निधी गोळा केलाय. ही संस्था डेबी किलरोय हिने सुरू केलेली आहे. या डेबीची स्वत:चीसुद्धा अशीच शोकांत कहाणी आहे. तिला १९८९ मध्ये अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली ६ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तेव्हा तिने हे तुरुंगातले जीवन अगदी जवळून पाहिले. तुरुंगात जाण्यापूर्वी डेबीला स्वत:चे घर, कुटुंब, मुलं होती. हे सगळे अर्थातच या तुरुंगवासानंतर तिने गमावले. तुरुंगात तिने एक खूनही पाहिला. या सगळ्या अनुभवानंतर बाहेर आल्यावर तिने कायद्याचे शिक्षण घेतले आणि आता ती मानवी हक्कांसाठी लढणारी ऑस्ट्रेलियामधली एक धडाडीची वकील म्हणून ओळखली जाते. दंड भरला नाही म्हणून तुरुंगात जाणाऱ्या स्त्रियांचे विश्वच उद्ध्वस्त होऊ शकते याची जाणीव असल्यामुळे तिने तिच्या ‘सिस्टर्स इनसाईड’ संस्थेमधून आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली आहे.
ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी निश्चितच दंड भरावा. पण ‘दंड भरता येत नाही म्हणून तुरुंगवास’ हा निव्वळ अन्याय आहे, हा कायदा बदलला पाहिजे, ही मागणी जोर धरत आहे. सरकारनेदेखील आम्ही लवकरच या कायद्यात दुरुस्ती करू, असे म्हटले आहे.
स्वत:ला आलेल्या अनुभवातून इतरांना शहाणे करणे स्त्रियांना जास्त सहज जमते. डेबीने संस्था उभारली. त्याद्वारे ती अनेक जणींना मदतही करते आहे आणि तिलादेखील अनेक जणी आर्थिक, भावनिक मदत करत आहेत. भगिनीभाव प्रत्येकीकडे असतो. प्रत्येक जण कळत-नकळत तो जोपासतच असतो. हेच डेबी तिच्या ‘सिस्टर्स इनसाईड’च्या माध्यमातून आपल्याला दाखवते.
उबदार ‘वॉर्मलाइन’
कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्याची मायेने विचारपूस करून त्याला त्याचा निर्णय बदलवणारे लोक केवळ पुस्तकात, चित्रपटांमध्येच असतात असा जर तुमचा समज असेल तर ‘इंटेल’ या जगप्रसिद्ध कंपनीने तो मोडून काढला आहे. २-३ वर्षांपूर्वी ‘इंटेल’ला लक्षात आले की अनेक स्त्रिया, अल्पसंख्य समूहातले त्यांचे कर्मचारी काम सोडून जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यावर काही तरी केले पाहिजे, असे त्यांना मनापासून वाटले. बार्बरा व्हे या त्यांच्या व्हाइस प्रेसिडेंटने ‘वॉर्मलाइन’ची कल्पना मांडली. माणसाला कायम स्थर्य हवे असते, मग हातातली पक्की नोकरी सोडून जेव्हा लोक जायचा निर्णय घेतात तेव्हा त्यामागे नक्कीच कुठली तरी असुरक्षितता असणार. हा कयास करत बार्बरा यांनी एका ‘हॉटलाइन’ची संकल्पना समोर ठेवली. कंपनीतल्याच वेगवेगळ्या विभागांमधल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असतो. ज्या कोणा कर्मचाऱ्याला काही खटकत असेल, नोकरीत काही असमाधान असेल किंवा ते तणावात असतील तर त्यांनी या सेवेचा लाभ उठवत या फोनवर आपला असंतोष व्यक्त करावा, अशी यामागची संकल्पना आहे.
ही सेवा कंपनीच्या उपयोगाचीच ठरली, कारण इथे तक्रार नोंदवलेल्या १० जणांपैकी ८ जणांचे समाधान झाले आणि त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय बदलला. ते आजही कंपनीत नोकरी करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा, वास्तव, कंपनीच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा या सगळ्यांचा मेळ घालणे या हॉटलाइनमुळे सहज शक्य झाले. सध्या अमेरिका आणि कोस्टारिकापुरतीच मर्यादित असलेली ही सेवा ‘इंटेल’ लवकरच त्यांच्या जगभरातल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे. या हेल्पलाइनमधून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून घेत ‘इंटेल’ने आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वाना एकत्र घेऊन काम कसे करता येऊ शकते यासाठी खास प्रशिक्षण देखील दिले. असे करणे एखाद्या स्त्रीलाच सुचू शकते.
कोणतीही कंपनी ही फक्त मालकाच्या भूमिकेतून किंवा कर्मचाऱ्याच्या भूमिकेतून चालत नसते. जेव्हा त्या दोघांचेही दृष्टिकोन जुळतात आणि ही आपली कंपनी आहे असे त्यांना वाटायला लागते तेव्हा कामाचा दर्जा सुधारत असतो. हीच गोष्ट बार्बरा यांनी हेरली आणि नाराज लोकांची नाराजी कोणत्या कारणासाठी आहे हे जाणून घेतले. त्यानंतर ती नाराजी दूर करायचा प्रयत्न केला. त्यामुळेच कंपनी सोडून जाणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले. घर चालवताना घरातली स्त्री अगदी हेच तर करत असते. काम टाळणाऱ्या कुटुंबीयांना ते काम आवडत नाही हे समजून घेऊन त्यांना जे काम आवडते ते काम देते त्यामुळे काम अगदी सहज होऊन जाते. याच कारणामुळे कदाचित बार्बरा यांना ‘वॉर्मलाइन’ची कल्पना सुचली असावी. ‘सेल्स फोर्स’ या सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रेसिडेंट आणि चीफ पीपल ऑफिसर सिंडी रॉबिन्स देखील म्हणतात, ‘‘जास्तीत जास्त स्त्रिया मोठय़ा पदांवर आल्या पाहिजेत. स्वयंपाक करताना, फोनवर बोलता बोलता मुलांचा अभ्यास घेणाऱ्या स्त्रिया आपल्याला घराघरांत दिसतात. सहजगतीने चार कामे करणे स्त्रियांना नैसर्गिकरीत्या जमते, त्यामुळे संधी मिळाली तर स्त्रिया नक्कीच त्याचे सोने करून दाखवतात. इंद्रा नुई, ‘आयबीएम’ची सीईओ जिनी रोमेटी, ‘ओरॅकल’ची सीईओ साफ्रा कात्झ अशी अनेक बोलकी उदाहरणेदेखील आहेतच.
लोकसत्ता, चतुरंग, पृथ्वी प्रदक्षिणा २२ जून २०१९
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

पृथ्वी प्रदक्षिणा १२

मायकेल जॉर्डन, रॉजर फेडरर, टायगर वूड्स, सेरेना विलियम्स यांच्यामध्ये काय साम्य आहे? हे सगळे जण ‘नायके’चे अ‍ॅम्बॅसॅडर आहेत. खेळाडूंचे कपडे, बूट आणि खेळाशी संबंधित वेगवेगळ्या इतर अनेक गोष्टींचे उत्पादन ही कंपनी करते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या मोन्तानो आणि गौचर या धावपटूंनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’कडे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. या दोघींनाही अपत्य जन्मानंतर लगेचच मैदानात उतरावे लागले. त्यांच्या निमित्ताने हा सगळा प्रश्नच नव्याने समोर आला. कंपनीने आम्ही जी स्पॉन्सरशिप देतो ती गुणवत्ता आणि खेळातले प्रदर्शन यावर आधारित असते त्यामुळे गर्भावस्थेत आणि त्यानंतर काही काळ स्त्री खेळाडू खेळू शकत नाहीत त्यामुळे त्यांचे मानधन कमी करू, अशी भूमिका घेतली होती.
सेरेना विल्यम्स हिने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते जेव्हा ती ८-९ आठवडय़ांची गर्भवती होती. सप्टेंबर २०१७ मध्ये मुलीला जन्म दिल्यावर डिसेंबरमध्ये सेरेनाने परत खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी तिने ‘विम्बल्डन’ आणि ‘अमेरिकन ओपन’च्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. गर्भारपणात किंवा प्रसूतीनंतरही सेरेनाने तिच्या खेळावर कोणताही परिणाम होऊ दिला नव्हता. तिच्यासारख्याच इतरही अनेक खेळाडू आहेत ज्यांनी गर्भारपणात किंवा प्रसूतीनंतरही आपली क्रीडा कारकीर्द सुरू ठेवलेली आहे. जर ‘नाइके’ने त्यांची अट शिथिल केली नसती तर सेरेनासारखा मोठा मोहरा गमवायची शक्यता होती. ते त्यांना नको होतं, त्यामुळेच त्यांनी ‘आम्ही नवीन करारात स्त्री खेळाडूंसाठी गर्भारपणात आणि प्रसूतीपश्चात काही महिने गुणवत्ता आधारित स्पॉन्सरशिपची अट शिथिल करत आहोत,’ असे जाहीर केले. त्यामुळेच या पूर्ण नाटय़ावर सेरेनाने ‘त्यांना त्यांची चूक कळली हे चांगले झाले. देर आए दुरुस्त आए,’ एवढीच प्रतिक्रिया दिली. खेळाडू होण्यासाठी शारीरिक मेहनतीबरोबरच मानसिक तयारी देखील लागते. त्यामुळे अनेकदा अनेक स्त्री खेळाडू त्यांचे लग्न लांबवतात आणि अर्थातच त्यानंतर येणारे मातृत्वही. त्यात जर त्यांना आर्थिक साहाय्य करणाऱ्या संस्थांनी प्रतिकूल भूमिका घेतली तर मातृत्वाचा निर्णय घेणे अनेकींसाठी नक्कीच अवघड होते. पण सेरेनासारख्या यशस्वी खेळाडूने यावर नापसंती दाखवल्यामुळे कंपनीला त्यांचा निर्णय बदलावा लागला.
आपल्या देशातही मॅटíनटी बेनीफिटचा कायदा आहे, ज्याअंतर्गत स्त्री कर्मचाऱ्यांना सहा महिने पगारी रजा देण्याची तरतूद असते. पण अनेकदा खासगी कंपन्यामध्ये, असंघटित कर्मचाऱ्यांना हे लाभ मिळत नाहीत. एकीकडे घरची आर्थिक जबाबदारी आणि दुसरीकडे नैसर्गिक जबाबदारी यामध्ये अनेक स्त्रियांची कुतरओढ होते. फक्त ‘फायदा’ हे लक्ष्य ठेवण्याऐवजी ‘मानवतेच्या दृष्टिकोनातून फायदा’ असे लक्ष्य ठेवल्यास लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची नायकेसारखी वेळ इतर कंपन्यांवर नक्कीच येणार नाही.
बीजं जगवताना..
प्रत्येक देशाचं, तिथल्या मातीचं एक वेगळेपण असतं साहजिकच अनेक पिकं त्या त्या ठिकाणीच उगवतात, भरघोस पिकं देतात आणि अनेकांचा घास बनतात. पण तीच पिकं इतर देशांतही रुजतात, वाढतात, त्या देशाची होतात. जसं आपल्याकडेही परदेशांतून आलेली मिरची, बटाटा आपली कधी झाली आपल्यालाही कळलंच नाही.
स्लोव्हाकिया हा युरोपमधला एक छोटासा देश. या देशातली झुझुना पास्त्रोकोव्हा ही अगदी सर्वसामान्य स्त्री. ७ वर्ष नौकेवरून जगभ्रमण केल्यावर तिला शांतपणे गावात राहून शेती करावीशी वाटली. लहान असताना तिने ज्या भाज्या खाल्ल्या होत्या ते सगळे परत खावेसे वाटले. ते सहज मिळेना म्हणून तिनेच गावातल्या लोकांकडून बियाणे मिळवून त्याची शेती करायला सुरुवात केली. त्याच्याच सोबत तिने जगभर फिरत असताना ठिकठिकाणाहून जमा केलेली बियाणेदेखील तिच्या शेतात पेरली. त्यामुळे स्लोव्हाकियामध्ये झुझुनाच्या शेतात आर्यलडच्या बीन्स, रोमानियाचे कांदे, सायप्रसचे भोपळेसुद्धा उगवतात. जशी पोर्तुगालमधून आलेली मिरची, टोमॅटो आपल्याकडे इतके रुळले, तसाच हा बाहेरच्या देशातला भाजीपाला स्लोव्हाकियामध्ये सहजच रुळून जाईल की काही वर्षांनी हा बाहेरचा आहे यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीत कदाचित.
झुझुनाची गोष्ट युरोपमधली आहे. तशीच एक वेगळी गोष्ट आहे मारिया लोरेथाची. इंडोनेशियाची रहिवाशी असलेली मारिया लोरेथाने गावोगाव फिरून आपली जुनी पिके काय होती याचा शोध घेतला तेव्हा तिला ज्वारीच्या पिकाची माहिती मिळाली. त्यांच्या भागात कैक दशकांपूर्वी ज्वारीचे पीक मोठय़ा प्रमाणावर घ्यायचे, पण तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांना पांढऱ्या तांदळाचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहन दिले आणि त्याचबरोबर ज्वारीचे जे स्थानिक पीक होते ते माणसांना खाण्यास योग्य नाही, ते फक्त प्राण्यांना खायला घातले पाहिजे असा समज पसरवला. त्यामुळे झपाटय़ाने ज्वारीची शेती कमी झाली. तांदळाच्या शेतीमुळे पाणी जास्त लागू लागले. त्यामुळे मारियाने कमी पाणी घेणारे पण श्रम जास्त असणारे ज्वारीचे पीक घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिला फार कोणाचे प्रोत्साहन नव्हते. अर्थात यासाठी तिने सोबतीला घेतल्या होत्या स्थानिक स्त्रिया. वेगवेगळ्या संशोधनात ज्वारीचे महत्त्व नव्याने समोर आले आहे. त्यामुळे कमी पाण्यात येणारे पण अत्यंत गुणकारी ज्वारीचे पीक या स्त्रियांना आर्थिक स्थर्य देखील मिळवून देत आहे.
ज्याप्रमाणे राहीबाई पोपेरे आपल्याकडे वेगवेगळ्या बियाण्यांची बँक करत आहेत त्याच पद्धतीचे काहीसे काम झुझुना, मारिया त्यांच्या देशात करत आहेत. अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी शेतीकडे वळत आहेत ही नक्कीच आशादायक गोष्ट आहे. त्याचबरोबर शेतीची गणिते घरात बसून सोडवायची नसतात. त्यासाठी माती, पाणी, आधुनिक शास्त्र आणि पूर्वापार चालत आलेल्या ज्ञानाचीदेखील सांगड घालायची असते. नाहीतर आपल्याकडच्या भगर, राजगिरा, राळ, नाचणी अशा मिलेटवर्गातील धान्याची महती इतर देशांतले आपल्याला सांगतील आणि आपल्याच मातीतील पिके, आपले पूर्वज जे खात होते ते, आपण ‘बाकीचे सांगतात चांगलं आहे’ म्हणून परत खायला सुरू करू. या मधल्या काही वर्षांमध्ये, किती तरी भाज्या, फळं, धान्यं दुर्मीळ किंवा नामशेष झालेत. किमान यापुढे तरी असे होऊ नये एवढी काळजी आपण घेतली तरी ही धरतीआई लेकरांवर खूश होईल.
विद्यार्थिनीसाठी वरदान
कोणतीही मुलगी स्त्री केव्हा होते, तर तिला मासिक धर्म सुरू होतो तेव्हा. पण मासिक धर्म, मासिक पाळी या गोष्टीकडे खूपच संकुचित दृष्टीने पाहिले जाते, अगदी भारतातही. पण या गोष्टीचा परिणाम जेव्हा मुलींच्या विकासावर होत असेल तर ती गंभीर बाब ठरते, जे कित्येक वर्षांपासून आपल्याकडेही होत आले आहे. आजही ग्रामीण भागातच नव्हे तर शहरांमध्येही शाळकरी मुलींमध्ये ‘त्या’ चार दिवसांत शाळा बुडवण्याचे प्रमाण जास्त आहे. जगभरात सगळीकडेच हे वास्तव बघायला मिळते. अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या मालाची जाहिरात करण्यासाठी म्हणून शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स वाटतात. पण कितीतरी जणी हा जादाचा खर्च दर महिन्याला करू शकत नाहीत. जुने कापड सर्रास वापरले जातात, पण ते स्वच्छ उन्हात वाळवण्याची साधी सुविधाही अनेकींना उपलब्ध नसते. या सगळ्या समस्येच्या मुळाशी जाऊन एक वेगळा प्रयोग मालावी या आफ्रिकेतल्या एका छोटय़ा देशातल्या शाळांमध्ये केला गेला.
मालावीतल्या शाळेत मुलींना बसवून त्यातल्या कोणाकोणाला मासिक पाळी येते हे विचारले आणि ज्या ज्या मुलींनी हात वर केले त्यांना एकेक ‘मेनस्ट्रएशन कप’, ते उकळण्यासाठीचे भांडे आणि एक पिशवी दिली. लुसी न्कोह्मा या मालावीमधील शाळांमध्ये जाऊन मेनुस्ट्रेशन कपबद्दलची माहिती देतात आणि त्याचे वाटप करतात. एकदा घेतलेला कप जास्तीत जास्त दहा वर्षे वापरता येत असल्यामुळे पशाची बचत होतेच पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील शून्य कचरा होत असल्यामुळे हे कप वरदान ठरत आहेत. ‘पहिल्यांदा हे कप वापरत असताना आम्हाला भीती वाटत होती, पण नंतर ते वापरणं खूप सोयीचं वाटू लागलं. त्यामुळे आमचे कपडे खराब होत नाहीत, आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो, खेळू शकतो,’ असे अनुभव तिथल्या मुलीच नव्हे तर शाळेतल्या इतर शिक्षिकांनीदेखील सांगितला.
पहिल्यांदा १९३२ मध्ये ‘मेनस्ट्रएशन कप’ची संकल्पना मांडली गेली मात्र त्याचा आकार थोडा वेगळा होता. नंतर १९३७ मध्ये लिओना चाल्मर्स यांनी विक्रीयोग्य कपची संकल्पना मांडून पेटंट मिळवले. १९६० च्या सुमारास टासअवे नावाच्या कंपनीने रबरी कप बाजारात आणले होते, पण त्याला काही यश मिळाले नाही. १९८७ मध्ये ‘लेटेक्स’ने तयार केलेले मेनस्ट्रएशन कप अमेरिकेच्या बाजारात आले, जे अजूनही मिळतात. २००१ मध्ये युकेमधल्या कंपनीने सिलिकॉनने बनवलेला मोनोकप बाजारात आणला. हे हलकेही होते आणि वापरायला सोपेदेखील त्यामुळे हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढायला लागली. अनेक बिगर सरकारी संस्था याच्याबद्दल जनजागृती करतात. भारतात देखील याचा प्रचार आणि प्रसार मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे.
‘पॅडमॅन’ चित्रपटामुळे किमान आपल्याकडे सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल बोलायला तरी सुरुवात झाली. शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मेनस्ट्रएशन कपबद्दल कुजबुजत्या आवाजात का होईना, पण चर्चा सुरू झाल्यात, एकमेकींच्या अनुभवावरून एकदोघी हे वापरायलादेखील लागल्या आहेत. या कपमुळे आर्थिक बचतीबरोबरच सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नसुद्धा लगेच सुटतो. या कपाच्या निमित्ताने मालावीतल्या शाळांमधल्या मुलींच्या हजेरीचे प्रमाण तर वाढलेच पण त्याचबरोबर त्यांचे शारीरिक आरोग्यदेखील जपले गेले. हे सर्व करताना पर्यावरणाचा देखील ऱ्हास झाला नाही. असे तिहेरी फायदे एका छोटय़ा कपामुळे झाले. आपल्याकडे पण लवकरच शासकीय, बिगर शासकीय पातळीवर हे पाऊल उचलले जावे अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो.
लोकसत्ता, चतुरंग, पृथ्वी प्रदक्षिणा ८ जून २०१९
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

पृथ्वी प्रदक्षिणा ११

आपण एखाद्या कपडे विकणाऱ्या वेबसाइटला जेव्हा भेट देतो, तेव्हा ते कपडे घालणाऱ्या मॉडेल्स दिसत असतात. चेहरा तोच असतो, पण अंगावरचे कपडे वेगवेगळे असतात. त्यामुळे अनेकदा ‘ही फोटो शॉपची करामत तर नाही ना’ असेच वाटते. पण चीनमधल्या ‘तावबाव’ या कपडय़ांच्या अग्रगण्य वेबसाइटसाठी काम करणाऱ्या तिआनतीन आन या मॉडेलने मात्र या फोटोमागचे वेगळेच वास्तव तिच्या मुलाखतीत सांगितले.
जवळजवळ दहा वर्षे मॉडेलिंगमध्ये संघर्ष केल्यावरही चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी काही तिला मिळेना. त्यानंतर मात्र तिने थोडा अधिक अभ्यास केला, आणि जास्त वेगाने कपडे कसे बदलता येतील, लवकर-लवकर वेगवेगळ्या पोझ कशा देता येतील याचा अभ्यास केला आणि त्यानंतर वर्ष-दीड वर्षांतच तिला ‘तावबाव’मध्ये काम मिळाले. पण हे काम तिच्या वयाच्या स्त्रियांसाठीच्या कपडय़ाचे नव्हते तर मध्यमवयीन, ज्येष्ठ स्त्रियांसाठीचे होते. काम मिळत होते म्हणून तिआनतीनने हे काम घेतले. ती सांगते, ‘‘फोटो काढत असताना माझे हात, चेहऱ्यावरचे हावभाव आधीच ठरवले असतात, अगदी त्याच क्रमाने मी प्रत्येक वेळी करते, डोळे बिलकूल मिचकावत नाही. पहिले हात पोटावर, मग गळ्यापाशी, नंतर तळवा गालावर, त्यानंतर कपाळावर, अशा माझ्या हालचाली ठरलेल्या असतात. त्यामुळे वेळ बिलकूल वाया जात नाही. आम्हाला मिळणारे कामाचे पैसे आम्ही एका दिवसात किती कपडय़ांसाठी फोटो काढले आहेत यावर अवलंबून असतात.’’  ‘‘माझ्यापेक्षा जलद गतीने कपडे बदलणारी, फोटो काढून घेणारी मला तरी माहीत नाही,’’ असे तिआनतीन अभिमानाने सांगते. याचे कारण तिने एका दिवसात ४८५ कपडे बदलून फोटो काढून घेतलेले आहेत. दोनदा कपडे काढण्या-घालण्यात दमणाऱ्या अनेक जणी आपल्या आसपास असतात, तेव्हा ४८५ वेळा ही फक्त कल्पनाच केलेली बरी!
मॉडेलिंग या क्षेत्राचे आजही अनेकांना आकर्षण असते. पण या क्षेत्रात फक्त चांगले दिसून नाही भागत, त्यासोबत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी चपळ, चतुर देखील असावे लागते, क्वचित एखाद्या रोबोट्सारखे तेच ते सतत करावे लागते, पण आपण केलेल्या कामाचा आनंद मिळत असतो तोवर दिवसातून ४८५ कपडे बदलण्याचा कंटाळा येत नाही तर अभिमान वाटतो.
इको फॅशन
समाजमाध्यमांचा परिणाम म्हणून आता जगातली कोणतीही फॅशन अगदी हाताच्या एका बोटावर आली आहे. एक क्लिक केले की ती आपल्यासमोर उलगडते. फॅशनचीपण एक स्वत:ची अशी गंमत असते, ‘पृथ्वी गोल आहे’ या संकल्पनेसारखीच फॅशनही गोलच फिरत असते, काही वर्षांनी परत तिथेच येऊन थांबते. जुनाट वाटणारी नऊवारी आता एकदम स्टाइल आयकॉन झाली आहे, फुगीर बाह्य़ा परत ‘इन’ झाल्या आहेत. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पूर्वी आणखी एक गोष्ट व्हायची. घरात, आजूबाजूला अनेक जण असल्यामुळे कपडे एकीकडून दुसरीकडे अगदी सहजगत्या प्रवास करायचे. त्यामुळे ताईचे कपडे अक्काला, अक्काचे कपडे छोटीला आणि त्यानंतर शेतावरच्या मुलीला. कपडे लहान झाले म्हणून लगेच टाकून देण्याऐवजी दुसरे वापरायचे. बरं ‘दिसायला चांगले’पेक्षा टिकाऊ, दणकट कपडे घेण्याकडे कल असल्यामुळे कपडे टिकायचेदेखील. मग कधी-कधी आईच्या / आजीच्या जुन्या साडीचे कपडेदेखील शिवले जायचे. हे सगळे लिहायचे कारण म्हणजे ब्रिटनमधली एक फॅशन डिझाइनर , लिंडा थॉमस. तिची ओळख आहे, ‘इको डिझाइनर’. लिंडाचं वेगळेपण म्हणजे ती खूप वेगवेगळ्या पद्धतीने जुने कापड, डिफेक्टिव्ह कापड किंवा लोकांनी फेकून दिलेल्या गोष्टी तिच्या डिझाइनमध्ये वापरते.
लिंडाने ‘हॅलोविन’च्या दिवशी एक आगळा-वेगळा ड्रेस जगासमोर आणला होता. अनेकदा मासेमारी करताना नायलॉनच्या जाळ्या किंवा त्यांचे काही भाग समुद्रातच राहतात. किंवा मासेमार जुनी झालेली जाळी टाकून देतात. लिंडाने अशा टाकून दिलेल्या जाळ्यांमधून सुरेखसा ड्रेस तयार केला. ती सांगते, ‘‘हा ड्रेस शिवताना माझी बोटंसुद्धा त्यात अडकत होती. गरीब बिचाऱ्या समुद्रातल्या जीवांचे काय होत असेल?’’ व्हेलच नव्हे तर इतर माशांच्या पोटातदेखील मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक आणि तत्सम सागरी कचरा मिळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या सगळ्याबाबत जागृती व्हावी म्हणून तिने हा ड्रेस शिवला होता. असाच तिने एक फुग्यांचा ड्रेस शिवला होता. हेलियमचे फुगे मुलांनाच काय मोठय़ांनासुद्धा भुरळ पाडतात. पण हे वर गेलेले फुगे कधी तरी खाली येणारच. तेव्हा त्यांचे काय? ते निव्वळ कचरा होऊन जातात. लिंडाने अशाच खाली आलेल्या, हवा गेलेल्या फुग्यांचा एक ड्रेस शिवला. या ड्रेसचे नाव तिने ठेवले होते ‘९९ डेड बलून्स’. ‘फुगे फुगवा पण ते आकाशात सोडून देऊ नका. ते सांभाळा. जर तुम्ही ते सोडून दिले तर ते कुठे तरी दुसरीकडे जातील, नंतर त्याचा कचरा होईल. तो कोण साफ करेल? त्यामुळे असा कचरा होऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत,’ हे तिचे मत तिने त्या ड्रेसद्वारे मांडले होते. असाच आणखी एक आगळा-वेगळा ड्रेस तिने तयार केला होता. तो होता तब्बल
२२ मल लांबीचा. हा ड्रेस तिने कशापासून बनवला होता, तर सìफगसाठी वापरलेल्या सर्फ बोर्डवरच्या प्लास्टिकपासून. अनेकदा अनेक जण समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येतात, सìफगसाठी बॉडीबोर्ड्स घेतात. नंतर ते टाकून देतात. त्याचे वरचे कव्हर मग तसेच तिथेच त्या समुद्रकिनाऱ्यावर कुजत राहते. यामुळे फक्त समुद्रकिनारेच नाही तर पर्यावरणाची खूप मोठी हानी होते. या सगळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी तिने अशा टाकून दिलेल्या कापडांचा ड्रेस शिवला. लिंडा अनेकदा डिफेक्टिव्ह किंवा जुने कापड, नवीन कपडे शिवतानासुद्धा वापरते.
केवळ लिंडाच नव्हे, पण सगळीकडे वापरलेले चांगले कपडे परत वापरण्याचीदेखील एक नवीनच टूम आली आहे. पूर्वी फक्त जुन्या बाजारात असे वापरलेले कपडे मिळायचे किंवा बोहारणी हे जुने कपडे घेऊन जायच्या. आता बोहारणी खूप कमी झाल्यात आणि जुन्या बाजारातल्या किमतीत नवीन कपडे मिळतात. त्यामुळे जुन्या बाजारातल्या कपडय़ांचे ग्लॅमर खूपच कमी झाले आहे. अमेरिकेत अशी जुनी कपडे विकणारी दुकाने/ वेबसाइट्सदेखील आहेत. भारतातदेखील जुने कपडे खास करून जुन्या साडय़ा विकणाऱ्या / विकत घेणाऱ्या अनेक जणी आहेत. अशा साडय़ांच्या विक्रीला ‘रीहोमिंग’ असे एक गोंडस नावदेखील वापरतात. अर्थातच कपाटात पडून राहणाऱ्या साडय़ांना अशा प्रकारे हवादेखील लागते. एकूणच काय, नवे असो वा जुने, किंवा जुन्यातून तयार केलेले नवे, कपडे हा कायम स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे.
आईपण नाकारताना..
जग दिवसेंदिवस विरोधाभासाने भरून जात आहे, म्हणजे चैनीच्या नवनव्या गोष्टी वाढत असतानाच दुसरीकडे ‘मिनिमलीस्ट’ लोकांची संख्यासुद्धा वाढत आहे. झाडं कापून, शेतं कमी करून घरे, इमारती बांधल्या जात आहेत, तर दुसरीकडे अनेक उच्चशिक्षित लोक शेतीकडे वळत आहेत, अगदी तसाच काहीसा विरोधाभास २५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘विश्वपालक दिवस’ आणि ‘बर्थस्ट्राईकर्स’मध्ये दिसत आहे. मुलांचा दिवस असतो तसाच पालकांचा दिवस का असू नये, या भूमिकेतून १९९४ पासून १ जून हा ‘विश्वपालक दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मात्र आई-बाबा ही काही फक्त उपाधी नसते, ती एक जबाबदारी देखील असते, त्यामुळे केवळ जन्माला घालायचे म्हणून मुलं जन्माला का घालायची हा प्रश्न विचारणाऱ्या ‘बर्थस्ट्राईकर्स’ची संख्या वाढते आहे. ब्लाथ पेपिनो ही या चळवळीच्या प्रणेत्यांपैकी एक आहे.
दिवसेंदिवस हवेचे प्रदूषण वाढत आहे, नानाविध प्रकारचे पर्यावरणीय प्रश्न जटिल होत चालले आहेत. तापमानवाढीचा प्रश्न अधिकच बिकट होत चालला आहे. त्यामुळे अनेक प्रगत देशांमधल्या जोडप्यांनी, खासकरून स्त्रियांनी मूल जन्माला घालायचे नाही असे ठरवले आहे. या जगात खूप माणसे आहेत त्यात अजून एकाची भर कशाला, असा विचार करत ठरवून आईपण नाकारणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ‘बर्थस्ट्राईकर्स’ असा हॅश टॅग वापरून अनेक जणी या मोहिमेला पाठिंबा देत आहेत. त्यातल्या अनेकींचे म्हणणे आहे, ‘हे जग सुंदर राहिलेले नाही, मग आम्ही का एका जिवाचे भविष्य धोक्यात घालायचे?’ ‘व्हेगन’ होणारे अनेकजण देखील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी म्हणून मूल जन्माला घालायचे नाही असे ठरवतात. अगदी क्वचित काहीजणी सांगतात, की त्यांना आई होण्याची आंतरिक उर्मी नाही म्हणून त्या या समूहात आलेल्या आहेत, पण बहुतांश जणींचे भविष्यकाळातले दुष्काळ, पूर, तापमान वाढ, युद्ध यामुळे हे जग राहण्यायोग्य नसेल यावर एकमत आहे. आपल्या जिवाचा अंश केवळ आपल्याला हवा म्हणून जन्माला घालणे हा स्वार्थ आहे, असे यातील काहींचे म्हणणे आहे. अनेकींनी हा निर्णय त्यांच्या साथीदाराला सांगून त्याचीसुद्धा सहमती मिळवलेली आहे. यातल्या काही जणींनी मूल दत्तक घेतले आहे, तर अनेकींनी जर त्यांना भविष्यात मूल असावे असे वाटले तर आपण त्यावेळी मूल दत्तक घेऊ असे सांगितले आहे. अमेरिका युरोपमध्ये अशा समविचारी लोकांचे समूह मोठय़ा संख्येने तयार होत आहेत. आपल्याकडे देखील अशा विचार करणाऱ्या स्त्रियांची, जोडप्यांची संख्या वाढत आहे.
मातृत्व ही स्त्रियांसाठी अगदी खास गोष्ट असते. कारण नवनिर्मितीची क्षमता निसर्गाने फक्त त्यांनाच दिलेली असते. असे असूनही काहीजणी डोळसपणे पृथ्वीचा, मनुष्यजातीचा विचार करून हे मातृत्व नाकारत आहेत. ही सगळ्यांना जमणारी, पटणारी गोष्ट नाही, पण किमान त्या ज्या कारणांसाठी हे करत आहेत ते समजून घेऊन आपण सगळ्यांनीच त्यासाठी आपल्या परीने शक्य तेवढे प्रयत्न करून कार्बन उत्सर्जन कमी केले तर पुढच्या पिढीचा देखील ‘पृथ्वी सुंदर आहे’ यावर विश्वास बसेल.
लोकसत्ता, चतुरंग, पृथ्वी प्रदक्षिणा, २५ मे २०१९
(स्रोत : इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

पृथ्वी प्रदक्षिणा १०

ग्रेटा थंबर्ग ही सोळा वर्षांची ‘अस्पर्जर सिंड्रोम’ने आजारी असणारी, काही वर्षांपूर्वी नराश्याच्या गत्रेत लोटली गेलेली, गरजेपुरती बोलणारी मुलगी सध्या शाळा बुडवून शाळेबाहेर आंदोलन करते आहे. तिला जे वाटते ते ठणकावून सगळ्यांना सांगते आहे. बरं ज्या कारणासाठी ती हे आंदोलन करते, ते तिच्या एकटीच्या संदर्भातले नाही. किंवा शाळेच्या वा फक्त तिच्या गावच्या संदर्भातलेही नाही. तिचा आंदोलनाचा जोर बघून हे लोण जगभर पसरत चालले आहे. तिला ‘युनो’ मध्येच नव्हे, तर अनेक ठिकाणी बोलायला बोलावलं जात आहे.
ग्रेटा थंबर्ग स्वीडनमधली असून तापमानवाढ कमी करण्यासाठी स्वीडन सरकारने योग्य ती पावले उचलावीत या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहे. तिने मागील वर्षी कार्बन उत्सर्जन, त्यामुळे होणारी तापमानवाढ, या संदर्भातला  एक व्हिडीओ पाहिला आणि तिच्यावर त्याचा खूप परिणाम झाला. स्वीडन सरकारने कार्बन उत्सर्जन कमी करावे म्हणून ती प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून ती शाळेच्या वेळेत तिथल्या संसदेच्या बाहेर बसायची. स्वत:पासून सुरुवात करून मगच लोकांना सांगावे यासाठी ग्रेटा स्वत: ‘व्हेगन’ झाली त्याचबरोबर ती विमान प्रवास शक्य तेवढा टाळते.
‘अस्पर्जर्स सिंड्रोम’ म्हणजे स्वमग्नतेच्या जवळ जाणारा आजार. यामध्ये पीडित व्यक्ती एकच गोष्ट वारंवार करते. त्या गोष्टीवरून ती तिचे लक्ष हरवू देत नाही. अशा लोकांना समाजात वावरताना, थोडय़ा अडचणी येतात. ग्रेटा सांगते, माझ्या आजारामुळे मला मी वेगळी असल्याची जाणीव झाली आणि त्यामुळेच आपण काही करू शकतो हेसुद्धा लक्षात आले. आपण सगळे जण त्रस्त आहोत या तापमानवाढीमुळे, याचे परिणाम आपण भोगत आहोत, त्यामुळे याच्यावरची उपाययोजना आपणच शोधून काढली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्या देशांनी पॅरिस ठरावानुसार कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी केलेच पाहिजे. हे ती ठासून सांगते. तापमानवाढीचे परिणाम आपल्यालाही दिसायला लागलेत. पश्चिम महाराष्ट्रात ४२-४३ चा आकडा ओलांडणारा काटा, किंवा विदर्भात ४६-४७ डिग्री नोंदवले जाणारे तापमान या सगळ्याचा अगदी गांभीर्याने विचार झाला पाहिजे. ग्रेटासारखा विचार करून स्वत:पासून सुरुवात करत आपणही कृतिशील बनले पाहिजे.
त्याचबरोबर समाज म्हणून एकत्र येऊनही आपण काही बदल घडवून आणूच शकतो. फिनलंडमधील १० हजार वस्तीच्या ‘ली’ या गावाने जगातील पहिले झिरो वेस्ट गाव बनण्याचे ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून २००७-२०१५ या आठ वर्षांत त्यांनी
गावातले कार्बन उत्सर्जन निम्म्यावर आणले. या गावात पेट्रोल, डीझेल, केरोसीन, कोळसा हे काहीच वापरले जात नाही. थर्मल एनर्जी, विंड एनर्जी, सोलार एनर्जी यासारख्या कमी उत्सर्जन करणाऱ्या गोष्टींचा वापर केला जातो. मुले शाळेतच नव्हे तर घरीसुद्धा सगळी उपकरणे बंद आहेत ना, फक्त गरजेच्या वेळीच चालवली जात आहेत ना, याची खातरजमा करतात. या पूर्ण चळवळीमध्ये विद्यार्थाचा मोठा सहभाग आहे.
ग्रेटा असो नाही तर ही फिनलंडमधली मुलं, त्यांना या पृथ्वीवर त्यांचं भविष्य हवं आहे. ते सुखकर असावं म्हणून ते शक्य त्या सर्व पद्धतींनी प्रयत्न करत आहेत. तापमानवाढ काही फक्त स्वीडन, फिनलंडपुरती मर्यादित नाही. आपणही या अशा प्रयत्नांना साथ दिली पाहिजे. वैयक्तिक पातळीवरून प्रयत्न सुरू करून नंतर सरकारकडेदेखील याचा पाठपुरावा केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या निवडणुका संपल्या, पण दुर्दैवाने एकाही पक्षाच्या, उमेदवाराच्या जाहीरनाम्यात वातावरण बदलाचा, किंवा तापमानवाढीचा मुद्दा नव्हता. यावरून आपण या विषयाबद्दल किती उदासीन, अनभिज्ञ आहोत हेच प्रतीत होते. आज काही पावले उचलली तर उद्याचा दिवस बघायला मिळेल. त्यामुळे आज आत्ता ताबडतोब सुरुवात करण्याची गरज आहे. आपल्याच साठी.
जागतिक गणितज्ञ ‘मरियम’ दिवस
१२ मे २०१९ हा दिवस तसा खासच म्हटला पाहिजे. १२ मे हा दिवस यापुढे दर वर्षी ‘जागतिक स्त्री-गणितज्ञ दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. वर्षांतले ३६५ दिवस असताना हाच दिवस का निवडला, तर १९७७ मध्ये याच दिवशी मरियम मिर्झाखानी इराणमध्ये जन्मली होती. इराणमधला उठाव अगदी भर बहरात असताना मरियम जन्मली खरी, पण तिच्या सुदैवाने ती शाळेत जाईपर्यंत युद्धाचे ढग मागे सरले होते. मरियमचे आई-वडील दोघेही खुल्या विचारांचे होते.
मरियमला तेहरानच्या चांगल्या शाळेत सहज प्रवेश मिळाला. तिथेच तिची रोया बेहेश्तीशी ओळख झाली आणि या जोडगोळीने इराणला अनेक बहुमान मिळवून दिले. शाळेजवळच्या पुस्तकांच्या दुकानातून या दोघी नेहमीच पुस्तक मिळवून वाचायच्या, तेव्हा मरियमला वाटायचं ती लेखिकाच होणार, त्यात तिच्या शाळेतल्या शिक्षिकेने तिला गणितात गती नाही हे सांगितले, त्यामुळे मरियमनेदेखील ‘आपल्याला गणित येत नाही’ अशीच खुणगाठ मनाशी बांधली. पण तिच्या आणि गणिताच्या सुदैवाने पुढच्या वर्षीच्या शिक्षकाने तिच्या मनातली ही भीती कायमची दूर केली आणि तिला गणित शिकण्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिकांनीदेखील या मुलींना प्रोत्साहन दिले. त्यानंतर मरियम आणि रोया या दोघींनी ‘इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पिक’मध्ये सलग दोन वर्षे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. तेहरानमध्ये गणितातली पदवी घेत असतानाच मरियमने नामांकित जर्नल्ससाठी शोधनिबंध लिहिले होते. त्यामुळे पदवीनंतर तिला हार्वर्डला पीएच.डी.साठी प्रवेश न मिळता तर विशेष होते. तिथे ही तिने वक्र पृष्ठभागावरच्या दोन बिंदूंमधील सर्वात कमी लांबीचा रेषाखंड (जिओडेसिक) मोजण्याच्या पद्धतीवर संशोधन केले होते. त्यामुळे जिओडेसिकची सोपी मोजमापाची समीकरणे, त्यांचे परस्परसंबंधदेखील जगासमोर आले.
अशी अनेक न उलगडलेली समीकरणे सोडवत असतानाच २०१३ मध्ये मरियमला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. ‘हे अवघड गणितही आपण सोडवू शकू’ या आत्मविश्वासाने तिने उपचार आणि संशोधन दोन्ही सुरूच ठेवले. २०१४ मध्ये ‘जागतिक गणित संघटने’चे दर चार वर्षांनी एकदा भरणारे संमेलन सेऊल इथे भरले होते. याच संमेलनात मरियम मिर्झाखानी ही ‘फिल्ड मेडल’ मिळवणारी पहिली स्त्री आणि इराणी व्यक्ती ठरली. (याच संमेलनात मंजुळ भार्गव या भारतीय वंशाच्या पण कॅनडाच्या रहिवासी असलेल्या गणितज्ज्ञालादेखील पुरस्कार मिळाला होता.) केमोथेरपी सुरूच होती पण तरीही ही एक ऐतिहासिक घटना असल्यामुळे मरियम तिथे गेली खरी, पण फार मोकळेपणाने बोलू वा सहभागी होऊ शकली नाही. दुर्दैवाने २०१६ मध्ये तिचा कर्करोग यकृतापर्यंत पसरला आणि १४ जुलै २०१७ ला मरियमचे निधन झाले. त्यानंतर इराणमधील वृत्तपत्रांनी चक्क शिरस्ता मोडून मरियमचे बिना स्कार्फचे फोटो छापले. हा खूप मोठा बदल होता.
मरियमचे शोध निबंध कायम उपलब्ध असतीलच पण तरीही तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ म्हणून तिचा जन्मदिवस ‘जागतिक स्त्री गणितज्ञ दिवस’ म्हणून साजरा करावा ही अनेकांची विनंती ‘इंटरनॅशनल सायन्स कौन्सिल’ने मान्य केली. त्यामुळेच २०१९ पासून उद्याचा, १२ मे हा दिवस ‘जागतिक स्त्री गणितज्ञ दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मनात इच्छा असेल, विश्वास असेल तर काहीही शक्य आहे हे मरियमने तिच्या अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात दाखवून दिले. अशा अनेक मरियम समोर येवोत. हीच मरियमला खरी श्रद्धांजली ठरेल.
आई-लेक आणि सोशल मिडिया
नुकताच ‘माव्‍‌र्हल्स’चा ‘अव्हेंजर’ मालिकेतला शेवटचा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित झाला. ग्विनथ पाल्ट्रो या अभिनेत्रीने ‘माव्‍‌र्हल्स’ मालिकेत याआधीही काम केले आहे. पण काही दिवसांपूर्वी ही अभिनेत्री दुसऱ्याच कारणासाठी चच्रेत होती. ग्विनथची मुलगी अ‍ॅपल १४ वर्षांची आहे. या वर्षांच्या सुरुवातीला दोघी माय-लेकी फिरायला गेल्या होत्या. सध्याच्या परंपरेला जागत ग्विनथने तिचा आणि लेकीचा सेल्फी घेतला. सेल्फी नुसता फोनमध्ये असून चालत नाही, तो कोणत्या तरी सोशल मीडिया साइटवर टाकावासुद्धा लागतो, या मंत्राला जागत तिने तो फोटो ‘इंस्टाग्राम’वर टाकला. काही क्षणांतच तिच्या मुलीने, अ‍ॅपलने, त्या फोटो खालीच लिहिले, ‘आई, आपलं याबद्दल बोलणं झालं होतं. माझ्या संमतीशिवाय तू माझे फोटो टाकणार नव्हतीस.’
तसे बघायला गेले तर जवळपास प्रत्येक घरात होणारा हा संवाद होता. काहींना कदाचित अ‍ॅपलचे वागणे उद्धट वाटू शकते, पण जर चौदा वर्षांच्या सर्वसामान्य मुलीचा विचार केला तर त्यात चुकीचे असे काहीच नाही. तिला स्वत:चे खासगी आयुष्य जगासमोर मांडावेसे वाटत नसेल. ती तिची इच्छा आहे. केवळ आई-वडील सेलिब्रिटी आहेत म्हणून तिला ते स्टारडम नकोही असेल. तिची अशी काही मते नक्कीच असणार आणि त्यामुळेच तिने तिला जे वाटते ते स्पष्टपणे तिथे मांडले. या निमित्ताने आई-वडील आणि मुलांचे सोशल मिडियावरील संबंध या अनुषंगाने खूप चर्चा झाल्या. त्या पोस्टवर अनेक जणींनी ‘आम्ही एकटय़ाच नाही आहोत हे आज कळलं’ अशा अर्थाच्या प्रतिक्रिया टाकल्या. आपल्याकडे देखील अनेक मुले आई-वडिलांना त्यांच्या प्रोफाईलला फॉलो करू देत नाहीत, ते खासगी ठेवतात. यामागची प्रत्येकाची कारणे वेगळी असतात.
चौदा वर्षे वय म्हणजे अडनीडंच त्यामुळे खूप गोंधळ उडत असतो या मुलांचा. मुले / मुली भांबावून गेलेले असतात. त्यांना त्यांच्या मर्जीने आयुष्य जगायचे असते, स्वत:ची ओळख तयार करायची असते. अमक्याची मुलगी, बहीण, ही ओळख पुसायची असते. कदाचित त्याच भावनेतून अ‍ॅपलने आईला तसे रोखठोक सुनावले असेल. किंवा कदाचित काही वेगळे कारणही असू शकेल. पण ‘आपली आई सेलिब्रिटी आहे याआधी ती आपली आई आहे, त्यामुळे तिच्यावर आपला हक्क आहे’ हेच अ‍ॅपलने तिच्या प्रतिक्रियेतून दाखवले. उद्या अमेरिकाप्रेरित ‘मदर्स डे’ आहे. जिच्यावर आपण प्रेम करतो तिच्यावर आपण हक्क सांगतो, त्यामुळेच लेकीने सांगितले ‘टाकू नकोस’ तरी आईने फोटो टाकला. नंतर लेकीने त्यावर जाब विचारल्यावर, पण यात तर तुझा चेहरादेखील दिसत नाही म्हणत आईने तिला आश्वस्त केले. आई-मुलीचे नाते असेच खटय़ाळ असते. कोणास ठाऊक उद्या ग्विनथबरोबरचा दुसरा एखादा फोटो अ‍ॅपलच टाकेल आणि ‘हॅपी मदर्स डे-वर्ल्डस् बेस्ट मॉम’ म्हणेल!
आईला तिची मुलं कधीच मोठी झाली आहेत असे वाटत नाही, आणि मुलांना ‘आई आपल्याला कधी समजवायचे थांबवेल’ असे वाटेल तोपर्यंत सगळे काही आलबेल आहे असे समजायचे.
लोकसत्ता, चतुरंग, पृथ्वी प्रदक्षिणा, ११ मे २०१९  
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

पृथ्वी प्रदक्षिणा ९

‘जर पृथ्वीवरून चंद्रावर ठेवलेल्या एका संत्र्याचा फोटो काढायचा असेल तर तो काढण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील, तेवढेच प्रयत्न लागतात पृथ्वीवरून कृष्णविवराचे फोटो काढायला. आम्ही प्रयत्न करतच आहोत, त्यामुळे दोन-तीन वर्षांत आपल्याला नक्कीच कृष्ण विवराची छायाचित्रे मिळतील.’ केटी बाऊमेन एप्रिल २०१७ मध्ये म्हणाली होती आणि आता एप्रिल २०१९  मध्ये तिने कृष्णविवराचे पहिले छायाचित्र जगासमोर ठेवले देखील.
कृष्णविवर खरेच अस्तित्वात असतील का, की ते फक्त एक मिथ्य आहे, खरे असतील तर कसे दिसत असेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे फक्त खगोलशास्त्रज्ञच नव्हे तर भौतिकशास्त्राचे, गणिताचे शास्त्रज्ञ देखील शोधत होतेच. या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे एकटय़ादुकटय़ाचे काम नव्हतेच, त्यामुळे वेगवेगळे लोक एकत्र येऊन या प्रश्नांची उकल शोधायच्या प्रयत्नात आहे. इव्हेंट होरायझन टेलिस्कोप (इएचटी) मध्ये जगभरातल्या निरनिराळ्या ठिकाणांहून मिळालेली माहिती, फोटो जमा करून त्यावर संगणकाच्या मदतीने अभ्यास केला जातो. केटी बाऊमेन तिथे संगणक विशेषज्ञ म्हणून काम करते. तिने तयार केलेल्या अल्गोरिथममुळे संगणक वेगवेगळ्या प्रतिमा/ छायाचित्रे जुळवून ताडून बघतो. त्याचेच फलस्वरूप म्हणून १० एप्रिलला डोनटसारखे दिसणारे, हसणारे कृष्णविवराचे छायाचित्र आपल्याला बघायला मिळाले.
केटीचे वडील देखील संगणकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. पीएच.डी. पूर्ण केल्यावर हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट डॉक करताना ती ईएचटीमध्ये काम करत होती. ‘मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये पीएच.डी. करत असल्यापासूनच केटी हा अल्गोरिदम लिहीत होती. तिच्या मास्टर्सच्या थिसीसला ‘अर्न्‍स्ट गील्मेन’ पुरस्कार देखील मिळाला होता. जूनपासून केटी ‘कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये अध्यापनास सुरुवात करणार आहे. संगणकशास्त्राच्या अभ्यासाच्या जोरावर वयाच्या केवळ २९ व्या वर्षी केटीने जगाच्या इतिहासात स्वत:ची नोंद केली आहे.
केटीचे कौतुक करतानाच ‘एमआयटी’ने त्यांच्या एका जुन्या विद्यार्थिनीचा फोटोसुद्धा ट्विटरवर टाकला होता. या जुन्या विद्यार्थिनीने लिहिलेल्या अल्गोरिदममुळे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले होते. त्याचबरोबर आपण आज सर्रास जो शब्द वापरतो, ‘सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग’ या शब्दाची देणगी जगाला दिली अशी मार्गारेट हॅमिल्टनचीसुद्धा आठवण ‘एमआयटी’ने केटी बाऊमेनच्या निमित्ताने काढली होती. मार्गारेट हॅमिल्टन यांनी मिशिगन विद्यापीठातून गणितातली पदवी घेतली होती. लग्नानंतर त्या बोस्टनला स्थायिक झाल्या. १९६० मध्ये त्यांनी ‘एमआयटी’मध्ये कामाला सुरुवात केली. त्याकाळी संगणक, संगणकशास्त्र असे काही वेगळे नव्हते. लोक नवीन नवीन गोष्टी करून बघत होते आणि त्यातूनच शिकत होते. त्यावेळीच त्यांनी या सगळ्याला ‘सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग’ असे संबोधले पाहिजे, हे ठासून सांगितले आणि नंतर हा शब्द रुळलादेखील. ‘एमआयटी’मध्ये चार्ल्स स्टार्क ड्रेपर लॅबोरेटरीमध्ये काम करत असताना त्यांनी ‘अपोलो’ आणि ‘स्कायलॅब’ या मोठय़ा प्रकल्पांवर काम केले होते.
अनेकदा संशोधन हे स्त्रियांचे क्षेत्रच नाही, त्यांना ते जमणार नाही असे म्हणत स्त्रियांच्या अनेक संधी हिरावून घेतल्या जातात. पण केटी, मार्गारेटसारख्या अनेक जणी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवतात. ‘नासा’मध्येच नव्हे तर आपल्याकडे ‘इस्रो’मध्ये देखील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. अशा ठिकाणी तुम्ही स्त्री आहात की पुरुष याने काही फरक पडतच नसतो. ज्याचे काम अचूक आहे, अभ्यास आहे त्याला यश नक्की मिळणारच, अनेक स्त्रियांनी ते सिद्ध करून दाखवलं आहेच.
सुजाण लोकशाही
जगातली प्रगत सत्ता म्हणून अमेरिकेकडे बघितले जाते. आर्थिक महासत्ता असल्यामुळे जगाच्या नाडय़ा त्यांच्या हातात असतात असे म्हटले जाते. पण तरीही अनेक बाबतीत आजही अमेरिका इतर देशांच्या मागे आहे. एकविसाव्या शतकाचे दुसरे दशकही संपायला आले आहे, पण अजूनही अमेरिकेत स्त्री राष्ट्राध्यक्ष झालेली नाही. २००९ मध्ये बराक ओबामा हे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले होते. ओबामा यांनी शिकागो शहरातून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. आज तेच शिकागो शहर वेगळ्या कारणासाठी चच्रेत आहे.
शिकागो शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. २ एप्रिल २०१९ ला या निवडणुकीचा निकाल लागला आणि संपूर्ण अमेरिकेत हा निकाल खऱ्या अर्थाने वेगळा ठरला. लॉरी लाईटफुट यांनी ही निवडणूक जिंकली. ही निवडणूक जिंकून शिकागोची पहिली कृष्णवर्णीय स्त्री महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉरी या ‘एलजीबीटीक्यू’च्या समर्थक तर आहेतच, पण त्यांनी आपण लेस्बियन असल्याचे जगापासून लपवलेले नाही.
ओहायो प्रांतात आई शिक्षिका आणि कामगार वडील अशा अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या लॉरी लाईटफुट यांनी मिशिगन विद्यापीठातून कला शाखेची पदवी मिळवली. त्यांनतर अनेक छोटय़ा मोठय़ा पगाराच्या नोकऱ्या करतानाच शिकागो विद्यापीठातून १९८९ मध्ये कायद्याची पदवी देखील मिळवली. सरकारमध्ये काम करताना त्यांना अनेक गोष्टी नव्याने कळल्या. आपल्या कृष्णवर्णीय लोकांना सामोरे जावे लागणाऱ्या भेदभावाचीही त्यांना जाणीव झाली, यासाठी त्यांनी राजकारणात उतरण्याचे ठरवले. या पूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात त्यांच्यावर अनेक आरोप झाले, अगदी नाझी पद्धतीने वागत असल्याचे देखील, पण त्यांनी तोल ढळू दिला नाही आणि मुद्दय़ांवर आधारित त्यांचा प्रचार सुरूच ठेवला, त्याचीच फलश्रुती म्हणून २० मे रोजी त्या शिकागोच्या ‘पहिली कृष्णवर्णीय स्त्री महापौर’ म्हणून शपथ घेतील.
लॉरी लाईटफुट यांनी अ‍ॅमी एश्लेमॅन यांच्याशी लग्न केलेलं आहे आणि या दोघींनी एक मुलगी दत्तक घेतलेली आहे. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करून भारतातल्या समिलगी लोकांना खूप मोठा दिलासा दिला होता. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून कदाचित काही वर्षांनी आपल्याकडे देखील एखादी व्यक्ती तिचे समलंगिक असणे न लपवता समाजासमोर मान्य करतील. निवडणूक लढवणारी व्यक्ती कोण आहे, कोठून आली आहे, तिचे लंगिक प्राधान्य काय आहे यापेक्षा ती व्यक्ती कोणत्या मुद्दय़ांवर निवडणूक लढवत आहेत हे जास्त महत्त्वाचे असते, ही गोष्ट जेव्हा मतदार समजून घेतील तेव्हा लोकशाही सुजाण झाली असे नक्कीच म्हणता येईल. शिकागोच्या लोकांनी लॉरी लाईटफुट यांना निवडून देऊन हीच सुजाणता दाखवली आहे
सुदानचा उठाव
आफ्रिका खंडातल्या अनेक देशांना स्वांतत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली असली तरीही अनेक देशांमध्ये अजूनही अस्थिरता आहे. काही देशांमध्ये लोकशाही रुजूच शकली नाही, तर काही देशांमध्ये लोकशाही ही केवळ नावापुरती आहे. सुदान हा देश सध्या सगळीकडे चच्रेत आहे, याचेही कारण तसेच आहे. जवळपास गेली ३० वर्षे राष्ट्राध्यक्ष असलेल्या अल बशीर यांच्याविरुद्धचा असंतोष डिसेंबर २०१८ पासूनच उफाळून आला होता. त्याची परिणती म्हणून ११ एप्रिल २०१९ ला प्रस्थापित सरकारविरोधी उठाव यशस्वी झाला आणि त्यांना पदच्युत करण्यात आले. हे नाटय़ इथेच संपले नाही. त्यांनतर सन्याने ताबा घेतला, पण सर्वसामान्य जनतेला सन्य देखील नको आहे, त्यांना लोकशाही पद्धतीने निवडून आलेला त्यांचा नेता हवा आहे. बशीर यांच्यानंतर
ले. जन. आवाद इब्न औफ यांनी पदभार स्वीकारला, पण जनतेची तीव्र नाराजी बघून काही तासांतच त्यांनी ही जबाबदारी ले. जन. अब्देल फतेह अब्देल रहमान बुरहान यांच्याकडे सोपवली. या सगळ्या उठावात मोठा वाटा स्त्रियांचा होता. हे राजकीय स्थित्यंतर घडवून आणणाऱ्या निदर्शकांमध्ये जवळपास ७० टक्के स्त्रिया होत्या.
या उठावातील एक छायाचित्र जगभर खूप गाजले. व्हायरल झाले आहे. एका गाडीच्या टपावर एक वीस-बावीस वर्षांची तरुणी पारंपरिक सुदानी वेशभूषेत, थोबे, मध्ये आहे. त्या पांढऱ्या रंगाच्या तिच्या कपडय़ांवर तिने घातलेले सोन्याचे कानातलेही उठून दिसत आहे. लाना हारून यांनी काढलेल्या एका छायाचित्रात ही मुलगी आकाशाकडे एक बोट दाखवून त्वेषाने काही बोलताना दिसते. सोशल मीडियावर या फोटोने खूप धुमाकूळ उडवला. त्या पाठोपाठ आलेल्या व्हिडीओमध्ये हीच स्त्री गाणी म्हणताना दिसते. निदर्शकांच्या मागण्या, त्यांच्या तक्रारी ते साध्या-सोप्या शब्दांतून गाण्यातून मांडताना दिसत आहेत. अला सलाह हे त्या स्त्रीचे नाव जगाला नंतर कळले, पण तिची छबी त्या आधीच सगळीकडे पोहोचली होती. अला सलाहची वेशभूषा बघून अनेकींना त्यांच्या आई, आजीची आठवण आली. ६० ते ७० च्या दशकात सुदानमध्ये जी काही राजकीय निदर्शने झाली होती, त्यातही स्त्रियांचा वाटा खूप मोठा होता. आजच्या पिढीला त्यामुळेच अला सलाहचा फोटो बघून त्यांच्या मागच्या पिढीने बजावलेल्या कर्तव्याची जाणीव झाली असणार. त्याच वेळी डिसेंबरपासून खदखदत असणाऱ्या सुदानमधल्या असंतोषाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनाही या फोटोने एकदम परिस्थितीची जाणीव करून दिली.
गेल्या दोन दशकांपासून सुदानमध्ये कट्टर इस्लामिकता जोर धरत आहे. सुदानमधील बशीर यांची एकाधिकारशाही, इस्लामिक जिहाद आणि दहशतवादाला घातलेले खतपाणी, सततच्या दक्षिण सुदानबरोबर होणाऱ्या चकमकी यामुळे जनता गांजलेली आहे. तेलाच्या विहिरी हे सुदानचे प्रमुख व्यापाराचे साधन होते. मात्र २०११ मध्ये दक्षिण सुदान हा नवीन देश झाल्यामुळे त्या सगळ्या विहिरी त्या देशात गेल्या, त्यामुळे सुदानमधले प्रश्न अधिकच गंभीर झाले. शिवाय तेथे इस्लामी कायद्याचे पालन होत असल्याने स्त्रियांची स्थिती तर अगदीच दयनीय आहे. आपणच आपल्यासाठी उभे राहिले पाहिजे, या भावनेमुळे सुदानमधल्या स्त्रिया एकत्र झाल्या आणि तिथले राजकीय स्थित्यंतर घडवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.
काही जण अला सलाहाला नुबीयनची राणी म्हणाले, तर काही जणांनी तिच्या या  फोटोची तुलना स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याशी केली. आजघडीला तरी सुदानमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे, पण  लवकरच तेथे लोकांचे शासन येईल अशी आशा आहे. अला सलाहसारख्या नव्या पिढीच्या तरुणी त्यांच्या साठी, त्यांच्या पुढच्या पिढीसाठी ही क्रांती नक्कीच घडवून आणतील.
लोकसत्ता, चतुरंग, पृथ्वी प्रदक्षिणा २७ एप्रिल २०१९
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

पृथ्वी प्रदक्षिणा ८

मर्द को दर्द नही होता’ अशा नावाचा एक चित्रपट नुकताच येऊन गेला, त्याच धर्तीवर ‘औरत को (भी) दर्द नही होता’ असे म्हणायची संधी स्कॉटलंडमधल्या जो कॅमेरॉन यांनी दिली आहे.
स्त्री काय किंवा पुरुष काय, शारीरिक वेदना या होतातच. प्रत्येकाची वेदना सहन करण्याची क्षमता वेगळी असू शकते. त्यातही स्त्रियांना लहानपणापासून वेदना सहन करणे म्हणजे स्त्रीत्व जपणे असे भ्रामक शिक्षण दिले जात असते. त्यामुळे कितीही त्रास झाला तरी तोंडातून चकार शब्द न काढणाऱ्या स्त्रियांबद्दल कौतुकाने बोलले जाते. पण कॅमेरॉनची गोष्ट जरा हटकेच आहे.
स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या जो कॅमेरॉन यांना वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत आपण वेगळ्या आहोत याची जाणीवही नव्हती. त्यांच्या हातावर एक शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुम्हाला त्रास होईल, दुखेल तेव्हा सांगा, आम्ही वेदनाशामक गोळ्या देऊ. तेव्हा त्या ठामपणे म्हणाल्या, ‘‘छे , मला त्या वेदनाशामक गोळ्यांची गरजच भासणार नाही.’’ डॉक्टर त्यांच्या उत्तरावर चकित झाले पण तरीही त्यांनी प्रतिवाद केला नाही. शस्त्रक्रियेनंतरही त्यांनी खरेच वेदनाशामक गोळी मागवली नाही तेव्हा मात्र डॉक्टर चक्रावले आणि त्यांनी त्यांची तपासणी करायची ठरवली. त्यावेळी जो कॅमेरॉनने सांगितले की तोपर्यंत त्यांनी कधीही वेदनाशामक औषधे घेतलेली नाहीत. डॉक्टरांनी जेव्हा त्यांची पुढील तपासणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले, कॅमेरॉन यांच्या जनुकांमध्ये थोडी ‘गडबड’ झालेली आहे. त्यामुळेच जो यांना वेदनेची जाणीवच होत नाही. जेव्हा डॉक्टरांनी त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटनांचा उलगडा झाला. लहानपणी त्यांचा हात मोडला होता आणि ते त्यांना कळलेदेखील नव्हते. जेव्हा त्या हाताच्या हालचाली विचित्र पद्धतीने होत असल्याचे त्यांच्या आईच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्यावर उपचार करवले. मुलांच्या जन्माच्या वेळी देखील त्यांना वेदनांची जाणीव झालीच नाही. अनेकदा घरात काम करताना, कापले, भाजले तरीही त्यांना काहीच विशेष वाटत नाही. अनेकदा इस्त्री त्यांच्या हातावरून फिरली आहे, जोपर्यंत त्यांना ते दिसत नाही तोपर्यंत त्यांना त्याची जाणीव देखील होत नाही. या थोडय़ाशा वेगळ्या जनुकाला ‘सुखी जनुके’ किंवा ‘विसराळू जनुके’ म्हणतात.
जो कॅमेरॉन यांच्यावर आता खास संशोधन सुरू झालेले आहे. या जनुकांमुळे वेदना होत नाहीतच शिवाय माणसे जास्त आनंदी राहतात, त्यांना राग येत नाही. या जनुकीय बदलाचे आणखी काय परिणाम संभवतात यावर डॉक्टर आता संशोधन करीत आहेत. हे जनुकीय बदल कृत्रिमपणे घडवून आणता येऊ शकतील का याचाही अभ्यास सुरू झालेला आहे. आपण जरा विसराळू आहोत, गोष्टी नीट करू शकत नाही, असे आयुष्यभर वाटणाऱ्या जो कॅमेरॉन यांच्यासाठी त्यांचे ‘वेगळे’ असणे हा खास सुखद धक्का होता. असे अनुभव असणाऱ्या इतर स्त्री-पुरुषांनी देखील पुढे यावे म्हणजे हा अभ्यास अजून जास्त व्यवस्थित होईल, असे आवाहन त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केले आहे.
वेदनांची जाणीव ही नैसर्गिक गोष्ट आहे असे आपण बोलून जातो, पण जो कॅमेरॉन यांच्यासारखी व्यक्ती या नियमाला अपवाद असतो हे दाखवून तो नियमच जणू सिद्ध करतात. प्रत्येक वेळी आपण निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करतो. निसर्ग आपल्यासमोर असे एखादे नवीन काही आणून ठेवतो तेव्हा अजूनही बरेच काही आपल्याला अज्ञात आहे, याची जाणीव होते. शेवटी अज्ञानाच्या जाणिवेतच तर पुढे जाण्याची, अधिक जाणून घेण्याची आस लपलेली आहे ना!
हुकलेला ‘स्पेस वॉक’
२९ मार्च २०१९ हा दिवस एक ऐतिहासिक दिवस होता होता राहिला. ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा होतो, त्याचेच औचित्य साधून ‘नासा’ने त्यांच्या ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’वर असणाऱ्या चमूतल्या दोन स्त्री अंतराळवीरांना ‘स्पेस वॉक’ला पाठवायचे ठरवले होते. आजवर अनेक स्त्रियांनी ‘स्पेस वॉक’ केला आहे. २००६-२००७ मध्ये सुनिता विल्यम्सने केलेल्या ‘स्पेस वॉक’ची आठवण आजही ताजी आहेच. पण प्रत्येक वेळी ‘स्पेस वॉक’ करताना या स्त्री अंतराळवीरांबरोबर पुरुष सहकारी असतात.
मात्र २०१९ च्या सुरुवातीला ‘नासा’ने प्रयोग म्हणून एकाच वेळी दोन स्त्री अंतराळवीरांना ‘स्पेस वॉक’ला पाठवण्याचे ठरवले. डिसेंबर २०१८ मध्ये अ‍ॅन मॅक्लेनही ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ (आयएसएस) मध्ये गेली आहे, ती अजूनही तिथेच आहे. तिच्यासोबत दोन पुरुष सहकारीदेखील आहेत. मार्च २०१९ मध्ये आणखी तीन जण ‘आयएसएस’मध्ये आले. यामध्ये ख्रिस्तिनाकोच ही स्त्री अंतराळवीरसुद्धा आहे. एकाच वेळी दोन स्त्रिया ‘आयएसएस’ मध्ये असल्याचा योग साधून ‘नासा’ने २९ मार्चच्या ‘स्पेस वॉक’ला या दोघींना पाठवण्याचे ठरवले होते. ‘आयएसएस’मध्ये एका वेळी जास्त लोक राहात नसल्यामुळे ‘स्पेस वॉक’साठी लागणारे सूट देखील मर्यादित होते. मीडियम, लार्ज आणि एक्स्ट्रा लार्ज याचे प्रत्येकी २ जोड होते. पण त्यातला एकच मध्यम आकाराचा टोरसो ‘स्पेस वॉक’ करण्यासाठी उपयुक्त आहे. अ‍ॅन मॅक्लेन हिने मोठय़ा आकाराचा तर ख्रिस्तिनाकोच हिने मध्यम आकाराचा सूट घालून २९ मार्चचा ‘स्पेस वॉक’ करण्याचे ठरवले होते. २२ मार्चला अ‍ॅन मॅक्लेन निक हेग बरोबर ‘स्पेस वॉक’ला गेली होती. तेव्हा तिने मध्यम आकाराचा सूट घालून हा वॉक केला तेव्हाच तिच्या लक्षात आले, मोठय़ापेक्षा आपल्याला मध्यम आकाराचा सूट  बरोबर बसणार आहेत. मोठे घातले तर मध्ये फट राहू शकत होती. म्हणजेच ही मोहीम असुरक्षित ठरू शकत होती. त्यामुळेच अ‍ॅन मॅक्लेनची निवड रद्द करत तिच्याजागी निक हेगलाच परत २९ मार्चच्या ‘स्पेस वॉक’ला पाठवण्याचे ठरवले गेले. २९ मार्चला ख्रिस्तिनाकोच हिने तिच्या आयुष्यातला पहिला ‘स्पेस वॉक’ केला. ही तिच्यासाठी नक्कीच खास गोष्ट होती. फक्त केवळ दोन स्त्रियांनी एकत्र ‘स्पेस वॉक’ करण्याची ख्रिस्तिना आणि अ‍ॅनची संधी हुकली.
ही मोहीम पूर्वनियोजित नव्हती त्यामुळे असे झाले असा ‘नासा’चा खुलासा होता, पण जगभरातून यावर आलेल्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या होत्या. मोहीम घोषित केल्यानंतर त्याचे अनेकांनी स्वागत केले होते, तर ही मोहीम ‘या तांत्रिक’ कारणामुळे रद्द झाल्याने लगेच त्यावर नापसंतीची मोहोर देखील उमटवली होती. काही जणांनी याच्याकडे बघत ‘स्त्रियांनी पुरेशी खरेदी केली नाही तर काय होते’ अशीही
टिप्पणी केली. अनेक समाज माध्यमांवर यासंबंधाने ‘नासाकडे स्त्रियांसाठी पुरेसे स्पेस सूट नाहीत’ म्हणत तिरकस टिप्पणी केल्या गेल्या. काहींनी याची खिल्ली उडवली तर काहींनी ‘सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची असते’ म्हणत ‘नासा’ आणि अ‍ॅनच्या निर्णयाची पाठराखण केली.
पूर्वनियोजित नसल्यामुळे या मोहिमेत असा गोंधळ झाला. पण कदाचित ‘नासा’ त्यांच्या पुढच्या मोहिमेच्या वेळी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवेल. ‘आयएसएस’मध्ये पुरेसे कपडे पाठवले जातील आणि दोन स्त्रिया एकमेकींचे हात धरून अंतराळात चालून इतिहासातले अजून एक मोठ्ठे पाऊल लवकरच टाकतील, हे निश्चित!
‘आबेल’ मिळवणाऱ्या कारेन
गणित हा विषय शाळेतच नाही तर शाळा सोडल्यावरसुद्धा अनेकांच्या मनात धडकी भरवतो. अजूनही कित्येकांच्या स्वप्नातला कर्दनकाळ बिचारा गणित हा विषयच असतो. त्यामुळेच की काय जगभरातल्या शास्त्रज्ञांना पुरस्कार देतानाही सर आल्फ्रेड नोबेल यांनी गणिताला लांबच ठेवले. सगळ्या आकडेमोडीची सुरुवात शून्यापासून झाली, पण त्या शून्याची भल्याभल्यांना जी धास्ती बसलेली आहे त्यामुळे ‘नोबेल’च्या तोडीचा ‘आबेल’ हा गणितातला पुरस्कार ‘नोबेल’ सुरू झाल्यानंतर जवळपास तब्बल शतकभराने सुरू झाला.
‘नोबेल’ पुरस्कार १९०१ मध्ये द्यायला सुरुवात झाली तेव्हाच गणितासाठी हा पुरस्कार नाही हे बघून गणितज्ञासाठी वेगळा पुरस्कार सुरू करण्याचे प्रयत्न नॉर्वे आणि स्वीडनमधल्या काही लोकांनी केले होते. मात्र ते सफल झाले नाहीत, मात्र २००२ मध्ये पुन्हा एकदा असे प्रयत्न झाले. त्याला नॉर्वे सरकारने सकारात्मक पाठिंबा दिला आणि २००३ पासून नील्स हेन्रिक आबेल्स या नॉर्वेच्या गणितज्ञाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे हे पुरस्कार द्यायला सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच, यंदा हा पुरस्कार एका स्त्रीला मिळालाय. अमेरिकेत ऑस्टिन विद्यापीठात अध्यापन करणाऱ्या कारेन उह््लनबेक (Karen Uhlenbeck ) यांना हा सन्मान यंदा मिळाला आहे. २१ मे रोजी नॉर्वेच्या राजाच्या हस्ते त्यांना हा सन्मान दिला जाईल.
उह््लनबेक या गेली चाळीसहून अधिक वर्षे गणित शिकवत आहेत. प्रिन्स्टन विद्यापीठाच्या त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. त्याचबरोबर ‘इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडव्हान्स स्टडीज’शी देखील त्या संलग्न आहेत. तरुण संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी, नव्या संशोधनाला चालना देण्यासाठी म्हणून ‘पार्क सिटी मॅथेमॅटिक्स इन्स्टिटय़ूट’ सुरूकरण्यात देखील त्यांचा मोलाचा सहभाग होता. १९९३ मध्ये त्यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ‘इन्स्टिटय़ूट्स वुमेन अ‍ॅण्ड मॅथेमॅटिक्स प्रोग्रॅम’ (डब्ल्यूएएम) सुरू केली. उह््लनबेक यांना त्यांच्या भौमितिक विश्लेषण आणि गॉज थेअरीमधील खास योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कारेन यांचे संशोधन हे केवळ गणितातच नव्हे तर भौतिक शास्त्रात देखील उपयुक्त आहे.
संशोधन क्षेत्रासह अनेक नवनवीन क्षेत्रांमध्ये स्त्रिया झपाटय़ाने पुढे जात आहेत. त्यामुळेच गणितासारख्या विषयातदेखील अनेकजणी संशोधन करताना दिसतात. पण तरीही २००३ ला सुरू झालेल्या या पुरस्कारांचे मानकरी होण्यासाठी स्त्री संशोधकाला १६ वर्ष वाट बघावी लागली. पुढच्या स्त्री गणितज्ञाला मिळणाऱ्या आबेल पुरस्कारासाठी आपल्याला जास्त वाट पाहावी लागणार नाही अशी आशा करू या.
लोकसत्ता, चतुरंग, पृथ्वी प्रदक्षिणा
१३ एप्रिल २०१९
(स्रोत इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

पृथ्वी प्रदक्षिणा ७

जानेवारी महिन्यामध्ये आपला शेजारचा देश एका वेगळ्याच कारणाने बातम्यांमध्ये गाजत होता. नेपाळ या हिंदुबहुल राष्ट्रामध्ये आजही अनेक हिंदू प्रथांचे परंपरा-रूढींच्या नावाखाली पालन केले जाते. नेपाळच्या खासकरून पश्चिम भागामध्ये आजही मासिक पाळीच्या चार दिवसांत स्त्रियांना घराबाहेर, गावाबाहेर एका छोटय़ा खोलीत, ज्याला ‘छोपाडी’ म्हणतात, तिथे जाऊन राहावे लागते. काही जणींना गोठय़ात त्यांचे ‘ते चार’ दिवस काढावे लागतात, तर काही जणी त्यांच्या घराच्या खालच्या अंधाऱ्या जागेत चार दिवस राहतात. आपल्याकडेही आदिवासी समाजात आजही ‘कुमराघर’ आहेत, ज्याची माहिती ‘चतुरंग’मध्येच गेल्या वर्षी आपण वाचली. शहरीभागात गेल्या काही वर्षांत हे चित्र बरेच बदललेले दिसत आहे, पण तरी आजही अनेक घरांमध्ये स्त्रियांना त्या चार दिवसांत स्वयंपाकघरात प्रवेश करू दिला जात नाही.  नेपाळमध्ये स्त्रियांनी मासिक धर्माच्या काळात ‘बाहेर बसणे’ ही वर्षांनुवर्षांपासून चालत आलेली घटना आहे. एखादी स्त्री त्या काळात घराबाहेर गेली नाही तर त्या घरावर संकट येते किंवा कुटुंबप्रमुखावर एखादी आपत्ती तरी येते या समजुतीतून अनेक जणी दर महिन्याच्या चार रात्री अंधाऱ्या जागेत, असुरक्षिततेत घालवतात. नेपाळमध्ये डिसेंबर-जानेवारीमध्ये हाडे गोठवणारी थंडी असते. त्यामुळे अशा थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकदा स्त्रिया/ मुली रात्री शेकोटी लावतात. पण त्याच शेकोटीमुळे त्यांचा घात होऊ शकतो. कार्बन मोनॉक्साइडमुळे श्वास कोंडून अनेकींनी जीवदेखील गमावलाय. या ‘छोपाडी’ गावाबाहेर असल्या तर वन्य प्राण्यांची भीतीदेखील असतेच. मागील वर्षी अशीच एक स्त्री सर्पदंशामुळे मेली. त्यानंतर सरकारने या ‘छोपाडी’ प्रथेवर बंदी घातली आणि जो कोणी याचे पालन करणार नाही त्याला दंड आणि कारावासाची शिक्षादेखील ठरवलेली आहे. पण तरीही त्याने फारसा काही फरक पडलेला दिसत नाही. जानेवारीमध्ये अशा दोन, तीन घटना घडल्यामुळे पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांची नजर यावर गेली.
इतर अनेक धर्मामध्येही अशा प्रथा आहेत. त्यातून स्त्रियांवर मासिक पाळीदरम्यान अनेक बंधने लादलेली आहेत. काही धर्मातही त्या चार दिवसांत स्त्रियांना स्पर्श केला जात नाही. त्यांच्याबरोबर जेवणे, बसणे टाळले जाते. अनेक उच्चविभूषित स्त्रिया आजदेखील या प्रथेचे पालन करतात. स्त्रिया या कोणत्याही भागातल्या, धर्माच्या असोत मासिक पाळीसंदर्भातल्या बंधनांना आजही बळी पडत आहेत हे सत्य आहे.
मासिक धर्माच्या काळात चांगले पौष्टिक अन्न, पुरेसा व्यायाम आणि सोबतीची गरज असते त्याच काळात जर ही अशी वेगळी वागणूक मिळाली तर पाळीचा शारीरिकपेक्षा मानसिक त्रासच जास्त होतो. मासिक पाळी हा आपल्याकडे न बोलण्याचा किंवा कुजबुजत्या आवाजातच बोलायचा विषय आहे. त्यामुळे अनेकदा वयात येणाऱ्या मुलींना त्याची नीटशी कल्पनादेखील नसते. स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी कळतात, पण त्या अगदीच बटबटीत, अर्धवट किंवा किळस वाटण्यासारख्या वाटतात. अनेक शाळांमध्ये सहावी ते दहावीच्या फक्त मुलींना बोलावून काहीवेळा या सगळ्याची माहिती दिली जाते, पण यात मुलींनाच असे वेगळे बोलावून सांगितल्यामुळे ती मुलांसाठी थट्टेची तर मुलींसाठी शरमेची बाब होऊन जाते. या सगळ्याचा अनुभव असल्यामुळेच अदिती गुप्ताने २०१४ मध्ये मुलींना मासिक पाळीची योग्य प्रकारे माहिती देण्यासाठी ‘मेनस्ट्रॉपिडीया’ ही कॉमिक पुस्तके(कांची सीरिज) काढली. ती आणि तिचा पती तुहिन पॉल यांनी आजवर दहा भारतीय भाषांसह नेपाळी, स्पॅनिश, बल्गेरियन आणि  रशियन भाषेतदेखील हे कॉमिक काढले आहेत. अतिशय साध्या सोप्या भाषेत मासिक पाळी, त्याचे परिणाम, शरीराची मूलभूत स्वच्छता, त्या काळात घ्यायची काळजी या सगळ्यांबद्दल सांगितले आहे. ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातदेखील ही पुस्तके अनेकींच्या मनातल्या शंका, भीती दूर करत आहेत.
वेंधळेपणा ऊर्फ ट्रेण्ड?
माणसाच्या चुका, गफलती, विसराळूपणा यातून काही फॅशन्स वा ट्रेण्डस् सुरू होत असतील यावर विश्वास नसेल तर मेरी यांचे उदाहरण पाहायला हवे. मेरी गे स्केंलोन या अमेरिकेतल्या नवनिर्वाचित सदस्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या असल्यामुळे एकदम जोशात आहेत. सध्याच्या जमान्यात तुम्ही काम किती केलंय याबरोबरच ते किती दाखवलंय हेसुद्धा महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळे ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्ड्इन अशा सगळ्या ठिकाणी सतत काहीतरी टाकत राहावे लागते. अशाच एका बैठकीसंदर्भातला फोटो ट्विटरवर टाकला. आणि सोबत लिहिले, ‘लोकं मला कायम ‘डीसी’मध्ये काम कसे असते याबद्दल विचारत असतात. आत्ता दुपारचे चार वाजून गेलेत आणि अचानक माझ्या लक्षात आले, सकाळपासून मी दोन पायात वेगवेगळे शूज घालून फिरत आहे.’ झालं, या त्यांच्या ट्वीटवर प्रतिसाद म्हणून मग अनेकींनी स्वत:चे अनुभव ‘शेअर’ केले. मेरी स्केंलोन यांच्याकडून कामाच्या दबावामुळे नकळत असे झाले खरे, पण अनेक ठिकाणी हा देखील ट्रेण्ड ठरला आहे.
निकोल किडमन, नाओमी हॅरीस यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींनी दोन पायांत वेगवेगळे शूज घालून हा ट्रेण्ड कायम ठेवला होता. याचबरोबर दोन्ही कानांत वेगवेगळे कानातले घालायची फॅशनसुद्धा आहेच. पूर्वी असे काहीतरी करणे हे गबाळेपणाचे, अव्यवस्थितपणाचे लक्षण समजले जायचे. आता त्यालाच ‘नवी फॅशन’ म्हणले जाते. मेरी स्केंलोनसारख्या अनेक जणी आपल्यातदेखील असतातच ज्या ऑफिसला जाताना दोन्ही पायांत वेगवेगळ्या चपला, नाहीतर घरातल्याच चपला घालून गेलेल्या असतात. कधी क्वचित कोणीतरी उलटी सलवार घालून गेलेलं असतं. अशा वेळी आपणच आपल्यावर हसलो आणि त्याची थट्टा केली तर बाकीचे कोणी हसल्याचे काही वाटत नाही. उलट ‘आपण किती कार्यमग्न असतो, म्हणून या अशा छोटय़ा-छोटय़ा गोष्टी घडतात’ असे म्हणायचे आणि हा धांदरटपणा ‘नवीन ट्रेण्ड आहे’ म्हणत आपणच सेट करायचा.
आहे मनोहर तरीही..
जगात असा एक देश आहे, जिथे ३७ टक्के स्त्रिया नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आघाडी सांभाळत आहेत. याच देशामध्ये ४० टक्के ‘चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स’ (सीईओ) स्त्रिया आहेत, तर ३४ टक्के ‘चीफ फायनान्शिअल ऑफिसर्स’(सीएफओ) स्त्रिया आहेत. या देशामध्ये स्त्रियांच्या उच्चशिक्षणाचे प्रमाण हे पुरुषांच्या उच्चशिक्षणापेक्षा जास्त आहे. अर्थातच हा देश युरोपमधला असणार किंवा अमेरिका असणार असा अनेकांचा अंदाज असेल तर तो पूर्ण चुकीचा आहे. हा चक्क एक दक्षिण आशियाई देश आहे. सुंदर रुपेरी वाळूचे किनारे, नितळ पाणी याचबरोबर ‘मसाज पार्लर’साठी प्रसिद्ध असलेला हा देश आहे, थायलंड! थायलंडमध्ये नोकरी-व्यवसायाच्या नाडय़ा स्त्रियांच्या हातीच आहेत असे म्हटले तर चूक ठरणार नाही. इथली कुटुंबव्यवस्था, समाजरचनादेखील स्त्रियांच्या नोकरी, व्यवसाय करण्यासाठी पूरक आहे. पण असे असले तरीही या देशाच्या राजकारणात मात्र स्त्रियांचे अस्तित्व अगदीच नगण्य आहे. राजकीय पक्ष स्त्रियांना त्यांच्या मंचावर आणण्यास उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे २४० जणांच्या संसदेमध्ये अवघ्या १३ स्त्रिया आहेत. जगातल्या सगळ्यात प्रभावी देशात, अमेरिकेतदेखील स्त्री प्रतिनिधींचे प्रमाण जेमेतेम २३ टक्के आहे. आपल्या देशात सध्याच्या संसदेत ६१ स्त्री खासदार आहेत. जे आजवरचे सगळ्यात जास्त प्रमाण आहे.
थायलंडमध्ये पाच वर्षांपूर्वी स्त्री पंतप्रधान होत्या, तिथे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या स्त्रियांनी राजकीय योगदान दिलं आहे. पण स्त्रिया केवळ मोठय़ा पदांवर असून चालत नाही. निर्णयप्रक्रियेमध्येदेखील त्यांना मोठा वाटा मिळायला हवा आणि त्यासाठी कोणत्याही संसदेतील स्त्रियांचे प्रमाण वाढायला हवे. आज या घडीला अनेक देशांच्या पंतप्रधान/ राष्ट्रप्रमुख स्त्रिया आहेत. पण त्याच देशातल्या संसदेत मात्र स्त्रियांचे प्रमाण तेवढे दिसत नाही.
स्त्रिया व्यवसाय चांगला सांभाळू शकतात म्हणून त्यांना व्यवसायात सहज संधी उपलब्ध करून देणाऱ्या थायलंडमध्ये तोच निकष देश सांभाळण्यासाठी लावला जात नाही, हेच वास्तव आहे.
‘मदर्ली संडे’
ब्रिटनमध्ये आणि त्यामुळेच जगामध्येही सध्या चर्चा आहे ती ब्रेग्झिटची. युरोपीन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर निम्मा देश नाखूश असतानाही इतरांसाठी ब्रेक्झीट यशस्वी व्हावे म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे कसून प्रयत्न करत आहेत. लवकरच हा निर्णय घेतला जाईल. पण याच ब्रिटनमध्ये पारंपरिक गोष्टीलाही तितकंच महत्त्व दिलं जातंय.
जेव्हा अमेरिकाधार्जण्यिा सगळ्या देशांमध्ये ‘मदर्स डे’ मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा होत असतो, तेव्हा ब्रिटनमध्ये तो मार्चमध्ये, धार्मिक उपवासांच्या काळात होत असतो. या वर्षी तो ३१ मार्चला साजरा होणार आहे. खरेतर हा ‘मदर्ली संडे’ या विचारातून सुरू झालेला आहे. या दिवशी आईला आणि चर्चमध्येसुद्धा फुले देण्याची प्रथा वर्षांनुवर्षे सुरू आहे. आता या वर्षी या फुलांवर ब्रेक्झीटचे सावट आहे. कारण युरोपातून फुले ब्रिटनमध्ये आयात केली जातात. पण व्यापाराच्या अटी, निर्बंध अजून फारसे स्पष्ट झालेले नसल्यामुळे फुलांचा व्यापार करणारे काळजीत आहेत. असे काहीही असले तरी वर्षांतून एकदा केवळ कौटुंबिक नव्हे तर धार्मिक महत्त्व असलेला हा दिवस लोकं साजरा करणारच. अमेरिकेतला मे  महिन्यात साजरा होणारा (जो आता आपल्याकडे देखील साजरा होतो)
तो मातृ दिवस असो किंवा आपल्याकडे श्रावणात पिठोरी आमावास्येला साजरा होणारा पारंपरिक मातृ दिवस असो, जोपर्यंत एक दिवस तरी आईसाठी म्हणून साजरा होत आहे तोपर्यंत आपल्यातलं शहाणं मूल जिवंत आहे असे म्हणता येईल.
लोकसत्ता, चतुरंग, #पृथ्वीप्रदक्षिणा
३० मार्च २०१९
(स्रोत- इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

पृथ्वी प्रदक्षिणा ६

काही दिवसांतच आपल्याकडे निवडणुकांचे पडघम वाजू लागतील. आत्तापासूनच अनेक संस्थळांनी, वृत्तपत्रांनी, खासदारांच्या पाच वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडायला सुरुवात केलीय. त्यामुळेच अशा एका आगळ्या खासदाराची ही गोष्ट! आपल्या मतदारसंघातल्या मतदात्यांचे ऋण लक्षात ठेवत, स्वतची सिझेरिअन प्रसूती पुढे ढकलून, मतदान करण्यासाठी टय़ुलिप सिद्दीक जेव्हा ब्रिटनच्या संसदेत आल्या तेव्हा साऱ्या जगाचे लक्ष त्यांच्याकडे वळले. ‘लेबर पार्टी’च्या टय़ुलिप या बांगलादेशचे शेख मुजीबुर रेहमान यांची नात आहेत. बांगलादेशाच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांची ही भाची! राजकारण त्यांच्या रक्तातच आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. टय़ुलिप यांच्या मतदारसंघातील लोकांनी ‘ब्रेक्झिट’च्या विरोधात मत दिले होते. त्यांच्या निर्णयाचा सन्मान करण्यासाठी टय़ुलिप यांनीदेखील तीच भूमिका कायम ठेवली. १५ जानेवारीला ब्रिटनच्या संसदेत ‘ब्रेक्झिट’बद्दलचे महत्त्वाचे मतदान होते. तेव्हा ३७ आठवडय़ांच्या गर्भवती टय़ुलिप यांना त्यांच्या पक्षाचे एक मत वाया जाऊ नये म्हणून व्हीलचेअरवर यावे लागले होते. ब्रिटनमध्ये नुकतीच प्रसूती झालेल्या किंवा आजारपणामुळे येऊ न शकणाऱ्या खासदारांसाठी जोडीची पद्धत आहे. म्हणजे असा वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम नसणारा खासदार आणि दुसऱ्या पक्षातला खासदार जोडी ठरवतात आणि दोघेही मतदान करत नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूंचे एक मत कमी होते. पण या प्रकारात जर दुसऱ्या पक्षाचा खासदार उलटला तर आपल्याच पक्षाचे एक मत वाया जाईल आणि प्रतिस्पध्र्याना एक मत मिळेल म्हणून टय़ुलिप यांनी हा पर्याय नाकारला. त्यांनी स्वतची प्रसूती दोन दिवस पुढे ढकलली. केवळ कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचेच फळ  म्हणून ब्रिटनच्या संसदेने वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम नसणाऱ्या खासदारांना एक वर्षांसाठी ‘प्रॉक्सी मतदान’ ही सवलत द्यायचे ठरवले. एक वर्षांनंतर या निर्णयाचा फेरविचार केला जाईल. तिथेही सत्ताधारी पक्षाने टय़ुलिप यांचा हा निर्णय त्यांच्यावर लादला होता, किंवा प्रसिद्धीसाठी घेतला होता, असे आरोप केले. पण अशा कोणत्याही आरोपांना उत्तर देण्यापेक्षा टय़ुलिप यांनी त्यांच्या चिमुकल्याच्या साथीने लगेच कामाला सुरुवातदेखील केली. यूएनमध्ये आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला स्तनपान करणाऱ्या न्यूझीलंडच्या जसिंदा आर्दन, मूत्रिपडबदलाची शस्त्रक्रिया झाल्यावर हॉस्पिटलमधूनच कामाला सुरुवात करणाऱ्या सुषमा स्वराज, आणि मतदानासाठी प्रसूती पुढे ढकलणाऱ्या टय़ुलिप सिद्दीक यांच्यासारख्या व्यावसायिक बांधिलकी मानणाऱ्या स्त्रिया हे सिद्ध करतात की, स्त्री एकाच वेळी अनेक आघाडय़ा समर्थपणे सांभाळू शकते.
‘मेकअप’शिवायचे सौंदर्य
‘फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन’ असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही काम कसे करता यापेक्षा तुम्ही कसे दिसता, वावरता याला काही कार्यालयांमध्ये जास्त महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळेच रिसेप्शन डेस्कवर असणारे, हॉटेलमध्ये काम करणारे, हवाईसुंदरी यांना कामाच्या ठिकाणी काही गोष्टींचे बंधन असते. निव्वळ चांगले दिसण्यापेक्षा आकर्षक दिसण्यावर जास्त भर दिला जातो. साहजिकच अशा ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी मेकअप करणे अनिवार्य असते. या सगळ्याबरोबरच चेहऱ्यावरचे हास्य ‘२४ ७ ७’ टिकवावेच  लागते.  विमान रात्री १२ वाजताचे असो, वा पहाटे ४ वाजताचे, विमानातल्या ‘हवाईसुंदरी’ कायमच नुकत्याच पार्लरमध्ये जाऊन आल्यासारख्या दिसतात. मेकअप ही त्यांच्यासाठी एक अनिवार्य बाब समजली जाते. ‘व्हर्जनि अटलांटिक’ या जगातल्या अग्रगण्य विमान कंपनीने नुकतीच त्यांच्या स्त्री कर्मचाऱ्यांसाठी खास घोषणा केलीय. या कंपनीच्या हवाईसुंदरींना यापुढे मेकअप करण्याची सक्ती असणार नाही. जर त्यांची इच्छा असेल तर त्या मेकअप करू शकतात, पण कंपनीकडून त्यांना तसे कोणतेही बंधन आता नसेल. कोणत्याही गोष्टीचे जेव्हा बंधन होते तेव्हा तिचा जाच वाटायला लागतो. ही गोष्ट उमजूनच बहुधा कंपनीने हा निर्णय घेतला असावा. याबरोबरच त्यांनी आणखीही एक महत्त्वाचा निर्णय घेतला. हवाईसुंदरींना पोशाखातदेखील स्कर्ट किंवा ट्राउजर असा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. सुटसुटीत कपडय़ात हालचाली जास्त सहज करता येतात, त्यामुळे अर्थात त्याचा कामावर सकारात्मक परिणाम नक्कीच होणार.
आपल्या सगळ्यांनाच प्रत्येक वेळी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे असते, त्यामुळेच ‘व्हर्जनि अटलांटिक’मधल्या कर्मचारी त्यांना नव्याने मिळालेल्या या स्वातंत्र्यावर नक्कीच खूश असणार. स्वतच्या इच्छेने सौंदर्यप्रसाधने वापरणे वेगळे आणि कोणीतरी सक्ती करतो म्हणून वापरणे वेगळे. त्यामुळे जरी सक्ती नसली तरीही ‘व्हर्जनि’मधल्या अनेक स्त्री कर्मचारी सौंदर्यप्रसाधने वापरतीलही, पण तो त्यांचा निर्णय असेल. आपण कसे दिसावे, काय घालावे हा निर्णय आपण घ्यायचाय, याचा आनंदच काही वेगळा असतो. सुंदर दिसायची आस सगळ्यांनाच असते. त्यामुळे मेकअप
करू नका सांगितल्यावर आपल्या स्त्री कर्मचारी अगदीच बेंगरूळ वेशात येणार नाहीत ही खात्री असल्यानेच कंपनीने हा निर्णय घेतला असेल. ‘तुमच्या आतलं खरं सौंदर्य बाहेर येऊ दे’ म्हणणाऱ्या ‘व्हर्जनि अटलांटिक’चे अनुकरण इतर एअरलाइन्स कंपन्या कधी करतात हे आता बघितले पाहिजे.
‘विने’श
‘वेगवेगळे क्रीडाप्रकार जगातल्या लोकांना एकत्र आणू शकतात आणि लोकांचा एकमेकांकडे बघायचा दृष्टिकोन बदलवू शकतात,’ हे जॉन रुपर्ट यांचे मत सर्वश्रुत आहे. दक्षिण आफ्रिकेतले मोठे व्यावसायिक जॉन फक्त बोलून थांबले नाहीत तर त्यांनी एक संस्था स्थापन केली आणि जगभरातल्या वेगवेगळ्या खेळाडूंना, संघांना ‘लॉरेसवर्ल्ड  स्पोर्ट्स अकादमी’तर्फे बक्षीस द्यायला सुरुवात केली. ही संस्था २००० पासून जगभरातल्या खेळाडूंचा, संघांचा सन्मान करते आहे. गेल्या १९ वर्षांमध्ये न घडलेली घटना या वर्षी घडली. पहिल्यांदा एखाद्या भारतीय खेळाडूला इथे नामांकन मिळाले. ‘दंगल’ या चित्रपटामुळे गीता आणि बबिता फोगट घरोघरी पोहोचल्या. त्यांच्याच चुलत बहिणीला विनेशला या वर्षीच्या ‘लॉरेसवर्ल्ड  स्पोर्ट्स कमबॅक ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. या श्रेणीत तिच्याबरोबरच नामांकन मिळवणारे बाकीचे खेळाडू पाहिले तर तिच्या या कामगिरीचे महत्त्व लक्षात येईल. गोल्फपटू टायगर वूड्स, स्केटर युझुरू हान्यू, मार्क मॉरीस आइस स्केटबोर्डर, लिंडसेवॉन ही दोन वेळची विश्वविजेती अल्पाईन स्की खेळाडू, आणि बिबिअन मेंटेल स्पी हिने तर ५ मोठय़ा शस्त्रक्रिया, ९ वेगवेगळे कर्करोगविरोधी उपचार घेऊन, पॅराऑलिम्पिकमध्ये तीन वेळा सुवर्णपदक मिळवले आहे. या सगळ्यांना विनेशबरोबर नामांकन मिळाले होते. गोल्फपटू टायगर वूड्स २०१९ चा ‘कमबॅक ऑफ द इयर’ ठरला, पण त्यामुळे इतर खेळाडू कमी नक्कीच ठरत नाहीत!
‘दंगल’ चित्रपटामुळे गीता-बबिता फोगटचा संघर्ष आपल्यापर्यंत पोचला. पण ज्या वेळी गीता-बबिता तयार होत होत्या, तेव्हाच त्यांना बघत विनेशपण तयार होत होती. हरियाणासारख्या राज्यात, जिथे स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण मोठं आहे, तिथे एकाच परिवारातल्या चार मुली, (रितू, गीता, बबिता आणि विनेशची अजून एक बहीण) कुस्ती खेळत देशाला पदकं  मिळवून देतात ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. विनेश ही कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धामध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय स्त्री आहे. आजवर तिने ग्लासगो, गोल्डकोस्ट (ऑस्ट्रेलिया), जकार्ता इथं सुवर्णपदकं मिळवलीत. याखेरीज इतरही अनेक ठिकाणी पदकांची कमाई केलेली आहेच.
ज्या समाजात मुलींचा जन्म दुखाची गोष्ट समजली जात होती अशा समाजात मुळात मुलांचा समजला जाणारा खेळ खेळणे नक्कीच सोपे नव्हते. अशा सामाजिक पार्श्वभूमीतून आल्यामुळे जर आपण काही करून दाखवले तर नंतर येणाऱ्या मुलींसाठी वाट थोडी तरी सुकर असेल या जाणिवेतूनच फोगट भगिनी भारताबाहेरसुद्धा स्वतची वेगळी ओळख तयार करत आहेत.  ‘खेळ म्हणजे फक्त मुलांचे/ पुरुषांचे’ या मानसिकतेतून आपला समाज बाहेर पडत आहे. आणि सरकारी-बिगरसरकारी संस्थादेखील क्रिकेट सोडून इतर क्रीडाप्रकारांकडे लक्ष देत आहेत. शालेय वयातच गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांच्यावर काम होत आहे, हे नक्कीच सुखावह चित्र आहे.
विनेशला हा पुरस्कार यंदा मिळाला नाही, पण ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मानित असलेली विनेश यापुढेही दर्जा राखून खेळत राहील. पुढं काय सांगावं कदाचित २०२० मध्ये ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंक त कॉमनवेल्थ, आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटूसुद्धा ठरेल. नावातच ‘विन’असणाऱ्या विनेशला अजून अनेक सामने जिंकण्यासाठी शुभेच्छा!
लोकसत्ता, चतुरंग १६ मार्च २०१९ 
#पृथ्वीप्रदक्षिणा