Monday, January 28, 2019

मिशन बाबा बेबीसिटींग


‘सम्या दोन दिवस सुट्टी टाकतो आहेस, जातो आहेस कुठे गोवा की पॉन्डी?’
‘छे मी मस्त घरात बसून मिकी माउस क्लब हाउस बघणार आहे, कांचन जाणार आहे ट्रीप ला?’
‘कांचन जाणार आणि तू नाही जाणार म्हणजे काय?’
‘कांचन जाणार , मी नाही जाणार म्हणजे मी कांचन एकटी जाणार मी आणि स्पृहा घरीच थांबणार, गरज भासली तर कांचनचे आई बाबा येतील, पण बहुतेक आम्ही दोघेच असू घरी.’
‘मला काही समजत नाही तू काय म्हणतो आहेस ते? ईयरएंड आहे, तो पण सोमवारी, मस्त एक दिवसाची सुट्टी काढली तर चार दिवस सुट्ट्या मिळताहेत, फ्रायडे ऑफ घेतला तर पाच दिवस आणि तू म्हणतोयेस मी घरीच थांबणार आहे, कांचन फिरायला जाणार आहे. बरं मग ३१चि पार्टी तुझ्या घरी करूया मग?’
‘निख्या बायको नाही म्हणजे पार्टी पण नाही, मी बेबीसिटींग करणार आहे, चार दिवस आणि, कांचन इंदोर, मांडू फिरायला चालली आहे.’
‘समीर दादा मला काहीच समजत नाही आहे, मला हे सगळे समजावून सांगाल का?’
निखील भंजाळला, चिडला की हमखास समीरला समीर दादा म्हणून हाक मारायचा. दोघे एकाच गावातले एकाच वयाचे नाही, पण इंजिनीअरींग करताना निखील समीर च्या बॅचला आला होता. त्यानंतर दोघे वेगळ्या कंपनीत होते. पण या कंपनीतून त्या कंपनीत उड्या मारता मारता गेल्या दोन वर्षांपासून दोघे एकाच गावात, एकाच कंपनीत आले होते.
‘अरे सोपे आहे रे सगळे, चल कॉफी पिता पिता समजावतो तुला.’
‘देवा जशी तुमची आज्ञा.’
‘निखील अरे खरे तर ही काही अवघड गहन गोष्ट नाही. कांचन लवकरच कामाला परत सुरुवात करणार आहे. स्पृहा पण आता अडीच वर्षांची झाली आहे. गेली अडीच तीन वर्ष तिचे जग पूर्ण स्पृहामय झाले होते. या तीन वर्षात आम्ही तिघे फिरलो, पण ते बहुतेक वेळा बेंगलोर-पुणे, मुंबई घरगुती, लग्न, कार्यक्रमांसाठीच. नाही म्हणायला एक गोवा, केरळ ची मोठी तरीप बाकी आसपासच्या छोट्या छोट्या ट्रिप्स मारल्या, पण तरीही त्या सगळ्यातही कांचनचे निम्मे लक्ष स्पृहा खात आहे ना, तिचे रुटीन नीट पाळले जात आहे ना यातच होते. तिने त्या सहलींचा आनंद पूर्ण उठवला नाही असे मला वाटले. आपण ऑफिस मध्ये येतो, इथल्या कामाचे प्रेशर आहे, टेन्शन आहे म्हणून मित्रांबरोबर बाहेर जातो, पण बायकोलाही असेच कधीतरी वाटत असू शकेल ना? ती पण पोरगी, घर यात कंटाळून जाता असेलच ना रे. त्यातही नोकरी न करणारी बाई असेल तर झालेच. आपण इतके त्यांना गृहीत धरतो की नंतर नंतर त्या स्वतः सुद्धा विसरतात की त्यांना काही वेगळे हवे आहे. ‘
‘सम्या, हे खरेच भारी आहे रे. मी कधीच असा विचार केला नव्हता. तू म्हणतोस तशीच सिच्युएशन माझ्या पण घरी आहे की रे. म्हणजे अनघा तर नोकरी सांभाळून सोहमकडे पण बघते. मला मुळातच फिरायला आवडत नाही त्यामुळे मी फक्त माझा विचार करून घरात थांबतो. पण मी तिला कधी विचारलेच नाही तिला कुठे जायचे आहे का? तरी बरे, तू आम्हाला जबरदस्ती घराबाहेर काढतोस म्हणून आम्ही जरा तरी इथल्या इथे फिरलो आहोत. ‘
‘तर त्यामुळे मी कांचन साठी सोलो ट्रीप प्लॅनकरून दिली आहे चार दिवसांची. शुक्रवारी जाऊन सोमवारी रात्री ती येईल मग ३१ला आम्ही मस्त घरातच झोपून ईयरएंड सेलीब्रेट करू. चार दिवस स्पृहाची पूर्ण जबाबदारी मी घेणार आहे. बॅंकअप प्लॅन म्हणून कांचनचे आई बाबा आहेतच, तसेही ते तिच्या भावाकडे इथे आलेच आहेत. ‘
‘उगाच नाही कांचन तुझ्या मागे लागली होती.’
‘बाबा रे हे तिच्या समोर बोलू नकोस, तिच्या मते मीच तिच्यामागे लागलो होतो, माझ्यात विचारायची हिम्मत नव्हती म्हणून फक्त तिने विचारले होते.’
‘सम्या पण मानले पाहिजे यार तुला, हे सगळे तुला सुचले, आणि तू ते केलेस.’
‘तू मला किती वर्षांपासून ओळखतोस निखील?’
‘झाली असतील १२, १५ वर्ष.’
‘तरीही तुला वाटते हे मला सुचले असेल?’
‘म्हणजे?’
‘अरे हे सगळे ज्ञान मला अर्थात आमच्या बहिणाबाईंकडून आम्हाला मिळाले. ती मागच्या महिन्यात अशीच चार महिन्याच्या लेकीला आईकडे सोडून मस्त दोन दिवस फिरून आली. आमच्या मातोश्रींनी सुरुवातीला थोडी कटकट केली, पण सुखदाने स्पष्ट सांगितले, आई तू अजून चार आठवडे आहेस, त्यानंतर आम्ही तिघेच आहोत, मला थोडा माझा वेळ मिळू देत. इथे जन्मलेल्या मुलांना अशीच स्वतंत्र रहायची सवय असतेच. मूल हे फक्त आईची जबाबदारी असते का? ती तेवढीच वडिलांची पण जबाबदारी असते ना. आमचे गिरीश राव बिचारे हो ला हो करत मुंडी हलवत होते. आता जावईसुद्धा काही म्हणत नाही म्हणाल्यावर आईने ताणले नाही. आणि मग आमची सखु दोन दिवस एकटीच फिरून फ्रेश होऊन आली. आई सांगत होती, डिलेव्हरी झाल्याच्या ३ ऱ्या दिवसापासूनच ही उभी राहिली, पिल्लू ८ आठवड्याचे झाल्यावर जॉबला पण गेली. घरातले तर करतेच, पण तिच्या दोन मैत्रिणींची डोहाळेजेवण पण केली तिने तिचे पिल्लू सांभाळून. त्यामुळे जर तिलाही थोडा तिचा वेळ हवा असे वाटले तर काय चूक आहे. तर तेव्हा फोनवर तिनेच मला सांगितले कांचनला पण विचार तिला असे कुठे जायचे असेल तर तू स्पृहाची काळजी घेतलीच पाहिजे. आमच्या सखुचे हे एक बरे असते, ती तिची मते दुसऱ्यावर लादत नाही, म्हणजे मी केले म्हणून सगळ्यांची केलेच पाहिजे असा तिचा हट्ट नसतो. म्हणून मी कांचनला सरळ विचारले, तुला जायचे आहे का सोलो ट्रीपला. तिने पण दोन चार दिवस विचार केला आणि मग  स्वतःच सगळे ठरवून मला थेट बुकिंग दाखवले.’
‘तुम्ही सगळेच ग्रेट आहात, इस बात पार आजची कॉफी माझ्याकडून. मी देतो पैसे.’
‘निखील काही म्हण, पण कांचन हे सगळे ठरवल्यानंतर एकदम वेगळीच वाटायला लागली आहे रे. म्हणजे पूर्वीची कॉलेज मधली कांचन झाली आहे. स्पृहाला तिने स्पष्ट खरे खरे सांगितले आहे, त्यामुळे स्पृहाच्या पण मनाची तयारी झाली आहे. आम्ही इथे काय करायचे हे पण तिने ठरवलंय, आम्ही एक दिवस कब्बन पार्कला जाणार, एक दिवस मॉलला जाणार, एक दिवस क्रंची मसाला डोसा खायला जाणार, लिस्ट खूप मोठी आहे. ‘
‘सम्या आता घरी जाऊन मी पण अनघाला विचारणार आहे तिला असे कुठे जायचे आहे का, ती जर हो म्हणाली तर बेबी सिटींग करायला मला मदत करशील ना?’
‘अरे मग तेव्हा आपण बाबा आणि पोरं मिळून मस्त फिरायला जाऊया. आयांना काय करायचे ते करू देत.’
‘बरं तुझ्या मिशन बाबा बेबीसिटींग साठी काही मदत लागली तर नक्की सांग, मी आणि अनघा नक्की धावत येऊ.’
‘चल आता काम संपवतो, म्हणजे कांचन नसताना मला घरत laptop उघडावा लागणार नाही. तसेही कांचनला जसा तिचा वेळ मिळणार आहे तसाच मला पण माझा वेळ मिळणारच आहे ना, घरी सारखे फोन न करता ट्रीप ती एन्जॉय करते की स्पृहाचे हे सापडत नाही, आता काय करायचे हे विचारायला मी फोन करतो यावर आमची पैज लागली आहे, पैजेचा काय निकाल लागतो ते मी तुला २०१९ मध्ये सांगेनच.’
‘मित्रा बायकोला खुश केलेस, २०१९ तुला नक्कीच चांगले जाणार. बायको खुश तर घर स्वर्ग.’
मानसी होळेहोन्नूर

     


समाधानाई-तृप्ताई


अंजु लक्षात आहे ना यावर्षी गौरी गणपती तुमच्याकडेच बसवायचे आहरेत. सवाष्ण सांगावी लागेल बरं  का गौरी जेवतात त्या दिवशी. तरी बरं  आपल्या गौरी उभ्या नाहीत. '
'हो आई सगळे लक्षात हाये, आता इतकी वर्ष तुम्हाला करताना पहिलेच आहे की मी, या वर्षी करेन सगळे नीट.  तुम्ही पियु ची काळजी घ्या.  नववा लागला ना तिला आता.'
'अग  इकडे या बायका डिलेव्हरीच्या  अगदी आदल्या दिवसापर्यंत जातात जॉबला , आणि त्यानंतर लगेच ३ महिन्यात परत रुजू पण होतात. आता या अरविवारी डोहाळजेवणाचा घाट घातलाय,बघू कसे होईल सगळॆ.'
'आई अहो काही काळजी करू नका, आपल्या घरी नेहेमीच २०, २५ जणांचा  गोतावळा असतोच, त्यात अजून एक ५, १० माणसे वाढवा  तेवढीच लोकं  असतील , आणि नरेन पण असेलच मदतीला. अजून एक सांगू का, तिकडे लोकं  येऊन फक्त जेवून नाही जात सगळे मांडायला, आवरायला देखील मदत करतात. दोन चार जणी तर फोन करून आधीच विचारतील काय मदत करू म्हणून. '
'हो गं  अंजु ते आहेच  म्हणा. बरं ते जाऊ दे आमचा बाळ्या  आणि त्याचा बाळ्या  कसे आहेत? शनिवारी आपण व्हिडीओ कॉल  करूयात, तेव्हा तुला तयारी पण दाखवेन काही राहिले तर सांग . 
'हो चालेल चालेल. तुम्हाला गुड नाईट, मी पण पळते शाळेत.
लेकीच्या बाळंतपणासाठी अंजूच्या सासूबाई अमेरिकेला गेल्या होत्या खऱ्या पण त्यांचे सगळे लक्ष इकडे लागून राहिले होते. कदाचित बाळाच्या आगमनानंतर त्या त्यात गुंतून पडतील आणि इकडच्या गोष्टींचा त्यांना विसर पडेल असे सगळ्यांनाच वाटत होते. त्यांचे दिवसा-रात्री येणारे मेसेजेस, फॉर्वर्डस यामुळे लेकाला सुनेला कळले होते आईला काही तिथे करमत नाहीये. पण अंतर असे होते की सहजासहजी येणे देखील जमणार नव्हते. त्यामुळे त्या एकाच एक गोष्ट दोन दोनदा तीन तीनतीनदा सांगत होत्या, आणि अंजू न चिडता ऐकून घेत होती. शाळेच्या नोकरीमुळे अंजूची पेशन्स लेव्हल खूप वाढली होती. कित्येकवेळा तर त्यांचा लेक त्यांचे ऐकून घ्यायचा नाही पण ती शहाण्या मुलीसारखे सगळे ऐकून घ्यायची. सासऱ्यांना जाऊन पण आता सहा सात वर्ष झाली होती, त्यामुळे कोणाशी बोलायचं हा त्यांना पडलेला एक प्रश्न होता.
अंजूच्या लग्नानंतर वर्षाच्या आत सासरे गेले, पण ते गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी सासूबाईंनी अंजूला सांगीतले होते, ‘ते गेले हा निसर्ग धर्म आहे, त्यांना हृदयविकाराचा त्रास होता, आपण शक्य तेवढी सगळी काळजी घेतली तरीही मृत्यूने त्यांना गाठलेच. यात तुझी काहीच चूक नाही. तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस, आणि पायगुण वगैरे गोष्टींचा विचार देखील करू नकोस, लोक काय म्हणतात याच्याशी मला देणे घेणे नाही.’ त्या दिवसानंतर अंजूला एकदम मोकळे वाटले होते, सासर माहेर मधले अंतरच जणू संपून गेले होते. ती तिच्या सासूची दुसरी मुलगी झाली होती. त्यामुळेच नणंदेच्या लग्नात अंजू आणि अनिरुद्धने नरेनच्या घरच्यांना आधीच सांगितले होते, की काहीही झाले तरी सगळे विधी आईच करणार, आणि जर ते पटत नसेल तर सरळ रजिस्टर लग्न करूया. नरेनच्या लोकांनी अगदी हसत हसत याला परवानगी दिली होती.
असे काळाशी सुसंगत विचार करणारे लोक आपल्या अवतीभोवती आहेत म्हणून अंजूला नेहेमी अभिमान वाटायचा.अगदी कर्मठ घरात देव देव करणाऱ्या घरापेक्षा माणसात देव पाहणाऱ्या या लोकांचे तिला अभिमान होता. लग्न झाल्यापासून त्यांनी बेंगलोरलाच आपलेसे म्हणाले होते, इथे एक नवीन जग वसवत होते. इथली भाषा, इथली संस्कृती यांना समजून घेत होते. गणपती दिवाळीला पाच दिवस तरी काढून ते घरी नक्कीच जात होते. अजून अर्णव लहान होता त्यामुळे शाळा बुडायचा फारसा प्रश्न आला नव्हता पण हा पुढचा प्रश्न पियूच्या बाळानेच सोडवला. आईला तिकडे जावे लागणार होतेच म्हणून तिने अनिरुद्ध आणि अंजूला विचारण्या’पेक्षा सांगितले, की आता देव तुमच्याकडेच ठेवा. कधी न कधी तरी तुम्हाला ही जबाबदारी घ्यायचीच होती, मग आता घ्याच.
आता गणपती आपल्याकडेच बसणार म्हणून अर्णव खुश होता. सवाष्ण कोणाला बोलवावं हा एक मोठ्ठा प्रश्न तिच्यासमोर होता. तशा मैत्रिणी बऱ्याच होत्या, पण बहुतेक नोकरी करणाऱ्या नाहीतर लांब राहणाऱ्या. एका जेवणासाठी कोणाला एवढ्या लामाब बोलावणं तसं तिला जीवावरच आले होते. सकाळी सासूबाईंच्या फोन च्या नंतर ती त्याच विचारात होती, तेव्हाच रत्नम्मा त्यांच्या घरी कामाला येत होती. गेली सहा सात वर्ष रत्नमाच्या मदतीनेच ते घर चालवत होते. पहिले अर्णवला सांभाळायला म्हणून यायची आणि उरलेल्या वेळेत घर काम पण करायची, आता फक्त घरकाम म्हणजे भांडी, फरशीचे काम आहे, पण ही तिचे घर असल्यासारखे मधूनच फर्निचर पुसून ठेवते, खिडक्यांच्या काचा पुसते. कित्येकवेळा स्वतः बघूनच कामं ठरवते आणि काम करून मोकळी होते. त्यामुळे ती कधीही बाहेरची वाटलीच नाही. घरातलीच एक सदस्य वाटायची.

तसे गणपतीला अजून एक आठवडा होता, पण आतापासून हळूहळू एकेक तयारी केले तर शेवटची धावपळ टाळता येईल, आता आज रात्री शांत बसून आपण यादी करूया असे ठरवून ती शाळेसाठी पळाली पण. तसे अनिरुद्ध आणि अर्णव पण मदतीला असणार होतेच पण तरीही आपल्या पद्धतीने सण साजरा करायचा म्हणजे थोडं व्यवस्थित नियोजन करूनच करावे लागणार. पहिलेच वर्ष आहे, पुढच्या वर्षी जरा अंदाज येईल पण यावर्षी मात्र नियोजन अगदी पक्के पाहिजे. सासूबाईंनी सुध्दा शाबासकीची थाप दिली पाहिजे असे ती स्वतःलाच बजावत होती.

एक दोन जणींना तिने विचारून पाहिले सवाष्ण म्हणून याल का? पण प्रत्येकीची काहीतरी कारणे होती. इथल्या लोकल मैत्रिणींना बोलवावे तर त्यांना आपले जेवण आवडेल की नाही इथपासून शंका. शेवटी मनाचा हिय्या करून तिने सासू बाईंशी बोलायचे ठरवले. ती त्यांना फोन लावणार तेवढ्यात त्यांचाच फोन आला. घरात लक्ष्मी आल्याचा आनंद त्यांच्या आवाजातून अंजुपर्यंत पोहोचत होता. आता त्यांना काही विचारणे योग्य वाटणार नाही म्हणत तिने मनातला विचार मनातच ठेवला. मामी झाल्याचा आनंद आता ती पण अनुभवत होती.

गणपती बसले, त्यादिवशी व्हिडीओ कॉल वरून सासूबाईंनी सारी व्यवस्था पाहिली. लेकाला सुनेला शाबासकी पण दिली. मग गौरीची पूजा त्यांना कसे आणायचे हे सगळे सविस्तर सांगितले, आणि सवाष्ण म्हणून कोणाला बोलावले विचारले, ती काही बोलणार तेवढ्यात छोटीचा रडायचा आवाज आला, आणि आणि आपण नंतर बोलू म्हणत फोन संपला पण.

गौरी बसतात त्या दिवशी शनिवारच होता त्यामुळे सुट्टी घ्यायचा काही प्रश्नच आला नाही. पण त्या दिवशी तिने रत्नम्माला जरा वेळ थांबवून घेतले. तिच्याच मदतीने गौरींना घरी घेतले, आणि सजवले. इकडे मुबलक असणाऱ्या फुलांनी सजवून जणू गौराईना त्यांनी फुलराणीच करून टाकले होते. रत्नम्माचा देखील पाय निघत नव्हता, शेवटी अंधार व्हायला लागल्यावर ती निघते म्हणाली, तेव्हा अंजू म्हणाली रत्नम्मा उद्या भरजरी साडी नेसून ये, आणि जेवण इकडेच करून जायचे आहे. तसे याआधी पण सणावाराला ती रत्नम्मालाच नाही तर तिच्या पोरींना पण जेवण पाठवायची.
‘अंजू उद्या कोणाला बोलावले आहेस जेवायला?’ अनिरुद्धने विचारले.
‘तूच बघ उद्या, तुझ्या चांगल्याच ओळखीची आहे सवाष्ण.’ अंजूने उगाच सस्पेन्स वाढवला.

रत्नम्मा तिच्याच वेळेला आली, तर अंजूने तिला बाहेरच बसवले, आत कामाला जाउच दिले नाही. आणि सांगीतले बाई आज तू माझी लक्ष्मी आहेस. माझे घर आवरतेस, स्वच्छ ठेवतेस माझ्या लेकरावर स्वतःच्या लेकारासारखी माया करतेस, देव काय याहून वेगळा असतो.  अनिरुद्ध गोंधळात पडला होता, पण तरीही बायकोच्या या विचारांचा त्याला आनंदही वाटला आणि भीतीही वाटली आई काय म्हणेल याची. त्याने अंजूला आतल्या खोलीत बोलावून त्याची शंका विचारली.
‘अनि मला आईंना विचारायचे होते पण चान्सच मिळाला नाही, इरा २ आठवडे आधीच आली, आणि आई एकदम बिझी होऊन गेल्या. हे बघ त्या नेहेमीच म्हणतात चांगल्या मनाने केलेली कोणतीही गोष्ट वाईट नसते. भले ती आपल्या समाजाच्या चौकटीत बसत नसेल. तुला आठवतंय अर्णव चे उष्टावण पण आपण रत्नम्माच्याच मांडीवर केले होते, कारण तो तेव्हा तिला अगदी चिटकून असायचा. मला खात्री आहे या वेळी पण त्या काहीच बोलणार नाहीत.’
रत्नम्माला आनंदही होत होता, पण अवघडल्यासारखे पण होत होते, गेल्या ७, ८ वर्षात तिला मराठी बोलता येत नसली तरी कळायची, आणि ती कन्नड मध्ये जे बोलायची ते अंजूला समजायचे. ती डोळ्यातले पाणी पुसत अक्का मला केवढा मोठा मान दिला म्हणत होती, आणि तिच्या हातावर हात ठेवत अंजू सांगत होती, आमचे जेवण गोड मानून जेवून घ्या, तेव्हाच मला समाधान वाटेल.
तिला पाटावर बसवून रांगोळी काढून, जेव्हा केळीच्या पानावर चार कोशिंबिरी, पाच सहा भाज्या, पुरणपोळी, पंचामृत, वरण भात खीर, करंज्या, वाढले तेव्हा रत्नम्मा फक्त अय्यो केवढे काय काय आहे एवढेच म्हणत होती, मनाने अगदी तृप्त झाली होती ती. तसा एक फोटो अंजूने काढला, आणि त्यांच्या फॅमिली ग्रुपवर टाकला, आता जे काय होईल ते नंतर बघुया. जाताना तिने तिची हळद कुंकू लावून ओटी भरली, आणी एका साडीबरोबरच दक्षिणा म्हणून पैसे दिले. जेव्हा ती नमस्कार करायला वाकली तेव्हा तिला पाठीवर अगदी आईच्या हाताची उब जाणवली. हो तर तिच्या आईच्याच वयाची असावी ती, दारुडा नवरा, आणि तीन पोरींचा संसार मात्र अगदी आनंदाने ओढत होती ती. दोन पोरी लग्न होऊन सासरी गेलाय होत्या, धाकटी अजून शिकत होती. आपण आज काहीच कामा न करता फक्त जेवण करून जातोय याचे रत्नम्माला खूप वाईट वाटत होते, पण त्याच वेळी आनंद समाधान देखील वाटत होता.
तो फोटो आईंनी बघितला आहे पण अजून काहीच कशा बोलल्या नाहीत, या भीतीत अंजूला जेवणच गेले नाही, तसेही नातीच्या मुळे त्या रात्री अपरात्री सुध्दा जाग्याच असायच्या. आपण फोन करावा की त्यांच्या फोनची वाट पाहावी. अंजूला काहीच कळत नव्हते, अनिरुद्ध मात्र भरपेट पुरणपोळी ओरपून झोपला होता. शेवटी न राहवून मेसेज करावा आणि आपल्या मनात जे आहे ते सांगावे असा विचार करून अंजूने फोन घेतला तेवढ्यात सासूबाईंचाच फोन आला. ‘अंजली,’ त्या तिचे पूर्ण नाव चिडल्या किंवा खुशीत असल्यावरच घेतात त्यामुळे तिला कधी नव्हे ती त्यांच्याशी बोलायची भीती वाटायला लागली.
‘अंजली, आजवर मला जे जमले नाही ते तू करून दाखवलेस, मला खूप आनंद झाला. ‘
‘आई तुम्ही खरेच बोलातंय ना की माझे मन राखण्यासाठी बोलताय?’
‘अंजू तुला मी माहिती आहे, आवडले नाही तर पहिले सांगते, आवडले तर मात्र सांगायला काचकूच करते. आता निम्म्या झोपेत आहे, उद्या सकाळी उठाल्यावर निवांत बोलते. पण एक नक्की तू माणसात देव पाहायला लागली म्हणजे तुला देव कळला. अशीच खुश, समाधानी विचार करती राहा.’

त्या क्षणी तिने जाऊन त्या गौराईना परत एकदा नमस्कार केला आणि सांगीतले, तुम्ही सोन्याच्या, चांदीच्या, रूपाच्या पावलांपेक्षा समाधानाच्या पावलांनी या, आणि तृप्तीच्या पावलांनी इथेच राहा.

मानसी होळेहोन्नुर

Tuesday, January 8, 2019

भेट माझी माझ्याशी ...

फ्री झालीस की फोन कर.’
जान्हवीने तिच्या BF ला मेसेज केला आणि ती निवांत फोन वर नेटफ्लिक्स बघत बसली.  आज कितीतरी महिन्यानंतर छे वर्षांनंतर ती एवढी निवांत बसली होती, की काही सेकंद या मिळालेल्या मोकळ्या वेळेचं काय करायचं हेच तिला कळेना. नवीन चित्रपट ,शोचा तिचा बॅंकलॉग एवढा जास्त होता, की कुठून सुरु करावं हेच तिला कळत नव्हतं. रिया झाल्या नंतर ते आता ती शाळेत रुळली आहे तोपर्यंत तिला असा तिचा वेळ मिळालाच नव्हता. मूल झाल्यावर त्याला किमान वर्ष तरी द्यायचं हे तिने आणि किरण ने आधीच ठरवलं होतं. त्यामुळे रिया झाल्यावर तिने ब्रेक घेतला, पण एक वर्षानंतरही तिला परत कामावर जावसं वाटलं नाही, त्याच वेळी किरणला एक वर्षासाठी लंडन ला जायची संधी मिळाली, मग काय त्या निमित्ताने तिथे ही राहता येईल म्हणत तिने नोकरीचा विचार लांब सारला. वर्षाचा प्रोजेक्ट दीड वर्षाने संपला , तोवर रिया पण मोठी झाली होती, शाळेत अॅडमिशन पण झाली होती. आता आपलं बूड एका जागी स्थिरावलं आहे तर आपण काही तरी सुरु करू या याची जान्हवीच्या मनाने उचल खाल्ली होती.
वन्स अगेन या चित्रपटाबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि मितालीने, तिच्या BF ने पण त्यावर फेसबुकवर पोस्टले होते त्यामुळे आज हा अर्धा तरी बघूया असे म्हणत तिने सिनेमा बघायला सुरुवात केली आणि तेवढ्यात मितालीचा फोन आला.
मिताली आणि तिची मैत्री हा तिलाच नव्हे सगळ्या जगाला पडणारा प्रश्न होता. जान्हवी म्हणजे आपण बरे आपले काम बरे, सतत आजू बाजुच्यांचा विचार करून वागणारी, हसतानासुद्धा माजून मोपून हसणारी. नोकरीच काय आयुष्यात देखील कोणतेही ध्येय न ठेवणारी, सतत सेकंड सीट घ्यायला तयार असणारी. जो पहिला मुलगा बघितला, आई वडीलांना आवडला आणि ती लग्न करून मोकळी झाली. आयुष्य हे सरळ सोट असते आणि ते तसेच जगायचं असतं, हा तिचा आजवरचा फंडा होता. पण कॉलेज मध्ये हा मिताली नावाचा किडा भेटला, आणि ती बदलली नाही पण तिला असे बंडखोरीचेपण एक जग असते याचाही जाणीव झाली. तिने ते जग लांबून बघितले, ती स्वतःला त्या सारखे करू शकली नाही, पण तरीही मिटली, तिच्या गोष्टी ऐकल्या की तिला एक धीर यायचा. कधी कुठला निर्णय घेताना तिला पुरेशी खात्री नसली, विश्वास नसला तर ती सरळ मितालीशी बोलायची, तिच्याशी बोलता बोलताच आपला प्रश्न सुटतो असे जान्हवीला वाटायचं. आजही जेव्हा तिला मोठा निर्णय घ्यायचा होता तेव्हा तिला मितालीशीच’ बोलायचे होते.
‘मीतू तुझा सल्ला पाहिजे मला.’
‘ते तर मला माहीतच होते, तू काम असल्याशिवाय मला कधी फोन लावतेस का?   
'पण कामाच्या वेळी तरी मला तुझीच आठवण येते ना. मग झालं की. आता भांडायचं आहे की  आधी बोलून घ्यायचं आहे ?'

'बोल बाई बोलआज मी डस्ट बिन  आहे किपोस्टाची पेटी आहे की  कन्फेशन बॉक्स आहे?'
'नाही गाइडिंग स्टार आहे  '
'म्हणजे काय कळले नाही? '

'सोप्पी गोष्ट आहेमी आता काय करू हे तू मला सांगणार आहेसम्हणजे रिया आता शाळेत जायला लागली आहेकिरण लपुढचे दीड  दोन वर्ष तरी बाहेरचकाही चान्स नाहीजर त्याने नोकरी बदलली  तरच काही शक्यता  असू शकतात,बाकी आई बाबा येऊन जाऊन असतात. त्यामुळे मला परत काही तरि सुरु करायची इच्छा आहे,मला आता फक्त हाऊस वाइफ व्हायचं  नाही आहे. '

'वाह माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच लवकर साक्षात्कार झाला की  तुला. '
'आता तू हे असेचबोलत राहणार आहेस की  काही सल्ला पण देणार आहेस?

'माझी फी माहीत आहे नाबघ देऊ शकणार असशील तर मी बोलते नाहीतर राहू देते.'

'गर्ल्स नाईट आउट नाडन  तू म्हणशील तेव्हा आणि म्हणशील तिथे. पण सांग ना मी काय करू?'
'
'गर्ल फ्रेंड मी सांगते पण मला सांग तुला नक्की काय करायचं आहे?'

'बघ तूच तीतुझ्याशी बोलताना मला आरशात स्वतःशी बोलल्या सारखे वाटत. खरं  सांगू मला इंजिनीअर वगैरेंकही व्हायचं नव्हतंमला बेकर  व्हायचं  होतं केक्स,कुकीज करताना मी अगदी स्वतःला सुद्धा विसरून जातंय,पण बाबा म्हणाले चांगले मार्क्स आहेत हो इंजिनीअर मी झाले इंजिनिअर. पण आता असे वाटतंय देवी तेवी दुसरी समाधी मिळतच आहे तर काय हरकत आहे हेअसे काही करायला. परत हे करताना रियाकडे पण दुर्लक्ष होणार नाही,किंवा दुसऱ्या कोणाचेही रुटीन बिघडणार नाही .’
‘अग जानू तू कधीतरी फक्त स्वतःचा विचार करायला शिकणार आहेस का ग? आता पण काहीतरी करायचं आहे तेव्हाही आधी सगळ्यांचा विचार करून मग त्यातून मिळालेल्या वेळेत काहीतरी करणार.’
‘सोड ग ते सगळं मी नाही बदलू शकणार, मी आहे ही अशीच आहे, मला आवडते सगळ्यांना सांभाळून घेऊन त्यांच्या बरोबर राहायला. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींना सुध्दा मग मी तयार असते आणि मला त्यात वाईट नाही वाटत.’
‘कधी तरी मला तुझ्यावर चिडावे की तुझे कौतुक करावे हेच कळत नाही. तू किती सॉर्ट आऊट आहेस, तुझ्या अपेक्षा क्लीअर आहेत, उगाच सगळ्याचा हव्यास धरत तू स्वतःलाच हर्ट नाही करत. मला तुझ्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळते एवढ्या गोष्टीवर आपले अपोझिट पोल अजूनही एकमेकांना धरून आहेत बहुतेक.’
‘काय हे, मी तुला सल्ला विचारायला फोन केला आणि तू मला हे भलतेच काय ऐकवतेस.’
‘बरं हे कौतुक मी आपल्या नाईट आउट साठी राखून ठेवते. कमिंग बॅक टू युअर प्रॉब्लेम. तुलाच दोन्ही माहित आहे. गो अहेड गर्ल, तुला जे मनापासून करावसं वाटते ते कर ग, मला नाही वाटत किरणला हे आवडणार नाही, आणि नाही आवडले तरीही तुला आवडते आहे ना मग तू कर, तुझा आनंद बघून त्यालाही कदाचित ते आवडेल. अग त्याला स्वतंत्र दुसऱ्या शहरात राहणारी जान्हवी तर आवडली होती, तो कशाला नाही म्हणेल. तू काही लगेच दुकान काढणार नाहीस ना, पहिले होम ऑर्डर्स घेशील जम बसवशील आणि नंतर हा व्याप वाढवशील हो ना. मग तो कशाला नाही म्हणेल. इन्व्हेस्टमेंट पण फारशी नसणार आहे. आणि जर तुला पैसे लागणार असेल तर सांग मी देते. तू मस्त बनवतेस यार केक, पहिली ऑर्डर मीच देते हवे तर. ‘
‘याच साठी मला तुझ्याशी बोलायचे होते बघ, पैशाचा काही प्रश्न नाही ग,आणि किरणशी बोलले तर त्याला काय वाटते ते कळेल ना, मी अजून त्याच्याशी बोललेच नाहीये, त्याच्याशी बोलण्या आधी मला माझा आत्मविश्वास वाढवायचा होता, जो मला या फोन मधून मिळणार होता  आणि मिळाला पण. जेव्हा केव्हा सुरु करेन तेव्हा पहिली ऑर्डर तुझीच घेईन बरे का ग ठमे. बाकी कशी आहेस?’
‘मी मजामा गं, आता एक प्रेसेंटेशन आहे, अर्ध्या तासात त्याची तयारी करत आहे.’
‘अग मग माझ्याशी बोलत काय बसलीस, जा काम कर, आणि जेव्हा फ्री होशील तेव्हा फोन कर.’
त्या दोघींनी फोन ठेवला, पण जान्हवीला एक नवा उत्साह या फोन मुळे आला होता. आयुष्यभर जे करायची इच्छा होती, ते करायचे तिने ठरवले होते. बाबांना तिने सांगितलेच नव्हते तिला काय करायचं होते, आता नवऱ्याला सांगून ती तिचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार होती. कोणीतरी तू हे करू शकतेस हे सांगायची गरज होती, आणि तिच्यासाठी हे काम मितालीने केले होते. तिला तिच्याशी भेटवायचे काम याही वेळी मितालीने केले होते. आरसा होऊन स्थिर उभे राहणे म्हणजे पण मैत्रीच असते ना !!!    

मानसी होळेहोन्नूर