Wednesday, April 17, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा ४


जपानमध्ये सध्या ‘मानलेल्या’ बहिणींची संख्या वाढत आहे. आश्चर्य वाटेल ना, पण हे सत्य आहे, मात्र या बहिणी केवळ मानलेल्याच नव्हे, तर भाडे तत्त्वावरच्या असतात. त्या जे काम करतात ते खूपच प्रशंसनीय आहे. बहिणीच्या नात्यानेच ते सोडवणं गरजेचं असल्यामुळे असेल कदाचित त्यांना सिस्टर म्हटलंय. ‘हिकीकोमोरी’ ही सध्या जपानमधली एक मोठी समस्या समजली जात आहे. १८ ते ३५ या वयोगटातले अनेक जण स्वत:ला खोलीत कोंडून घेत आहेत, ते त्यांच्या घरातूनच नव्हे तर त्यांच्या खोलीमधूनदेखील बाहेर पडत नाहीत. काही जण तर वर्षांनुवर्ष घरातून बाहेर पडत नाहीत. एक प्रकारे ते सगळ्यापासून अलिप्त होतात. हा खरे तर मानसिक आजार समजून त्यावर उपचार झाले पाहिजेत, पण घरात हिकीकोमोरी असणे हे कमीपणाचे समजले जात असल्याने ही गोष्ट लपवण्याकडे लोकांचा कल असतो. पण त्यामुळे गोष्टी काही वेळा अगदीच हाताबाहेर जातात. मुळात असे एखादे कारण घडले असते की ज्यामुळे लोक त्यांच्या कोषात जातात, लोकांमध्ये मिसळणे टाळतात. हिकीकोमोरी होणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाणच जास्त असते. हे पुरुष कोणाशीही संवाद साधत नाहीत, आपल्या खोलीत स्वत:भोवती एक अदृश्य भिंत उभी करून त्याच्या आतच राहतात, कोणालाही त्याच्या आत येऊ देत नाहीत. काही वेळा हे हिकीकोमोरी, स्वत:ला इजा करून घेतात किंवा अचानक आक्रमक होऊन घरातल्यांना शारीरिक इजा करतात. या सगळ्या समस्येचे मूळ संवादात असल्यामुळे जपानमध्ये ‘रेंट-अ-सिस्टर’ हे संवादाचे, हिकीकोमोरींवर उपचाराचे नवीन माध्यम शोधून काढले आहे. या मानलेल्या बहिणी मग ही सेवा मागवणाऱ्या लोकांच्या घरी जातात आणि हिकीकोमोरीच्या दाराबाहेरून त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतात. कधी कधी त्यांना दोन तीन भेटींमध्येच खोलीत प्रवेश मिळतो, संवाद सुरू होतो, तर काही वेळेला यासाठी काही महिनेसुद्धा द्यावे लागतात. मग हळूहळू संवाद सुरू झाल्यावर या बहिणी त्यांच्या भावांना परत एकदा माणसाळवतात. प्रत्येक माणूस वेगळा असतो, तसेच त्याचे समाजापासून दूर जाण्याचे कारण वेगळे असते, त्यामुळे प्रत्येकाशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधावा लागतो, त्यासाठी लागणारा वेळ वेगळा असतो. त्यामुळे एकदम अशा लोकांना समाजात मिसळणे, नोकरी, व्यवसाय करणे अवघड जाते, यासाठी म्हणून ‘न्यू स्टार्ट’ या ‘रेंट-अ-सिस्टर’ सुरू करणाऱ्या कंपनीने काही वसतिगृहेसदृश व्यवस्थादेखील सुरू केली आहे. ज्या लोकांना समाजात पूर्णपणे मिसळण्याची खात्री वाटत नसते, असे लोक इथे राहतात. त्या बदल्यात ते काही समाजोपयोगी कामे करतात, त्यातून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा नवा आत्मविश्वास मिळतो. मग ते परत नव्याने त्यांचे आयुष्य सुरू करतात. एखादी बहीण ज्या पद्धतीने शांतपणे ऐकून घेते, गरज पडली तर हात पुढे करून सांभाळून घेते. ही बहिणीच्या नात्यातली भावना जगभर सारखीच असणार. त्यामुळेच जगाकडे पाठ फिरवलेल्यांना परत माणसात आणण्याचे काम करण्यासाठी बहिणीच लागतात आणि त्या घरात नाहीत म्हणून मग अशा भाडेतत्त्वावर मिळवल्या जातात. पूर्वी म्हणायचे कितीही पैसे फेकले तरी नाती बाजारात मिळत नाहीत, आता बदलत्या काळात पैसे देऊन नातीदेखील मिळायला लागली आहेत. काळाचा महिमा तो हाच!
धावपटू माता
सध्या लोकांना पळणे आणि पळवणे खूप आवडायला लागले आहे, कारण शहरोशहरी ३ किमी, ५ किमी, १० किमी पळण्याच्या स्पध्रेचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने अनेक जणांना सोशल मीडियावर त्यांचा हा व्यायाम दाखवता येतो. बरेच जण या छोटय़ा स्पर्धाना सरळ मॅरेथॉन असेच म्हणतात आणि बोलता बोलता ३ कि.मी.ची मॅरेथॉन पळालो असे म्हणतात. मुळात मॅरेथॉन असते ४२.१९५कि.मी. किंवा २५.२२ मलांची, हे अर्थात ऑलिम्पिकसाठी ठरवलेले अंतर आहे. असे अंतर कापण्यासाठी मेहनत, सराव हा लागतोच, त्यामुळे हौस म्हणून छोटी अंतरे पळणारे नेहमीच जास्त असतात. हौशे-नवशे हे फार फार तर अर्ध्या मॅरेथॉनपर्यंत जातात. पण एखादी मॅरेथॉन २६८ मलांची असेल तर त्यामध्ये पळणाऱ्यांना काय म्हटले पाहिजे?
दरवर्षी ग्रेट ब्रिटनमध्ये २६८ मल म्हणजे ४३१.३ किमीची ‘स्पाइन रेस’ होत असते, ही स्पर्धा अनेक दऱ्याखोऱ्यांमधून जात असते. धावपटूंचा खरा कस लावणारी ही स्पर्धा जगातल्या अवघड स्पर्धापैकी एक समजली जाते. वेगवेगळ्या वयोगटातले, देशांमधले स्त्री-पुरुष या स्पर्धेत भाग घेत असतात. या वर्षीची ही स्पर्धा १२ जानेवारीला सुरू झाली आणि एका अनपेक्षित स्पर्धकाने ती जिंकली. जॅस्मिन पॅरिस या ३५ वर्षांच्या स्त्रीने या वर्षी ८३ तास, १२ मिनिटे आणि २३ सेकंद ही वेळ नोंदवून या वेळची स्पर्धा जिंकली. जर दिवसांच्या हिशोबात बोलायचे झाले तर जॅस्मिन सलग ३ दिवस ११ तास पाठीवर मोजके सामान घेऊन पळत होती, चालत होती. पहिल्यांदाच या स्पध्रेत भाग घेऊनसुद्धा तिने पहिल्याच वर्षी ही स्पर्धा जिंकून तर दाखवलीच, पण त्याचबरोबर या स्पर्धेतला स्त्री स्पर्धकांमधल्या सर्वात कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रमदेखील गाजवला. जॅस्मिनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ही स्पर्धा सुरू असतानाच, ती तिच्या मुलीला ब्रेस्ट फीडिंगही करत होती. या पूर्ण स्पर्धेत पळत असताना तिने काही छोटे विश्राम घेतले होते, ते सगळे मिळून अवघे ७ तासाचे होते. त्यामध्येच तिने खाऊन घेतले होते, पॉवर नॅपही घेतली होती आणि तिच्या १४ महिन्यांच्या मुलीसाठी ब्रेस्ट मिल्क पंप करून दिले होते. या स्पर्धेत भाग घ्यायचा असे जेव्हा तिने ठरवले, त्याच्यानंतर या स्पध्रेसाठी तिने खास तयारी करायला सुरुवात केली. तिच्या मार्गदर्शकाने तेव्हा तिला पाठीवर काहीतरी सामान घेऊन पळण्याची सुरुवात केली, तर या बयेने चक्क तिच्या लेकीलाच पाठुंगळी घेतले आणि पळण्याचा, चालण्याचा सराव करायला लागली. या स्पध्रेच्या काही दिवस आधीच तिची लेक आजारी पडली होती, त्यामुळे डॉक्टरांनी तिला अँटिबायोटिक्स दिले होते, म्हणून मग काळजीपोटी, जॅस्मिनने ब्रेस्ट फीडिंग सुरूच ठेवले होते. तिच्या या पळण्याच्या स्पर्धेतही तिने ते सुरूच ठेवले आणि त्याचा कोणताही अडथळा तिला जाणवला नाही. आई झाल्यावर तुम्हाला अनेक गोष्टींच्या मर्यादा येतात. मुलांमुळे काहीच करता येत नाही असे सांगणाऱ्या सगळ्यांना जॅस्मिन पॅरिस, मेरी कोम, सेरेना विल्यम्स यांसारख्या अनेकींनी हे नेहमीच दाखवून दिले आहे. जॅस्मिन ही प्राण्यांची डॉक्टर आहे आणि सध्या ब्रिटनमध्येच एडिन्गबर्ग विद्यापीठात संशोधनदेखील करत आहे. स्पाइन रेस ही स्पर्धा फक्त शारीरिक कस जोखणारी नाही तर तेवढीच मानसिक क्षमता जोखणारीसुद्धा असते. रात्री, अपरात्री एकटय़ानेच एखाद्या भागातून पळायचे, दोन, तीन दिवस नीट सलग झोप झालेली नसतानाही शरीराला आणि मनाला पळवायचे हे नक्कीच सोपे नाही. अनेकजण ही स्पर्धा मध्येच सोडून देतात, जॅस्मिनने पण स्पर्धा जिंकल्यानंतर सांगितले की शेवटचे काही अंतर तिला नुसते भास होत होते, रस्त्यात प्राणी दिसत होते, त्यावेळी तिच्या कणखर मनाने तिला तारून नेले. लेकीला बघण्याची ओढही होतीच. या स्पध्रेच्या आधीही जॅस्मिनने अनेक विक्रमांची नोंद केली होती. पण ‘स्पाइन रेस’ ही तिची खास कामगिरी समजली पाहिजे. कारण तिने आईपण निभावता निभावता स्पर्धादेखील जिंकून दाखवली. आता अजून पुढे पुढे कोणते नवीन विक्रम जॅस्मिन पॅरिस करून दाखवते याची जास्त उत्सुकता आहे.
ऑस्करसाठी ‘भारत’
आंतरराष्ट्रीय स्तरावर घटनांच्या तारखा, महिने अनेकदा ठरलेले असतात, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये नोबेल विजेत्यांची घोषणा होते आणि डिसेंबरमध्ये त्यांना हे पुरस्कार दिले जातात, तसेच डिसेंबरमध्ये ऑस्करसाठीच्या पहिल्या ९ नावांच्या यादीची घोषणा होत असते. मग जानेवारीमध्ये शेवटची यादी आणि फेब्रुवारीमध्ये विजेत्यांना पारितोषिके दिली जातात. ‘लगान’नंतर कोणत्याच भारतीय चित्रपटाने शेवटच्या पाचात हजेरी लावलेली नाही, तरीही यावेळच्या ऑस्करमध्ये एका वेगळ्या अर्थाने ‘भारत’ आहे. हे भारताचे ऑस्करमधले प्रतिनिधित्व करायला कारणीभूत ठरली आहे एक इराणी स्त्री. ‘रायका झेहताब्शी’ या इराणी अमेरिकन स्त्री दिग्दर्शिकेची ‘पीरेड, एंड ऑफ सायलेन्स’ ही डॉक्युमेंट्री वा माहितीपट शेवटच्या पाचात आहे. मग आता त्याचा आणि भारताचा काय संबंध? तर या माहितीपटात जी गोष्ट सांगितली आहे ती दिल्लीजवळच्या एका गावातली आहे. या माहितीपटाएवढीच हा माहितीपट कसा तयार झाला याची गोष्टसुद्धा वेधक आहे. लॉस एंजेलिसमधल्या ओकवूड शाळेतल्या मुलींना त्यांच्या शिक्षिकेकडून कळले की जगात अनेक ठिकाणी स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस खूप असुविधांना सामोरे जावे लागते. अनेकींना सॅनेटरी पॅड म्हणजे काय हेसुद्धा माहीत नसते, त्यांच्यामध्ये पाळीबद्दल अनेक गैरसमज असतात. त्यामुळे त्यांनी शाळेत व्हेगन केकची विक्री करून आणि इतर स्टॉल लावून ३ हजार डॉलर म्हणजे जवळपास २ लाख रुपये जमवले. या पशांतून काठीखेरा या हापूर जिल्ह्य़ातल्या गावात ‘पॅडमॅन’ अरुणाचलम मुरुंगथम यांची सॅनेटरी पॅड मशीन विकत आणली जाणार होती. हा प्रकल्प यशस्वीपणे पार पडल्यावर ओकवूडच्या मुलींना आणि त्यांच्या शिक्षिकेला वाटले, जर आपण या सगळ्याची गोष्ट माहितीपटाद्वारे जगासमोर आणली तर कदाचित इतरही अनेक ठिकाणी स्त्रियांना या सुविधा मिळतील, पाळीबद्दलचे समज-गैरसमज दूर होतील. म्हणून त्यांनी रायकाला या कामासाठी विचारले आणि त्यासाठी तिला पैसेसुद्धा देऊ केले. हा माहितीपट करण्यासाठी या अमेरिकन शाळकरी मुलींनी ४० हजार डॉलर (जवळपास २८ लाख रुपये) एवढा मोठा निधी गोळा केला. या माहितीपटाच्या निमित्ताने रायका दोनदा भारतात येऊन गेली. तिला खात्री आहे, या माहितीपटामुळे या विषयावर खुलेपणाने चर्चा होईल. अमेरिकन मुलींच्या पुढाकाराने एका इराणी स्त्री दिग्दíशकेने भारतातल्या एका गावातल्या स्त्रियांचे मासिक पाळीबद्दलचे प्रश्न, त्यांचे समज यावर बोधपट तयार केला हे खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाचे उदाहरण आहे. या बोधपटाला ऑस्कर मिळो अशी शुभेच्छा तर देऊ याच; पण त्याचबरोबर आपल्या समाजातही मासिक पाळीबद्दल बोलण्याचा खुलेपणा येवो, स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास सुसह्य़ करण्यासाठी आवश्यक ते सगळे मिळो आणि त्यासाठी लागणारे प्रयत्न आपल्याच देशातून, आपल्याच समाजातून व्हावे अशी आशा करायला काय हरकत आहे?

मानसी होळेहोन्नूर
(स्त्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग, लोकसत्ता १६ फेब्रुवारी२०१९

पृथ्वी प्रदक्षिणा ३


ग्वाटेमाला हा मध्य अमेरिकेमधला एक देश. कोणाच्याही अध्यात ना मध्यात. आपण बरे नि आपले काम बरे अशा मनोवृत्तीचा. खरे तर या देशाला वारसा आहे समृद्ध अशा माया संस्कृतीचा. हजारो वर्षांपूर्वीपासून या भागामध्ये समृद्ध अशी माया संस्कृती नांदत होती; पण १६व्या शतकात तिथे स्पेनचे व्यापारी आले आणि हळूहळू त्यांनी इथल्या लोकांवर राज्य करायला सुरुवात केली. जेव्हा परदेशी शासक एखाद्या भूभागावर राज्य करतात तेव्हा काय होते हे आपल्याला- भारतीयांना नव्याने सांगायची गरज नाही. या अशा आक्रमणांमध्ये सगळ्यात जास्त भरडली जाते ती तिथली पारंपरिक व्यवस्था. इंग्रजांच्या काळात ओहोटीला लागलेला हस्तोद्योग, कुटिरोद्योग महात्मा गांधीजींमुळे तग धरू शकला आणि आता इंटरनेटच्या मदतीने परत उभा राहू शकत आहे. हे सगळे लिहिण्याचे खरे कारण आहेत ग्वाटेमालामधल्या धाडसी मूलनिवासी स्त्रिया. काही शतके स्पेनची वसाहत म्हणून राहत असल्यामुळे इथल्या मूळ मायन लोकांवर अर्थातच स्पॅनिश संस्कृतीचा प्रभाव न पडता तर विशेष होते. अशा परिस्थितीत इथल्या काही लोकांनी, खास करून बायकांनी त्यांची माया संस्कृती जपण्यासाठी म्हणून ‘असोसिएशन फेमेनिना पॅरा एल देसारोलो दे सकातेपेकीज’ (आएऊएर) ची स्थापना केली आहे. मायन लोक त्यांच्या संस्कृतीचे निदर्शक असलेले कपडे घालतात आणि त्यावरून त्यांना हिणवलेदेखील जाते. अनेकदा त्यांचे कपडे बघून त्यांना हलक्या दर्जाची कामे सांगितली जातात; पण हेच असे कपडे जेव्हा बाजारात विकायला येतात, गोरे लोक वापरतात तेव्हा मात्र या सगळ्याची किंमत अचानक वाढते. जो कपडा हस्तकारांकडून ३ युरोला विकत घेतला जातो, त्याची किंमत विकताना ३०० युरो होते. यातही, या मायन हस्तकारांच्या शैलीची सर्रास नक्कल केली जाते. त्यांच्या कपडय़ांसारखेच दिसणाऱ्या पण हलक्या प्रतीच्या कपडय़ांची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर केली जाते. त्यामुळे ‘एएफईडीईएस’चा त्यांच्या वस्त्रशैलीचे ‘इंटलेक्चुअल राइट’ म्हणजे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातले एक पाऊल म्हणजे तिथल्या कोर्टाने केवळ मायन समूहालाच मायन शैलीची वस्त्रे तयार करण्याचे हक्क असावेत अशा धर्तीचा काही कायदा करता येईल का याची चाचपणी करण्यास सांगितले आहे. वर्षांनुवर्षे पूर्वजांकडून मिळवलेले ज्ञान वापरून या स्त्रियांनी त्यांची वस्त्रसंस्कृती जतन केलेली आहे. त्यामुळे अर्थात त्यावर सगळ्यात जास्त त्यांचाच हक्कआहे. जर त्यातून अर्थप्राप्ती होत असेल तर त्याचा योग्य तो मोबदलादेखील या स्त्रियांना मिळालाच पाहिजे. अर्थात आयपीआरबद्दलचे जागतिक कायदे आणि त्यातली लढाई यात या स्त्रिया कितपत यशस्वी होतील माहीत नाही; पण किमान त्यांना स्वत:कडे असलेल्या कौशल्याची किंमत कळली, त्याचे आर्थिक मोल आणि त्याहून जास्त सांस्कृतिक मोल कळले. ‘‘आम्ही जपलेली आमची वस्त्रसंस्कृती हे आमचे ज्ञानाचे भांडार आहे, जे आमच्यावर राज्य करणाऱ्या कोणत्याही शासकांना तोडता, फोडता, जाळता आले नाही,’’ असे अंजेलिना अस्पुअक अभिमानाने सांगतात तेव्हा ही प्राचीन संस्कृती कालौघात अशी सहजासहजी लुप्त होणार नाही याची खात्री पटते.
५२ किनारे स्वच्छ
बघता बघता जानेवारी महिना संपलासुद्धा. २०१९ च्या वर्षांतला दुसरा महिना सुरू झाला. अनेकांनी वर्षांच्या सुरुवातीला केलेले संकल्प कदाचित मागच्या महिन्यातच राहिले असतील. काहींचे संकल्प या महिन्यातही सुरू असतील. प्रत्येक पूर्ण केलेल्या अपूर्ण असलेल्या संकल्पाची एक गोष्ट असते. संकल्प सुरू करण्यामागेसुद्धा काही कारण असते. ब्रिटनमधल्या कॉन्रेलजवळ राहणाऱ्या पॅट स्मिथ यांनी २०१८ मध्ये संकल्प केला, की त्या दर आठवडय़ाला एक किनारा स्वच्छ करणार. हा त्यांचा संकल्प किती दिवस त्या पाळू शकतील अशी त्यांच्यासह अनेकांना शंका होती, कारण हा संकल्प केला तेव्हा स्मिथ यांचे वय होते अवघे ७० वर्षे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला रोज चालत जायचा संकल्प १० दिवस टिकत नाही, पण या ब्रिटनच्या आज्जींनी वर्षभर त्यांचा संकल्प पाळून एक, दोन नव्हे, तर तब्बल ५२ किनाऱ्यांची सफाई केली. कॉन्रेल हा ब्रिटनच्या नर्ऋत्य किनाऱ्याकडचा भाग. तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या भागातले किनारे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत; पण या सौंदर्याला काळा डाग लागत होता तो त्या किनाऱ्यांवर असणाऱ्या कचऱ्याचा. त्यामुळे या आज्जींनी ठरवले की,आपण आपल्याला जसे जमेल तसे हे किनारे स्वच्छ करायचे. त्यामुळे त्या दर आठवडय़ाला हातात रबरी मोजे घालून मोठय़ा पिशव्या, झाडू घेऊन जवळपासच्या किनाऱ्यांवर जायच्या. कधी एकटीने, तर कधी इतरांच्या मदतीने, पण चिकाटीने त्यांनी ५२ आठवडे हे काम केले. लोक रोजच्या वापरातल्या गोष्टीसुद्धा इथे टाकून तसेच जातात. हा असा वारसा मी माझ्या मुलांना, नातवंडांना पुढच्या पिढीला देऊ इच्छित नाही, म्हणून त्यांनी किनारे स्वच्छ करायचा संकल्प केला, असे त्या म्हणतात. एक वर्षभर संकल्प पाळला आणि अजूनही माझ्या किनाऱ्यांना माझी गरज आहे. त्यामुळे मी हे काम थांबवणार नाही, असे त्या म्हणतात. किनारे स्वच्छ करतानाच त्या लोकांमध्ये प्लास्टिकच्या गैरवापराबद्दल जनजागृती करत आहेत. स्वच्छ प्रदूषणरहित किनाऱ्यांचे महत्त्व इतरांना कळून तेही त्यासाठी प्रयत्न करतील, असा त्यांना विश्वास आहे. वयाच्या ७०व्या वर्षीदेखील पॅट स्मिथ यांनी केलेली संकल्पपूर्तीची ही बातमी अनेकांना त्यांचे संकल्प या वर्षी तरी पूर्ण करण्यास नक्कीच मदत करतील.
हार्ड’ मेटल
लेबनॉन हा मध्यपूर्व आशियातला देश, याचे शेजारी युद्धामध्ये पोळून निघत असताना या देशाने अजून तरी शांतता टिकवून ठेवली आहे. इस्रायल, सीरिया या देशांमधल्या अस्थिर धगीची झळ या देशालाही लागते. पूर्णपणे मुस्लीम नाही, पण मुस्लीमबहुल असलेल्या या देशातही त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर निर्बंध आहेत. कदाचित जेव्हा परिस्थिती पूरक नसते, तेव्हाच काही तरी करून दाखवण्याची ऊर्मी जास्त तीव्र असते. त्यामुळेच ज्या देशात ‘हार्ड रॉक’, ‘मेटल’ या संगीत प्रकाराकडे उपेक्षेनेच बघितले जाते, त्याच देशात काही मुली एकत्र येऊन स्वत:चा हार्ड मेटलचा बँड सुरू करतात हे विशेषच म्हटले पाहिजे ना. शेरी, लिलास, माया, अल्मा, तात्याना या पाच मुलींनी मिळून त्या देशातला पहिला ‘फिमेल ओन्ली, स्लेव्ह टू सायरेन’ हा बँड सुरू केला आहे. २०१५ मध्ये सुरू झालेला हा बँड आजही लेबनॉनमध्ये ठिकठिकाणी त्यांचे शो करीत आहे. त्यांचा पहिला अल्बम या वर्षी तरी येईल अशी त्यांना आशा आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला त्यांचा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता. ज्या देशात ‘मेटॅलिका’, ‘निर्वाणा’ यांसारख्या जगप्रसिद्ध बँडवर बंदी आहे, त्या देशात पाच मुलींनी स्वत:ची ओळख हार्ड मेटल बँड चालवणाऱ्या मुली अशी तयार केली आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रत्येकाचे व्यक्त होण्याचे माध्यम वेगळे असते. मुलगी आहे म्हणजे नाजूक, सौम्य संगीत ऐकले पाहिजे, गायले पाहिजे हे समज मोडून काढणे या पाचही जणींना नक्कीच सोपे गेले नसणार, पण त्या ते करून दाखवत आहेत. त्या प्रत्येकीची स्वत:ची एक गोष्ट आहे. आठवडय़ातून दोन दिवस त्या भेटतात, एकत्र सर्व करतात, ड्रम्स, गिटारमध्ये बुडून जातात. हिरव्या रंगाचे केस, ओठ, कान, नाक जिथे कुठे शक्य आहे तिथे त्यांनी टोचून घेतले आहे, वेगवेगळे टॅटू काढले आहेत. ही फक्त बंडखोरी नाही तर त्यांना ते करण्यात आनंद वाटतो म्हणून त्या हे करतात. आम्हाला कोणालाही काही दाखवून द्यायचे नाही, कोणाविरुद्ध काही करायचे नाही, आम्हाला फक्त गायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे. हे वाचत असताना मला राहून राहून ‘व्हिलेज रॉक स्टार’ची आठवण येत होती. अशीच एका मुलीच्या संगीतप्रेमाची कथा असलेल्या या चित्रपटाला मागच्या वर्षी सर्वोत्तम चित्रपटाचे सुवर्णकमळ मिळाले होते. चित्रपटातली कथा कदाचित वास्तवावर आधारित असेल किंवा नसेल; पण लेबनॉनमधल्या ‘स्लेव्ह टू सायरन’च्या मुली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवत आहेत हे नक्कीच बदलत्या जगाचे लक्षण आहे.
प्लॅटॉनिक पालकत्व
इला आणि व्हॅन ही दोन गोंडस मुले अमेरिकेत एकत्र राहत आहेत, पण त्यांचे आईबाबा एकत्र राहत नाहीत. आता यात तसे काही फार वेगळे वाटायचे कारण नाही. घटस्फोटामुळे वेगळे राहणारे आई-बाबा, दोन्ही आईच किंवा दोन्ही बाबाच असणारी घरंदेखील आता काही नवीन नाहीत. मग इला आणि व्हॅनच्या आईबाबांचे असे काय वेगळेपण आहे? इला आणि व्हॅन यांचे आईवडील ‘प्लॅटॉनिक पॅरेन्टस्’ आहेत. म्हणजे त्या दोघांनी लग्न केलेलं नाही किंवा ते एकत्रही राहत नाहीत. केवळ आपले स्वत:चे मूल असावे या भावनेतून दोन अनोळखी माणसे एका वेबसाइटवर माहिती टाकतात, नंतर भेटतात आणि ठरवतात आपण दोघे मिळून आपले मूल या जगात आणू या, त्याला वाढवू या. मग आयव्हीएफच्या मदतीने त्यांना जे मूल होते त्यामुळे यांचे आगळेवेगळे कुटुंब सुरू होते. आई वेगळ्या घरात, वडील वेगळ्या घरात आणि मुलं आईवडील दोघांच्या बरोबर वाढत असतं. इला आणि व्हॅन आता २ वर्षांचे आहेत, आठवडय़ातले ३ दिवस आई, ३ दिवस बाबा आणि १ दिवस एकत्र किंवा ज्याला वेळ आहे तो त्यांना सांभाळतो. या मुलांच्या आईवडिलांना तुम्ही हा असा निर्णय का घेतला, असे विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्हाला मूल हवं होतं. कदाचित दत्तक घेऊनही ही भूक भागवता आली असती, पण ही अशी सह-पालकत्वाची सोय जेव्हा कळली तेव्हा आम्ही हे करून बघायचे ठरवले.’’ या मुलांच्या आईने सांगितले की, ‘‘अनोळखी माणसावर विश्वास ठेवून मुलांना जन्म देणे ही तशी खूप जोखमीची गोष्ट होती, पण जर त्या माणसाने ऐन वेळी हात झटकले, आर्थिक किंवा सामाजिक जबाबदारी झटकली तरीही मी समर्थ होतेच, त्यामुळे मी माणसांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून हे सह-पालकत्व करायचे ठरवले. स्पर्म घेऊन मला एकटी आई होता आले असते, पण जर मुलांना वडीलही मिळत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे.’’ या विचारातून अमेरिकेत असे सह-पालकत्व (को-पॅरेंटिंग) किंवा प्लॅटॉनिक पालकत्व हा पर्याय अनेक जण वापरत आहेत. ‘मोडामिली’ ही वेबसाइट सुरू करणाऱ्या इव्हान फॅटोव्हीक यांच्या मते आजपर्यंत १०० अशी बाळे नक्कीच जन्माला आलेली आहेत.

मानसी होळेहोन्नूर
(स्त्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग, लोकसत्ता २ फेब्रुवारी २०१९
 

पृथ्वी प्रदक्षिणा २


जगातली महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत जे काही घडते त्याचा थेट परिणाम त्यांच्या शेजारी देशांवर तर होताच असतोपण इतर देशांवरही प्रत्यक्षअप्रत्यक्षरीत्या होतच असतो२२ डिसेंबर २०१८ पासून अमेरिका शट डाऊन होतीम्हणजे अनेक ठिकाणचे काम ठप्प होते.ऑफिसेसबागासरकारी मालकीची ठिकाणे अनेक गोष्टी बंद होत्यात्यामुळे लाखो लोकांना पगार मिळाले नाहीतया सगळ्याचे कारण होती मेक्सिको सीमेवरची भिंतराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तिथली काँग्रेस यांच्यात या भिंतीसाठीच्या निधीवरून वाद आहेतमुळात ट्रम्प यांचे म्हणणे आहेमेक्सिकोमधील अनेक लोक अमेरिकेत घुसतात आणि इथल्या लोकांच्या नोकऱ्या हिसकावतातहळूहळू इथलेच नागरिक होऊन जातातत्यावर उपाय म्हणून पूर्ण सीमेवर मोठ्ठी भिंत बांधावीमेक्सिकोपेक्षा अमेरिकेतली परिस्थिती नक्कीच चांगली असल्याने ही गोष्ट खरीही आहेपण मेक्सिकोमध्ये फक्त या सीमेवरच नव्हे तर देशाच्या इतर भागामधूनदेखील लोक गायब होत आहेतअमेरिकेला लागून असलेल्या प्रांतातले लोक अमेरिकेत जात असतीलअसा संशय तरी बाळगता येतोपण सिनालोआ या उत्तरेकडच्याच पण समुद्रकिनारा असलेल्या प्रांतातलेदेखील अनेक पुरुष हरवलेले आहेत२००६ पासून संपूर्ण मेक्सिकोमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त जण गायब झाल्याच्या नोंदी आहेतत्यातले काही जण या भागातलेदेखील आहेतत्यातल्याच एल फ्युर्तो गावातून मिरना नेरीयदा मेदिना हिचा मुलगा रॉबर्ट २०१४ मध्ये अचानक गायब झालाम्हणजे त्याला काही जण घेऊन गेल्याचे काही लोकांनी पाहिलेपण त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच कळले नाहीत्याचा शोध घेत असताना मेदिनाला कळले की तिच्यासारख्या अनेक जणी आहेतकोणाचा नवराकोणाचा भाऊकोणाचे वडील गायब झाले आहेतमुळात हा भाग कुप्रसिद्ध आहे इथल्या अमली पदार्थाच्या व्यवसायासाठीत्यामुळे माणसे अचानक गायब होतात त्याचा संबंध अनेकदा या व्यवसायाशीदेखील असतोकिमान आपला माणूस जिवंत आहे की त्याचे काही बरेवाईट झाले एवढे तरी कळावेअसे या शोध घेणाऱ्या परिवारांना वाटणे साहजिक आहेत्यामुळेच मग मिरना नेरीयदा मेदिना हिने
द सर्चर्स ऑफ एल फुअत्रे’ ही चळवळ सुरू केलीया चळवळीअंतर्गत आसपासच्या भागांमध्ये कुठेही एखादा बेवारशी मृतदेह सापडला तर त्याची डीएनए टेस्ट करतात आणि हरवलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातल्या कोणाशी तो जुळतोय का हे पाहतातकधी एखाद्या शेतकऱ्याला शेत नांगरताना मृतदेह किंवा त्यांचे सांगाडेकाही अवशेष सापडतातकिंवा कधी जनावरे जमीन उकरून हे अवशेष वर काढतातया संबंधीची काहीही माहिती मिळाली की मेदिना आणि तिच्या सहकारी कुदळ फावडे घेऊन जातात आणि हलक्या हाताने मृतदेहअवशेष गोळा करतातया त्यांच्या शोधमोहिमेत त्यांना आजवर दोनशे मृतदेह मिळालेमात्र त्यातल्या काहींचीच ओळख पटलीत्यांच्याकडे सातशे जणांच्या डीएनएचे नमुने आहेतमिरनाने ज्या कारणासाठी हा शोध सुरू केला होतातो शोध २०१७ मध्ये संपलातिला रॉबर्टचे अवशेष सापडलेपण तरीही तिने हे कार्य थांबवले नाहीआता त्यांच्या या शोध मोहिमेत काही पुरुषदेखील मदतीला येत आहेतआपल्या प्रियजनांचा मृत्यू हा कायमच दु:खद असतोपण त्याहीपेक्षा ते जिवंत आहेत की नाहीत याची अनिश्चितता जास्त वाईट असतेत्यामुळे मिरनाला कळले तसेच इतरांना आणि तिच्या सहकारी कार्यकर्त्यांनाही त्यांच्या प्रियजनांचा ठावठिकाणा लवकरात कळो हीच प्रार्थना समर्पक ठरेल.
बदलाचे वारे?
आपण अनेक परीकथांमध्ये वाचलेले असते किंवा ऐकतोएक राजा असतोतो जनतेच्या कल्याणाचे सगळे निर्णय घेत असतोत्यामुळे राज्याचे स्वरूपच बदलत असतेअशीच काहीशी गोष्ट झाली आहे सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्याबद्दल२०१७ मध्ये राजेपदाचा मुकूट चढवल्यापासून त्यांनी सुधारणांचा सपाटाच लावलेला आहेतिथे नव्या उद्योगांना चालना देण्याबरोबरच अनेक स्त्रीकेंद्रित निर्णयही घेतले गेलेत्यातलाच जगभर गाजलेला एक निर्णय म्हणजे सौदीमध्ये बायका पुरुषांशिवाय गाडी चालवू शकतात.त्याचबरोबर या राजे साहेबांनी स्त्रियांना शिक्षणवैद्यकीय सोयींचा लाभ उठवण्यासाठी घरातल्या पुरुष मंडळींची परवानगी घेणे गरजेचे नसेलत्या त्यांचा व्यवसायदेखील सुरू करू शकतातखेळाचे सामने बघण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊ शकतातखासगी क्षेत्रात नोकरी करू शकतातघटस्फोटानंतर मुलांची कस्टडी मिळवू शकतातपण असे सगळे बदल घडले असले तरीही तिथले चित्र अजूनही खूप काही सुखकारक असेल असे वाटत नाही आणि असे वाटण्याचे कारण म्हणजे रहाफ मोहम्मद ही १८ वर्षांची तरुणीसौदी अरेबियामध्ये स्त्रियांना त्यांच्या घरातल्या पुरुषाच्या परवानगी शिवाय प्रवास करता येत नाहीइतरही अनेक बंधने आहेतया सगळ्या बंधनांना आणि सतत कुटुंबीयांकडून होणाऱ्या शारीरिक मानसिक अत्याचारामुळे रहाफला सौदी सोडून आश्रित म्हणून ऑस्ट्रेलियाकॅनडा अशा देशात जायचे होतेकाही दिवसांपूर्वी या तरुणीला बँकॉकमध्ये पकडले होतेही एकटीच कुवेतवरून बँकॉकला आली होतीती पळून आल्याचा संशय आल्याने तिचा पासपोर्ट सौदीच्या अधिकाऱ्यांनी घेतला,त्या वेळी थायलंडच्या लोकांनी तिला परत पाठवण्याची तयारीदेखील केली होतीमात्र हिने सोशल मीडियाचा वापर करतस्वत:ची परिस्थिती ट्विटरवर टाकली आणि बघता बघता तिची केस आंतरराष्ट्रीय प्रश्न बनलीतिची एक मत्रीणजिने इस्लाम सोडून दुसरा धर्म स्वीकारला आहेती ऑस्ट्रेलियामध्ये असतेतिनेही रहाफला ट्वीट करण्यास मदत केली होती.
सुरुवातीला रहाफला ऑस्ट्रेलियामध्ये जायचे असे ती म्हणत होतीमात्र नंतर तिने ट्वीट करून कॅनडाअमेरिकायूके कुठेही आश्रय मिळाला तर चालेलअशी भूमिका घेतलीतिचे वडील तिला घेण्यासाठी बँकॉकला पोहोचले होते मात्र जर मला माझ्या वडिलांकडे पाठवले तर सौदीमध्ये गेल्यावर कदाचित माझा खून करतील हेही तिने वारंवार सांगितले२०१७ मध्ये दीना लासूम या सौदीमधून पळून जाणाऱ्या स्त्रीची अशीच काहीशी गत झाली होतीपण तिला तिच्या कुटुंबीयांनी परत नेले आणि त्यानंतर तिचे काय झाले हे आजपर्यंत कोणालाच कळले नाही.
रहाफ मात्र या बाबतीत सुदैवी ठरलीतिने सोशल मीडियाचा अगदी योग्य वापर करून घेतला.कॅनडा सरकारने तिला राजाश्रय दिलेला आहे आणि हा लेख छापून येईपर्यंत ती कॅनडापर्यंत पोहोचली देखील असेलसौदी अरेबियात बदलाचे वारे जोरात फिरताहेत हे दिसतच आहे.तिथल्या वाळवंटात हे बदलाचे वारे मिटतातकी वादळ आणतात हे आता बघायचे आहे.
वेदनामय आयुष्य
स्त्रिया आता कोणत्याही क्षेत्रात आपण मागे नाही हे दाखवून देत आहेतस्वत:चे निर्णय स्वतघेत आहेतहे प्रगत आणि प्रगतिशील देशांमधले चित्र असतानाच आफ्रिकामध्यपूर्व आशियातल्या अनेक मुलींना आजही जुनाट प्रथांना बळी पडावे लागत आहेमुलींचा सुंथा करणे ज्याला वैद्यकीय भाषेत एफएमजी (female genital mutilation) म्हणतातहे आजही जगाच्या अनेक भागात सर्रास घडत आहेजुन्या काळात स्त्रियांवर अंकुश राहावात्यांची कामभावना कमीमर्यादित राहावी अशा भावनेतून सुरू झालेली ही प्रथा आजही छुप्या मार्गाने पाळली जातेचहे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे पश्चिम केनिया मधल्या शाळांनी ९१७ वर्षांच्या मुलींसाठी प्रेग्नन्सी टेस्ट आणि एफएमजी टेस्ट करून घेणे सक्तीचे केले आहे.
नवीन वर्ष सुरू झालेयआता ही टेस्ट केली जाईलयामध्ये एफएमजी झाले असेल तर पुढे काय काळजी घेतली पाहिजेत्रास होत असेल तर त्यासाठीची उपाय योजना करणेजर मुलगी गर्भवती असेल तर तिला घरी परत पाठवून तिची वैद्यकीय काळजी घेणे आणि मुलाच्या जन्मानंतर शाळेत परत प्रवेश दिला जाईल ही हमी देणे या गोष्टींवर भर आहेखरे तर २०११ पासून केनियामध्ये एफएमजी करणे हा गुन्हा आहेपण ही इतकी खासगी गोष्ट आहे की त्याच्याबद्दल कोणी बोलतही नाहीया प्रथेला कोणताही वैद्यकीय किंवा धार्मिक आधार नाहीकेवळ परंपरा म्हणून अनेक वर्षांपासून ही गोष्ट चालत आली आहेपण याचा त्रास होऊन अनेक जणींना कायमचे वंध्यत्व आले आहेकाही मरण पावल्यातपण तरीही ही प्रथा चालूच आहेआपल्यावर आपल्या रूढी परंपरा यातून आलेल्या वर्चस्वाचा प्रभाव इतका असतो,की आपण त्यापलीकडे जाऊन त्यातून आपल्याला काही शारीरिक त्रास तर होणार नाही ना याकडे अनेक स्त्रियासुद्धा लक्ष देत नाहीकेनिया सरकारच्या या निर्णयावर त्यांना पुरोगामी आणि प्रतिगामी दोन्ही लोकांकडून विरोध सहन करावा लागत आहेप्रतिगामी अर्थातच अशी कोणती टेस्ट करायच्या विरोधात आहेत तर पुरोगामी लोकांच्या मते ही खूप खासगी गोष्ट आहेहे मुलींच्या खासगी आयुष्यावर बंधन घालण्यासारखेच आहेत्यामुळे खरे तर सर्व स्तरांवर या विरोधात आवाज उठणे गरजेचे आहेस्त्रीच्या आयुष्यातील अशी वेदना थांबायला हवीय.
अशीही इन्व्हेस्टमेंट
नोकरीमध्ये असतानाकामाचे स्वरूप तेचकामाची वेळ तेवढीच असली तरीही त्या दोघांच्या वेतनात फरक बघायला मिळतोचहा फरक अगदी खालच्या आणि खूप वरच्या स्तरावर जास्त अनुभवायला मिळतोस्त्रिया १०० टक्के झोकून देऊन काम करत नाहीतत्यांच्या डोक्यात कायम घरचेमुलांचे विचार असतात हा नेहमीचा आरोप तर अनेकदा असतोच.गमतीची गोष्ट अशी असते की हा आरोप करणारे त्यांच्या घरी त्यांच्या बायकोकडून हीच अपेक्षा ठेवत असतात. ‘यूके’मध्ये झालेल्या एका सव्‍‌र्हेक्षणामध्ये नामांकित विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांचे वेतन त्यांचा वर्णवंशलिंग यावर आधारित असते ही माहिती नुकतीच समोर आलीगोऱ्या पुरुषांना अर्थातच सर्वाधिक पगार मिळतोगोऱ्या स्त्रियांना त्यांच्यापेक्षा थोडा कमीत्यानंतर भारतीय किंवा दक्षिण आशियाई पुरुषमग दक्षिण आशियाई स्त्रिया आणि मग इतरयातले अजून एक निरीक्षण म्हणजे गौरवर्णीय स्त्रियांना भारतीय किंवा दक्षिण आशियाई पुरुष सहकाऱ्यांपेक्षाही कमीच वेतन मिळतेअनेक जण या वेतनतफावतीचे समर्थन करताततर अनेक जण हिरिरीने स्त्रिया कशा कामचुकार असतातत्या झोकून देऊन काम करत नाहीत हे सांगत राहतातपण स्वत:वरील कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे एकटे राहणाऱ्या,किंवा उशिरा लग्न करणाऱ्या स्त्रियांची वाढती संख्या हेच सिद्ध करतेआताशा अनेक स्त्रियादेखील कामाला पहिले प्राधान्य देत आहेतपण तरीही त्यांना नोकरीच्या ठिकाणी समान वागणूक मिळतेच असे नाहीअशा वातावरणात गोल्डमन सॅक्सने त्यांच्या इंग्लड मधल्या स्त्रीकर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली खास सवलत सुखावह आहेया जगप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीने तिच्या लंडन येथील स्त्रीकर्मचाऱ्यांसाठी एक विशेष घोषणा केली आहे.अनेकदा मूल आजारी आहे किंवा वृद्धपरावलंबी आईवडिलांकडे बघण्यासाठी कोणी नाही म्हणून स्त्रिया कर्मचारी रजा घेतातम्हणून कंपनीने त्यांच्यासाठी अल्प दरात मदतीची सोय उपलब्ध करून दिली आहेकर्मचारी वर्षभरात कोणतेही २० दिवस या सोयीचा फायदा घेऊ शकतातत्यासाठी त्यांना तासाला फक्त ४ पौंड द्यायचे आहेतउरलेली रक्कम कंपनीकडून दिली जाईलआपल्यासाठी आपल्या स्त्रीकर्मचारीदेखील महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासाठी ही खास सुविधा आपण देत आहोतअसे या कंपनीने सांगितले होतेया आधीदेखील या कंपनीने स्तन्यदा आणि कामानिमित्त दुसरीकडे जावे लागणाऱ्या आयांना त्यांचे ब्रेस्ट मिल्क घरी पाठवण्याची सोय करून दिली होतीज्या इंग्लंड मध्ये विद्यापीठे वेतन देताना स्त्रीपुरुष भेदभाव करताततिथेच ही बँक त्यांच्या स्त्रीकर्मचाऱ्यांना खास सवलत देते.बहुतेक इन्व्हेस्टमेंट बँकेला कुठे इन्व्हेस्ट केले म्हणजे चांगले रिटर्न्‍स मिळतील याचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळेते अनुभवाला प्राधान्य देत असावेत.

मानसी होळेहोन्नूर

(स्त्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
 सौ. चतुरंग लोकसत्ता१९ जाने  २०१९
#पृथ्वीप्रदक्षिणा२

Thursday, April 11, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा १


शेड्स ऑफ ग्रे
केस हा स्त्रियांचाच नव्हे तर पुरुषांचादेखील ‘सॉफ्ट कॉर्नर’ समजला जातो. त्यातही आपल्याकडे काळेभोर लांबसडक केस अद्यापही सौंदर्याचे मापक समजले जाते आणि पांढरे केस तर वृद्धपणाचे लक्षण समजले जाते. त्यामुळे केस पांढरे व्हायला लागल्याबरोबर हेअर डाय लावणे हे समाजसंमत समजले जाते. बाजारात रोज नवीन डाय येतो; पण हे काही फक्त आपल्या समाजाचे चित्र नाही, इंग्लंडमध्येसुद्धा हीच परिस्थिती आहे. फक्त तिथे थोडा बदल बघायला मिळत आहे. मागच्या वर्षी केलेल्या एका पाहणीत आढळले की, िपटरेस्टवरती ‘गोइंग ग्रे’ हा सर्च करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ८९७ टक्क्यांची वाढ झाली होती. नैसर्गिकरीत्या केसांना पिकू द्यावे, उगाच त्यांच्या पांढरे होण्याच्या प्रक्रियेत डायचा अडसर घालू नये, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आपण स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारले तर त्याचा परिणाम आपलाच आत्मविश्वास वाढण्यात होतो, असे अनेक मानसशास्त्रज्ञांचे मत आहे. त्यातही पांढरे केस न दाखवण्याची जबरदस्ती ही स्त्रियांवर जास्त असते. पुरुष त्याच्या काळ्यापांढऱ्या केसांमध्ये जास्त ‘सेक्सी’ दिसतो, मात्र त्याच वयाची स्त्री काळ्यापांढऱ्या केसांमध्ये ‘ऑड वुमन आऊट’ दिसते, असा सामाजिक प्रवाद मानला जातो; पण आता या प्रवादालाच अनेक जणी मोडून काढत आहेत.
सारा हॅरिस या प्रख्यात ‘व्होग’ मासिकाच्या उपसंपादिकेने एक पोस्ट लिहून ते केस पांढरेच का ठेवत आहे हे सोशल मीडियावर टाकले होते. आज काही मॉडेल्सदेखील त्यांचे पांढरे केस अभिमानाने मिरवत आहेत. आम्ही जे आहोत ते आहोत, ते का लपवावे, असा सूर लावणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत आहे. सौंदर्याच्या नव्या परिभाषा येत आहेत. काळ्या दगडावरची पांढरी रेष उठून दिसते तसेच सॉल्ट अँड पेपर मस्त दिसतात, मग ते पुरुष असोत की स्त्रिया!
इथिओपियाची तंत्रज्ञ
बिटेलहेम डेसी ही इथिओपिया मधली अवघी १९ वर्षांची मुलगी आहे. इथिओपिया म्हणल्यावर कदाचित ती एखादी धावपटू नाही तर तत्सम खेळाडू असावी असा जर तुमचा अंदाज असेल तर तो साफ चुकीचा आहे. ही तरुणी चच्रेत आहे ते वेगळ्याच कारणाने. इथिओपियामधली ‘आयसीएलओजी’ या रोबोटिक लॅबोरेटरीमध्ये ती को-ऑर्डिनेटर म्हणून काम करते. अगदी सर्वसाधारण घरात जन्मलेल्या डेसीच्या नावावर चार सॉफ्टवेअर प्रोग्रामचे कॉपीराइट आहेत.
यातील एक तर मोबाइल अ‍ॅपचे आहे. या अ‍ॅपचा उपयोग इथिओपिअन सरकार नद्यांच्या पाणी व्यवस्थापनासाठी करते. या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? तर डेसी ९ वर्षांची असल्यापासून. तिच्या नवव्या वाढदिवसाच्या आधी तिच्या वडिलांनी तिला सांगितले की, तिला वाढदिवसाला काही घेऊन देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. तेव्हा डेसीने तिच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचा वापर करून पैसे कमवायला सुरुवात केली. ती लोकांना व्हिडीओ एडिट करून द्यायची, त्यात संगीत घालून द्यायची. या सगळ्या कामांतून तिला ९० डॉलर मिळाले होते. गेल्या दहा वर्षांत तिने खूप मोठा पल्ला गाठला आहे. २०१३ मध्ये सुरू झालेली ‘आयसीएलओजी’ ही इथिओपियामधली पहिली रोबोटिक लॅबोरेटरी आहे.  इथिओपियाने नुकतेच त्यांचे नवीन मुक्त धोरण जाहीर केले, त्यामुळे इथिओपिया या तंत्रज्ञान क्षेत्रात नवी मजल गाठणार हे नक्कीच. स्वत:च्या प्रगतीवर हुरळून न जाता, डेसीने
तिच्या देशातल्या मुलामुलींसाठी ‘सॉल्व इट’, ‘एनिवन कॅन कोड’ असे वेगवेगळे प्रोग्राम तयार केले आहेत, ज्याच्यायोगे शाळेतल्या मुलामुलींना नवीन शोध, माहिती सहज कळेल. त्यांना नवीन प्रयोगदेखील करता येतील.
अशाच एका उपक्रमाचा भाग म्हणून डेसीने ‘सोफिया स्कूल बस’ हा उपक्रम खास मुलींसाठी तयार केला आहे. या फिरत्या बसमध्ये रोबोट, थ्री डी पिंट्रर अशा अनेक गोष्टी असतील. मुली जर त्यांच्या गरजा बोलून दाखवत नसतील तर एक मुलगी म्हणून मीच त्या ओळखल्या पाहिजेत ना, म्हणून मी बस सुरू केली, असे  डेसी म्हणते. मुले खूप कल्पक असतात, नवीन काही शोधू शकतात, पण मुली समाजासाठी काही तरी भरीव करतात हे फक्त बोलण्यातूनच नव्हे तर वागण्यातूनही दाखवणारी डेसी इथिओपियाची धावपटूंचा, आफ्रिकेतला भूसीमाबद्ध (landlocked) देश ही ओळख बदलायला नक्कीच मदत करेल.
स्थलांतरित आशा
स्वीडन हा युरोपमधला तसा कोणाच्याही अध्यातमध्यात नसणारा देश. उत्तर ध्रुवाजवळ असल्याने इथे जवळपास वर्षभरच प्रतिकूल थंड हवामान असते. मात्र या थंड हवामानाचा इथल्या उद्योग व्यवसायावर काहीच फरक पडलेला दिसत नाही. ‘इलेक्ट्रोलक्स’, ‘आयकिया’, ‘अस्ट्रा झेंका’, ‘स्काइप’, ‘एरिकसन’ अशा अनेक महत्त्वाच्या कंपन्या याच देशातून सुरू झालेल्या आहेत. या देशाने आजवर अनेक विस्थापितांनादेखील सहज सामावून घेतले आहे. इराक, इराण, युगोस्लाविया (जेव्हा तो एक देश होता), सोमालिया, बोस्निया, हर्जेगोविना यांसारख्या अनेक युद्धग्रस्त देशांतल्या लोकांना या देशाने सामावून घेतले आहे. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे लीला अली एल्मी, स्वीडनमध्ये खासदार झालेली पहिली स्थलांतरित स्त्री.
अडीच वर्षांची असताना सोमालिया सोडून लीला एल्मी आईवडिलांसोबत स्वीडनमध्ये आली. आज अठ्ठावीस वर्षांनंतर ती इथे येणाऱ्या स्थलांतरितांसाठी दुभाषक, संवादकाचे काम करते. हे  काम करताना तिला स्थलांतरितांच्या प्रश्नांची जाणीव झाली. त्यामुळेच २०१८ मधली देशातली मध्यवर्ती निवडणूक लढवण्याचे तिने ठरवले. ही निवडणूक लढवताना तिने तिचे स्थलांतरित असणे, मुस्लीम असणे, स्त्री असणे या कोणत्याही मुद्दय़ाचा आधार घेण्याऐवजी शाळा, नोकरीच्या संधी, स्थलांतरितांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, अशा प्रत्यक्षातल्या मुद्दय़ांचा आधार घेतला.
स्वत: हिजाब बांधून स्वत:ची धार्मिक श्रद्धा उघडपणे मिरवणाऱ्या, पण त्याच वेळी त्याचा आपल्या कामावर परिणाम होऊ न देणाऱ्या लीला एल्मीकडे त्यामुळेच स्वीडनमधला एक मोठा समुदाय आशेने बघत आहे. आपला देश सोडून दुसऱ्या देशात राहणाऱ्या नागरिकांची दुसरी पिढी तयार होत आहे, ज्या पिढीने त्यांचा मूळ देश पाहिलाच नाही. त्यांना ही दुसरी संस्कृतीच जवळची वाटत असेल तर त्यात काहीच चूक नाही. त्यामुळेच लीला एल्मी म्हणते, स्थलांतरितांमुळे प्रश्न उभे राहिलेत, असे म्हणण्याऐवजी स्थलांतरितांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले तर प्रश्न उभे राहणार नाहीत. त्यामुळे  स्वीडनमध्ये स्थायिक झालेल्या विस्थापितांच्या या पिढीला धर्म, जात, वंश यापेक्षा स्थिर भविष्याची आस आहे हे सुखावह चित्र आहे.
अन्नपूर्णा मस्तान अम्मा
जगभरातल्या निवडक बातम्यांचा कानोसा घेतल्यावर ही शेवटची बातमी आपल्याच देशातली, आंध्र प्रदेशातली. १०७ वर्षांची एखादी बाई म्हटल्यावर डोळ्यासमोर येते, एखादी अंथरुणाला खिळलेली आज्जी; पण मस्तान अम्मा मात्र खूपच वेगळी होती. वयाच्या १०५ व्या वर्षी तिने नातवाच्या मदतीने यूटय़ूब चॅनेल सुरू केले. ही आज्जी कायम चुलीवर मोकळ्या हवेत स्वयंपाक करायची. मिक्सर, चाकू या सगळ्यापेक्षा तिने कायम हाताची नखे, विळी, खलबत्ता वापरला. चष्मा नाकापर्यंत ओघळलेली, कृश, रापलेला वर्ण, अशी ही आज्जी चुलीसमोर बसते तेव्हा जणू तिची समाधीच लागून जाते. टोमॅटो, बटाटा, आलं यांची सालं ही आजी नखाने अगदी सहज काढते. परिसरात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा भांडय़ासारखा वापर करते. म्हणजे काय? तर ही आज्जी किलगडाच्या आतला गर काढून त्यात केळ्याची पाने लावून आतमध्ये मस्त चिकन शिजवते. तसाच एक प्रयोग शहाळ्याच्या आत पदार्थ शिजवूनदेखील करते. अस्सल गावरान स्वयंपाक करणाऱ्या, मसाले, मीठ चिमटीच्या हिशोबाने टाकणाऱ्या या आज्जीने देशविदेशातल्या खवय्यांना वेड लावले होते.
त्यांच्या ‘कंट्री फुड्स’ या पेजला भेट दिली तर या आजीच्या चाहत्यांचे तिच्यावरचे प्रेम बघायला मिळेल. ही आजी अलीकडेच वारली. तिच्या देशविदेशातल्या नातवंडांना त्यामुळे अचानक पोरके झाल्यासारखे वाटले हेही खरे. अगदी सामान्य घरातली, केवळ स्वत:वर विश्वास ठेवून, ते ज्ञान जगापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणारी मस्तान अम्मा असामान्य ठरते. १०५ वर्षी सुरुवात करून केवळ दोन वर्षांत तिच्या चॅनेलला १२ लाख लोकांनी ‘सबस्क्राइब’ केले होते, तर तिचे व्हिडीओज् हा आलेख लिहीपर्यंत २० कोटी २१ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले होते. इंग्रजी बोलता न येणाऱ्या, नातवंडांना भरवण्यात आनंद मानणाऱ्या मस्तान अम्मा खरोखरच एक अन्नपूर्णा होत्या.

पृथ्वी प्रदक्षिणा ५ जानेवारी २०१९
चतुरंग लोकसत्ता