Sunday, July 31, 2016

इनसाईड आऊट

त्या शाळेतला पहिलाच दिवस होता, बाबांच्या या अशा सारख्या बदल्यांना खरच ती आता कंटाळली होती. तसे बाबा ही बदली रद्द करायचा प्रयत्न करत होते, पण तसे काही झालं नाही, ती ८ वीत होती, बदलीचे शहर आधीच्या गावापेक्षा मोठं होतं जिल्ह्याचं गाव होतं, आजीचे गाव पण तिकडून तासभराच्या अंतरावर होतं, त्यामुळे हो नाही करता करता त्या गावात जायचं ठरलं. मग बँकेतल्याच लोकांच्या सल्ल्यानी घर आणि शाळा ठरवून टाकली. इकडचं घर अगदी मोकळं ढाकळ होतं, पुढे अंगण, मागे झाडं, जवळपास पाच, सहा वर्ष वर्ष कशी गेली कळलंच नव्हतं. त्या वर्षात ती, तिची बहिण झाडावर चढायला शिकल्या, पोहायला शिकल्याहोत्या कैऱ्या, चिंचा पाडण्यात तरबेज झाल्या होत्या. त्या गावात त्यांना खरा भारत, लोकं बघायला मिळत होती, शेती कशी करतात हे टीव्ही वर किंवा पुस्तकात वाचायची गरजच पडली नव्हती. निसर्गाचं शिक्षण घेत होत्या त्या. शाळेत पहिला नंबर तिचा ठरलेला होता, मग ती परीक्षा असो व स्पर्धा, पण मैदानावर मात्र ती खूप काही शिकत स्पर्धेच्या बाहेरच होती, ते सगळं तिला आवडत होतं, न आणि ण च्या शुद्ध भाषेच्या गुंत्यात न पडणारी मैत्री तिला खुणावत होती, कोणाच्याही घरून येणाऱ्या वासाबरोबर वानोळा ही यायचा, घराचा स्वैपाक फक्त एका घरापुरता नाही तर शेजार पाजारच्या साऱ्यांसाठी असायचा, हे ती बघत होती. आयुष्य शिकत होती. रात्रीचे दिवे, असो नसो, माणसं मात्र हाक मारल्यासरशी धावून येतात हे पाहत होती. आणि तिकडून एकदम काडेपेटीसारख्या बिल्डींगमध्ये राहायला गेल्यावर तिला रडूच कोसळलं. ह्या अशा घरात राहायचं? रांगोळी काढायला जागा नाही, फुलांसाठी जागा नाही. आपण परत आपल्या जुन्या घरी जाऊ, तिनी आणि तिच्या बहिणीनी एकच घोष लावला होता. तिथल्या मैत्रिणींची नावं काढत काढत रात्र कशी तरी काढली. सकाळी बाबांना तिनी जाऊन सांगितलं, तुम्ही सगळे रहा इथे, मी त्या गावात राहते माझ्या मैत्रिणीच्या घरी. आई नवीन घर लावता लावता आधीच वैतागली होती, तिला तिनी एक धपाटा घातला आणी परत तिच्या कामाला गेली. त्याच दिवशी तिच्या शाळेचा पहिला दिवस होता, नकोच वाटतं होतं सगळ. बाबांनी जवळ घेतलं, आणी समजावलं काहीतरी, मग म्हणाले, चाल एक चक्कर मारून येऊ स्कूटर वर. आणि मग तिला एका दुकानात नेऊन छान पेन, कंपास बॉक्स घेऊन दिला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आतापर्यंत झिरपत नव्हतं.
शाळेची मोठी इमारत बघूनच तिला दडपायला झालं, आपला वर्ग कसा ओळखायचा? शाळा घराजवळ होती म्हणून किमान रस्त्यात हरवायची तरी भीती नव्हती. कशी बशी विचारत शोधात ती वर्गात पोहोचली, आपल्यापेक्षा चटपटीत मुलं, मुली पाहून ती अजूनच बुजली, तशीच खाली मान घालून जो बाक रिकामा दिसला तिथं जाऊन बसली,  कोणी विचारलं तर जेम तेम पुटपुटत्या स्वरात नाव सांगायची. शिक्षकांपैकी काहींनी तिची दखल घेतली काहींनी विचारलंही नाही, तशीही शाळा सुरु होऊन दोन आठवडे झाले होतेच. तिला जुन्या शाळेची बचकभर आठवण आली, दुपारी एकटीच बसून डबा खाताना तिला भयंकर रडू कोसळत होतं. उत्तर माहीत असूनही द्यायचं नाही असा तिनी चंगच बांधला होता, कोणत्याही गोष्टीत भाग घ्यायचा नाही, विचारल्याशिवाय बोलायची नाही, इतर कोणाशी मैत्री तर बिलकुल नाहीच नाही, ती जशी नव्हती तशी ती व्हायचा प्रयत्न करत होती. उगाचच चिडत होती, आधी किती छान गायची इथे गाण्याच्या क्लास ला जायला पण नाही म्हणाली. छोट्या छोट्या गोष्टीवरून हिचं वाद घालणं, आईचे रागावणं, मग चिडणं, त्यावर उतारा म्हणून हिचं रडणं हा त्यांच्या घरातला रोजचाच कार्यक्रम होत चालला होता. बाबा मध्ये पडून सावरू बघत होते पण ती काही बधायला तयार नव्हती. तेरा, चौदा वर्षाच्या तिच्या वर्गातल्या मुली कशा छान केसांचे भंग पाडायच्या, शाम्पू, पिना, पावडर अशा कशाबद्दल बोलायच्या, पण तिला ते काही माहिती ही नव्हतं आणि त्याबद्दल बोलावसं वाटायचंही नाही. तिच्या लांब वेण्या नको वाटायच्या, गायला नको वाटायचं, सगळ्या जगावर रागवावस वाटायचं.
मग कधी तरी एका मोकळ्या तासाला त्या बाई त्यांच्या वर्गावर आल्या, त्या म्हणे मोठ्या वर्गाना शिकवायच्या. खांद्यापर्यंत रुळतील असे मोकळे सोडलेले कुरळे केस, त्यावर दोन छोट्या पिना, एका पिनेत गजरा माळलेला, आकाशी रंगाची साडी घट्ट चोपून बसवलेली, कपाळावर छोटीशी चंद्रकोर लावलेली. आणि तोंडभर हसू.  तिला त्यांच्याकडे बघतच बसावसं वाटलं. का कोणास ठाऊक तिला त्यांच्याशी नाळ जुळल्यासारखी वाटली. त्या दिवशी त्यांनी वर्गात कविता सांगायला सुरुवात केली, आणि तिच्याही न नकळत तिचा हात वर गेला,जवळ जवळ महिना दीड महिन्यांनी तिला वर्गात काही तरी बोलावसं वाटलं. या नव्या बाई शेतकऱ्यांची कैफियत सांगत होत्या कविता, कथा, अनुभव सारे अनुभव देत होत्या, तिनी एकदम हात वर करून बाई मी काही बोलू का?
आख्ख्या वर्गानं मागं वळून पाहिलं ही आता काय बोलणार, बाई इतक्या छान सांगताहेत आणी आता हिचं काय मधेच, सारा वर्ग तिला शिष्टाम्बिका म्हणायचा. बाईनी तिला बोलायला सांगितलं, मग ती त्यांचे आधीच गाव, तिथल्या मैत्रिणी, त्या कशा शेतात काम करायच्या, त्यांच्या वडिलांना कसा कधीच नीट मोबदला मिळायचा नाही, मग वर्गातल्या एका मुलीच्या वडिलांनी केलेली आत्महत्या, हे सगळं सांगताना तिचा सगळा बांध फुटला. आणि मग ती रडतच खाली बसली, बाईं तिच्यापर्यंत आल्या आणि त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला, त्या स्पर्शामुळे तिला अजूनच आश्वस्त वाटत होतं. त्या दिवशी पहिल्यांदा तिला मोकळ वाटलं. मग हळू हळू सगळंच गाड रस्त्यावर आलं, ३, ४ दिवसात कधी तरी तिला पहिलं न्हाण देखील आलं. आणि मग सगळाच गुंता सुटल्यासारखं वाटलं. ती गायला लागली होती, मैत्रिणी जमवायला लागली होती, कोशातून फुलपाखरासारखी बाहेर पडली होती.  हे गाव, घर , ही शाळा सगळं तिला आवडायला लागलं होतं.
खूप वर्षांनी मुलीसोबत इनसाईड आउट पिक्चर बघताना तिला वाटलं अरे ही तर माझीच गोष्ट आहे, यांना कशी कळली. मीच तर आहे ती मधेच हसणं, खुश होणं विसरलेली मुलगी. मीच तर होते ना अशी सगळ्या भावनांचा गुंताडा करून जगावर रुसलेली मुलगी. आउटसाईड काहीही असलं तरी इन सगळं एकच असतं, सगळ्यांची गोष्ट येऊन जाऊन एकच असते.
तुकाराम म्हणतात तेच खरं आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरू कोटी कोटी, परि अंती ब्रह्म एकले... !!!!!!



संदर्भ : इनसाईड आऊट 
https://en.wikipedia.org/wiki/Inside_Out_(2015_film)
     

Thursday, July 28, 2016

जुनी कोणी तरी

सखे ग ,
धावत ये पूर्वीसारखी,
आणि मार मिठी पूर्वीसारखीच,

जेव्हा,
आपल्या दोघींव्यतिरिक्त जगच नव्हतं तेव्हा,
प्रत्येक क्षण सोबत असावासायचा तेव्हा,

निःशब्दतेतही भगवदगीता सापडायची तेव्हा,
माझ्याआधी तुझं नाव आठवायचं तेव्हा,
फार पूर्वी नाही पण,
आपण पहिल्या प्रेमात होतो तेव्हा,

जेव्हा,
शब्दांचे अर्थ नव्याने कळत होते, तेव्हा,
फुलपाखरांचे रंग आपण चोरत होतो तेव्हा,
आरश्यांची नव्यानं ओळख झाली होती तेव्हा ,
स्वतःच स्वतःला नव्यानं भेटत होतो तेव्हा,

या सगळ्या तेव्हांना भेटायचीस ना तशीच भेट कधीतरी..

आताही भेटतेस तू कधीतरी
पण आता ना
आपल्या जगात तू आणि मी सोडून सगळे असतो,
प्रत्येक क्षणावर नात्यांचे हिशोब असतात,
शब्दांमध्ये अर्थही दडलेले असतात,
बोलतो आपण अर्थाचं पण त्यातून शब्द निसटलेले असतात,

जुन्या प्रेमाच्या कथा कधीच विसरतात,
फुलपाखराचे रंग उडून जातात,
आरसा फसवतो हे लक्षात येतं,
सोबतच्या आठवणीही विरतात

आताही भेटतेस तू त्याच मैत्रिणीच्या हक्कानं
गळ्यातही येऊन पडतेस पूर्वीसारखीच
समोर फक्त मी असले तरी
विचारात मात्र मी नसते.






Sunday, July 24, 2016

कागदावरच प्रतिबिंब

ती तेव्हा एक चौदा पंधरा वर्षाची असावी, घरी कोणी नव्हतं, अभ्यास करून झालेला होता. मोठ्या जबाबदारीनं तिच्यावर घर सोडलं होतं. तिच्या आईचं म्हणणं होतं, ही तर अगदी सद्धी गोष्ट आहे, आपल्या घरात आपल्याला कसली भीती?, त्यामुळे अगदी १० वर्षांची असल्यापासून आई तिला अशी एकटी सोडून जायची, कधी गरज म्हणून तर कधी एक नवीन अनुभव शिकवण्यासाठी. त्यावेळी टीव्ही वर आजच्या सारखं २४ तास कोणी ना कोणी नाचत, बोलत नसायचं, जेवायच्या, झोपायच्या वेळेसारखा टीव्ही पण ठराविकच वेळ असायचा.
त्या दिवशी दुसरं काही करण्याचा मूड नव्हता म्हणून तिला घर आवरण्याची हुक्की आली. अशी फार कमी वेळी तिलिया हुक्की यायची, पण आली तर मग इकडचं घर तिकडं व्हायचं. त्या ही दिवशी तिनी तिच्या कपाटापासून सुरु केलं, कपडे सगळे नीट ठेवून झाल्यावर, आज आई बाबांचे कपाट ही आवरावं असं तिला वाटलं. आईच्या साड्या नीट घडी केलेल्याच होत्या, तिच्या कपाटासारखा सावळा गोंधळ नव्हता तिथं, पण मग साडीच्या कप्प्याच्या खालचा कागद बदलताना तिला तिथं काही दहा , वीस रुपयांच्या नोटा मिळाल्या आणि अगदी हसूच आलं, तिच्या दप्तरात कधी कधी तिला असेच आठ आणे, एखादा रुपया मिळायचा तो ही तिनीच कधी तरी टाकलेला असायचा, पण अनपेक्षितपणे असे पैसे मिळण्यातला आनंद वेगळाच होता. तिच्या या सवयीचं मूळ आता तिला कळल होतं. साड्या नीट लावून झाल्या मग ब्लाऊजचा कप्पा लावता लावता तिला एक पिशवी मिळाली, अगदी उत्सुकतेनं तिनं ते उघडलं, त्यात काही पत्र दिसत होती. खरंतर आई नी खूप वेळा सांगितलं होतं अशी कोणाचीही पत्र, डायरी न विचारता वाचू नये, पण आईच्या कप्प्यात अशी कोणाची पत्र असावीत. ती पण अशी जपून ठेवलेली. तिनी मनातल्या मनात देवाची माफी मागून ती पत्र वाचायला सुरुवात केली. लग्नाच्या आधी तिच्या बाबांनी तिच्या आईला लिहिलेली, ४, ५ पत्रं होती ती. किती वेगळे होते बाबा त्या पत्रांमध्ये, अगदी एखाद्या प्रियकारासारखेच, तिला खूप भारी वाटलं. त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या पेन नी ती पत्रं लिहिली होती, मग कुठे फुलं होती, एका पत्रावर तर मोगऱ्याचे अत्तर लावलेलं होतं, आईला अत्तरं आवडतात हे तिला त्या दिवशी नव्यानंच कळत होतं.
आई वडील म्हणून आपण आपल्या आई वडिलांना अगदी गृहीत धरून चालतो, ते एकमेकांशी किराण सामान, नातेवाईक, मुलं, पाहुणे यावरच बोलत असतील असा आपला ठाम विश्वास असतो, पण मग ते प्रियकर प्रेयसी नसतात का? फक्त समाजानी गाठ बांधून दिली म्हणून एकत्र राहायचं बंधन त्यांनी स्वीकारलं असतं का? हे काही कळण्याचं ते वयही नव्हतं, पण तिला अगदी फुलावर झुलल्यासारखं वाटत होतं.   आई वडिलांना एक वेगळीच ओळख त्या दिवशी होत होती. प्रत्येक गोष्टीत प्रेम शोधण्याचेच दिवस होते ते, आई वडिलांवर अजून जास्त प्रेम वाटायला लागलं होतं.
कोणाला कळायच्या आधीच तिनी तो सगळा मौल्यवान ऐवज परत जशाचा तसा ठेवला, आणि आईचे कपाट लावल्याच्या सगळ्या खुणा मिटवून दिल्या. पण आपण पण आपल्या नवऱ्याला अशी पत्रं लिहायची, आणि त्याच्याकडून लिहून घ्यायची असं तिनी ठरवलं होतं.
प्रेमात पडायचं वय आहे ह्याची सगळीकडून जाणीव झाल्यावर सिने अभिनेते, क्रिकेटपटू असा आसपासच्या तमाम मदनांवर भाळून झाल्यावर तिला कॉलेजमधल्या प्रेमाची आठवण झाली, कोणीतरी आवडणं म्हणजे प्रेम, कोणाबरोबर तरी फिरणं म्हणजे प्रेम, कोणालातरी आपण आवडणं म्हणजे प्रेम, सारखं बघत रहावसं वाटणं म्हणजे प्रेम अशा प्रेमाच्या अनेक व्याख्या अनुभवून होईपर्यंत कॉलेज संपलं होतं, पण हात अजूनही मोकळेच होते.
ठरायच्या वयात लग्न ठरलं, इंटरनेट वरून फोटो पाहिले, एकमेकांशी chat करून मत जाणून घेतली, आणि मग भेटून बोलून सावरून हो म्हणलं. साखरपुडा, लग्न यामध्ये असलेल्या ४, ५ महिन्यात फोन वर सतत बोलणं होतंच, भेटणं तर must होतं. लग्न अगदी आठ दिवसांवर येऊन ठेपल आणि तिला एकदम घरी कपाट बघून आठवण आली आई बाबांच्या लग्नाआधीच्या पत्रांची. अरे हे तर करायचंच राहिलं.  पत्र फक्त परीक्षेत नाहीतर सरकारी ऑफिसमध्ये लिहिली जात होती तेव्हा, पण तरीही तिनी निश्चयान एक तरी पत्र लिहायचा चंग बांधला. काळ किती बदलला होता, बाबा साखरपुड्यानंतर आईला थेट लग्नात भेटले होते, आणि फोन वगैरे तर तेव्हा फक्त चित्रपटांमध्येच दिसायचे. बाबांनी त्यांच्या अपेक्षा, घराच्या माणसांची ओळख असं काय काय लिहिलं होतं पत्रात, पण आता आपण काय लिहायचं, जवळपास रोज त्याला भेटणं होत होते, बोलणं तर स्वतःशी होत नाही इतकं त्याच्याशी होत होतं, मग आता या सगळ्यातून असं उरलेलं काय आहे जे आपण पत्रात लिहायचं? मोठ्ठा प्रश्न घेऊन ती पत्र लिहायला बसली. पण जसं लिहायला सुरु केलं तसं अगदी सहज सुचत गेलं, लिहित राहिली इमेल राहील कॉम्पुटर मध्ये कदाचित जगाच्या अंतापर्यंत मिटणारही नाही, पण त्याला गंध नसणार हाताचा, त्याला स्पर्श नसणार प्रेमाचा. आपली मुलं मोठी झाल्यावर विचारणार नाहीत आपल्याला आपली गोष्ट, आपल्या लग्नाची गोष्ट, किंवा कदाचित आपणच त्यांना सांगू how I met your mother. जगातल्या ९९.९९ % सर्वसामान्यांसारखी आपली सामान्यळू गोष्ट. फोटो जपतात काही खास क्षण तशीच पत्रही जागवतात जुन्या आठवणी, ती मजा नसते इमेल, मेसेज त्यातल्या स्माईलीमध्ये. माझं तुझ्यावरच प्रेम दाखवायचा एक मार्ग असेही समज या पत्राला. अक्षर पुसत होतील, पान पिवळ पडेल, पण पत्राची आठवण मात्र कधीच संपणार नाही...
ती लिहित होती, खूप वर्षांपासून साचलेले, आत मध्ये दाटलेलं प्रेम ती कागदावर उतरवत होती आपल्या पोरांना रोमिओ ज्युलीएट आई बापामध्ये दिसावेत म्हणून लिहित होती.....    


Monday, July 18, 2016

वेण्यांचे झाड


मैत्री म्हणजे हे कळायच्या आधीच किंवा मैत्री हा शब्द उच्चारायच्या आधीपासूनच होती तिची माझी गट्टी. ती माझी आणि मी तिची असा आमचा मंत्र होता तेव्हा. बहिणी म्हणा मैत्रिणी म्हणा, सख्या म्हणा काही फरक न पडण्याचं वय होतं ते. कोणतेही रुसवे फुगवे २ मिनिटांच्या वर न उरण्याचा काळ होता तो. आता वयही वाढलीत आणि निरागसता कधीच हरवलीये, पण तरीही काही हळव्या आठवणी आजही मनात पिंगा घालतात आणि डोळ्यात पाणी आणतात.
मैत्रीण माझी लांब सडक केसांची. मस्त मोठ्या दोन वेण्या मिरवणारी. कमरेपर्यंत रुळणाऱ्या लांब वेण्या हीच खरी तिची ओळख होती. कित्येक क्षण गुंतलेले होते तिच्या त्या लांब वेण्यांमध्ये. कधी व्हायच्या त्या वेण्या शेपूट , कधी असायच्या झाडू, कधी असायच्या ओढण्या, कधी असायच्या जोड साखळी. मोकळ्या केसांपेक्षाही जास्त आवडायच्या त्या वेण्या, अगदी जवळच्या वाटायच्या त्या वेण्या. एखादा मान मिरवावा तश्या मिरवल्या त्या वेण्या तिनी आणि मी ही.....
आज इतक्या वर्षांनंतरही आठवतंय मावशी तिचे केस किती निगुतिनी सांभाळायची.आज असंही वाटतं की तिचे लांब केस बहुदा मावशीचीच हौस होती. शनिवारी वाटीभर तेल सहज तिच्या केसात मुरून जायचं, मग रविवारी शिकेकाईच्या पाण्यानी आंघोळ, ती शिकेकाई डोळ्यात जातीये म्हणून तिचा आरडओरडा, आणि मग केस वाळल्यावर फणीनी ती शिकेकाई काढून टाकणं. अगदी आवडीनं आणि सहज करायची मावशी. आज फणी बघायलाही मिळत नाही, आणि शिकेकाई चे नाव फक्त शाम्पू मध्ये वाचायला मिळत.  
आयुष्याच्या अशाच कुठल्यातरी अल्लड वेळी खेळता खेळता मी तिला म्हणलं,’ जमिनीत बी पुरलं की मग झाड येतं आपल्याला शाळेत शिकवलंय ना, मग आपण तुझी वेणी जमिनीत पुरुयात ना आणि बघुयात काय होतंय ते. त्या वेणीचही कदाचित झाड येईल मग आपण अशी झाडं सगळ्यांना देऊयात. पहिलं झाड मी मला घेणार. दर तीन महिन्यांनी बाबांबरोबर सलून मध्ये जाऊन केस कापून यायचा खरंतर मला कंटाळा यायचा, पण का कोणास ठाऊक ते केस सत्र थांबवण्यासाठी रडावं, नको म्हणावं असेही कधी वाटलं नाही. केस सांभाळण्याची आपली क्षमता मी चांगलीच ओळखून होते त्या मुळे असेल कदाचित, पण तिच्या वेण्या बघून मी खुश होते, त्यामुळे मला केस कापण्याच दुःख नव्हतं, किमान असं आत्ता तरी वाटतं.
मग एक दिवस दोघींनी हिय्या करून ठरवलं आज आपण वेण्यांची झाडं लावायची म्हणून. दुपारची जेवणं झाल्यावर आम्ही दोघी गुपचूप बागेत जाऊन बसलो, मग एक छोटा खड्डा खणला आणि त्यात वेणी पुरली. आणि मग दर ५ मिनिटांनी माती थोडीशी उकरायची आणि बघायचं झाड फुटलं का. तास झाला, दोन तास झाला, पण नवीन वेणीच कुठेच चिन्ह दिसेना, संध्याकाळ झाली, अंधार दाटायला लागला तशी मैत्रीण रडवेली झाली, झाड तर आलंच नाही आणि केसही असे मातीत बरबटलेले.. कसेतरी केस सोडवले त्या चिखलातून. घरी जाताना तिला सोबत म्हणून गेले राणी लक्ष्मीबाईच्या आवेशात, पण वेण्यांकडे, चिखलाकडे पाहिल्यावर लक्ष्मीबाई गळून पडली आणि भित्री राणी तेवढी उरली. मावशी घराचे सगळे रागावतील असे वाटलं, म्हणून ओरडून घेण्यासाठी खोटी कारण काही सांगण्याऐवजी आम्ही सगळी खरी खरी गोष्ट सांगितली आणि त्या सगळ्यांच्या हसू बघून आम्हाला अजूनच रडायला आलं.
त्यानंतर कित्येक दिवस सगळे आम्हाला विचारायचे वेण्यांच्या झाडाबद्दल, वाईट्ट मोठ्या माणसांचा राग येऊन मी म्हणायचे तुमच्या सारखी चिडवणारी, अविश्वासी माणसं असतात ना म्हणून आलं नाही आमचं वेण्यांचे झाड, नाहीतर नक्की आलं असतं.

वर्ष सरली, आणि सरत्या वर्षांबरोबर आम्हीही बदललो, मैत्रीचे संदर्भ बदलले. अंतर वाढली तरी धागा अजूनही कुठे तरी कायम होता. मैत्रीण भेटली त्याच ओढीनं भेटली आणि जाणवलं काहीतरी सुटलंय, गायब झालेल्या वेण्यांनी जणू सोबत नेलं होतं आमचे बालपण. वयात येताना, बाकीच्या सगळ्यांसारख दिसायच्या नादात, तिनीही त्या वेण्यांना टाटा केला होता. 
निरागसतेच्या ज्या जगाला आम्ही निरोप देऊन आलो होतो, त्याच जगात शांत पहुडलेल्या असाव्यात त्या वेण्या. वाट पाहत असाव्यात परत दोन मैत्रिणींची ज्यांच्या चांगुलपणाच्या जोरावर त्या वेण्यांची झाडं येणार आहेत अशा दोन घट्ट मैत्रिणींची. !!!!!!!!!!!!!!!!!!!!!