मैत्री म्हणजे
हे कळायच्या आधीच किंवा मैत्री हा शब्द उच्चारायच्या आधीपासूनच होती तिची माझी
गट्टी. ती माझी आणि मी तिची असा आमचा मंत्र होता तेव्हा. बहिणी म्हणा मैत्रिणी
म्हणा, सख्या म्हणा काही फरक न पडण्याचं वय होतं ते. कोणतेही रुसवे फुगवे २
मिनिटांच्या वर न उरण्याचा काळ होता तो. आता वयही वाढलीत आणि निरागसता कधीच
हरवलीये, पण तरीही काही हळव्या आठवणी आजही मनात पिंगा घालतात आणि डोळ्यात पाणी
आणतात.
मैत्रीण माझी लांब
सडक केसांची. मस्त मोठ्या दोन वेण्या मिरवणारी. कमरेपर्यंत रुळणाऱ्या लांब वेण्या
हीच खरी तिची ओळख होती. कित्येक क्षण गुंतलेले होते तिच्या त्या लांब वेण्यांमध्ये.
कधी व्हायच्या त्या वेण्या शेपूट , कधी असायच्या झाडू, कधी असायच्या ओढण्या, कधी
असायच्या जोड साखळी. मोकळ्या केसांपेक्षाही जास्त आवडायच्या त्या वेण्या, अगदी
जवळच्या वाटायच्या त्या वेण्या. एखादा मान मिरवावा तश्या मिरवल्या त्या वेण्या
तिनी आणि मी ही.....
आज इतक्या
वर्षांनंतरही आठवतंय मावशी तिचे केस किती निगुतिनी सांभाळायची.आज असंही वाटतं की
तिचे लांब केस बहुदा मावशीचीच हौस होती. शनिवारी वाटीभर तेल सहज तिच्या केसात
मुरून जायचं, मग रविवारी शिकेकाईच्या पाण्यानी आंघोळ, ती शिकेकाई डोळ्यात जातीये
म्हणून तिचा आरडओरडा, आणि मग केस वाळल्यावर फणीनी ती शिकेकाई काढून टाकणं. अगदी
आवडीनं आणि सहज करायची मावशी. आज फणी बघायलाही मिळत नाही, आणि शिकेकाई चे नाव फक्त
शाम्पू मध्ये वाचायला मिळत.
आयुष्याच्या
अशाच कुठल्यातरी अल्लड वेळी खेळता खेळता मी तिला म्हणलं,’ जमिनीत बी पुरलं की मग
झाड येतं आपल्याला शाळेत शिकवलंय ना, मग आपण तुझी वेणी जमिनीत पुरुयात ना आणि
बघुयात काय होतंय ते. त्या वेणीचही कदाचित झाड येईल मग आपण अशी झाडं सगळ्यांना
देऊयात. पहिलं झाड मी मला घेणार. दर तीन महिन्यांनी बाबांबरोबर सलून मध्ये जाऊन
केस कापून यायचा खरंतर मला कंटाळा यायचा, पण का कोणास ठाऊक ते केस सत्र
थांबवण्यासाठी रडावं, नको म्हणावं असेही कधी वाटलं नाही. केस सांभाळण्याची आपली क्षमता मी चांगलीच ओळखून होते त्या मुळे असेल कदाचित, पण तिच्या वेण्या
बघून मी खुश होते, त्यामुळे मला केस कापण्याच दुःख नव्हतं, किमान असं आत्ता तरी
वाटतं.
मग एक दिवस
दोघींनी हिय्या करून ठरवलं आज आपण वेण्यांची झाडं लावायची म्हणून. दुपारची जेवणं
झाल्यावर आम्ही दोघी गुपचूप बागेत जाऊन बसलो, मग एक छोटा खड्डा खणला आणि त्यात
वेणी पुरली. आणि मग दर ५ मिनिटांनी माती थोडीशी उकरायची आणि बघायचं झाड फुटलं का. तास
झाला, दोन तास झाला, पण नवीन वेणीच कुठेच चिन्ह दिसेना, संध्याकाळ झाली, अंधार
दाटायला लागला तशी मैत्रीण रडवेली झाली, झाड तर आलंच नाही आणि केसही असे मातीत
बरबटलेले.. कसेतरी केस सोडवले त्या चिखलातून. घरी जाताना तिला सोबत म्हणून गेले राणी
लक्ष्मीबाईच्या आवेशात, पण वेण्यांकडे, चिखलाकडे पाहिल्यावर लक्ष्मीबाई गळून पडली
आणि भित्री राणी तेवढी उरली. मावशी घराचे सगळे रागावतील असे वाटलं, म्हणून ओरडून घेण्यासाठी खोटी कारण काही सांगण्याऐवजी आम्ही
सगळी खरी खरी गोष्ट सांगितली आणि त्या सगळ्यांच्या हसू बघून आम्हाला अजूनच रडायला
आलं.
त्यानंतर
कित्येक दिवस सगळे आम्हाला विचारायचे वेण्यांच्या झाडाबद्दल, वाईट्ट मोठ्या माणसांचा
राग येऊन मी म्हणायचे तुमच्या सारखी चिडवणारी, अविश्वासी माणसं असतात ना म्हणून आलं
नाही आमचं वेण्यांचे झाड, नाहीतर नक्की आलं असतं.
वर्ष
सरली, आणि सरत्या वर्षांबरोबर आम्हीही बदललो, मैत्रीचे संदर्भ बदलले. अंतर वाढली
तरी धागा अजूनही कुठे तरी कायम होता. मैत्रीण
भेटली त्याच ओढीनं भेटली आणि जाणवलं काहीतरी सुटलंय, गायब झालेल्या वेण्यांनी जणू
सोबत नेलं होतं आमचे बालपण. वयात येताना, बाकीच्या सगळ्यांसारख दिसायच्या नादात,
तिनीही त्या वेण्यांना टाटा केला होता.
निरागसतेच्या
ज्या जगाला आम्ही निरोप देऊन आलो होतो, त्याच जगात शांत पहुडलेल्या असाव्यात त्या
वेण्या. वाट पाहत असाव्यात परत दोन मैत्रिणींची ज्यांच्या चांगुलपणाच्या जोरावर
त्या वेण्यांची झाडं येणार आहेत अशा दोन घट्ट मैत्रिणींची. !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment