Wednesday, July 25, 2018

ती आणि त्या ८

ती
माणसाचा स्वभाव नक्की केव्हा कळतो? त्याच्यासोबत जास्तीत जास्त राहिल्याने की  अजून कशाने? मी माझ्या आई वडिलांना ओळखते असे ठाम विधान करूच शकत नाही , आज चाळीस वर्षानंतर ही आई बाबांच्या कोणत्याही निर्णयाची किंवा प्रतिक्रियेची खात्री मला देता येत नाही. हे तसे तर प्रत्येकाच्या बाबतीतच होते, पण सासूच्या बाबतीत जरा जास्तच होते. मी वेगळ्या भाषेतली, वेगळ्या संस्कारातली. त्यामुळे मम्मी म्हणणे हेच पहिले मोट्ठे काम होते. येत जाता वाकणे सतत तोंडावर हसू ठेवणे  बापरे लिस्ट अजून वाढतच जाईल. अमितला पक्का आमच्या सारखा स्वैपाक आवडतो, पण मम्मी आलाय म्हणजे मला रोज कांदा  लसूण  टोमॅटो चे अग्निहोत्र सुरूच ठेवावे लागते. तसे ते दोघे लांब असतात,. आमच्याकडे काही मागत नाहीत. उलट दर वेळी आम्हालाच खूप काही देतात. आयुषी  झाल्यावर तर तिला आणि मला प्रेम , गिफ्टच्या  पावसात बुडवायचे तेवढे बाकी ठेवले होते. अमितच्या आजोबांना बहीण होती आणि  त्यानंतर आयुषीच त्यांच्या घरातली पुढची मुलगी. खरंतर मला मुलगी झाल्यावर माझ्या आई सकट  सगळ्यांनी मला घाबरवून सोडले होते. या लोकांना मुलगाच हवा असतो. बघ आता काय काय बोलतील ते. पण छे  उलटंच  झाले. मला भेटायला आल्यावर मम्मीनी  पहिल्यांदा छातीशी धरले, आणि  म्हणाले, 'बेटी बोल तुझे क्या चाहिये? दुनिया की  सबसे बडी  ख़ुशी नातीन  दी  हैं  तुमने हमें . मला रडायलाच येत होते. तस त्यांनी मला सासू म्हणून त्रास वगैरे दिला नव्हता कधी पण एक अंतर असायचे काहीही करताना. मुलाची पसंती, त्याचा आनंद त्यांनी महत्वाचा मानला  होता. लग्नात मीच खूप अटी  घातल्या होत्या, त्या सुद्धा त्यांनी हो नाही  करत मान्य  केल्या  होत्या.  तक्रारीचे  वादांचे  प्रसंग आई मुलींमध्येही येत असतात मग सासू सूना कशा काय अपवाद राहतील त्याला. पण एकुणात आमचे चांगले चालले होते हे खरे. मम्मी मला दर  वेळी येताना कपडे आणतात त्यांची चॉईस  मला नाही  आवडत. खूप भडक,चकचकीत असते. मी नाही  घालत कधी असले कपडे.  आता दहा बारा वर्षांनंतर  तरी त्यांना समजावे मी कसे कपडे घालते. दर वेळी त्यांनी आणलेले कपडे मी एकदा त्यांच्यासमोर घालते, आणि मग ते कपाटात जाऊन लपून बसतात किंवा आमच्या कामवाल्या ताईकडे. दर वेळी त्यांना हे सांगावे असे वाटते पण मग त्यांचे प्रेम,काहीतरी आणायची इच्छा  बघितली की  वाटते जाऊ देत राहू देत. या वेळी  त्यांनी आयुषी साठी आणलेला लेहेंगा बघून मात्र ती किंचाळलीच . तिच्या  समाधानासाठी म्हणून सुद्धा कधी घालणार नाही असे म्हणाली त्यामुळे मी त्यांना तसे हळूच सांगितले तर भडकल्याचं एकदम, मग मी पण कसे त्यांनी दिलेले कपडे घालत नाही  आणि  मुलीला पण  मीच फूस लावली असे काय काय बोलत राहिल्या. इतक्या वर्षांचे साचलेले एकदम बाहेर येत राहिले. मला रागही येत होता, हसूही  येत होते, पण प्रयत्न पूर्वक शांत राहिले. त्या जे काही बोलल्या त्यातले निम्मे आरॊप होते, आणि ते ही  खोटे होते. मग मी कशाला वाईट वाटून घेऊ. त्यांचा राग शांत झाला तर मी जाऊन बोलेन, एखादा प्रयत्न करेन. अमित यात कुठेच नसतो, त्याचे म्हणणे होते मम्मीइथे राहत नाही  तर तिच्या समाधानासाठी  एकदा घालायचा तिच्यासमोर आणि मग नंतर तू त्याचे काहीही कर तिला काय कळणार  आहे , आज तेच बुमरँग सारखे आले. आणि नेमके आजच आमच्या कामवालीला मम्मीनेच चार वर्षांपूर्वी दिलेला ड्रेस घालून यायची काही गरज होती काआईशी भांडण झाले तर तिच्या आवडीचे काही तरी आणून ते मिटवता येते. बहुतेक आज मला मम्मीसाठी गाजर हलवा करून त्यांचा रुसवा काढावा लागणार.


त्या

खरेतर अमितच्या लग्नाच्या माझ्या खूप अपेक्षा होत्या. मोठा मुलगा, घरातले पहिले लग्न पण या पोराने स्वतःच पोरगी पसंत केली. आमच्या सिमी दीदींच्या महेशने थेट लग्न झाल्यावरच घरी सांगीतले होते, त्यापेक्षा अमितने किमान आम्हाला आधीच सांगीतले आणि आमची अब्रू राखली. तशी पोरगी ठीक ठाकच होती. आमच्यापेक्षा जरा खालचे होते, पण पोराच्या आनंदापुढे सगळे काही माफ केलं. लग्नासुध्दा पोराला, सुनेला हवे तसेच केले, पण हे सगळे करताना आपण हे सगळे पोरासाठी करतोय हे माहित असल्यामुळे मी खूषच होते. तशी ही बहु चांगलीच आहे. घर नोकरी बघते. आमच्या घरचे रितीरिवाज पण लवकरच शिकली. मिक्स झाली आमच्यामध्ये. त्यामुळेच अनीशच्या लग्नात तर कोणाला वाटलेही नाही ही बाहेरची, दुसऱ्या समाजातली आहे म्हणून. आयुषीच्या जन्मानंतर तर मीच जास्त खुश झाले होते. मला मुलगी हवी होती म्हणून मी तीन मुले होऊ दिली, पण मुलगी काही झाली नाही ठीक आहे आपण सुनेलाच मुलगी समजायचे ठरवले होते. या छोट्या परीला काय करू आणि काय नको असे मला झाले होते, आणि तसेच मला आजही वाटते.

मला मुलगी नव्हती म्हणून मी माझी सगळी हौस मौज या सुनांवर करायची ठरवली. म्हणून दर वेळी येताना मी हिच्यासाठी कपडे, आणि काय काय घेऊन यायचे. ही माझ्यासमोर घालून पण दाखवायची पण नंतर ते परत कधीच घातलेली दिसायची नाही. आज तर हद्द झाली मी आयुषीसाठी लेहेंगा आणला होता, तर आयुषीच्या ऐवजी हीच आली सांगायला की तिला असा भडक, गॉडी ड्रेस आवडत नाही म्हणून सांगायला. आणि आजच मला यांच्या कामवालीच्या अंगावर मीच दिलेला एक सूट दिसला आणि माझे डोकेच फिरले. आवडत नाही तर ते आधीच सांगायचे होते, आणि आता मुलीला सुध्दा पट्टी पढवत आहे. मी आणत असलेले महागमोलाचे कपडे असे कामवाल्या बाईला द्यायला नक्कीच नाहीत. कितीही प्रेम करा सून बाहेरची ती बाहेरचीच असते. मी इतका जीव लावला तर तिला येऊन सांगता आले नाही का कधी की मम्मीजी मुझे ये पसंद नही है. सुनेची आई होणे अशक्यच असावे,
मानसी होळेहोन्नुर
  

Wednesday, July 18, 2018

नहप्र, सप्र, अप्र

सार्वजनिक ठिकाणी बसून आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करणे ही म्हणलं तर एक कला आहे, म्हणले तर मनोरंजनाची संधी आहे. विमानतळावर बोर्डिंग पास घेणाऱ्यांमध्ये ओळखपत्र, तिकीटाची प्रिंट हातात घेऊन रांगेच्या पुढे पुढे वेगाने सरकू पाहणारे लोक हे साधारण उशिरा तरी आलेले असतात की नवहवाईप्रवासी तरी असतात. वेब चेक इन करून येणारे हे सराईत प्रवासी असतात. तर हे विमान माझ्यासाठी थांबेलच, मग मी दारे बंद करायच्या अर्धा मिनिट आधी जाऊन पोहोचलो तरी चालेल अशा आविर्भावात असणारे लोक हे अट्टल प्रवासी असतात.
नहप्र हे विमानतळावर त्यांच्या तिकीटावर लिहिलंय त्यापेक्षा अर्धा एक तास आधीच येतात. आपले सगळे सामान वजनमापात आहे ना हे दोन दोनदा बघतात. यांच्याकडे तिकिटाच्या दोन प्रती असतात. एक हरवली तर दुसरी असावी म्हणून. मी विमानाने प्रवास करतोय याचा एक जाज्वल्य अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर असतो. काऊटरवर ते साधारणपणे जरा विंडो सीट वगैरे मागतात. निर्धारित वेळेच्या तास दीड तास आधीच ते त्यांच्या गेटवर जाऊन बसतात. मग तिथेच असलेले एखादे वर्तमानपत्र किवा त्यांनी आणलेलं पुस्तक वाचायला घेत ते दर पाच मिनिटांनी आजूबाजूला नजर टाकत असतात. मध्येच एखादा फेरफटका विमानतळावरच्या दुकानामध्ये मारतात पण तिथल्या किंमती पाहून नकोच म्हणत परत त्यांच्या गेटवर येऊन बसतात. यांना शक्यतो नवीन लोकांशी बोलण्यात रस असतो. नवीन ओळखी काढायच्या असतात, त्यामुळे कोणाच्याही हातातले बोर्डिंग कार्डवरचा सीट नंबर शोधायच्या ते कायम प्रयत्नात असतात. जर हे नहप्र सहकुटुंब प्रवास करत असतील तर मात्र हे विमानतळ माझे घर या आवेशांत त्यांचे वागणे बोलणे चालले असते. विमानात गेल्यावरही आपण पैसे भरून तिकीट घेतले आहे त्यामुळे हे आपले खासगी विमान आहे अशी यांची उगाचच समजूत असते.
सप्र हे आठवड्यातले जास्त तास विमान प्रवासात किंवा विमानतळावर घालवत असल्याकारणामुळे त्यांना विमानतळांची माहिती तिथल्या कर्मचाऱ्याएवढीच असते. सिक्युरिटीचेक मध्ये तेच त्या कर्मचाऱ्याला बघून हसून विचारतात काल वेगळी ड्युटी होती का? त्यांचे हॉटेल्स, खाण्याचे/ पिण्याचे पदार्थ ठरलेले असतात, त्यामुळे अनेकदा त्यांना बघूनच तिथली लोकं बिल टाईप करायला घेतात. हे लोक कधीही चार्जिंग पॉईंट शोधत नाही कारण यांच्याकडे त्यांची पॉवर बँक नेहेमीच असते. विमानतळावर सुध्दा ते त्यांचे लॅपटॉप उघडून काम करत असतात. किंवा फोनवर कोणाशी तरी गंभीर चर्चा करत असतात. विमान किती मिनिट आधी उडते, आपण किती मिनिट आधी काउंटरवर असले पाहिजे याची त्यांची गणिते पक्की असतात, त्यामुळे त्यांचे विमान कधी चुकत नाही आणि वेळही वाया जात नाही. यांच्याकडे लाउंज अक्सेस असल्यामुळे हे शक्यतोवर बाहेरच्या जनतेत मिसळत नाहीत.
अप्र ही जमात पूर्णपणे वेगळीच असते, यात तुमचा अनुभव किती आहे यापेक्षा तुम्ही तुमचा अनुभव किती भासवू शकता हे दाखवणे जास्त महत्वाचे असते. म्हणजे  आपली बॅग २० किलोची आहे हे माहीत असले तरी काउंटरवर जाऊन वजन बघताना अरे यात हे ५ किलोचे सामान कोणी घातले असा भाव आणणे, जड सामानाचे पैसे देण्यास घासाघीस करणे. दोन चार एक्स्ट्राचे टॅग उचलणे. बोर्डिंग पास घेऊन जोवर आपल्या नावाची घोषणा होत नाही तोवर तिथल्याच एखाद्या दुकानात निवांत फिरणे असे अनेक प्रकार करतात. आपल्याला विमान प्रवासाचा अनुभव आहे आणि आपण कसे अनेक विमानतळावरची कॉफी प्यायलो आहोत हे त्यांच्या चेहऱ्यावरून ओघळत असते. त्यातही जर त्यांना एखादा बकरा मिळाला हे ऐकायला तर मग त्यांचा उत्साह कॉफीच्या फेसासारखं बाहेर सांडत असतो. आजवर त्यांची काही विमाने सायलेंट विमानतळावर चुकली असतात, आणि त्याबाबत त्यांनी फेबुवर, ट्विटर वर लिहलंही असते पण तरीही या प्रवासातही विमानात चढणाऱ्या शेवटच्या प्रवाशांपैकी ते एक असतात.
तसे बघायला गेले तर विमानतळ म्हणजे मेल्टिंग पॉट असतात, त्यांना काही स्वतःची ओळख संस्कृती नसते, त्यांना ओळख मिळत असते ती तिथे येणाऱ्या विमानांमुळे आणि प्रवाशांमुळे, अनेक नानाविध प्रकारचे लोक येतात जातात, विमानतळावर घटना घडतात, बिघडतात, ओळखी नव्याने होतात, नाती जुळतात, तुटतात, प्रवाशी कोणत्याही प्रकारचे असले तरी प्रवास महत्वाचा असतो. प्रवासाचे ठिकाण कधीच कायमस्वरूपी नसते, कारण आलेला प्रत्येकजण जाणार असतो, पण आपण तो येणे  आणि जाणे या मधला प्रवास कसा करतो यावर सगळा आनंद ठरलेला असतो. नहप्र, सप्र, अप्र हे तुमच्या आमच्यातच असतात. त्या सगळ्यांना माहीत असते, हा प्रवास आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने तो प्रवास केला पाहिजे, जर सगळ्यांनी एक सारखाच प्रवास केला तर माणसे आणि रोबोट यात काय फरक राहील.
मानसी होळेहोन्नूर 

Wednesday, July 11, 2018

ती आणि त्या ७


ती
अजून लग्न झाले नाही तर हा हाल आहे, लग्न झाल्यावर काय होईल कोणास ठाऊक. तरी बरे संकेत बाहेर असतो, म्हणजे रोज तोंडाला तोंड लागणार नाही. आता माझे लग्न आहे, तेव्हा मी मला काय आवडेल ते घ्यायला हवे की यांना आवडते ते? साड्या प्रकरण मला फारसे आवडतनाही आणि झेपतही नाही. आता झेपत नाही म्हणून आवडत नाही की मुळातच आवडत नाही मला माहित नाही. मुळात खरेदीला मला फक्त संकेत हवा होता, पण या त्याला घट्ट चिटकून आल्याच. उगाच खोटे खोटे हसत मी अरे वाः बरे झाले तुम्ही पण आलात म्हणले पण मनात मात्र तुम्ही कशाला असेच होते.
आता आल्या तर आल्या, स्वतःची, स्वतःच्या बहिणीची साडी निवडून शांत बसावे ना, पण नाही सतत मी माझे. यांच्या लग्नाची गोष्ट मी गेल्या चार महिन्यात पाच वेळा ऐकली आहे. त्यांच्या लग्नातून झालेली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे संकेत. तसा त्याचा लहान भाऊ बरा आहे बाबा पण ठीक आहेत पण ही बाई माझ्या अगदी डोक्यात जाते. कधी कधी वाटते  कशाला हो म्हणाले या मुलाला. लग्न ठरल्यापासून जवळपास रोज फोन. बरे आता २ मिनिटांपेक्षा जास्त काय बोलणार मी, कशी आहे, काय खाल्ले यापेक्षा तिसरे वाक्य काय बोलायचे या बाईशी कळत नाही मला, पण ही मला तिच्या आयुष्याची कथा सांगणार, लेकाला काय आवडते, नवऱ्याला काय आवडते ते सांगणार, मग आमच्या घरात कसं हे मुळीच चालत नाही आवरा... कधी कधी तर घरी असताना फोन आला की मी सरळ आईकडेच देऊन टाकते, तिचा आणि माझा आवाज सारखाच आहे, मग नंतर आई आई बनून पण त्यांच्याशी गप्पा मारते. मला गप्पा मारायला आवडत नाही असे नाही, पण कोणाशी काय बोलावे हे माझ्या भावी सासू बाईंना कळत नाही त्याचा जास्त त्रास होतो.
आता मला आवडलेली साडी २५००० ची होती, बरं ही साडी आमच्याच कडची होती, तरी त्यांचे लगेच सुरु झाले, अग तू काही फार साड्या नेसत नाही मग कशाला इतकी महाग मोलाची साडी घेतेस, जरा कमीचीच घे की, पैशावरून बोलणे झाले की, रंगावर . तू गोरी तुला गडद रंग छान दिसेल, हा फारच हिरवट आहे, हे कॉम्बिनेशन संकेतला आवडत नाही, हो ना रे? बिचारे लेकरू सँडविच होऊन बसले होते. मग शेवटी मी त्याला मेसेज केला, आणि त्याच्या तोंडून मला आवडलेली साडी छान आहे हे वदवून घेतले तेव्हा सासुबाईंचा चेहरा पाहणे लायक होता, न राहवून त्य बोलून पण गेल्या, तूच म्हणतोस ना लाल रंग तुला आवडत नाही, त्याने काहीतरी कारण देऊन बोळवण केली.
आता माझे लग्न आहे, माझी आवड हौस मौज मला महत्वाची वाटणारच ना, एकदाच होणारी ही गोष्ट केले थोडे फार पैसे खर्च तर काय बिघडते. यांच्या आवडीच्या साड्या मी माझ्या लग्नासाठी का घेऊ? माझ्या लग्नासाठी अर्थात मी माझ्या आवडीच्याच साड्या घेणार, भले त्या मी नंतर घालेन की नाही, तो वेगळा प्रश्न असेल.


त्या
संकेत चे लग्न ठरले आणि  मलाच टेन्शन आले. तसे ते दोघेही बाहेरच राहतील, वर्ष दोन वर्षांनी काही दिवसांसाठी येतील पण तरीही घरात एक नवीन माणूस येणार म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलणारच ना.
मी घरातली मोठी सून त्यामुळे माझ्या सासुबाईंनी मला अक्षरशः प्रत्येक गोष्टीला तयार केली होती. लग्नानंतर साधा वरण भाताचा स्वैपाक यायचा मला, पण आता मात्र चारीठाव स्वैपाक करून वाढते. मला आपली लेकीची हौस होती, पण दोन्ही पोरगेच झाले, तेव्हाच ठरवले सुनेला अगदी मुलीसारखे वागवायचे. त्यामुळे संकेतचे लग्न ठरवताना पण मी मला आवडलेल्या मुलीच फक्त संकेत पर्यंत पोहोचवत होते, त्यातल्या त्यात ही स्नेहा मला हसरी छान वाटली होती, दोघांची पसंती झाली आणि मलाच जास्त आनंद झाला.
मग काय लग्नाच्या आधीच मी तिला जरा जरा आमच्या सगळ्यांच्या बद्दल माहिती दिली, म्हणजे नंतर तिला काही जड जायला नको. आमच्या घरातल्या लोकांच्या सवयी तिला माहिती असल्या तर तिला ही लोकं आपलीशी करायला मदत होईल म्हणून. ही बोलते फोनवर पण का कोणास ठाऊक बाई माझ्यासारखी मोकळी होऊन बोलत नाही. आमच्या सासूबाईंपुढे बोलायची आमची टाप नव्हती आता मीच स्वतःहून हिच्याशी बोलतीये तरी ही मोकळी होत नाही. या पोरींचा प्रॉब्लेम काय आहे कळत नाही.
आता साडी खरेदीची गोष्ट, संकेतला बोलावले तिने, त्याला काय कळते त्यातले, म्हणून मग मीच म्हणाले मी पण येते तुझ्याबरोबर. तर मला बघून एकदम म्हणाली, ‘तुम्ही पण’. सरप्राईझ ग, तसेही या ठोम्ब्याला काही कळत नाही साड्यामधले म्हणून मीच आले. आमच्या  नेहेमीच्या दुकानात जाऊ म्हणले तर तिने आधीच दुकान ठरवले होते, त्या दुकानातल्या साड्या जरा महाग होत्या, सांगीतले मी तिला तर लगेच चेहरा पाडून म्हणाली, लग्न एकदाच होते हो, झाला थोडा खर्च तर चालेल ना. आता ही फारशी काय साड्याच नेसत नाही मग कशाला घ्यायच्या महागमोलाच्या साड्या, पण नाही हौसेला मोल नाही म्हणतात तेच खरे, रंग तर काय उचलत होती, एक पण साडी आम्हाला दोघींना आवडत नव्हती, मला आवडली तर हिला नाही, आणि तिला आवडली तर मला नाही. शेवटी एका साडीवर संकेत म्हणाला, मस्त आहे घेऊन टाक. आणि मी माझ्या पोराकडे बघत राहिले, लाल रंग कधीच न आवडणारा माझा लेक, बायकोला चक्क लाल रंगाची हिरव्या काठाची साडी मस्त दिसेल तुला म्हणत होता.
लग्नानंतर मुले बदलतात बघितले होते, पण हा तर लग्नाआधीच बदलला होता. बरे आहे हे दोघे लग्नानंतर बाहेर असतील म्हणजे मला हे असे धक्के रोज रोज बसणार नाहीत, अधून मधून बसतील.
मानसी होळेहोन्नुर   

Wednesday, July 4, 2018

वळणाचे पाणी


सहावी अ च्या वर्गातल्या चिमण्या नुसत्या चिव चिव करत होत्या. हा वर्ग आख्ख्या शाळेत बडबडा म्हणून प्रसिद्ध होता. हर प्रकारे या वर्गाला समजावून, धमकावून, शिक्षा देऊन झाले होते. पण तरीही चिवचिवाट मस्ती काही कमी व्हायची नाही. त्यामुळे सगळे जुने अनुभवी शिक्षक त्यांचा अनुभव पणाला लावून हा वर्ग सांभाळायचे. अति हुशार मुलांचे पाणी जरा नीट वळवायची गरज होती.  

वर्गात कोणी शिक्षक यायला दोन मिनिटांचा उशीर झाला की संपले या चिमण्या आणि चिमणे बडबड करायला लागलेच म्हणून समजायचे.
‘अग आपल्या मराठीच्या पाटील बाई आता येणार नाहीत.’
‘त्यांना बाळ होणार आहे ना? मला माझ्या ताईने सांगितले’
‘मग आता आपल्याला मराठी कोण शिकवणार? काळे सर? नको बाबा. ते शिकवतात कमी ओरडतात जास्त.’
‘नाही नाही एक नवीन बाई येणार आहेत.  एकदम छान आहेत दिसायला, डिट्टो माधुरी, केस पण तसेच कुरळे आहेत. ‘
‘तुला कसे हे सगळे कळते ग?’
‘अग मी काल स्टाफ रूम मध्ये गेले होते तर तीच चर्चा चालली होती आपल्या बाकीच्या बाईमध्ये म्हणून मला कळले.’
एक चिमण्यांचा थवा त्यांच्या आकाशात विहरत होता.
‘अरे तू कालची मॅच पाहिलीस ना? अजय जाडेजा काय भारी खेळला ना?’
‘छोड रे चुकून काल चांगला खेळला तो, माझा दादा म्हणतो तो वशिल्याचे तट्टू आहे, पण म्हणजे काय ते मला कळलेच नाही.’
‘कोणी आले नाहीये वर्गावर तोवर चल विमान करू, कोणाचे लांब जाते बघू?’
‘ज्याचे लांब त्याला एक पेप्सीकोला मधल्या सुट्टीत.’
‘चालेल.’
चिमणेसुध्दा चिवचिवाट मागे नव्हते.
ठप ठप एकदम वर्गात डस्टर मारायचा आवाज आला.
जेमतेम २२, २३च्या आसपास असलेल वय,  उंच, कुरळ्या केसांची, साडी नव्हे तर चक्क पंजाबी ड्रेस घातलेली एक बाई वर्गावर येऊन थांबलेली होती, एक हलका मंद वास सुद्धा होता त्यांच्या येण्याबरोबर वर्गात पसरला होता.  

सगळा वर्ग एकदम फळ्याकडे बघायला लागला होता. त्याचबरोबर त्यांच्या टेबलवर त्यांचे स्वागत करणारे एक विमान पण.
‘मी उर्मिला तुमची नवीन मराठी टीचर. आणि हो मला हे विमान आवडले, ज्या कोणी केले आहे तो मला प्लीज शिकवेल का हे कसे करायचे’
तोवर शाळेत फक्त बाई आणि सर म्हणायचे असते, फार तर फार शिक्षक असे संबोधन होते, आणि यांनी आल्या आल्याच टीचर सांगितले. मस्ती करणाऱ्या मुलाला शिक्षा वगैरे सोडून विनंती हे पाणीच वेगळे होते.  

रंग गव्हाळ आणि गोराचा मधला होता, केस खरेच माधुरीसारखे कुरळे होते, डोळे अगदी मोठ्ठे पाणीदार होते, की काजळ लावून मोठे केले होते कोणास ठाऊक. हिरवा कुर्ता आणि गुलाबी रंगाची सलवार आणि ओढणी घेतली होती. ओढणी छान पिन अप केलेली होती. हसताना एका गालावर खळी पडायची. शाळेत तोवर सुंदर दिसणाऱ्या शिक्षिका नव्हत्या असे नाही पण त्या सगळ्या साडीमध्ये येणाऱ्या आई काकू टाईप वाटायच्या, या टीचर मात्र मोठी ताई असल्यासारख्या वाटल्या.  आवाज सुध्दा अगदी नाजूक पण गरजेच्या वेळी जोरात व्हायचा.
‘अय्या किती छान आहेत ना या बाई दिसायला.’
चिमण्यांची कुजबुज सुरु झाली.
‘अरे ही माधुरी दीक्षित तर चिडलीच नाही, उलट मला विमान शिकवा म्हणाली, आता काय करायचे.’
चिमणे काही मागे नव्हते.
बाईंनी कुठलीशी कविता शिकवायला सुरुवात केली, त्यांच्या आवाजात चालीवर म्हणताना वर्गातला प्रत्येक जण अगदी गुंगून गेला होता.  या आधी कोणी अशी चाळीत कविता शिकवली नव्हती असे नाही पण वयाचा, आवाजाचा की आणखीन कशाचा माहीत नाही पण वर्ग पूर्णपणे त्या नव्या शिक्षिकेला शरण गेला होता एवढे नक्की. धडे म्हणजे गोष्टीच असतात फक्त ते गोष्टी सारखे वाचून दाखवावे लागतात. आपली भाषा आपल्या ओळखीची असते पण त्यातले साहित्य नाही ही गोष्ट नव्याने समोर येत होती.

मराठी शिकवणाऱ्या या मॅमला चक्क इतिहास शिकवायला सुध्दा सांगीतले, आणि मुले खुश झाली या अजून एका विषयाला येणार म्हणून आणि बाकीचे शिक्षक आता यांचा इतिहास कसा करतात मुले बघू म्हणून खुश. पण इतिहास हा काही फक्त सन सनावळ्यामध्ये नसतो तो घटनांमध्ये असतो हेच त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि अनेकांचा इतिहास आवडता विषय झाला.

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात विश्वास, आदर याशिवाय मैत्रीचे ही नाते तयार होत होते. त्यांच्याशी गट्टी होऊन एका चिमणीने तर त्यांना चक्क तिची स्लॅम बुकच भरायला दिली त्यांना. त्यांनी पण तिचा मान राखत त्यातल्या बोबड्या बालिश प्रश्नांची उत्तरे दिली. मराठी हा विषय इतका रंजक असू शकतो हे सगळेच जण नव्याने शिकत होते. उर्मिला मॅम हो, त्यांना बाई म्हणून कसे चालेल, त्या मॉडर्न मॅम होत्या, शाळेत पंजाबी ड्रेस , गॉगल लावून येणाऱ्या सेंट मारून येणाऱ्या मॅम.

एक धरणग्रस्तांची कविता शिकवता शिकवता त्या त्यात इतक्या गुंगून गेल्या की वर्गातल्या सगळ्यांचे डोळे पाणावले. आजवर धरण म्हणजे मजा वाटणाऱ्या सगळ्यांना धरणाची खोली, त्याचे पायाचे दगड बोचले होते. अशाच एका फ्री पिरेडला त्यांनी त्यांची कविता म्हणून दाखवली आणि वर्गातल्या एका चिमणीने जाऊन त्यांना थेट विचारले, ,’ कविता कशी करतात?’
त्यावर त्यांनी हसून उत्तर दिले, ‘ मनात जे येतं ते कागदावर उतरवायचं,  कधी शब्द जुळून येतात तर कधी भावना व्यक्त होतात. लिहायची उर्मी सच्ची असेल तर त्याची कविता, कथा नक्कीच होते. आणि हो महत्वाचे म्हणजे स्वतःसाठी लिहायचं. शब्द म्हणजे दुसरे तिसरे काही नसतात आपलेच सखे सोबती असतात, त्यांच्याबरोबर बोलायला , खेळायला ,भांडायला यायले लागले की बास.’
ज्या शिक्षिकेच्या जागी त्या आल्या होत्या त्या शिक्षिका परत आल्या. शाळेत तात्पुरते आलेलं हे वादळ पण गेलं. पण जाताना काही चांगल्या आठवणी ठेवून गेलं.

नुसते एक अडलेलं पाणी त्यांनी वाहते केले होते असे नाही तर  ४०, ४५ जणांची एक तुकडी त्यांनी वळणावर आणून ठेवली होती. मुला मुलींच्या कोणत्याही प्रश्नांना नाही, नको चा पाढा न लावता त्यांनी उत्तरे दिली होती. शिक्षक कसे शिकवतात, किती वर्ष शिकवतात, यापेक्षा काय शिकवतात हे नेहेमीच लक्षात राहते. तो वर्ग, ती चिमणी त्या वळणावरून इतके पुढे गेले, की मागचे सारेंच धूसर झाले. आठवणी राहिल्या पण त्याही धुक्यात विरलेल्या. कदाचित ती चिमणी मीच असेन किंवा नसेन, कदाचित माझ्याच आयुष्यात असेच काही घडल असेल किंवा नसेलही. पण लिहायची उर्मी सच्ची असेल तर त्याचे साहित्य होते एवढे मात्र नक्की. 
  
मानसी होळेहोन्नुर