Monday, November 15, 2010

प्लीज साइन इन!


काही वर्षांपूर्वी एका गाजलेल्या चित्रपटात संवाद होता, ‘इस वल्र्ड में दो ही
टाईप के लोग होते है, एक ‘बनाने’वाले और दुसरे ‘बिगाडने’वाले. आता हाच संवाद थोडासा बदलून म्हणता येईल, ‘इस वल्र्ड में दो ही टाईप के लोग होते है, एक ‘सोशल नेटवर्किंग साइट्स’ देखनेवाले और दुसरे ‘सोशल नेटवर्किंग साइट्स नहीं देखनेवाले.’

पूर्वी चार लोक जमले की चर्चा व्हायची ती हवा-पाण्याची. वयोमानानुसार किंवा स्त्री-पुरुष अशा फरकाने शाळा, कॉलेज, राजकारण, घर-संसार, सासू असे विषय चर्चेत असायचे. पण आता मात्र चार लोक भेटले की आधी चौकशी करतात ती facebook, orkut बद्दल. किंबहुना दोन बिल्डिंगपलीकडच्या घरात आज ‘भरले वांगे’ आहे किंवा ‘आत्याच्या दिराच्या मुलाचे लफडे आहे’ किंवा ‘शाळेतल्या वर्गमैत्रिणीला मुलगा झाला’ अशा बातम्या पूर्वी गप्पांमधून कळायच्या, आता मात्र त्या कळतात facebook वरच्या वॉलवरून किंवा orkut वरच्या स्टेटस अपडेटवरून! Twitter हाही त्यातलाच एक प्रकार, फक्त थोडय़ाशा वेगळ्या वळणावरचा!

‘सोशल नेटवर्किंग साइट्स’ या गोंडस नावाखाली अमेरिकेमध्ये या वेगवेगळ्या प्रयोगांना सुरुवात झाली. या दशकाच्या सुरुवातीला ‘फ्रेडस्टर ही सोशल नेटवर्किंग साइट गुगलला विकत घ्यायची होती, पण तो सौदा फसला म्हणून ‘ऑर्कुट’ जन्माला आले. ही गोष्ट २००२ सालातली. ३० जानेवारी २००४ पासून आजतागायत ‘ऑर्कुट’ आपली लोकप्रियता टिकवून आहे. सुरुवातीला फक्त ‘आमंत्रण’ असेल तरच तुम्ही सभासद होऊ शकत होता. आता मात्र तशी काही अट नाही, पण वयाचे बंधन नक्कीच आहे. ऑर्कुटचे सभासद होण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे. (किमान आपली जन्मतारीख ‘त्या पद्धतीने’ सांगणे गरजेचे आहे!) भारतामध्ये ऑर्कुट येऊन चार-पाच वर्षे होऊन गेली असल्यामुळे त्याने चांगलेच बाळसे धरले आहे. किंबहुना ऑर्कुटवर ओळख होऊन लग्न ठरणे, हीदेखील आता कुतूहलाची बाब राहिली नाही.

खरं तर स्क्रॅप म्हणजे कचरा! परंतु ऑर्कुटवर स्क्रॅप म्हणजे एकमेकांना संदेश पाठवणे. ऑर्कुटवर आपण आपल्या ‘प्रोफाईल’मध्ये आपले स्क्रॅप सगळ्यांना दिसावेत की नाही हे ठरवू शकतो, पूर्वी मात्र कोणीही कोणाचेही स्क्रॅप वाचू शकायचे. ऑर्कुट काय किंवा फेसबुक, Hi5, ट्विटर काय सगळीकडे जे ‘प्रोफाईल’ असते, ते म्हणजे आपली ओळख जगासमोर मांडणे! आपल्या स्वत:च्या आयुष्यातला झरोकाच म्हणता येईल त्याला. म्हणजे जे पहिल्यापासून ओळखतात त्यांना ओळख पटावी आणि जे कोणी नवे मित्र-मैत्रिणी असतील त्यांना ओळख व्हावी हा उद्देश. मग त्यात स्वत:चा फोटो, आवडीनिवडी, शाळा, कॉलेज, नोकरीचे ठिकाण इ. माहिती टाकून स्वत:च्या प्रोफाईलमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणता येते. आता ही माहिती किती खरी, खोटी हा पूर्णत: वैयक्तिक प्रश्न आहे. माहितीची पडताळणी शक्य नसल्याने फसवणुकीचे प्रकार ऑर्कुटवर सर्रास आढळून येतात. फेक प्रोफाईल तयार करणे, चुकीची माहिती देणे, दिशाभूल करणे, फसवणूक करणे याबाबत ऑर्कुटवर भारतात कायदेशीर खटलेदेखील भरले आहेत. ऑर्कुटवर वेगवेगळ्या ‘कम्युनिटीज’ असतात. ज्यांचा साधा अर्थ विशिष्ट विषयाशी संबंधित गप्पा मारण्याची, अधिक माहिती मिळवण्याची जागा, असा होतो. ब्राझिलखालोखाल भारतात सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जात असलेल्या ऑर्कुटची लोकप्रियता सध्या भारतातही उतरणीला लागली आहे. त्यामुळे 'Bye Bye Orkut, Welcome facebook' हे अनेकांचे ऑर्कुटवरचे ‘स्टेटस’ सध्या बघायला मिळते. वरवर बघायला गेले तर ऑर्कुटवर मित्र-मैत्रिणींशी संबंध हे जास्त वैयक्तिक पातळीवर ठेवता येतात. मित्र-मैत्रिणींमध्ये जवळचे, ओळखीचे, नातेवाईक अशी वर्गवारी करता येते. एखाद्याबद्दल आपल्याला काय वाटते ते सांगता येते; परंतु मोबाइलचा जमाना आल्यावर पेजर जसे मागे पडले, तसेच facebook आल्यावर ऑर्कुट मागे पडले आहे.

काही दिवसांपूर्वी एक विनोद सगळीकडे लोकप्रिय होत होता. एक मरणासन्न आजी आपल्या नातीला जवळ बोलावून सांगते, ‘पोरी, मी आता मरायला टेकली आहे, पण मरण्यापूर्वी तुला सांगायचे होते, मी मेल्यावर माझं शेत, बैल, गाई, म्हशी यांची काळजी घेशील ना? थोडीबहुत पिकेही मी काढली आहेत!’ नातीला भयंकर धक्का बसतो, ‘पण आजी, आहे कुठे तुझी जागा? आम्हाला कोणालाच याबद्दल माहीत नाही, नात विचारते. त्यावर ती म्हातारी म्हणते, ‘अगं फेसबुकवरच्या फार्मव्हिलेमधल्या माझ्या शेतीविषयी बोलत आहे मी.’ फेसबुक, आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय होण्याचे एक महत्त्वाचे कारण, त्यावरचे ‘गेम्स’ आणि ‘अ‍ॅप्लिकेशन्स’ आहेत. (मुद्दाम गेम्स आणि अ‍ॅप्लिकेशन्स ठेवले आहे, नाहीतर साराच ‘खेळखंडोबा’ व्हायचा.) फार्मव्हिले, फिशव्हिले, व्हॅम्पायर वॉर, आयटी गर्ल्स, माऊसहंट असे अनेक वेगवेगळे खेळ तिथे खेळता येतात. ‘सोशल नेटवर्किंग’ म्हणजे फक्त मनातले बोलायचेच नसते तर दोन-चार मौजेचे क्षण, निवांत क्षणही हवे असतात. कधी अशा व्हर्चुअल खेळांमधून पुन्हा बालपणीचा, तरुणपणीच्या आठवणी ताज्या होतात. तरीही फेसबुक ही मूलत: सोशल नेटवर्किंग साइटच, एखाद्या चाळीप्रमाणे! चाळीत कोणाकडे कोण येतो-जातो, काय स्वयंपाक होतो, भांडणे होतात हे जसे सगळ्यांना कळते तसेच फेसबुकवर तुमचे मित्र-मैत्रिणी काय करत आहेत, म्हणत आहेत. कुठे जाणार आहेत, त्यांनी कुठे फोटो काढले. अशी सगळी माहिती (फोटोंसह) तुम्हाला मिळते. तुमच्या स्वत:च्या भिंतीवर (wall) तुम्हाला हवं ते खरडू शकता, मनातला सल, आयुष्यातला आनंद, प्रतिक्रिया काहीही लिहू शकता. जगातल्या दर चौदा माणसांमधला एक फेसबुकवर असतो, इतक्या मोठय़ा प्रमाणात हे जाळं जगभर पसरलेलं आहे. यावर जसे जुने मित्र-मैत्रिणी भेटू शकतात तसेच सेलेब्रिटी आपले मित्र-मैत्रिणीसुद्धा होऊ शकतात. पाकिस्तान, चीन, व्हिएतनाम, इराण, उत्तर कोरिया या देशांनी मात्र फेसबुकला हद्दपार केले आहे. फेसबुकबद्दल बोलताना असे नेहमीच म्हटले जाते, ‘जे तुम्हाला बोलायचे आहे, पण बोलता येत नाही किंवा कुठे बोलावे हे उमगत नाही, त्यांच्यासाठीचे ते व्यासपीठ आहे.’ प्रत्येकाला याच्या वर्तुळातील मित्र-मैत्रिणींची माहिती देण्याच्या सुविधेचे ‘पेटंटही’ फेसबुकने मिळवलेले आहे. कदाचित भविष्यात त्यावरून फेसबुक, ट्विटर आणिोत्सम साइट्समध्ये वादही होतील!

सध्या चलती असलेलं दुसरं नाणं आहे ‘ट्विटर’. मुळात त्याची संकल्पना ही काही मित्रांच्या एसएमएस ग्रुपमधून जन्माला आली. ‘सोशल नेटवर्किंग’पेक्षाही ट्विटर प्रसिद्ध आहे ती मायक्रोब्लॉकिंगसाठी! फेसबुक, ऑर्कुटवर लिहिण्यासाठी शब्दसंख्येचे बंधन नाही. मात्र, ट्विटरची मूळ संकल्पनाच रटर मधून आलेली असल्याकारणाने तिथे आपले म्हणणे १४० अक्षरांमध्ये मांडण्याचे बंधन असते. त्यामुळे त्याचा वेग आणि सहजता जास्त आहे, असे अनेक ट्विटकरांना वाटते. मुळात ट्विटरवर असणे, ट्विट करणे हे आपल्याकडे गरजेपेक्षा फॅशन झाली आहे. आवडत्या नट- नटींना, राजकीय नेत्यांना follow करायचे या भावनेनेही अनेक जण ट्विटरवर असतात. मुळात भारतातच नव्हे तर जगभरात सगळ्यांनाच इतरांबद्दल, त्यातही प्रसिद्ध लोकांच्या खाजगी आयुष्याबद्दल चघळून बोलायला आवडते. ट्विटरवर जेव्हा कोंकणा सेन-शर्मा आपल्या लग्नाबद्दल सांगते किंवा अमिताभ एखाद्या विषयावर प्रतिक्रिया देतो; तेव्हा ही माणसे हे आपल्याला सांगताहेत किंवा जगाला कळण्याआधी हे मला माहिती होते आहे, असा एक सुप्त आनंद होतो. ट्विटर हे संवाद वाढवण्यापेक्षा बोलण्याला, माहिती सांगण्याला जास्त महत्त्व देते.

प्रस्तुत लेखात जरी मुख्यत: ऑर्कुट, फेसबुक, ट्विटरविषयी सांगितले असले तरी याव्यतिरिक्त Hi5 (हायफाईव्ह), फ्रेडस्टर, मायस्पेस, निंग अशा अनेक सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत. प्रामुख्याने या तीन साईट्स विषयीच बोलण्याचे कारण म्हणजे या तीन चांगल्या पक्क्या रुजल्या आहेत. मुळात संवाद ही माणसांची प्राथमिक गरज आहे. संवाद साधण्यासाठी भाषेचा शोध लागला, मग तेही पुरेसे वाटले नाही म्हणून नंतर लिपी आली. आणि मग संपर्काची, संदेशवहनाची वेगवेगळी माध्यमे शोधून काढली गेली. पत्र, ई-मेल, पेजर, मोबाइल, एसएमएस असे किती वेगवेगळे मार्ग, पण ईप्सित एकच, एकमेकांशी संवाद!

‘तुका म्हणे आम्हावरी जो रुसला,
त्याचा अबोला आकाशासी!’

संवादाशिवाय माणूस जगू शकत नाही. आपण समाजात एकमेकांना ‘धरून राहतो’ कारण कितीही एकटेपणाची ओढ असली तरीही त्या एकटेपणाचे मूक साक्षीदार तरी हवेच असतात. पुलं म्हणाले होते त्याप्रमाणे मुंबई, पुणे, नागपूर ही तीनच गावे अशी आहेत ज्यांच्यापुढे कर जोडून विचारावे, ‘तुम्हाला कोण व्हायचे’ मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?’ तसेच या इंटरनेटच्या जमान्यात ऑर्कुट, फेसबुक की ट्विटर यापैकी कोणाचे ‘साईन इन’ करायचे हे मात्र शेवटी तुम्हीच ठरवायचे आहे!

Tuesday, June 22, 2010

पुस्तकाचा कोपरा : पावसाच्या मैफलीत.. गावझुला

पाऊस जेव्हा संततधार लावून काहीतरी सांगत असतो तेव्हा आपण मूकपणे ते ऐकण्याचे काम करायचे असते. सोबतीला फक्त घ्यायचे असते एक जीवाभावाचे पुस्तक आणि मग ऐटीत जमवायची असते मैफल तिघांची, पुस्तक आपण आणि पाऊस! या अशा मैफिलीसाठी सोबत लागते ती जरा वेगळ्या पुस्तकांची, म्हणजे जीवनानुभव सांगणारे लघुनिबंध, कविता तत्सम पुस्तकांची. कारण एका पानावरून दुसऱ्या पानाकडे वळताना क्षणभर आपल्याला एका सरीवरून दुसऱ्या सरीकडे जाणाऱ्या पावसालाही सोबत करायची असते. श्याम पेठकरांचे ‘गावझुला’ हे पुस्तक अशी मैफल जमण्याची खात्री देणारे पुस्तक आहे.

साप्ताहिक ‘लोकप्रभा’मधल्या सदराचे हे पुस्तकरुप. त्यातील लेख हे सारे आहेत ललितबंध. (या ललित निबंधासाठी लेखकानेच ललीतबंध हा सुंदर शब्द वापरलेला आहे) कधीकधी पूर्ण पुस्तक सलगपणे वाचायला वेळही नसतो आणि इच्छाही. कुठलेही पान काढून स्वत:ला त्या पानांमध्ये बुडवायचे असते. ‘गावझुला’ ती गरज पूर्ण करतं. हे पुस्तक, यातले ललितबंध हे मुळीच हलकेफुलके, वाऱ्याच्या झुळकीसारखे उडून जाणारे नाहीत. ते वाचून विरून जात नाहीत, ते उद्युक्त करतात याचा विचार करायला. किंबहुना गोष्टींचा सुसंगतपणे विचार करायला भाग पाडतात. गावागावातून प्रवास करणाऱ्या बैराग्याचे अनुभव हे फक्त त्याचेच राहात नाहीत ते वैश्विक होऊन जातात. कित्येकवेळा लेखकाने बैराग्याच्यामाध्यमातून रुपककथाही मांडल्या आहेत. इतिहास, पुराणकथांचाही सर्वसामान्यांच्या नजरेतून दिसणारा आकृतीबंध मांडून मग वाचकांनाच पेचात टाकले आहे, वेगळा विचार करण्यास भाग पाडले आहे। नावावरून जाणवतं तसं यात गाव आहे किंवा असंही म्हणात येईल की अनेक गावे आहेत.

वाचताना अनेकवेळा प्रश्नही पडून जातो; बैराग्याचा हा प्रवास दोन गावांमधला आहे की, दोन मनांमधला? ‘पावलं नेहमीच प्रश्नात अडकलेली असतात, म्हणून त्यांचा आकार प्रश्नचिन्हासारखा असतो’ हे अफलातून निरीक्षण. किंवा ‘सुरक्षेच्या परिघातले जगणे म्हणजे स्वातंत्र्य समजतो आपण किंवा ‘या जगातली सगळीच नाती शरीरसंबंधातून किंवा शरीरसंबंधांसाठी निर्माण झालेली असतात. मित्र हे एकमेव मनाचं मनाशी असलेलं नातं आहे,’ ही वाक्ये फक्त पुस्तकातली राहात नाहीत, ती मनाचा ठाव घेऊन आत आत रुंजी घालत राहातात. त्यांना प्रतिभेचा स्पर्श आहे. यासारखी अनेक वाक्ये, अनेक विचार या पुस्तकात भेटतात, पण तरीही जाणवतं की हे पुस्तक आडवळणाने जरासे अध्यात्माच्या वाटेकडे जाणारे आहे. हे पुस्तक पूर्णपणे वैचारिकही म्हणता येत नाही आणि पूर्णपणे तत्वज्ञानात्मकही म्हणता येत नाही.

प्रत्येकाला ते वेगळं भासू शकतं. कोणाला ते जडही वाटू शकतं तर कोणाला ते आत्मसंवादाचे माध्यम वाटू शकतं. वस्तुत: यातल्या सगळ्या लेखांना ललितबंध असं नाव दिलेलं आहे. ललितलेख हे सहज-सरळ दीर्घ रस्त्यासारखे असतात, त्यात एखाद-दुसरं वळण असू शकतं आणि ते आजुबाजूच्या सर्वाचा, निसर्गाचा हात हातात घेऊन चालतात. या पुस्तकातले लेख हे मात्र सरळ रस्त्यासारखे नाहीत ते आहेत घाटातल्या वळणावळणाच्या रस्त्यांसारखे. काहींना त्यात रोमांचक अनुभव येतील तर काहींना शांतपणे डोळे मिटून हा प्रवास करावासा वाटेल.

लेखकाच्या अनुभवाच्या मर्यादांची कुंपणे अशा लेखांना आपसूकच पडतात, तशीच विषयांचीही. अनेकवेळा लेखांमधला शाब्दिक फुलोरा बाजूला सारला तर तेच ते परत वाचल्यासारखे वाटते. त्याचे कारण हेच असावे. विदर्भातले असल्यामुळे नकळत काही लोभस वैदर्भीय शब्द येऊन जातात, ते मात्र घाटात अचानक पिसारा फुलवून सामोऱ्या येणाऱ्या मोरासारखे मोहक वाटतात. ग्रामीण भागाचे झपाटय़ाने शहरीकरण होते आहे. शहरीकरणाच्या या प्रक्रियेत ‘गावातील’ अनेक गोष्टी गडप होताना दिसतात. जगण्याची निवांत लय. समाजाकडे पाहण्याचा एक निरागस दृष्टिकोन, हिरव्या निसर्गाची बदलती रुपे आणि त्या बदलत्या रुपाशी जडणारे नाते, गावरहाटीचा भाग असलेले अनेक घटक हळूहळू ‘विस्मरणा’च्या तिजोरीत बंद होत आहेत। अशावेळी ‘गावझुल्या’वर बसून निवांत झोके घ्यावेत. हरवत चाललेल्या गोष्टींविषयीची ही खंत भाबडेपणाची असली तरी
त्याचे शब्दवेल्हाळ रुप वाचकांना धरून ठेवते.

Thursday, March 25, 2010

सांस्कृतिक कट्टा : मंद सुगंधी फुलोरा..

कित्येक वेळा आपल्याला कविता माहीत असतात, आपण आपल्या परीने त्यांचा अर्थही लावलेला असतो. स्वत:च स्वत:ला ती कविता समजावून सांगितलेली असते. परंतु अचानक एखादे वेळी कोणीतरी आपला हात धरतं आणि त्याच कवितेचा एका नवा चेहरा दाखवतं; तिचं नवं सौंदर्य दृष्टीसमोर उलगडवून अर्थाचे, शब्दांचे नवे पदर दाखवतो. मग आपण स्वत:च स्वत:ला म्हणतो, ‘अरे! हे आधी का दिसलं नाही आपल्याला?

‘चतुरंग’मध्ये गेल्या वर्षी अरुणा ढेरे यांचे ‘कवितेच्या वाटेवर’ हे सदर वाचताना वारंवार हा अनुभव आला. संपताना एक हूरहूर लावून संपलेल्या या सदराचे आता ‘पुस्तकरूप’ आले असून तोच अनुभव वाचकांना आता समग्रपणे घेता येणार आहे. या सदरासाठी केवळ मराठी कवितांच्या प्रांतातच मुशाफिरी करण्याचे बंधन न
स्वीकारता अरुणाताईंनी संस्कृत, इंग्रजी, हिंदी कविता, विविध प्रांतातील लोकगीते अशा विविध माध्यमातून रसिकांना कवितांच्या वाटेवर नेले. ‘पुसी कॅट, पुसी कॅट’ची गंमत सांगतानाच त्या लंडनला जाऊन आलेल्या, राणीच्या सिंहासनाखालच्या उंदराला घाबरवणाऱ्या मांजराची गंमत सांगतात. ‘ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, त्यांच्या सम्राज्ञीच्या सिंहासनाला एक उंदीर खालून कुरतडू शकतो’ अशी मार्मिक टिप्पणीही त्याच वेळी करतात. लाला टांगेवाला आणि लीलाची कविता सांगत अगदी शिशूवर्गाचीही आठवण करून देतात. ‘चाफ्याच्या झाडा’, ‘मधुघट’ आणि ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ या कवितांवरील लेख वाचताना हे सर्व ओळखीचे होते तरी किती अनोळखी होते हे लक्षात येते. असाच एक प्रत्यय ज्ञानेश्वरांच्या ‘विरहणी’ वरचा! ‘घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा। भवतारक वो कान्हा, वेगी भेटवा का। अनेकदा ऐकलेली, वाचलेली ही विराणी, पण अरुणा ढेरेंनी जेव्हा त्यावर लिहिताना त्याला ‘मिनीएचर पेंटिंग’ची उपमा दिली होती तेव्हा मात्र इतके दिवस, वर्षे न दिसलेले मिनीएचर पेंटिंग, ज्ञानेश्वरांचे स्त्री मन, सगळे लख्ख दिसू लागलं. लोकगीतं हा तर या पुस्तकाचा आत्मा म्हणावा लागेल. अनेकवेळा संदर्भासाठी किंवा सहज त्या विषयाच्या वाटेवर जाता जाता अरुणा ढेरेंनी दोन-दोन ओळी लोकगीतांच्या वापरल्या आहेत. मग तुकाराम जिजाबद्दल असो, गंगेची कहाणी असो, सीतेच्या दुसऱ्या वनवासाची कथा असो किंवा सवतीमत्सराची कथा असो. विशेषत: सवतीमत्सराबद्दल बोलताना त्या लिहून गेल्या की, रुक्मिणी-सत्यभामा, रुक्मिणी-जनी- तुळशीच्या निमित्ताने लिहिताना स्त्रियांनी स्वत:च्या दु:खालाच वाचा फोडली आहे. किती वेगळे निरीक्षण आहे हे!

लेखिकेनं लोकगीतांचे संदर्भ घेतानाही भिल्ल लोकगीते ज्यांचा अनुवाद रणधीर खरेंनी केलाय ती किंवा माळवा प्रांतातल्या लोकगीतांचेही उल्लेख केलेत। नवरात्राच्या वेळेस खेळल्या जाणाऱ्या भोंडला, हादगा किंवा विदर्भातल्या
भुलाबाईबद्दल आपल्याला माहिती असते. पण तशाच पद्धतीच्या मध्य प्रदेश, माळवा प्रांतातल्या ‘सांझी’बद्दल त्यांनी ‘सांझी’मध्ये लिहिलं आहे. इंदिरा संतांची ‘कुब्जा’ असो किंव ना. घ. देशपांडेंची ‘अजून’ कविता असो. मुळातूनच त्या कविता सुंदर आहेत; पण अचानक कागदावर जेव्हा त्या भेटतात तेव्हा खरोखरच त्यांना कडकडून मिठी मारावीशी वाटली. मीरेच्या भजनांबद्दल लिहिताना अरुण ढेरेंची त्या भजनांच्या सौंदर्यापेक्षा मीरेतलं सौंदर्य दाखवताना लिहिलं आहे, ‘मीरेने केलेला स्थैर्याचा त्याग हा खरा त्याग! सगळं सुस्थित असूनही अदृश्याच्या मागे
जाणं हे मीरेचं वेगळेपण!’ कवितेबद्दल लिहितानाच त्यांनी कृष्णा जे. कुलकर्णी या अकाली मिटलेल्या कवीबद्दलही लिहिलं आहे.

शाळेच्या दिवसांत किंवा कॉलेजमध्ये सुटलेला कवितेचा हात आपण मध्येच कधीतरी धरतो, मासिकांतून, दिवाळी अंकामधून, पण जेव्हा एखादा मर्मज्ञ मार्गदर्शक आपल्याला त्या प्रदेशातून पुन्हा फिरवून आणतो तेव्हा खरी त्या खजिन्याची ओळख होते. गोडी लागते. कवितांच्या आशयापलीकडचा आशय समजून घेण्यासाठी तरी ‘कवितेच्या वाटेवर’ जायलाच हवे! बहुधा दरम्यानच्या काळात आपल्याही जाणिवा अधिक समृद्ध होतात त्यामुळे हे सदर अधिक भावले असावे. सर्वोत्तम लेख लेखिकेने निरोपासाठी राखून ठेवला होता. हे सदर संपविताना अरुणा ढेरेंनी लिहिलेला ‘निरोप’ हा जसा वाचकांचा होता, तसाच तो कवितेच्या वाटेवरच्या आनंदयात्री सुनीताबाईंसाठीही होता. स्वत: कविता न लिहिताही कविता हा सुनीताबाईंचा श्वास होता आणि कदाचित त्यामुळेच या लेखात कुठेतरी सुनीताबाईंचे अस्तित्वही जाणवून जातं. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूएवढीच त्याला वाहिलेली श्रद्धांजली चटका लावून जाणारी असू शकते हे हा लेख वाचल्यावर प्रकर्षांने जाणवले, आरती प्रभूंच्या या ओळी सुनीताबाईंसाठी आणि त्या सर्वासाठी ज्यांचा ‘निरोप’ घेता येत नाही,

‘अखेरच्या वळणावर यावा, मंद सुगंधी फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे, आणि सरावा प्रवास सारा..’

असे हे पुस्तक ‘मंदी सुगंधी फुलोरा’ फुलविणारे! रविमुकुल यांच्या देखण्या मुखपृष्ठासह.

Sunday, February 21, 2010

शिल्लक कांजिणी

मीशरद आठवले. स्टेट बँक ऑफ इंडियाचा निवृत्त कारकून. दोनच दिवसांपूर्वी माझी एकसष्टी माझ्या तिन्ही मुलांनी झोकात साजरी केली. माझी लेक खास त्यासाठी अमेरिकेतून आली, तर मुलगा दिल्लीहून कुटुंबाला घेऊन आला. मी सहसा भावनिक होत नाही, पण परवा तो सगळा कार्यक्रम बघून मलाही गदगदून आलं. पण त्यानंतर माझ्या मुलांनी मला जे गिफ्ट दिलं, ते मात्र द्यायला नको होतं. त्यांच्या त्या प्रेमाच्या भेटीमुळे माझी स्वत:ची ओळख पुसली गेली. गेली पन्नास वर्षे मी जपून ठेवलेली किंवा नकळत जपली गेलेली माझी स्वतंत्र आयडेंटिटी संपून गेली. मला काय वाटतंय हे मला अजूनही कळत नाहीये. तुम्हाला मी माझी कथा सांगतो, कदाचित तुम्हाला सांगता सांगताच मलाही ठरवता येईल मला नक्की काय वाटतं!

नावासारखाच मी साधा, सरळ नाकासमोर चालणारा मुलगा होतो, तेव्हाची गोष्ट आहे ही. निसर्गनियमानुसार मला वयाच्या ११ व्या वर्षी कांजिण्या आल्या. आता काहीजणांना त्या वयाच्या दुसऱ्या वर्षी येत असतील तर काहींना वयाच्या ५० व्या वर्षी. कांजिण्या येण्याबद्दल माझी काही तक्रार नव्हती. उलट मी खूश झालो, कारण आमच्या आठवले कुळात सर्वाना म्हणजे मुले, मुली सगळ्यांनाच १० व्या वर्षांच्या वाढदिवसाच्या आधीच कांजिण्या येऊन गेल्या होत्या, त्यामुळे मी सर्वामध्ये चेष्टेचा विषय झालो होतो. तर त्यामुळेच कांजिण्या आल्यावर खूश होऊन मी माझ्या मोठय़ा भावाला म्हणालो, ‘‘बघ, उशिरा तर उशिरा, पण माझ्या कांजिण्यामुळे माझी परीक्षा बुडाली, किती छान झाले!’’

दोन-तीन दिवसांनंतर कांजिण्या कमी व्हायला लागल्या. बहुधा नेहमीपेक्षा उशिरा आल्यामुळे की काय, पण मला भरपूर कांजिण्या आल्या होत्या. म्हणजे ‘शरीरावर बोट ठेवायलाही जागा नाही’ असं माझी नमू आत्या म्हणाली होती. माझ्या आईला तर भयंकर भीती वाटली होती, मी जगतो की नाही अशी! त्यामुळे तिने आमच्या गावच्या भैरोबाला नवस केला होता, माझ्या कांजिण्या बऱ्या झाल्या की २१ नारळ वाहीन म्हणून! मला काही आठवत नाही, पण सगळे म्हणतात त्या दोन-तीन दिवसांत मी झोपेतच होतो आणि काय काय बरळायचो! आमच्या मास्तरांना मी यथेच्छ शिव्या देऊन घेतल्या. गणिताचा पेपर बुडल्यामुळे मी कांजिण्यांना धन्यवाद देत होतो. माझा सदरा लपवून ठेवणाऱ्या माझ्या आत्येबहिणीबद्दलही मी काहीतरी बरळलो म्हणे. त्यानंतर ती आमच्या घरी आली ती थेट लग्नानंतर नवऱ्याला घेऊनच! तर माझ्या कांजिण्या कमी कमी होत होत्या, म्हणजे फुललेले फोड बसत होते किंवा फुटत होते, दुखत होते, पण तरीही मला छान वाटत होते. सगळीकडचे फोड जात होते. अनुभवी मार्गदर्शक भावा-बहिणींनी सल्ले देऊन सावध केलेले होते त्यामुळे मी हाताने एकही फोड फोडला नव्हता, कारण त्याचा म्हणे डाग राहतो. माझ्या सगळ्यात मोठय़ा चुलत भावाने असेच काही फोड फोडले होते आणि त्याचा पुरावा त्याच्या हातावर होता. (त्याला सांगायला कोणी नव्हते, म्हणून उत्साहाने पुढच्या पिढीचा मार्गदर्शक होण्याची जबाबदारी त्याने स्वेच्छेने घेतली होती.)

यथावकाश माझ्या अंगावरच्या साऱ्या कांजिण्या गेल्या, फक्त एक सोडून! आमच्या मार्गदर्शकांनी तेही सांगितले होते की, एक कांजिणी राहते आणि मग स्वत:च्या पाश्र्वभागावरची कांजिणी दाखविली होती. पाठोपाठ एकेक करत प्रत्येकाने स्वत:ची दाखवली, फक्त आमच्या नमू आत्याच्या कमूने सोडून. तिची कांजिणी कुठे होती हे आम्हाला आजवर कळलेच नाही. पण माझी शिल्लक कांजिणी मात्र अशी लपून ठेवण्याच्या जागी नव्हती, उलट मला बघितल्याक्षणी आधी कांजिणीच दिसत असे. नाकाच्या शेंडय़ावर त्या ‘स्पेशल’ कांजिणीने मुक्काम ठोकला होता. खरं तर तिने त्या जागेवर थांबावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. मी प्रयत्न केला की हातावर कुठं तरी एखादी कांजिणी थांबून राहावी, पण माझ्या प्रयत्नांना, इच्छेला मान न देता ती अखेर नाकावरच टिच्चून पाय रोवून उभी होती!

इथूनच खरी गोष्ट सुरू झाली. एक चित्पावन गोरा रंग सोडला तर मी वर्गात चटकन लक्षात यावा असा विशेष काही नव्हतो. पुढच्या बाकावर बसून हात वर करून उत्तर देणारा, परीक्षेत उत्तम गुण मिळविणारा वगैरे पण नव्हतो. मात्र अचानक माझ्या कांजिण्यांनंतर माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जाऊ लागलं. एक वेगळीच ओळख मला माझ्या शिल्लक कांजिणीने दिली होती. सहसा कोणाच्या लक्षात न राहणारा मी अचानक विविध नावांनी वर्गात प्रसिद्ध झालो होतो. फोडेल्या, नाकफोडय़ा, नाकोडय़ा, पोपट आठवले, चोचवाला आठवले आणि काय काय. खरं तर पाच भावांमधला मी तिसरा, म्हणजे इकडेही नाही आणि तिकडेही नाही. वर्गात पण पहिलाही नाही आणि शेवटचाही नाही. माझं अस्तित्व हे तसं अदखलपात्रच होतं, पण त्या कांजिणीमुळे जणू माझा नवा जन्म झाला. मुलां-मुलांमधलं हेच नाव शिक्षकांमध्येही पसरलं आणि मी शरद आठवलेचा नाकोडय़ा आठवले झालो!

यथावकाश तारुण्यपिटिका येऊ लागल्या, तेव्हा हीच कांजिणी मला माझा चेहरा विद्रूप करत आहे, असं वाटू लागलं. विशेषत: तारुण्यपिटिका येऊन जायच्या तेव्हा मनात विचार यायचाही कांजिणी पण अशीच निघून जावी. मी काही नाकोडय़ा आठवले नाही, मी शरद रामचंद्र आठवले आहे. सगळे साले मनाचे खेळ, नाकावरची कांजिणी हवीशी पण होती आणि नकोशी पण!

नाकोडय़ा आठवले नावानेच कॉलेजातही मुलं ओळखू लागली आणि ‘नाकोडय़ा आठवले’ या पदवीसह ‘पदवी’ घेऊनच कॉलेज सोडलं! कॉलेजमध्ये जास्त जाणवलं माझं वेगळेपण! आता खरं तर आपण जसे असतो तसे का असतो याला उत्तर नसतं, म्हणजे एखाद्याचं नाक बसकं का असतं? एखाद्याचे कान लांब का असतात? किंवा एखादा तिरळा का असतो? कॉलेजमध्ये जेव्हा दरवर्षी माझ्या नाकावर, कांजिणीवर फिशपाँड पडले, तेव्हा मलाच कळेना, हे हसून एन्जॉय करावं की चिडावं.
x
‘नाकोडय़ाच्या नाकावरची कांजिणी
म्हणजे आठवणीत राहिलेली मैत्रीण जुनी’
x
‘राणीनं भरून ठेवल्या प्रेमाच्या रांजणी
राजा मात्र म्हणतो, मला प्यारी माझी कांजिणी’
x
‘प्रेमाच्या प्रवासात ते करत होते मजल दरमजल
ओठांवर ओठ ठेवून ती म्हणाली, तुझे नाक मात्र बदल’
x
कॉलेजमधले असे काही फिशपाँड्स मला अजूनही आठवतात, कारण दरवर्षी त्यांना ‘बेस्ट फिशपाँड्सचं’ बक्षीस मिळायचं आणि मग सगळेजण एकमेकांना तेच ऐकवायचे। यावर वैतागून एकदा मी सरळ कांजिणी फोडायचं ठरवलं, पण जेव्हा जेव्हा मी ती कांजिणी फोडायला जायचो, आईची आठवण यायची. कारण आई म्हणायची, ‘‘शरदा, तुझ्या सगळ्या कांजिण्या बऱ्या झाल्या की मी गावातल्या भैरोबाला जाऊन २१ नारळ वाहणार आहे.’’ कित्येक दिवस नाकावरची कांजिणी जात नव्हती म्हणून एकदा मी आईला म्हणालो, ‘‘का गं, तुझ्या भैरोबाने माझ्या कांजिण्या बऱ्या केल्या, मग ही एकटीच कशी राहिली?’’ त्यावर ती म्हणाली होती, ‘‘तुझी ही कांजिणी जेव्हा बरी होईल तेव्हाच माझा नवस पूर्ण होईल. माझा माझ्या देवावर विश्वास आहे, तू काही करू नकोस तिला!’’ १५ वर्षांपूर्वी आई गेली, पण तेव्हाही ती जाता जाता सांगून गेली, ‘‘तुझी कांजिणी आपोआप बरी होईल आणि जेव्हा ती बरी होईल, तेव्हा माझा नवस पूर्ण कर!’’

पुढे बँकेत नोकरी मिळाली आणि ‘नाकोडय़ा आठवले’चा ‘फोडवाले साहेब’, ‘कांजिण्या आठवले’ वगैरे झाला. बाकी माझी आयुष्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. कांजिणी हीसुद्धा तक्रार नव्हती, उलट माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस तिच्यामुळे अनेकांच्या लक्षात राहिला होता. बँकेमध्ये १० ते ५ कारकुनी करणारा मी, माझ्यात चारचौघांहून वेगळं होण्याची इतर कोणतीही क्षमता नव्हती आणि महत्त्वाकांक्षाही नव्हती, पण अशी एक वेगळी ओळख नाकावरच्या कांजिणीने मला सहजगत्या दिली होती.

लग्नाच्या बाजाराने मात्र माझे विमान खाली आणले. तब्बल तीन मुलींनी ‘नाही’ म्हटल्यावर चौथी मुलगी माझी बायको झाली. तिन्ही मुलींनी, त्यांच्या पालकांनी, फोडवाला मुलगा आपल्याला, आपल्या मुलीला शोभणार नाही, असाच विचार केला असणार बहुधा! म्हणून मग शोभाला, माझ्या बायकोला, जी माझ्यासारखीच सर्वसामान्य चारचौघींसारखीच होती, तिला मी विचारलं, ‘‘मला हो का म्हणालीस?’’ त्यावर तिनं जे उत्तर दिलं ते ऐकून मला पटलं ही माझ्याच सारखी आहे! माझं आणि हिचं जमणार! शोभा म्हणाली, ‘‘मला चारचौघांपेक्षा वेगळा नवरा हवा होता. तुमच्या त्या नाकावरच्या फोडामुळं तुम्ही किनई वेगळेच दिसता, म्हणून मी हो म्हणाले.’’

त्या क्षणापासून आजपर्यंत मी माझ्या नाकावरच्या कांजिणीसह शोभाबरोबर संसार केला, अगदी सुखानं. तीन मुले झाली, तिघांचं शिक्षण व्यवस्थित करून दिलं। संसार मांडून दिले, भरून पावल्यासारखं वाटत होतं. यथावकाश बढत्या वगैरे होऊन बँकेतून निवृत्तही झालो. शेवटच्या दिवशी भाषण करताना सगळेजण प्रयत्नपूर्वक ‘शरद आठवले’ असं म्हणत होते. शेवटी आमच्या सखारामनं न राहवून विचारलं, ‘‘कांजिण्या आठवले साहेबांचं नाव शरद आहे, हे कधी कळलंच नाही!’’ आणि सगळेच मुक्त हसले!

एक छोटासा फोड, फुटकळी.. नाकाच्या शेंडय़ावर ५० वर्षे तिने मला सोबत केली. नुसतीच सोबत केली नाही तर ओळखही दिली. १०० पैकी ९० जण हे सो सो कॅटेगरीतले असतात, म्हणजे ते असून कळत नाहीत आणि नसून फरक पडत नाही. मी पण त्याच वर्गातला होतो, पण माझ्या नाकावरच्या कांजिणीनं मला एक ओळख दिली. आयुष्यातले सगळे चढ-उतार, यश-अपयश मी पचवले या शिल्लक कांजिणीच्या साथीनं.

आणि माझ्या मुलांनी ६१ व्या वाढदिवसाची भेट म्हणून मला दिली प्लॅस्टिक सर्जनची अपॉइंटमेंट! जो काढून टाकणार होता माझ्या नाकावरची कांजिणी, पुसून टाकणार होता माझी ओळख!

माझा होकार, नकार न विचारताच दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांकडे घेऊन गेले. सर्व सोपस्कार होऊन डॉक्टरांनी ऑपरेशन करून ती कांजिणी काढली. त्यानंतर त्यांनी जेव्हा मला आरसा दाखवला, तेव्हा मी दोन मिनिटं डोळे बंद करून घेतले. ५० वर्षे जिची मला सवय झाली होती, ती दिसणार नव्हती. मलाच माझा चेहरा अनोळखी वाटणार होता. आयुष्याच्या या वळणावर मला माझी ही ओळख खरं तर पुसायची नव्हती. माझ्याही नकळत ती कांजिणी माझा, माझ्या अस्तित्वाचा भाग झाली होती. मला तिला माझ्यापासून तोडायचं नव्हतं. मनाचा धीर करून मी डोळे उघडले. ते डबडबलेलेच होते. तशाच ओलसर डोळ्यांनी मी ‘शरद आठवले’चा चेहरा पाहिला. मलाच माझी ओळख पटायला बराच वेळ लागत होता. नकळत माझा हात नाकाकडे गेला!

xxx
माझी ओळख पुसली गेली आणि माझा पुन्हा एक जन्म झाला. आणि हा जो कोणी शरद आठवले आहे, त्याला मी ओळखतच नाही. आता मला प्रश्न पडलाय, तो प्लास्टिक सर्जन म्हणजे काही भैरोबा नव्हता, मग आईनं केलेला नवस फेडावा की फेडू नये?

Tuesday, January 19, 2010

पुस्तकाचा कोपरा - इव्हच्या लेकींसाठी!



स्त्रीवादी लिखाण असा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा बहुतांश वेळा ते स्त्रीमुक्तीवर स्त्रियांना काय वाटते याच ढंगाचे असते. पण ‘व्हॉट वुमेन रिअली वाँट्स?’ हा प्रश्न फक्त चित्रपट, लोककथांमध्ये चर्चिला जातो. खरं तर स्त्री-पुरुष ही निसर्गचक्राची दोन आरी. पण तरीही पुरुषाच्या तुलनेत स्त्रीला कायमच दुय्यमस्थान मिळत आलं. मग या दुय्यम स्थानाचा इतिहास धुंडाळताना लक्षात येतं, भाषा वेगळ्या असल्या, प्रांत वेगळे असले, जाती वेगळ्या असल्या इतकंच काय धर्मही वेगळे असले तरी हे स्त्रियांचे दुय्यम स्थान मात्र सगळीकडे आणि सगळ्या काळात सारखं आहे ही खात्री डॉ. मंगला आठलेकरांचे ‘महापुरुषांच्या नजरेतून स्त्री’ हे पुस्तक वाचताना परत पटते.

जगातले चार महत्त्वाचे धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, बौद्ध धर्म आणि ख्रिश्चन धर्म. या धर्माच्या आचरणग्रंथातील स्त्रीचे स्थान किंवा स्त्रीआचरणाचे नियम या सर्वामध्ये एक मोठी गोष्ट सामायिक आहे ती म्हणजे ‘स्त्री ही मोक्षमार्गातली धोंड आहे. त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करा, तिला दूर ठेवा. मोक्ष मिळवण्यासाठी तिला दूर ठेवणं आवश्यक आणि त्यामुळेच विविध मार्गानी तिची करता येईल तितकी नालस्ती सर्व धर्मानी केली. एकही धर्म याला थोडासुद्धा अपवाद नाही. या सर्व धर्मातील स्त्रीदृष्टीकोनांवर लिहिण्याआधी डॉ. आठलेकरांनी अमाप ग्रंथ वाचले असणार. कारण त्याचे प्रत्यंतर संदर्भग्रंथात येतं, तैत्तिरिय संहिता, भारतीय संस्कृती कोष, मनुस्मृती, याज्ञवल्कस्मृती, स्कंदपुराण महाभारत आदीपर्व, अंगुत्तरनिकाय, संयुक्तिनिकाय, पाली भाषेतील बौद्ध संत साहित्य, द इसेन्स ऑफ बुद्धिझम, भगवान बुद्ध जीवन और दर्शन, नवा करार, जुना करार, Women, church, church and state- Matida Gage, The religion of women- Anhistorical study, कुराण, इस्लामचे अंतरंग, निर्वाचित कलाम, Women in Islam इत्यादी अनेक ग्रंथाचा संदर्भ घेऊन त्या त्या धर्मासंदर्भातले लिखाण केलेले आहे. केवळ टीकेसाठी टीका करण्याच्या हेतूपेक्षाही स्त्रीस्थानाचा परामर्श घेण्यासाठी या पुस्तकाचा ध्यास आहे हे संदर्भसूची पाहूनच जिज्ञासूंच्या लक्षात येईल. या धर्मामधील रूढी, परंपरा, इतिहास यांवर भाष्य करता करताच लेखिकेचे काही प्रश्न निरुत्तर करून जातात. त्या म्हणतात सर्व पुरुषजातीला मोक्ष मिळवून देताना सर्व स्त्रीजातीचं जगणं अत्यंत हलाखीचं करून टाकण्याचं काम सर्व धर्माकडून घडलं, हे एकाही धर्मसंस्थापकाला, एकाही महापुरुषाला कसं खटकलं नाही? इतकं जीवघेणं दु:ख स्त्रीच्या पदरात टाकूनसुद्धा हे महापुरुष माणुसकीच्या तत्त्वज्ञानाच्या गप्पा कोणत्या अधिकाराने करत राहिले? स्वत:ला ‘करुणामयी’ कसं म्हणवून घेत राहिले?

महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, महर्षी कर्वे, महात्मा गांधी, महर्षी वि. रा. शिंदे, र. धों. कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्यादेखील साहित्याचा अभ्यास करून योग्य तिथे त्यांच्या मताबद्दल कठोरपणे लिहून जातात. आज सहज वाटणारे स्त्री-शिक्षण किती कष्टाने मिळाले किंवा बालविवाह, बालविधवा या सगळ्या वणव्यातून स्त्रियांच्या कित्येक पिढय़ा शतकानुशतके, युगानुयुगे भाजून निघत होत्या. ‘स्त्री’ला मान देण्यासाठी तिला माता किंवा भगिनी होण्याचं बंधन महापुरुषांकडून घातलं जात होतं. ‘स्त्रीला ठरवू द्यात तिला काय हवंय’ किंवा ‘स्त्रियांनी संततीनियमनाची साधने वापरली पाहिजेत, त्यांना समागमाचा अधिकार मिळायला हवा’ असे म्हणणारे आगरकर, र. धों. कर्वे त्यांच्या जिवंतपणीच नव्हे तर मृत्यूंनतरही दुर्लक्षित, एकाकी पडले.

पुस्तक वाचताना एकच गोष्ट वारंवार मनात येत होती. गार्गी, मैत्रेयीचे दाखले देत आपल्या संस्कृतीने ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हते’ म्हणणाऱ्या मनूचीही भलावण केली. काळ बदलला आणि आपण कनिष्ठ आहोत हा भाव स्त्रियांसकट जगभरातल्या सर्वच लोकांमध्ये असा खोलवर भिनला, भिनवला गेला की, स्त्रीसुद्धा ‘पुरुषाशिवाय जगणं कठीण, तोच आपला आधार आहे’ हे घोकत राहिली, काळ बदलला काही संवेदनशील पुरुषांनी आणि बंडखोर स्त्रियांनी या वर्षांनुवर्षे खितपत पडलेल्या अस्पृश्य, गरीब, बिचाऱ्या ‘इव्ह’च्या लेकींसाठी स्वातंत्र्याची दारं हळूहळू खुली केली, आता किमान त्या दुसऱ्यांकडे पाहू शकतात. हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र प्रकर्षांने वाटलं, पुरुषांनी सामान्य असो वा महान कायम, स्त्रीला काय हवं ते स्वत:च ठरवले, स्त्रीसुधारणा पुरुषी नजरेने केल्या. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी बरे असं म्हणत स्त्रीवर्गही खुश झाला. पण स्त्रिया कधी स्वत:कडे स्त्री म्हणून एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघतील? हा विचार प्रकर्षांने पृष्ठभागावर आणण्याचे काम हे पुस्तक करते!

Sunday, January 17, 2010

कविता - अठवणींच कपाट

असते एक भलेमोठे कपाट,
त्यात लपवलेल्या असतात गोष्टी सतराशे साठ,
जाणते अजाणतेपणी कोम्बलेल्या असतात गोष्टी भा‍रंभार ,
कधी जमून जातात त्यावरच धूळीचे थर न थर,
पण कपाट मोकळे करणे मात्र जमतच नाही,
कधीतरि वाटते आणि सुरवातहि होते साफ़सफ़ाईला
पण काळचे एकेक थर मोकळे करतान आठवतात आठ्वणीसुद्धा नको वाटणारे क्षण
आणि मग गच्च आपटून ‍बन्द करुन टाकतो आपणच कपाट,
त्या आवाजालाच म्हणतात हुन्दका..

तर कधी असेहि होते
आपण टाकतच राहतो टाकतच राहतो कपाटात ,
आणि त्यातल्या आठवणी ओ‍सन्डून वाहयला लागतात,
त्या‍नाच म्हणतात अश्रु......