Wednesday, May 30, 2018

ती आणि त्या ४


ती

भारतात जायचं म्हणलं की एका डोळ्यास आसू आणि एका डोळ्यात हासूच असतं. मुळात जायला मिळणार जेमतेम तीन, चार आठवड्यांसाठी, तिथे जाऊनही काम करायचं ठरवलं तर अजून एक ८, १० दिवस जास्त घालवता येतील. त्यात सासर, माहेर, बँका, डॉक्टर, खरेदी, मित्र मैत्रिणी, नवीन नवीन हॉटेल्स, एखादी दुसरी लग्न कार्ये, घराची, किंवा तत्सम इन्व्हेस्टमेंट, मग त्याची धावपळ, एखादे गेट टुगेदर कम पूजा किती काय काय करायचं असत आणि ते ही अगदी कमी वेळात. परत एवढ सगळं होता होता एखादे आजारपण मग ते आमचं असो वा मुलांचे निघाले नाही म्हणजे मिळवली. दर वेळी आल्यावर गोष्टी राहतातच करायच्या. पुढच्या वेळी करू म्हणून ठरवते पण होतच नाही. तिथेही मीच करायचं, आणि इथे आल्यावरही मीच करायचं.
मुळात बुकिंग करतानाच मी सासरी किती राहायचं आणि माहेरी किती याचे सगळेच जण गणित मांडत असतात.  सासरी पोरांना नाही आवडत ते आजारी पडतात, आजी आजोबा सारखे हे करू नका ते करू नका म्हणतात. मग ते कंटाळतात  म्हणून मी आईकडे गेले की सासूबाई बसणार तोंड फुगवून. लग्नाला आता बारा वर्ष झाली आणि आम्हाला अमेरिकेला जाऊन दहा वर्ष. या दहा वर्षात ही आमची आठवी खेप पण गेल्या सात खेपांप्रमाणे यावेळी सुद्धा नेहेमीचे नाट्य घडणार, मला अपराधी वाटणार आणि अमेरिकेत आल्यावर काही दिवस अम्या आणि माझी चिडचिड भांडणं होणार. मग तो सासू बाई, सासऱ्यांना अमेरिकेत बोलावून घेणार, चार सहा महिने महिने ते आमचा चांगला पाहुणचार घेणार. अम्याला सगळं कळत पण आई बाबांना सांगता येत नाही. दादा वहिनी एकाच गावात वेगळं घर घेऊन राहतात ते चालत पण आम्ही लांब राहतो म्हणजे कर्तव्यात आम्हीच चुकतो. मग ती भरपाई करायला नको का?
पण मग कर्तव्य फक्त मुलाचे, सुनेचच असते का? मुलीचे नसते का? माझा भाऊ पण बाहेर असतो. आई बाबा दोघेच असतात भारतात. मी भारतात आलेल्या दिवसांचा हिशोब ठेवून मी चार दिवस माहेरी जास्त राहिले यावरून आमच्याकडे शीतयुद्ध असते. पण मला माहेरी राहण्याचा हक्क नाही का? माझ्या आईवडिलांना त्यांच्या मुलीबरोबर नातवंडांबरोबर रहावस वाटत नसेल का? या दहा वर्षात ते दोनदाच येऊन गेलेत. त्यातलं एकदा सान्वी च्या बाळंतपणात आणि दुसऱ्यांदा मी माझ्या नोकरीतल्या पैशांनी त्यांना बोलावून घेतलं होतं तेव्हा. आई बाबांची आत्ता आत्ता पर्यंत नोकरी होती, त्यामानाने सासूबाई सासरे रिकामेच होते, त्यामुळे ते नेहेमीच येऊन जाऊन असायचे, तरीही मुलांना त्यांची ओढ नाही लागली. आता यावेळी मी ठरवलं आहे, एक आठवडा काय ती मुलांबरोबर सासरी राहणार आहे, आणि उरलेले दिवस आईकडे. सतत जगाची आणि आमची तुलना, पण मी मात्र त्यांची तुलना साधी माझ्या आईशी पण करायची नाही.   
त्या काही बोलल्या तरी मी उलटून बोलणार नाही, पण मला जे करायचं आहे ते मात्र करणार आहे. झाले आता वनवासाचे एक तप. आणि यावेळी जातानाच आई बाबांना सोबत घेऊन जाणार आहे. वाघ म्हणल तरी खातो, वाघोबा म्हणल तरी खातोच ना मग वाघच म्हणते.

त्या
आता येणार हे काही दिवसांचे पाहुणे. घर आता यांच्या कलाने चालणार किमान काही दिवस तरी. सून बाई तर अगदी आल्या दिवसापासून दिवसच काय तास मोजत असते कधी एकदा माहेरी राहायला जाईन याचे. इथे राहत असले तरी निम्मे दिवस हे जातात बाहेरच खायला प्यायला. मुळात आल्यावर चार दिवस तर हे अर्धवटरावच असतात, जेट लॅग झालेले असतात, रात्र सकाळ कळतच नाही. मग यांचे डॉक्टर , बँका अशी सगळी काम इथे असतानाच आठवतात. यांच्या खाण्याच्या तऱ्हा वेगळ्या, आवडी वेगळ्या. एखाद दिवशी आवडीने पोहे खातील, की दुसऱ्या दिवशी नेहेमीचे फ्लेक्स पाहिजे नाहीतर बाहेर जाऊन खातील. आम्हा दोघांना सोसत नाही ते सारखे सारखे बाहेरचे खाणे. पण बोललं की परत तिकडे मीच करते, मलाही जरा आराम हवा असतो म्हणून सांगायला बाईसाहेब मोकळ्या.
आम्ही अमेरिकेत गेल्यावर सुद्धा नातवंडांना काही बोलू शकत नाही , कारण त्यांचे जागाच वेगळं असतं. आता तर काय भाषा पण वेगळी झाली. आणि इथे आले तर बोलायची सोयच नसते कारण त्यांच्या आईला आवडत नाही. आमच्या पोरं नव्हती बाई यांच्यासारखी नाजूक, हट्टी. जरा हवा पाणी बदललं की पडले आजारी. आमचं म्हणजे पडो झाडो माल वाढो. म्हणून तर अमित एवढा अमेरिकेत सुद्धा कधी म्हणून आजारी पडत नाही. आलोक सुध्दा सारखा फिरत असतो पण आजारी म्हणून नाही पडत. त्याला त्याच्या बायकोला लांब पडत म्हणून त्यांनी दुसरे घर केलं. पण तरीही रोज फोन तरी करतात, १०, १५ दिवसातून एकदा चक्कर मारतात. त्यांची लेक सुध्दा सहज येऊन राहते कधी मधी. पण तिचे नखरे नसतात, आम्ही जे खातो तेच खाते, पण हे अमेरीकेवाले मात्र वेगळेच. तिखटच आहे, कांदाच आहे, हे च नाही म्हणत जवळपास प्रत्येक गोष्टीला नाकं मुरडतात.  तिचे आई बाबा करतील ती प्रत्येक गोष्ट चांगली. मुलांना जरा काही नाही नको म्हणल तर झालं, बाईंच्या चेहऱ्यावर आठ्या. मग दोन दिवसात पाय आपटत जाणार माहेरी, ती थेट उगवणार जायच्या दिवशी. अध्ये मध्ये काही कार्य पूजा असली तर पाहुण्यांसारखी येऊन जाणार. मग तिकडे जाऊन गरज लागली कि आम्हाला बोलावणार. मग काय मुलं सांभाळायला आम्ही आहोतच की घरचेच कामगार. दहा वर्ष केलं सगळ आता नाही होत बाई. ही मुलं काय बोलतात ते ही नाही कळत आता. यावेळी अमितला स्पष्ट सांगणार आहे, आम्ही आता म्हातारे झालो, आता नाही जमणार तुझ्याकडे यायला.
यांच्या मदतीला जात होतो, यांच्या प्रत्येक गोष्टीत आनंद मानत होतो, पण तरीही तिच्या कुरकुरी, तक्रारी काही थांबत नाहीत. लग्नाच्या नंतर बारा वर्षांनी पण तिच्या वागण्यात कर्तव्याचा, उरकल्याचा भागच’ जास्त असतो. कशाला ठेवायचीत मग असली नाती घट्ट धरून, हळू हळू त्यातून बाहेर पडणेच चांगले.

मानसी होळेहोन्नुर

Tuesday, May 22, 2018

पत्र १


प्रिय,
आज अचानक इतकी आठवण आली तुझी की काही सुचेनासं झालं, मन उगाच ओढ घेत राहिलं जुन्याच आठवणींकडे. मन पण कसं खुळं असतं ना, सुतावरून स्वर्ग गाठतं. कुठलातरी एक छोटासा बिंदू आणि मग त्यावरून आठवणींची मालिका एखादा चेंडू उतारावर घरंगळत जावा तशी समोर जात राहते. आता यात एकामागोमाग येणाऱ्या दोन आठवणींचा सबंध असेलच असे नसतं. कधी कधी तर काळ वेळेचं गणित सुध्दा या आठवणी धुडकावून टाकतात. पिंगा घालत राहतात, फेर धरतात, जोवर आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांना आंजारत गोंजारत नाही तोवर त्या काही हलत नाहीत.

बहुदा कॉलेज मधलं दुसरं वर्ष होतं, पहिल्याची नवलाई ओसरली होती, नवीन कंपू जमले होते, सगळ्याच गोष्टींचा थोडाफार अंदाज यायला लागला होता. राहत्या जागेपेक्षा कॉलेज जास्त आवडायला लागलं होतं, कॉलेजमधून पाय निघायचा नाही. कोणता कोपरा कोणाचा, कोणत्या झाडामागे कोण बसले असेल किती वाजता कोण कुठे असू शकेल याचे सगळेच अंदाज खरे ठरायला लागले होते. मास्तर लोकांचेही पाणी कळलं होतं. त्यामुळे तर कॉलेज जास्त आपलंसं वाटत होतं. शिक्षण काय वर्गात, पुस्तकात, बाहेर, जगात मिळतच असतं. परीक्षेच्या काही दिवस आधी वाचून पाट्या टाकून बरे मार्क्स मिळवता येतात हे ही नव्याने कळलं होतंच.  घाबरायचं कोणतही कारण नसतानाही तुला बघितलं की मात्र भीती वाटायची.

तुला बघून वाटायची भीती हे मी कधीच कोणालाही सांगू शकले नाही. तू देखणा, मुडी, हुशार, बोलका गडी. सतत काहीतरी करत राहणारा. तुझ्या आसपास पोरींचाच काय पोरांचाही राबता कमी नसायचा, तुझा खाली पडणारा उःश्वास सुद्धा झेलायला पोरीबाळी तयार असायच्या. तुझ्या गालावरच्या त्या खळीने किती जणींना घायाळ केले होती याची गणतीच नव्हती. तशी मी तुमच्याच ग्रुप मध्ये विसावलेली, पण तरीही तुझ्याशी अंतर राखून ठेवलेली. मी अशी का याचे कारण कोणी विचारू नये म्हणून इतकी धडपडायचे, कारण मला तू आवडतोस हे तेव्हा मला स्वतःशीसुध्दा मान्य करायचे नव्हते, त्यामुळे ते तोंडावर सुध्दा आणायचे नव्हते.

अशातच त्यादिवशी चहाची तल्लफ आली म्हणून मी कॅन्टीन मध्ये येऊन बसलेली होते, एकदम सुरु झालेल्या पावसाच्या सरीत एकटीच शून्यात नजर लावत चहा पीत बसले होते. मला आजही असे एकटीने बसून चहा प्यायला आवडते, स्वतःलाच स्वतःची कंपनी देत घोट घोट चहा पिणं ही आजही माझी सुखाची परमावधी आहे. त्यादिवशी पण मी अशीच बसलेली असताना तुझा आवाज ऐकू आला आणि माझी समाधी भंगली. कोपऱ्यात बसून तू सिमॉन द बुआचं पुस्तक वाचत होतास हे आजही आठवतंय, मला आजही त्या बाईचे नाव घेता येत नाही,आणि तू मात्र अगदी तल्लीन होऊन पुस्तक वाचत होतास, आवडलेलं वाक्य मोठ्यानं बोलायची तुझी सवय तेव्हा मला पहिल्यांदा कळली. मी सहज उठून तुझ्या टेबलवर येऊन बसले. तू पुस्तकाची शेवटची पाने अगदी आधाशासारखी संपवत होतास, तुझ्या डोळ्याची बुब्बुळ, हात, चेहऱ्यावरचे हावभाव सगळे सगळे टिपत होते मी. पहिल्यांदा आणि शेवटचेच मी तुला अशी बघत होते. तूच हात डोळ्यासमोर फिरवून मला जगात ओढून आणलेस, तू बुआबद्दल काहीतरी बोलत होतास, आणि मी तुझ्याबद्दल काहीतरी विचार करत होते. तू तेव्हा खूप काय काय बोलला होतास, मात्र त्यातलं एक वाक्य तेवढं लक्षात राहिलं होतं  माझ्या.

दुपारी पाऊस कोसळत होता, नवऱ्याने, पोराने विस्कटवलेल घर मी परत जागेवर आणत होते. रोजच्याच सवयीच्या गोष्टी करत होते. चाकोरी पाळत गेली तर त्याच चाकोरीत अडकून पडता येतं. सरावाने चाकोरीची सवय होऊन जाते. तक्रारच उरत नाही. आयुष्य कसं साच्याच होऊन जातं. नवीन काही तयार होत नाही आणि त्यामुळे उद्धवस्त होण्याची भीती सुद्धा राहत नाही. तरीही दुपारी पाऊस ऐकताना, चहा पिताना तंद्री लागताना तुझी आठवण आली. marriage almost always destroys women. हे तू सांगितलेले वाक्य तेवढं आजही डोक्यात फिट्ट आहे. तू आवडू नयेस म्हणून तुझ्याशी बोलणं टाळणारी मी, तुझ्या प्रेमात पडेन म्हणून कॉलेज बदलणारी मी, सगळ्यापासून लांब पळू शकले, पण या वाक्यापासून नाही. स्वतःला उद्धवस्त होताना बघणं ही सुध्दा एक मजा आहे, ते मी तुलाच सांगू शकले असते, तूच ती समजून घेऊ शकतोस, म्हणून आज तुझी अशक्य आठवण आली.

जिथे कुठे असशील, उचक्या थांबत नसतील तर सिमॉन द बुआचंच नाव घे, माझं नाव कदाचित  तुला आठवणारच नाही, मी मात्र तुमच्या दोघांची नावं घेत आयुष्य चहाच्या घुटक्यासारखं संपवत राहीन. ‘

©मानसी होळेहोन्नुर

Wednesday, May 9, 2018

चहाबाज , कॉफीकर की इतर काहीही ???


तुम्ही चहा घेणार की कॉफी? या एका प्रश्नाने जगात तीन वर्ग तयार होतात, चहा कॉफी आणि इतर काही. मुळात जगभरात कुठेही गेलात तरी आदरातिथ्य करताना हा प्रश्न समोर येतोच. अनेक जण तुम्ही काय निवडता यावरून तुमची पहिली परीक्षा सुरु करतात. काही जण तर म्हणे त्यावरून भविष्य सुद्धा वर्तवतात. एक मात्र आहे चहा कॉफी वरून स्वभावाचा अंदाज लावता येतो आणि जो चक्क बरोबरही निघू शकतो. 
चहावाले जमात म्हणजे काळा, हिरवा, पिवळा, केशरी, पांढरा अशा कोणत्याही रंगाचे पाणी असलेला द्रव पदार्थ आवडणारे अशी जगाची व्याख्या आहे भारतात मात्र ही जमात थोडी बदलते, आणि एकाच रंगाशी इमान राखते. चहा भारतात हंड्रेड शेड्स ऑफ ब्राऊन म्हणून ओळखला जातो. मुळचा भारताचा नसून भारतात एकरूप पावलेल्या बटाट्याप्रमाणे चहाही इथल्या मातीत माणसांमध्ये मिसळून गेला आहे. गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, उत्तर प्रदेश-केरळ असे अनेक भेद केवळ एक कप चहा वर मिटवले जातात. आता अस्सल चहाबाज दिवसातून कितीही आणि कसाही चहा पिऊ शकतो. चहा लाईट आहे, चहा पातळ आहे, चहा गोड बासुंदी आहे अशा कोणत्याही सबबी तो देत नाही. पण त्याचबरोबर चहाचे असेही काही दर्दी असतात जे चहाच्या कंपनीशी इमान साधून असतात. म्हणजे मग त्यांना ब्रूक बॉंडचा चहा टाटा टी पेक्षा कमी कडक वाटतो. पण हे ब्रँड प्रेम कॉफीकरांमध्ये पराकोटीचे असते. चहा वाले कुरकुर करत का होईना पण समोर येईल तो चहा पितात.
चहा पिणाऱ्यांमध्ये चहा कसेही कधीही पिणारे अट्टल चहाबाज असतात, त्यांच्याकडे कायम चहा पिण्यासाठीचे कारण तयार असतं. त्यांना कितीही चहा प्यायला तरी त्रास होत नाही, उलट शरीरातलं चहाचं प्रमाण कमी झालं तर त्यांना टीडिप्रेशन होतं. याच पंथातले काही लोकं असेही असतात ज्यांना दिवसातून ठराविक वेळा चहा मिळाला नाही तर हायपो’टी’सिस होतो. काही चहाबाज असेही असतात ज्यांचं क्वॉन्टीटीपेक्षा क्वालिटीवर जास्त प्रेम असतं. अशा लोकांना चहा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनेच लागतो. मग काहींना उकळलेला घट्ट, तर काहींना बासुंदीचा, काहींना मसाल्याचा, काहीना लाईट तर काहींना स्ट्राँग लागतो. व्यक्तिगणिक चहाची पध्दत आणि चहाची चव बदलत जाते पण तरीही चहाचे प्रेम कमी होत नसतं.
चहा पोहयावर लग्न ठरतात, मंत्रीमंडळ बनतात, पडतात, लोकं एकत्र येतात, नवीन ओळखी होतात, एवढंच काय चाय पे चर्चा करत देशाचा पंतप्रधान सुध्दा या चहामुळे ठरला जातो. चहामुळे त्रास होतो हे चहा न पिणारे लोकंच म्हणतात, हे लोकं म्हणजे कॉफी पिणारे किंवा इतर काही वाले. जसे चहा पिणारे चहाबाज असतात तसे कॉफी पिणारे कॉफीकर असतात. कॉफी हा जरा पैसेवाल्यांचा शौक. चहा कसा दुध असलं, नसलं तरी चालत. कॉफीचे मात्र तसे नाही.
कॉफी हे तासे साधं सुध प्रकरण नाही, घरंदाज नजाकतीची गोष्ट आहे ती. त्यामुळेच की काय कॉफी पिणारा हा स्वतःला या सगळ्या उतरंडीत सगळ्यात वरती ठेवून बघत असतो. कॉफी ही जेवढी प्यायची गोष्ट आहे तेवढीच ती अनुभवायची गोष्ट आहे. कॉफी उकळताना तिचा जो घमघमाट पसरतो त्यानेच कॉफीकराला नशा चढायला लागते. भारतामध्ये खास करून दक्षिण भारतात कॉफीला ज्या काही मायेच्या हातांनी या पेल्यातून त्या पेल्यात फिरवतात, की कॉफीलाही भरून येतं आणि ती पेल्याच्या काठोकाठ येते. बाकीच्या भारतात इंस्टट कॉफीला मान असतो, तर दक्षिणेत कॉफीलाही डिग्री असते. जसा अनेक घरांमध्ये एखादी परंपरा असते, तशी अनेक घरांमध्ये कॉफीच्या प्रमाणाची, ताज्या दळून आणलेल्या कॉफी पावडरची, ठराविक दुकानाची परंपरा असते. घरातल्या एखाद्या माणसाप्रमाणे कॉफीचे भांड, पावडरचा डबा यांचा मान असतो. इंस्टट कॉफी या सुरु झाल्या ते रात्रीच्या जागरणांना सोबत करण्यासाठी, गप्पा रंगवत हॉटेलमध्ये अड्डा जमवण्यासाठी. कॉफीचे भक्त कॉफीसाठी काहीही करतील असे काही नाही नसतं. कॉफीचे मग रिचवत काम करणारे अनेक असतात, कॉफी ही तशी आब राखून असणारी असल्यामुळे तिला उगाच ग्रीन टी, लेमन टी सारखे फाटे फोडले जात नाहीत, कॉफीसाठी कॉफी पावडरही आवश्यकच असते. अगदी डीकॅफे पिणारे सुद्धा कॉफीसदृश्य, आणि सुवासाची पावडर घालूनच कॉफी करतात. जगभर जरी हिची मिजास जास्त असली, तरी भारतीय मनावर खरी भुरळ आहे ती चहाचीच.
जर तुम्ही इतर काही गटातले असाल म्हणजे दुध, किंवा काहीच न पिणारे तर तुम्हाला सतत तुमच्या अल्पसंख्याक असल्याची जाणीव करून दिली जात असते. मुळात इतर काही पिणारेसुध्दा अनेकदा छुपे चहाबाज किंवा कॉफीकर असतातच. फक्त त्यांना ठरवता येत नसतं आपण कोणत्या बाजूने जायचे म्हणून ते मधला मार्ग धरून असतात.
चीनमधून आलेल्या चहाने भारतात मूळ धरलं, आफ्रिकेतल्या कॉफीने जगभर हात पाय पसरवले, चहा असो वा कॉफी किंवा इतर काही संवादासाठी शब्दांबरोबर हे ही आवश्यकच आहेत. दररोज चहा प्यायल्याने अमके होते, तमके होते, कॉफीचे दुष्परिणाम , असे हजारो निष्कर्ष येत राहतात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत विसरलेही जातात. कारण चहा असो, व कॉफी किंवा इतर काही माणसांना जोवर बोलण्याचे , संवादाचे एक कारण देत आहेत तोवर आचंद्रसूर्य या जगतावर चहा आणि कॉफी अनभिषिक्त साम्राज्य करतच राहणार कारण च हाच काफी आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी.    

©मानसी होळेहोन्नुर
पूर्व प्रसिद्धी : झी दिशा 

Tuesday, May 1, 2018

ती आणि त्या ३


ती

हे लग्न करताना आईनेच काय सगळ्यांना मला घाबरवून सोडलं होतं. सासू नाही तर आज्जे सासू सुध्दा आहे त्या घरात. नीट विचार करून हो म्हण बरं का. पण माझ्या बाकीच्या सगळ्या अटींमध्ये बसत असल्यामुळे मी हो म्हणाले आणि आज ७ वर्षानंतरही त्याचा पश्चाताप नाही होत आहे. आज्जेसासुबाई आता ८०च्या पुढे गेल्यात थकल्यात. सासूबाई या वर्षी शाळेतून निवृत्त होत आहेत. म्हणजे काय तर त्यांनी २५ वर्षांपूर्वी सुरु केलेली बालवाडी आता बंद करत आहेत. माझ्या बँकेतल्या नोकरीचे त्यांना खूप कौतुक वाटायचं. कधीही त्यांनी मला ही गोष्ट करू नकोस असं सांगितलं नाही, मात्र प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आज्जींना विचारल्याशिवाय पुढे सरकायची नाही. एक दोनदा तर माझ्यासाठी त्यांनी आज्जींकडे रदबदली देखील केली होती, अर्थात हे मला त्यांनी नाही तर आज्जींनी सांगितलं होतं. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, आणि सुयोगचे बाबा मोठे, त्यामुळे आमच्या आई मोठ्या सून बाई. हे केलं तर चांगलं दिसणार नाही, घरातल्या आल्या गेल्यांचं कोण करणार, सणवार, कुळधर्म सगळे काही चालत मोठ्या सुनेच्याच गळ्यात पडतात. तरी बर सुयोग बालवाडीमध्ये जायला इतका रडायचा कि मग त्याच्यानिमित्ताने आईंनी ही बालवाडी सुरु केली आणि त्यांना जरा स्वतःचा वेळ मिळाला. सासुपुढे आजही त्या तेवढ्याच दबून असतात, आज्जींच्या समोर एक शब्दही उच्चारायची आजही त्यांची हिम्मत नाही. मला कधी कधी गंमत वाटते या सगळ्याची. म्हणजे बाबा त्यांच्या तोंडावर चार गोष्टी सुनावतात, पण आई एक शब्द नाही काढत तोंडातून. आता आई बाबांसाठी आम्ही मुद्दामून युरोप ची २० दिवसांची ट्रीप बुक केली,  पण यांचा घोषा वेगळाच, आई काय म्हणतील. यांना सून आली तरी या अजून सुनेच्या भूमिकेतून बाहेर पडतच नाहीयेत.
बरं आज्जी अगदी खाष्ट सासू अशा काही वाटत नाहीत, म्हणजे गेल्या ७ वर्षात त्यांनी मला फारशी काही बंधनं नाही घातली, दोन वर्ष थांबण्याचा आमचा निर्णय सुद्धा त्यांनीच सगळ्यांना नीट पटवून दिला. अगदी गेल्या वर्षीपर्यंत दर वर्षी दिवाळीचे अनारसे त्याच करायच्या. अहो आईंना साडीमधून पंजाबी ड्रेसमध्ये त्यांनीच आणले, आणि हे आईंनी, आज्जींनीच मला सांगितलं. सुयोगच्या दोन्ही आत्या माहेरपणाला आल्या कि आज्जी आईला पण माहेरी पाठवायच्या सुट्टीसाठी. तरी आई आज्जींना का घाबरतात हे मला कळतंच नाही. आई बाबा असे एकत्र कधी जातंच नाहीत, आता जबाबदारी नाहीत म्हणून त्यांनी मोकळं फिरावं असे आम्हाला वाटतं. सासू आणि आज्जेसासू सोबत असल्यामुळे मी अगदी बिनधास्त नोकरी करू शकते, मला त्यांच्यामुळे जे काही मिळतंय त्याची परतफेड करणे शक्य तर नाही, पण एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही आई बाबांना जग फिरायला पाठवतोय तर ते हे घरच आमचे जग म्हणत पाय बाहेर काढत नाहीयेत.

त्या

वयाची पन्नाशी ओलांडली तरी आईंना विचारल्याशिवाय स्वतःचा काही निर्णय घ्यायची हिम्मत होत नाही. माझ्या हाताखालच्या हजारो मुलांना मी धीट धाडसी केलं पण मी स्वतः मात्र नाही होऊ शकले तशी. लग्न झालं तेव्हा जेमतेम २० वर्षांची होते मी. आईकडे कधी निर्णय घ्यायची वेळ नाही आली, आणि इकडे तर सगळीच वेगळीच गत. सासऱ्यापेक्षा सासुबाईच जास्त कर्तबगार. माहेरच्या पेक्षा पूर्ण वेगळे वातावरण, मी काहीतरीच बोलून जाईन असे मला वाटायचं म्हणून मी पहिल्यापासूनच कमी बोलायचे, सगळं ऐकत राहायचे. सासूबाई जे काही सांगतील ते काही चुकीचे नसेल असा एक विश्वासच बसला. सुरुवातीचे अनुभव सुध्दा तसे आले.
आता सुयोग झाल्यावर सुध्दा त्यांनी मला मागे लागून बालवाडीचा कोर्स करायला लावला, मी जेव्हा जेव्हा परीक्षेला जायचे सुयोगला मस्त सांभाळायच्या. मग त्यांनीच मला बालवाडी सुरु करायला सांगितली. हे यांच्या दोन्ही बहिणी मला कधी परके व्तालेच नाही. उलट हे सगळे म्हणजेच मला माझे जग वाटायला लागले. दरवर्षी माझ्या दोन्ही नणंदा माहेरपणाला यायच्या तेव्हा मला कित्ती वाटायचं, त्यांचे माहेरपण करावं, त्यांना चांगलचुगल खायला घालावं. पण आई म्हणायच्या, तू पण जाऊन ये माहेरी. त्यांना सांगताही यायचं नाही कि माहेरी मला सासरी असल्यासारखं वाटतं, आणि सासरीच मोकळं वाटतं. नंतर सुयोगंच कारण पुढे करून मी माहेरी जाण थांबवलं, तेव्हा एक वर्षी त्यांना दोन्ही लेकींना माहेरपणाला बोलावलं नाही, मग मी त्यांना पहिल्यांदाच स्पष्ट माझ्या मनातलं सांगितलं. तेव्हा त्यांनी पाठीवरून हात फिरवला आणि आईपेक्षाही त्या हातातली माया जास्त आहे हे जाणवलं.
त्या थोड्या रागीट होत्या, एकदा बोलायला लागल्या की बोलत राहायच्या, पण नंतर शांत झाल्या की सगळे विसरून जायच्या. सुरुवातीला भीती वाटायची, पण मग सवय होत गेली. आजही त्यांना एखादी गोष्ट बाहेरून कळलेली आवडत नाही. त्यांचे म्हणणे आम्ही त्यांना ती सांगावी. लेकाने सुनेने ही युरोपची ट्रीप बुक केली आणि आम्हाला देखील सांगितलं नव्हतं, पण नेमकी आईंची भाची सुध्दा त्याच ट्रीप मध्ये आहे, आणि तिनेच आईंना सांगितलं. त्यामुळे त्या बसल्या फुगून, मी जाऊ नको असे थोडीच म्हणाले असते, नातसुनेपुढे आज्जी म्हणून त्या वेगळ्याच असतात, पण सासू म्हणून त्या वेगळ्या आहेत हे कसे सांगू कोणाला. सासू झाले तरी माझी सासू असेपर्यंत तरी मी सूनच राहणार, आणि सुनेची भूमिका इतकी अंगवळणी पडली आहे कि मी कधी खरंच सासू म्हणून वागू शकेन का माहित नाही.
मानसी होळेहोन्नुर