Wednesday, May 30, 2018

ती आणि त्या ४


ती

भारतात जायचं म्हणलं की एका डोळ्यास आसू आणि एका डोळ्यात हासूच असतं. मुळात जायला मिळणार जेमतेम तीन, चार आठवड्यांसाठी, तिथे जाऊनही काम करायचं ठरवलं तर अजून एक ८, १० दिवस जास्त घालवता येतील. त्यात सासर, माहेर, बँका, डॉक्टर, खरेदी, मित्र मैत्रिणी, नवीन नवीन हॉटेल्स, एखादी दुसरी लग्न कार्ये, घराची, किंवा तत्सम इन्व्हेस्टमेंट, मग त्याची धावपळ, एखादे गेट टुगेदर कम पूजा किती काय काय करायचं असत आणि ते ही अगदी कमी वेळात. परत एवढ सगळं होता होता एखादे आजारपण मग ते आमचं असो वा मुलांचे निघाले नाही म्हणजे मिळवली. दर वेळी आल्यावर गोष्टी राहतातच करायच्या. पुढच्या वेळी करू म्हणून ठरवते पण होतच नाही. तिथेही मीच करायचं, आणि इथे आल्यावरही मीच करायचं.
मुळात बुकिंग करतानाच मी सासरी किती राहायचं आणि माहेरी किती याचे सगळेच जण गणित मांडत असतात.  सासरी पोरांना नाही आवडत ते आजारी पडतात, आजी आजोबा सारखे हे करू नका ते करू नका म्हणतात. मग ते कंटाळतात  म्हणून मी आईकडे गेले की सासूबाई बसणार तोंड फुगवून. लग्नाला आता बारा वर्ष झाली आणि आम्हाला अमेरिकेला जाऊन दहा वर्ष. या दहा वर्षात ही आमची आठवी खेप पण गेल्या सात खेपांप्रमाणे यावेळी सुद्धा नेहेमीचे नाट्य घडणार, मला अपराधी वाटणार आणि अमेरिकेत आल्यावर काही दिवस अम्या आणि माझी चिडचिड भांडणं होणार. मग तो सासू बाई, सासऱ्यांना अमेरिकेत बोलावून घेणार, चार सहा महिने महिने ते आमचा चांगला पाहुणचार घेणार. अम्याला सगळं कळत पण आई बाबांना सांगता येत नाही. दादा वहिनी एकाच गावात वेगळं घर घेऊन राहतात ते चालत पण आम्ही लांब राहतो म्हणजे कर्तव्यात आम्हीच चुकतो. मग ती भरपाई करायला नको का?
पण मग कर्तव्य फक्त मुलाचे, सुनेचच असते का? मुलीचे नसते का? माझा भाऊ पण बाहेर असतो. आई बाबा दोघेच असतात भारतात. मी भारतात आलेल्या दिवसांचा हिशोब ठेवून मी चार दिवस माहेरी जास्त राहिले यावरून आमच्याकडे शीतयुद्ध असते. पण मला माहेरी राहण्याचा हक्क नाही का? माझ्या आईवडिलांना त्यांच्या मुलीबरोबर नातवंडांबरोबर रहावस वाटत नसेल का? या दहा वर्षात ते दोनदाच येऊन गेलेत. त्यातलं एकदा सान्वी च्या बाळंतपणात आणि दुसऱ्यांदा मी माझ्या नोकरीतल्या पैशांनी त्यांना बोलावून घेतलं होतं तेव्हा. आई बाबांची आत्ता आत्ता पर्यंत नोकरी होती, त्यामानाने सासूबाई सासरे रिकामेच होते, त्यामुळे ते नेहेमीच येऊन जाऊन असायचे, तरीही मुलांना त्यांची ओढ नाही लागली. आता यावेळी मी ठरवलं आहे, एक आठवडा काय ती मुलांबरोबर सासरी राहणार आहे, आणि उरलेले दिवस आईकडे. सतत जगाची आणि आमची तुलना, पण मी मात्र त्यांची तुलना साधी माझ्या आईशी पण करायची नाही.   
त्या काही बोलल्या तरी मी उलटून बोलणार नाही, पण मला जे करायचं आहे ते मात्र करणार आहे. झाले आता वनवासाचे एक तप. आणि यावेळी जातानाच आई बाबांना सोबत घेऊन जाणार आहे. वाघ म्हणल तरी खातो, वाघोबा म्हणल तरी खातोच ना मग वाघच म्हणते.

त्या
आता येणार हे काही दिवसांचे पाहुणे. घर आता यांच्या कलाने चालणार किमान काही दिवस तरी. सून बाई तर अगदी आल्या दिवसापासून दिवसच काय तास मोजत असते कधी एकदा माहेरी राहायला जाईन याचे. इथे राहत असले तरी निम्मे दिवस हे जातात बाहेरच खायला प्यायला. मुळात आल्यावर चार दिवस तर हे अर्धवटरावच असतात, जेट लॅग झालेले असतात, रात्र सकाळ कळतच नाही. मग यांचे डॉक्टर , बँका अशी सगळी काम इथे असतानाच आठवतात. यांच्या खाण्याच्या तऱ्हा वेगळ्या, आवडी वेगळ्या. एखाद दिवशी आवडीने पोहे खातील, की दुसऱ्या दिवशी नेहेमीचे फ्लेक्स पाहिजे नाहीतर बाहेर जाऊन खातील. आम्हा दोघांना सोसत नाही ते सारखे सारखे बाहेरचे खाणे. पण बोललं की परत तिकडे मीच करते, मलाही जरा आराम हवा असतो म्हणून सांगायला बाईसाहेब मोकळ्या.
आम्ही अमेरिकेत गेल्यावर सुद्धा नातवंडांना काही बोलू शकत नाही , कारण त्यांचे जागाच वेगळं असतं. आता तर काय भाषा पण वेगळी झाली. आणि इथे आले तर बोलायची सोयच नसते कारण त्यांच्या आईला आवडत नाही. आमच्या पोरं नव्हती बाई यांच्यासारखी नाजूक, हट्टी. जरा हवा पाणी बदललं की पडले आजारी. आमचं म्हणजे पडो झाडो माल वाढो. म्हणून तर अमित एवढा अमेरिकेत सुद्धा कधी म्हणून आजारी पडत नाही. आलोक सुध्दा सारखा फिरत असतो पण आजारी म्हणून नाही पडत. त्याला त्याच्या बायकोला लांब पडत म्हणून त्यांनी दुसरे घर केलं. पण तरीही रोज फोन तरी करतात, १०, १५ दिवसातून एकदा चक्कर मारतात. त्यांची लेक सुध्दा सहज येऊन राहते कधी मधी. पण तिचे नखरे नसतात, आम्ही जे खातो तेच खाते, पण हे अमेरीकेवाले मात्र वेगळेच. तिखटच आहे, कांदाच आहे, हे च नाही म्हणत जवळपास प्रत्येक गोष्टीला नाकं मुरडतात.  तिचे आई बाबा करतील ती प्रत्येक गोष्ट चांगली. मुलांना जरा काही नाही नको म्हणल तर झालं, बाईंच्या चेहऱ्यावर आठ्या. मग दोन दिवसात पाय आपटत जाणार माहेरी, ती थेट उगवणार जायच्या दिवशी. अध्ये मध्ये काही कार्य पूजा असली तर पाहुण्यांसारखी येऊन जाणार. मग तिकडे जाऊन गरज लागली कि आम्हाला बोलावणार. मग काय मुलं सांभाळायला आम्ही आहोतच की घरचेच कामगार. दहा वर्ष केलं सगळ आता नाही होत बाई. ही मुलं काय बोलतात ते ही नाही कळत आता. यावेळी अमितला स्पष्ट सांगणार आहे, आम्ही आता म्हातारे झालो, आता नाही जमणार तुझ्याकडे यायला.
यांच्या मदतीला जात होतो, यांच्या प्रत्येक गोष्टीत आनंद मानत होतो, पण तरीही तिच्या कुरकुरी, तक्रारी काही थांबत नाहीत. लग्नाच्या नंतर बारा वर्षांनी पण तिच्या वागण्यात कर्तव्याचा, उरकल्याचा भागच’ जास्त असतो. कशाला ठेवायचीत मग असली नाती घट्ट धरून, हळू हळू त्यातून बाहेर पडणेच चांगले.

मानसी होळेहोन्नुर

No comments:

Post a Comment