Tuesday, June 12, 2018

ती आणि त्या ५



ती

कोणताही सण  आला की  मला आनंद व्हायच्या ऐवजी टेन्शनच  येते. माझी उगाच चिडचिड व्हायला सुरु होते. नवरोबा तर काय मोठं  झालेलं बाळ आहे. रोज रोज नाही ना राहावे लागत मग एखादा दिवस कर कि सहन आईला हे त्याचे नेहेमीचे वाक्यतो दर वेळी न चुकता माझ्या तोंडावर मारतो. त्यामागे तुझ्यासाठी , तुझ्यामुळे आपण वेगळे राहतो ना मग एवढं ऍडजस्ट  केलं तर काय फरक पडेल असे न बोललेलं वाक्य देखील असत. लग्नानंतर वर्ष दोन वर्षातच मला लक्षात आलं  मी नाही  जुळवून घेऊ शकत यांच्यासोबत, नशिबाने नोकरी पण मिळाली आणि आम्हाला दोघांना घरापासून ऑफिस लांब पडायला लागले त्यात परत अभि लहान होता, मग आम्ही सरळ ऑफिसजवळ घर घ्यायचा निर्णय घेतला, गुंतवणूकही  झाली आणि आमची आम्हाला प्रायव्हसी पण मिळाली. येण्याजाण्यातला वेळ वाचायला लागला. तसेही ते  घर आम्हाला लहान पडायला लागले होते, म्हणजे घरात सामान जास्त आणि हलायला जागा कमी, त्यामुळे काहीही नवीन आणताना शंभरवेळा विचार करावा लागायचा. नशिबाने नवऱ्यालाही  ते जाणवले, तसेही त्याच सुमाराला त्याची बहीण पण वेगळी राहायला लागली होती, त्यामुळे सासूबाई फारसे काही बोलू शकल्या नाही, पण आम्ही घर घेतल्यापासून तिथे राहायला जाईपर्यंत रोज एकदा तरी पाणी डोळ्यात आणायच्याच. त्याच वेळी बोली झाली होती  सणाला मात्र आपल्या याच घरी यायचं. 

 दर वेळी सण  आला की  आम्ही निघालो हेड क्वार्टरला. गेल्या १५ वर्षात त्यात काही बदल झाला नाहीपण आता अभि पण मोठा झालाय त्याला त्याचे क्लासेस, मित्र असतात तो कुरकुरतो यायला. मलाही तिथे काही करायचे म्हणले की ऊर धपापतो आणि केलं नाही तर नवऱ्याची बोचरी नजर डाचते. त्यांच्या घरात त्यांच्या पद्धतीने करताना थोडे पुढे मागे झाले की इतकं ऐकावं लागत की त्यापेक्षा ते करणेच नको वाटते. यावेळी मात्र मी धीर धरून म्हणणार आहे आता आता तुमच्याने होत नाही आपण काही सण आमच्याकडे करत जाऊयात.


त्या

मी मुद्दाम सून जरा आमच्यापेक्षा खालच्या परिस्थितीतली करून घेतली होती, म्हणजे कसे तिला शिस्तीत ठेवता आले असते, पण ही थोडी नाही चांगलीच हुशार निघाली. नोकरी करायची त्यामुळे की काय पण न बोलून शहाणी होती. दोन वर्ष काय ती राहिली सोबत आणि नंतर पोराचे, नोकरीचे कारण काढून वेगळे झाले. माझा पोरगा बिचारा तिच्या या असल्या कारणांपुढे काहीच बोलू शकला नाही. दिसायला सुंदर असली म्हणून काय झाले, घराचे काम मी होते म्हणून नीट व्हायचे नाहीतर हिला कुठे जमते काही. हिचा स्वैपाक म्हणजे वरण केलं पातळ झाले, पोळ्या केल्या करपून गेल्या. आता थोडे फार करते नीट पण वाया फार घालवते. काटकसर अशी माहितीच नाही, तरी बर माहेरी तेच करावे लागायचे.

प्रत्येक वेळी माझ्या लेकीची बरोबरी करायला जाते ही. तिने काही केलं त्याचे मी कौतुक करून काही बोलले की झालेच या बाईसाहेब तसेच काहीतरी करून दाखवणार. माझ्या लेकीला बिचारीला सासू सासरे, दीर जाऊ सगळ्यांचे करावे लागायचे म्हणून ती वेगळी झाली, लगेच चार महिन्यात ही पण पडली की बाहेर. तरी बर मी हिंडती फिरती आहे म्हणून पूर्वी ही कामे करायचे आणि आताही करते. त्यामुळेच वेगळे होताना पण मी माझी लेकाला सांगितले काहीही झाले तरी सण सगळे आपल्या याच घरी करायचे. म्हणजे तरी ते इकडे येत जात राहतील आणि माझ्या मुलाला नातवाला किमान सणाच्या दिवशी तरी चांगले खायला मिळेल.

पण आता नातवाला काय पढवून ठेवलंय माहित नाही, इकडे यायलाच तयार नसतो, आला तरी निघायची घाई करतो. आता या वेळी मी निक्षून सांगणार आहे आम्ही असे पर्यंत तरी करा की सण इकडेच मी गेल्यावर करायचेच आहे सगळे सण , कुळधर्म तुमच्याच घरी. माझा लेक समजून घेईल आणि पोरालाही समजावेल. त्या निमित्ताने हे घर भरून जाते, आम्हाला जगल्यासारख वाटत. या घरात जरा तरी गप्पा गाणी होतात, नाहीतर या घरात फक्त टीव्ही बोलतो. दोघांच्यासाठी पथ्याचे करताना जिभेचे चोचले पुरवणारे काही करायला इच्छाच होत नाही. तसे आजू बाजूचे येऊन जाऊन असतात, लेक येते पण मुलाचे त्याच्या मुलाचे लाड पुरवणे ह्यात वेगळेच सुख असते. ते सुख माझ्या सुनेला बहुतेक तिची सून आल्यावरच कळेल.
©मानसी होळेहोन्नुर  



No comments:

Post a Comment