Wednesday, June 20, 2018

शेजारच्या काकू


गोष्ट तशी जुनीच, पण काही जुन्या गोष्टी इतक्या आत जाऊन बसलेल्या असतात, की आपण विसरूनच जातो त्यांच्याबद्दल, पण त्या गोष्टी आपल्याला  विसरत नाहीत. मग एकदम कधीतरी काही तरी घडतं आणि त्या गोष्टींची आठवण उफाळून येते. असंच काहीसं झालं परवा, कोणीतरी त्यांच्या बागेतल्या पेरूची आठवण काढली आणि मला आठवलं आमचं शेजारचं घर. एक सोडून पाच पाच पेरूची झाडं, आठ दहा वेगवेगळे गुलाब असलेलं. शेवगा, सीताफळाचं झाडही होतंच, येत जाता लावलेल्या, आपोआप उगवलेली, झेंडू, शेवंती, तगरीची झाडं पण होती. खूप खूप वर्ष झाली, त्यामुळे झाडं सुद्धा धूसर आठवताहेत, पण शेजारच्या काकू मात्र आजही तशाच समोर उभ्या राहतात.

फ्लॅट मधून नुकतेच आम्ही राहायला आलो होतो आमच्या बंगल्यात. जिना नाही, मागे पुढे पळायला मोठ्ठी जागा, कुंडीत नाही तर आपण थेट जमिनीत झाडं लावू शकतो अशा अनेक गोष्टींचा आनंद होता. त्यात हे शेजारचं मस्त झाडांनी डवरलेलं घर बघून तर अजूनच वाटायचं आपला पण असा बगीचा पाहिजे. मग हळू हळू ओळखी होत गेल्या, आणि त्या काकूंना नाव पडलं शेजारच्या काकू. सुरुवातीच्या दिवसात पाण्याची माहिती देणं, आजू बाजूच्या लोकांची ओळख करून देणं, ही सगळी शेजार धर्माची कर्तव्य त्यांनी प्रेमाने पार पाडली होती. मुळात २०, २५ वर्षांपूर्वी त्या भागात जास्त घरही नव्हती आणि माणुसकी सुद्धा आत्ताच्या पेक्षा कैक जास्त प्रमाणात होती. बहुदा घरांची संख्या वाढल्यावर माणुसकी शेजारधर्म कमी होत जातो.

आज इतक्या वर्षानंतरही मला काकूंचं नाव आठवत नाही पण चेहरा असा समोर उभा राहतो. कपाळावर असलेलं गोंदण, हातात २, ४ काचेच्या बांगड्या, सिंथेटिकच्या साडीचा एक कमरेला खोचलेला. अर्धवट कुरळ्या केसांचा मागे बांधलेला बुचडा. सतत कामात, कुठेतरी जायच्या घाईत असणाऱ्या काकूंच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालेलं मी कधी पाहिलं नाही, म्हणजे ते घर सोडून जाताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं ते प्रसन्न हसू तसचं होतं. आपल्या मुलांचं जन्म बालपण जिथे पाहिलं ते घर सोडताना सुद्धा त्या तेवढ्याच तटस्थ होत्या. संसाराला हातभार म्हणून त्या घरगुती शिकवण्या घ्यायच्या. पण त्यात पैसे कमवण्यापेक्षा, वेळेचा उपयोग करून घेणं,  अडल्या नडल्याला मदत करणं हा हेतू जास्त होता. दर वर्षी वारीला जाणाऱ्या लोकांना फळं , फराळाचं द्यायला काकू नेहेमी पुढं असायच्या.

मला त्यांच्या घरच्या भाज्या आवडायच्या म्हणून खास काही केलं की एक वाटी हमखास आमच्या कडे यायची. कधी तरी सणासुदीला, दारावरच्या जाईचा गजरा गुंफून द्यायच्या. कधी खूप गुलाबाची फुलं आली म्हणून आणून द्यायच्या. पेरू तर न मागता मिळायचेच. हा सगळा व्यापार चालायचा आमच्या तारेच्या कुंपणामधून. आम्ही आमचं घर त्यांच्या भरवशावर सोडून किती तरी वेळा बाहेरगावी जायचो. मी लक्ष देईन तुमच्याकडे तुमच्या घराकडे म्हणणारी माणसं दुर्मिळ झालीत एवढं मात्र खरं.

आज इतक्या वर्षानंतरही खूप काही बदलूनही काकू, त्यांचं घर, ती बाग डोळ्यासमोरून जात नाही. आता तिथे आलेले नवे शेजारी, त्यांचा सुरेख बंगला , शेजारपण सगळं चांगलं असूनसुद्धा जुन्या आठवणी पुसल्या जात नाहीत एवढ मात्र खरं. काकूंच्या करण्यात, देण्यात घेण्यात कोणताच कधी स्वार्थ नव्हता. सहजभाव होता. आता जेव्हा प्रत्येकाचं जगणं वागणं घड्याळ हेतूशी जुळलेलं असतं तेव्हा हे असे निर्भेळ क्षण देणारे लोकं आठवण करून देत रहातात आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदी क्षणांची. शेवटी काय या क्षणांनीच आयुष्य सुंदर होत असतं ना ?
 © मानसी होळेहोन्नुर

No comments:

Post a Comment