Wednesday, February 17, 2016

पारणं

कधीतरी मी बोलून जाते वेडेवाकडे काहीतरी, आणि तू फक्त चमकून बघतोस माझ्याकडे,
मग मी समजून जाते काय ते,
 आता असेल तोंडावर कारल्याची चव, डोळ्यात  पिवळट लाल झाक आणि ओठ होऊन जातील मलूल,
मी वाट बघत असेन तुझ्या मौनाच्या पारन्याची आणि तू धुमसत असशील आतल्या आत,
राग येतो म्हणून स्वतावरच चिडत असशील आणि आणि राग उतरत नाही म्हणून अजून जास्त पेटत असशिल… 

भीतीच वाटते मला तुझ्या या मौनाच्या उपवासांची,
बोल रे काहीतरी, शिव्या घाल, मार झोड कर, तुझे माझे नाते संपले असे खोटे खोटे तरी म्हण 
पण 
हे उपवास म्हणजे न तपासणे तुला आणि मला, 
जमवून आणावे लागते परत पहिल्या पायरीपासून, 
जिथे तू मला सांगितली होतीस मेथीची भाजी परतून कशी करायची 
आणि तिथेच मी तुला सांगितले होते संध्याकाळच्या उतरणीला तुझी दाढी झक्कास दिसते…। 

बसते मग मी एकेक पायऱ्या चढत, आठवते मग तू ऐकवलेली बापटांचि कविता, साहिरच्या गजला , 
आणि भसाड्या आवाजात तू गायलेली तलत, मुकेश ची गाणी,

चायला पायऱ्या संपायची भीतीच वाटते, कारण आठवणीतला तू तरी असतोस बोलत माझ्याशी, 
डोळे होतात आपोआप बंद, आणि नकळत मी देवालाच साकडे घालू लागते, संपव बाबा याचा उपवास आता,

आणि मग देवासारखा तूच येतोस धावून मारतोस एक मिठी आणि म्हणतोस राणी प्रसाद दे, उपवास सोडायची वेळ झाली … 

Monday, February 15, 2016

प्रेम

हृदयात प्रेम घेऊन आपण
चालत असतो प्रेमाच्या शोधात,
अजून जास्तीचा हव्यास आपल्याला
आणून सोडतो आयुष्याच्या अंतात

आपल्याला प्रेम मोजायचे असते
काळाच्या, वेळेच्या हिशोबामध्ये,
पण प्रेमाला राहायचे असतं
अविनाशी क्षणांच्या कोंदणामध्ये

केवळ घेतच राहिल्यामुळे
अडगळीच्या खोल्या भरून जातात
नंतर कधीतरी लक्षात येतं
कोठीच्या खोल्या रिकाम्याच असतात

आपल्याला आपल्या सोयीने
प्रेम करायला वेळ हवा असतो,
बंधनापलीकडच्या चौथी मितीच्या
कायम प्रेम शोधात असतो

एकाच एक सुखी रंग
आपल्याला प्रेमात हवा असतो,
 प्रेमाला मात्र आयुष्यात
रंगोत्सव फुलवायचा असतो

आपण आपल्या इच्छा आकांक्षा
घेऊन प्रेम करू पाहत असतो
आणि प्रेम मात्र
स्वतंत्र अस्तित्वासाठी झगडत असतो

खरतर आयुष्य असतो
आपल्याच हृदयापर्यंतचा प्रवास
जमला तर प्रेमाची सार्थकता
नाही तर जन्मभराची तगमग त्रास