Monday, May 22, 2017

शोध स्वतःचा !

सुट्टी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातही काम करणाऱ्या, गृहिणी असणाऱ्या साऱ्याच बायकांना ही उन्हाळ्याची सुट्टी अगदी हवीहवीशी वाटत असते ती अनेक कारणांनी. मुलांच्या अभ्यासाचं, शाळेचं असं कोणतंच कारण नसतं. माहेरपण अनुभवण्यासाठी, भटकण्यासाठी ही एक उत्तम संधी असते. मग काही जण कुटुंबाची एकत्र अशी एखादी सहल काढतात, ह्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी म्हणून एखादे थंड हवेचे ठिकाण मग ते भारतातील असो व परदेशातील सहल.काही जन तिर्थस्थळाना भेट देतात. पण उन्हाळ्यात एखादी तरी सहल होतेच. रोजच्या त्याच त्या रुटीन पासून थोडा बदल म्हणून काही तरी हवेच असतं. हा असा स्थान बदल, एक नवीन तरतरी मिळवून देतो. या अशा सहलींमध्येच एक नवा ट्रेंड रुजत आहे बायकांच्या एकटीच्या सहली !
कुटुंबासोबत सहलीला गेलं तरी बायकांच्या मागच्या अनेक गोष्टी सुटत नाहीत, मुलांना वेळेवर खायला देणं, सामान नीट लावून घेणं, मुलांकडे बघणं अशा एक न अनेक गोष्टी असतातच त्यामुळे अनेक बायकांसाठी हे असं फिरायला जाणं म्हणजे फक्त जागेचा बदल असतो, घरामध्ये जे करतो तेच बाहेरही येऊन करायचं, फरक एवढाच की इथे स्वैपाक आयता मिळतो आणि कामवाली आज येईल की नाही याची फिकीर करावी लागत नाही. कितीही घरात, मुलांमध्ये जीव असला तरी बाईला थोडा स्वतःचा वेळ देखील हवाच असतो. त्यामुळेच फक्त बायकांच्या सहली जशा जोर धरू लागल्या आहेत तशाच एकट्या प्रवास करणाऱ्या बायकांची संख्या देखील वाढत आहे.
खरंच सतत दुसऱ्यांचा विचार करत जगणाऱ्या बाईला स्वतःच्या मनासारखं जगायला मिळतं का? कुटुंबासोबत सहलीला जाताना बायकांना विचारलंदेखील जात नाही, अगदी साधं हॉटेल मध्ये गेल्यावर सुद्धा आईला, बायकोला काय हवं आहे, तिला काय खायचं आहे हा प्रश्न येतंच नाही, अनेकदा मुलंच हे सारे प्रश्न सोडवतात किंवा उरलेल्या ठिकाणी घरातले पुरुष! अनेक कमावत्या बायका, मुली एकटं फिरायला आजकाल बाहेर पडतात याचं कारण हे देखील असावं. सारी माहिती ऑन लाईन मिळवून, वेगवेगळ्या ब्लॉगच्या आधाराने अनेक जणी स्वतःच स्वतःच्या सहलींच आयोजन करतात. सावधानी बाळगण्यासाठी अनेकवेळा b&b मध्ये राहणं पसंत करतात. b&b म्हणजे बेड आणि ब्रेकफास्ट ची सोय देणारी घरं. अशा अनेक वेबसाईटस आहेत ज्यावर आपण ही बुकिंग करू शकतो. या अशा ठिकाणी शक्यतो कुटुंब रहात असल्या कारणाने सुरक्षेचा फारसा प्रश्न येत नाही. त्याच बरोबर स्थानिक पदार्थांचा आस्वाद देखील घेता येतो. आणि हे हॉटेल मधे राहण्यापेक्षा किफायतशीर देखील पडतं.
साऱ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी विसरून एकट , किंवा ग्रुप मध्ये फिरताना अनेक गोष्टी नव्यानी कळतात. स्वतःशी एका वेगळ्या पद्धतीने संवाद साधला जातो. स्वतःमधल्या क्षमतांची नव्याने ओळख होते. त्याचबरोबर एक अहंकार देखील गळून पडतो. अनेक वेळा बायकांना वाटत असतं त्यांच्याशिवाय घर चालूच शकणार नाही. पण आपल्या गैरहजेरीत घराची घडी विस्कटते पण तरीही घर सुरु असतं. त्यामुळे माझ्यावाचून कोणाचं काही अडत नाही हे कळतंच पण आपण नसल्याचा परिणाम घरावर झाला आहे हे देखील दिसत असतं. अनेक टूर्स कंपन्या देशातच नव्हे तर परदेशातही अशा फक्त बायकांच्या सहली आयोजित करतात, आणि तिथे बायका आपली वय विसरून धमाल गंमती करतात. आयुष्यात राहून गेलेल्या अनेक गोष्टी करण्याची मजा अनुभवतात.
परदेशात अनेक जण एकेकटा प्रवास करत असतात, लोनली प्लॅनेट सारखी पुस्तके हाताशी धरून पुरुष, बायका वेगवेगळे खंड, वेगवेगळे देश फिरतात. भाषा येत नसलेल्या प्रांतात जाऊन तिथली संस्कृती समजून घ्यायचा प्रयत्न करतात. नवे नवे अनुभव गाठीला बांधतात. अनेकदा असा एकटा प्रवास करणाऱ्यांना तुम्हाला भीती वाटत नाही का असा प्रश्न विचारून लोकच जास्त घाबरवतात. एकटे फिरताना अनेक गोष्टींचे व्यवधान सांभाळावं लागतं पण त्याचबरोबर माणुसकीचे वेगवेगळे रंग, पुस्तकाबाहेरचे अनुभव देखील अनुभवता येतात हे ही तितकंच खरं. असं एकट फिरणाऱ्याना कोणत्याही गायडेड टूर शिवाय प्रवास करणाऱ्यांना लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून फिरावं लागतं. अनेकदा अपेक्षा नसलेल्या ठिकाणी जास्त आपुलकी बघायला मिळते. एकट्या फिरणाऱ्या बायकांबद्दल तर समाजात कुतूहलाबरोबरच एक प्रकारचं प्रश्नार्थक आश्चर्य पण असतं. म्हणजे एखादी बाई अशी एकटी सगळ्या गोष्टी कशा करू शकेल इथ पासून ते तुम्हाला कोणी काही केलं तर इथपर्यंत.
क्वीन चित्रपटामुळे तर एकट्या फिरणाऱ्या महिलांना जणू ग्लॅमरच मिळालं. जर एखादी लग्न तुटलेली सामान्य मुलगी एकटीच युरोप फिरू शकते तर आपण आपला देश का नाही? मग ट्रीपलिंग सारख्या वेब सीरिअल मुळे याला अजून खात पाणी मिळालं. कधी सोबत नाही म्हणून, कधी नवा अनुभव घ्यायचा म्हणून, कधी गरज म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांनी पहिला सोलो प्रवास होतो, आणि मग त्यातली मजा आवडायला लागते आणि मग सुरु होतो एकट्यानी प्रवास करण्याचा नवा प्रवास. स्वतःला शोधण्यासाठी, नव्यानी भेटण्यासाठी, स्वतःवर, आयुष्यावर नव्यानी प्रेम करण्यासाठी एकदा तरी घराचा उंबरठा एकटीनी ओलांडून पहा, परत तुमच्या जगात याल तेव्हा अजून जास्त प्रेम, अनुभव, नात्यांचे दोर जास्त घट्ट करतील.

जग फिरणं, नवीन माणसांना भेटणं हे एक प्रकारचं शिक्षणचं असतं. या शिक्षणाला कोणताही अभाय्साक्रम नसतो, पदोपदी परीक्षेची वेळ असते, आणि पास नापास असा कोणताच पर्याय नसतोच, तुम्ही फक्त पुढे जायचं असतं. एक स्त्री जेव्हा असा प्रवास एकटीने करते तेव्हा तिला सोबत करत असतात तिच्या आतल्या अंतःप्रेरणा, आणि एक व्यक्ती म्हणून त्या तिला अजून जास्त समृद्ध करत असतात. हे स्वानुभवाचे बोल आहेत. मग हा अनुभव घेण्यासाठी कधी करताय तुमची बॅग पॅक? सुट्टीचे दिवस अजून संपलेले नाहीत, तेव्हा टेक अ ब्रेक, अँड मीट युअरसेल्फ...  
(महाराष्ट्र टाईम्स २२ मे २०१७ )

Sunday, May 7, 2017

आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव... माऊलींग!

Mawlynnong.
मेघांचे घर असणाऱ्या मेघालयाच्या बद्दल खूप कुतूहल होतं. भारतातले ईशान्येकडचे महत्वाचं राज्य. सैन्य दलाच्या दृष्टीनेही अतिशय महत्वाचं ठिकाण. गारो, खासी, जयंतिया या जमातीच्या लोकांमध्ये विभागलेले राज्य. भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणं जिथे आहेत त्या राज्यात पाणी आणि हिरवा रंग यांना काही कमी नसणार एवढेच मनात ठेवून शिलॉंग च्या प्रवासाला सुरुवात केली. घाटाघाटातून वळणारे रस्ते, प्रत्येक वळणावर एक नवा निसर्ग समोर दाखवत होते. आता घाट संपला आता सरळ रस्ता सुरु होईल असं वाटत असतानाच नवी चढण सुरु होते. भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव याच राज्यात आहे, ते बघण्याची खूप इच्छा होती. माऊलीन्नोंग गाव म्हणजे अगदी बांगलादेशाच्या सीमेवर लागून असलेलं गाव. साध ९२ घरांचं गाव.वस्ती असेल एक ६०० च्या आसपास. या गावाबद्दल बरंच वाचलं होतं, त्यामुळे बघायची उत्सुकता पण होती. मेघालय मधे







खूप डोंगर दऱ्या असल्यामुळे रस्ते बांधणं सोपं नाही, त्यामुळे अनेक गावं रस्त्यांनी जोडलेली आहेत पण आपापसात जोडली गेलेली नाहीत, म्हणजे चालत एखाद्या गावाला जायला अर्धा तास लागत असेल तर रस्त्यांनी देखील तेवढाच वेळ लागू शकतो, कारण, तुम्हाला पूर्ण वळसा घालून जावं लागतं. हे गाव देखील तसंच. नकाशावर अगदी जवळ दिसणारं पण रस्त्यानी गेलं तर बराच वेळ लागणारं. या गावापर्यंत रस्ता जातो, आणि त्याच रस्त्यानी परत हमरस्त्याला लागता येतं.
गावात गेल्याबरोबर एंट्री फी कम पार्किंग फी म्हणून पन्नास रुपये घेतले, तेव्हा क्षणभर वाटलं, स्वच्छ गाव बघण्याचा अजून एक कर! गाडी लावून जेव्हा गावात फेर फटका मारायला गेले तेव्हा सुरुवातीला बाकीच्या गावांपेक्षा फार काही वेगळे नाही दिसलं. म्हणजे इथे प्रत्येक गावातच सिमेंटची पायवाट दिसते, कारण पाऊस इतका प्रचंड पडतो, तो ही जवळपास वर्षातले ६, ७ महिने त्यामुळे माती, डांबर कधीच वाहून जातं. पण मग फिरता फिरता जाणवलं, इथे प्रत्येकानी घराच्या बाहेर कुंपण म्हणून झाडंच लावली होती. प्रत्येकानी आपलं घर आणि बाग उत्तम राखली होती. अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं वाटेवर सुद्धा लावली होती. जागोजागी बांबूच्या टोकऱ्या लावल्या होत्या. म्हणजे बघायला येणाऱ्या लोकांनी देखील त्यांचा कचरा त्या टोकऱ्यामध्ये टाकावा. कपडे वाळत घालताना देखील नीट नेटेकेसे होते. व्यवस्थितपणा इतका टोकाचा की डायपर देखील चिमटा लावून वाळायला ठेवले होते.
चालतानाच जिथे घरं संपली तिथे एक मस्त मोठ्ठ मैदान होतं. आणि दोन गोल पोस्ट. जर कधी काळी भविष्यात भारत फुटबॉल विश्वचषकात खेळलाचा तर तो अशा छोट्या छोट्या गावांमधल्या फुटबॉलवेड्यांमुळे असेल हे नक्की. जेव्हा तिथल्या काही लोकांशी बोलले तेव्हा कळल, की गावातल्या प्रत्येक घरात  LPG चे कनेक्शन आलेलं आहे, घरात चूलही वापरतात, आणि त्या चूल वापरण्यामुळे घरातला ओला कचरा हा अनेकदा त्या चुलीमध्येच वापरला जातो. आमच्या गावात प्रत्येकाच्या घरात संडास आहे हे सांगताना त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा अभिमान त्याला जाणवलेलं महत्व सांगून गेला. गाव स्वच्छ राहावं म्हणून त्यांनी पाळीव प्राण्यांवर खास करून डूक्करांवर प्रतिबंध घातलेला आहे. ज्यांना गायी, किंवा इतर प्राणी पाळायचे असतील त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर गाव खराब होऊ न देता करायचे असतात. ६०० लोकसंख्येच्या त्या गावात एक आठवीपर्यतची शाळा देखील आहे. या गावाच्या जवळच लिव्हिंग रूट ब्रिज म्हणजे झाडांच्या मुळांनी तयार झालेला पूल आहे तो बघायला येणारे अनेक जण या गावाला देखील भेट देतात. त्यामूळे इथे देखील होम स्टे वाढले आहेत.  त्यातल्या एकाच नाव फारच गंमतीशीर होतं, बांगलादेश व्ह्यू होम स्टे. मान्य आहे या गावातून बांगलादेश दिसतो, पण जमीन पठारावर असणाऱ्या आपल्या शेजाऱ्याच्या नावाच्या त्या होम स्टे की मात्र गंमत वाटली.

मेघालयच्या इस्ट खासी हिल्स जिल्ह्याच्या इतर गावांप्रमाणे या ही गावात विड्याची पाने, सुपारी, झाडू ( त्याबद्दल एक स्वतंत्र प्रकरण लिहिणार आहे) हे होतात, तसेच काळी मिरी, पांढरी मिरी , तमाल पत्र यांची देखील शेती होते. खासी बहुल या भागात ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे. कदाचित सुबत्तेमुळे असेल पण या गावात सिमेंटची घर जास्त दिसली. पैसा सुबत्ता आली की आपण निसर्गाला विसरून त्या पैशांनी जास्तीत जास्त महाग मोलाचं काही कसं घेता येईल याचा जास्त विचार करायला लागतो असंही  जाणवलं. स्वच्छ गाव हे फक्त शाळेतल्या प्रयोगांमध्ये, किंवा पुस्तकात नसतं. आखीव रेखीव टुमदार गाव हे फक्त स्वप्न नसतं. हे सगळं बघण्यासाठी अनुभवण्यासाठी तरी एकदा माउलीन्न्ग ला भेट दिलीच पाहिजे. 

Thursday, May 4, 2017

मेघालय डायरी १

शाळेत असताना भूगोलामध्ये वाचलं होतं मेघालयात गारो, खासी आणि जयंतिया टेकड्या असतात. तिथल्या लोकांच्या जमातीवरूनच ही नावे पडली आहेत. केरळ सोडून फक्त मेघालयात असलेली मातृसत्ताक पद्धती. नावानुसारच ढगांचं घर असलेलं राज्य, आणि त्यामुळेच पावसाचा वरदहस्त असलेलं मेघालय, इतका पाउस की भारतातलं सर्वात जास्त पाउस नोंदवलेलं ठिकाण देखील याच राज्यात आहे. या सगळ्यामुळेच हे राज्य कायम एक कुतूहलाचा विषय होतं. काही दिवसानापुर्वी इथे एका गावात राहण्याचा योग आला होता. कोणतही शहर जसं स्वतः चालून बघितल्याशिवाय त्याचं दर्शन घडवत नाही तसचं कोणतीही संस्कृती ही प्रत्यक्ष्य राहायचा अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही.
मेघालय, आसाम च्या शेजारचं राज्य. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी एक. ख्रिश्चन बहुसंख्य असलं तरी स्वतःची एक वेगळी संस्कृती जपणारं राज्य. शिलॉंग ही या राज्याची राजधानी भारतीय हवाई दलाचं मोठा तळ इथे आहे. ज्याप्रमाणे आसामी संस्कृतीवर बांगला छाप दिसून येते तशी या राज्यावर इंग्रजांची छाप दिसून येते. आज इंग्रज जाऊन आता ६७ वर्षे झाली असली तरी देखील शिलॉंग शहरात त्यांच्या खुणा जागोजागी मिळतात. मग ते क्रिकेट सोडून फुटबॉल खेळणं असो किंवा पारंपारिक लोकसंगीताबरोबरच रॉक संगीतावर यांचे पाय थरकतात. शिलॉंग ला भारताची रॉक संगीताची राजधानी मानलं जातं. शिलॉंग या अराज्याच्या राजधानीच्या शहरात संमिश्र लोकसंख्या आढळते, खासी, गारो, पनार या स्थानिक जमातीच्या लोकांबरोबरच बंगाली, आसामी आणि थोड्या फार प्रमाणात बिहारी लोकांचं अस्तित्व जाणवतं. शहरात कुठेही भाषेचा अडसर जाणवत नाही, हिंदी, इंग्रजी कोणतीही भाषा वापरून सहज फिरता येतं. उंचसखल भागेत वसलेलं गाव असल्यामुळे कित्येक घरांचे पहिला मजला खालच्या रस्त्यावर तर दुसरा मजला वरच्या रस्त्यावर आलेला आहे. शहरातले रस्ते रुंदीला फारसेवाढवणे शक्य नसल्यामुळे वाहतुकीला आपोआपच शिस्त आलेली आहे. गाडीचालक साऱ्या नियमांचे पालन करतात, कारण जर एकानी चूक केली तर त्याचा परिणाम बाकीच्या गाडीवाल्यांना भोगावा लागून वाहतूक खोळंबून राहते हे स्वनुभावानी सगळ्यांना माहीत झालेलं आहे.
जसजसे शिलॉंग मधून बाहेर पडावे तसे वळण वाटांचे रस्ते सोबत अजूनच घट्ट करतात. सुंदर हिरवे डोंगर आणि त्या हिरव्या रंगाला मध्येच छेद देणारे पांढरे शुभ्र धबधबे हे साऱ्या मेघालय चं वैशिष्ट्य. गारो, खासी आणि जयंतिया या तीन टेकड्यांमुळे इथे पाऊस अडवला जातो आणि त्यामुळे इथली जंगलं कायम हिरवीगार राहतात. इथला स्थानिक माणूस आजही शेतीत रमतो, त्यांच्या स्थानिक सणांमध्ये गातो, नाचतो, पारंपारिक भात, भाज्या, मांसाहार करतो. पर्यटनाच्या नकाशावर आलेली गावं वगळता आजही इथली गावातली लोकं हिंदी इंग्रजी पासून लांब आहेत, बाहेरच्या लोकांमध्ये ते बुजतात. जरी इथे ख्रिश्चन बहुभाषिक असले तरीही इंग्रजी सगळीकडे समजली जाते असं नाही. आपण उगाचच भाषा आणि धर्म यांची सांगड घालतो, खरंतर त्या दोन वेगळ्या गोष्टी. आताशा खाजगी मोबाईल कंपन्या सर्वदूर पसरल्या आहेत आणि त्यांचे इंटरनेट, खासगी वाहिन्यांचे जाळे पसरत चालले आहे त्यामुळे हिंदी मालिका बघितल्या जातात. उर्वरित भारताशी त्यांचा संपर्क होत असतो तो याच माध्यमातून. आता आता अनेक गावांतून मुलं शिक्षणासाठी तालुक्याच्या गावाला, शिलॉंगला गेलेत, किंवा काही आसाम, भारताच्या इतर भागातही जाऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळे गावांची नावे अगदीच अनोळखी नसतात.
शहरांमध्ये असणाऱ्या औपचारिकता गावांमध्ये नसतात, तिथे सगळाच मोकलेधाकळे असतं. त्यामुळेच पहिल्याच भेटीत मला एक दोन जणांनी माझं वय विचारलं, तर त्यानंतर लग्न झालंय का? हिंदी मालिका, आणि चित्रपट बघितल्याचे परिणामस्वरूप मला त्या लोकांनी लगेच मग मी ‘मांग मध्ये सिंदूर’ नाही लावत म्हणून देखील विचारलं. मग मी मंगळसूत्र घालते सांगितल्यावर म्हणजे सगळेच नॉन ट्राईबल्स सिंदूर लावत नाही का असंही विचारलं, आणि मला ऐकायला खूप मजा वाटली. धर्म, भाषा, यावरून खूप वेळा माझं वेगळेपण दाखवलं गेलं होतं पण यावेळी या सर्वांपेक्षा मी त्यांच्या जमातीची नसणं हे अधोरेखित करून इतर जमातीची प्रतिनिधी म्हणून बघितलं जात होतं. खूप सारे प्रश्न तिथल्या डोळ्यांमध्ये, ओठांमध्ये होते, तोडक्या मोडक्या मालिकांमधून शिकलेल्या हिंदी मधून ते मला विचारत होते, आणि माझी उत्तरं समजून घेत होते. सगळ्यांचा एकाच लाडका प्रश्न होता मी कोणकोणत्या अभिनेत्यांना, अभिनेत्र्यांना भेटले. मला अनेक नवीन गाणी येत नाही हे पाहून त्यांना माझ्या भारतीय चित्रपटविश्व अज्ञानाची कीव येऊन त्यांनी मला बरीच नवीन गाणी शिकवली, आणि कोणा कोणाचं कोणाकोणाशी अफेअर सुरु आहे हे सुद्धा सांगितलं. त्याचबरोबर एकीनी सांगितलं दीदी मला रणबीर कपूर आवडत नाही कारण त्यानी कॅटरीना कैफ ला नाही म्हणलं.
असं म्हणतात की क्रिकेट, आणि सिनेमा या दोन गोष्टी भारतात कोणालाही जोडू शकतात. याची परत एकदा खात्री पटली. रस्ते फक्त गावं जोडण्याची कामं नसतात करत. ते त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनाही जोडत असतात. या राज्यात सरकारी वाहतूक व्यवस्था फारशी दिसत नाही, तिथे जीप, अल्टो तत्सम गाड्यांमधून वाहतूक होत असते. खरंतर इथली ती वाहतूक बघून या कार कंपन्या त्यांची जाहिरात देखील बदलू शकतात, कारण आल्तो गाडी ८ माणसांना घेऊन आरामात घाट चढते आणि उतरते. आणि आरामात गाडीचं आतच जागा हवी असं काही नसतं, लोकं बाहेरच्या कठड्यांना, टपावर बसून देखी हसत प्रवास करतात. मेघालयातच नव्हे तर आसाम, अरुणाचल प्रदेश मध्ये देखील रस्ते अतिशय उत्तम आहेत. त्या सगळ्या रस्त्यांवरून हसत प्रवास करणाऱ्या साऱ्या लोकांना बघून साहजिकच एक सहज हसू तोंडावर उमटतं आणि मग  तिथल्या माणसांशी मन जोडायला वेळ लागत नाही. कारण शब्दांपेक्षा हसणं जास्त प्रभावी संवादक असतं.