Showing posts with label महाराष्ट्र टाइम्स. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र टाइम्स. Show all posts

Monday, May 22, 2017

शोध स्वतःचा !

सुट्टी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातही काम करणाऱ्या, गृहिणी असणाऱ्या साऱ्याच बायकांना ही उन्हाळ्याची सुट्टी अगदी हवीहवीशी वाटत असते ती अनेक कारणांनी. मुलांच्या अभ्यासाचं, शाळेचं असं कोणतंच कारण नसतं. माहेरपण अनुभवण्यासाठी, भटकण्यासाठी ही एक उत्तम संधी असते. मग काही जण कुटुंबाची एकत्र अशी एखादी सहल काढतात, ह्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी म्हणून एखादे थंड हवेचे ठिकाण मग ते भारतातील असो व परदेशातील सहल.काही जन तिर्थस्थळाना भेट देतात. पण उन्हाळ्यात एखादी तरी सहल होतेच. रोजच्या त्याच त्या रुटीन पासून थोडा बदल म्हणून काही तरी हवेच असतं. हा असा स्थान बदल, एक नवीन तरतरी मिळवून देतो. या अशा सहलींमध्येच एक नवा ट्रेंड रुजत आहे बायकांच्या एकटीच्या सहली !
कुटुंबासोबत सहलीला गेलं तरी बायकांच्या मागच्या अनेक गोष्टी सुटत नाहीत, मुलांना वेळेवर खायला देणं, सामान नीट लावून घेणं, मुलांकडे बघणं अशा एक न अनेक गोष्टी असतातच त्यामुळे अनेक बायकांसाठी हे असं फिरायला जाणं म्हणजे फक्त जागेचा बदल असतो, घरामध्ये जे करतो तेच बाहेरही येऊन करायचं, फरक एवढाच की इथे स्वैपाक आयता मिळतो आणि कामवाली आज येईल की नाही याची फिकीर करावी लागत नाही. कितीही घरात, मुलांमध्ये जीव असला तरी बाईला थोडा स्वतःचा वेळ देखील हवाच असतो. त्यामुळेच फक्त बायकांच्या सहली जशा जोर धरू लागल्या आहेत तशाच एकट्या प्रवास करणाऱ्या बायकांची संख्या देखील वाढत आहे.
खरंच सतत दुसऱ्यांचा विचार करत जगणाऱ्या बाईला स्वतःच्या मनासारखं जगायला मिळतं का? कुटुंबासोबत सहलीला जाताना बायकांना विचारलंदेखील जात नाही, अगदी साधं हॉटेल मध्ये गेल्यावर सुद्धा आईला, बायकोला काय हवं आहे, तिला काय खायचं आहे हा प्रश्न येतंच नाही, अनेकदा मुलंच हे सारे प्रश्न सोडवतात किंवा उरलेल्या ठिकाणी घरातले पुरुष! अनेक कमावत्या बायका, मुली एकटं फिरायला आजकाल बाहेर पडतात याचं कारण हे देखील असावं. सारी माहिती ऑन लाईन मिळवून, वेगवेगळ्या ब्लॉगच्या आधाराने अनेक जणी स्वतःच स्वतःच्या सहलींच आयोजन करतात. सावधानी बाळगण्यासाठी अनेकवेळा b&b मध्ये राहणं पसंत करतात. b&b म्हणजे बेड आणि ब्रेकफास्ट ची सोय देणारी घरं. अशा अनेक वेबसाईटस आहेत ज्यावर आपण ही बुकिंग करू शकतो. या अशा ठिकाणी शक्यतो कुटुंब रहात असल्या कारणाने सुरक्षेचा फारसा प्रश्न येत नाही. त्याच बरोबर स्थानिक पदार्थांचा आस्वाद देखील घेता येतो. आणि हे हॉटेल मधे राहण्यापेक्षा किफायतशीर देखील पडतं.
साऱ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी विसरून एकट , किंवा ग्रुप मध्ये फिरताना अनेक गोष्टी नव्यानी कळतात. स्वतःशी एका वेगळ्या पद्धतीने संवाद साधला जातो. स्वतःमधल्या क्षमतांची नव्याने ओळख होते. त्याचबरोबर एक अहंकार देखील गळून पडतो. अनेक वेळा बायकांना वाटत असतं त्यांच्याशिवाय घर चालूच शकणार नाही. पण आपल्या गैरहजेरीत घराची घडी विस्कटते पण तरीही घर सुरु असतं. त्यामुळे माझ्यावाचून कोणाचं काही अडत नाही हे कळतंच पण आपण नसल्याचा परिणाम घरावर झाला आहे हे देखील दिसत असतं. अनेक टूर्स कंपन्या देशातच नव्हे तर परदेशातही अशा फक्त बायकांच्या सहली आयोजित करतात, आणि तिथे बायका आपली वय विसरून धमाल गंमती करतात. आयुष्यात राहून गेलेल्या अनेक गोष्टी करण्याची मजा अनुभवतात.
परदेशात अनेक जण एकेकटा प्रवास करत असतात, लोनली प्लॅनेट सारखी पुस्तके हाताशी धरून पुरुष, बायका वेगवेगळे खंड, वेगवेगळे देश फिरतात. भाषा येत नसलेल्या प्रांतात जाऊन तिथली संस्कृती समजून घ्यायचा प्रयत्न करतात. नवे नवे अनुभव गाठीला बांधतात. अनेकदा असा एकटा प्रवास करणाऱ्यांना तुम्हाला भीती वाटत नाही का असा प्रश्न विचारून लोकच जास्त घाबरवतात. एकटे फिरताना अनेक गोष्टींचे व्यवधान सांभाळावं लागतं पण त्याचबरोबर माणुसकीचे वेगवेगळे रंग, पुस्तकाबाहेरचे अनुभव देखील अनुभवता येतात हे ही तितकंच खरं. असं एकट फिरणाऱ्याना कोणत्याही गायडेड टूर शिवाय प्रवास करणाऱ्यांना लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून फिरावं लागतं. अनेकदा अपेक्षा नसलेल्या ठिकाणी जास्त आपुलकी बघायला मिळते. एकट्या फिरणाऱ्या बायकांबद्दल तर समाजात कुतूहलाबरोबरच एक प्रकारचं प्रश्नार्थक आश्चर्य पण असतं. म्हणजे एखादी बाई अशी एकटी सगळ्या गोष्टी कशा करू शकेल इथ पासून ते तुम्हाला कोणी काही केलं तर इथपर्यंत.
क्वीन चित्रपटामुळे तर एकट्या फिरणाऱ्या महिलांना जणू ग्लॅमरच मिळालं. जर एखादी लग्न तुटलेली सामान्य मुलगी एकटीच युरोप फिरू शकते तर आपण आपला देश का नाही? मग ट्रीपलिंग सारख्या वेब सीरिअल मुळे याला अजून खात पाणी मिळालं. कधी सोबत नाही म्हणून, कधी नवा अनुभव घ्यायचा म्हणून, कधी गरज म्हणून अशा वेगवेगळ्या कारणांनी पहिला सोलो प्रवास होतो, आणि मग त्यातली मजा आवडायला लागते आणि मग सुरु होतो एकट्यानी प्रवास करण्याचा नवा प्रवास. स्वतःला शोधण्यासाठी, नव्यानी भेटण्यासाठी, स्वतःवर, आयुष्यावर नव्यानी प्रेम करण्यासाठी एकदा तरी घराचा उंबरठा एकटीनी ओलांडून पहा, परत तुमच्या जगात याल तेव्हा अजून जास्त प्रेम, अनुभव, नात्यांचे दोर जास्त घट्ट करतील.

जग फिरणं, नवीन माणसांना भेटणं हे एक प्रकारचं शिक्षणचं असतं. या शिक्षणाला कोणताही अभाय्साक्रम नसतो, पदोपदी परीक्षेची वेळ असते, आणि पास नापास असा कोणताच पर्याय नसतोच, तुम्ही फक्त पुढे जायचं असतं. एक स्त्री जेव्हा असा प्रवास एकटीने करते तेव्हा तिला सोबत करत असतात तिच्या आतल्या अंतःप्रेरणा, आणि एक व्यक्ती म्हणून त्या तिला अजून जास्त समृद्ध करत असतात. हे स्वानुभवाचे बोल आहेत. मग हा अनुभव घेण्यासाठी कधी करताय तुमची बॅग पॅक? सुट्टीचे दिवस अजून संपलेले नाहीत, तेव्हा टेक अ ब्रेक, अँड मीट युअरसेल्फ...  
(महाराष्ट्र टाईम्स २२ मे २०१७ )

Thursday, November 10, 2016

घरोघरी साड्यांची म्युझियम

“ अगं मी यावर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या साड्याच्या निमित्ताने मी एक मस्त गुलाबी रंगाची पैठणी घेतली आणि दिवाळी साठी म्हणून काळी चंद्रकळा. तू काय घेतलेस नवीन?” एक बस मध्ये एक जण दुसरीला विचारत होती.
“हो ग मी पण  नऊ दिवस त्या नवरात्रीच्या रंगांच्या रेशमी साड्याच नेसते, यावेळी पांढरी साडी नेमकी नव्हती बघ, आणि कित्ती दिवसापासुन एक संबळपूर सिल्क घ्यायची होती मग काय एक पांढरी किरमिजी बॉर्डर ची संबळपूर सिल्क घेऊन आले. दिवाळीला बाई आम्ही सोनेच घेतो.” माझा स्टॉप आल्यामुळे मी उतरले आणि माझी पुढची साडी खरेदी, रेशमी साड्यांचे प्रकार, नवरात्रीचे नऊ रंग, सोन्याची खरेदी अशी मिळणारी वेगळी माहिती माझी हुकली.

लग्नामध्ये मिळणाऱ्या ५ मानाच्या साड्या, आहेरात मिळणाऱ्या साड्या यापासून कित्येक जणींच्या साड्यांचा प्रवास सुरु होतो, तसं त्या आधी हौस म्हणून, किंवा जवळच्या कोणत्या तरी लग्नासाठी म्हणून घेतलेल्या साड्या असतात, पण बहुतांश जणींच्या रेशमी साड्यांच्या संग्रहाची सुरुवात मात्र होते ती लग्नापासूनच! सध्याचा जमाना डिझाईनर साड्यांचा असला, तरी पारंपारिक रेशमी, सुती  साड्या आजही त्यांचे महत्व टिकवून आहेत. मग चेन्नईला गेलं की कांची सिल्क किंवा कांजीवरम घेणं हे मरीना बीच बघण्यापेक्षाही महत्वाचं काम असतं. पैठणी अगदी नाक्यावरच्या दुकानात मिळत असली तरी येवल्यावरून आणलेल्या पैठणीची बातच न्यारी असते. आपल्याकडे नाही बाई मिळत एवढे रंग आणि प्रकार पैठण्यांचे म्हणत एखादी सहज ३, ४ पैठण्या येवल्यावरून येता जाता घेते.

साडी हा साडी नेसणाऱ्या आणि ना नेसणाऱ्या सगळ्याच जणींचा अगदी खास चर्चेचा विषय असतो, न नेसणाऱ्या  हे एक काहिअतरी अवघड जटील प्रकरण आहे म्हणून बघतात, रोज घालणाऱ्या आमचाच जास्त हक्क याच्यावर बोलण्याचा म्हणून बोलून घेतात, आणि कधी मधी साडी नेसणाऱ्या, मिरवणाऱ्या #100dayssareepact करतात, किंवा परदेशात साडी नेसून लक्ष वेधून घेतात. त्या अमुक अमुक अभिनेत्रींनी परदेशात नेसलेल्या साड्यांचे तर भारतातच नव्हे तर परदेशातही कौतुक होत असते. साडी नेसल्याचा पहिला पुरावा सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये मिळाला, म्हणजे ख्रिस्त पूर्व २८००-१८०० च्या सुमारास, सुरुवातीस फक्त सुती साड्या होत्या, नंतर रेशमाचा शोध लागल्यावर रेशमी साड्या तयार होऊ लागल्या, गेल्या शतकापासून तर कृत्रिम धाग्यांपासून बनवलेल्या साड्यांची देखील चलती सुरु झाली आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, आणि क्वचित ठिकाणी श्रीलंकेमध्ये सुद्धा साड्या वापरल्या जातात.

भारतात प्रत्येक राज्याची अशी स्वतंत्र साडी संस्कृती आहे, म्हणजे फक्त साड्यांचा प्रकार नव्हे तर साडी घालण्याच्या पद्धती देखील, महाराष्ट्रीयन, बंगाली, गुजराथी, कोंकणी, केरळी, माडीसार( तमिळ अय्यांगरी ९ वारी साडी), निवी (आंध्र प्रदेशातली), कोडगू (कुर्गी पद्धतीची ), आसामी, मणिपुरी, खासी असे अनेक पारंपारिक प्रकार तर आहेतच पण डिझाईनर साड्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या पदधतीने आजकाल नेसवल्या जातात.  

जसं तामिळनाडू म्हणल्याबरोबर बायकांना कांजीवरम, उत्तरप्रदेश म्हणाल्यावर बनारसी, लखनवी साड्या, आंध्र प्रदेश म्हणल्यावर नारायणपेट, धर्मावरम, मंगलगिरी, उप्पडा, वेंकटगिरी सिल्क, गडवाल, मध्य प्रदेश मधील चंदेरी, माहेश्वरी साड्या, राजस्थान गुजराथ मधील बांधणी, गुजराथ मधीलच पटोला, बंगाल मधील सुती साड्या, कांथा सिल्क साड्या, बांगलादेश मधील मलमलच्या साड्या, टसर सिल्क, आसाम मधील मूगा सिल्क,  संबळपूर, बेहरामपूर सिल्क, इक्कत या ओरिसा मधील साड्या, कर्नाटकातील म्हैसूर सिल्क, आणि इरकल, केरळ मधील पारंपारिक ऑफ व्हाईट, सोनेरी काठाच्या साड्या काश्मीर मधील सिल्क साड्या, पंजाब मधील फुलकारी किंवा हातानी विणकाम केलेल्या साड्या, बघावी तेवढी यादी वाढत जाते. यातल्या प्रत्येक ठिकाणी भेट दिल्यावर एखादी साडी घेणं हे भारतीय एकात्मतेसाठी गरजेचंच असतं.

भारतामध्ये पर्यटन किंवा गावोगावी लागणाऱ्या मेळाव्यांमध्ये गेला बाजार आपल्या शहरांमधल्या दुकानांमध्ये यातल्या बऱ्याचशा प्रकारच्या साड्या मिळतातच, आणि याखेरीज अनेक प्रकारच्या साड्यांनी दुकानं कायम भरलेली असतात, मग कधी रंग आवडला म्हणून, कधी काठ आवडले म्हणून, कधी पदरावरची नक्षी आवडली म्हणून, कधी हा रंगच माझ्याकडे नाही, किंवा ही रंगसंगती नाही. कधी सगळ्या जणी एक सारख्या साड्या घेऊ म्हणून घेतलेली, कधी, ( बऱ्याच वेळा ?) भेट म्हणून आलेल्या साड्या, अशा साऱ्या साड्यांनी कपाट वाहून चाललेलं असतं, तरीही साडीचा मोह हा कधी सुटत नसतो, रस्त्यावर सहज फिरताना, किंवा कोण एकीच्या अंगावरची साडी आवडली म्हणून साडीची खरेदी कधीच थांबत नसते.

साड्या बायकांना एकत्र जोडतात,  त्यांच्यात संभाषणं तयार करवतात, नैसर्गिक औत्सुक्याला खतपाणी घालतात भौगोलिक, भाषिक अंतर मिटवतात, पुरुषांना बायकांचं मन जिंकण्याची सोपी संधी देतात, संस्कृती जपण्याचे, जोपासण्याचे कामा करतात, हस्त शिल्प कारागिरांना उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देतात, बायकांचे सौंदर्य खुलवतात. इतकं सगळं करणाऱ्या बहुगुणी साड्या जरा चुकून जास्तच असल्या घरात तर काय झालं, शेवटी मनाजोगती साडी मिळाली तर बाई खुश, बाई खुश तर घर खुश आणि घर खुश तर दुनिया सलामत. सहा वारांमध्ये लपलेली असतात किती तरी गुपितं, वर्षे गेली, साडी विरली तरी तशीच जपलेली त्यामुळेच घरोघरची साड्यांची कपाट फक्त कपाट नसतात ती असतात साड्यांची म्यूझियम.


Thursday, September 22, 2016

आई गं ची जागा...


एका भारतीय पद्धतीचे पुरुषांचे कपडे बनवणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत बाप आणि मुलगा दाखवले होते. स्वातंत्रदिनासाठी मुलाला झब्बा घालायचा होता, आई कुठेतरी दुसरीकडे गेली होती, अशी काहीशी जाहिरात होती ती. मुळात पुरुषांसाठीच्या कपड्यांच्या जाहिराती मध्ये बाईचे नसणं हाच एक सुखद धक्का होता, त्यात वडील मुलाची काळजी घेत आहेत हे पाहणं म्हणजे सोनेपे सुहागा होतं. जाहिराती ह्या समाजमनाचा आरसा समजल्या जातात. त्यामुळे आईच्या अनुपस्थितीत मुलाला सांभाळणारे, त्याला तयार करून देणारे बाबा आजूबाजूला वाढले असणार अशी एक खात्री झाली.

मुलांचे संगोपन ही जणू निसर्गानेच मादी जमातीवर सोपवलेली जबाबदारी आहे असं फक्त मनुष्य प्राण्यातच नव्हे इतर प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये देखील समजलं जातं.  अर्थात नियमाला अपवाद असतात तसेच पेंग्विन, rhea प्रकारचे शहामृग, समुद्री घोडे, काही प्रकारचे मासे, बेडूक, असे काही बाबा लोक आहेत जे मुलांचे संगोपन करतात, यातले काही जण तर चक्क पिल्लांची अंडी त्यांच्या, पोटात, तोंडात, अंगावर ठेवतात. हे सारे जणू अपवादाने नियम सिद्ध होतो अशा पंथातले. पण मनुष्य प्राण्यांमध्ये हे चित्र थोडे थोडं बदलताना दिसतंय. म्हणून तर सरकारी नोकरीतल्या कर्मचाऱ्यांना १५ दिवसाची पितृत्व रजा मिळते जी बाळहोण्याआधी पासून ते  झाल्यापासून सहा महिन्यापर्यंत कधीही घेता येते. सरकरी तजवीज झाली, पण या सोयीचा उपयोग किती बाबांनी खरोखरीच मुलांच्या गरजेसाठी करून घेतला हा ही एक संशोधनाचा विषय आहे.

पुरुषाने घराबाहेर ची कामं करायची, आणि बाईनी घराच्या चार भिंतींच्या आतली, हा समज आता बर्यापैकी मोडीत निघतोय, त्यामुळे चित्रपटातही घरबशा  नवरा, आणि नोकरी करणारी बायको असं बघायला मिळतंय. तसंच शहरांमध्ये कित्येक हॉस्पिटलमध्ये आता आईच्या शेजारी उभं राहून बाळांना नॅपी घालणारे, त्यांचे कपडे बदलणारे बाबा दिसायला लागलेत. हे चित्र अगदी प्रातिनिधीक नसलं तरी मनोवृत्तीतला बदल टिपणार नक्की आहे. मुलांसोबत डॉक्टर कडे जाणारे बाबा देखील आता नवीन राहिले नाहीत. पाश्चात्य देशांमधल्या काही चांगल्या गोष्टी आपल्याकडे रुजतात आहेत. आई वडील दोघांनी अगदी समसमान जबाबदारी नाही पण जबाबदारी वाटून घेतली जात आहे.

अगदी तान्हं मुल असो वा शाळा, कॉलेज मध्ये जाणारी मुलं त्यांच्या परीक्षा, आजारपण यावेळी आईची हमखास सुट्टी पडते, किंबहुना ती आईनीच घेतली पाहिजे असा मानसिक, सामाजिक दबाव स्त्रियांवर असतो. चुकून एखाद्या पुरुषाने अशी रजा घेतली तर त्याच्या बायकोला मुलांकडे दुर्लक्ष करते असं ऐकावं लागतं. खरं पाहिलं तर मुलांचे संगोपन ही आई वडील दोघांची जबाबदारी असते, त्यामुळे मुलांच्या प्रत्येक गरजेच्या वेळी आईनीच घरी थांबलं पाहिजे असं नसतं. खास करून नोकरी करणाऱ्या आयांमध्ये तर हा खूप मोठा गंड असतो, जणू आपण नोकरी करतो त्यामुळेच मुलं आजारी पडतात, किंवा त्यांच्या शाळा, त्यांच्या शाळाबाह्य गोष्टी जपणं, जोपासणं ही जणू फक्त आईचीच जबाबदारी असते. नोकरी न करणाऱ्या ऐअला तर बिचारीला कोणतीच सबब नसते. घरातल्या बाकीच्या साऱ्यांचे करायचे, आजारी मुलाबरोबरच, दुसरं मूल असेल तर त्याला बघायचं, अशा वेळी खरंच जोडीदाराकडून मदतीची अपेक्षा असते. कधी कधी अशा वेळी मनात विचार देखील येतो, मुलाच्या जन्माचे कारण झालं की पुरुष मोकळेच असतात. मुलाला नाव वडिलांचं लागतं, नावं ठेवताना मात्र आईचे नाव पुढे येते.

परदेशात पितृत्वाची राजा ही हक्काची मानली जाते, कारण तिथं आपल्यासारखी बळकट कुटुंबव्यवस्था किंवा समाजसंस्था नाही. त्यामुळे ओघानं वडिलांवर देखील बाळाची जबाबदारी येते. स्वीडन मधेय ही पितृत्व राजा सुरु केल्यापासून घटस्फोटाच प्रमाण कमी झालं, यावरून तिथल्या समाजरचनेचा अंदाज येऊ शकतो. आपल्या देशात स्त्रियांसाठी १२ आठवड्याची मातृत्व रजा असते, मात्र सरकारी कर्मचारी वगळता खाजगी कंपन्यांमध्ये पितृत्व रजेची तरतूद फारशी आढळत नाही, आणि याचं एक कारण म्हणजे आपली मानसिकता! पुरुषांनी घराची कामं, स्वैपाक (हॉटेल मध्ये पुरुष आचारी चालतो मात्र घरात नाही ), मुलांचे संगोपन करणं या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक बघितलं जात नाही, आणि कित्येक पुरुषांनाही ह्या सगळ्या गोष्टी करताना कमीपणा वाटतो. जेव्हा आपण कारण ठरलेल्या जीवाची जबाबदारी घेणं म्हणजे फक्त त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करणं इतकाच नसतं हे समाजात मान्य होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आई बाबा दोघंही मुलांच्या जडण घडणीला हातभार लावतील. पुरुषांना या गोष्टी जमणारच नाहीत, त्यांना आवडत नाहीत, ही त्यांची कामं नाहीत हे असे सगळे समाज पुसले जातील तेव्हा कदाचित मातृत्व रजा सारखी पितृत्व रजेची गरज भासेल, कोणी सांगाव त्यासाठी एखादं आंदोलनही भविष्यात उभं राहू शकतं.   

एखादा नवीन बाबा हौसेनं मुलाचं काही करायला घेतो तेव्हा त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया येते ती त्याच्या आईकडून, कधी त्यात कौतुक असतं, तर कधी असूया! आताच्या पेरेंटिंगच्या क्लास ला जाणाऱ्या, जग निम्मं फिरलेल्या, किंवा बघितलेल्या बाबा लोकांना देखील मुलाची दुपटी बदलावीशी वाटतात, आपल्यामुळे या जगात आलेल्या जीवाला अंगा खांद्यावर खेळवता खेळवता खायला प्यायला घालावंसं वाटतं. आणि जेव्हा खरंच असं घडतं तेव्हा नकळत स्पर्शातून बाळापर्यंत ते प्रेम पोहोचत असतं. आणि असं जेव्हा सगळीकडे व्हायला लागेल, प्रत्येक बाबा रजा मिळू, ना मिळू, पण वेळ काढून मुलांना वेळ देईल तेव्हा काहीही लागलं, दुखलं खुपलं तर सहज तोंडातून बाहेर पडणारं ‘आई ग’ ची जागा ‘ए/ओ बाबा’ घ्यायला वेळ लागणार नाही.

Thursday, September 15, 2016

माहेरीचा भोपळा मज कलिंगड भासे



लग्न झाल्यावर मुलगी फक्त घर बदलत नाही, तर तिचं नाव, कधी कधी शहर , देश सुद्धा, नोकरी, सवयी थोडक्यात काय तर स्वतःचे आयुष्य बदलवून टाकत असतात. वर्षानुवर्षे जे नाव लावत आलो, ते सोडायचे (अलिकडे ही प्रथा कमी होत चालली आहे.) त्याही पेक्षा ज्या पद्धतीचं आपण जेवण खात आलो, ते सोडून अचानक काही तरी वेगळंच आपल्या पुढ्यात येत असतं. नवीन घर, नवीन माणसं, नवीन अन्न कशालाच काही बोलता येत नाही. क्वचित प्रसंगी, नवऱ्याला काही आवडी निवडी माहित असतात, मग तो सांभाळून घेतो. जसं प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येक घर वेगळ असतं तसंच प्रत्येक घराची खाद्यसंस्कृतीही वेगळी असते. अगदी एकाच गावातली दोन घरं असली, नात्यातले असले तरी थोडे फार फरक जाणवतातच. मग आंतरजातीय, आंतरधर्मीय, किंवा आंतरराष्ट्रीय लग्न असली तर विचारायलाच नको. आपण म्हणतो १२ मैलावर पाणी आणि वाणी बदलते. तसंच खायच्या चवी सुद्धा बदलतात आणि या चवीपांयी अनेकदा नात्यांची चव जाऊ शकते किंवा नाती अधिक चवदारही होऊ शकतात.

घाटावरची मुलगी सून म्हणून  विदर्भात येते आणि सासू तिला विचारते, ‘उपासाला उसळ चालेल ना?’ ती ओरडायच्याच बेतात असते, परंतु सावरून विचारते, ‘उसळ?’ मग सासू पण लक्षात येऊन म्हणते, ‘अग तुम्ही साबुदाण्याची खिचडी म्हणताना? तेच गं, त्यालाच इकडे, उसळ म्हणतात.’ ती नवीन सून हसू दाबत म्हणते, ‘बरं बरं यापुढे लक्षात ठेवेन.’ मग अशातच कधी कधी तरी दक्षिणेकडे इडली सोबत खातात तो सांबार वेगळा, आणि विदर्भाकडे भाजीवालीकडे मिळणारा सांबार म्हणजे कोथिंबीर वेगळी, हे तिच्या लक्षात येतं. जेवतानाही अशीच गंमत उडते. कधीतरी सासू म्हणते चटणी दे आणि सून आणून देते तिखट. कधी दक्षिणेकडची सून म्हणते ‘आज मी नाश्त्याला केशरी भात करते’ सगळे ‘अरे बापरे सक्काळी सक्काळी भात?’ म्हणेपर्यंत समोर येतो शिरा. आलू बोंडा आणि बटाटेवडा एकंच, हे खाल्ल्यावर कळतं. ही तर फक्त नावांची हेराफेरी आहे, कृतीमधल्या वैविध्यांवर आपली भारतीय खाद्यसंस्कृती टिकून आहे हे खरं असलं तरी त्या वैविध्यांसह नाती टिकवून ठेवणं हे सासुरवाशींनीपुढे मोठं आव्हान असतं.

नवीन घरात गेल्यागेल्या स्वैपाकघराचा ताबा सुनेकडे लगेच न देण्याचं एक कारण हेही असतं, की वर्षानुवर्षे त्या घरातल्या लोकांची एक चव ठरलेली असते. तिखटाचं प्रमाण, मिठाची रुची, स्वैपाक करायची पद्धत ही सवयीनुसार आखली गेलेली असते. नवीन आलेल्या सुनेच्या खाण्याच्या सवयी, स्वैपाक(येत असल्यास ) करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, काही घरात कांद्याशिवाय भाजी केलीच जात नाही, तर काही घरात  ज्यात त्यात चिंच वापरली जाते, काही घरात गूळ/साखरेशिवाय स्वैपाक पूर्ण होत नाही. दुधी भोपळ्याची भाजी फक्त चना डाळ घालून खाणारी माणसं एकदम दुधी भोपळा मुगाच्या डाळीसोबत बघून गोंधळतात. त्यामुळे अल्पमतातल्या सूनबाईना एकदम बहुमत तरी मिळतं किंवा त्यांना  प्रशिक्षणासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी दिला पाहिजे,असं ठरतं.

आपल्या तिखट मिठाच्या कल्पना, जिभेचं वळण हे वर्षानुवर्षे एकाच प्रकारचं खाल्यामुळे ठरत असतात. त्यामुळे मुलगी लग्नानंतर एका रात्रीत त्या घरातले मसाले, स्वैपाक आपलासा करू शकत नाही तशीच  त्या घरातली माणसंही नवी चव एक रात्रीत आपलीसी करू शकत नाहीत. मोजून मापून स्वैपाक करणाऱ्या असतात तसाच अंदाजाने स्वैपाक करणाऱ्या देखील असतात. एखाद्या घरात आयत्यावेळी आलेला पाहुणा सपादला जावा (म्हणजे समाविष्ट करया यायला हवा) या बेतानं थोडा जास्त स्वैपाक केला जातो तर एखाद्या घरात पोळीचा (पोळी म्हणावं की चपाती!) तुकडाही शिल्लक राहू नये असा दंडक असतो. प्रत्येक घरात काळा, गोडा मसाला वापरत जात असला  तरी त्याचं प्रमाण बदलत असतं. त्यामुळं अनेकदा, सासूच्या हाताची चव अगदी  तश्शीच्या तशीच कृती करणाऱ्या सुनेच्या हाताला येत नाही. पण मग त्या प्रयत्नात एखादी नवीन चव जन्माला येते, जी, कदाचित आधीच्या चवीपेक्षाही सरस असते. कधी सासू सुनेकडून काही शिकते, तर कधी सून सासूच्या हाताखाली अगदी तयार होऊन जाते. स्वैपाकाच्या या आदानप्रदानामुळे कित्येदा नव्या पदार्थांचा शोध लागतो. इतिहासात अनेक नवे पदार्थ कदाचित असेच जन्माला आले असावेत.


आपण घरात रुळतो म्हणजे खरं तर त्या घरातल्या चवीला सवयीचे होतो, किंवा त्या चवीत आपली चव मिसळून देऊन त्या घराच्या खाद्यसंस्कृतीचा भाग होऊन जातो. हे रुपांतर कधी दर्शनीय असतं तर कधी अदृश्य असतं. जसं दुध एकच असतं, पण त्याच दुधाचं, दही, ताक, श्रीखंड, तूप, खवा, पनीर, बासुंदी सगळं कसं वेगवेगळ्याच चवीचं असतं. तसचं आहे आपल्या स्वैपाकाचं. हळू हळू नव्या मसाल्यांची, नव्या चवीची सवय होते, मग ते ही आवडायला लागतं. आपण काय शेवटी जिभेचे चोचले पुरवले गेले की खुश असतो, पण ज्या घरात नव्या जुन्या चवींची सरमिसळ समजूतीनं आणि उत्तम रितीनं होते, तिथं आनंद फुलतो. त्या घरात सासू सुना एकाच स्वैपाकघरात भांड्याला भांड लागूनही आवाज येऊ न देता काम करत नवी खाद्यसंस्कृती जन्माला घालत असतात. मात्र काहीही झालं तरी सासूरवाशीणीच्या मनात माहेराची चव ठाण मांडून बसलेली असतेच आणि माहेरी आल्या आल्या ती आईला, आई तुझ्या हातची अळूची भाजी करना गं..असा लाडिक आदेश देते. ‘माहेरीचा भोपळा मज कलिंगड भासे...’ म्हणतात ते काय उगीच? परतुं दरम्यान तिच्या माहेरीही नवी सून आलेली असते आणि तिथंही चवींची सरमिसळ सुरू झालेली असते. ही सरमिसळ हेच तर आपल्या जगण्याचं रसायन आहे.