सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच विषय चर्चिला जात आहे. ‘जगातल्या सगळ्या देशांना भेट देणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री कोण?’ अमेरिकेत जन्मलेल्या ५५ वर्षीय वोनी स्पॉट यांनी अलीकडेच, मेमध्ये ७ खंडांतील १९५ देशांना भेट दिल्याचे जाहीर केले. त्याच वेळी जेसिका नबोंगो या अमेरिकेत जन्मलेल्या पण मूळ युगांडाच्या असलेल्या कृष्णवर्णीय स्त्रीनेही ‘मीच जगातील प्रत्येक देशाला भेट देणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री असेन,’ असा दावा केलाय.
३४ वर्षांच्या जेसिकाचे जगभ्रमण तिच्याही नकळत तिच्या आई-वडिलांबरोबर सुरू झाले होते. २९ मार्च २०१८ मध्ये तिने बालीमधून तिच्या इन्स्टाग्रामवर लिहिले होते, की तिने आजवर १०६ देशांना भेट दिली आहे, आणि तिला अजून ८९ देशांना भेट द्यायची आहे. मे २०१९ पर्यंत हे पूर्ण करून तिला ‘जगातील प्रत्येक देशाला भेट देणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री’ व्हायचे होते. तिने आजवर भेट दिलेल्या प्रत्येक देशातला फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर टाकला होता. त्याचबरोबर ब्लॉगवर ती तिच्या प्रवासाबद्दलही लिहीतच होती. अमेरिकेत जन्मलेल्या जेसिकाचे शिक्षण ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये झाले. त्यानंतर काही काळ तिने ‘युनो’मध्येदेखील काम केले. अमेरिकी पासपोर्ट बरोबरच तिच्याकडे युगांडाचा पासपोर्टदेखील आहे. हा लेख लिहून होईपर्यंत तिने १८० देशांना भेट दिली होती. सीरिया, येमेनसारख्या युद्धग्रस्त देशांना भेट द्यायला तिच्या ‘युनो’मधल्या ओळखीचा तिला फायदा झाला. तिने ठरवलेले उद्दिष्ट मे मध्ये नाही पण ऑक्टोबर २०१९ मध्ये पूर्ण होईल. पण त्याआधीच वोनीने दावा केला आहे, की तिने जेसिकाच्या आधीच १९५ देशांना भेट दिलेली आहे.
वोनीने अनेक वर्षांपूर्वीच विविध देशांची भ्रमंती सुरू केली. निमित्त होते एका माहितीपटाचे. ९०च्या दशकात अनेक देशांमध्ये तिने फिरायला सुरुवात केली होती. पण त्या माहितीपटाच्या दिग्दर्शकाचे अकाली निधन झाले आणि तो प्रकल्प तिथेच थांबला. पण तिचे फिरणे काही थांबले नव्हते. २०१४-२०१८ या काळात तिने उरलेल्या ३३ देशांनादेखील भेट दिली. तिच्याकडे या भेटींचेच फक्त फोटो आहेत. भेटींशिवाय जुने कोणतेच फोटो नाहीत. तिने कधी कोणत्याही सोशल मीडियावरदेखील तिच्या भेटींचे वृत्तांत प्रसिद्ध केले नाहीत. तिच्या मते हे माझ्या स्वत:च्या आनंदासाठी करत होते, त्यामुळे मला याची माहिती जपून ठेवावी, कोणाला तरी सतत सांगावीशी वाटली नाही.
एक आहे जेसिका, जिने प्रवास करताना सगळे फोटो, पुरावे म्हणून ठेवले आहेत तिच्यावर विश्वास ठेवायचा की पहिल्यांदा कामानिमित्त आणि नंतर स्वांतसुखाय प्रवास करणाऱ्या, त्याचे पुरावेही मागे न ठेवलेल्या वोनीवर? वोनीने आपण कृष्णवर्णीय आहोत हे दाखवण्यासाठी स्वत:चा डीएनए अहवालसुद्धा प्रसारमाध्यमां- समोर ठेवलाय. वोनी म्हणते, ‘‘मी हे आत्ता केवळ जेसिकाचे श्रेय हिरावून घेण्यासाठी बोलले असे नाही. जेसिकाने नक्कीच एक चांगले उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. माझे सातही खंड फिरून झाले असले तरीही मला अजून फिरायचे आहे.
प्रवासाने माणसाला अनुभव मिळतात आणि अनुभवाने चातुर्य. वोनीचा दावा मान्य होईल, की जेसिकाचा, हा तसा वादाचा आणि पुराव्यांचा मामला. पण जगभ्रमणाने त्यांचे आयुष्य समृद्ध केले असणार हे नक्की.
यशस्वी लढा
‘‘आयुष्यात सगळ्यात जास्त भीती वाटायची ती कर्करोगाची. २००६ ची ही गोष्ट आहे. माझ्या एका जवळच्या मित्राच्या बायकोला कर्करोग झाला होता. त्याच वेळी माझ्या नात्यातल्या एका काकांनादेखील कर्करोग असल्याचे कळले. माझ्याच शहरात राहणाऱ्या माझ्या दोन जवळच्या लोकांना कर्करोगाने गाठले होते हा योगायोग नसावा, असा माझा ठाम विश्वास होता. मी यामागे काय कारण असू शकते हे शोधायचा प्रयत्न केला तेव्हा मला आमच्या गावाच्या जवळच असलेले कचऱ्याचे डिम्पग ग्राऊंड आठवले. त्या ठिकाणी रासायनिक कचरा आणि वैद्यकीय कचरा वेगळा करून पुरला जायचा आणि त्यावर नवीन कचरा यायचा. या कचऱ्यामुळे आमच्या भागात कर्करोगाचे प्रमाण वाढले होते, हे आम्ही ३५ वर्षांची माहिती मिळवून सिद्ध केले. अशा वातावरणात खासकरून ८ प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते, हे आम्ही शास्त्रीयदृष्टय़ा दाखवून दिले. न्यायालयात या लढय़ाचे काय होईल याची फिकीर न बाळगता आम्ही पूर्ण शक्तीने लढलो, अर्थात निकाल आमच्याच बाजूने लागला. त्या जागेवरती फक्त आमच्याच नव्हे तर आजूबाजूच्या देशांतून येऊन टाकला जाणारा कचरा न्यायालयाच्या आदेशाने थांबला होता.’’ २०१६ मध्ये ‘गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल फाउंडेशन’चा पुरस्कार मिळवणारी झुझुना कॅपिटोव्हा तिने दिलेल्या लढय़ाबद्दल अशी भरभरून बोलते. आता झुझुनाकडे बोलायला आणि करायला खूप गोष्टी आहेत, कारण वयाच्या केवळ ४५व्या वर्षी ही जबाबदारी सांभाळणारी ती स्लोव्हाकियाची पहिली स्त्री आणि तरुण राष्ट्राध्यक्ष झाली आहे. स्लोव्हाकिया कम्युनिस्ट रशियाचा भाग असताना जन्मलेली, महाविद्यालयामध्ये असताना आवश्यक ती कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यामुळे तिला मानसशास्त्राऐवजी कायद्याचा अभ्यास करावा लागला होता. बेकायदेशीररीत्या मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्याविरुद्ध तिने न्यायालयात कायदेशीर लढाई केली. त्याआधी निदर्शने केली, लोकांचा पाठिंबा मिळवला, माहिती गोळा करून पुरावे शोधले. या सगळ्या गोष्टी करताना तिच्या विरोधातले माफियाही शांत नव्हते, त्यांनी साम, दाम, दंड, भेद सगळे प्रकार वापरून बघितले, पण झुझुना बधली नव्हती. तिने ज्या पद्धतीने कचरा माफियांविरुद्ध यशस्वी लढा दिला, तसाच लढा ती देशातला भ्रष्टाचार संपवायलादेखील देईल, असा विश्वास सर्वसामान्य जनतेला वाटतो. त्यामुळेच कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसतानाही या वर्षी झालेल्या निवडणुकीत ५८ टक्के मते मिळवून ती जिंकली. आता तिच्यापुढे फक्त एक गाव, त्याचा लढा नाही तर पूर्ण देश आणि त्याचे प्रश्न असणार आहेत. समलैंगिक संबंधांना पूर्ण संमती देणारी, युरोपमध्ये असल्याचा अभिमान बाळगणारी, झेन योगा गेल्या १३ वर्षांपासून करणारी झुझुना ही स्लोव्हाकियाच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक देशांसाठी एक नवे प्रेरणास्रोत ठरणार आहे. स्त्रियांमध्ये कोणतीही गोष्ट नेटाने करण्याची उपजत शक्ती जास्त असते, त्याच वेळी ‘आपल्या मुलाबाळांचे भविष्य आपणच जपले पाहिजे’ ही मातृत्वाची भावना प्रबळ असल्यामुळेच कदाचित जेव्हा स्त्री नेतृत्व पुढे येते तेव्हा सुधारणा झालेल्या दिसतात. किमान सुधारणा होतील हा विश्वास तरी लोकांमध्ये आलेला असतो. लोकांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी झुझुनाला अनेक शुभेच्छा!
ब्युटी विथ अ डिफरन्स
१९९४ मध्ये एकाच वेळी भारतीय स्पर्धकांनी ‘मिस युनिव्हर्स’ आणि ‘मिस वर्ल्ड’चा सन्मान मिळवल्यानंतर अशा सौंदर्य स्पर्धाकडे गांभीर्याने बघायला सुरुवात झाली. त्यातही हा किताब जिंकणाऱ्या सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या असल्यामुळे अशा स्पर्धा केवळ श्रीमंत, अतिश्रीमंत मुलींसाठीच असतात हा समज मोडीत निघाला. या स्पर्धामध्ये सगळ्याच स्पर्धकांना प्रश्नदेखील विचारले जातात, या प्रश्नांच्या आधाराने या स्त्रिया केवळ सुंदर नसून स्वतंत्र विचार करणाऱ्यादेखील आहेत ना याचा शोध घेतला जातो. आता अशा सौंदर्य स्पर्धामध्ये ‘शो युअर टॅलेंट’ अशीही एक फेरी काही ठिकाणी सुरू झालेली आहे.
मागच्या महिन्यात, जून २०१९ मध्ये अमेरिकेतल्या व्हर्जिनिया राज्यातल्या या वर्षीच्या सौंदर्यवतीचा शोध घेण्यासाठी स्पर्धा झाली. त्यात फक्त बाह्य़ सौंदर्याचे मापक लावण्यापेक्षा स्पर्धकांच्या इतर कलागुणांची माहिती करून घेण्यासाठी एक खास फेरी ठेवली होती. या फेरीत काही स्पर्धकांनी नृत्य करून दाखवले, तर काहींनी ऑपेरा पद्धतीचे गाणे म्हटले, काहींनी पियानो वाजवून दाखवला, काहींनी पपेट शो करून दाखवला. या फेरीत सगळ्यात वेगळी ठरली ती कॅमिल श्रॉयर! २४ वर्षांच्या या तरुणीने सौंदर्यस्पर्धेत आजवर कोणीही केले नसेल असे काहीतरी करून दाखवले. विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असणारी कॅमिल सध्या जीवरसायनशास्त्रामध्ये पीएच.डी. करत आहे. पांढरा कोट, रबरी हातमोजे घालत, डोळ्यांवर गॉगल चढवून तिने काही मिनिटांसाठी तिची प्रयोगशाळा त्या स्टेजवर आणली. तीन वेगवेगळ्या काचेच्या भांडय़ांमध्ये तिने वेगवेगळी रसायने भरून ठेवली होती. हायड्रोजन पॅरॉक्सॉइड आणि पोटॅशिअम आयोडाइड यांचे मिश्रण केले तर विघटन होते आणि फोम तयार होतो हे तिने सर्वाना दाखवले.
‘‘मला लहानपणापासून वैज्ञानिक गोष्टींची आवड होती, त्यामुळे मी त्याचेच शिक्षण घेत आहे. जेव्हा माझ्या आईने मला असा काही प्रयोग या स्पर्धेत करण्याचे सुचवले तेव्हा मी जरा साशंक होते, पण हे आजवर कोणीही केलेलं नसल्यामुळे वेगळे नक्कीच ठरेल याची मला खात्री होती.’’ स्पर्धा जिंकल्यानंतर कॅमिलने तिच्या भावना अशा व्यक्त केल्या. तिच्या या जगावेगळ्या प्रयोगाने तिला ही स्पर्धा जिंकण्यासाठी नक्कीच मदत केली असणार. ‘विज्ञान हे फक्त प्रयोगशाळेत नसून आपल्या अवतीभोवती सगळीकडे असते.’ हेच तिला यातून दाखवून द्यायचे होते. आता ‘मिस अमेरिका’च्या स्पर्धेत ती काय करून दाखवेल याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
‘सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा संगम दुर्मीळ असतो,’ हे पूर्वीचं गृहीतक आजच्या सौंदर्यवतींनी खोटं ठरवलं आहे. तर दुसरीकडे ‘सौंदर्यस्पर्धा म्हणजे शरीराचे प्रदर्शन नव्हे,’ हेदेखील रूढ होत आहे. याआधीदेखील अनेक कृष्णवर्णीय स्त्रियांनी ‘मिस युनिव्हर्स’, ‘मिस वर्ल्ड’सारखे किताब जिंकून ‘गोरा रंग हा सौंदर्याचा निकष नसतो.’ हेच दाखवून दिले होते. आपल्याकडेदेखील कॅमिलसारख्या वेगळा विचार करणाऱ्या सौंदर्यवती पुढे येवोत, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे.
(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)
चतुरंग
२० जुलै २०१९
No comments:
Post a Comment