Wednesday, March 28, 2018

चालणाऱ्या बाईची कहाणी

बोलणाऱ्या बायकांबरोबरच चालणाऱ्या बायकांचा पण एक ट्रड असतो. जसं कधीही न थांबणाऱ्या सतत बोलणाऱ्या, फक्त स्वतःबद्दल बोलणाऱ्या, झोपेतही बोलणाऱ्या, दगडाबरोबरही बोलणाऱ्या अशा वेगवेगळ्या बायका असतात तशाच वजन कमी करण्यासाठी चालणाऱ्या, गप्पा मारता याव्यात म्हणून चालणाऱ्या, मी पण एक्सरसाईज करते दाखवण्यासाठी चालणाऱ्या, वेळ आहे तर थोडून चालून बघावं म्हणून चालणाऱ्या असे अनेक चालणाऱ्या बायकांचे प्रकार कोणत्याही वॉकिंग ट्रॅक वर बघायला मिळतात.
स्वतःला एकदम फिट ठेवायचं आहे या एका दृढ निश्चयाने चालणाऱ्या बायका या चालण्यासाठी खास पोशाख करूनच मैदानात उतरतात, म्हणजे अगदी ट्रॅक पँट टी शर्ट घालतातच असे नाही, पण पायात शूज मात्र आठवणीनी घालतात. कुर्ता, जीन्स, सलवार कमीज, घालून त्यावर शूज नक्की घातलेले असतात. आणि कानात हेडफोन असतात. चालताना यांची नजर एकदम झापडं लावलेल्या घोड्यासारखी असते. या बायकांना स्वतःच्या मागून पुढे गेलेलं कोणी आवडत नाही, झपाझप चालून त्यांना पुढे पुढे जाण्याचे वेध लागलेलं असतात. या गटात फक्त बायकाच असतात असं नाही, तरुणी देखील मोठ्या प्रमाणावर असतात, म्हणजे या गटातल्या बायका सुद्धा स्वतःला तरुणीच समजत असतात. मनाने त्या तरुणच असतात. या तरुणी अर्जुनासारख्या स्वतःला फिट ठेवायचं या एकाच हेतूने चालत असतात, पळत असतात. त्यांनी स्वतःच सारं टाईम टेबल आखलेलं असतं आणि चालण्यात खंड पडू देत नसतात. रिमझिम पाउस असला तर त्या रेनकोट घालून चालायला येतात, थंडी असली तर त्या लाईट जॅकेट घालून येतात, पण चालणं सोडत नाहीत. चालणं हा यांचा एक छंद असतो. चालताना गाणी ऐकत त्या स्वतःशीच संवाद साधू पाहत असतात. स्वतःला उत्तम ठेवणं, डौलदार शरीर राखण्यासाठी त्या योगा, जिमला सुद्धा जातात. खाणं, पिणं झोपणं यासारखच चालणं हे देखील यांच्यासाठी मस्ट असतं.
टाईप टू मधल्या बायका या वजन कमी करण्याच्या निश्चयाने मैदानात उतरणाऱ्या असतात. त्या आपले घरात पडलेले जुने शूज किंवा सँडल्स घालून चालायला सुरुवात करतात, निश्चयाच्या पहिल्या आठवड्यात अगदी नेमाने येऊन मग नंतर हळू हळू गायब होत जातात. या साधारण त्यांच्या सारख्याच विचार करणाऱ्या बायकांच्या शोधात असतात. एकटीने चालायला खूप कंटाळा येतो बाई, सोबत असली तर बरं म्हणत त्या मैत्रिणींच्या घोळक्यात चालत असतात. आपण चालून आपलं वजन कमी करणारच  याची पुरेपूर खात्री असल्यामुळे त्या बाकी कोणतेही डायेट करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. उलट चालून झाल्यावर आलेला थकवा घालवण्यासाठी एखादं सरबत, चाट, मात्र नक्की आठवणीने पितात खातात.
या नंतरच्या चालणाऱ्या बायका म्हणजे घरातून बाहेर पडायची सुवर्ण संधी मानतात अशा. म्हणजे व्यायामाच्या नावाखाली चालणं होतंच, पण चालता चालता मैत्रिणींसोबत मस्त गप्पा होतात, नवीन पदार्थांच्या रेसिपी शेअर केल्या जातात, नवीन कपडे साड्यांच्या बद्दल बोललं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी लागणाऱ्या सेलच्या बद्दल नवीन नवीन माहिती कळते. कुठे काय नवीन आलं आहे, यापासून घरातले प्रश्न व्यक्त होण्याचं उत्तम ठिकाण म्हणजे हे चालण्याचं ठिकाण असतं. एक खिडकी योजनेसारखं, सगळी काही माहिती अशी एकाच ठिकाणी अनेक जणींना मिळत असते. त्यामुळे हे असे बहुगुणी चालणं फारच आवडत असतं. त्यामुळे या बायकासुद्धा अगदी नित्यनेमाने येत असतात चालायला. यांच्यासाठी चालणं हा एक विरंगुळा असतो.
या खेरीज अधूनमधून थोडा बदल म्हणून फिरायला येणाऱ्या, ४ दिवस चालून २ किलो वजन कमी करण्याची स्वप्न पाहणाऱ्या, फोन वर निवांत बोलायला मिळावे म्हणून चालायला येणाऱ्या पण काही कमी नसतात. कारणं काहीही असो, पण या चालणाऱ्या बायकांचं एक वेगळं विश्व असतं. घरातल्या गोष्टींपासून थोडा पळ काढून स्वतःला वेळ द्यायला जरी त्या बाहेर पडल्या तरी घरची कामं, व्यवधानं काही त्यांना सुटत नसतात. चालून खरंच किती जणींची वजनं कमी झाली माहित नाही पण त्यांच्या मनावरची ओझी मात्र हलकी नक्कीच होत असतात.
मानसी होळेहोन्नुर

Thursday, March 22, 2018

गुंता

केसांतून कंगवा फिरवत,
त्यांना घट्ट पकडत त्यांची वेणी घालत तू विचारलंस,
‘तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणजे नक्की काय आहे?’
शर्टच्या गुंड्या लावता लावता मीच गडबडलो,
हे असले प्रश्न म्हणजे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेपेक्षा भयानक,
असाच प्रश्न काही वर्षांपूर्वी मी तिला विचारला होता,
तेव्हा तिला उत्तरं देता आलं नव्हतं,
आणि त्यामुळे एका मोठ्या संकटातून सुटल्यासारखा
मी त्या मैत्रीतून मोकळा झालो होतो,
अजूनही मित्रांमध्ये बोलताना तिचा उल्लेख टाळून बोलतो मी,
तिचं माझ्यावर प्रेम होतं असं म्हणणं होतं तिचं,
पण तिला ते स्पष्ट करता आलं नव्हतं.
आता दशकभर जुन्या बायकोने एकदम
असा काही प्रश्न विचारला म्हणजे नात्याचीच भीती वाटायला लागते.
कुठं काही तुटणार तर नाही ना,
कुठं काही चुकलंय का आपलं,
हजार प्रश्नांचे भुंगे डोक्यात भिरभिरायला लागतात.
उगाच जुनी भांडणं, जुने वाद,
दोन चार दिवसातल्या घटना आठवायला लागतात.
खालीवर लागलेली बटण नीट लावत बायको म्हणते,
प्रत्येक प्रश्नाचं उत्तरं असतंच आणि आपल्यालाच सापडतं असं नसतं,
काही गोष्टी असतात म्हणून असतात,
उगाच त्यांची कारणं शोधू नये.
बयो हेच उत्तरं तिने तेव्हा हातावर हात ठेवून दिलं होतं.
आता तू छातीवर हात ठेवून दिलंस,
मी अजूनही गोंधळातच आहे,
प्रेम तिचं माझ्यावर होतं, की माझं तुझ्यावर आहे
की माझं माझ्यावर आहे?
बिचकत मी तिचा हात हातात घेतला, आणि म्हणालो,
तू माझं उलटपालट झालेलं आयुष्य नीट लावतेस,
त्यामुळे जगणं सोपं होतं,
सोप्या जगण्यात आनंद वाटतो,
तो आनंद म्हणजे माझं तुझ्यावरच प्रेम असावं...
ती हसत म्हणाली,
‘फसलास गड्या, ते सगळं झूट आहे,
गेल्या दहा वर्षात मी तुला कधीच कोणत्याच गोष्टीचा जाब विचारला नाही,
जबाबदारी टाकली नाही,
या सगळ्याची कृतज्ञता म्हणजे तुला माझ्याबद्दल वाटतं ते प्रेम आहे.’
माझ्या मोठ्या डोळ्यांकडे बघत ती म्हणाली,
‘तू मला आवडतोस, तुला मी सहन करू शकते,
तुझ्या सगळ्या गोष्टीत आनंद मानून घेते, ते माझं प्रेम आहे तुझ्यावरचं’
स्वतःच्या केसांचा गुंता तिने कचरापेटीत टाकला
आणि तिच्या तिच्या कामाला निघून गेली,
कधी कधी काही गोष्टी खऱ्या असल्या तरी
बोलू नयेत आणि बायकोने तर नाहीच नाही
मानसी होळेहोन्नुर

प्रेमवेग

रस्त्याच्या दुसऱ्या टोकाच्या दुकानात उभ्या असलेल्या
माणसाच्या चष्म्याची फ्रेम थेट तुझ्याच चष्म्याच्या फ्रेम सारखी होती,
काल दोन सेकंद शेजारून गेलेल्या माणसाचा परफ्युम
तोच होता ज्याचा वास मी स्वप्नातसुद्धा घेते,
कुरियर द्यायला आलेल्या माणसाचं नाक थेट तुझ्यासारखच होतं,
हे तो गेल्यावर सुध्दा मला चांगलं लक्षात आहे,
परवा तर गल्लीतला बहरलेल्या चाफ्याच्या खाली मला तूच दिसलास,
इमी त्याच्या खाली जाऊन पाहिले तर दोन फुलं पडलेली होती,
पदोपदी तुझे आभास व्हायला लागतात,
जागोजागी तू दिसायला लागतोस,
छोट्या छोट्या गोष्टीत तुझी आठवण यायला लागते,
तुझ्यावाचून गोष्टी अडायला लागतात,
वय वाढता वाढता प्रेम मोठं होत असतं,
दुराव्यात ते तिप्पट वेगानं वाढत असतं...
मानसी

गृहलक्ष्मी

...

ती घरी येते तेव्हा घर असतं पसरलेलं,
उष्टी खरकटी भांडी पडलेली असतात सिंकमध्ये,
काही तासांचा कचरा तसाच पडून वाट बघत असतो तिची,
कधी कधी तर कपडे भिजलेले,
भिजवलेले बादलीत पडून निवांत असतात,
मग ती फिरवते जादूची काडी
आणि सपासप एकेक काम उरकत जाते,
धुतलेली भांडी, पुसलेली लादी,
डब्यात गेलेला कचरा,
दोरीवर वाळणारे कपडे,
घर हसायला लागतं पुन्हयांदा
कपाळावरचा घाम पुसत,
शिळे काहीबाही पोटात ढकलत ती उघडते
दुसरं दार तिथेही असेच काही बाही वाट पाहत असतं तिचं
अशी अनेक वाट पाहणारी दार उघडून झाल्यानंतर
ती येते स्वतःच्या हक्काच्या दारात,
जादूच्या काडीतली जादू ओसरलेली असते,
तरीही ती पदर खोचते, नाहीतर ओढणी घट्ट बांधून घेते,
सारं काही झाक पाक करते,
तेव्हा तिचा खरा दिवस संपतो.
तिच्या घराला ती जास्तीच मायेने गोंजारते,
कारण ते घरच पुरवत असतं
जादू तिच्या काडीत, ते घर आहे म्हणून ती असते उभी
सगळ्यांची घर उभीच ठेवत...!!!!!