Thursday, March 22, 2018

गुंता

केसांतून कंगवा फिरवत,
त्यांना घट्ट पकडत त्यांची वेणी घालत तू विचारलंस,
‘तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणजे नक्की काय आहे?’
शर्टच्या गुंड्या लावता लावता मीच गडबडलो,
हे असले प्रश्न म्हणजे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेपेक्षा भयानक,
असाच प्रश्न काही वर्षांपूर्वी मी तिला विचारला होता,
तेव्हा तिला उत्तरं देता आलं नव्हतं,
आणि त्यामुळे एका मोठ्या संकटातून सुटल्यासारखा
मी त्या मैत्रीतून मोकळा झालो होतो,
अजूनही मित्रांमध्ये बोलताना तिचा उल्लेख टाळून बोलतो मी,
तिचं माझ्यावर प्रेम होतं असं म्हणणं होतं तिचं,
पण तिला ते स्पष्ट करता आलं नव्हतं.
आता दशकभर जुन्या बायकोने एकदम
असा काही प्रश्न विचारला म्हणजे नात्याचीच भीती वाटायला लागते.
कुठं काही तुटणार तर नाही ना,
कुठं काही चुकलंय का आपलं,
हजार प्रश्नांचे भुंगे डोक्यात भिरभिरायला लागतात.
उगाच जुनी भांडणं, जुने वाद,
दोन चार दिवसातल्या घटना आठवायला लागतात.
खालीवर लागलेली बटण नीट लावत बायको म्हणते,
प्रत्येक प्रश्नाचं उत्तरं असतंच आणि आपल्यालाच सापडतं असं नसतं,
काही गोष्टी असतात म्हणून असतात,
उगाच त्यांची कारणं शोधू नये.
बयो हेच उत्तरं तिने तेव्हा हातावर हात ठेवून दिलं होतं.
आता तू छातीवर हात ठेवून दिलंस,
मी अजूनही गोंधळातच आहे,
प्रेम तिचं माझ्यावर होतं, की माझं तुझ्यावर आहे
की माझं माझ्यावर आहे?
बिचकत मी तिचा हात हातात घेतला, आणि म्हणालो,
तू माझं उलटपालट झालेलं आयुष्य नीट लावतेस,
त्यामुळे जगणं सोपं होतं,
सोप्या जगण्यात आनंद वाटतो,
तो आनंद म्हणजे माझं तुझ्यावरच प्रेम असावं...
ती हसत म्हणाली,
‘फसलास गड्या, ते सगळं झूट आहे,
गेल्या दहा वर्षात मी तुला कधीच कोणत्याच गोष्टीचा जाब विचारला नाही,
जबाबदारी टाकली नाही,
या सगळ्याची कृतज्ञता म्हणजे तुला माझ्याबद्दल वाटतं ते प्रेम आहे.’
माझ्या मोठ्या डोळ्यांकडे बघत ती म्हणाली,
‘तू मला आवडतोस, तुला मी सहन करू शकते,
तुझ्या सगळ्या गोष्टीत आनंद मानून घेते, ते माझं प्रेम आहे तुझ्यावरचं’
स्वतःच्या केसांचा गुंता तिने कचरापेटीत टाकला
आणि तिच्या तिच्या कामाला निघून गेली,
कधी कधी काही गोष्टी खऱ्या असल्या तरी
बोलू नयेत आणि बायकोने तर नाहीच नाही
मानसी होळेहोन्नुर

No comments:

Post a Comment