Sunday, March 6, 2016

स्वयम्

नेहमीसारखा मी पळत पळत बस स्टॉप गाठला. सकाळी घाईत आरशात बघायला वेळच मिळाला नव्हता. टिकली लावली होती की नाही हे ही आठवत नव्हते. आपण स्वतःकडे किती दुर्लक्ष करतो याचंच मला हसू फुटलं. घड्याळाकडे पाहिलं आणि नंतर नेहेमीचे चेहरे शोधात बसस्टॉपवरून नजर फिरवली. कोपऱ्यात उभा असलेला तो माझ्याकडे पाहून प्रसन्न हसला. मला काहीच कळेना, ओळखीचा म्हणावा तर चेहरा आठवत नव्हताआणि अनोळखी असेल तर उगा कशाला स्माईलदेऊन त्याला भाव द्यायचा. परत मनात आलं. आपल्या गबाळग्रंथी वेशाकडे पाहून तर हसला नसेल ना, आणि मी जवळपासच्या गाडीचा आरसा शोधायला लागले, चेहरा तर ठीक होता, रोजच्यासारखाच, आरशात बघताना काही वेगळ तरी वाटलं नव्हतं, माझा रोजचाच  ओळखीचा चेहरा आरशात दिसला होता. मग तो का हसला? मी प्रश्नावर विचार करत बसची वाट पहात होते. तो ही तिथेच त्याच्या स्मित हास्यासह बसची वाट पाहत होता. त्याचे डोळे काहीतरी सांगू पाहत होते, संवादाची आस लावत होते, या सगळ्यात बस आली आणि गच्च भरलेल्या बस मध्ये मी त्याला विसरूनही गेले.

ऑफिस मध्ये काम करतानाही मनात कुठेतरी काहीतरी वेगळे वाटत होते.   एक अस्वस्थता वाटत होती, मन ओढून आणलं तर कामात लागत नव्हतं मग सरळ हाफ डे टाकून ऑफीसबाहेर पडले, कुठे जायचं, काय करायचं काहीच माहीत नव्हत, मोकाट सुटलेल्या मनाच्या मागे मी हि चालत चालले होते. मग पाय वळतील तिकडे वळवायचे, विचारांचे रस्ते बंद केले, तर आज असे का वाटतंय याचं उत्तर बापुडा मेंदू शोधात होता. सकाळच्या त्या एका अनोळखी स्मितहास्याचा हा परिणाम असावा असा निष्कर्षही मग निघाला. चालता चालता अचानक नाव्याव्ने उघडलेल्या मॉलपाशी पाय थबकले. जरा गार झुळूक घ्यावी म्हणून आत शिरले.

मग शांतपणे कॉफीचे दोन घुटके घशाखाली उतरल्यावर वाटलं, असा ब्रेक हवाच आयुष्यात, काहीच न ठरवता, असे काहीतरी केलं पाहिजे, स्वतःसाठीचे क्षण जोडायला हवे. मग एक दहा पंधरा मिनिट गप्पा मारत कॉफी पिणारी, बिझनेस च्या गप्पा मारणारी, मस्ती करणारी अ लॉट कॅन हॅपन हे वाक्य सार्थ करणारी लोकं बघून कंटाळा आला तेव्हा मात्र मी बाहेरचा रस्ता धरला. असेच फिरता फिरता एका दुकानाच्या बाहेर लावलेल्या सुंदरशा नारिंगी-पिवळ्या रंगाच्या कुर्त्याने माझं लक्ष खेचलंखरंतर. मला हे असलं विंडो शॉपिंग कधीच आवडत नाही, कोणीतरी ते मुद्दाम तुंच्याकडून करवून घेतं असे वाटतं. पण एखादा दिवसा वेगळा असतो, मी आत जाऊन विचारलं आणि चक्क तो अंगाला लावून बघावा म्हणून मागितला, एकटीनं खरेदी करायला मला आवडत नाही, कारण आपण घेतलेलं आपल्याला नंतर परत कधी आवडेल याचाही खात्री नसते, पण दुअसार्या कोणी सांगितले छान दिसतंय तर त्या आवडण्यावर एक प्रकारची मोहर बसते. मी चेंजिंग रूम मध्ये जाऊन बघ्यानाऐवजी, फक्त मापाला बरोबर आहे ना बघत होते, तेवढ्यात कोणीतरी मागून म्हणाले वाह सुपर्ब, मस्त दिसतोय, घेच तू हा कुर्ता.' मला एकेरीवर येऊन सांगणारा कोणता मित्र आत्ता इथे येऊन टपकला म्हणून माग पाहिले तर चक्क बसस्टॉप वाला. जाम तिडीक आली, नकोच घ्यायला हा कुर्ता, सरळ जाऊन त्याला विचारावं काय चाललंय काय?
 पण का कोणास ठाऊक त्या कुर्त्याची भुरळ जास्त पडली होती. हा रंग आपल्याकडे असावे असे प्रकर्षानं वाटत होत त्यामुळे पैसे देऊन सरळ बाहेर पडले. 'एक्सक्युज मी, जस्ट अ मिनिट, कॅन वी हॅव अ कप ऑफ टी , कॉफी?
आगाऊपणाची हद्द झाली होती, मी न वळताच चालता चालता सांगितलं मी चहा घेत नाही,
बर मग आपण कॉफी घेऊ, हा लोचट सोडायलाच तयार नव्हता.
दोन सेकंद मी थांबले, तर लगेच म्हणाला हे बघा इथेच आहे शेजारी
ही काय जबरदस्ती? मला नकोय आत्ता कॉफी.
मग मला कंपनी द्या.
एरवी कोणाचा एक शब्द खाली पडू न देणारी मी चक्क त्या अनोळखी माणसाला कंपनी देण्यासाठी कॉफी शॉप मध्ये गेले. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती, पण ती ही मानभावीपणे! टेबलवर मी त्याला निरखून पाहत होते, आणि मनाशी काही आडाखे बांधत होते, उंच म्हणावा असाच होता, रंग सावळाच पण त्याला शोभून दिसत होता. नाक डोळे अगदी तरतरीत होते. हसल्यावर उजव्या गालावर पडणारी खळी पाहून याच्या मागे पोरीच काय बायका सुद्धा लागत असणार हे नक्की कळत होतं. वयाचा मात्र अंदाज बांधता येत नव्हता, एखाद दुसरा पंधरा केस चमकत होता, पण ते सोडलं तर फार काही वयाची जाणीव करून देणारे दिसत नव्हते, वागण्यात, बोलण्यात एक आदब, सौजन्य होतं. कुठेही थिल्लरपणा, उथळपणा  नव्हता. पण मग तरीही हा असा अनोळखी पोरींशी कसा काय बोलत असेल. माझा गोंधळ वाढतच होता.
'झालं का  निरीक्षण पूर्ण? मग काय वर्णन करणार पोलिसांकडे?' त्याने हसत हसत विचारलं
'वय अंदाजे २७-२८, उंची सुमारे ५ फुट ९ इंच, उजव्या गालावर खाली पडते, डाव्या भुवईच्या वर एक खोक पडल्याची खूण आहे. असा वर्णनाचा इसम दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
मुलींच्या फसवणुकीच्या अनेक प्रकरणात या इसमाचा हात आहे. कितीही गोड बोलला, आग्रह केला तरी याच्या सोबत कॉफी प्यायला जाऊ नका. असं वर्णन करते पोलिसांकडे. काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? माझा राग शब्दाशब्दातून ठीपकत होता.
'ह्म्म्म बाकी तसं सगळ ठीक आहा,ए वय थोडाफार कमी जास्त चालतंच म्हणा उंचीचा अंदाज मात्र २ इंचांनी चुकला, आईस टी घ्या आणि शांत व्हा.' तो शांतपणे म्हणाला.
'पहिले मला तुमचं नाव सांगा, माझा पाठलाग का करताय ते सांगा, मग मी ठरवेन इथं थांबायचं की नाही आणि हा आईस टी घ्यायचा की नाही ते.
'तुमचा पाठलाग वगैरे काही करत नाहीये, अगदीच योगायोगाने, आजच्या दिवसात आपली दोनदा भेट झाली इतकंच. या शहरातल्या लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने अगदी अशक्य कोटीतली घटना. पण घडली खरी. आणि माझ नाव म्हणाल तर त्या दिवशी, त्या क्षणी जे वाटेल ते सांगतो. नाव ही आपली खरच ओळख असते का? बहुतेक ठिकाणी आपण नावाशिवायच वावरत असतो, मग माझ नाव मी तुम्हाला सांगून खरच फरक पडेल? आत्ता तुमच्याशी बोलताना मला वाटल माझं नवा स्वयम असत तर छान झालं असते, त्यामुळे आपण हे च नाव ठेउयात. म्हणजे माझं नाव घेता घेता स्वतःलाही साद घालता येते.
२१व्या शतकातला खराखुरा लखोबा लोखंडे म्हणायच वाटत याला. ' मी मनात म्हणलं.
'मग आता तुला वाटत असेल माझा तपकिरीचा धंदा आहे म्हणून' स्वयम म्हणाला. माझ्या चेहऱ्यावरचे  बारा वाजलेले कोणालाही वाचता आले असते, स्वयम् कसा काय त्याला अपवाद असेल.
'तुला कसं कळल मी मनातल्या मनात काय बोलले ते?' मी माझ्याही नकळत बोलून गेले.
'हे बघ ' त्याने अगदी गांभीर्याने बोलायला सुरुवात केली. ,' तू विश्वास ठेव अथवा ठेवू नकोस पण मी तुला काही इथ इम्प्रेशन मारण्यासाठी किंवा फ्लर्टीग करण्यासाठी बोलावलं नाही, तुझे डोळे खूप बोलके आहेत, पारदर्शी आहेत. तुझं हसणं मोकळं आणि मनमोहक आहे. इतके सुंदर संवाद साधणारे डोळे, क्षणात आपलंसं करणारं हसू मी याआधी बघितलं नव्हतं, तुला हे सकाळीच सांगावस वाटलं, पण, सांगितलं नाही, किंवा राहून गेलं. तू काहीतरी चुकीचा अर्थ काढशील म्हणूनही कदाचित मी गप्प राहिलो असेन पण आवडलेल्या अनोळखी माणसाची एकाच दिवसात दोनदा भेट झाली तेव्हा मात्र राहवलं गेलं नाही मला. आणि हे तुला सांगितलेच पाहिजे म्हणून मग तूला इकडे घेऊन आलो.'
या त्याच्या बोलण्यावर काय बोलावं हेच मला कळेना  मी मख्खपणे त्याच्याकडे बघत राहिले.
'आणि अजून एक सांगायचंराहिलं, मला तुझं नाव माहित नाही, आणि माहित करून घेण्याची गरजही वाटत नाही, कारण मला जे सांगायचं होतं ते मी सांगितले.
'मला हे सांगून तुला काय मिळालं? सॉरी तुम्हीवरून तू वर आले. पण हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? कितीही नाकारलं तरी मला हा मुलींना फूस लावण्याचाच प्रकार वाटतो. मि. सौन्दर्यौपासक. 'जगाची ही रीतच मला कळत नाही, प्रत्येक गोष्टीला, कारण, प्रत्येक नात्याला लेबल लावायची काय गरज आहे, साधं चांगल म्हणायला,अॅप्रिशिएट करायलाही  वेळ ओळख का हवी?' जरा घुश्यातच तो बोलला. ती उलटून काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, 'माझ्या कॉफीचे बिल मी दिलंय, तुझ्या आईस टी च तू दे, मी दिले तर तू परत त्याचे काहीतरी अर्थ शोधायला जाशील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव कोणीतरी तुला तुझे डोळे, हसन सुंदर, निरागस असल्याचे सांगितले होतं. आणि हो माझ्या रिक्वेस्टला हो म्हणल्याबद्दल  थंक्स. आयुष्यात मोकळेपणानी जगायला शीक.
त्यादिवशीआरशात बघताना पहिल्यांदा जाणवलं की खरेच माझे डोळे नितळ आहेत. कुणाशीही बोलायची उर्मी त्यांच्यात ठासून भरली आहे. पण कोणा स्वयम नावाच्या अनोळखी माणसाने संगे पर्यंत मला का कळली नाही ही गोष्ट?, चार शब्दांनी जे काम होणार नाही ते माझ्या एका हास्यानी होतं हे ही मला नव्यानेच कळल. माझ्या आजू बाजूच्या लोकांना हे कधी कळलचं नाही की त्यांनी हे कधी मला सांगितलं नाही? दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा माझ्या मलाच या गोष्टी का कळू नये? थेट वर्मावरच घाव घालणारा प्रश्न माझी डोळ्यांनी मला विचारला होता, उत्तर माहीत नाही, पण किमान प्रश्न उभे केल्याबद्दल थँक्यू स्वयम्!
एखादं वादळ येतं आणि जातपण जाताना आपल्या खुणा ठेवून जातं. तसाच त्या अपरिचित स्वयम् नावाच्या वादळाच झालं होतं. माझ्या वागण्यात, बोलण्यात, देहबोलीत एक वेगळच फरक होता. पण या फरकाला देखील कारणाच बंधन नको होतं.
विचारांमध्ये बदल झाले की आपोआप ते वागण्यातही येतात याचा अनुभव मी घेत होते. त्यामुळेच की काय वाढदिवसाला स्वतःच स्वतःला काहीतरी भेट द्यावीशी वाटली. आपण सगळेच स्वतःचे उत्तम टीकाकार, समीक्षक, मित्र असतो. किमान वाढदिवशी तरी या टीकाकाराला खुश करूया म्हणून पुस्तक खरेदीला गेले, तशी घ्यायच्या पुस्तकांची यादी तयार होती, पण तरीही पुस्तकंचे भांडार समोर असले की पुस्तक किमान चाळायचा तरी मोह होतोच. त्यामुळे यादीत नसलेली दोन पुस्तकही सोबत येऊ घातली होती. निघता निघता सीडीज सेक्शन मध्ये जरा पाय थबकले, लताच्या शास्त्रीय गाण्यांची एक डीव्हीडी अगदी हाक मारत होती, पण मी डोळे मिटून तिथून काढता पाय घेतला. आणि मोहाच्या त्या एक क्षणाच्या विजयाचं कौतुक करत काउंटरवर आले. बिल घेता घेतानाही, ती सीडीच समोर दिसत होती, शेजारच्या काउंटरवर कोणीतरी घेत असावं,
एक मिनिट ही सीडी पण मॅडमचीच आहे, मी चमकून बघितलं तर स्वयम्.
'तू इथे?'
'का कलंदर, चक्रम लोकांना इथे प्रवेश नसतो का?तू पण  कमालच करतेस, आणि हो ऑस्कर वाइल्ड म्हणतो, माणसानं मोहाला शरण जावं, त्यामुळे तुला हि सीडी गिफ्ट.'
'ह्म्म्म'
'बर घाईत नाहीस ना? माझ्याबरोबर येतेस भटकायला? इथेच चालत फिरुयात, हा त्या दिवशी घेतलेला ड्रेस ना? मी म्हणालो नव्हतो, तुला छान दिसेल. माझी निवड सहसा चुकत नाही.'
'अॅक्चुअली तुझं बरोबर आहे, मला या कुर्त्यामुळे खूप कॉम्पलीमेंटस मिळाल्या. त्यामुळे मनापासून धन्यवाद, असं मी म्हणाले खरं पण मनात धाकधूक होतीच हा आता काय म्हणेल याची. अगदी आपलं मन वाचल्यासारखी त्यांनी ती सीडी दिली. कसं वागावं तरी कसं. त्या सगळ्या गोंधळात मी बोलून गेले, अशा सीडीज, गिफ्ट्स देऊन किती जणींना फिरायला नेतोस रे?'
'छे परत तेच. तू पण कठीणच आहेस, मला वाटलं बदलली असशील. ती सीडी मी गिफ्ट दिली म्हणण्यापेक्षा तुझ्यातल्या बदलासाठी बक्षीस दिलं असं मी म्हणेन. बसस्टॉपवरची तू आणी आजची तू खूप फरक वाटला मला, छान वाटलं मला. आपल्यातलं नेमकं काय बदलायचं याची जाणीव झाली की होणारा बदल सुखावह असतो. पण दुर्दैवाने बऱ्याच जणांना त्यांच्याकडे काय आहे, याची जाणीवच नसते, पिसाऱ्याची ऐत सांभाळणारा मोर, अंगावरचे पत्ते मिरवणारा वाघ, स्वतःच्या आवाजाची जान असणारा कोकीळ यांची गोष्टच निराळी. खरतर त्या दिवशी मला तुझ्याशी बोलायची काहीच गरज नव्हती. आजही नाही. त्यादिवशी तुझ्या बोलक्या डोळ्यांचे, हसण्याचे कौतुक मनातच ठेवलं असते, तर कदाचित हा आजचा दिवस उगवलाही नसता, माझी प्रौढी नाही पण सत्य आहे हे. एखादी सुंदर कलाकृती, रांगोळी, निसर्गाचा अविष्कार बघितला की आपण म्हणून जातो, वाह काय सुंदर आहे, त्यावेळी आपल्याला त्याच्या निर्मिकाच्या ओळखीची गरज भासत नाही, मग ईश्वरनिर्मित , निसर्गनिर्मित मनुष्यकलाकृतीच्या सौदार्याबद्दल बोलतानाच का आपल्याला ओळख लागते? मी पुरुष आहे म्हणून एखाद्या स्त्रीच्या केलेल्या कौतुकाला प्रत्येक वेळी हेतू लावायची काय गरज आहे? मी जाणीव करून देईपर्यंत तू स्वतः तरी कधी स्वतःच्या सौंदर्याची दखल घेतली होतीस का? हिऱ्याला मातीत असताना किंमत नसते, खाणीतून काढून त्याला पैलू पाडावे लागतात, पण तुला मी फक्त हिरा आहे सांगितले आणि तुझे तूच पैलू पाडून घेतलेस. याबद्दल कॉम्प्लिमेंट म्हणून मी तुला ही सीडी दिली. माझ्याकडे एक व्यक्ती, पुरुष म्हणून न बघता एक प्रवृत्ती म्हणून बघ. आग कदाचित तुला माझे वागण समजेल. कारणाशिवाय काही घडत नाही आणि काही नात्यांना नाव नसत. या आडन गोष्टी लक्षात तेह्वाल्यास तरी पुष्कळ. भेटूयात असेच परत कधी तरी अनपेक्षितपणे. माझ्या उत्तराची वाट ही न पाहता स्वयम् निघून गेला, मला पुन्हा नव्या विचारांच्या रस्त्यावर सोडून!

नकळत त्या मार्गावर चालत असताना माझी मीच मला नव्याने भेटत होते. काळात होतं. स्वयम् ने सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे उमगत नव्हत्या पण थोड्या थोड्या समजत होत्या. भोवतालाच सौंदर्य आता माझ्याही नजरेत भरायला लागले होते. अशाच काळात कधीतरी हॉटेलमध्ये शेजारच्या तेबाल्वाराच्या बाळाला पाहून नकळत बोलले, किती सुंदर आहेत याचे डोळे, नाव काय बाळाचे? आणि स्वयम् ची आठवण झाली.
मग कधीतरी बसस्टॉपवरच्या एका षोडशेला म्हणलं, काय सुंदर केस आहेत तुझे. तेव्हा खरच वाटल, स्वयम् ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. कोणाला चांगलं म्हणण्यासाठी, कौतुक करण्यासाठी खरच ओळख लागते का?
(चारचौघी २००७)





Thursday, March 3, 2016

मोरपिसातला मोर

आपण प्रत्येक गोष्टीतून अपेक्षा करायचे जेव्हा थांबवू तेव्हा आपल्याला निखळ आनंद मिळेल. आलेल्या अडचणीवर रडण्याऐवजी आपण जेव्हा मार्ग काढायला शिकू तेव्हा यश लांब नसतं. छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद घायला शिकलं पाहिजे.’
समोरचा सेल्फ हेल्प ग्रुप वाला त्याच्या खास तासलेल्या इंग्रजी मधून काही बाही सांगत होता, आणि अश्विनी ते खूप गांभीर्याने ऐकून घेतल्याचा आव आणत हळूच घड्याळात बघत अजून किती वेळ हे रटाळ पुराण ऐकावे लागणार हे बघत होती. अजून १० मिनिट हे ऐकून घेऊन मग तिला याचा उपयोग तिच्या ताण नियंत्रणासाठी करायच्या होता, म्हणजे कंपनीचा तरी तसा उद्देश होता, या माणसाला भली मोठी रक्कम देऊन इथं हे असे  बोलायला लावण्यापेक्षा शनिवार रविवार काम नाही म्हणजे नाही, रात्री ९ नंतर कामाचे फोन नाही एवढे जरी केलं तरी पुष्कळ होईल हे तिच्या परत मनात येऊन गेलं. सालं  जावं  तिथं काही तरी प्रश्न, टेन्शन आहेतच, शाळेत असताना मोठं होण्याचे टेन्शन, मग इंजिनिअरिंग तत्सम चांगल्या नोकरीची खात्री देणारे शिक्षण घेण्याचे टेन्शन, मग आपले मार्क्स, कमवत पैसे मिळवण्याचे टेन्शन, नोकरीत पुढे जाण्याचे टेन्शन, लग्न जमवण्याचे, ते निभावण्याचे टेन्शन, बर ही सारी टेन्शन्सयेतात कुठून’ एक छोट्याशा  अपेक्षेमधून. आपणच अपेक्षा ठरवतो आणि मग त्या गुंत्यात अडकून पडतो. टाळ्यांचा आवाज आल्यावर विचारांची तार तुटलेल्या अश्विनीला लक्षात आलं अपान आत्ता पटकन इथून कलटी मारू शकतो, तसंही आपण एक प्रश्न विचारून आपली उपस्थिती दाखवलीच होती. सहकाऱ्याना परत एकदा तोंड दाखवत वक्त्याचे कौतुक करत ती तिथून सटकली.
घराच्या खाली जाऊन गाडीचा हॉर्न वाजवत ती माईंची वाट बघत होती, तर चक्क बाबा येऊन म्हणाले तिनी चहा ठेवलाय आता येऊन घेऊन जा. बाबा काही बोलले तर ती आज्ञाच असते हे तिला आता कळून चुकले होतं. शांत पणे गाडी बंद करून ती घरात गेली. खरं तर तिला घरी लवकर जायचे होते, कारण सानूचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता. पटकन तिनं अविला मेसेज करून घरी लवकर यायला सांगितलं. आत गेल्यावर तिनं सवयीनं बाबांना नमस्कार केला, तर चक्क ते सुखी हो असे काहीसे पुटपुटले. तोवर मैं चहा घेऊन आल्याच होत्या. या माणसामुळे आपल्याला या घरात राहता येत नाहीये, तिचा राग उफाळून येत होता, पण आता जरा ती शांत बसायलाही शिकली होती. आपली गोष्ट प्रत्येकावर लादून काय समाधान मिळत यांना माहीत नाही. पण जगात अशा लोकांची काही कमी नाही हेही खरेच.
माई निघायचे का? बाबा मी नंतर माईना परत सोडून जाईन. बाबांना सांगायची फॉर्मलिटी करून ती निघाली. तेव्हा माईच बाबांना काहीतरी कुजबुजत्या आवाजात म्हणत होत्या.
सानू कशी आहे? तिच्यासाठी ही दोन पुस्तकं आणली आहेत.
नक्कीच माईंनी सांगितले असणार. पण ते काही मनात न ठेवता ती म्हणाली,  बाबा तुम्हीच देता का तिला, ते जास्त आवडेल सानुला. वाटलं तर मी सोडते आत्ता घरी, येताना माई आणि तुम्हाला अवि आणून सोडेल. तिनी एक खडा मारून बघितला.
नाही आज नको, मी एखाद्या संध्याकाळी येऊन जाईन.
तिच्या अपेक्षेतले उत्तर तिला मिळालं.
अश्विनी अवि चे लग्न बाबांनी इतक्या हौसेने करून दिलं होतं की कोनिअरी तिला विचारले , हे तुझे बाबा आहेत की सासरे. पण नंतर एकत्र राहताना कितीतरी गोष्टी नव्याने कळल्या आणि मग उडणारे खटके रोजचे झाले तेव्हा माईच म्हणाल्या तुम्ही वेगळे घर का नाही घेत. बाकीच्या मैत्रिणी जेव्हा सासू बद्दल तक्रारीचा सूर लावायच्या तेव्हा ही हिच्या हेकेखोर सासऱ्याबद्दलच मत मनातच ठेवून सासूचे गुण गायची. अविनी आईची ओळख करून दिल्यावर तिला माई आवडल्या, पण तरीही आई म्हणताना तिला अडखळायला व्हायचे. ते जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्याच स्वतःहून म्हणाल्या अग माझा हट्ट नाहीये मला आई म्हणून हाक मारायचा, तुला जी सहज सोपी ओठावर येईल अशी हाक मार. जन्मापासून जिला आई हाक मारली, तिला सोडून एकदम नव्या अपरिचित बाईला अशी आई हाक कशी मारायची? अशी नाळ एकदम कशी जुळेल? असे तिला कायम वाटायचे, त्यामुळे आई नाही पण त्याजवळ जाणार माई तिच्या तोंडून आपसूक बाहेर पडले, आणी मग ती माई हाक मारायला लागली, पण मला मात्र बाबाच हाक मार हसत हसत पण जरबेच्या स्वरात म्हणाले तेव्हा तिला तो अधिकार वाटला, आणि नंतर मात्र हक्काचा अतिरेक वाटायला लागला. दुसऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे आपण का वाहायचे? जर हे माझे घर असेल तर मला आवडेल तसे वागायचा मलाही हक्क आहे ना?
अश्विनी तिला भलत्या सलत्या सवयी लावू नकोस बर का ग. माझी बायको साधी सरळ आहे, तिला तशीच राहू देत.
हो बाबा संभाषण संपवत माईला घेऊन बाहेर पडली पण.
माईला कायम चार चाकी चालवणाऱ्या बायकांबद्दल कुतूहल वाटायचे. कसे काय जमते यांना असे कायम वाटायचे.
माई मग बघितल्या का डिझाईन? कोणती कंपनी काही ठरवली का?
छे ग बाई मला नाही कळत त्यातले काही, तू एवढा आग्रह धरलास म्हणून, नाहीतर हे कधी हो म्हणाले नसते, आणि मी काही मागितले नसते.
माई हेच चुकते तुमचे, अपेक्षा व्यक्त करायला शिका. अहो तुमचेही आता वय होत चाललंय, पूर्वी सारख्या तरण्या नाही आहात तुम्ही, सांधे कुरकुरतात पण तुम्ही कधी नाही कुरकुरणार.
अश्विनी अग तो स्वभाव असतो, सहजासहजी बदलत नाही. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर ती एक सवय होती जी स्वभाव झाली. त्यामुळे सवय सुटू शके पण स्वभावाचे काय? ६० च्या दशकात तीन मुलीन्मादाह्ली मधली मुलगी मी. मोठीचे मोठी म्हणून कौतुक तर धाकटीचे शेंडेफळ म्हणून. आम्ही आपल्या मधल्या अधांतरी. लग्नानंतरही मी मधलीच. त्यामुळे अधिकारही नाही आणि बेफिकीरीही नाही. कौतुकाचे म्हणशील तर कौतुक , आनंद मानण्यावर असतो. मला लहानपणापासून एकाच गोष्ट कळली, छोट्या गोष्टींमधले आनंद शोधले तर आपल्यालाच त्रास होत नाही. आणि नवऱ्याच म्हणशील तर लग्नाआधी’ सुद्धा मला कोणी माझ्या अपेक्षा विचारल्या नव्हत्या, त्य गृहीत धरून चालले होते, आणि मी ही त्याला विरोध केला नाही. नवरा निर्व्यसनी होता, त्यांनी कधी अंगावर हात उगारला नाही. न विचारता व्यवस्थित खायला मिळायचे, घरातली कोणतीही गोष्ट संपत आली की किंवा संपलीये सांगितल्यावर मिळायची. वर्षाकाठी नवीन कपडे, आणि कधीमधी बाहेरगावी फिरायला जाणं यापेक्षा काही वेगळ्या अपेक्षा व्यक्त कराव्याशा देखील नाही कराव्याशा वाटल्या. हां एक खंत मात्र आहे कायमची, मला दोन मुले हवी आहेत, पण ह्यांनीच ठरवले एक मूल बास आणि मग बोलायचे धैर्य नाहीच झालं कधी. कधी अगदीच मनावर ओझे आले तर शांत पाने रामदासस्वामींची करुणाष्टके आणि दासबोध काढून वाचा बसायचे. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजनमाया तोडिता तोडवेना, घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा असं म्हणत स्वतःला शांत करायचे. तुमच्या सारखे ताणाचे व्यवस्थापन करायला आमचे आम्हीच मार्ग शोधले होते.
माई आता पुढच्या वेळी आमच्या ऑफिस मध्ये तुमचेच लेक्चर ठेवते.
नको ग बाई नको, एकदा अवीच्या शाळेत दासनवमीसाठी गोष्ट सांगायला गेले होते तर घरी येऊन आमचा शंकर तांडवनृत्याच्या बेतात होता. तसे ते वाईट नव्हते, फक्त कोणी त्यांच्या मनाविरुद्ध काही केलं तर त्यांना चालत नाही. झालं ग  आता ४० वर्ष, सवय झाली सगळ्याचीच, एखाद दिवशी त्यांनी चिडचिड राग राग केला नाही तर विशेष वेगळे वाटतं
माई तुम्ही छान लिहू शकता असे मला नेहमीच वाटते, पण आता तरी उतरून एक निर्णय आज तुम्ही घ्या.
अश्विनी माईला घेऊन दुकानात गेली. अशा मोठ्या मॉल मधल्या दुकानात माईना नेहमीच बिचकायला व्हायचे. अशा दुकानंमधल्या चमचमाटाला त्या घाबरायच्या. अशा डोळे दिपवणाऱ्या प्रकाशात मेंदूवर पण एक पडदा पडतो, आणी डोळ्याला जे आवडते तेच आपण घेऊन मोकळो होतो असं त्या म्हणायच्या.
ही म्हातारी बाई काही आपलं गिऱ्हाईक नसणार, आणि पैसे देणारा पुरुष कदाचित मागे असेल, असं समजून त्या दुकानातल्या सेल्समन ने या दोघींकडे बघून त्यांच्या मागून येणाऱ्या पुरुषाची वाट पाहिली. पाच मिनिट कोणीच काही आला नाही तेव्हा अश्विनीच पुढे झाली आणि म्हणाली, आम्हाला वॉशिंग मशीन घ्यायची आहे. कोणत्या कंपनीची घ्यायची आहे मॅडम?
तुम्हीच सांगा कोणती चांगली आहे?
फ्रंट लोड हवी की टॉप लोड.
माई शांतपणे वेगवेगळी मॉडेल्स पहात होत्या. त्यावर किती तरी बटण होती, पण कंपनीचे नाव सोडलं तरी साधारण साऱ्या मशीन्स सारख्याच दिसत होत्या. अगदी त्याच्या वरची नाव, फंक्शन्स. सुद्धा त्यांना सारख्याच वाटत होते. या गुंतागुंतीची मशीन मध्ये कपडे कसे घालायचे, छे त्यापेक्षा आपलं हातानी दोन कपडे खंगाळून टाकणं सोपे. नकोच पडायला या फंदात. हळूच त्यांचे लक्ष किंमतीकडे गेले आणि अबब अग अश्विनी हे काय? केवढ्या या किंमती नको ग काही आपल्याला हे.
माई तुम्ही त्याचा विचार नका करू, मी घेऊन देणार आहे तुम्हाला. किंमती बघून नाही म्हणताय, पण थोड्याच दिवसात त्याचीही सवय होईल तुम्हाला.  यावेळी मी काही ऐकणार नाहीये तुमचे.
मग तिथल्या सेल्समन कडे वळून म्हणाली,
फ्रंट लोड आणि टॉप लोड नेमकी कोणती चांगली? दोन्ही मध्ये कपडेच धुवून निघतात ना.
कसे आहे ताई, फ्रंट लोड ला जागा जास्त लागते, आणि त्यात कपडे थोडे जास्त चांगले निघतात, म्हणून त्याची किंमत जास्त असते, टॉप लोड कधी कधी व्हायब्रेट होत पुढे सरकतं पण त्यात मशीन थांबवून विसरलेले कपडे मात्र घालता येतात. हे बघा ही समसंग ची मशीन याचा आवाज इतका कमी आहे, की नाही येत म्हणलं तरी चालेल. हे बॉश चे मशीन यात कपडे  जास्त वाळतात. हे आयएफबी चे मशीन याला खूप कमी विजेची गरज आहे. ताई बघाल तर फरक आहेत पण ते फारसे काही महत्वाचे नाहीत, तुम्हाला किती जणांच्या घरासाठी मशीन हवंय.
२ जण हो फक्त, माईच बोलल्या.
मग तुम्ही हे छोटे ५.५ किलो चे घ्या मावशी. आणि मावशी कमी किंमत हवी असेल तर इकडे या ह्या सेमी ऑटोमटीक बघा.
नाही हो त्या काही दाखवू नका, माई तुम्ही फुल्ली ऑटोमटीकच घ्या. आपण काही ही खरेदी सारखी सारखी करत नाही.
यांच्या साठी घ्यायचे असेल तर तुम्ही टॉप लोडच घ्या, कारण मावशीना सारखे वाकायला लागण्यापेक्षा वरून कपडे टाकायला सोपे होतील ना.
हो खरंच की, माई आपण टॉप लोड मशीनच घेऊ.
बर बाई तू म्हणशील तसं.
मग तिनीच जाऊन समसंगआय एफ बी, आणि बॉश चे तीन मॉडेल ठरवले आणि माईना सांगितले आता यातले तरी एक तुम्ही ठरवा. अर्थात माईंनी ज्याची किंमत सगळ्यात कमी ते आपल्या घरी या खाशा मध्यमवर्गीय धारणेने सॅमसंग चे मशीन घेऊ असे सांगितले. अश्विनीनी सेल्समनला त्यात कोणते कोणते रंग आहेत हे विचारलं. कधी तरी खेळता खेळता सानुनी आजीला तिचा आवडता रंग विचारला होता, तेव्हा त्यांनी पांढरा रंग सांगितला होता. ते लक्षात घेऊन तिनी पांढरा रंग आहे का असे विचारलं, पण एकदम माई म्हणाल्या नको ग ह्यांना आवडत नाही पांढरा रंग,
माई अहो आयुष्यभर जगलात ना त्यांच्यासाठी आता घ्या की एखादी गोष्ट स्वतःसाठी. शांतपणे पण ठामपणे तिनं सांगितलं.
बर आपण तुझेही ऐकू आणि ह्यांचेही मन राखू एक कव्हर घालुयात यावर.
आपण माझ्यासाठी पांढरा घेत नाहीयो, तुम्हाला आवडतो म्हणून घेतोय. जरा चिडतच कपाळावर हात मारून घेत अश्विनी म्हणाली माई अहो स्वभावाला मुरड घालत कधीतरी स्वतःला हवं तसं वागा.
बयो, माझ्या आईला लाव बोल त्यासाठी. जाऊदे हा संवाद न संपणारा आहे, चल लवकर उशीर होतोय, आमचे टाईम टेबल घरी वाट बघत असेल.
पैसे देताना रांगेत उभं राहताना अश्विनी माईंकडे बघत होती, तो सेल्समन वॉशिंग मशीन  बांधत असताना माई त्याच्याकडे एखाद लहान मूल नवीन खेळणं ज्या उत्सुकतेनं बघतो, त्याच भावनेनं बघत होत्या.
मॅडम कॅश की कार्ड
कार्डच घ्या.
आणि पावती याच नावानी करू का?
नाही, एक मिनिट हां, माई जरा इकडे येता.
माई तुमचे नाव स्नेहा टाकू ना पावतीवर?
अग आता हे काय? तू घेऊन देतीयेस तर तुझेच नाव टाक ना?
माई बाबांचे नाव, आडनाव काही टाकत नाही, बघा नुसतं तुमचे नाव कस वाटत.
मग स्नेहलता टाक, माझं लग्नाआधीचे नाव, गेल्या कित्य्के वर्षात पूर्ण नावानी कोणी हाकच मारली नाहीये. नकळत त्यांचे डोळे पाणावले.
गाडीतून उतरता उतरता त्या म्हणाल्या मी ही पावती माझ्याचकडे ठेवू का?
लहान मुलं मोरपीस ज्या भावनेनं जपतात त्याच भावनेन माई हे बिल जपून ठेवणार याची खात्री अश्विनीला होती.
मनातलं हसू चेहऱ्यावर उमटवतात डौलदार तंद्रीत चालणाऱ्या माईना पाहून तिला एकदम छोट्या गोष्टींमधला आनंद शिकता येत होता कोणत्याही बोजड शब्दांशिवाय, खोट्या मुखवट्याच्या वक्त्यांशिवाय.
(जानेवारी २०१६)