Wednesday, April 25, 2018

मोकळं हसून तर बघा....

काही चित्रपट गाण्यांमुळे लक्षात राहतात, तर काही चित्रपट गाण्यांमुळे पाहिले जातात. रेडिओवर कधीतरी एक गाणं ऐकलं, आणि त्याचे शब्द, संगीत इतकं मनात घर करून बसलं, की पहिले गाणे शोधलं, आणि मग चित्रपट शोधून बघितला.

२००४ मध्ये रेवती सारख्या संवेदनशील अभिनेत्रीने एक चित्रपट काढला होता. शिल्पा शेट्टी, सलमान खान, आणि अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत होते, या तगड्या स्टारकास्टहून अधिक गहन विषयाचं इंद्रधनुष्य त्यात पेललं होतं. मित्र माय फ्रेंड या चित्रपटामुळे रेवतीची दिग्दर्शक ही ओळख आवडलीच होती, आता फिर मिलेंगे मध्ये काय नवीन सांगितलं असेल याची जास्त उत्सुकता होती. या चित्रपटातली दोन तीन गाणी अतिशय आवडली होती, साधी सोपी कानाला गोड वाटणारी गाणी.

एका उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला केवळ HIV पॉझिटीव्ह आहे म्हणून कामावरून काढणे योग्य आहे का? आज परिस्थिती बऱ्यापैकी बदलली असली तरी, हिंदी चित्रपटांमधून एडस्, HIV हा विषय मांडण्याचे काम मोजक्या चित्रपटातून झाले आहे, त्यात फिर मिलेंगे नक्कीच आहे. नायिकेला अचानक कळतं की तिला HIVची लागण झालेली आहे. आयुष्यात एकदाच जुन्या कॉलेजमधल्या मित्राबरोबर झालेला असुरक्षित लैंगिक संबंध सोडता इतर कोणत्याही पद्धतीने ही लागण होण्याची शक्यता नाही. बरं ज्याच्यामुळे हे झाले असायची शक्यता आहे, तो मित्र त्यानंतर जवळपास गायबच झालेला आहे. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यामुळेच आयुष्यातून उठून जायची वेळ आली आहे. अर्थातच कोणतीही व्यक्ती अशावेळी स्वतःच्या कोशात जाणे पसंत करेल.
अशाच परिस्थितीमध्ये नायिकेची छोटी बहिण नायिकेसाठी एक गाणे वाजवते ते म्हणजे,
खुल के मुस्कुराले तू दर्द को शर्माने दे
बूंदों को धरती पर साज एक बजने दे

हवाये कह रही हैं
गगन के गाल को जाके छुले जरा
उतार ग़म के मोज़े
कंकरो को तलवो में गुदगुदी मचाने दे
खुल के मुस्कुराले साज एक बजने दे

कित्येकदा आपण आपलं दुःख कुरवाळत बसत स्वतःपाशीच ठेवतो, ते इतकं आत लपवायचा प्रयत्न करतो की अश्रूंना पण ते कळू देत नाही. उगाच मनात गोठलेला भावनांचा समुद्र घेऊन फिरत बसतो, पण त्यापेक्षा रडून मोकळं होणं हे जास्त गरजेचं असतं. हे दुःख जेव्हा व्यक्त करू, तेव्हाच ते कमी होऊ शकतं. दुःख कमी करायचं असेल तर पहिले त्याचं ओझं बाळगणे बंद केलं पाहिजे. जेव्हा त्याचे ओझं वाटणार नाही तेव्हाच त्यात लपलेली गंमत सुद्धा आपण अनुभवू शकतो.
झील एक आदत है
और नदी शरारत है
हर लहर यह कहती है
जिंदगी को आज नया गीत कोई गाने दे
खुल के मुस्कुराले साज एक बजने दे

हे माझं या गाण्यातलं आवडतं कडवं आहे. झील एक आदत है, और नदी शरारत है, एकाच जागी थांबून राहणं हा सवय असू शकतो, पण वाहत राहणं हे खरा स्वभाव आहे. सवयीचे गुलाम झालो तर स्वाभाविक गोष्टी विसरून जाऊ. छोट्या छोट्या क्षणांना काय सांगायचं आहे हेच समजू नाही शकणार आपण, आयुष्य अनुभवायचं असेल तर या क्षणांना समजून घेतलेच पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधलाच पाहिजे.

बांसुरी की खिड़कियो पे सुर यह क्यों ठिठकते हैं
अंख के समन्दर क्यों बेवजह छलकते हैं
तितलियां यह कहती हैं अब्ब बसंत आने दे
जंगलो के मौसम को बस्तियों में छाने दे
खुल के मुस्कुराले साज एक बजने दे.

प्रसून जोशी यांनी साध्या सरळ उपमा वापरून हे गाणं अजूनच भावगर्भ केलं आहे. बासरीमधून येणारं संगीत हे त्याच्यातल्या छिद्रांमधून तर पाझरत असते, सुटकेचा रस्ता हा प्रत्येक ठिकाणी असतोच, आपल्याला फक्त तो शोधायचा असतो. बासरीच्या आत दबलेल्या संगीताला या भोकांमधुनच तर बाहेर जायची वाट सापडत असते. हृदयात साचलेल्या दुःखाला व्यक्त होण्याची वाट डोळे करून देत असतात. शिशिरानंतर वसंत येणारच असतो, आपण फक्त आशा कायम ठेवायच्या असतात. बदलाची चाहूल घट्ट धरून ठेवायची असते.
एखादं गाणं आपल्याला अचानक येऊन भेटतं, आणि आपल्यासोबत कायम राहतं. असेच काहीसे या गाण्याचे आणि माझं नातं आहे. कोणतीच गोष्ट चिरकालिक नसते, म्हणून काही तिथेच थांबायचं नसते, आपण पुढे जातच राहायचं असते. कोणत्याही गोष्टीचा बाऊ करत बसण्याऐवजी पुढच्या गोष्टींचा वेध घेत राहिलं तर आयुष्य सुंदर आहे याचा प्रत्यय पावलोपावली येतो. हे गाणे ऐकत एकदा मोकळं हसून बघा, आयुष्य सुंदर असल्याची जाणीव परत एकदा होईल. 

गायिका : बॉम्बे जयश्री
गीतकार : प्रसून जोशी
संगीतकार : शंकर एहसान लॉय


© मानसी होळेहोन्नूर


Wednesday, April 18, 2018

ती आणि त्या २

ती

ह्याने जेव्हा मला सांगितलं होतं की त्याला मी आवडते त्यावर माझा पहिला प्रश्न होता, आणि तुझ्या आईला? मी आमच्या घरात आई आणि आजीच्या कुरुबुरी बघतच मोठी झाले, त्यामुळे मला लग्न या प्रकरणात नवऱ्यापेक्षा सासू या व्यक्तीचीच भीती जास्त वाटायची. आईमध्ये खूप काही करायची ताकद होती, आणि बाबांनाही ते माहित होतं, पण तरीही आजीशी जमवून घेण्यातच तिची निम्मी शक्ती संपून जायची, शेवटी अंथरुणाला खिळल्यावर आजी थोडी फार बदलली होती, तेव्हाच मग आई मोकळी झाली आणि घराबाहेर मुक्तपणे पडू शकली. वयाच्या ४० मध्ये तिने शाळा सुरु केली आणि पन्नाशी मध्ये ती यशस्वी उद्योजिका झाली होती. मला खरंच अभिमान होता आईचा, त्यामुळे आईच्या वाटेला आलेला भोग माझ्या वाटेला येऊ नये असे खूप वाटायचं, त्यामुळेच तर लग्न नकोच वाटायचं, मी तर त्याला म्हणलं पण होतं, लग्न वगैरे काही नको, हवं तर तसेच राहू. त्यावर तो हसला, तुझ्या या निर्णयाचा पुढे मागे तुला कदाचित पश्चाताप होऊ शकेल, त्यापेक्षा तू आधी माझ्या घरच्यांना खास करून आईला भेट आणि मग निर्णय घे म्हणाला. मग काय मी त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या आईच्या आणि त्याच्या घराच्या प्रेमात पडले. मला कधी असे वाटलेच नाही की मी ह्या माणसांना पहिल्यांदा भेटतीये, मस्त गप्पा झाल्या, आणि त्यांच्या दारातच मी त्याला सांगितले, मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. मग काय लग्न झाले अगदी साध्या पद्धतीने जसे मला आणि माझ्या सासुबाईंना हवे होते तसेच.
आता दोन माणसे म्हणाल्यावर त्यांच्यात मतभेद येणारच, सगळेच कसे एकमेकांचे एकमेकांना पटेल, मग काय आमच्यातही वाद होतातच. आता परवाचाच प्रसंग कशावरून तरी विषय निघाला आणि त्या म्हणाल्या, आम्ही सिनियर सिटिझन्स हाउस मध्ये घर घेतलेलं आहे. त्यावरून आमच्या घरात वादाला तोंड फुटलंय. त्यांनी असे काही करायची गरज नाही असे आम्हाला वाटते, तर त्यांचे म्हणणे आहे उगा कोणावर ओझे व्हायचं नाही मला. हात पाय धड असे पर्यंत तुमच्यासोबत ठीक आहे, पण त्या नंतर तुमच्याकडे नको, सुदैवाने माझे पैसे आहेत, त्यामुळे आर्थिक भार तर पडणार नाहीच, शारीरिक भार पण मला नको आहे.
तशा त्या पहिल्यापासूनच स्वतंत्र बाई, आमचे घर, नातेवाईक सगळे कोणी बांधून ठेवले असतील तर त्यांनीच, स्पष्ट बोलणाऱ्या म्हणून फटकळ वागायच्या त्या लोकांना, पण मला त्यांचा हा फटकळपणाच बरा वाटायचा, एक घाव दोन तुकडे, समोरच्याला पूर्ण त्याची स्पेस द्यायच्या, आम्ही लग्न कधी करणार, हनिमूनला कुठे जाणार, वेगळे रहा, पैसे कसे खर्च करता, मूल कधी, असले कोणतेही प्रश्न त्यांनी कधीच विचारले नाहीत, आणि आम्हीही त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांनी विचारल्याशिवाय काही सांगितले नाही. एकत्र राहत असलो तरी आम्ही सगळेजण व्यक्ती म्हणून वेगळे आहोत, हे पथ्य आजवर पाळत आलोय, पण आता हा त्यांचा आजारी पडल्यावर वेगळे, राहण्याचा हट्ट मात्र काही झेपत नाहीये.


त्या

आमचं लग्न झाल्यावर थोड्याच दिवसात मला आमच्या घरातलं पाणी लक्षात आलं. सासूबाई बिचाऱ्या सासऱ्यांच्या हुकुमाखाली गांजलेल्या होत्या, आमचे हे पण वडिलांच्या समोर कायम दाबून असायचे. नाना होते कर्तबगार त्यामुळेच त्यांना सगळ्यांना त्यांच्या पंखाखाली घ्यायला पण आवडायचे. मी त्यांच्या पंखाखाली जायला थेट नाकारलं नाही आणि जोपर्यंत माझं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं, नाना थकले होते, त्यामुळे आमच्या घरी मला थोडे झुकतं माप मिळायचं एवढं खरं. मग त्याचा उपयोग करून मी प्रत्येकाला त्याची स्पेस मिळवून दिली.
मुलगा झाला तेव्हा मी थोडी खट्टू झाले कारण मला मुलगी हवी होती, मला जे मिळाले नाही ते सगळं मला तिला मिळवून द्यायचं होतं, स्त्रीत्वाचा सन्मान स्त्रीच करू शकते हे दाखवून द्यायचं होतं. पण मग मुलगा झालाच तर मग आपण त्याला जाणीव करून देऊ यात स्त्री काय असते या विचाराने मला नवा उत्साह आला. मग काय मस्त माझ्या मुशीतून घडवला त्याला. हा पठ्ठ्या स्वतःची बायको स्वतःच शोधून आणणार याची मला खात्री होती, पण तो कशी पोरगी शोधून आणेल याची जरा धाकधूक होती. अगदीच मिळमिळीत वाटली तर सरळ आपणच वेगळ राहायचं असं मी मनोमन ठरवलं होतं. पण पोराची निवड फारच उत्तम निघाली. एक सेकंद गर्व सुध्दा वाटला अरे पोराला चांगलं निवडता आलं म्हणून !
माणूस म्हणलं की कमी जास्त होतंच, प्रत्येक जण आपल्याला हवा तसा प्रत्येक वेळी वागू शकत नाही, जर तो तसा वागला तर त्याचा रोबो होतो. ही तर दुसऱ्या घरातली, हाडामासाची बाई. त्यामुळे मी आपली तिला माझ्या घराच्या शिस्तीत बसवायला गेले नाही, कारण मला खात्री होती, तिला आवडलं तर ती स्वतःच या शिस्तीत येईल. मग काय आम्ही दोघी एकमेकींना बदलवत गेली १५ वर्ष एकत्र राहतोय. कधी वादाचे प्रसंग झालेच, खटके उडाले तर सरळ समोरासमोर बसतो आणि काय आहे ते सांगतो, उगाच तू माझ्या मनातलं ओळखचा खेळ नाही खेळत बसत. आवडलं, जसं सांगतो, तसं आवडलं नाही हे ही सांगतो. प्रत्येक गोष्ट सांगायची एक पद्धत असते हे तिला पण हळू हळू अंगवळणी पडलं.
मी पहिल्यापासून माझ्या काही मतांवर ठाम असते त्यातलेच एक मत होतं, जोपर्यंत धकतय तोवर मुलासोबत राहायचं, आणि शरीराच्या कुरबुरी सुरु झाल्या की मात्र सरळ ओल्ड एज होम मध्ये जाऊन राहायचं. कोणावरही भार होऊन राहायचं नाही. आणि म्हणूनच मी आणि ह्यांनी मागेच तशी एक तरतूद करून ठेवली होती. एका अशा ठिकाणी आम्ही दोन रूम घेऊन ठेवल्या, पण मुलाला, सुनेला त्याबद्दल काहीच नाही सांगितलं. परवा बोलता बोलता विषय निघाला आणि मी त्याबद्दल सांगितलं, तर भयंकर भडकली ती. म्हणजे लेकापेक्षा सुनेला जास्त वाईट वाटलं. बहुतेक लोकं काय म्हणतील याची तिला भीती वाटली की काय माहित नाही. आपण आपलं कर्तव्य पार पाडत नाही वगैरे वगैरे वाटायला लागलं असावं. पण खरंच असे काहीच नाही. आमच्या त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हत्या, आणि ज्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या. घरात राहिलो तर संसारातून लक्ष काढून नाही घेता येत, त्यामुळे घराबाहेर पडायलाच हवं, आणि खास करून जेव्हा आपण कोणावर तरी जबाबदारी होऊन जाऊ तेव्हा. नेहेमीसारखे या वेळी पण बहुदा माझ्या कायद्याच्या लेकीला शेजारी बसवून घेऊन या आमच्या निर्णयाची बाजू समजावून सांगावी लागेल असं दिसतंय. शहाणी आहे ती, समजून घेईल आणि तिला पटलं तर तिच्या उत्तरवयात हाच कित्ता पुढे गिरवेल.

मानसी होळेहोन्नुर‌

Wednesday, April 11, 2018

चांग भलं....


आठवणी कशाकशात गुंतलेल्या असतात सांगताच येत नाही. कधी एखादा फोटो बघून जाग्या होतात, तर कधी एखादी जागा बघून, कधी एखादे गाणे ऐकून तर कधी अशाच काहीच कारण नसताना भेटायला येतात आठवणी. त्या आठवणींमध्ये वय एकदम हरवलं जातं, अस्पष्ट झालेले संदर्भ ताजे होऊन जातात, जगण्याचं अजून एखादं नवं कारण सापडतं या आठवणींमध्ये.
परवा असाच आजोळच्या ग्रामदैवताचा फोटो पाहिला आणि मनातल्या जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या.
शहरात राहताना सगळेच देव एकत्र होऊन जातात, एखादा वेगळा असा उरत नाही, त्या उलट गावात गावाची ओळख म्हणून एखादा, भैरोबा, बिरोबा, म्हाळसाई, खंडोबा, काळेश्वर आणि असे नानाविध नावाचे देव त्या त्या गावात सुखाने राहत असतात. गावातल्या लोकांनी गाव सोडला तरी त्यांच्या देवावरची श्रद्धा कमी होत नसते, अडीनडीला, सुखाच्या प्रसंगी या सगळ्यांची हमखास आठवण निघत असतेच. साधारण मार्चपासून मेपर्यंतचा काळ हा पूर्वीपासून शेतीसाठी थोडा निवांत काळ समजला जातो त्यामुळे गेल्या पिढीपर्यंत अनेकांचा लग्नाचा मुहूर्त याच काळात धरला जायचा. आजही गावांकडे लग्नासाठी हाच मुहूर्त धरण्याचा पहिला प्रयत्न असतो. हाच काळ असतो गावाच्या यात्रांचा पण. उन्हाळ्याची सुट्टी, शेतीतला थोडा विसावा सगळं कसं कित्येक पिढ्यांपासून जुळवून आणलेलं.
गावच्या देवाच्या/ देवीच्या यात्रेला म्हणून लोकं न चुकता गावची वारी करतात. प्रत्येक दारात पाहुणारावळा असतो, घरोघरी पुरणपोळी शिजते. गावची यात्रा हा मुळात एका दुसऱ्याचा सण नसतो तर तो पूर्ण गावचा सण असतो. देवाची रात्री निघणारी पालखी, त्यातल्या प्रत्येकाच्या हातावर गुळ ठेवणारे गावकरी, रस्ता झाडून पाण्याने सडा घालून त्यावर रांगोळ्या घालणाऱ्या बायका, आकाशात होणारी रोषणाई. फुल, फळ, मिठाई यांनी भरून वाहणारा बाजार. गाव कसा रंगीबेरंगी दिसत असतो. त्यातच देवपूजेच्या नंतर पोटपूजा, मनाची शांती झालीच पाहिजे, म्हणून एका मोकळ्या माळरानावर वेगवेगळे ठेले टाकलेले असतात. कुस्तीचा, तमाशाचा फड याबरोबरच आकाशपाळणे, तलवारी, बाजे, पिपाणी ,धनुष्यबाण, पिसापिसाची टोपी असं काय काय तरी अदभूत मिळायचं तिथं. या सगळ्याचे खूप अप्रूप वाटायचं. आख्या गावात लागतात त्याहून जास्त दिवे त्या दोन तीन दिवसात त्या माळरानावर दिसायचे, गाव असं वेगळंच वाटायचं त्या दिवसात. हक्काने आलेल्या माहेरवाशिणी, त्यांची चिल्लीपिल्ली, हौशे नवशे, गवशे, शेजारच्या गावातला पाव्हना अशा सगळ्यांनी माळरान बहरून गेलेलं असत. एक छोटा बाजा , शिट्टी मिळाली तरी खुश होणारी पोरं, मैत्रिणींना भेटून, आईच्या, वहिनीच्या हातचं खाऊन खुश होणाऱ्या लेकी, चार दिवस घर भरलं म्हणून खुश होणारे थकलेले हात, कुस्तीचे डाव पाहता पाहता हात चालवणारे तरणे, पहिल्यांदा तमाशा बघायला लाजत जाऊन आत सगळीच ओळखीचे चेहरे बघून चेपणारी भीती, यात्रेची एक वेगळीच नशा असते. यात्राही फक्त बघायची नव्हे तर अनुभवायची गोष्ट असते.  
आता मात्र गल्ली बोळात खेळण्यांची दुकाने झालीत, एकेका घरातच शेकड्याने दिवे लागतात, रात्रीचा अंधार आता नावालाही नसतो. घरात गोड करायला काही निमित्त लागत नाही. घरातल्या चुली वेगळ्या झाल्यात त्यामुळे पाहुणे आपोआपच गळालेत. खाण्याची चंगळ करण्यासाठी आता वर्षभर थांबावं लागत नाही. कुस्ती, तमाशा यापेक्षा कितीतरी वेगळी मनोरंजनाची साधने आता बोटाच्या अंतरावर आली आहेत. सारवायच्या अंगणांऐवजी गाड्या ठेवायला फरश्या आल्या आहेत. काही अंतरं वाढली आहेत, तर काही जाणीवा बदलल्या आहेत. काही ठिकाणी श्रद्धा आणि भक्ती यातली गल्लत व्हायला लागली आहे, तर काही ठिकाणी वेळ, पैसा याचे गणित सोडवता येत नाहीये. बदल चिरकालिक असतो.
यात्रा होत होत्या, त्या होतंच राहणार, लोकं येत राहतील, यात्रा होत राहतील, त्यांचं स्वरूप बदलेल, लोकं त्या बदललेल्या स्वरूपाला आत्मसात करतील, सोहळे साजरे होतच राहतील, ते कधीही कोणासाठीही थांबत नसतात. आनंद घेण्यासाठी, देण्यासाठी नातं, कारण, पैसा कशाचीच गरज नसते. वर्षे लोटली गावच्या यात्रेला जाऊन, तेव्हा बोलावणारे आता नाहीत, आता जे आहेत त्यांच्या बोलावण्यात आग्रह नाही, पण तरीही यात्रा म्हणाल्यावर दंडवत घालणारे, रात्रीची पालखी, देवळात मिळणारे गुळ खोबरं, आणि चांगभलंचा गजर कानात उमटतच राहतो. यात्रेत म्हणलेलं चांग भलं साऱ्या सृष्टीसाठी असतं, फक्त तिथे येणाऱ्या, नमस्कार करणाऱ्यांसाठी नाही असं कधी तरी आजीच्या तोंडून ऐकलं होतं. तेच आठवत दरवर्षी यात्रेला न जाताही यात्रेची आठवण काढत, चांग भलं म्हणत मी यात्रा जगून घेते.  
मानसी होळेहोन्नुर


Wednesday, April 4, 2018

ती_आणि_त्या १




ती

पण काय हरकत होती त्यांनी सोहमला दोन तास सांभाळायला. तिची नुसती चिडचिड चालली होती. पॉपकॉर्न फुटावे तशी ती फुटत होती. सोहम च्या जागी निशा ताईंचा अर्णव असता तर त्यांनी दोन तास काय दोन महिने बघून घेतलं असतं. तुझ्या आईला मला कधीच मदत करायची नसते. ही काही आजची पहिली वेळ नाही. लग्न ठरल्यापासून बघते आहे मी. काहीही करताना निशा ताईंना माझ्यापेक्षा चांगलं घेतात त्या. मला काही करायचं झालं की त्या आजारी तरी असतात, किंवा उरकायचं म्हणून उरकतात.
नाही म्हणायला घरात मदत करतात, पण कधी तोंड उघडून कौतुक करायचं नाही की कशाला चांगलं म्हणायचं नाही. बोलणं तर इतकं मोजून मापून जणू काही पैसेच पडणार आहेत दोन शब्द सुनेशी जास्त बोलल्या तर.
हां आता मी काय करावं याबद्दल कधी काही सांगत नाहीत, पैश्याबद्दल तर चुकूनही विचारत नाहीत. पण तरी स्वतःहून कोणती गोष्टही करत नाहीत. आता मी जर त्यांना एखादी साडी आणली, तर लगेच पुढच्या महिन्यात तेवढ्याच किंमतीची साडी मला आणून देतील. आपण सगळे एखाद्या हॉटेल मध्ये गेल्यावर जेवणाचं बिल दिलं तर पुढच्या वेळी पुढे होऊन लगेच त्या नाहीतर बाबा बिल देतील. बाबा आपले साधे सरळ आहेत, कधीतरी चुकून ते बिल द्यायला लागले तर याच डोळे मोठे करून बघतील.
आम्ही नवरा बायको कुठेही फिरायला गेलो तरी यांची तक्रार भुणभुण नसते, आता माहेर जवळ आहे त्यामुळे आईकडे जाणे येणे असतेच पण त्यावरून गेल्या दहा वर्षात कधी बोलल्या नाहीत पण सोहमला कधी एक दिवस त्यांच्याकडे ठेवून घेत नाहीत.
आम्ही ही समजून घेऊन सोहमला शाळेनंतर दोन तास पाळणाघरात ठेवायचं ठरवलं होतं. सगळे नीट चाललं होतं, पण नेमक्या त्या काकू आजारी पडल्या आणि आता काहीतरी वेगळी सोय करावी लागणार हे लक्षात आल्यावर त्यांनी साफ हात वर झटकले. म्हणजे आता मला नोकरी सोडावी लागेल नाहीतर सोहमला आईकडे सोडावं लागेल. तसा तो आधीही आईकडेच असायचा दिवसभर म्हणा.त्यावर आता हा काय म्हणतोय माहित नाही. बरं हा आता दुसरीत आहे, स्वतः सगळं करून घेतो, तसा त्याचा काही त्रास नाही, फक्त त्याच्याशी भरपूर बोलावं लागतं. सतत तो काहीना काही विचारत असतो. पण काय हरकत आहे तुमचाच नातू आहे ना तो.
यांच्यासाठी आम्ही दुसऱ्या शहरात आलेल्या चांगल्या संधी घालवल्या, वेगळे घर घेतलं पण राहायला गेलो नाही. घरात कायम कोणतीही गोष्ट करताना दोघांना विचारात घेऊन मगच निर्णय घेतले, आता आमची ही थोडी गरज त्यांना पूर्ण करता येत नाही का?

त्या

मला खरं तर ही इतकं बोलणारी सून नकोच होती, पण पोराला पसंत पडली आणि आमच्यासाठी पवित्र झाली. कसं काय लोकांना इतकं बोलवतं बाबा मला कधीच कळलं नाही. यांचं तोंड कसं दुखत नाही कधी. ही काय हिचा गोतावळा काय साधी सरळ गोष्ट एका वाक्यात सांगून कधीच संपवणार नाहीत. हे लांबण लावणार त्याला. आता लग्नानंतर आम्ही एकत्र राहणार म्हणजे तिची काहीच हरकत नव्हती त्याला उलट तिला तसेच घर हवं होतं. पण मग मला साधी सरळ हाक मारायची सोडून प्रसादच्या आई असं म्हणायला लागल्यावर मात्र मीच म्हटलं, काकू, मावशी, आत्या, आई सासूबाई अशी काहीही हाक मार.
माझी लेक निशू पण माझ्यासारखीच अबोल, कधी मनातलं काही बोलणार नाही, माझ्यासारखीच असल्यामुळे मला बरोबर तिच्या मनातलं कळायचं. आता ती नोकरी नाही करत, त्यामुळे स्वतःवर खर्च पण नाही करत कधी म्हणून मी कधी तिला जरा काही जास्त घेतलं की लगेच सून बाईंच्या पोटात दुखायला लागायचं. मला हे जसं लक्षात आलं मग आपलं निशाला काहीही द्यायचं असलं की हिच्यासमोर देणंच बंद केलं. तिने आणि तिच्या नवऱ्याने अगदी ठरवून मुलगा मोठाहोईपर्यंत एका तरी पालकाने घरीच थांबायचा निर्णय घेतला, आणि मस्त घरबसल्या शक्य आहे ते ते सगळं करते ती. मुलाला कसं अगदी छान वळण लावलं आहे, अगदी सॉफ्ट आहे, हळू बोलतो, ओरडत नाही, आला की त्याचे पुस्तक घेऊन बसतो, कधीतरी चित्र रंगवत बसतो. काही म्हणून बघावं लागतं नाही त्याच्याकडे. आणि आमचा सोहम म्हणजे बरोबर त्याचं दुसरं टोक आहे. एक मिनिट हा मुलगा एका जागी शांत बसत नाही. नुसता बोलत तरी असतो, नाहीतर काही तरी शंका विचारत असतो. ह्याला हात लावेल, ते पाडून ठेवेल, नुसता गोंधळ असतो हा घरात असला म्हणजे.
आता यांची गरज म्हणून आम्ही दोन तास त्याला सांभाळायचं म्हणे, मुळात आम्हाला न विचारता त्यांनीच हा निर्णय घेतला. मला पहिले राग त्याचा आला, मग नंतर तिने अर्णव आणि सोहम ची तुलना करायला सुरुवात केली, आता जर मी हिची आणि निशा ची तुलना केली तर आवडणार आहे का हिला. तरी मी काही बोलायला गेले नाही, फक्त साफ सांगितलं आम्हाला जमणार नाही, तुम्ही दुसरी काही तरी सोय बघा. हे म्हणत होते असे एकदम तोडू नकोस, पण माझे म्हणणं आता परत अडकून पडायचं का/ एखाद दिवसाचा प्रश्न असता तर ठीक होतं,पण रोज जमणार नाही बाबा. आमचा फिरायचा ग्रुप मस्त जमलाय सगळं विसरावं लागेल आता.
आज दहा वर्षात मी कधीच ह्यांना काहीच विचारलं नाही, उलट त्या दोघांना तिघांना कायम फिरायला जायला सुचवलं, ते गेले की तेवढंच माझे घर परत मला माझं वाटायचं. हिने घराची शिस्त पूर्ण बदलवली, पण मी काही बोलले नाही, तिची हौस होऊन जाऊ देत म्हणत गप्प राहिले. घर खर्चात आम्हीही त्यांच्या एवढाच वाटा उचलला, त्यामुळे तर ते दोघं त्यांचं स्वतःच घर घेऊ शकले पण कधी त्याबद्दल काहीच बोलले नाही हे दोघेही. आता जेव्हा केव्हा बाहेर गेलो तर यांच्यावर भार नाही पडू दिला आमचा, एकदा यांनी खर्च केला म्हणाल्यावर पुढच्या वेळी लगेच आम्ही केला.
खरंतर मला किती तरी गोष्टी पटत नाहीत त्यांच्या, सांगायला गेलं तर खूप काही आहे, पण नको कशाला म्हणत दर वेळी गप्प बसले, आणि तसेही बोलणे माझ्या स्वभावात नाही. पण यावेळी मात्र राहवलं नाही आन ठाम पणे माझा निर्णय सांगितला. शेवटी सासू म्हणून माझाही मान आहेच ना..!
मानसी होळेहोन्नुर