Wednesday, April 11, 2018

चांग भलं....


आठवणी कशाकशात गुंतलेल्या असतात सांगताच येत नाही. कधी एखादा फोटो बघून जाग्या होतात, तर कधी एखादी जागा बघून, कधी एखादे गाणे ऐकून तर कधी अशाच काहीच कारण नसताना भेटायला येतात आठवणी. त्या आठवणींमध्ये वय एकदम हरवलं जातं, अस्पष्ट झालेले संदर्भ ताजे होऊन जातात, जगण्याचं अजून एखादं नवं कारण सापडतं या आठवणींमध्ये.
परवा असाच आजोळच्या ग्रामदैवताचा फोटो पाहिला आणि मनातल्या जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या.
शहरात राहताना सगळेच देव एकत्र होऊन जातात, एखादा वेगळा असा उरत नाही, त्या उलट गावात गावाची ओळख म्हणून एखादा, भैरोबा, बिरोबा, म्हाळसाई, खंडोबा, काळेश्वर आणि असे नानाविध नावाचे देव त्या त्या गावात सुखाने राहत असतात. गावातल्या लोकांनी गाव सोडला तरी त्यांच्या देवावरची श्रद्धा कमी होत नसते, अडीनडीला, सुखाच्या प्रसंगी या सगळ्यांची हमखास आठवण निघत असतेच. साधारण मार्चपासून मेपर्यंतचा काळ हा पूर्वीपासून शेतीसाठी थोडा निवांत काळ समजला जातो त्यामुळे गेल्या पिढीपर्यंत अनेकांचा लग्नाचा मुहूर्त याच काळात धरला जायचा. आजही गावांकडे लग्नासाठी हाच मुहूर्त धरण्याचा पहिला प्रयत्न असतो. हाच काळ असतो गावाच्या यात्रांचा पण. उन्हाळ्याची सुट्टी, शेतीतला थोडा विसावा सगळं कसं कित्येक पिढ्यांपासून जुळवून आणलेलं.
गावच्या देवाच्या/ देवीच्या यात्रेला म्हणून लोकं न चुकता गावची वारी करतात. प्रत्येक दारात पाहुणारावळा असतो, घरोघरी पुरणपोळी शिजते. गावची यात्रा हा मुळात एका दुसऱ्याचा सण नसतो तर तो पूर्ण गावचा सण असतो. देवाची रात्री निघणारी पालखी, त्यातल्या प्रत्येकाच्या हातावर गुळ ठेवणारे गावकरी, रस्ता झाडून पाण्याने सडा घालून त्यावर रांगोळ्या घालणाऱ्या बायका, आकाशात होणारी रोषणाई. फुल, फळ, मिठाई यांनी भरून वाहणारा बाजार. गाव कसा रंगीबेरंगी दिसत असतो. त्यातच देवपूजेच्या नंतर पोटपूजा, मनाची शांती झालीच पाहिजे, म्हणून एका मोकळ्या माळरानावर वेगवेगळे ठेले टाकलेले असतात. कुस्तीचा, तमाशाचा फड याबरोबरच आकाशपाळणे, तलवारी, बाजे, पिपाणी ,धनुष्यबाण, पिसापिसाची टोपी असं काय काय तरी अदभूत मिळायचं तिथं. या सगळ्याचे खूप अप्रूप वाटायचं. आख्या गावात लागतात त्याहून जास्त दिवे त्या दोन तीन दिवसात त्या माळरानावर दिसायचे, गाव असं वेगळंच वाटायचं त्या दिवसात. हक्काने आलेल्या माहेरवाशिणी, त्यांची चिल्लीपिल्ली, हौशे नवशे, गवशे, शेजारच्या गावातला पाव्हना अशा सगळ्यांनी माळरान बहरून गेलेलं असत. एक छोटा बाजा , शिट्टी मिळाली तरी खुश होणारी पोरं, मैत्रिणींना भेटून, आईच्या, वहिनीच्या हातचं खाऊन खुश होणाऱ्या लेकी, चार दिवस घर भरलं म्हणून खुश होणारे थकलेले हात, कुस्तीचे डाव पाहता पाहता हात चालवणारे तरणे, पहिल्यांदा तमाशा बघायला लाजत जाऊन आत सगळीच ओळखीचे चेहरे बघून चेपणारी भीती, यात्रेची एक वेगळीच नशा असते. यात्राही फक्त बघायची नव्हे तर अनुभवायची गोष्ट असते.  
आता मात्र गल्ली बोळात खेळण्यांची दुकाने झालीत, एकेका घरातच शेकड्याने दिवे लागतात, रात्रीचा अंधार आता नावालाही नसतो. घरात गोड करायला काही निमित्त लागत नाही. घरातल्या चुली वेगळ्या झाल्यात त्यामुळे पाहुणे आपोआपच गळालेत. खाण्याची चंगळ करण्यासाठी आता वर्षभर थांबावं लागत नाही. कुस्ती, तमाशा यापेक्षा कितीतरी वेगळी मनोरंजनाची साधने आता बोटाच्या अंतरावर आली आहेत. सारवायच्या अंगणांऐवजी गाड्या ठेवायला फरश्या आल्या आहेत. काही अंतरं वाढली आहेत, तर काही जाणीवा बदलल्या आहेत. काही ठिकाणी श्रद्धा आणि भक्ती यातली गल्लत व्हायला लागली आहे, तर काही ठिकाणी वेळ, पैसा याचे गणित सोडवता येत नाहीये. बदल चिरकालिक असतो.
यात्रा होत होत्या, त्या होतंच राहणार, लोकं येत राहतील, यात्रा होत राहतील, त्यांचं स्वरूप बदलेल, लोकं त्या बदललेल्या स्वरूपाला आत्मसात करतील, सोहळे साजरे होतच राहतील, ते कधीही कोणासाठीही थांबत नसतात. आनंद घेण्यासाठी, देण्यासाठी नातं, कारण, पैसा कशाचीच गरज नसते. वर्षे लोटली गावच्या यात्रेला जाऊन, तेव्हा बोलावणारे आता नाहीत, आता जे आहेत त्यांच्या बोलावण्यात आग्रह नाही, पण तरीही यात्रा म्हणाल्यावर दंडवत घालणारे, रात्रीची पालखी, देवळात मिळणारे गुळ खोबरं, आणि चांगभलंचा गजर कानात उमटतच राहतो. यात्रेत म्हणलेलं चांग भलं साऱ्या सृष्टीसाठी असतं, फक्त तिथे येणाऱ्या, नमस्कार करणाऱ्यांसाठी नाही असं कधी तरी आजीच्या तोंडून ऐकलं होतं. तेच आठवत दरवर्षी यात्रेला न जाताही यात्रेची आठवण काढत, चांग भलं म्हणत मी यात्रा जगून घेते.  
मानसी होळेहोन्नुर


No comments:

Post a Comment