Wednesday, April 18, 2018

ती आणि त्या २

ती

ह्याने जेव्हा मला सांगितलं होतं की त्याला मी आवडते त्यावर माझा पहिला प्रश्न होता, आणि तुझ्या आईला? मी आमच्या घरात आई आणि आजीच्या कुरुबुरी बघतच मोठी झाले, त्यामुळे मला लग्न या प्रकरणात नवऱ्यापेक्षा सासू या व्यक्तीचीच भीती जास्त वाटायची. आईमध्ये खूप काही करायची ताकद होती, आणि बाबांनाही ते माहित होतं, पण तरीही आजीशी जमवून घेण्यातच तिची निम्मी शक्ती संपून जायची, शेवटी अंथरुणाला खिळल्यावर आजी थोडी फार बदलली होती, तेव्हाच मग आई मोकळी झाली आणि घराबाहेर मुक्तपणे पडू शकली. वयाच्या ४० मध्ये तिने शाळा सुरु केली आणि पन्नाशी मध्ये ती यशस्वी उद्योजिका झाली होती. मला खरंच अभिमान होता आईचा, त्यामुळे आईच्या वाटेला आलेला भोग माझ्या वाटेला येऊ नये असे खूप वाटायचं, त्यामुळेच तर लग्न नकोच वाटायचं, मी तर त्याला म्हणलं पण होतं, लग्न वगैरे काही नको, हवं तर तसेच राहू. त्यावर तो हसला, तुझ्या या निर्णयाचा पुढे मागे तुला कदाचित पश्चाताप होऊ शकेल, त्यापेक्षा तू आधी माझ्या घरच्यांना खास करून आईला भेट आणि मग निर्णय घे म्हणाला. मग काय मी त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या आईच्या आणि त्याच्या घराच्या प्रेमात पडले. मला कधी असे वाटलेच नाही की मी ह्या माणसांना पहिल्यांदा भेटतीये, मस्त गप्पा झाल्या, आणि त्यांच्या दारातच मी त्याला सांगितले, मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. मग काय लग्न झाले अगदी साध्या पद्धतीने जसे मला आणि माझ्या सासुबाईंना हवे होते तसेच.
आता दोन माणसे म्हणाल्यावर त्यांच्यात मतभेद येणारच, सगळेच कसे एकमेकांचे एकमेकांना पटेल, मग काय आमच्यातही वाद होतातच. आता परवाचाच प्रसंग कशावरून तरी विषय निघाला आणि त्या म्हणाल्या, आम्ही सिनियर सिटिझन्स हाउस मध्ये घर घेतलेलं आहे. त्यावरून आमच्या घरात वादाला तोंड फुटलंय. त्यांनी असे काही करायची गरज नाही असे आम्हाला वाटते, तर त्यांचे म्हणणे आहे उगा कोणावर ओझे व्हायचं नाही मला. हात पाय धड असे पर्यंत तुमच्यासोबत ठीक आहे, पण त्या नंतर तुमच्याकडे नको, सुदैवाने माझे पैसे आहेत, त्यामुळे आर्थिक भार तर पडणार नाहीच, शारीरिक भार पण मला नको आहे.
तशा त्या पहिल्यापासूनच स्वतंत्र बाई, आमचे घर, नातेवाईक सगळे कोणी बांधून ठेवले असतील तर त्यांनीच, स्पष्ट बोलणाऱ्या म्हणून फटकळ वागायच्या त्या लोकांना, पण मला त्यांचा हा फटकळपणाच बरा वाटायचा, एक घाव दोन तुकडे, समोरच्याला पूर्ण त्याची स्पेस द्यायच्या, आम्ही लग्न कधी करणार, हनिमूनला कुठे जाणार, वेगळे रहा, पैसे कसे खर्च करता, मूल कधी, असले कोणतेही प्रश्न त्यांनी कधीच विचारले नाहीत, आणि आम्हीही त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांनी विचारल्याशिवाय काही सांगितले नाही. एकत्र राहत असलो तरी आम्ही सगळेजण व्यक्ती म्हणून वेगळे आहोत, हे पथ्य आजवर पाळत आलोय, पण आता हा त्यांचा आजारी पडल्यावर वेगळे, राहण्याचा हट्ट मात्र काही झेपत नाहीये.


त्या

आमचं लग्न झाल्यावर थोड्याच दिवसात मला आमच्या घरातलं पाणी लक्षात आलं. सासूबाई बिचाऱ्या सासऱ्यांच्या हुकुमाखाली गांजलेल्या होत्या, आमचे हे पण वडिलांच्या समोर कायम दाबून असायचे. नाना होते कर्तबगार त्यामुळेच त्यांना सगळ्यांना त्यांच्या पंखाखाली घ्यायला पण आवडायचे. मी त्यांच्या पंखाखाली जायला थेट नाकारलं नाही आणि जोपर्यंत माझं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं, नाना थकले होते, त्यामुळे आमच्या घरी मला थोडे झुकतं माप मिळायचं एवढं खरं. मग त्याचा उपयोग करून मी प्रत्येकाला त्याची स्पेस मिळवून दिली.
मुलगा झाला तेव्हा मी थोडी खट्टू झाले कारण मला मुलगी हवी होती, मला जे मिळाले नाही ते सगळं मला तिला मिळवून द्यायचं होतं, स्त्रीत्वाचा सन्मान स्त्रीच करू शकते हे दाखवून द्यायचं होतं. पण मग मुलगा झालाच तर मग आपण त्याला जाणीव करून देऊ यात स्त्री काय असते या विचाराने मला नवा उत्साह आला. मग काय मस्त माझ्या मुशीतून घडवला त्याला. हा पठ्ठ्या स्वतःची बायको स्वतःच शोधून आणणार याची मला खात्री होती, पण तो कशी पोरगी शोधून आणेल याची जरा धाकधूक होती. अगदीच मिळमिळीत वाटली तर सरळ आपणच वेगळ राहायचं असं मी मनोमन ठरवलं होतं. पण पोराची निवड फारच उत्तम निघाली. एक सेकंद गर्व सुध्दा वाटला अरे पोराला चांगलं निवडता आलं म्हणून !
माणूस म्हणलं की कमी जास्त होतंच, प्रत्येक जण आपल्याला हवा तसा प्रत्येक वेळी वागू शकत नाही, जर तो तसा वागला तर त्याचा रोबो होतो. ही तर दुसऱ्या घरातली, हाडामासाची बाई. त्यामुळे मी आपली तिला माझ्या घराच्या शिस्तीत बसवायला गेले नाही, कारण मला खात्री होती, तिला आवडलं तर ती स्वतःच या शिस्तीत येईल. मग काय आम्ही दोघी एकमेकींना बदलवत गेली १५ वर्ष एकत्र राहतोय. कधी वादाचे प्रसंग झालेच, खटके उडाले तर सरळ समोरासमोर बसतो आणि काय आहे ते सांगतो, उगाच तू माझ्या मनातलं ओळखचा खेळ नाही खेळत बसत. आवडलं, जसं सांगतो, तसं आवडलं नाही हे ही सांगतो. प्रत्येक गोष्ट सांगायची एक पद्धत असते हे तिला पण हळू हळू अंगवळणी पडलं.
मी पहिल्यापासून माझ्या काही मतांवर ठाम असते त्यातलेच एक मत होतं, जोपर्यंत धकतय तोवर मुलासोबत राहायचं, आणि शरीराच्या कुरबुरी सुरु झाल्या की मात्र सरळ ओल्ड एज होम मध्ये जाऊन राहायचं. कोणावरही भार होऊन राहायचं नाही. आणि म्हणूनच मी आणि ह्यांनी मागेच तशी एक तरतूद करून ठेवली होती. एका अशा ठिकाणी आम्ही दोन रूम घेऊन ठेवल्या, पण मुलाला, सुनेला त्याबद्दल काहीच नाही सांगितलं. परवा बोलता बोलता विषय निघाला आणि मी त्याबद्दल सांगितलं, तर भयंकर भडकली ती. म्हणजे लेकापेक्षा सुनेला जास्त वाईट वाटलं. बहुतेक लोकं काय म्हणतील याची तिला भीती वाटली की काय माहित नाही. आपण आपलं कर्तव्य पार पाडत नाही वगैरे वगैरे वाटायला लागलं असावं. पण खरंच असे काहीच नाही. आमच्या त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नव्हत्या, आणि ज्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या. घरात राहिलो तर संसारातून लक्ष काढून नाही घेता येत, त्यामुळे घराबाहेर पडायलाच हवं, आणि खास करून जेव्हा आपण कोणावर तरी जबाबदारी होऊन जाऊ तेव्हा. नेहेमीसारखे या वेळी पण बहुदा माझ्या कायद्याच्या लेकीला शेजारी बसवून घेऊन या आमच्या निर्णयाची बाजू समजावून सांगावी लागेल असं दिसतंय. शहाणी आहे ती, समजून घेईल आणि तिला पटलं तर तिच्या उत्तरवयात हाच कित्ता पुढे गिरवेल.

मानसी होळेहोन्नुर‌

No comments:

Post a Comment