Thursday, September 21, 2017

पिवळा चाफा...

ती मला साधारण रोज भेटते, एखाद दिवशी ती दिसली नाही तिचा आवाज ऐकला नाही तर मला चुकचुकल्या सारखे होते. सकाळी 8 च्या सुमारास तिच्या गाडीचा, तिचा किंवा तिच्या मुलांचा आवाज ऐकून आम्ही सगळे हुश्श करतो. वेळेत एक पाच दहा मिनिटांचा फरक पडला तर आम्ही इगाच बाहेर येरझाऱ्या घालत बसतो, किंवा उगाचच गाडीच्या आवाजाचा कानोसा घेत बसतो.
ती असेल पन्नाशी आसपास, तसं वाटत नाही तिच्याकडे पाहून पण तीच एकदा बोलता बोलता म्हणाली माझा नातू आहे तुमच्या मुलाच्या वयाचा तेव्हा मी तिच्या वयाचा उगाचच एक अंदाज बांधला. मध्यम चणीची, गव्हाळ रंगाची, ती रोज व्यवस्थित साडी नेसून येते, कुरळ्या केसांची वेणी घातलेली असते, क्वचित त्यावर कधीतरी फुल, साडीवर शर्ट घालून, हातात ग्लोव्हज घालून ती जेव्हा जेव्हा सगळ्यांच्या घरातला कचरा गोळा करते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर राग, किळस नसते, तर असते प्रसन्न हसू... 
वर्षाहून जास्त झाले असेल ती तिची मुलं आमच्या भागात कचरा गोळा करण्याचे काम करतात. पण तिचे नाव विचारण्याची गरजच पडली नाही मावशी म्हणून हाक मारणं पुरेसं होत. 
एकदा कधीतरी घरातल्या कचऱ्यातली काचेची बाटली आम्ही वेगळी ठेवली होती आणि मावशींना तसं सांगितलं, तर त्यावर हातावरची पट्टी दाखवत म्हणाल्या तुमच्यासारखा सगळ्यानी विचार केला तरी बरं होईल. हे सगळं बोलताना सुद्धा त्यांच्या आवाजात राग नव्हता, चीड नव्हती, साधी एक माणुसकीची अपेक्षा होती.
एकदा असेच दहा पंधरा दिवस त्या नाही दिसल्या तेव्हा मी त्यांच्या सोबत येणाऱ्या मुलांकडे चौकशी केली, तर ती मुलं म्हणाली ती गांवाला गेलीये, मग मीही फारशा चौकशीच्या फंदात नाही पडले. जवळपास महिन्या भरानी त्या दिसल्या, मग दोन तीन दिवसांनी त्यांना सावकाश विचारलं मावशी कुठे गेला होता दिसला नाहीत? तर हसून म्हणाल्या जरा चारधाम, हरिद्वार हृषीकेश फिरून आले. त्यांच्या पायातल्या स्पोर्ट्स शूज कडे बघत मी म्हणाले, अच्छा पण मग हे शूज कसे काय एकदम, तर म्हणाल्या तिकडे थंडी खूप होती आणि चालायचे होते म्हणून विकत घेतले, खूप सोयीचे आहेत बघा वापरायला. मग मला सांगत होत्या, त्या एका भजनी ग्रुपच्या सदस्य आहेत, तर एका नेत्याने त्यांना सोबत म्हणून नेले होते, अट एकाच की या लोकांनी रोज भजने गायची आणि नाममात्र शुल्का मध्ये सगळं फिरवून आणलं. आधीच हसमुख असलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे तेज झळकत होते.
एकदा कधीतरी कचरा देताना मी सहज म्हणले मावशी आज सण आहे तरी आलात? ताई आम्हाला कसली सुट्टी, एक दिवस सुट्टी घेतली तर दुसऱ्या दिवशी दुप्पट काम पडतं त्यामुळे एक नवरात्री मधल्या अष्टमीची सोडली तर आम्ही शक्यतो सुट्टी नाही घेत. मला त्यांच्या बद्दल वाटणारा आदर अजून वाढला. 
एकदा असंच त्या बोलता बोलता म्हणाल्या ताई दुसरं काम करायला काही हरकत नाही, पण हे काम करून चांगले पैसे मिळतात, आणि त्याशिवाय समाधान मिळते समाजातली घाण दूर करायचं, कोणतं तरी काम करायचं आहे ना मग काय हरकत आहे हे काम करायला? यात कसली लाज बाळगायची?
रोज स्वतः घाणीचा वास सहन करून, त्या घाणीत हात घालून कचरा वेगळा करण्याचं काम करणाऱ्या आमच्या मावशी मला खऱ्या अर्थाने स्वच्छता लक्ष्मी वाटतात.
आमच्या मावशींसाठी पिवळं धम्मक चाफ्याचे फुल!
मानसी होळेहोन्नुर

Sunday, September 10, 2017

काकूची पुतणी की ... ???

ते घर तसं नेहेमीचं होतं, पण तरीही त्या दिवशी त्या घरी जाताना उगाचच भीती वाटत होती. आज जे काही बोलणं होईल त्यामुळे सगळी नाती बदलतील, आणि माणसांकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा. आज मी काही एकटी नव्हते, सोबत आई बाबा पण होते. गेली तीन चार वर्ष मी या घराच्या पायऱ्या चढत आहे, तेव्हा कधी वाटलंही नव्हतं, पुढे असं काही होईल...
चैतन्यची आणि माझी मैत्री म्हणजे अक्ख्या कॉलेजला पडलेला प्रश्न होता. तो असा चिकणा चुपडा आणि मी जरा मुलांच्यासारखी. नावाला मुलगी पण बाकी सगळं मुलांसारखचं. आणि चैतन्य एकदम पढाकू, घरातला कोणी तरी वाटावा असा गोड. तो कायम पुढच्या बेंचवर, सगळी उत्तरं देणारा, आणी मी धापा टाकत के टी लावत पास होणारी. खरंतर आम्ही चुकूनही एकमेकांच्या वाटेला गेलो नसतो पण ती अंताक्षरी आडवी आली. म्हणजे मी पण नाव दिल आणि त्यानी पण नाव दिलं. आणि ड्रॉ मध्ये आमची दोघांची टीम निघाली. आम्ही दोघांनी एकमेकांकडे शक्य तेवढ्या तुच्छतेने पाहिलं, पण मग बोलता बोलता समजलं दोघेही कच्चे लिंबू नाहीत, म्हणजे मी सी अर्जुन म्हणायच्या आत हा मला त्याचे चित्रपट गाणी सांगायचा, तर मी कोणतं गाणं कोणावर चित्रित झालंय, कोणत्या वर्षी हे त्याला डोळ्याचं पातं लवायच्या आत सांगायचे. अर्थात  अंताक्षरी आम्हीच जिंकली. मग काय संगीताच्या पायावर सुरु झालेली मैत्री पुढे नेण्यासाठी खुप गोष्टी होत्या. ट्रेक, पुस्तकं आणी जोडीला अभ्यास, कोण कोणामुळे बदलत होतं माहीत नाही, पण माझा त्यावर्षीचा निकाल कोणत्याही के टी शिवाय लागला, पण चैतन्य चा पहिला नंबरही हुकला नाही. स्मार्ट अभ्यास करायला शिकवलं होतं त्यानी मला.
मग काय आधी ग्रुप मध्ये असणारे आम्ही हळू हळू दोघं च फिरायला लागलो. we are just friends म्हणत दिवसरात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मात्र फिरत होतो. कॅम्पस सिलेक्शन मधे दोघांना दोन वेगळ्या कंपनी मधे नोकरी मिळाल्यावर मात्र  त्याची ट्यूब पेटली आणि पठ्ठ्यानी मला सरळ सांगितलं आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात आहोत, हे तुला कळेल तेव्हा मला तरी आत्ता कळलंय. आता विचार बिचार करून केस पांढरे करू नकोस, आपण घरी सांगूया, दोन तीन वर्षात लग्न करून मोकळे होऊया. मी टोटल बोल्ड झाले होत्या त्याच्या त्या बॉल वर. मग काय रात्री विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं नेहेमीसारखा या वेळी पण तूच बरोबर. मग ही आजची बैठक ठरली होती. त्याच्या आई बाबांना मी माहित होते, माझ्या आई बाबांना तो माहित होता, पण माझ्या आईबाबांना त्याचे आई बाबा माहित नव्हते. म्हणून ही औपचारिकता.
‘अग आज तरी साडी नेस.एवढा दाखवण्याचा कार्यक्रम ना आज ’
‘आई प्लीज काकूंनी मला इतक्या वेळा बघितलंय आता हे साडी वगैरे काय? आणि हा काही दाखवण्याचा कार्यक्रम नाही, तुमची एकमेकांशी ओळख व्हावी म्हणून आज जातोय आपण भेटायला.’
मला आधीच टेन्शन आलं होतं आणि आई ते अजून वाढवत होती. काकूंच्या कडे जायचं म्हणून तिनी मिठाई चे बॉक्स, काहीतरी गिफ्ट काकांसाठी पुस्तक (ते मीच सांगितलं होतं) असं काय काय घेतलं होतं. मला बाबांना हज्जार सूचना दिल्या होत्या, असं बोलू नका, तसं बोलू नका. थांबतच नव्हत्या तिच्या सूचना. शेवटी त्यांच्या घरापाशी गाडी पोहोचली तेव्हा कुठे तिच्या सूचनांची टेप थांबली.
मग घरात शिरताना मला वेगळंच वाटत होतं, म्हणजे उगाचच दडपण वगैरे. पण काका काकू, आई बाबा असे काही गप्पा मारायला लागले जणू काही ते एकमेकांना खूप आधी पासून ओळखतात, म्हणजे तसं झालंही, आत्या, आणि काका एकाच कॉलेज मध्ये होते, काकूंची बहिण पूर्वी आईच्या ब्रँच मध्ये होती. मग काय गप्पांना नुसता उधाण आलं होतं. काकूंनी मला आवडतात म्हणून खास दडपे पोहे केले, होते. काकू नेहेमीच माझे लाड करायच्या, कधी आवडले म्हणून कानातले आण, कधी कुर्ता आण, कधी माझी आवडीची भाजी केली कि खास फोन करून घरी बोलवायच्या. म्हणजे जेव्हा आम्हाला दोघांना माहित नव्हतं, पुढे काय होणार आहे, तेव्हाच काकूंनी सगळं ओळखलं होतं.
‘काकू नेहेमीसारखे मस्त झालेत दडपे पोहे.’
‘अग काकू काय म्हणतेस, म्हणजे एवढे दिवस ठीक होतं, पण आता आई म्हणायची सवय कर  बर का?’ माझ्या आईनी मला सांगितलेल्या सुचनांमधली महत्वाची सूचना मी विसरल्याची आठवण करून देत डोळे मोठे करत मला सांगितलं.
‘अग आई आता हे काय नवीन? गेली चार पाच वर्ष मी काकूंना काकू म्हणतीये, आता एकदम आई?’ आईनी मोट्ठे केलेलं डोळे अजूनही मोट्ठेच होते. पण तरीही मला काही पटत नव्हतं, शेवटी काकूच मदतीला धावून आल्या.
‘राहू द्यात हो, कितीही केलं तरी मी काही आईची जागा घेऊ शकणार नाही, मग उगाच कशाला नाटक करायचं. मुळात शब्दांमध्ये काय आहे, तुमची लेक एक व्यक्ती म्हणून माझा आदर करते, मला समजून घेते, माझ्या घरात सहज सामावून जाते. गेल्या चार वर्षांपासून बघतीये ना मी. मध्ये एकदा मला बरं नव्हतं, तर स्वैपाक करून गेली. छोट्या छोट्या गोष्टीतून ती आपलेपण दाखवते, मग आई या नावाची मी सक्ती का करू तिच्यावर? माझा लेक पटकन म्हणेल का तुम्हाला आई, मग तीच अपेक्षा मी सुनेकडून का करावी?’
काकू मला नेहेमीच आवडायच्या. म्हणजे त्या स्पष्ट बोलायच्या, न आवडलेली गोष्ट देखील शांतपणे सांगायच्या. आणि आज तर त्यांनी मला अवघड वाटणारा प्रश्न इतका सहज सोडवला होता की मी पटकन त्यांचा हात हातात घेतला, आणि म्हणलं,
‘हुश्श काकू केवढा मोठ्ठा प्रश्न सोडवला तुम्ही, आता मी खास तुमच्यासाठी म्हणून वेलची वाली कॉफी करते.’

आत जाणाऱ्या पाठमोऱ्या मला काकूंचं बोलणं अस्पष्ट ऐकू येत होतं, कोणतीही गोष्ट लादली की त्याचा त्रास होता, तिनी मनापासून मला अहो आई ऐवजी ए आई हाक मारली तर आवडणारच आहे, पण ए आई म्हणताना आईवर गाजवणारा हक्क तिनी माझ्यावर गाजवला तर माझ्यातल्या सासूला कितपत आवडेल माहीत नाही, त्यापेक्षा हे काकूच बरं. कोणत्याही अपेक्षांच्या लेबलाशिवाय!   

Monday, August 21, 2017

आई होते मुलगी माझी....

काही चित्रपट मनात घर करून राहतात, तुम्ही त्यात बुडून जाऊन जगत असता तो चित्रपट. त्यातली पात्र फक्त पात्र राहत नाही, तुम्हीच होऊन जाता. आणि मग कित्येक दिवस उतरत नाही तो सिनेमा तुमच्या मानगुटीवरून. इतका भिनून जातो तो की वागताना बोलताना घुमत असतो डोक्यात. अशीच अॅलीस ठाण मांडून बसली आहे माझ्या डोक्यात. ५० व्या वाढदिवस मुलांसोबत साजरा करणारी, अगदी आपल्यातलीच एक कुणीतरी. भाषाविद्यानाची प्राध्यापक असणारी ही बया अगदी साधं सरळ आयुष्य जगत असते आणि अचानक ती बोलता बोलता शब्द विसरते, मग एकदा रस्ताच विसरते. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष न करता ती जाते डॉक्टरकडे.

काय झालं असू शकेल हिला आपण पण विचार करायला लागतो, आणि मग समोर येऊन उभा राहतो अल्झायमर्स चा काळोखाचा बोगदा. सुरुवातीला नाकारलं तरी आपण हे नाकारू शकत नाही कळल्यावर तिनी स्वीकारलेलं वास्तव. मग सुरु होते तिची स्वतःची एक लढाई . अल्झायमर मुळे आयुष्य थांबत नाही. आपण ते थांबवू शकत नाही हे पटवण्याची धडपड. तिला असलेला आजार हा आनुवंशिक आहे हे कळल्यावर तिच्या तीन मुलांपैकी मोठी मुलगी आणि मुलगा टेस्ट करून घेतात, पण धाकटी मुलगी जी बाकी दोघांपेक्षा वेगळी आहे, बंडखोर आहे ती नाकारते. तिचं म्हणणं, टेस्ट करून काय मिळणार आहे. जेव्हा तिच्या मोठ्या मुलीला शक्यता आहे हा रोग होण्याची तेव्हा हताश झालेली अॅलीस मधली आई जणू ती तिचीच चूक असल्यासारखी माफी मागत राहते. मग हळू हळू ती विसरायला लागते आजूबाजूची माणसं, शब्द. जे तिचे कधी काळी सख्खे सोबती होते. तेच आत तिची साथ सोडत होते. आयुष्यात तिनी स्वतःच स्थान निर्माण केलं होत शब्दांच्या जोरावर पण आता धूसर होत जाते तेच शब्द. एकीकडे हे होत असतानाच तिचा नवरा, मुलं मात्र तिला सांभाळून घेत असतात. तिला एकाच गोष्ट चार चार पाच पाच वेळा सांगत असतात, ते ही न कंटाळता, न वैतागता.

यातला एक प्रसंग कायम माझ्या डोळ्याच्या कडा पाणावतो. अॅलीस तिच्या धाकट्या मुलीच्या लिडीयाच्या खोलीत जाते, आणि तिची खोली आवरता आवरता तिला मुलीची डायरी मिळाली, आणि तिनी ती वाचायला सुरुवात केली, आपण काय करतोय हे कळण्या न कळण्याच्या पलीकडे गेलेली अॅलीस मुलीच्या मनातली खळबळ जाणून घेत होती. त्याच दिवशी ती मुलीला त्या अनुषंगाने काही बोलते, तेव्हा तिची मुलगी चिडून तिला सांगते ती माझी खासगी डायरी आहे, ती तू का वाचलीस? त्यावर भांबावलेली अॅलीस म्हणते मला खरंच माफ कर मला कळत नव्हतं मी काय वाचतीये. मला खरंच कळत नव्हतं मी काय करतीये. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट च्या वेळी अॅलीस लीडीयाला विचारते तिच्या नाटकाचा प्रयोग कधी आहे मी नक्की येईन. आणि ती तिच्या डायरीत त्याची नोंद करून ठेवते. बाकीचे सगळे विरोध करत असतानाही ती म्हणते नाही मी नक्की जाईन.  सगळे निघून गेल्यावर ती म्हणते, लिडीया मी काल काहीतरी केलं ज्यामुळे ती चिडली होतीस इतकंच मला आठवतंय, पण मी काय केलं ते आठवत नाहीये. मला माफ कर, तेव्हा लेक म्हणते माझीच चूक होती, मीच माफी मागते. तेव्हा तिच्या डोळ्यातला अश्रू पुसत ती म्हणते ठीक आहे ग. मला कुठे काय लक्षात राहणार आहे. पण हे बोलतानाही कुठेच अगतिकता तिच्या आवाजात नसते. तिच्यातली आई सतत जागी असते. आणि त्यानंतर लिडियाच्या खोलीत जेव्हा ती परत जाते तेव्हा तिला त्याच डायरीवर no secrets लिहिलेलं दिसतं. लेकीची आई होऊ घातली होती.

अॅलीस अल्झायमर्स शी निगडीत एका परिषदेत स्वतःचे अनुभव मांडते, तेव्हाही ती विसरत असते एकेक अनुभव, तिच्या मुलीचा नाटकातला अभिनय बघताना ती विसरून जाते ती तिचीच मुलगी आहे, स्वतःच्या नातीला पहिल्यांदा घेतानासुद्धा ती विसरली असते तिच्या मुलांचं बालपण, एकेक शब्द विसरत असताना ती विसरत असते तिच्या आठवणी, विझून जात असतं तिच्या डोळ्यातलं चैतन्य. जेव्हा कोणी सांभाळायला नसतं तेव्हा तिची तीच हट्टी बंडखोर लेक लिडिया येते तिची काळजी घ्यायला. तिच्या सोबत रहायला. तेव्हा अॅलीस होऊन गेलेली असते एक बाळ. फक्त प्रेम समजू शकणारं, प्रेम करू शकणारं एक लहान मूल. एक निरागस जीव जो पोहोचला असतो सगळ्या भाव भावनांच्यापुढे. आणि तिला समर्थपणे सांभाळत असते तिची लेक!

हा चित्रपट खूप काही शिकवून जातो, एकीकडे हे आई लेकीचं तरल नातं तर दुसरीकडे स्वतःच्या असाध्य रोगाशी लढण्याची दुर्दम्य इच्छा. अॅलीस जेव्हा आजारपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असते तेव्हाच इतरांना आपलं ओझं होऊ नये म्हणून आत्महत्या करण्याचा व्हिडीओ करून ठेव स्वतःसाठीच पण भविष्यासाठी. ही लढाई जिंकू शकत नाही हे माहित असूनही तिची लढण्याची जिद्द कुठतरी आपण किती छोट्या छोट्या गोष्टींनी पटकन घाबरून जातो , निराश होऊन जातो याची जाणीव करून देते. अॅलीस तिच्या भाषणात सांगते, मी हरवतीये रोज काही आठवणी, माझं आयुष्य. माझी एकाच इच्छा आहे भविष्यात माझी मुलं किंवा त्यांची मुलं यांच्यावर येऊ नये ही वेळ. या आजारपणामुळे मी शिकतीये क्षणांमधली मजा लुटायला शेवटी आयुष्य काय क्षणांचेच तर आहे. स्वतःला होणारा त्रास मुलांना होऊ नये म्हणून विचार करणारी ही आई खरंच मनात घर करते.!!!   

मानसी होळेहोन्नुर


Still Alis:  https://en.wikipedia.org/wiki/Still_Alice

Saturday, August 5, 2017

'प्रेमाचा भाऊ'

नुकतीच त्या सगळ्यांना शिंग फुटली होती, म्हणजे घरचे, दाराचे, शिक्षक सगळेच तसे म्हणायचे.आरशात त्यांना कधी ती शिंग दिसली नव्हती, पण काही झालं की सगळे हे वाक्य नक्की म्हणायचे. दहावी पास होऊन अकरावी सुरु झाली होती, रोजच्या युनिफॉर्म मधून सुटका झाली होती. शाळेच्या शिस्तीतून मोकाट सुटलेले वळू आहात अस केमिस्ट्रीचे सर म्हणायचे. तशी तेव्हा शहर गावं देखील अजून जास्त हिरवी होती. फोन हातात नाही तर फक्त घरात असायचे. फोटो काढून घेण्यासाठी सगळे जण स्टुडीओ मध्ये जायचे, नाहीतर रिळाच्या कॅमेरानी ३६ किंवा ३७ फोटो काढून ते नंतर धुवून घेऊन बघायचे. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचं अप्रूप होतं. त्यामुळे शाळेतून कॉलेज मधे जाणं म्हणजे एक प्रकारे रंगीत कपडे, थोडी फॅशन कार्याला परवानगी, कॅन्टीन मध्ये खाण्याची मुभा, मुलांशी बोललं तर हरकत घेतली जात नव्हती, किमान छोट्या शहरांमध्ये तरी.
या आधी एखाद्या मुलानी मुलीशी बोलणं म्हणजे त्यांचं नक्कीच काहीतरी अफेअर असणार असं वाटायचं.  कॉलेजमध्ये फिजिक्स केमिस्ट्री चे एकत्र प्रॅक्टिकल्स करताना त्यांच्याशी बोलणं व्हायचं पण  तरीही एक अंतर ठेवूनच सगळं काही चालायचं. अकरावी सुरु होऊन जेमतेम काही दिवस झाले असतील नसतील की फ्रेन्डशिप डे का काय तो आला होता. शाळेमध्ये असेपर्यंत हे फॅड फक्त टीव्ही मध्ये किंवा पिक्चर मध्येच असतं असं वाटायचं म्हणजे मैत्री आहेच मग ती काय फक्त अशी बँड देऊन दाखवायची असं वाटायचं मुळात प्रश्न असायचा हे बँड विकत आणायला घरून ऐसे मिळतील का म्हणून , मग लोकर घेऊन त्याचे घरीच बँड तयार करून अकरावीचा प्रश्न तर संपला होता. मुलींच्या शाळेतल्या तिला अजूनही मुलांच्या हातावर राखीच बांधतात एवढाच माहीत होतं. त्यामुळे तिनी वर्गातल्या तमाम मुलींना फ्रेन्डशिप बँड बांधले पण एकाही मुलाकडे साधं वर करून बघितलं नाही. तशी ती जरा आगाव म्हणूनच ओळखली जायची. कधी कोणाला काय बोलेल याचा कोणालाच नेम नव्हता, भीडभाड न बाळगता  तोंडावर बोलून मोकळी होणारी, शाळेत जरा तरी सुत होती, कॉलेज मधून जाऊन अगदी भूत झाली होती. मुलीच काय मुलं पण घाबरायची.
अशातच कधी तरी तिला जाणवलं तो पिंगट डोळ्याचा मुलगा सारख तिच्याकडे बघायचा. म्हणजे तो वर्गातला अगदीच पपलू. आहे काय आणि नाही काय कॅटेगरी मधला. तिच्या अगदी विरुद्ध, पण तरीही त्याला ती आवडायची. किती तरी वेळा रस्त्यात तिला तो दिसायचा. तसा त्रास त्याचा काहीच नव्हता, पण तो तिच्या मागे आहे हे तिला जाणवायचं. तोवर हा असा अनुभव कधीच आला नव्हता, म्हणजे ही बया काहीही करू शकते या भीती पायी एकही मुलगा तिच्या कधी वाटेल गेला नव्हता. आणि हा डायरेक्ट लाईन मारत होता. आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणीनी सांगून झालं होतं त्याला तू आवडतेस ग, तुझी खूप छान चित्रं काढतो तो. मग एका मैत्रिणीकडून त्यानी एक मस्तस ग्रीटिंग तिच्या वाढदिवसाला पाठवलं. ग्रीटिंग पेक्षा त्याची हिंमत तिला आवडली होती. पण  तीही तेवढ्यापुरतीच.

तसा तो अगदी निरुपद्रवी जीव होता. म्हणजे उगाच समोर घराच्या आसपास घिरट्या घालायचा नाही की फोन करायचा नाही, पण वर्गात एकटक तिच्याकडे बघत बसायचा. एकदा कि दोनदा त्याच्या काही मित्रांनी तिला वहिनी म्हणून चिडवलं त्यावर तिनी त्यांना थांबवून पार त्यांची आई बहिण काढली बिचारे पुढचा एक आठवडा कॉलेज मध्ये आलेच नव्हते. त्याच्यासारखेच त्याचे मित्र पण अगदी पाप्याचं पितर होते, त्याच्या पिंगट डोळ्यात तिला भित्रा ससा दिसायचा. नेहेमी निळ्या किंवा आकाशी रंगाचे शर्ट, टी शर्ट घालायचा, म्हणून हिनीच त्याला नाव पण ठेवलं होतं निळूभाऊ. मग वर्गात जेव्हा फिशपॉड पडायला सुरुवात झाली तेव्हा मात्र ती वैतागली. कशात नाही काही आणि उगाचच तमाशा. त्यावर्षी त्यानी पण बेट लावली होती तिला फ्रेन्डशिप मागूनच दाखवेन.मुळात फ्रेन्डशिप अशी मागून मिळत नसते पण उगाच स्वतःच पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून अशी जबरदस्ती मागून घेतलेली मैत्री म्हणजे प्रेमप्रकरणाची पहिली सुरुवात समजली जायची. तिला पण कुणकुण लागलीच होती या सगळ्याची.

मग काय ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या रविवारी ती मुद्दाम कुठेही बाहेर पडली नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या दारातच तिला तो आणि त्याचे मित्र दिसले.  
‘कॅन्टीन मध्ये येशील का जरा बोलायचं आहे.’ अगदी हळू आवाजात त्यानी विचारलं. ती मानेनीच हो म्हणली. कॅन्टीन मध्ये गेल्याबरोबर त्यानी खिशातला फ्रेन्डशिप बँड बाहेर काढला आणि तिला म्हणाला मला फ्रेन्डशिप देशील. 
तिनी खिशातली राखी बाहेर काढली आणि,’ म्हणाली माझा भाऊ होशील?’
प्रसंग मोठा बाका होता, पण एकदम कुठून त्याला सुचलं कोणास ठाऊक,
‘तू राखी म्हणून बांध मी फ्रेन्डशिप बँड समजून बांधून घेईन.’
‘अरे दोन वेगळी नाती आहेत ती.’
‘प्रेम तर आहेच ना दोन्ही नात्यांमध्ये.’
कपाळावर हात मारत ती राखीची पक्की गाठ बांधली, आणि म्हणाली, ‘मैत्री, प्रेम असं काही सांगून होत नसतं, कर म्हणून करून घेता येत नसतं. ते आतून जुळून यावं लागतं. मैत्रीचे बंध आपोपाप जुळले जात असतात. पौगंडावस्थेत आकर्षण जास्त असतं, त्यात प्रेम, मैत्री शोधायची नसते. खर प्रेम मैत्री असेल तर ते आपोआप समोर येते. त्याला कोणत्याही दिवसाची, प्रसंगाची गरज नसते. भावाची मात्र नेहेमीच गरज पडू शकते मुलींना. तू माझा प्रेमाचा भाऊ बर का, तुझ्याच भाषेत सांगायचं झाल तर’
बिचारा खाली मान घालून निघून गेला होता.  नंतर फारसं काही त्याच्याबद्दल ऐकलं नव्हतं तिनी.
आज तिची मुलगी म्हणत होती, ‘ममा मी त्या समोरच्या ध्रुवला फ्रेंडशिप बँड ऐवजी राखी बांधणार आहे, तो सारखा मला त्याची  बेस्ट फ्रेंड म्हणतो, पण मला नाही आवडत तो.’
आपले जिन्स अशी सहजासहजी आपली साथ सोडत नाही हेच खरं.
लेकीच्या निमित्ताने तिला परत आठवला तिचा तो ‘प्रेमाचा भाऊ!’

मानसी होळेहोन्नुर 

Monday, July 31, 2017

ब्रुकलीन मधला शहाणा...

एक पन्नाशीतला माणूस गाडी चालवत असतो, सिग्नल ला थांबतो, आणि सिग्नल सुटल्यावर निघतो तर दुसऱ्या बाजूनी एक गाडी येऊन त्याच्यावर आदळते, आधीच गाडीमध्ये वैतागलेला, आता तर त्याचा स्वतःवरचा ताबा सुद्धा सुटतो आणि तो त्या टॅक्सी ड्रायव्हरशी अगदी हमरी तुमरीवर येऊन भांडायला लागतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडून तो दाखवून देत असतो सगळ्यात जास्त चिडणारा माणूस आहे तो. त्याच दिवशी त्याची हॉस्पिटल मध्ये अपॉइंटमेंट असते, तिथे जाऊन त्याला कळतं त्याचा नेहेमीचा डॉक्टर नाही तर दुसरीच कोणती तरी बाई आलेली आहे, जरा थांबलेला राग परत त्याला गाठतो, आणि तो त्याच रागाच्या भरात प्रश्नांची फैरी झाडतो त्या डॉक्टरवर. ती डॉक्टर स्वतःच गोळ्या खाऊन स्वतःला शांत करायचा प्रयत्नात असताना त्या चिडणाऱ्या पेशंट कडे डॉक्टर म्हणून बघूच शकत नसते हे आपल्याला कळत असते, पण त्या दोघांनाही ते उमगत नसतं. तो खरतरं गंभीर आजारी आहे, त्याच्या डोक्यातला ट्युमर फुटून रक्तस्त्राव सुरु झालेला आहे, तो कधीही कोसळू शकतो, ती डॉक्टर ही सगळी तांत्रिक माहिती त्याला अगदी निर्विकारपणे देत असते, आणि मृत्यू असा फारसा लांब नाही हे उमगून तो अजूनच वैतागतो, चिडतो, आता तो चिडलेला असतो, स्वतःच्या आयुष्यावर, चाहूल लागलेल्या मृत्यूवर. मृत्यूला आपणा हरवू शकत नाही हे माहीत असतं, त्यामुळे किमान हातात अजून किती वेळ आहे हे कळल तर किमान आपण ते उरलेले महिने, दिवस तास चांगले घालवू उगाच एक भाबडी आशा मनाशी बाळगत तो त्या डॉक्टरला छळत राहतो, विचारत राहतो किती वेळ आहे माझ्याकडे? स्वतःच्या वेळेत अडकलेली ती डॉक्टर एकाच सांगत राहते, किती वेळ ते मी नाही सांगू शकत. शेवटी कंटाळून वैतागून समोर पडलेल्या मासिकावरचा आकडा बघत ती म्हणते ९० मिनिटं राहिलीत, झालं समाधान तुझं.
आकडा कळेपर्यंत धडपडणारा तो माणूस आकडा ऐकल्यावरही क्षणभर लटपटतो, फक्त ९० मिनिटं. आणि मग ठरवतो जवळच्या माणसांना एकदा शेवटचं भेटायचं. आपण ९० मिनिटानंतर या जगात नसू कल्पनाच किती भयंकर असू शकते, किती तरी गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात, किती तरी गोष्टी अनुभवायच्या असतात आणि असा ९० मिनटात आपल्याला निरोप घ्यायचा आहे सगळ्यांचा सोपं बिलकुल नसतं. त्याचवेळी आपण काय बोलून गेलो आहोत हे त्या डॉक्टरला तिचे सिनिअर डॉक्टर लक्षात आणून देतात, जर तो माणूस मेला, त्यानी कोणाला या सगळ्याबद्दल सांगितलं तर तिचं लायसन्स जप्त होऊ शकतं याची जाणीव झाल्यावर सुरु होतो एक पकडापकडी चा खेळ. मृत्यू भेटण्याआधी जवळच्या माणसांना गाठण्याची त्या माणसाची धावपळ, आणि मृत्यू त्या माणसाला गाठण्याआधी त्याला पकडून हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी त्या डॉक्टरची पळापळ.
द अंग्रीएस्ट मॅन इन ब्रुकलिन ची कथा ही. आपलं आयुष्य फक्त आपलं नसतं. आजूबाजूच्या ओळखीच्या अनोळखीच्या लोकांमुळे ते घडत असतं. एक पेशंट, आणि डॉक्टरची ही गोष्ट फक्त तेवढीच नाही. प्रत्येकाच्या वागण्यामागे काहीतरी कारण असतं, आपण ते कारण समजून घेण्याचा प्रयत्न न करता सरळ हल्ले चढवून, सूचना देऊन, सल्ले सांगून मोकळे होत असतो! दोन वर्षापूर्वी तरुण मुलगा मेल्यामुळे सैरभैर होऊन चिडचिड्या झालेल्या नवऱ्याला बायको समजून घेत नाही, स्वतःच्या मर्जीचं करिअर करू पाहणाऱ्या मुलाला बाप समजून घेत नाही, विवाहित प्रियकर धोका देत आहे हे शिकलेली डॉक्टर तरुणी समजून घेत नाही. जगात प्रत्येकाला चिडायला प्रत्येक सेकंदाला एक कारण मिळत असतं, आणि तो एक चिडका क्षण जन्म देत असतो पुढच्या चिडक्या क्षणांना. छोट्या मोठ्या गोष्टींवर चिडत असताना आपण जगणं हरवत चाललोय हे आपल्याला लक्षातच येत नसतं. किंवा लक्षात आलं तरी तोवर वेळ निघून गेलेली असते.
हातात १९ मिनिट राहिलेली असताना भाऊ, बायको, मुलगा या तिघांशी शेवटचा भांडून, मनात असलेलं प्रेम अव्यक्तच ठेवून तो चिडका माणूस आत्महत्या करायला निघतो, त्यावेळी त्याला ती डॉक्टर गाठते, त्याला विनवते किमान माझ्यासाठी तरी आत्महत्या करू नकोस, पण स्वतःच्या आत्मसन्मानाची काळजी करणारा हेन्री आल्टमन पुलावरून खाली उडी मारतो. मे २०१४ मध्ये आलेला हा चित्रपट रॉबिन विल्यम्स च्या हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. द अंग्रीएस्ट मॅन इन ब्रुकलिन मध्ये नायक आत्महत्या करायचा प्रयत्न करतो पण त्याची डॉक्टर त्याला वाचवते, पण खऱ्या आयुष्यात मात्र असं कोणीच वाचवायला आलं नाही रॉबिन विल्यम्सला! आत्महत्या करून त्यानं स्वतःला संपवलं. उत्तमोत्तम चित्रपटात काम करून एकापेक्षा सरस एकेक सरस भूमिका करणारा हा अभिनेता देखील रागाच्या एका सेकंदात, स्वतःवरचा ताबा विसरून शरण गेला रागाला, मृत्यूला. हा चित्रपट रॉबिन विल्यम्स च्या चांगल्या चित्रपटांमध्ये गणला जात नाही, समीक्षकांनी पण याला नाकं मुरडली होती. पण तरीही मला वाटतं, यातले योगायोग नाट्य सोडलं तरीही हा चित्रपट ब्रुकलिन मधल्याच नव्हे तर जगातल्या सामान्य माणसाच आयुष्य दाखवतो. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडून जगण्यातली गंमत विसरलेल्या माणसाला आरसा समोर धरून त्याच्या आयुष्यात काय हरवत चाललंय हे सांगत.

आत्महत्या हे कोणत्याही प्रश्नाच उत्तर नसतं. आणि कोणत्याही वयोगटासाठी, कोणत्याही स्तरातील, समाजातील माणसांसाठी ते भूषण असू शकत नाही. मृत्यू सगळीकडेच फिरत असतो, त्याला शोधत जाण्यापेक्षा हसणाऱ्या क्षणांना शोधत आयुष्य जगणं जास्त धैर्याच, साहसाचं आणि समाधानकारक असतं. रागावून चिडून आपण मनात असलेलं बोलतच नाही, भावना व्यक्त करतच नाही. ब्रुकलिन मध्ये राहणाऱ्या एका चिडक्या माणसाने सांगेपर्यंत हे मला कळलं नव्हतं असं नव्हतं, पण काही गोष्ट दुसऱ्यांच्या बघूनच आपण लवकर शिकतो हे मात्र मला परत एकदा कळलं.   
मानसी होळेहोन्नुर

https://en.wikipedia.org/wiki/The_Angriest_Man_in_Brooklyn

Monday, July 24, 2017

सृष्टीला पाचवा महिना...

श्रावण महिना अगदी आवडता, म्हणजे बारा महिन्यांची नावं माहित नव्हती तेव्हापासून तो भरपूर फुलं, देवाची पूजा , प्रसाद मिळतो तो महिना आवडायचा. तशी आई रोजच साडी नेसायची, पण तेव्हा मस्त फुलं माळायची, गजरे करायची. मोठ्ठी एकादशी नंतर आईची, आज्जीची गडबड धांदल सुरु व्हायची. फुलवाती कर, वस्त्र माळ कर, सगळी पितळ्याची, तांब्याची भांडी चिंचेनी, लिंबानी घासून चक्क करायची, देवाचं तेल वेगळं ठेवायचं. फुलवाल्या मावशींना आधीपासूनच सांगून ठेवायची, कोणत्या कोणत्या दिवशी गजरे, हार हवेत ते. कालनिर्णय मधले ते अबोली रंगाचे दिवस कधी सुरु होतात याकडे घरातल्या बायकांचेच नव्हे तर पुरुषांचं पण लक्ष असायचं.
दिव्याच्या अमावास्येच्या आदल्या दिवशीच आजी सगळ्या ट्यूब लाईट, दिवे पुसायला लावायची, मग माळ्यावरचे जुने कंदील पण याच सुमाराला दर वर्षी उन्हं खायला बाहेर पडायचे. घरात असतील नसतील तेवढ्या समया, निरांजनी, कंदील सारे न्हाऊन माखून नव्याने चमकायचे. मग दुसऱ्या दिवशी आजी आई मस्त आंघोळ करून पाटावर त्या मांडून ठेवून, रांगोळीनी ते सजवून फुलं वाहून, त्याची पूजा करायच्या, मग दिव्यांचा नैवेद्य झाला का पुरणावरणाचा महिना सुरु झाला अशी वर्दी मेंदू तावड्तोब पोटाला, जिभेला द्यायचा. ते सारे शांत तेवणारे दिवे, त्यावर लावलेल्या वस्त्र माळा, रंगीबेरंगी फुलं पाहून खरंच आपोआप हात जोडले जायचे. आजी नेहेमी म्हणायची हे दिवे आपल्याला प्रकाश दाखवतात, त्यांचे ऋण मान्य करण्यासाठी हा अदिवास दरवर्षी साजरा करायचा. आजच्या जमानातल्या, अमुक डे, तमुक डे च्याच पंथातला हा ही एक डे. पण तो ज्या पद्धतीने साजरा व्हायचा ते पाहून हा दिवस वर्षभर व्हावा असं वाटायचं.
दुसऱ्या दिवसापासून घरात जणू एखादा पाहुणा आला असावा असंच वाटायचं. श्रावणी सोमवारी बेलाची पानं, मंगळवारी घरी, किंवा शेजारी, आजूबाजूला कुठे तरी नक्कीच मंगळागौर असायची, त्यामुळे फुलं, पत्री गोळा करायच्या असायच्या, बुधवार, गुरुवार  जरा निवांत गेले की परत शुक्रवारच्या जीवंतिका पूजा, हळदी कुंकुवाच्या तयारी साठी फुलं आणायची जबाबदारी अंगावर पडायचीचच. घरातली, शेजारची, मागच्या गल्लीतली, रस्त्यावरची फुलं शोधणं, तोडणं हा आमचा तेव्हाचा मुख्य उद्योग होता, आमच्या सुदैवाने १०, १५ पानं भरून गृहपाठ आम्हाला कधीच करावे लागले नाहीत, कधी कधी तर शाळेचा गृहपाठ आम्ही मधल्या सुट्टीत, किंवा एखाद्या रटाळ शिकवणाऱ्या मास्तर मास्तरणीच्या तासालाच करून मोकळे व्हायचो. म्हणजे ही अशी सगळी कामं करायला पूर्ण वेळ देता यायचा.
एखाद्या शेजारच्या काकू खडूस पाने फुलं तोडू द्यायच्या नाहीत, पण मग त्यांच्या बागेतली फुलं तोडण्यातच आम्हाला खरा आनंद मिळायचा. देवासाठी, पूजेसाठी फुलं तोडताना सुद्धा आमचे काही नियम होते, मुक्या कळ्या तोडायच्या नाहीत, (श्यामच्याआईसारखी आमच्या आईची शिकवण ती.) सगळी फुलं आपण नाही तोडायची, घरच्या लोकंसाठी, झाडासाठी काही फुलं ठेवायची, ओकं बोकं झाड आजही मला बघवत नाही. दिवेलागणीनंतर फुलं, कळ्या तोडायच्या नाहीत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही झाडाला, अपाय होईल, फांदी तुटेल असं काहीही करायचं नाही. आजूबाजूच्या सगळ्या जणी मिळून फुलं गोळा करायचो आणि मग सगळी फुलं तोडून झाल्यावर त्याच्या वाटण्या पण मस्त व्हायच्या. देवाला वाहून उरलेल्या फुलांमधून गाजरे ओवणं हे एक आवडीचं काम होतं. मोगरा, जाई, जुई, साईली, शेवंती, तगर, कण्हेरी, गणेशवेल, गोकर्णाची फुलं, जास्वंदी, अबोली, गुलाब, मधुमालती, पारिजात, कित्ती कित्ती रंग, त्यांच्या छटा, वास सगळं कसं एखादं चित्र वाटायचं.
या महिन्यात असा बहरलेला निसर्ग बघून साठवू किती या डोळ्यात व्हायचं. निसर्ग आपल्यापुढं असे दोन्ही हात पसरून उभा असतो आणि आपल्याच ओंजळी कमी पडत असतात त्याला झेलण्यासाठी. त्या सौंदर्यात एक नजाकत असते, एक अवघडलेपण असतं, एक सुप्त चाहूल असते. उन पावसाचा खेळ रंगवणारा हा श्रावण हा एकाच वेळी अल्लड पण असतो आणि पोक्त पण! ‘समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला पाचवा महिना’ ही बोरकरांची कविता नंतर जेव्हा केव्हा ऐकली तेव्हा ती अशी कशी रुतली आतमध्ये आणि श्रावण नव्यानं कळला असं वाटलं. पाचवा महिना म्हणजे गर्भानी केलेली हालचाल मातेला कळायला सुरुवात झालेली असते, आईपणाच्या वाटेची हलकीशी चाहूल लागलेली असते, चेहऱ्यावर एक तेज आलेलं असतं, आईपणाचा एक सुप्त आनंद, अहंकाराचा गंध निराळाच असतो. गर्भाशी जुळलेल्या नाळेचा रंग मुखावर उठून दिसत असतो. धरणीची गोष्टही अशीच काहीशी असावी ना? आत रुजलेलं बीज हळू हळू वाढत असतं, अजून एक दोन चार महिन्यात सारी शेतं तरारून निघतील, मोत्याच्या दाण्यांनी शेतं भरून जातील. आणि ही भू माता आपल्याला सुपूर्द करेल तिची बाळं!
श्रावण रंगवला, बालकवींनी पण समजावला बोरकरांनी असं मला दर श्रावणात वाटतं. आणि त्यामुळेच श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ओठ गुणगुणत असतात, आणि डोळे पाचव्या महिन्यातल्या तेजानं भारलेल्या गर्भिणीच्या श्रावणमासाची दृष्ट उतरवून टाकत असतात!!!
मानसी होळेहोन्नुर

   

Wednesday, July 19, 2017

आठवणींचा डब्बा गुल....


घरात काम सुरु असताना एका बाजूला रेडीओ लागला पाहिजे ही तिच्या आजीची सवय तिच्या आईनी आणि तिच्या आईची सवय तिनी उचलली होती. म्हणजे एका बाजूला गाणी, कार्यक्रम सुरु असतातच, त्या ऱ्हीदम मध्ये कामांची पण एक लय जुळली जाते आणि कळत नकळत वेळेचं भान पण राहिलं जातं. म्हणजे दोन गाण्यानंतर कुकर बंद केला तरी चालेल, किंवा हा कार्यक्रम संपेपर्यंत स्वैपाक संपला पाहिजे, मिनिटामिनिटांची गणितं ही त्या रेडीओवर ठरलेली असायची. आणि आज सकाळी जेव्हा ताल मधलं नही सामने ये अलग बात है आणि हात तसेच थांबले.
नुकतेच कुठे मोबाईल फोन आले होते तेव्हा, फेसबुक च्याही आधी जेव्हा सगळ्यांना ऑरकुट चं वेड लागलं होतं तेव्हाची गोष्ट ! कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं बहुतेक, अनेक मैत्रिणींची एकेक, दोन प्रेम प्रकरणं झालेली होती, ती मात्र अजूनही प्रेमव्हर्जीन होती. तिला भयंकर कॉम्प्लेक्स यायला लागल होता, पण कॉलेज मधली मुलं, मैत्रिणींचे भाऊ कोणीच तिला आवडत नव्हते, आणि कोणालाही ती आवडत नव्हती, कधी अपेक्षा जास्त होत्या, तर कधी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होतं. दिसायला ती बरी होती, स्मार्ट होती, मित्रांची काही कमी नव्हती पण प्रियकर तेवढा अजून भेटला नव्हता. मग अशातच कधी तरी ऑर्कूट आयुष्यात शिरलं. नवीन मित्र नवे ग्रुप असे काय काय माहिती झाले.
फोटो, शिक्षण, प्रोफाईल बघून मित्र शोधत होती, कधी संवाद पुढे जात होते, कधी थांबत होते. त्यातले काही जण मैत्रीच्या रेषेच्या पुढे डोकावू पाहत होते. आणि गंमत म्हणजे हा सगळा न बघतानाचाच मामला होता, त्यातला एक मित्र कुठेतरी कोचीन ला होता, दुसरा मित्र मुंबई , तिसरा मित्र कोलकाता असे कुठे कुठे होते. फोन नंबर द्यावा की नाही द्यावा अशा सगळ्या तळ्यात मळ्यात मध्ये शेवटी एकदाचे तिनी तिघांनाही दिले नंबर, त्या काळात जग अजून स्मार्ट झालं नव्हतं त्यामुळे सगळं काही एसमेएस आणि फोन वरच चालायचं. उगाच लास्ट सीन कधीचा, माझा मेसेज डीलीव्हर झाला तरी अजून वाचला नाही असल्या भंपक गोष्टी अजून जन्माला यायच्या होत्या, थापा मारण्याचं आणि पचण्याचं प्रमाण जास्त होतं तेव्हा.
तिन्ही मित्रांशी काही कारण काढून बोलूनही झालं होतं, आपण काय करतोय हे समजण्याचं वय, आणि बुद्धी नक्कीच तेव्हा नव्हती. उठलास का, जेवलास का, अभ्यास केलास का, असे काहीही मेसेज पाठवायला वेळही होता, आणि इच्छाही , तसंही मोबाईल कंपन्या तेव्हा ठराविक वेळेला कमी चार्जेस आणि मेसेजस फुकट वाटायच्या तेव्हा. मग अशातच एकदा कधीतरी मला बघून तुला कोणतं गाणं आठवतं असा थेट दगड मारणारा मेसेज तिनी त्याला पाठवला आणि उत्तरादाखल त्यानी विचारलं ‘चिडणार नाहीस ना गाणं सांगितलं  तर.’
‘तू सांग तर’.
तेव्हा पाठवलं त्यानी ‘नही सामने ये अलग बात है.’
तो मेसेज वाचून आयुष्यात पहिल्यांदा ती लाजली, पोटात गुदगुल्या होणं म्हणजे काय हे तिला कळलं. पाच मिनिटं ती फक्त तो मेसेज बघून ते गाणंच गुणगुणत बसली, त्यातली ओळ न ओळ तिला तशीही पाठ होती, पण आता त्याला एक वेगळा अर्थ मिळत होता.
तेवढ्या वेळात त्याचे चार मेसेज आले रागावलीस, प्लीज, सॉरी, सॉरी मला जे वाटलं ते मी सांगितलं.
शेवटी तिनी फोनच लावला, आणि त्याला सांगितलं नाही रे रागावले वगैरे नाही पण तरीही आपण अजून भेटलो पण नाही आणि तू हे गाणं सांगितलं म्हणून जरा वेगळ वाटलं. मग ते गाणं, रेहमान यावर पुढची दहा मिनिटं बोलल्यावर तिला लक्षात आला, तिचा टॉक टाईम संपत आला होता, खरंतर अजून खूप बोलायचं होतं, पण तोवर फोन चा बॅलन्स संपला आणि फोन बंद पडला. परत लगेच त्यानी फोन लावला. आणि मग काय गप्पा जणू थांबल्याच नव्हत्या अशा सुरु झाल्या. मग तिनी मिस कॉल द्यायचा आणि त्यानी कॉल करायचा असा सिलसिला सुरु झाला. मैत्रीच्या नक्कीच पुढे जात होतं हे नातं. मग कधीतरी भेटायचं ठरलं. तो काहीतरी कारण काढून तिच्या गावात आला, दोघं भेटले. पण फोनवर जेवढे कम्फर्टेबल होते तेवढे भेटल्यावर नव्हते. काय कुठे चुकत होतं कळत नव्हतं. पण तिला फोन वर तो जेवढा जवळचा वाटला तेवढा प्रत्यक्ष भेटल्यावर नाही वाटला.
आपोआपच मेसेज, फोन कमी झाले. नंतर तर नावं सुद्धा विसरली गेली. आयुष्यात प्रेम आलं, नवरा आला, संसार आला. पण त्या गाण्यासोबतची ती आठवण कधी नाही पुसली गेली. प्रेमाचा एक हलका अनुभव येता येता राहून गेलेलं ते गाणं. कुठे असेल तो, कसा असेल? बोलेल का आपल्याशी परत. आपण चुकीचं वागलो, प्रेम नाही पण मैत्री टिकवायला काय हरकत होती, कदाचित त्या मैत्रीतून पुढे घडलं ही असतं काही. १०, १५ वर्षांनी पण आपल्याला त्याची आठवण येते म्हणजे नक्कीच आतवर काहीतरी घुसलेलं होतंच. गाणी काय माणसं काय आत रुतून बसतात. अशी कुठल्या कुठल्या वळणावर भेटलेली माणसंच खरं आयुष्य घडवत राहतात.
मस्त चहाचा कप नवऱ्याच्या हातात देत तिनं विचारलं, ‘मला एखादं गाणं डेडीकेट करायचं असेल तर कोणतं करशील?’ पृथ्वी गोल आहे तशा आठवणीही गोल असल्या पाहिजेत ना, जुन्या आठवणींवर नव्य गुंफता आल्या कि समजायचं आपल्याला आजही हसून जगता येतंय.

मानसी होळेहोन्नुर