सध्याच्या काळात ‘एनी पब्लिसिटी इज अ गुड पब्लिसिटी’ असं समजलं जातं, आणि त्यामुळे खळबळजनक विधानं करण्यातच अनेक जणांना कृतकृत्यता वाटतं. असाच काहीसा प्रकार अलीकडेच इजिप्तमधल्या रेहाम सईद यांच्या ‘सबाया’ या कार्यक्रमात झाला.
रेहाम सईद या त्यांच्या सनसनाटी बातम्यांसाठी, चुकीच्या शब्दप्रयोगांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांनी सीरियामधून आलेल्या आश्रितांबद्दल अपशब्द वापरले होते, एकदा तर त्यांनी आमंत्रित पाहुण्याला बोलू न देता कार्यक्रमातून निघून जायला सांगितलं होतं. अलीकडे पुन्हा त्या चर्चेत आल्या त्या त्याच्या लठ्ठपणावरील निषेधात्मक उद्गारामुळे. त्यांच्या कार्यक्रमातून त्यांनी लठ्ठ लोकांसाठी ‘घरादारावरचं ओझं’ असा शब्दप्रयोग तर केलाच शिवाय, ‘अशा लठ्ठ बायकांच्या अंगात विष असतं आणि त्यामुळे त्या त्यांचं सौंदर्य गमावतात आणि जगण्यातल्या आनंदाला मुकतात,’ अशी विधानं केली. अर्थात या वाक्यांवर गदारोळ न झाला तर विशेष होते. याआधीदेखील एका बातमीच्या संदर्भात त्यांनी केलेला ‘स्टंट’ त्यांना तुरुंगात घेऊन गेला होता. या वेळी सरकारने त्यांच्यावर एका वर्षांसाठी बंदी घातली.
अर्थात, रेहम सईद या अनेक वर्ष या माध्यमात मुरलेल्या असल्यामुळे त्यांनी स्वत:ची बाजूदेखील लगेच सोशल मीडियावर मांडली. त्यांनी बनवलेल्या व्हिडीओमधून या बंदीचं खापर त्यांनी त्यांच्या विरोधकांवर फोडलं आणि स्वत:च्या विधानाचं अप्रत्यक्षरीत्या समर्थनच केलं. त्यांचं म्हणणं होतं की, लठ्ठ बायकांना समाजात खूप अवहेलना भोगावी लागते. रेहम यादेखील काही वर्षांपूर्वी लठ्ठ होत्या आणि त्यामुळे त्यांना लठ्ठपणाचं दु:ख माहीत आहे. शस्त्रक्रिया आणि डायटिंग करून त्यांनी स्वत:चं वजन कमी केलं. इजिप्तचे पंतप्रधान अब्दुल फाताह यांनी त्यांच्या एका भाषणात इजिप्तच्या लोकांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. ‘इजिप्तच्या लोकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे या त्यांच्या विधानाशी निगडितच आपलं विधान होतं, असं रेहाम यांचं म्हणणं होतं. माझ्यावर होणाऱ्या सततच्या आरोपांमुळे मी कंटाळून गेलं आहे आणि म्हणूनच मीच निवृत्त होत आहे,’ असंही त्यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगितलं.
मुळात लठ्ठ असणं किंवा राहणं ही कुणाची निवड नसते. कारण त्याचे दुष्परिणाम जास्त असतात. निरोगी राहणं सगळ्यांनाच आवडतं, त्यामुळे जेव्हा कोणी तरी तुमच्या लठ्ठपणावर ताशेरे ओढतं, त्याला ओझं म्हणतं तेव्हा ते जखमेवर मीठ चोळण्यासारखं असतं. शिवाय रेहाम यांनी लठ्ठपणा आणि स्त्रियांच्या सुंदर दिसण्याचा, सुखी असण्याचा संबंध जोडण्याचा निर्थक प्रयत्न केलाय. मुळात सौंदर्याच्या व्याख्या व्यक्तिगणिक बदलतात. त्याला अशा कोणत्याही मानकांमध्ये अडकवता येत नाही. त्यामुळे रेहम यांच्यावर टीका होणं अगदीच रास्त होतं. लठ्ठपणामुळे अनेक वैद्यकीय समस्या उद्भवतात, त्याबद्दल जनजागृती करणं, लोकांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करणं, ही वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या कार्यक्रमातून त्याबद्दल नकारात्मक संदेश पाठवणं ही पूर्णपणे चुकीचीच गोष्ट. माध्यमांनी सजग राहून संवेदनशीलता दाखवण्याची साधी अपेक्षादेखील आता दुर्मीळ झाली आहे हे रेहाम यांच्या घटनेतून परत एकदा सिद्ध झालं.
सावध ऐका पुढल्या हाका
दक्षिण कोरिया हा देश त्याच्या शेजारील देशापेक्षा खूपच वेगळा आहे. हा देश तिथल्या इलेक्ट्रॉनिक आणि चारचाकी गाडय़ांसाठी ओळखला जातो. अत्यंत प्रगत मानलेल्या या देशात २ सप्टेंबरला जाहीर झालेल्या एका अहवालाने या देशातीलच नव्हे तर जगभरातली अनेक लोक चक्रावून गेले. दक्षिण कोरियाचे अनेक सांख्यिकी अहवाल त्यादिवशी प्रसिद्ध झाले. त्यातला एक होता जननदराबद्दलचा. मागील अहवालानुसार तो १.०५ होता, तर तो आता घसरून ०.९८ झाला आहे. ‘युनायटेड नेशन’च्या अहवालानुसार जगाचा जननदर २.४७ आहे. जननदर म्हणजे १५-४९ या वयोगटातील स्त्री किती मुलांना जन्म देते याचा सांख्यिकीच्या मदतीने लावलेला अंदाज.
१९७४ पर्यंत जगाचा जननदर आणि दक्षिण कोरियाचा जननदर सारखाच होता. त्यावेळी तो ४.२१ होता, जो आता एकपेक्षाही कमी आहे. याचा अर्थ तो गेल्या चाळीस वर्षांत ७३.६ टक्के कमी झाला आहे. या सगळ्याचा परिणाम कोरियाच्या एकूणच लोकसंख्येवरदेखील झाला आहे. यामुळे कोरियामध्ये ६५ वर्षांपेक्षा ०-१४ वयोगटातील लोकसंख्या जास्त आहे. अशीच समस्या जपानलादेखील भेडसावत आहे. कोरियामध्ये विशीतल्या तरुणींचा आई बनण्यातला कमी झालेला टक्का हा घटलेल्या जननदरातला मोठा घटक समजला जातो.
कोरिया सरकारने या अहवालातले गांभीर्य समजून घेऊन काही बदल घडवून आणले आहेत. त्यानुसार सरकारने मुलांच्या मोफत प्राथमिक शिक्षण आणि डे केअर सेंटरसाठी १८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर आठवडी कामाचे तास ६८ वरून ५२ तासांवर आणलेत. या सगळ्यामुळे लोकांना स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याकडे बघायला वेळ मिळेल अशी आशा आहे. कोणत्याही देशात जेव्हा जननदर २ असतो तेव्हा सामाजिक संतुलन व्यवस्थित असते, जेव्हा तो दोनपेक्षा जास्त होते तेव्हा लोकसंख्या वाढीचा प्रश्न उभा राहतो, पण जेव्हा हा दर एक, किंवा एकापेक्षा कमी होतो तेव्हा भावी पिढीच्या अस्तित्वाचा बिकट प्रश्न उभा राहतो. जननदर कमी होण्यामागे स्त्रियांना मिळालेलं स्वातंत्र्य हा जसा एक घटक आहे तसाच ‘जबाबदारी नको’ ही पुरुषांमधली वाढती भावनादेखील आहे. जननदराच्या कमी-जास्त होण्याला स्त्री-पुरुष दोघेही जबाबदार असतात. त्यामुळे आता दक्षिण कोरियामध्ये स्त्री-पुरुष दोघांचंही समुपदेशन केलं जात आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तर बिघडलं तरी समाजाचा समतोल बिघडतो. जननदर कमी झाला तर समाजातलं वृद्धांचं प्रमाण वाढतं. जननदर जास्त वाढला तर लोकसंख्या विस्फोटाचा धोका असतो. तसेही वैद्यकीय सोयी-सुविधांमुळे आयुर्मान वाढलेलंच आहे. अवाजवी हस्तक्षेपामुळे समाजाचं आणि निसर्गाचं संतुलन आपण गमावलेलंच आहे. पण खूप उशीर होण्यापूर्वी या हाका ऐकून सावध झालं पाहिजे. कोरिया, जपान सारख्या देशाने तर नक्कीच.
इवलीशी आई
चीनला ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ला या वर्षी ७० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त चीनने देशातल्या काही नागरिकांचा सन्मान करण्याचं ठरवलं. देशाच्या उभारणीत मोठा हातभार लावलेल्या अनेकांच्या योगदानाचा यासाठी विचार केला होता आणि मग मोठय़ा छाननीनंतर ८ जणांना ‘नॅशनल मेडल’ तर २८ जणांना ‘नॅशनल ऑनर’ देण्याचं जाहीर केलं. यातल्या २८ जणांपैकीच एक आहे दुगी मा, ज्यांना ‘नॅशनल ऑनर’ने सन्मानित करण्यात आले आहे.
चीनच्या उत्तर सीमेवर मंगोलिया आहे, त्यामुळे चीनमध्ये अनेक मंगोल वंशाचे लोक आढळतात. दुगी मा हीदेखील अशीच मंगोल सीमेजवळ राहणारी मंगोल वंशाच्या एका भटक्या जमातीतली जमात प्रमुख आहे. १९४२ मध्ये जन्मलेली दुगी मा ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ची सदस्यदेखील आहे. १९६० च्या सुमारास चीनमध्ये सलग तीन वर्ष नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या. त्यामुळे अर्थातच अन्नधान्याचा तुटवडा झाला होता. अशा वेळेस अनेक कुटुंबं त्यांच्या मुलांना सोडून देत होती. खास करून शांघायसारख्या मोठय़ा शहरांमध्ये. अशा बेघर मुलांचे हाल व्हायला लागल्यावर ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’च्या मध्यवर्ती समितीने या मुलांना मंगोल सीमेजवळच्या अशा भटक्या लोकांमध्ये सोडलं. तेव्हा अवघ्या १९ वर्षांच्या असणाऱ्या दुगी माने स्वत:हून २९ मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी घेतली. जी स्वत:च एक लहान मुलगी होती तिने केवळ देशाचा विचार करून हे पाऊल उचललं होतं. आजूबाजूच्या इतर लोकांच्या मदतीने तिने ही जबाबदारी योग्यपणे पारदेखील पाडली. ते २९ जण आज आयुष्यात स्थिरस्थावर झाले आहेत. दुगी मा तिच्या एका लेकीसह आता वृद्धाश्रमात राहते. ‘आपण जे काही केलं ते खूप वेगळं काम नव्हतं. त्या वेळेची ती गरज होती म्हणून केलं,’ असंच ती म्हणते. स्वत:च्या पुढे देशहित मोठं मानणारे आपल्या देशालासुद्धा नवीन नाहीत. अशा लोकांचा योग्य तो सन्मान राखला जातो तेव्हाच देश खऱ्या अर्थाने पुढे जात असतो. एकोणिसाव्या वर्षी कोणी सांगितलं म्हणून नाही तर स्वत:ला वाटतें म्हणून २९ मुलांची जबाबदारी घेणं हे खरोखरीच वेगळं कार्य होतं. चीन सरकार करत असलेल्या या सन्मानासाठी दुगी मा नक्कीच पात्र आहे.
थरारक जगण्याची अखेर
वेगाचं वेड सगळ्यांनाच असतं. त्यातही वाहन वेग अधिक लोकप्रिय. पूर्वी वाहनांच्या अतिवेगवान वेडाचं नातं पुरुषत्वाशी जोडलं जायचं. त्यामुळे कोणतीही रेस म्हटलं की पुरुषी टक्का जास्त असायचा. परंतु आता केवळ गाडय़ांच्या-बाईकच्या स्पर्धा बघणाऱ्याच नव्हे तर अशा स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या स्त्रियांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढते आहे. अनेक मुली या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक आहेत. अशाच वेगावर आरूढ होण्याची इच्छा असलेल्या, नवनवीन विक्रम मोडण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांमध्ये एक होती जेसी कॉम्ब्स. जगातली वेगवान चारचाकी स्त्री-चालक होण्याचं तिचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाचा पाठपुरावा करत असतानाच २९ ऑगस्टला तिचं अमेरिकेत अपघाती निधन झालं आणि एक प्रवास अर्धवट थांबला.
१९८० मध्ये अमेरिकेत मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या जेसीला महाविद्यालयामधून बाहेर पडल्यावर या वेगवान गाडय़ांची भुरळ पडली. ‘एक्स्ट्रीम फोर बाय फोर’ या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून चार वर्ष तिने काम केलं. त्यानंतर ‘माइथ बस्टर्स’ या कार्यक्रमाच्या सातव्या सीझनमध्ये देखील तिचा सहभाग होता. २०११ ते २०१४ या काळात ती ‘ऑल गर्ल्स गॅरेज’ या कार्यक्रमाची संचालिका होती. स्त्रियांना गाडय़ांबद्दलची माहिती देणारा हा खास कार्यक्रम होता. या सगळ्याबरोबरच तिने अनेक स्पर्धामध्येदेखील भाग घेतलेला होता.
२०१३ मध्ये जेसीने अलव्हॉर्ड वाळवंटात ‘नॉर्थ अमेरिकन ईगल’ ही स्वनातीत (सुपरसॉनिक) गाडी ३९८. ९५४ मल/तास किंवा ६३२ किमी/ तास अशा वेगाने गाडी चालवून वेगळा विक्रम रचला होता. या आधीचा विक्रम १९६५ मध्ये
ली ब्रीडलव्ह यांनी ‘स्पिरीट ऑफ अमेरिका सॉनिक’ ही गाडी ३०८.५०६ मल / तास (४९८.४९२ किमी / तास) या वेगाने चालवून रचला होता. जेसीने २०१६ मध्ये स्वत:चाच विक्रम परत मोडला आणि ४७७.०५९ मल / तासाची नोंद केली होती. इतक्या वेगाने गाडी चालवली तरीही तिला जगातील वेगवान स्त्री-चालक हा किताब मिळाला नव्हता. हा विक्रम १९७६ मध्ये किटी ओ’निल हिने ५१२ मल / तास अशा वेगाने गाडी चालवून रचला होता.
मृत्यूपूर्वी काही दिवस आधी जेसीने जेट गाडीकडे जातानाचं तिचं पाठमोरं छायाचित्र ‘इन्स्टाग्राम’ अकाऊन्टवर टाकत त्यावर ‘आगीत उडी मारणं’ हा अनेकांना वेडेपणा वाटतो, पण असं करूनच तावूनसुलाखून निघता येते, नवीन उंची गाठता येते. जे मला वेडी म्हणतात त्यांचे मी आभार मानते.’ असा ‘मेसेज’ टाकला होता. जेसी खरोखरीच धाडसी होती. हिशेबी जोखीम घेणं तिच्या स्वभावाशी विसंगत होते.
स्वप्नपूर्तीच्या वाटेवर तिचं अपघाती निधन झालं तेव्हा केवळ तिचं कुटुंबीय, आप्त, मित्रच नव्हे तर जगभरातले तिचे चाहते हळहळले. ३९ वर्षांचं आयुष्य म्हणजे अल्पायुष्यच. या धाडसी खेळात भाग घेताना जेसीला यातल्या धोक्यांचीदेखील कल्पना होतीच. खूप काळजी घेऊनही यंत्रामध्ये बिघाड होऊन तिचा जीव गेलाच. किटीचा विक्रम मोडला नसला तरीही जेसीचं नाव लोक नक्कीच विसरणार नाहीत.
(माहिती व छायाचित्र स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळं)
चतुरंग १४ सप्टेंबर
No comments:
Post a Comment