आपण प्रत्येक गोष्टीतून अपेक्षा करायचे जेव्हा थांबवू तेव्हा आपल्याला निखळ आनंद मिळेल. आलेल्या अडचणीवर रडण्याऐवजी आपण जेव्हा मार्ग काढायला शिकू तेव्हा यश लांब नसतं. छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद घायला शिकलं पाहिजे.’
समोरचा सेल्फ हेल्प ग्रुप वाला त्याच्या खास तासलेल्या इंग्रजी मधून काही बाही सांगत होता, आणि अश्विनी ते खूप गांभीर्याने ऐकून घेतल्याचा आव आणत हळूच घड्याळात बघत अजून किती वेळ हे रटाळ पुराण ऐकावे लागणार हे बघत होती. अजून १० मिनिट हे ऐकून घेऊन मग तिला याचा उपयोग तिच्या ताण नियंत्रणासाठी करायच्या होता, म्हणजे कंपनीचा तरी तसा उद्देश होता, या माणसाला भली मोठी रक्कम देऊन इथं हे असे बोलायला लावण्यापेक्षा शनिवार रविवार काम नाही म्हणजे नाही, रात्री ९ नंतर कामाचे फोन नाही एवढे जरी केलं तरी पुष्कळ होईल हे तिच्या परत मनात येऊन गेलं. सालं जावं तिथं काही तरी प्रश्न, टेन्शन आहेतच, शाळेत असताना मोठं होण्याचे टेन्शन, मग इंजिनिअरिंग तत्सम चांगल्या नोकरीची खात्री देणारे शिक्षण घेण्याचे टेन्शन, मग आपले मार्क्स, कमवत पैसे मिळवण्याचे टेन्शन, नोकरीत पुढे जाण्याचे टेन्शन, लग्न जमवण्याचे, ते निभावण्याचे टेन्शन, बर ही सारी टेन्शन्सयेतात कुठून’ एक छोट्याशा अपेक्षेमधून. आपणच अपेक्षा ठरवतो आणि मग त्या गुंत्यात अडकून पडतो. टाळ्यांचा आवाज आल्यावर विचारांची तार तुटलेल्या अश्विनीला लक्षात आलं अपान आत्ता पटकन इथून कलटी मारू शकतो, तसंही आपण एक प्रश्न विचारून आपली उपस्थिती दाखवलीच होती. सहकाऱ्याना परत एकदा तोंड दाखवत वक्त्याचे कौतुक करत ती तिथून सटकली.
घराच्या खाली जाऊन गाडीचा हॉर्न वाजवत ती माईंची वाट बघत होती, तर चक्क बाबा येऊन म्हणाले तिनी चहा ठेवलाय आता येऊन घेऊन जा. बाबा काही बोलले तर ती आज्ञाच असते हे तिला आता कळून चुकले होतं. शांत पणे गाडी बंद करून ती घरात गेली. खरं तर तिला घरी लवकर जायचे होते, कारण सानूचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता. पटकन तिनं अविला मेसेज करून घरी लवकर यायला सांगितलं. आत गेल्यावर तिनं सवयीनं बाबांना नमस्कार केला, तर चक्क ते सुखी हो असे काहीसे पुटपुटले. तोवर मैं चहा घेऊन आल्याच होत्या. या माणसामुळे आपल्याला या घरात राहता येत नाहीये, तिचा राग उफाळून येत होता, पण आता जरा ती शांत बसायलाही शिकली होती. आपली गोष्ट प्रत्येकावर लादून काय समाधान मिळत यांना माहीत नाही. पण जगात अशा लोकांची काही कमी नाही हेही खरेच.
माई निघायचे का? बाबा मी नंतर माईना परत सोडून जाईन. बाबांना सांगायची फॉर्मलिटी करून ती निघाली. तेव्हा माईच बाबांना काहीतरी कुजबुजत्या आवाजात म्हणत होत्या.
सानू कशी आहे? तिच्यासाठी ही दोन पुस्तकं आणली आहेत.
नक्कीच माईंनी सांगितले असणार. पण ते काही मनात न ठेवता ती म्हणाली, बाबा तुम्हीच देता का तिला, ते जास्त आवडेल सानुला. वाटलं तर मी सोडते आत्ता घरी, येताना माई आणि तुम्हाला अवि आणून सोडेल. तिनी एक खडा मारून बघितला.
नाही आज नको, मी एखाद्या संध्याकाळी येऊन जाईन.
तिच्या अपेक्षेतले उत्तर तिला मिळालं.
अश्विनी अवि चे लग्न बाबांनी इतक्या हौसेने करून दिलं होतं की कोनिअरी तिला विचारले , हे तुझे बाबा आहेत की सासरे. पण नंतर एकत्र राहताना कितीतरी गोष्टी नव्याने कळल्या आणि मग उडणारे खटके रोजचे झाले तेव्हा माईच म्हणाल्या तुम्ही वेगळे घर का नाही घेत. बाकीच्या मैत्रिणी जेव्हा सासू बद्दल तक्रारीचा सूर लावायच्या तेव्हा ही हिच्या हेकेखोर सासऱ्याबद्दलच मत मनातच ठेवून सासूचे गुण गायची. अविनी आईची ओळख करून दिल्यावर तिला माई आवडल्या, पण तरीही आई म्हणताना तिला अडखळायला व्हायचे. ते जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्याच स्वतःहून म्हणाल्या अग माझा हट्ट नाहीये मला आई म्हणून हाक मारायचा, तुला जी सहज सोपी ओठावर येईल अशी हाक मार. जन्मापासून जिला आई हाक मारली, तिला सोडून एकदम नव्या अपरिचित बाईला अशी आई हाक कशी मारायची? अशी नाळ एकदम कशी जुळेल? असे तिला कायम वाटायचे, त्यामुळे आई नाही पण त्याजवळ जाणार माई तिच्या तोंडून आपसूक बाहेर पडले, आणी मग ती माई हाक मारायला लागली, पण मला मात्र बाबाच हाक मार हसत हसत पण जरबेच्या स्वरात म्हणाले तेव्हा तिला तो अधिकार वाटला, आणि नंतर मात्र हक्काचा अतिरेक वाटायला लागला. दुसऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे आपण का वाहायचे? जर हे माझे घर असेल तर मला आवडेल तसे वागायचा मलाही हक्क आहे ना?
अश्विनी तिला भलत्या सलत्या सवयी लावू नकोस बर का ग. माझी बायको साधी सरळ आहे, तिला तशीच राहू देत.
हो बाबा संभाषण संपवत माईला घेऊन बाहेर पडली पण.
माईला कायम चार चाकी चालवणाऱ्या बायकांबद्दल कुतूहल वाटायचे. कसे काय जमते यांना असे कायम वाटायचे.
माई मग बघितल्या का डिझाईन? कोणती कंपनी काही ठरवली का?
छे ग बाई मला नाही कळत त्यातले काही, तू एवढा आग्रह धरलास म्हणून, नाहीतर हे कधी हो म्हणाले नसते, आणि मी काही मागितले नसते.
माई हेच चुकते तुमचे, अपेक्षा व्यक्त करायला शिका. अहो तुमचेही आता वय होत चाललंय, पूर्वी सारख्या तरण्या नाही आहात तुम्ही, सांधे कुरकुरतात पण तुम्ही कधी नाही कुरकुरणार.
अश्विनी अग तो स्वभाव असतो, सहजासहजी बदलत नाही. आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर ती एक सवय होती जी स्वभाव झाली. त्यामुळे सवय सुटू शके पण स्वभावाचे काय? ६० च्या दशकात तीन मुलीन्मादाह्ली मधली मुलगी मी. मोठीचे मोठी म्हणून कौतुक तर धाकटीचे शेंडेफळ म्हणून. आम्ही आपल्या मधल्या अधांतरी. लग्नानंतरही मी मधलीच. त्यामुळे अधिकारही नाही आणि बेफिकीरीही नाही. कौतुकाचे म्हणशील तर कौतुक , आनंद मानण्यावर असतो. मला लहानपणापासून एकाच गोष्ट कळली, छोट्या गोष्टींमधले आनंद शोधले तर आपल्यालाच त्रास होत नाही. आणि नवऱ्याच म्हणशील तर लग्नाआधी’ सुद्धा मला कोणी माझ्या अपेक्षा विचारल्या नव्हत्या, त्य गृहीत धरून चालले होते, आणि मी ही त्याला विरोध केला नाही. नवरा निर्व्यसनी होता, त्यांनी कधी अंगावर हात उगारला नाही. न विचारता व्यवस्थित खायला मिळायचे, घरातली कोणतीही गोष्ट संपत आली की किंवा संपलीये सांगितल्यावर मिळायची. वर्षाकाठी नवीन कपडे, आणि कधीमधी बाहेरगावी फिरायला जाणं यापेक्षा काही वेगळ्या अपेक्षा व्यक्त कराव्याशा देखील नाही कराव्याशा वाटल्या. हां एक खंत मात्र आहे कायमची, मला दोन मुले हवी आहेत, पण ह्यांनीच ठरवले एक मूल बास आणि मग बोलायचे धैर्य नाहीच झालं कधी. कधी अगदीच मनावर ओझे आले तर शांत पाने रामदासस्वामींची करुणाष्टके आणि दासबोध काढून वाचा बसायचे. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजनमाया तोडिता तोडवेना, घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा असं म्हणत स्वतःला शांत करायचे. तुमच्या सारखे ताणाचे व्यवस्थापन करायला आमचे आम्हीच मार्ग शोधले होते.
माई आता पुढच्या वेळी आमच्या ऑफिस मध्ये तुमचेच लेक्चर ठेवते.
नको ग बाई नको, एकदा अवीच्या शाळेत दासनवमीसाठी गोष्ट सांगायला गेले होते तर घरी येऊन आमचा शंकर तांडवनृत्याच्या बेतात होता. तसे ते वाईट नव्हते, फक्त कोणी त्यांच्या मनाविरुद्ध काही केलं तर त्यांना चालत नाही. झालं ग आता ४० वर्ष, सवय झाली सगळ्याचीच, एखाद दिवशी त्यांनी चिडचिड राग राग केला नाही तर विशेष वेगळे वाटतं
माई तुम्ही छान लिहू शकता असे मला नेहमीच वाटते, पण आता तरी उतरून एक निर्णय आज तुम्ही घ्या.
अश्विनी माईला घेऊन दुकानात गेली. अशा मोठ्या मॉल मधल्या दुकानात माईना नेहमीच बिचकायला व्हायचे. अशा दुकानंमधल्या चमचमाटाला त्या घाबरायच्या. अशा डोळे दिपवणाऱ्या प्रकाशात मेंदूवर पण एक पडदा पडतो, आणी डोळ्याला जे आवडते तेच आपण घेऊन मोकळो होतो असं त्या म्हणायच्या.
ही म्हातारी बाई काही आपलं गिऱ्हाईक नसणार, आणि पैसे देणारा पुरुष कदाचित मागे असेल, असं समजून त्या दुकानातल्या सेल्समन ने या दोघींकडे बघून त्यांच्या मागून येणाऱ्या पुरुषाची वाट पाहिली. पाच मिनिट कोणीच काही आला नाही तेव्हा अश्विनीच पुढे झाली आणि म्हणाली, आम्हाला वॉशिंग मशीन घ्यायची आहे. कोणत्या कंपनीची घ्यायची आहे मॅडम?
तुम्हीच सांगा कोणती चांगली आहे?
फ्रंट लोड हवी की टॉप लोड.
माई शांतपणे वेगवेगळी मॉडेल्स पहात होत्या. त्यावर किती तरी बटण होती, पण कंपनीचे नाव सोडलं तरी साधारण साऱ्या मशीन्स सारख्याच दिसत होत्या. अगदी त्याच्या वरची नाव, फंक्शन्स. सुद्धा त्यांना सारख्याच वाटत होते. या गुंतागुंतीची मशीन मध्ये कपडे कसे घालायचे, छे त्यापेक्षा आपलं हातानी दोन कपडे खंगाळून टाकणं सोपे. नकोच पडायला या फंदात. हळूच त्यांचे लक्ष किंमतीकडे गेले आणि अबब अग अश्विनी हे काय? केवढ्या या किंमती नको ग काही आपल्याला हे.
माई तुम्ही त्याचा विचार नका करू, मी घेऊन देणार आहे तुम्हाला. किंमती बघून नाही म्हणताय, पण थोड्याच दिवसात त्याचीही सवय होईल तुम्हाला. यावेळी मी काही ऐकणार नाहीये तुमचे.
मग तिथल्या सेल्समन कडे वळून म्हणाली,
फ्रंट लोड आणि टॉप लोड नेमकी कोणती चांगली? दोन्ही मध्ये कपडेच धुवून निघतात ना.
कसे आहे ताई, फ्रंट लोड ला जागा जास्त लागते, आणि त्यात कपडे थोडे जास्त चांगले निघतात, म्हणून त्याची किंमत जास्त असते, टॉप लोड कधी कधी व्हायब्रेट होत पुढे सरकतं पण त्यात मशीन थांबवून विसरलेले कपडे मात्र घालता येतात. हे बघा ही समसंग ची मशीन याचा आवाज इतका कमी आहे, की नाही येत म्हणलं तरी चालेल. हे बॉश चे मशीन यात कपडे जास्त वाळतात. हे आयएफबी चे मशीन याला खूप कमी विजेची गरज आहे. ताई बघाल तर फरक आहेत पण ते फारसे काही महत्वाचे नाहीत, तुम्हाला किती जणांच्या घरासाठी मशीन हवंय.
२ जण हो फक्त, माईच बोलल्या.
मग तुम्ही हे छोटे ५.५ किलो चे घ्या मावशी. आणि मावशी कमी किंमत हवी असेल तर इकडे या ह्या सेमी ऑटोमटीक बघा.
नाही हो त्या काही दाखवू नका, माई तुम्ही फुल्ली ऑटोमटीकच घ्या. आपण काही ही खरेदी सारखी सारखी करत नाही.
यांच्या साठी घ्यायचे असेल तर तुम्ही टॉप लोडच घ्या, कारण मावशीना सारखे वाकायला लागण्यापेक्षा वरून कपडे टाकायला सोपे होतील ना.
हो खरंच की, माई आपण टॉप लोड मशीनच घेऊ.
बर बाई तू म्हणशील तसं.
मग तिनीच जाऊन समसंग, आय एफ बी, आणि बॉश चे तीन मॉडेल ठरवले आणि माईना सांगितले आता यातले तरी एक तुम्ही ठरवा. अर्थात माईंनी ज्याची किंमत सगळ्यात कमी ते आपल्या घरी या खाशा मध्यमवर्गीय धारणेने सॅमसंग चे मशीन घेऊ असे सांगितले. अश्विनीनी सेल्समनला त्यात कोणते कोणते रंग आहेत हे विचारलं. कधी तरी खेळता खेळता सानुनी आजीला तिचा आवडता रंग विचारला होता, तेव्हा त्यांनी पांढरा रंग सांगितला होता. ते लक्षात घेऊन तिनी पांढरा रंग आहे का असे विचारलं, पण एकदम माई म्हणाल्या नको ग ह्यांना आवडत नाही पांढरा रंग,
माई अहो आयुष्यभर जगलात ना त्यांच्यासाठी आता घ्या की एखादी गोष्ट स्वतःसाठी. शांतपणे पण ठामपणे तिनं सांगितलं.
बर आपण तुझेही ऐकू आणि ह्यांचेही मन राखू एक कव्हर घालुयात यावर.
आपण माझ्यासाठी पांढरा घेत नाहीयो, तुम्हाला आवडतो म्हणून घेतोय. जरा चिडतच कपाळावर हात मारून घेत अश्विनी म्हणाली माई अहो स्वभावाला मुरड घालत कधीतरी स्वतःला हवं तसं वागा.
बयो, माझ्या आईला लाव बोल त्यासाठी. जाऊदे हा संवाद न संपणारा आहे, चल लवकर उशीर होतोय, आमचे टाईम टेबल घरी वाट बघत असेल.
पैसे देताना रांगेत उभं राहताना अश्विनी माईंकडे बघत होती, तो सेल्समन वॉशिंग मशीन बांधत असताना माई त्याच्याकडे एखाद लहान मूल नवीन खेळणं ज्या उत्सुकतेनं बघतो, त्याच भावनेनं बघत होत्या.
मॅडम कॅश की कार्ड
कार्डच घ्या.
आणि पावती याच नावानी करू का?
नाही, एक मिनिट हां, माई जरा इकडे येता.
माई तुमचे नाव स्नेहा टाकू ना पावतीवर?
अग आता हे काय? तू घेऊन देतीयेस तर तुझेच नाव टाक ना?
माई बाबांचे नाव, आडनाव काही टाकत नाही, बघा नुसतं तुमचे नाव कस वाटत.
मग स्नेहलता टाक, माझं लग्नाआधीचे नाव, गेल्या कित्य्के वर्षात पूर्ण नावानी कोणी हाकच मारली नाहीये. नकळत त्यांचे डोळे पाणावले.
गाडीतून उतरता उतरता त्या म्हणाल्या मी ही पावती माझ्याचकडे ठेवू का?
लहान मुलं मोरपीस ज्या भावनेनं जपतात त्याच भावनेन माई हे बिल जपून ठेवणार याची खात्री अश्विनीला होती.
मनातलं हसू चेहऱ्यावर उमटवतात डौलदार तंद्रीत चालणाऱ्या माईना पाहून तिला एकदम छोट्या गोष्टींमधला आनंद शिकता येत होता कोणत्याही बोजड शब्दांशिवाय, खोट्या मुखवट्याच्या वक्त्यांशिवाय.
(जानेवारी २०१६)
छान आहे
ReplyDeleteThank you Chinmaye
ReplyDelete