Sunday, March 6, 2016

स्वयम्

नेहमीसारखा मी पळत पळत बस स्टॉप गाठला. सकाळी घाईत आरशात बघायला वेळच मिळाला नव्हता. टिकली लावली होती की नाही हे ही आठवत नव्हते. आपण स्वतःकडे किती दुर्लक्ष करतो याचंच मला हसू फुटलं. घड्याळाकडे पाहिलं आणि नंतर नेहेमीचे चेहरे शोधात बसस्टॉपवरून नजर फिरवली. कोपऱ्यात उभा असलेला तो माझ्याकडे पाहून प्रसन्न हसला. मला काहीच कळेना, ओळखीचा म्हणावा तर चेहरा आठवत नव्हताआणि अनोळखी असेल तर उगा कशाला स्माईलदेऊन त्याला भाव द्यायचा. परत मनात आलं. आपल्या गबाळग्रंथी वेशाकडे पाहून तर हसला नसेल ना, आणि मी जवळपासच्या गाडीचा आरसा शोधायला लागले, चेहरा तर ठीक होता, रोजच्यासारखाच, आरशात बघताना काही वेगळ तरी वाटलं नव्हतं, माझा रोजचाच  ओळखीचा चेहरा आरशात दिसला होता. मग तो का हसला? मी प्रश्नावर विचार करत बसची वाट पहात होते. तो ही तिथेच त्याच्या स्मित हास्यासह बसची वाट पाहत होता. त्याचे डोळे काहीतरी सांगू पाहत होते, संवादाची आस लावत होते, या सगळ्यात बस आली आणि गच्च भरलेल्या बस मध्ये मी त्याला विसरूनही गेले.

ऑफिस मध्ये काम करतानाही मनात कुठेतरी काहीतरी वेगळे वाटत होते.   एक अस्वस्थता वाटत होती, मन ओढून आणलं तर कामात लागत नव्हतं मग सरळ हाफ डे टाकून ऑफीसबाहेर पडले, कुठे जायचं, काय करायचं काहीच माहीत नव्हत, मोकाट सुटलेल्या मनाच्या मागे मी हि चालत चालले होते. मग पाय वळतील तिकडे वळवायचे, विचारांचे रस्ते बंद केले, तर आज असे का वाटतंय याचं उत्तर बापुडा मेंदू शोधात होता. सकाळच्या त्या एका अनोळखी स्मितहास्याचा हा परिणाम असावा असा निष्कर्षही मग निघाला. चालता चालता अचानक नाव्याव्ने उघडलेल्या मॉलपाशी पाय थबकले. जरा गार झुळूक घ्यावी म्हणून आत शिरले.

मग शांतपणे कॉफीचे दोन घुटके घशाखाली उतरल्यावर वाटलं, असा ब्रेक हवाच आयुष्यात, काहीच न ठरवता, असे काहीतरी केलं पाहिजे, स्वतःसाठीचे क्षण जोडायला हवे. मग एक दहा पंधरा मिनिट गप्पा मारत कॉफी पिणारी, बिझनेस च्या गप्पा मारणारी, मस्ती करणारी अ लॉट कॅन हॅपन हे वाक्य सार्थ करणारी लोकं बघून कंटाळा आला तेव्हा मात्र मी बाहेरचा रस्ता धरला. असेच फिरता फिरता एका दुकानाच्या बाहेर लावलेल्या सुंदरशा नारिंगी-पिवळ्या रंगाच्या कुर्त्याने माझं लक्ष खेचलंखरंतर. मला हे असलं विंडो शॉपिंग कधीच आवडत नाही, कोणीतरी ते मुद्दाम तुंच्याकडून करवून घेतं असे वाटतं. पण एखादा दिवसा वेगळा असतो, मी आत जाऊन विचारलं आणि चक्क तो अंगाला लावून बघावा म्हणून मागितला, एकटीनं खरेदी करायला मला आवडत नाही, कारण आपण घेतलेलं आपल्याला नंतर परत कधी आवडेल याचाही खात्री नसते, पण दुअसार्या कोणी सांगितले छान दिसतंय तर त्या आवडण्यावर एक प्रकारची मोहर बसते. मी चेंजिंग रूम मध्ये जाऊन बघ्यानाऐवजी, फक्त मापाला बरोबर आहे ना बघत होते, तेवढ्यात कोणीतरी मागून म्हणाले वाह सुपर्ब, मस्त दिसतोय, घेच तू हा कुर्ता.' मला एकेरीवर येऊन सांगणारा कोणता मित्र आत्ता इथे येऊन टपकला म्हणून माग पाहिले तर चक्क बसस्टॉप वाला. जाम तिडीक आली, नकोच घ्यायला हा कुर्ता, सरळ जाऊन त्याला विचारावं काय चाललंय काय?
 पण का कोणास ठाऊक त्या कुर्त्याची भुरळ जास्त पडली होती. हा रंग आपल्याकडे असावे असे प्रकर्षानं वाटत होत त्यामुळे पैसे देऊन सरळ बाहेर पडले. 'एक्सक्युज मी, जस्ट अ मिनिट, कॅन वी हॅव अ कप ऑफ टी , कॉफी?
आगाऊपणाची हद्द झाली होती, मी न वळताच चालता चालता सांगितलं मी चहा घेत नाही,
बर मग आपण कॉफी घेऊ, हा लोचट सोडायलाच तयार नव्हता.
दोन सेकंद मी थांबले, तर लगेच म्हणाला हे बघा इथेच आहे शेजारी
ही काय जबरदस्ती? मला नकोय आत्ता कॉफी.
मग मला कंपनी द्या.
एरवी कोणाचा एक शब्द खाली पडू न देणारी मी चक्क त्या अनोळखी माणसाला कंपनी देण्यासाठी कॉफी शॉप मध्ये गेले. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती, पण ती ही मानभावीपणे! टेबलवर मी त्याला निरखून पाहत होते, आणि मनाशी काही आडाखे बांधत होते, उंच म्हणावा असाच होता, रंग सावळाच पण त्याला शोभून दिसत होता. नाक डोळे अगदी तरतरीत होते. हसल्यावर उजव्या गालावर पडणारी खळी पाहून याच्या मागे पोरीच काय बायका सुद्धा लागत असणार हे नक्की कळत होतं. वयाचा मात्र अंदाज बांधता येत नव्हता, एखाद दुसरा पंधरा केस चमकत होता, पण ते सोडलं तर फार काही वयाची जाणीव करून देणारे दिसत नव्हते, वागण्यात, बोलण्यात एक आदब, सौजन्य होतं. कुठेही थिल्लरपणा, उथळपणा  नव्हता. पण मग तरीही हा असा अनोळखी पोरींशी कसा काय बोलत असेल. माझा गोंधळ वाढतच होता.
'झालं का  निरीक्षण पूर्ण? मग काय वर्णन करणार पोलिसांकडे?' त्याने हसत हसत विचारलं
'वय अंदाजे २७-२८, उंची सुमारे ५ फुट ९ इंच, उजव्या गालावर खाली पडते, डाव्या भुवईच्या वर एक खोक पडल्याची खूण आहे. असा वर्णनाचा इसम दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
मुलींच्या फसवणुकीच्या अनेक प्रकरणात या इसमाचा हात आहे. कितीही गोड बोलला, आग्रह केला तरी याच्या सोबत कॉफी प्यायला जाऊ नका. असं वर्णन करते पोलिसांकडे. काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? माझा राग शब्दाशब्दातून ठीपकत होता.
'ह्म्म्म बाकी तसं सगळ ठीक आहा,ए वय थोडाफार कमी जास्त चालतंच म्हणा उंचीचा अंदाज मात्र २ इंचांनी चुकला, आईस टी घ्या आणि शांत व्हा.' तो शांतपणे म्हणाला.
'पहिले मला तुमचं नाव सांगा, माझा पाठलाग का करताय ते सांगा, मग मी ठरवेन इथं थांबायचं की नाही आणि हा आईस टी घ्यायचा की नाही ते.
'तुमचा पाठलाग वगैरे काही करत नाहीये, अगदीच योगायोगाने, आजच्या दिवसात आपली दोनदा भेट झाली इतकंच. या शहरातल्या लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने अगदी अशक्य कोटीतली घटना. पण घडली खरी. आणि माझ नाव म्हणाल तर त्या दिवशी, त्या क्षणी जे वाटेल ते सांगतो. नाव ही आपली खरच ओळख असते का? बहुतेक ठिकाणी आपण नावाशिवायच वावरत असतो, मग माझ नाव मी तुम्हाला सांगून खरच फरक पडेल? आत्ता तुमच्याशी बोलताना मला वाटल माझं नवा स्वयम असत तर छान झालं असते, त्यामुळे आपण हे च नाव ठेउयात. म्हणजे माझं नाव घेता घेता स्वतःलाही साद घालता येते.
२१व्या शतकातला खराखुरा लखोबा लोखंडे म्हणायच वाटत याला. ' मी मनात म्हणलं.
'मग आता तुला वाटत असेल माझा तपकिरीचा धंदा आहे म्हणून' स्वयम म्हणाला. माझ्या चेहऱ्यावरचे  बारा वाजलेले कोणालाही वाचता आले असते, स्वयम् कसा काय त्याला अपवाद असेल.
'तुला कसं कळल मी मनातल्या मनात काय बोलले ते?' मी माझ्याही नकळत बोलून गेले.
'हे बघ ' त्याने अगदी गांभीर्याने बोलायला सुरुवात केली. ,' तू विश्वास ठेव अथवा ठेवू नकोस पण मी तुला काही इथ इम्प्रेशन मारण्यासाठी किंवा फ्लर्टीग करण्यासाठी बोलावलं नाही, तुझे डोळे खूप बोलके आहेत, पारदर्शी आहेत. तुझं हसणं मोकळं आणि मनमोहक आहे. इतके सुंदर संवाद साधणारे डोळे, क्षणात आपलंसं करणारं हसू मी याआधी बघितलं नव्हतं, तुला हे सकाळीच सांगावस वाटलं, पण, सांगितलं नाही, किंवा राहून गेलं. तू काहीतरी चुकीचा अर्थ काढशील म्हणूनही कदाचित मी गप्प राहिलो असेन पण आवडलेल्या अनोळखी माणसाची एकाच दिवसात दोनदा भेट झाली तेव्हा मात्र राहवलं गेलं नाही मला. आणि हे तुला सांगितलेच पाहिजे म्हणून मग तूला इकडे घेऊन आलो.'
या त्याच्या बोलण्यावर काय बोलावं हेच मला कळेना  मी मख्खपणे त्याच्याकडे बघत राहिले.
'आणि अजून एक सांगायचंराहिलं, मला तुझं नाव माहित नाही, आणि माहित करून घेण्याची गरजही वाटत नाही, कारण मला जे सांगायचं होतं ते मी सांगितले.
'मला हे सांगून तुला काय मिळालं? सॉरी तुम्हीवरून तू वर आले. पण हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? कितीही नाकारलं तरी मला हा मुलींना फूस लावण्याचाच प्रकार वाटतो. मि. सौन्दर्यौपासक. 'जगाची ही रीतच मला कळत नाही, प्रत्येक गोष्टीला, कारण, प्रत्येक नात्याला लेबल लावायची काय गरज आहे, साधं चांगल म्हणायला,अॅप्रिशिएट करायलाही  वेळ ओळख का हवी?' जरा घुश्यातच तो बोलला. ती उलटून काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, 'माझ्या कॉफीचे बिल मी दिलंय, तुझ्या आईस टी च तू दे, मी दिले तर तू परत त्याचे काहीतरी अर्थ शोधायला जाशील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव कोणीतरी तुला तुझे डोळे, हसन सुंदर, निरागस असल्याचे सांगितले होतं. आणि हो माझ्या रिक्वेस्टला हो म्हणल्याबद्दल  थंक्स. आयुष्यात मोकळेपणानी जगायला शीक.
त्यादिवशीआरशात बघताना पहिल्यांदा जाणवलं की खरेच माझे डोळे नितळ आहेत. कुणाशीही बोलायची उर्मी त्यांच्यात ठासून भरली आहे. पण कोणा स्वयम नावाच्या अनोळखी माणसाने संगे पर्यंत मला का कळली नाही ही गोष्ट?, चार शब्दांनी जे काम होणार नाही ते माझ्या एका हास्यानी होतं हे ही मला नव्यानेच कळल. माझ्या आजू बाजूच्या लोकांना हे कधी कळलचं नाही की त्यांनी हे कधी मला सांगितलं नाही? दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा माझ्या मलाच या गोष्टी का कळू नये? थेट वर्मावरच घाव घालणारा प्रश्न माझी डोळ्यांनी मला विचारला होता, उत्तर माहीत नाही, पण किमान प्रश्न उभे केल्याबद्दल थँक्यू स्वयम्!
एखादं वादळ येतं आणि जातपण जाताना आपल्या खुणा ठेवून जातं. तसाच त्या अपरिचित स्वयम् नावाच्या वादळाच झालं होतं. माझ्या वागण्यात, बोलण्यात, देहबोलीत एक वेगळच फरक होता. पण या फरकाला देखील कारणाच बंधन नको होतं.
विचारांमध्ये बदल झाले की आपोआप ते वागण्यातही येतात याचा अनुभव मी घेत होते. त्यामुळेच की काय वाढदिवसाला स्वतःच स्वतःला काहीतरी भेट द्यावीशी वाटली. आपण सगळेच स्वतःचे उत्तम टीकाकार, समीक्षक, मित्र असतो. किमान वाढदिवशी तरी या टीकाकाराला खुश करूया म्हणून पुस्तक खरेदीला गेले, तशी घ्यायच्या पुस्तकांची यादी तयार होती, पण तरीही पुस्तकंचे भांडार समोर असले की पुस्तक किमान चाळायचा तरी मोह होतोच. त्यामुळे यादीत नसलेली दोन पुस्तकही सोबत येऊ घातली होती. निघता निघता सीडीज सेक्शन मध्ये जरा पाय थबकले, लताच्या शास्त्रीय गाण्यांची एक डीव्हीडी अगदी हाक मारत होती, पण मी डोळे मिटून तिथून काढता पाय घेतला. आणि मोहाच्या त्या एक क्षणाच्या विजयाचं कौतुक करत काउंटरवर आले. बिल घेता घेतानाही, ती सीडीच समोर दिसत होती, शेजारच्या काउंटरवर कोणीतरी घेत असावं,
एक मिनिट ही सीडी पण मॅडमचीच आहे, मी चमकून बघितलं तर स्वयम्.
'तू इथे?'
'का कलंदर, चक्रम लोकांना इथे प्रवेश नसतो का?तू पण  कमालच करतेस, आणि हो ऑस्कर वाइल्ड म्हणतो, माणसानं मोहाला शरण जावं, त्यामुळे तुला हि सीडी गिफ्ट.'
'ह्म्म्म'
'बर घाईत नाहीस ना? माझ्याबरोबर येतेस भटकायला? इथेच चालत फिरुयात, हा त्या दिवशी घेतलेला ड्रेस ना? मी म्हणालो नव्हतो, तुला छान दिसेल. माझी निवड सहसा चुकत नाही.'
'अॅक्चुअली तुझं बरोबर आहे, मला या कुर्त्यामुळे खूप कॉम्पलीमेंटस मिळाल्या. त्यामुळे मनापासून धन्यवाद, असं मी म्हणाले खरं पण मनात धाकधूक होतीच हा आता काय म्हणेल याची. अगदी आपलं मन वाचल्यासारखी त्यांनी ती सीडी दिली. कसं वागावं तरी कसं. त्या सगळ्या गोंधळात मी बोलून गेले, अशा सीडीज, गिफ्ट्स देऊन किती जणींना फिरायला नेतोस रे?'
'छे परत तेच. तू पण कठीणच आहेस, मला वाटलं बदलली असशील. ती सीडी मी गिफ्ट दिली म्हणण्यापेक्षा तुझ्यातल्या बदलासाठी बक्षीस दिलं असं मी म्हणेन. बसस्टॉपवरची तू आणी आजची तू खूप फरक वाटला मला, छान वाटलं मला. आपल्यातलं नेमकं काय बदलायचं याची जाणीव झाली की होणारा बदल सुखावह असतो. पण दुर्दैवाने बऱ्याच जणांना त्यांच्याकडे काय आहे, याची जाणीवच नसते, पिसाऱ्याची ऐत सांभाळणारा मोर, अंगावरचे पत्ते मिरवणारा वाघ, स्वतःच्या आवाजाची जान असणारा कोकीळ यांची गोष्टच निराळी. खरतर त्या दिवशी मला तुझ्याशी बोलायची काहीच गरज नव्हती. आजही नाही. त्यादिवशी तुझ्या बोलक्या डोळ्यांचे, हसण्याचे कौतुक मनातच ठेवलं असते, तर कदाचित हा आजचा दिवस उगवलाही नसता, माझी प्रौढी नाही पण सत्य आहे हे. एखादी सुंदर कलाकृती, रांगोळी, निसर्गाचा अविष्कार बघितला की आपण म्हणून जातो, वाह काय सुंदर आहे, त्यावेळी आपल्याला त्याच्या निर्मिकाच्या ओळखीची गरज भासत नाही, मग ईश्वरनिर्मित , निसर्गनिर्मित मनुष्यकलाकृतीच्या सौदार्याबद्दल बोलतानाच का आपल्याला ओळख लागते? मी पुरुष आहे म्हणून एखाद्या स्त्रीच्या केलेल्या कौतुकाला प्रत्येक वेळी हेतू लावायची काय गरज आहे? मी जाणीव करून देईपर्यंत तू स्वतः तरी कधी स्वतःच्या सौंदर्याची दखल घेतली होतीस का? हिऱ्याला मातीत असताना किंमत नसते, खाणीतून काढून त्याला पैलू पाडावे लागतात, पण तुला मी फक्त हिरा आहे सांगितले आणि तुझे तूच पैलू पाडून घेतलेस. याबद्दल कॉम्प्लिमेंट म्हणून मी तुला ही सीडी दिली. माझ्याकडे एक व्यक्ती, पुरुष म्हणून न बघता एक प्रवृत्ती म्हणून बघ. आग कदाचित तुला माझे वागण समजेल. कारणाशिवाय काही घडत नाही आणि काही नात्यांना नाव नसत. या आडन गोष्टी लक्षात तेह्वाल्यास तरी पुष्कळ. भेटूयात असेच परत कधी तरी अनपेक्षितपणे. माझ्या उत्तराची वाट ही न पाहता स्वयम् निघून गेला, मला पुन्हा नव्या विचारांच्या रस्त्यावर सोडून!

नकळत त्या मार्गावर चालत असताना माझी मीच मला नव्याने भेटत होते. काळात होतं. स्वयम् ने सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे उमगत नव्हत्या पण थोड्या थोड्या समजत होत्या. भोवतालाच सौंदर्य आता माझ्याही नजरेत भरायला लागले होते. अशाच काळात कधीतरी हॉटेलमध्ये शेजारच्या तेबाल्वाराच्या बाळाला पाहून नकळत बोलले, किती सुंदर आहेत याचे डोळे, नाव काय बाळाचे? आणि स्वयम् ची आठवण झाली.
मग कधीतरी बसस्टॉपवरच्या एका षोडशेला म्हणलं, काय सुंदर केस आहेत तुझे. तेव्हा खरच वाटल, स्वयम् ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. कोणाला चांगलं म्हणण्यासाठी, कौतुक करण्यासाठी खरच ओळख लागते का?
(चारचौघी २००७)





2 comments: