Thursday, November 10, 2016

घरोघरी साड्यांची म्युझियम

“ अगं मी यावर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या साड्याच्या निमित्ताने मी एक मस्त गुलाबी रंगाची पैठणी घेतली आणि दिवाळी साठी म्हणून काळी चंद्रकळा. तू काय घेतलेस नवीन?” एक बस मध्ये एक जण दुसरीला विचारत होती.
“हो ग मी पण  नऊ दिवस त्या नवरात्रीच्या रंगांच्या रेशमी साड्याच नेसते, यावेळी पांढरी साडी नेमकी नव्हती बघ, आणि कित्ती दिवसापासुन एक संबळपूर सिल्क घ्यायची होती मग काय एक पांढरी किरमिजी बॉर्डर ची संबळपूर सिल्क घेऊन आले. दिवाळीला बाई आम्ही सोनेच घेतो.” माझा स्टॉप आल्यामुळे मी उतरले आणि माझी पुढची साडी खरेदी, रेशमी साड्यांचे प्रकार, नवरात्रीचे नऊ रंग, सोन्याची खरेदी अशी मिळणारी वेगळी माहिती माझी हुकली.

लग्नामध्ये मिळणाऱ्या ५ मानाच्या साड्या, आहेरात मिळणाऱ्या साड्या यापासून कित्येक जणींच्या साड्यांचा प्रवास सुरु होतो, तसं त्या आधी हौस म्हणून, किंवा जवळच्या कोणत्या तरी लग्नासाठी म्हणून घेतलेल्या साड्या असतात, पण बहुतांश जणींच्या रेशमी साड्यांच्या संग्रहाची सुरुवात मात्र होते ती लग्नापासूनच! सध्याचा जमाना डिझाईनर साड्यांचा असला, तरी पारंपारिक रेशमी, सुती  साड्या आजही त्यांचे महत्व टिकवून आहेत. मग चेन्नईला गेलं की कांची सिल्क किंवा कांजीवरम घेणं हे मरीना बीच बघण्यापेक्षाही महत्वाचं काम असतं. पैठणी अगदी नाक्यावरच्या दुकानात मिळत असली तरी येवल्यावरून आणलेल्या पैठणीची बातच न्यारी असते. आपल्याकडे नाही बाई मिळत एवढे रंग आणि प्रकार पैठण्यांचे म्हणत एखादी सहज ३, ४ पैठण्या येवल्यावरून येता जाता घेते.

साडी हा साडी नेसणाऱ्या आणि ना नेसणाऱ्या सगळ्याच जणींचा अगदी खास चर्चेचा विषय असतो, न नेसणाऱ्या  हे एक काहिअतरी अवघड जटील प्रकरण आहे म्हणून बघतात, रोज घालणाऱ्या आमचाच जास्त हक्क याच्यावर बोलण्याचा म्हणून बोलून घेतात, आणि कधी मधी साडी नेसणाऱ्या, मिरवणाऱ्या #100dayssareepact करतात, किंवा परदेशात साडी नेसून लक्ष वेधून घेतात. त्या अमुक अमुक अभिनेत्रींनी परदेशात नेसलेल्या साड्यांचे तर भारतातच नव्हे तर परदेशातही कौतुक होत असते. साडी नेसल्याचा पहिला पुरावा सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये मिळाला, म्हणजे ख्रिस्त पूर्व २८००-१८०० च्या सुमारास, सुरुवातीस फक्त सुती साड्या होत्या, नंतर रेशमाचा शोध लागल्यावर रेशमी साड्या तयार होऊ लागल्या, गेल्या शतकापासून तर कृत्रिम धाग्यांपासून बनवलेल्या साड्यांची देखील चलती सुरु झाली आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, आणि क्वचित ठिकाणी श्रीलंकेमध्ये सुद्धा साड्या वापरल्या जातात.

भारतात प्रत्येक राज्याची अशी स्वतंत्र साडी संस्कृती आहे, म्हणजे फक्त साड्यांचा प्रकार नव्हे तर साडी घालण्याच्या पद्धती देखील, महाराष्ट्रीयन, बंगाली, गुजराथी, कोंकणी, केरळी, माडीसार( तमिळ अय्यांगरी ९ वारी साडी), निवी (आंध्र प्रदेशातली), कोडगू (कुर्गी पद्धतीची ), आसामी, मणिपुरी, खासी असे अनेक पारंपारिक प्रकार तर आहेतच पण डिझाईनर साड्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या पदधतीने आजकाल नेसवल्या जातात.  

जसं तामिळनाडू म्हणल्याबरोबर बायकांना कांजीवरम, उत्तरप्रदेश म्हणाल्यावर बनारसी, लखनवी साड्या, आंध्र प्रदेश म्हणल्यावर नारायणपेट, धर्मावरम, मंगलगिरी, उप्पडा, वेंकटगिरी सिल्क, गडवाल, मध्य प्रदेश मधील चंदेरी, माहेश्वरी साड्या, राजस्थान गुजराथ मधील बांधणी, गुजराथ मधीलच पटोला, बंगाल मधील सुती साड्या, कांथा सिल्क साड्या, बांगलादेश मधील मलमलच्या साड्या, टसर सिल्क, आसाम मधील मूगा सिल्क,  संबळपूर, बेहरामपूर सिल्क, इक्कत या ओरिसा मधील साड्या, कर्नाटकातील म्हैसूर सिल्क, आणि इरकल, केरळ मधील पारंपारिक ऑफ व्हाईट, सोनेरी काठाच्या साड्या काश्मीर मधील सिल्क साड्या, पंजाब मधील फुलकारी किंवा हातानी विणकाम केलेल्या साड्या, बघावी तेवढी यादी वाढत जाते. यातल्या प्रत्येक ठिकाणी भेट दिल्यावर एखादी साडी घेणं हे भारतीय एकात्मतेसाठी गरजेचंच असतं.

भारतामध्ये पर्यटन किंवा गावोगावी लागणाऱ्या मेळाव्यांमध्ये गेला बाजार आपल्या शहरांमधल्या दुकानांमध्ये यातल्या बऱ्याचशा प्रकारच्या साड्या मिळतातच, आणि याखेरीज अनेक प्रकारच्या साड्यांनी दुकानं कायम भरलेली असतात, मग कधी रंग आवडला म्हणून, कधी काठ आवडले म्हणून, कधी पदरावरची नक्षी आवडली म्हणून, कधी हा रंगच माझ्याकडे नाही, किंवा ही रंगसंगती नाही. कधी सगळ्या जणी एक सारख्या साड्या घेऊ म्हणून घेतलेली, कधी, ( बऱ्याच वेळा ?) भेट म्हणून आलेल्या साड्या, अशा साऱ्या साड्यांनी कपाट वाहून चाललेलं असतं, तरीही साडीचा मोह हा कधी सुटत नसतो, रस्त्यावर सहज फिरताना, किंवा कोण एकीच्या अंगावरची साडी आवडली म्हणून साडीची खरेदी कधीच थांबत नसते.

साड्या बायकांना एकत्र जोडतात,  त्यांच्यात संभाषणं तयार करवतात, नैसर्गिक औत्सुक्याला खतपाणी घालतात भौगोलिक, भाषिक अंतर मिटवतात, पुरुषांना बायकांचं मन जिंकण्याची सोपी संधी देतात, संस्कृती जपण्याचे, जोपासण्याचे कामा करतात, हस्त शिल्प कारागिरांना उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देतात, बायकांचे सौंदर्य खुलवतात. इतकं सगळं करणाऱ्या बहुगुणी साड्या जरा चुकून जास्तच असल्या घरात तर काय झालं, शेवटी मनाजोगती साडी मिळाली तर बाई खुश, बाई खुश तर घर खुश आणि घर खुश तर दुनिया सलामत. सहा वारांमध्ये लपलेली असतात किती तरी गुपितं, वर्षे गेली, साडी विरली तरी तशीच जपलेली त्यामुळेच घरोघरची साड्यांची कपाट फक्त कपाट नसतात ती असतात साड्यांची म्यूझियम.


No comments:

Post a Comment