Tuesday, November 15, 2016

तरीही फुलतो आहे.....

काही काही वासाशी, झाडांशी आपल्या आठवणी निगडीत असतात. आणि मग त्या आठवणी इतक्या घट्ट होऊन जातात, की ते वास आणि त्या आठवणी एकच होऊन जातात. मग कधी या आठवणी वय विसरायला लावतात तर कधी या आठवणी कातर करून सोडतात. आयुष्य म्हणजे तरी काय असतं, आठवणींची पुरचुंडी तर असते. बऱ्याचशा आठवणी मेंदूत जागृत, निद्रित साठवलेल्या असतात, पण काही आठवणी मात्र मनात खोल रुतून बसलेल्या असतात.

लहानपणी कधी तरी आजीच्या मांडीवर बसून कृष्णाच्या गोष्टी ऐकताना नरकासुराची गोष्ट ऐकली होती. मग नरकासुराला मिळालेलं वरदान, आणि मग त्याचा गैरवापर टाळण्यासाठी मिळालेला शाप. तेव्हा कायम वाटायचं हे राक्षस लोकंच का कायम तपश्चर्या करायचे. मग ही एवढी साधना करून पण यांची वृत्ती का बदलायची नाही? आणि दर दर वेळी हे राक्षसच का वाईट असायचे. कधी तरी एकदा आजीला तसं थेट विचारल्यावर ती म्हणाली, अग या गोष्टी म्हणजे साऱ्या प्रतिकं असतात. आपल्याच आत देव पण असतो आणि राक्षस ही. राक्षसाला देवापेक्षा मोठं व्हायचं असतं म्हणून तो तपश्चर्येच्या मागे लागतो. देवाला अशी कोणाशीही स्पर्धा करायचीच नसते. आणि वाईट गोष्टीना मारणं गरजेचं असतं ना त्यासाठी शाप देतात. मग त्या नरकासुराच्या गोष्टीतली सत्यभामा मस्त हिरोईन सारखी वाटायची. कृष्ण तर पहिल्यापासून हिरो होताच, पण नरकासुराला मारताना त्याला मदत करणारी त्याची बायको मनापासून आवडली होती.

तीच सत्यभामा दुसरऱ्या एका कथेमध्ये नवऱ्यावर हक्क गाजवणारी म्हणून दिसते. मग त्याला दान म्हणून सोडतानाही तिला लक्षात येत नाही आपण काय करतो आहोत. अति प्रेम , आंधळं प्रेम असंच आपल्याकडून काहीही करून घेतं असतं. आपल्याही नकळत आपण वहावत असतो. . पण या सगळ्यापेक्षाही मला आवडते ती पारिजात फुलाची आणि सत्यभामेची कथा. कृष्णाची पट्टराणी खरं तर रुक्मिणी त्यामुळे आपण कायम दुसऱ्या क्रमांकावर या खंतेत सत्यभामा, खरंतर ती सौंदर्यवती, त्यात परत नरकासुर वध केला म्हणून तिला मिळालेलं  अमर सौंदर्याचं वरदान बर माहेरचं घराणं देखील मोठं त्यामुळे त्याचा ताठा वेगळा. मग एकदा फुरंगटून तिनं म्हणे कृष्णाला सांगितलं मला पारिजातकाचं झाड माझ्या अंगणात हवं. पारिजात म्हणजे स्वर्गीय झाड, थेट समुद्रमंथनातून मिळालेलं. बायकोचा हट्ट पूर्ण करण्यासाठी नवऱ्याला काहीही करावं लागतो ह्याचा पहिला धडा गिरवला कृष्णानं. जिथं कृष्ण काही करू शकला नाही तर बाकीच्या सामान्य नवऱ्यांची काय कथा! नवऱ्यानं बायकोचा हट्ट पूर्ण करत झाड लावलं खरं. पण फुलं मात्र पडायला लागली रुक्मिणीच्या अंगणात. ह्यालाच म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं.

जेव्हा केव्हा पारिजातकाची फुलं, झाड बघते तेव्ह तेव्हा मला सत्यभामा डोळ्यासमोर येते, आणि नकळत नरकासुराची पण आठवण येते. हे पारिजातकाचं पिटुकल फुल, त्याचा तो केशरी रंगाचा दांडा, कधी पाच, कधी सहा क्वचित कधी आठ पाकळ्या. सूर्यास्तानंतर उमलायला सुरु होणारं आणि सूर्य परत हजेरी द्यायला आल्यावर हळूहळू कोमेजणाऱ्या या फुलाच्या झाडाला  इंग्लिश मध्ये ‘ट्री ऑफ सॉरो’ म्हणतात, आणि गंमतीची गोष्ट म्हणजे याचं जे शास्त्रीय नाव आहे, निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस त्याचा अर्थ देखील ‘दुःखी झाड ‘ असा होतो. पारिजातकाची एक दंतकथा पण अशी सांगितली जाते की हे झाड एकदा सूर्याच्या प्रेमात पडलं, आणि त्यानी त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, पण सूर्यानी त्याला नकार दिला म्हणून ही फुलं सूर्य असताला गेल्यावर फुलांमधून अश्रू ढाळायला सुरुवात करतात ते थेट सूर्याचं परत दर्शन होईपर्यंत.


स्वतंत्र वास असणारी ही पारिजातकाची झाडं खरंच अंगणाची शान असतात. प्राजक्त, हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक या नावांनी पण ओळखलं जातं. जमिनीवर पडताक्षणी हिरमुसून जाणारी ही फुलं गोळा करण्यात देखील एक आनंद होता. जेव्हा कधी प्राजक्ता अशी हाक कानावर पडते तेव्हा पारिजातकाचा परिमळ दरवळून जातो, हेच असावं कदाचित आठवण आणि वास एकच होऊन जाणं.  आपले अश्रू ढाळता ढाळता सुवास पसरवणारं दुःख इतक्यांना सुखी करून जातं, की दुःखालाही त्याच्या दुखण्याचा विसर पडावा. आयुष्यात एवढं जमलं तरी पुष्कळच म्हणावं लागेल. ...!  

No comments:

Post a Comment