Monday, November 7, 2016

गोष्ट एका 'केस' ची

मैत्रीण खूप वर्षांनी भेटत होती. फोटो मधून एकमेकींचे दर्शन घडत होतं, पण फोटो मधेय बऱ्याचदा आपण आपल्याला जे आवडतं, जे दाखवायचं असतं तेच दाखवतो. कॉलेज च्या दिवसापासुनची ही मैत्रीण, म्हणजे अगदी एखादा मुलावर टप्पे टाकण्यापासून घरी वेळ मारून नेण्यापर्यंत सारे काही सोबत केलेली. कॉलेज च्या दिवसात असे मित्र मैत्रिणी असतातच ज्यांच्यामुळे आयुष्यात पुढे आठवणीना वेगळा रंग, गंध, स्पर्श असतो. आयुष्य व्यापून उरतात त्या आठवणी. त्यामुळे हे मैत्र उघडं नागडं असतं, तिथं काही लापवाछपवी नसते. प्रत्यक्षात बघितल्यावर मैत्रीण एकदम बोलून गेली
‘अग हे काय? एवढेसे केस?’
माझ्या झड झड झडणाऱ्या केसांकडेच तिचं पहिलं लक्ष गेलं. हाय रे दैवा, इतके दिवस लपवून ठेवलेलं सत्य शेवटी समोर आलंच होतं. मीच मग पलटवार करत म्हणलं,
‘अग एवढे तरी केस राहिलेत बघ अजून , पूर्ण टकली व्हायला वेळ आहे.’ आणि मग हा हा हा करत वेळ मारून नेली.
वेगवेगळे विषय निघत गेले, गप्पा रंगत गेल्या, पण तिच्या डोक्यातून काही माझे केस जात नव्हते, आणि केसांबद्दल विचार करून करून माझे केस गळून गेले होते. वाढत्या वयाबरोबर माझे केस माझी सोबत सोडत चालले होते. वयाबरोबर पांढरे होत जाणारे केस माहीत होते, पण वयाबरोबर साथ सोडणारे केस मी पहिल्यांदाच पाहत होते. प्रत्येक वेळी काही तरी नवीन कारण मिळायची केस गळायला, मग त्यावरती नवीन काही तरी उपाय.
शाळेत कॉलेजात असताना आईच्या शाळेच्या धाकानी तरी तेल पाणी व्हायचं, पण मग शाळेतून कॉलेजात गेल्यावर शिंग फुटतात त्यामुळे, केस कापून शिंगाना खास जागा केली, मग एकदा लागलेली कात्री सहज सुटत नाही म्हणत ती कात्री दर सहा महिन्यांनी आगत गेली, कधी कात्री कधी रंग. केस म्हणजे एक प्रयोग शाळा होत होती. मग प्रयोग कमी कमी होत गेले आणि केसांचा आकार, घनता देखील.
मग कामाचा, आयुष्याचा ताण, नानाविध कारणं लागत गेली, गावं बदलली, देश बदलले, खाणं बदललं, साध्या साध्या सवयी बदलत गेल्या आणि केशरचना देखील! मग तेल बदललं, शाम्पू बदलले, कधी कुठल्या पावडरी लावून पाहिल्या, कडीपत्ता, ते मेथ्या, अंड ते दही सारं काही खावून, लावून, वापरून झालं, पण केसांनी मात्र वाढायला पसरायला पूर्णपणे नकार दिला होता. कधी वर बांधून , कधी वेणी मध्ये लपवून त्यांचं अस्तित्व मी लपवू पाहत होते. जेवढे जास्त प्रयत्न तेवढ जास्त दुःख! जाहिरातीना भुलून वापरलेल्या तेल, शाम्पू नी बिलाचा आकडा वाढायचा पण केस मात्र जिथे आहेत तिथे.
लहानपणी आईकडे केस कापू दे, छोटे करायचेत म्हणून हट्ट करावा लागायचा आणि आता केस वाढावेत म्हणून हट्ट धरावा लागतोय. आयुष्य बहुदा हेच असतं, जेव्हा जे असतं, तेव्हा त्याची किंमत कळत नाही, आणि मग जेव्हा ते हातातून (डोक्यावरून) निसटून जायला लागतं तेव्हा मात्र त्याला घट्ट धरून ठेवण्याची खटपट केली जाते. कधी कधी शांतपणे विचार केला तर वाटतं, का करायची ही खटपट, द्यावं सोडून सारं, सुंदर दिसण्याची एक पायरी म्हणजे सुंदर केस, पण मग बिनाकेसांच्या सौंदर्याच्या काय? वर्षानुवर्षे मांडत असलेल्या गृहितकांना, मापकांना कुठेतरी छेद दिलाच पाहिजे ना? सौंदर्याच्या कल्पनाच जर आपण किमान आपल्यापुरत्या तरी बदलल्या तर? काही कारणानी गमावले केस तर? आयुष्य थांबत तर नाही ना तिथं? सौंदर्याच्या कल्पना जेव्हा बदलून जातात तेव्हा बदल असते आपली प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची नजर. आणि मग न दिसलेल्या अनेक गोष्टी दिसायला, जाणवायला लागतात.
गळणाऱ्या केसांमुळे मिळालेलं हे शहाणपण जेव्हा मैत्रिणीबरोबर वाटत गेले तेव्हा  ती सहज  बोलून गेली, ‘टकले, बहुदा केस गेल्यामुळे मेंदूला छान ऊन मिळत असावं, त्यामुळे, विचारांचं पीक जरा बरं वाढतंय!’ आणि मला बाल बाल बचावल्याच नवं समाधान मिळालं!



टीप: बिनाकेसांच्या सौंदर्याच्या एका सुंदर जाहिरातीची लिंक सोबत जोडत आहे. जेव्हा जेव्हा ही जाहिरात बघते तेव्हा तेव्हा हे सौंदर्य मला अजूनच भावतं...




No comments:

Post a Comment