Thursday, September 15, 2016

माहेरीचा भोपळा मज कलिंगड भासे



लग्न झाल्यावर मुलगी फक्त घर बदलत नाही, तर तिचं नाव, कधी कधी शहर , देश सुद्धा, नोकरी, सवयी थोडक्यात काय तर स्वतःचे आयुष्य बदलवून टाकत असतात. वर्षानुवर्षे जे नाव लावत आलो, ते सोडायचे (अलिकडे ही प्रथा कमी होत चालली आहे.) त्याही पेक्षा ज्या पद्धतीचं आपण जेवण खात आलो, ते सोडून अचानक काही तरी वेगळंच आपल्या पुढ्यात येत असतं. नवीन घर, नवीन माणसं, नवीन अन्न कशालाच काही बोलता येत नाही. क्वचित प्रसंगी, नवऱ्याला काही आवडी निवडी माहित असतात, मग तो सांभाळून घेतो. जसं प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येक घर वेगळ असतं तसंच प्रत्येक घराची खाद्यसंस्कृतीही वेगळी असते. अगदी एकाच गावातली दोन घरं असली, नात्यातले असले तरी थोडे फार फरक जाणवतातच. मग आंतरजातीय, आंतरधर्मीय, किंवा आंतरराष्ट्रीय लग्न असली तर विचारायलाच नको. आपण म्हणतो १२ मैलावर पाणी आणि वाणी बदलते. तसंच खायच्या चवी सुद्धा बदलतात आणि या चवीपांयी अनेकदा नात्यांची चव जाऊ शकते किंवा नाती अधिक चवदारही होऊ शकतात.

घाटावरची मुलगी सून म्हणून  विदर्भात येते आणि सासू तिला विचारते, उपासाला उसळ चालेल ना?’ ती ओरडायच्याच बेतात असते, परंतु सावरून विचारते, उसळ? मग सासू पण लक्षात येऊन म्हणते, अग तुम्ही साबुदाण्याची खिचडी म्हणताना? तेच गं, त्यालाच इकडे, उसळ म्हणतात. ती नवीन सून हसू दाबत म्हणते, बरं बरं यापुढे लक्षात ठेवेन. मग अशातच कधी कधी तरी दक्षिणेकडे इडली सोबत खातात तो सांबार वेगळा, आणि विदर्भाकडे भाजीवालीकडे मिळणारा सांबार म्हणजे कोथिंबीर वेगळी, हे तिच्या लक्षात येतं. जेवतानाही अशीच गंमत उडते. कधीतरी सासू म्हणते चटणी दे आणि सून आणून देते तिखट. कधी दक्षिणेकडची सून म्हणते आज मी नाश्त्याला केशरी भात करते सगळे अरे बापरे सक्काळी सक्काळी भात?’ म्हणेपर्यंत समोर येतो शिरा. आलू बोंडा आणि बटाटेवडा एकंच, हे खाल्ल्यावर कळतं. ही तर फक्त नावांची हेराफेरी आहे, कृतीमधल्या वैविध्यांवर आपली भारतीय खाद्यसंस्कृती टिकून आहे हे खरं असलं तरी त्या वैविध्यांसह नाती टिकवून ठेवणं हे सासुरवाशींनीपुढे मोठं आव्हान असतं.

नवीन घरात गेल्यागेल्या स्वैपाकघराचा ताबा सुनेकडे लगेच न देण्याचं एक कारण हेही असतं, की वर्षानुवर्षे त्या घरातल्या लोकांची एक चव ठरलेली असते. तिखटाचं प्रमाण, मिठाची रुची, स्वैपाक करायची पद्धत ही सवयीनुसार आखली गेलेली असते. नवीन आलेल्या सुनेच्या खाण्याच्या सवयी, स्वैपाक(येत असल्यास ) करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, काही घरात कांद्याशिवाय भाजी केलीच जात नाही, तर काही घरात  ज्यात त्यात चिंच वापरली जाते, काही घरात गूळ/साखरेशिवाय स्वैपाक पूर्ण होत नाही. दुधी भोपळ्याची भाजी फक्त चना डाळ घालून खाणारी माणसं एकदम दुधी भोपळा मुगाच्या डाळीसोबत बघून गोंधळतात. त्यामुळे अल्पमतातल्या सूनबाईना एकदम बहुमत तरी मिळतं किंवा त्यांना  प्रशिक्षणासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी दिला पाहिजे,असं ठरतं.

आपल्या तिखट मिठाच्या कल्पना, जिभेचं वळण हे वर्षानुवर्षे एकाच प्रकारचं खाल्यामुळे ठरत असतात. त्यामुळे मुलगी लग्नानंतर एका रात्रीत त्या घरातले मसाले, स्वैपाक आपलासा करू शकत नाही तशीच  त्या घरातली माणसंही नवी चव एक रात्रीत आपलीसी करू शकत नाहीत. मोजून मापून स्वैपाक करणाऱ्या असतात तसाच अंदाजाने स्वैपाक करणाऱ्या देखील असतात. एखाद्या घरात आयत्यावेळी आलेला पाहुणा सपादला जावा (म्हणजे समाविष्ट करया यायला हवा) या बेतानं थोडा जास्त स्वैपाक केला जातो तर एखाद्या घरात पोळीचा (पोळी म्हणावं की चपाती!) तुकडाही शिल्लक राहू नये असा दंडक असतो. प्रत्येक घरात काळा, गोडा मसाला वापरत जात असला  तरी त्याचं प्रमाण बदलत असतं. त्यामुळं अनेकदा, सासूच्या हाताची चव अगदी  तश्शीच्या तशीच कृती करणाऱ्या सुनेच्या हाताला येत नाही. पण मग त्या प्रयत्नात एखादी नवीन चव जन्माला येते, जी, कदाचित आधीच्या चवीपेक्षाही सरस असते. कधी सासू सुनेकडून काही शिकते, तर कधी सून सासूच्या हाताखाली अगदी तयार होऊन जाते. स्वैपाकाच्या या आदानप्रदानामुळे कित्येदा नव्या पदार्थांचा शोध लागतो. इतिहासात अनेक नवे पदार्थ कदाचित असेच जन्माला आले असावेत.


आपण घरात रुळतो म्हणजे खरं तर त्या घरातल्या चवीला सवयीचे होतो, किंवा त्या चवीत आपली चव मिसळून देऊन त्या घराच्या खाद्यसंस्कृतीचा भाग होऊन जातो. हे रुपांतर कधी दर्शनीय असतं तर कधी अदृश्य असतं. जसं दुध एकच असतं, पण त्याच दुधाचं, दही, ताक, श्रीखंड, तूप, खवा, पनीर, बासुंदी सगळं कसं वेगवेगळ्याच चवीचं असतं. तसचं आहे आपल्या स्वैपाकाचं. हळू हळू नव्या मसाल्यांची, नव्या चवीची सवय होते, मग ते ही आवडायला लागतं. आपण काय शेवटी जिभेचे चोचले पुरवले गेले की खुश असतो, पण ज्या घरात नव्या जुन्या चवींची सरमिसळ समजूतीनं आणि उत्तम रितीनं होते, तिथं आनंद फुलतो. त्या घरात सासू सुना एकाच स्वैपाकघरात भांड्याला भांड लागूनही आवाज येऊ न देता काम करत नवी खाद्यसंस्कृती जन्माला घालत असतात. मात्र काहीही झालं तरी सासूरवाशीणीच्या मनात माहेराची चव ठाण मांडून बसलेली असतेच आणि माहेरी आल्या आल्या ती आईला, आई तुझ्या हातची अळूची भाजी करना गं..असा लाडिक आदेश देते. माहेरीचा भोपळा मज कलिंगड भासे...म्हणतात ते काय उगीच? परतुं दरम्यान तिच्या माहेरीही नवी सून आलेली असते आणि तिथंही चवींची सरमिसळ सुरू झालेली असते. ही सरमिसळ हेच तर आपल्या जगण्याचं रसायन आहे.

No comments:

Post a Comment