आम्ही शाळू
मैत्रिणी खूप दिवसांनी भेटत होतो. खर तर खूप वर्षांनी. एका मैत्रिणीच्या घरीच भेटत
होतो, त्या काकूंनी साऱ्या माहेर वाशिणींसाठी म्हणून खास भरल्या ढोबळी मिरचीची
भाजी केली होती. बाकी दोन भाज्या, आमटी कोशिंबीर, लोणची होतीच पण ती भाजी खाता खाता जणू परत शाळेत गेल्यासारखं वाटत होतं. त्या मैत्रिणीनी
एकदा डब्यात ती भाजी आणली होती, आणि तेव्हा हायजेनिटी शब्द फक्त उत्तरांमध्ये वापरला
जायचा, त्यामुळे दुपारचा डबा एकत्रच खाल्ला जायचा, रोज वाटावाटी व्हायची. त्यामुळे
प्रत्येकीच्या घरच्या चवीची ओळख होती. आणि मग काही जणींच्या घराच्या ठराविक भाज्या
हिट्ट असायच्या, एका मैत्रिणीच्या आईच्या हाताची मटकीची उसळ आम्हाला सगळ्यांना
आवडते म्हणून ती उसळ नेहेमी जास्त घेऊन यायची. आमच्या घरचं भरलं वांगं, दुसऱ्या
एकीच्या घराची पीठ पेरून दुधी भोपळ्याची भाजी, तर एकीच्या घरच्या गुळपोळ्या,
एकीच्या घरातलं लिंबाचं लोणचे (जे आम्ही तोंडात ठेवून चघळत चघळत खायचो). असे काय
काय तरी आजही आठवतंय. काकूंना अगदी आठवणींनं
भाजीची पध्दत विचारली, त्यांनी पण आढेवेढे न घेता, लगेच सगळी कृती सांगितली. कोणत्याही
वेबसाईट वरच्या पदार्थांच्या कृती करून बघण्याची सवय असलेली आमची एक मैत्रीण मधेच
बोलली, काकू टीस्पून, टेबल स्पून मध्ये सांगा ना. काकू लगेच म्हणाल्या, अग मला असे
मोजमापात सांगता नाही येत बाई, मी आपलं सगळं अंदाजानीच घालते. आता इतक्या वर्षांची
सवय झालीये की झोपेत सुद्धा स्वैपाक करता येतो गं.
आई , आजी, ला स्वैपाक
करत बघतच वाढले, आईनी कधी हाताला धरून आता हे असं करायचं असे शिकवलं नाही, मात्र
वेगवेगळे प्रयोग करायला मात्र भरपूर मुभा दिली. चिमूटभर मीठ, रंग येईलाशी हळद,
बेताचं किंवा झणझणीत जसं हवं तसं तिखट. आलं लसूण पेस्ट घायायची असेल तर आल्याचा
जेवढा तुकडा हातात येतो तेवढा किंवा आधीचा
वापरून झाल्यावर उरला तेवढा आलं वापरायची सवय हाताला लागलेली. मग कधी घरात लसूण
आवडत नाही म्हणून किंवा टोमॅटो एकच आहे म्हणून तेवढाच वापरला असं करत स्वैपाक करत
गेलेलं. त्यामुळे अगदी ठरवून सुद्धा फारच क्वचित तीच चव दरवेळी येते. कित्येक वेळा
अगदी सगळं तसंच घेतलं तरी चवीत किंचित फरक जाणवतोच. तो फरक कधी हातांचा तर कधी वापरलेल्या
जिन्नसांचा. ताज्या मसाल्याचा वास पदार्थ ताटात यायच्या आधीच दरवळतो, तर ताजी
खुडून आणलेली भाजी तशीच खाल्ली तरी चवदार लागते. प्रत्येकाच्या हाताची चव हा
जागतिक संशोधनाचा विषय आहे खरं तर! आपल्याकडं जसं आजीच्या हाताच्या कुरड्या,
पापड्या, लोणची या साऱ्याची एक विशेष गोडी असते तशीच पाश्चात्य देशात मुरब्बे, जॅम,
कुकीज च्या बद्दल म्हणलं जातं. कित्येक घरांमध्ये आजीने केलेले हे सारे पदार्थ
वर्षभर जपून ठेवले जातात, त्या कृती तंतोतंत पाळल्या जातात तरी ती चव येत नाही.
आपण कोणतीही गोष्ट करताना मनात काय विचार करत होतो, मूड कसा होता यावर सुद्धा त्या
पदार्थाची चव जमून येत असते.
भात लावताना काही
ठिकाणी तांदुळाच्या प्रमाणात पाणी घातले जाते, तर काही ठिकाणी बोटाच्या पेराच्या
हिशोबाने, तर कधी निव्वळ डोळ्यांच्या अंदाजाने. मीठ कधी चिमूटभर घातलं जातं, तर
कधी चमच्याच्या हिशोबानं. कधी चार माणसांच्या स्वीप्कात पाचवा, सहावा माणूस सहज
खपून जातो, तर कधी चार माणसांचं स्वैपाकातून तिसरा माणूस सुद्धा निसटू शकतो.
स्वैपाक ही खरोखरीच एक कला आहे. जसा प्रत्येकाचा आयुष्याचा दृष्टीकोन वेगळा असतो
तसच या कलेचे देखील आहे. रोज करत करत सरावाने अंदाजाचा देखील अंदाज येतो. पण तरीही
कोणत्याही बाईला, किंवा स्वैपाक करणाऱ्या माणसाला चहाची कृती किंवा प्रमाण विचारलं
तर ते सांगतील अंदाजाने. जेव्हा हा अंदाज अंगवळणी पडतो तेव्हा शिकावू श्रेणी मधून
हळू हळू सराईत गटाकडे वाटचाल सुरु झालेली असते.
कृष्णाने
द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं. त्यामध्ये जोवर अन्नाचा एक कण जरी असेल तरी अन्न
कमी पडणार नाही असा आशीर्वाद कृष्णानी त्याच्या प्रिय सखीला पांचालीला दिला होता.
कधी कधी मला वाटतं हे अक्षय पात्र म्हणजे स्त्रियांना किंवा स्वैपाक करणाऱ्या
बल्लवांना मिळालेलं अंदाजाचं वरदान असणार. अंदाजपंचे पदार्थ करून त्यात रुची उतरून
अंदाजानेच जेवणाऱ्या साऱ्या लोकांना पुरणं
हेच असू शकतं अक्षयपात्राचे रहस्य. कदाचित द्रौपदीकडून ती थाळी पुढे पुढे सरकत
गेली असणार, किंवा या थाळीचं गुपित तिनी फक्त तिच्यापर्यंत न ठेवता साऱ्यापर्यंत
पोहोचवण्यासाठी हा अंदाजाचा घाट घातला असणार. शेवटी काय अंदाजानेच सारे शोध लागत
गेले, नंतर त्यांची प्रमेय मांडली गेली, ती सिद्ध झाली. अंदाजाने केलेला स्वैपाक
हे रोजचं प्रमेय असतं आणि तृप्त होऊन जेवून उठणारी लोकं ही त्याची सिद्धता असते.
त्या सगळ्याला चमचे, इंच, वाट्या, यांच्या प्रमणात अडकवून ते सिद्ध करता येतं
किंवा वय, हात, चिमुट, मुठ, डोळे यांचं अंदाजाने ते सिद्ध करता येतं, शेवटी काय
अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणत तृप्त होणे महत्वाचे !!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment