एका भारतीय
पद्धतीचे पुरुषांचे कपडे बनवणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत बाप आणि मुलगा दाखवले
होते. स्वातंत्रदिनासाठी मुलाला झब्बा घालायचा होता, आई कुठेतरी दुसरीकडे गेली
होती, अशी काहीशी जाहिरात होती ती. मुळात पुरुषांसाठीच्या कपड्यांच्या जाहिराती
मध्ये बाईचे नसणं हाच एक सुखद धक्का होता, त्यात वडील मुलाची काळजी घेत आहेत हे
पाहणं म्हणजे सोनेपे सुहागा होतं. जाहिराती ह्या समाजमनाचा आरसा समजल्या जातात.
त्यामुळे आईच्या अनुपस्थितीत मुलाला सांभाळणारे, त्याला तयार करून देणारे बाबा
आजूबाजूला वाढले असणार अशी एक खात्री झाली.
मुलांचे संगोपन
ही जणू निसर्गानेच मादी जमातीवर सोपवलेली जबाबदारी आहे असं फक्त मनुष्य प्राण्यातच
नव्हे इतर प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये देखील समजलं जातं. अर्थात नियमाला अपवाद असतात तसेच पेंग्विन, rhea
प्रकारचे शहामृग, समुद्री घोडे, काही प्रकारचे मासे, बेडूक, असे काही बाबा लोक
आहेत जे मुलांचे संगोपन करतात, यातले काही जण तर चक्क पिल्लांची अंडी त्यांच्या,
पोटात, तोंडात, अंगावर ठेवतात. हे सारे जणू अपवादाने नियम सिद्ध होतो अशा पंथातले.
पण मनुष्य प्राण्यांमध्ये हे चित्र थोडे थोडं बदलताना दिसतंय. म्हणून तर सरकारी
नोकरीतल्या कर्मचाऱ्यांना १५ दिवसाची पितृत्व रजा मिळते जी बाळहोण्याआधी पासून ते झाल्यापासून सहा महिन्यापर्यंत कधीही घेता येते.
सरकरी तजवीज झाली, पण या सोयीचा उपयोग किती बाबांनी खरोखरीच मुलांच्या गरजेसाठी
करून घेतला हा ही एक संशोधनाचा विषय आहे.
पुरुषाने
घराबाहेर ची कामं करायची, आणि बाईनी घराच्या चार भिंतींच्या आतली, हा समज आता
बर्यापैकी मोडीत निघतोय, त्यामुळे चित्रपटातही घरबशा नवरा, आणि नोकरी करणारी बायको असं बघायला मिळतंय.
तसंच शहरांमध्ये कित्येक हॉस्पिटलमध्ये आता आईच्या शेजारी उभं राहून बाळांना नॅपी
घालणारे, त्यांचे कपडे बदलणारे बाबा दिसायला लागलेत. हे चित्र अगदी प्रातिनिधीक
नसलं तरी मनोवृत्तीतला बदल टिपणार नक्की आहे. मुलांसोबत डॉक्टर कडे जाणारे बाबा
देखील आता नवीन राहिले नाहीत. पाश्चात्य देशांमधल्या काही चांगल्या गोष्टी
आपल्याकडे रुजतात आहेत. आई वडील दोघांनी अगदी समसमान जबाबदारी नाही पण जबाबदारी
वाटून घेतली जात आहे.
अगदी तान्हं मुल
असो वा शाळा, कॉलेज मध्ये जाणारी मुलं त्यांच्या परीक्षा, आजारपण यावेळी आईची
हमखास सुट्टी पडते, किंबहुना ती आईनीच घेतली पाहिजे असा मानसिक, सामाजिक दबाव
स्त्रियांवर असतो. चुकून एखाद्या पुरुषाने अशी रजा घेतली तर त्याच्या बायकोला
मुलांकडे दुर्लक्ष करते असं ऐकावं लागतं. खरं पाहिलं तर मुलांचे संगोपन ही आई वडील
दोघांची जबाबदारी असते, त्यामुळे मुलांच्या प्रत्येक गरजेच्या वेळी आईनीच घरी
थांबलं पाहिजे असं नसतं. खास करून नोकरी करणाऱ्या आयांमध्ये तर हा खूप मोठा गंड
असतो, जणू आपण नोकरी करतो त्यामुळेच मुलं आजारी पडतात, किंवा त्यांच्या शाळा,
त्यांच्या शाळाबाह्य गोष्टी जपणं, जोपासणं ही जणू फक्त आईचीच जबाबदारी असते. नोकरी
न करणाऱ्या ऐअला तर बिचारीला कोणतीच सबब नसते. घरातल्या बाकीच्या साऱ्यांचे करायचे,
आजारी मुलाबरोबरच, दुसरं मूल असेल तर त्याला बघायचं, अशा वेळी खरंच जोडीदाराकडून
मदतीची अपेक्षा असते. कधी कधी अशा वेळी मनात विचार देखील येतो, मुलाच्या जन्माचे
कारण झालं की पुरुष मोकळेच असतात. मुलाला नाव वडिलांचं लागतं, नावं ठेवताना मात्र
आईचे नाव पुढे येते.
परदेशात
पितृत्वाची राजा ही हक्काची मानली जाते, कारण तिथं आपल्यासारखी बळकट
कुटुंबव्यवस्था किंवा समाजसंस्था नाही. त्यामुळे ओघानं वडिलांवर देखील बाळाची
जबाबदारी येते. स्वीडन मधेय ही पितृत्व राजा सुरु केल्यापासून घटस्फोटाच प्रमाण
कमी झालं, यावरून तिथल्या समाजरचनेचा अंदाज येऊ शकतो. आपल्या देशात स्त्रियांसाठी
१२ आठवड्याची मातृत्व रजा असते, मात्र सरकारी कर्मचारी वगळता खाजगी कंपन्यांमध्ये
पितृत्व रजेची तरतूद फारशी आढळत नाही, आणि याचं एक कारण म्हणजे आपली मानसिकता!
पुरुषांनी घराची कामं, स्वैपाक (हॉटेल मध्ये पुरुष आचारी चालतो मात्र घरात नाही ),
मुलांचे संगोपन करणं या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक बघितलं जात नाही, आणि कित्येक
पुरुषांनाही ह्या सगळ्या गोष्टी करताना कमीपणा वाटतो. जेव्हा आपण कारण ठरलेल्या
जीवाची जबाबदारी घेणं म्हणजे फक्त त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करणं
इतकाच नसतं हे समाजात मान्य होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आई बाबा दोघंही मुलांच्या जडण
घडणीला हातभार लावतील. पुरुषांना या गोष्टी जमणारच नाहीत, त्यांना आवडत नाहीत, ही
त्यांची कामं नाहीत हे असे सगळे समाज पुसले जातील तेव्हा कदाचित मातृत्व रजा सारखी
पितृत्व रजेची गरज भासेल, कोणी सांगाव त्यासाठी एखादं आंदोलनही भविष्यात उभं राहू
शकतं.
एखादा नवीन बाबा
हौसेनं मुलाचं काही करायला घेतो तेव्हा त्याच्यावर पहिली प्रतिक्रिया येते ती
त्याच्या आईकडून, कधी त्यात कौतुक असतं, तर कधी असूया! आताच्या पेरेंटिंगच्या
क्लास ला जाणाऱ्या, जग निम्मं फिरलेल्या, किंवा बघितलेल्या बाबा लोकांना देखील
मुलाची दुपटी बदलावीशी वाटतात, आपल्यामुळे या जगात आलेल्या जीवाला अंगा खांद्यावर
खेळवता खेळवता खायला प्यायला घालावंसं वाटतं. आणि जेव्हा खरंच असं घडतं तेव्हा नकळत
स्पर्शातून बाळापर्यंत ते प्रेम पोहोचत असतं. आणि असं जेव्हा सगळीकडे व्हायला
लागेल, प्रत्येक बाबा रजा मिळू, ना मिळू, पण वेळ काढून मुलांना वेळ देईल तेव्हा
काहीही लागलं, दुखलं खुपलं तर सहज तोंडातून बाहेर पडणारं ‘आई ग’ ची जागा ‘ए/ओ बाबा’
घ्यायला वेळ लागणार नाही.
Manasi..Down Down..
ReplyDeleteTotal Discrimination .. Now we know who have to change .
By the way loved your writup (vadilanche naav and Aaila naave )