Monday, September 19, 2016

ओळखीचं अनोळखीपण

ते गाव सोडूनच आता कित्येक वर्ष झाली होती, आयुष्यातली सर्वात सुंदर १०, १२ वर्ष त्या गावात घातली होती. स्वतःचे घर ही केलं होतं, अगदी छानसा छोटासा बंगला, मग काय आमची शिक्षणं, नोकरी, लग्न यानंतर त्या गावातलं वास्तव्य कमी कमी होत गेलं, मग कधीतरी ते घरच विकायचा निर्णय घेतला. तसा तो निर्णय कोणालाच फारसा पटला नव्हता, पण दुसरा उपायही नव्हता. तिनी आणि तिच्या बहिणींनी एक जग तयार केलं होतं त्या गावात, घरात. बांच्या फिरत्या नोकरीमुळे कुठे एका गावात राहता येईल असं वाटलंच नव्हतं. पण या गावात ते काही काळासाठी का होईना पण स्थिरावले. बदली झाली पण जवळपासच्याच गावांमध्येच झाली. प्रवासाची दगदग सोसली, पण गाव बदलावसा नाही वाटलं. एक प्रकारचा आराम, निवांत आपलेकपणा होता गावात. म्हणलं तर शहर म्हणलं तर गाव असं काहीसं आडनिड होतं ते. तसंच काहीसं लोकांबाबत सगळेच चांगले होते असे नाही, पण उडदामाजी काळे गोरे सारखे चालवून गेले, कोनाताय्ही नातेवाईकाशिवाय १०, १२ वर्ष सगळं निभावून गेलं. काही जवळचे ऋणानुबंध जुळले, काही नवीन अनुभव आले, बरंच काही शिकायला मिळालं, त्यामुळं गाव सोडताना कोणीच खुश नव्हतं.

१२ वी नंतर ताई लांब दुसऱ्या कॉलेजात गेली, मग वर्षभरात तिची १० वी झाल्यावर सगळाच गाशा गुंडाळून सगळेच दुसऱ्या गावाला गेले होते. आज इतक्या वर्षांनी देखील तिला त्या गावाबद्दल तेवढेच प्रेम होतं. त्याच गावात ती पहिल्यांदा सायकल सायकल होती, त्याच गावात पहिल्यांदा न्हाण आलं होतं, त्याच गावात स्वैपाक करायला शिकली होती, घट्ट मैत्रिणी जमवायला सुरुवात तिथेच झाली होती, आई बाबांशी वाद घालायला त्याच गावातून सुरु केलं होतं, शिकणं फक्त पुस्तकात नसतं तिथेच कळल होतं, अठरापगड जाती, त्यांचे सामाजिक जीवन प्रत्यक्ष बघायला मिळत होतं. शिक्षक हे शाळेच्या वेळेपुरते मर्यादित नसतात हे प्रत्यक्ष अनुभव होती. घरात केलेलं काहीही हे फक्त घरापुरत नसतं, ते शेजार पाजारच्या ओळखीच्या पाळखीच्या साऱ्यांमध्ये वाटायचं असतं. घरात काही नसलं तर खालच्या मानेनं नव्हे तर हक्कानं शेजारी मागायचं असतं, एक ना अनेक किती गोष्टी ती अनुभव होती, शिकत होती. त्यामुळे एकदम गाव बदललं तरी गावात शिकलेल्या गोष्टी विसरल्या गेल्या नव्हत्या, गावातून थेट आजी आजोबांच्या घरी जाण्याचा एक वेगळा आनंद होता. बाबा तर म्हणाले पण सगळं फिरून शेवटी इथंच आलो. बालपण गेलं त्या घरात परत राहायला जायचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे तर तिला तिचं बालपण गेलेल्या घराची अजूनच आठवण यायची. लहानपणी कधी तरी ती म्हणायची, आपण नं उडतं घर बनवलं पाहिजे म्हणजे आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे हे घर पण नेता नेईल.

प्रत्येक गावाची एक संस्कृती असते, तुमच्याही कळत नकळत तुम्ही त्याचा भाग बनत असता, तुम्ही ते गाव सोडा, नका सोडू पण ती संस्कृती कुठे तरी आत मध्ये टिकून असते. त्या गावाचं नाव काढलं तरी पुढचे कित्येक वर्ष तिच्या डोळ्यातून पाणी टिपकायच. त्या गावातला अल्लडपणा, बालीशपणा जणू तिनी त्या गावच्या वेशीतच ठेवला होता. गाव सोडलं आणि ती ही बदलली होती. लग्नानंतर तर देशच बदलला, त्यामुळे आसव गाळायला अजून कारण मिळाली होती, कधी तरी त्या गावात, देशात रुळून गेली, आपल्या माणसांची आठवण काढणं सवयीचं झालं, वर्षाकाठी एक मायदेशी ट्रीप काढून काही आठवड्यात कौटुंबिक, मैत्रीक नाती जोपासून परत जाताना पुढचे काही दिवस सगळ्यांनाच अवघड जायचे. परदेशातही काही गावं बदलून झाली, घरं तर इतकी बदलली की नंतर घरामध्ये जीव अडकवायचीच भीती वाटायची, असं वाटायचं, आपण घर सोडताना आपल्या आयुष्याचा एक भागच जणू तिथं सोडून जातोय असं वाटायचं. आपण म्हणजे आपण आज असतो तेवढेच नसतो ना, जिथं राहतो, ज्या लोकांबरोबर राहतो, वाढतो, चुकतो, शिकतो, ते सगळं असतं ना. एका दिवसाची गोष्ट नसते ही काही, त्यामुळेच जुन्या दिवसांची किंमत जास्त असते, प्रत्येक गावात घरात आपण आपल्या आयुष्याच्या काही सावल्या सोडलेल्या असतात. मग या गावाला, घराला विसरून कसं चालेल, तिथं विसरलेल्या सावल्यांना भेटलंच पाहिजे ना.  तिला परत त्या आयुष्यात जावसं वाटलं. 

मग एका भारतातल्या भेटीत तिनी मनाचा हिय्या केला आणि गावाला जाऊन घर बघायचं ठरवलं. खरतर असं कित्येक दिवसांत एकटीनं प्रवास केलेलाच तिला आठवत नव्हता. सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता तिनं एकटीनच जायचं ठरवलं होतं. खरंतर ते गाव माहेरच्या गावापासून जेमतेम ४ तासाच्या अंतरावर पण तरीही ते ४ तासांचे अंतर  कापायला तिला जवळ जवळ २० वर्ष लागली होती. आपण आपलं घर बघून येऊया ह्या विचारानं मनाचा ताबा घेतल्यापासून ती जणू झपाटूनच गेली होती, तिला या भारताच्या भेटीत ही बालपणाची भेट घ्यायचीच होती.
अगदी ठरवून तिनी कार नाकारली होती, जणू तिला तो सगळा काळ परत अनुभवायचा होता म्हणून तिला राज्य परिवहन मंडळाच्या गाडीतूनच जायचं होतं. लहानपण अनुभवायचा एक मार्ग असतो, तेव्हा जे जे केलं ते ते परत कोणाच्याही भितीशिवाय करणं. ती जेव्हा त्या बस मध्ये बसली तेव्हा तिला ती पिचकाऱ्यांनी रंगलेली, सीटमधला स्पंज बाहेर येणारी, खिडक्या अर्धवट उघडणारी गच्च भरलेली बस सुद्धा आरामदायक वाटायला लागली, तेव्हा तिला खरंच मधली वर्ष गळून पडल्यासारखी वाटली. अगदी सहजतेनं ती शेजारच्या आजीशी गप्पा मारायला लागली, थोडं सरकून घ्या म्हणत तिघांच्या जागेवर त्या तीन बायका आणि एक मुलगा असे साडे तीन जण आरामात सुखानी बसले होते. बाहेरचं काही खायचा मोह तिनी टाळला पण घरून आणलेलं डब्यातलं खाताना तिला पिक्चर ला सुद्धा डबा बांधून देणाऱ्या मैत्रिणीच्या आईची आठवण आली. सारंच काही बदललं होतं, रस्ते, रस्त्यावरची गावं, लोकं ही थोड्याफार प्रमाणात बदलले होतेच. ४० रुपयाच तिकीट १३० रुपये झालं होतं, पण तेव्हा जशी लोकं किती महाग आहे म्हणायचे तसंच आजही म्हणत होते. मोबाईलमुळे जगभर संवाद होत होता पण शेजारच्या माणसाकडे बघायला वेळ नव्हता. तिचीच माणसं ती जणू पुन्हा नव्यानं पाहत होती.

गावात उतरल्यावर कोणतीही ओळखीची खुण सापडेना तेव्हा तिला क्षणभर आपण एकटीनं येऊन चूक केली की काय वाटायला लागलं. पण वेड अंगावर स्वार असलं तर शरीर मन क्षमतेपेक्षा जास्त कामं पार पाडून दाखवतात. बस स्थानकापासून थोडं लांबच होतं त्याचं घर, गुगल वर तसा तिनी रस्ता सारं पाहून ठेवलं होतं. त्यावेळी गावाबाहेर असणारं त्याचं घर आता गावाच्या हद्दीत काय मध्यवर्ती वस्तीत आलं होतं. रिक्षानीच जावं म्हणत तिनी चेहेऱ्यावरचा गोंधळलेला भाव जरा पुसला, आणि चक्क एका रिक्षावाल्याशी भाव करत मी काही नवीन नाही हे दाखवून दिलं, तिच्याच वयाचा होता अतो रिक्षावाला, कोण जाणे कदाचित आपलाच एखादा वर्गमित्र असायचा, उगाच तिला योगायोगांचे योग यावेत वाटायला लागलं, इमारती उंच होत होत्या, मोठी मोठी दुकान येत होती, आणि जुनं गाव हरवत होतं. रस्त्यावरच्या एक दोन खुणा सोडल्या तर सारंच काही वेगळ होतं. तिला रिक्षावाल्याशी स्नावाद साधायचा मोह होत होता, कधी काही काही मोहांना शरण जाणं चांगल असतं, त्यामुळ तिलाही कळलं नाही कधी तिनी गप्पा मारायला सुरुवात केली. पूर्वी शहर म्हणाल्यावर एक अन्तर जाणवायचं, आणि गाव म्हणाल्यावर एक आपुलकी, आता प्रत्येक गावाला शहर बनायची घाई झालेली असल्यामुळं प्रत्येक जण जगायचं सोडून पळायचं शिकलाय. जेव्हा ती पत्त्यापाशी आली तेव्हा आळीतली दोन चार घर सोडली तर साऱ्या इमारतीच दिसत होत्या. त्या रिक्षावाल्याला तिथेच ५ मिनिटं थांबायला सांगून ती त्यांच्या घरापाशी गेली. साधं चार खोल्यांचं, आजूबाजूला बाग असलेलं घर त्याचं आता चांगल दुमजली झालं होतं, काळाबरोबर झाडही हरवली होती, इंच न इंच सिमेंट चं साम्राज्य दिसत होतं. एकदा आत जाऊन बघावं का? परत एकदा झालेल्या मोहावर विजय मिळवणं अशक्य आहे कळल्यावर तिनी बेधडकपणे दारात जाऊन आल्याची वर्दी दिली. खिडकीतून डोकावणाऱ्या आवाजाला सांगितलं, जरा दोन मिनिटं दरवाजा उघडता का, पूर्वी आम्ही इथं राहायचो, म्हणून खास घर बघायला आले मी. थांबा जरा, मग तो खिडकीतला आवाज आत जाऊन कोणाला काही तरी विचारून आला, दरवाजा जरा किलकिला झाला, परत एक प्रश्नतपासणी झाली, आणि मगच ती आत गेली, त्यांनी ज्यांना घर विकलं होतं, त्या लोकांकडून या लोकांनी १० वर्षापूर्वी घर विकत घेतलं होतं, त्यामुळे त्यांना ही जरा आगाव आगंतुकच वाटत होती. आपलच घर दुसऱ्या लोकांनी सजवल्यावर किती अपरिचित भासतं. पूर्वी फक्त रात्री बंद होणारी दारं आणि आताच्या दिवस रात्र बंद असणाऱ्या खिडक्या तिला आयुष्याचं प्रतिक वाटत होत्या. त्या अनोळखी माणसांच्यामध्ये सुद्धा तिला तिचं बालपण, तिच्या आठवणी साऱ्या दिसत होत्या, स्वतःलाच ती पुन्हा नव्यानं भेटत होती. निघताना तिचे डोळे परत भरून आले होते. ती रिक्षात बसता बसता, त्या घरात राहणारी मुलगी आली आणि शांत घर परत गजबजून गेलं होत जसं ती असताना व्हायचं तसंच.

परतीच्या प्रवासात डोळे बंद करून ती आठवत होती, विसरलेल्या आठवणी, शाळेचा गृहपाठ, फुलांच्या वेण्या, टिपऱ्या, लगोरीचा खेळ, शेजारच्या काकूंची घरून येणारी अळू वडी, आळीतला भोंडला, गणपतीमध्ये पहिल्यांदा केलेलं नाटकात काम, शेजारच्या ताईचा तिच्या मित्राला हळूच पोहोचवलेला निरोप, दिवाळीला केलेला मोठा किल्ला, नरकचतुर्दशीला पहिल्यांदा फटके फोडायची स्पर्धा, मागच्या घरातल्या काकांनी अंगचटीला यायचा केलेला प्रयत्न, त्यानंतर त्या घरी कधी गेलीच नाही ती. सायकल शिकताना फुटलेले गुडघे, दोन वेण्यांमध्ये दोन गजरे माळायचा वेड्चापपणा, चोरून आई काकूंच्या गप्पा ऐकून त्याचं केलेलं गॉसिप, भारत पाकिस्तान च्या सामन्याच्या वेळी केलेला कल्ला. आपणच जगलेलं आयुष्य ती परत एकदा जागून घेत होती, स्वतःच स्वतःला भेटत होती, गावामधली ती आणि आता जग फिरलेली ती या प्रवासातून आयुष्याचा एक सांधा जोडू पाहत होत्या. निसटलेलं निरागसपण मिळवू पाहत होती. विसरलेल्या सावल्यांना परत भेटत ती चालत होती.  इतके दिवस आरशात बघताना जाणवणारं एक अनोळखीपण पुसू पाहत होती!!!   

No comments:

Post a Comment