Sunday, September 25, 2016

आणि कपाट हसलं......

कपाट उघडल्याबरोबर कपडे खाली पडले की समजायचं कपाट लावण्याची वेळ आली आहे, मग काही दिवस चालढकल करून शेवटी तो दिवस उजाडतोच. आणि मग सगळ्या कपड्यांचा एका ढिगाऱ्यात आपण बसलेलो असतो. सारे आजू बाजूला पडलेले, कुर्ते, पंजाबी ड्रेसेस, जीन्स, लेगीन्स, स्कर्टस, नशिबानं साड्या वेगळ्या ठेवलेल्या असतात त्यामुळे त्या या सगळ्या गोंधळापासून दूर दुसऱ्या गोंधळात विसावलेल्या  असतात. जेव्हा आपण त्या कपड्यांच्या समुद्रात हरवलेले असतो, त्यावेळी अनेक नवीन नवीन शोध लागत असतात.

खरं तर कपडे ही माणसाची प्राथमिक गरज, पण आता कपडे, अन्नापेक्षाही स्वस्त झाल्यामुळे घरटी कपड्यांची दुकानं निघाली आहेत. पूर्वी कारणासाठी, सणावारी होणारी खरेदी आता सेल साठी, डिस्काऊंटसाठी होत असते. मग आपल्याला हवंय का पेक्षाही आत्ता मिळतंय, स्वस्त आहे, अगं ऑफर होती, परत परत काय अशी ऑफर नाही मिळणार , सणाला , वाढदिवसाला नवीन कपडे पाहिजेतच ना, एक कारणं, पण या कारणांची फळ निष्पत्ती म्हणजे कपाटात भर पडलेले नवीन कपडे. बर परत लग्न कार्य, भेटवस्तू म्हणून मिळालेलं कपड्यांचं वाण वेगळंच. आजकाल आहेर नसला तरी चालेल पण परतीचा आहेर झालाच पाहिजे, त्यामुळे अशा रिटर्न गिफ्ट मध्ये मिळालेले कपडे देखील बऱ्याच वेळा रीरिटर्न करायचेच असतात.

कपड्यांच्या त्या डोंगरातच अनेक दिवस सापडत नसलेलं कपडे सापडतात. आणि मग घडी घालता घालता आपण त्या कपड्यांच्या आठवणीत हरवून जात असतो. असं वाटत असतं जणू आपण आठवणींच्या प्रवासालाच निघालो आहोत. एक हिरव्या रंगाचा कुर्ता पहिल्या पगारातून दादानी आणलेला, आता थोडा विरलाय पण तरीही टाकवत नाही, अरे तो जांभळा बांधणीचा पंजाबी ड्रेस रूममेटच्या आईनी खास दिलेला, तिच्या आळशी मुलीला वर्षभर सांभाळले म्हणून, पांढऱ्या रंगाचा दोन तीन कुर्ते चुरगळलेले होते एका कोपऱ्यात, एकेका वेळेला आपल्याला वेड लागायचे एकेका रंगाचे, आणि मग आपण त्याच रंगाचे कपडे विकत घायायला सुरु करायचो,  सध्या जसं सध्या हिरव्या रंगाचं झालं आहे, त्याआधी निळा, त्याआधी किरमिजी, काळा असे किती तरी रंग आयुष्यात येऊन गेले होते. मग त्या रंगवेडाच्या वेळी घेतलेले एकाच रंगाचे पण वेगळ्या रंगछटांचे कुर्ते, मग त्याच कपड्यांच्या धबडग्यात तिनी त्यांची अजून काही बहिण भावंड शोधली, आणि सारी रंगावली एका बाजूला ठेवली. मग त्यातल्या प्रत्येकाच्या खरेदीच्या जन्माच्या आठवणींनी हसता हसता पुरेवाट झाली, एक कुठे अगदी फुटपाथवर घेतलेला, तर दुसरा फॅब इंडिया च्या वातानुकुलीत ठिकाणी घेतलेला, काही परदेशात घेतलेले तर काही घराजवळच्या छोटाशा दुकानात, पण बिचारे सगळे कपाटात शेजारी शेजारी सुखानं नांदत होते.

मग घड्या करत असताना एकदम घबाड लागल्यासारखं अगदी जुने कॉलेज मध्ये घालत असलेले काही कपडे मिळाले, आणि ती  तशीच उठून ते मापाला लावायला लागली, काही येत होते, काही वयाबरोबर अंगही सोडून गेले होते, मग न येणाऱ्या कपड्यांचा एक वेगळा कप्पा करायला सुरु केला.  एक भडक लाल रंगाचा आरसे लावलेला एक पंजाबी ड्रेस त्यानी अगदी प्रेमानी आणला होता, पण त्याच दिवशी त्यांचं काही तरी भांडण झालं होतं, त्यामुळे तो ड्रेस तिनी अंगाला देखील लावला नव्हता, आज तो ड्रेस हातात घेतल्यावर तिला त्यातली उब जाणवत होती. अशी अंगाची उब न लागलेलं कपड्डे तिनी पहिले वापरायचे ठरवलं. डोळ्यासमोर असणारे कपडे सारखेच वापरले जात होते, आणि मागे पडलेले कपडे, विस्मृतीत गेलेल्या लोकांसारखे मागेच पडत होते, त्या स्मृती परत जागवायच्या ठरवल्या. आयुष्य आणि कपडे असे हातात हात घालूनच जगतात, किमान माणसांच्या बाबतीत तरी.

एक जुना पिवळ्या रंगाचा ड्रेस पाहून तिला आठवलं, ह्या महागड्या ड्रेस वरून आईशी भांडण केलं होतं, कारण त्याच्या दोन दिवस आधीच एक ड्रेस घेतला होता, आणि आईचं म्हणणं होतं, असे सारखे सारखे पैसे कपड्यांवर काय उधळतेस, त्यावर माझे पैसे आहेत, मला करू देत ना हवे तसे खर्च म्हणत ती धुमसतच होती, आणि मग आईचा अबोला, मग माफीनामा, तिला खरंच वाटलं, तेव्हा तो ड्रेस खरच त्या मानाने महागच होता, आई म्हणाली, ते खरंही होतं, पण आई वडिलांचं म्हणणं पटायला कधी कधी वर्ष जाऊ द्यावी लागतात. मग एकदा अगदी शोधून शोधून घेतलेला चटणी रंगाचा चिकनचा ड्रेस, आणि मग त्याच प्रकारचे वेगवेगळे रंग गोळा करायचा जणू छंदच लागला होता, ते सारे लखनवी ड्रेस, कुर्ते एकत्र ठेवता ठेवता १० पेक्षा जास्त रंग आपल्या जवळ जमा झालेत, आणि आता पुढचे कोणते घेता येतील याचाच विचार मनात सुरु झाला होता.
आत्ता येणारे कपडे, आपले आवडते कपडे, घालता न येणारे पण तरीही आठवणी जपणारे कपडे, कडवट आठवणींचा माग ठेवणारे कपडे, जुने अंगाला न येणारे पण चांगले कपडे, खास प्रसंगांचे कपडे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कपडे नीट घड्या घालून झाल्यावर, कामवालीला द्यायचे कपडे वेगळे वेगळे काढता काढता, तिनी त्यात एक दोन चांगले कपडे देखील घातले, कायम थोडेसे, उसवलेले, फाटलेले, विरलेले कपडे द्यायचे आणि दान केल्याचा आव आणण्यापेक्षा यावेळी चांगले, नवीन कपडे देऊन तिच्याही चेहऱ्यावर हसू फुलवूयात असं तिला वाटलं. आणि मग तिनी फाटलेले, विरलेले कपडे वेगळेच ठेवले, यावेळी ते कोणाला देण्याऐवजी त्याची दुसरी काही तरी सोय लावावी, आणि काही तरी वेगळ्या आठवणी तयार कराव्यात दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात असं तिला प्रकर्षानं जाणवलं.

जेव्हा कपाटात सारे घालत्या येण्याजोगे कपडे लावून झाले, आठवणींचे कपडे वेगळे काढून झाले, द्यायचे कपडे वेगळे ठेवून झाले, तरी सुद्धा कपाट भरून कपडे दिसत होते, अगदी लिंबू रंगाचा, फिरोझी रंगाचा, जो एके काळी तिचा जीव की प्राण होता त्या रंगाचा एकही कुर्ता, ड्रेस नसला तरी तिला तो खरेदी करावा असं त्या क्षणी तरी वाटत नव्हतं, स्वस्त आहे, घेऊ शकतंय म्हणून काही घेण्यापेक्षा आपण खरच आपल्याला गरज आहे का बघून घेतलं तर आपलेच प्रश्न किती सोपे होतील, किमान हे कपड्यांचे कपाट लावणं म्हणजे मोठ्ठा पेचप्रसंग सोडवणं वाटणार नाही असा स्वतःलाच बजावत तिनी मोठा निःश्वास सोडला.


कपडे शरीर रक्षण करतात, कपड्यांनीच चारित्र्य ठरतं, कपड्यांनीच रामायण , महाभारत घडतं, काळ बदलला तसे कपडेही बदलले, कपड्यांची लांबी रुंदी ,नक्षी, पोत बदलले, नवीन नवीन जे काही येऊ शकत होत ते सगळं कपड्यांच्या दुनियेत येतच असतं, आणि त्या सृष्टीचा पसाऱ्यातला एक छोटासा भाग असतो प्रत्येकाच्या कपाटात! कपडे येतात, जातात, वापरलेले कपडे, न वापरलेले कपडे, आवडते कपडे, नावडते कपडे, खास कपडे, कंटाळा आलेले कपडे, आठवणींचे कपडे, विरलेले कपडे जग कपड्यात लपेटून गेलेलं असतं तरी कपड्यांचं कपाट उघडल्या बरोबर आज काय घालावं? माझ्याकडे आज घालायला काहीच नाही ? हा प्रश्न मात्र आदिकाळापासून तसाच राहिलेला आहे!!!!!!!   

No comments:

Post a Comment