Tuesday, May 22, 2018

पत्र १


प्रिय,
आज अचानक इतकी आठवण आली तुझी की काही सुचेनासं झालं, मन उगाच ओढ घेत राहिलं जुन्याच आठवणींकडे. मन पण कसं खुळं असतं ना, सुतावरून स्वर्ग गाठतं. कुठलातरी एक छोटासा बिंदू आणि मग त्यावरून आठवणींची मालिका एखादा चेंडू उतारावर घरंगळत जावा तशी समोर जात राहते. आता यात एकामागोमाग येणाऱ्या दोन आठवणींचा सबंध असेलच असे नसतं. कधी कधी तर काळ वेळेचं गणित सुध्दा या आठवणी धुडकावून टाकतात. पिंगा घालत राहतात, फेर धरतात, जोवर आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांना आंजारत गोंजारत नाही तोवर त्या काही हलत नाहीत.

बहुदा कॉलेज मधलं दुसरं वर्ष होतं, पहिल्याची नवलाई ओसरली होती, नवीन कंपू जमले होते, सगळ्याच गोष्टींचा थोडाफार अंदाज यायला लागला होता. राहत्या जागेपेक्षा कॉलेज जास्त आवडायला लागलं होतं, कॉलेजमधून पाय निघायचा नाही. कोणता कोपरा कोणाचा, कोणत्या झाडामागे कोण बसले असेल किती वाजता कोण कुठे असू शकेल याचे सगळेच अंदाज खरे ठरायला लागले होते. मास्तर लोकांचेही पाणी कळलं होतं. त्यामुळे तर कॉलेज जास्त आपलंसं वाटत होतं. शिक्षण काय वर्गात, पुस्तकात, बाहेर, जगात मिळतच असतं. परीक्षेच्या काही दिवस आधी वाचून पाट्या टाकून बरे मार्क्स मिळवता येतात हे ही नव्याने कळलं होतंच.  घाबरायचं कोणतही कारण नसतानाही तुला बघितलं की मात्र भीती वाटायची.

तुला बघून वाटायची भीती हे मी कधीच कोणालाही सांगू शकले नाही. तू देखणा, मुडी, हुशार, बोलका गडी. सतत काहीतरी करत राहणारा. तुझ्या आसपास पोरींचाच काय पोरांचाही राबता कमी नसायचा, तुझा खाली पडणारा उःश्वास सुद्धा झेलायला पोरीबाळी तयार असायच्या. तुझ्या गालावरच्या त्या खळीने किती जणींना घायाळ केले होती याची गणतीच नव्हती. तशी मी तुमच्याच ग्रुप मध्ये विसावलेली, पण तरीही तुझ्याशी अंतर राखून ठेवलेली. मी अशी का याचे कारण कोणी विचारू नये म्हणून इतकी धडपडायचे, कारण मला तू आवडतोस हे तेव्हा मला स्वतःशीसुध्दा मान्य करायचे नव्हते, त्यामुळे ते तोंडावर सुध्दा आणायचे नव्हते.

अशातच त्यादिवशी चहाची तल्लफ आली म्हणून मी कॅन्टीन मध्ये येऊन बसलेली होते, एकदम सुरु झालेल्या पावसाच्या सरीत एकटीच शून्यात नजर लावत चहा पीत बसले होते. मला आजही असे एकटीने बसून चहा प्यायला आवडते, स्वतःलाच स्वतःची कंपनी देत घोट घोट चहा पिणं ही आजही माझी सुखाची परमावधी आहे. त्यादिवशी पण मी अशीच बसलेली असताना तुझा आवाज ऐकू आला आणि माझी समाधी भंगली. कोपऱ्यात बसून तू सिमॉन द बुआचं पुस्तक वाचत होतास हे आजही आठवतंय, मला आजही त्या बाईचे नाव घेता येत नाही,आणि तू मात्र अगदी तल्लीन होऊन पुस्तक वाचत होतास, आवडलेलं वाक्य मोठ्यानं बोलायची तुझी सवय तेव्हा मला पहिल्यांदा कळली. मी सहज उठून तुझ्या टेबलवर येऊन बसले. तू पुस्तकाची शेवटची पाने अगदी आधाशासारखी संपवत होतास, तुझ्या डोळ्याची बुब्बुळ, हात, चेहऱ्यावरचे हावभाव सगळे सगळे टिपत होते मी. पहिल्यांदा आणि शेवटचेच मी तुला अशी बघत होते. तूच हात डोळ्यासमोर फिरवून मला जगात ओढून आणलेस, तू बुआबद्दल काहीतरी बोलत होतास, आणि मी तुझ्याबद्दल काहीतरी विचार करत होते. तू तेव्हा खूप काय काय बोलला होतास, मात्र त्यातलं एक वाक्य तेवढं लक्षात राहिलं होतं  माझ्या.

दुपारी पाऊस कोसळत होता, नवऱ्याने, पोराने विस्कटवलेल घर मी परत जागेवर आणत होते. रोजच्याच सवयीच्या गोष्टी करत होते. चाकोरी पाळत गेली तर त्याच चाकोरीत अडकून पडता येतं. सरावाने चाकोरीची सवय होऊन जाते. तक्रारच उरत नाही. आयुष्य कसं साच्याच होऊन जातं. नवीन काही तयार होत नाही आणि त्यामुळे उद्धवस्त होण्याची भीती सुद्धा राहत नाही. तरीही दुपारी पाऊस ऐकताना, चहा पिताना तंद्री लागताना तुझी आठवण आली. marriage almost always destroys women. हे तू सांगितलेले वाक्य तेवढं आजही डोक्यात फिट्ट आहे. तू आवडू नयेस म्हणून तुझ्याशी बोलणं टाळणारी मी, तुझ्या प्रेमात पडेन म्हणून कॉलेज बदलणारी मी, सगळ्यापासून लांब पळू शकले, पण या वाक्यापासून नाही. स्वतःला उद्धवस्त होताना बघणं ही सुध्दा एक मजा आहे, ते मी तुलाच सांगू शकले असते, तूच ती समजून घेऊ शकतोस, म्हणून आज तुझी अशक्य आठवण आली.

जिथे कुठे असशील, उचक्या थांबत नसतील तर सिमॉन द बुआचंच नाव घे, माझं नाव कदाचित  तुला आठवणारच नाही, मी मात्र तुमच्या दोघांची नावं घेत आयुष्य चहाच्या घुटक्यासारखं संपवत राहीन. ‘

©मानसी होळेहोन्नुर

No comments:

Post a Comment