Wednesday, May 9, 2018

चहाबाज , कॉफीकर की इतर काहीही ???


तुम्ही चहा घेणार की कॉफी? या एका प्रश्नाने जगात तीन वर्ग तयार होतात, चहा कॉफी आणि इतर काही. मुळात जगभरात कुठेही गेलात तरी आदरातिथ्य करताना हा प्रश्न समोर येतोच. अनेक जण तुम्ही काय निवडता यावरून तुमची पहिली परीक्षा सुरु करतात. काही जण तर म्हणे त्यावरून भविष्य सुद्धा वर्तवतात. एक मात्र आहे चहा कॉफी वरून स्वभावाचा अंदाज लावता येतो आणि जो चक्क बरोबरही निघू शकतो. 
चहावाले जमात म्हणजे काळा, हिरवा, पिवळा, केशरी, पांढरा अशा कोणत्याही रंगाचे पाणी असलेला द्रव पदार्थ आवडणारे अशी जगाची व्याख्या आहे भारतात मात्र ही जमात थोडी बदलते, आणि एकाच रंगाशी इमान राखते. चहा भारतात हंड्रेड शेड्स ऑफ ब्राऊन म्हणून ओळखला जातो. मुळचा भारताचा नसून भारतात एकरूप पावलेल्या बटाट्याप्रमाणे चहाही इथल्या मातीत माणसांमध्ये मिसळून गेला आहे. गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, उत्तर प्रदेश-केरळ असे अनेक भेद केवळ एक कप चहा वर मिटवले जातात. आता अस्सल चहाबाज दिवसातून कितीही आणि कसाही चहा पिऊ शकतो. चहा लाईट आहे, चहा पातळ आहे, चहा गोड बासुंदी आहे अशा कोणत्याही सबबी तो देत नाही. पण त्याचबरोबर चहाचे असेही काही दर्दी असतात जे चहाच्या कंपनीशी इमान साधून असतात. म्हणजे मग त्यांना ब्रूक बॉंडचा चहा टाटा टी पेक्षा कमी कडक वाटतो. पण हे ब्रँड प्रेम कॉफीकरांमध्ये पराकोटीचे असते. चहा वाले कुरकुर करत का होईना पण समोर येईल तो चहा पितात.
चहा पिणाऱ्यांमध्ये चहा कसेही कधीही पिणारे अट्टल चहाबाज असतात, त्यांच्याकडे कायम चहा पिण्यासाठीचे कारण तयार असतं. त्यांना कितीही चहा प्यायला तरी त्रास होत नाही, उलट शरीरातलं चहाचं प्रमाण कमी झालं तर त्यांना टीडिप्रेशन होतं. याच पंथातले काही लोकं असेही असतात ज्यांना दिवसातून ठराविक वेळा चहा मिळाला नाही तर हायपो’टी’सिस होतो. काही चहाबाज असेही असतात ज्यांचं क्वॉन्टीटीपेक्षा क्वालिटीवर जास्त प्रेम असतं. अशा लोकांना चहा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनेच लागतो. मग काहींना उकळलेला घट्ट, तर काहींना बासुंदीचा, काहींना मसाल्याचा, काहीना लाईट तर काहींना स्ट्राँग लागतो. व्यक्तिगणिक चहाची पध्दत आणि चहाची चव बदलत जाते पण तरीही चहाचे प्रेम कमी होत नसतं.
चहा पोहयावर लग्न ठरतात, मंत्रीमंडळ बनतात, पडतात, लोकं एकत्र येतात, नवीन ओळखी होतात, एवढंच काय चाय पे चर्चा करत देशाचा पंतप्रधान सुध्दा या चहामुळे ठरला जातो. चहामुळे त्रास होतो हे चहा न पिणारे लोकंच म्हणतात, हे लोकं म्हणजे कॉफी पिणारे किंवा इतर काही वाले. जसे चहा पिणारे चहाबाज असतात तसे कॉफी पिणारे कॉफीकर असतात. कॉफी हा जरा पैसेवाल्यांचा शौक. चहा कसा दुध असलं, नसलं तरी चालत. कॉफीचे मात्र तसे नाही.
कॉफी हे तासे साधं सुध प्रकरण नाही, घरंदाज नजाकतीची गोष्ट आहे ती. त्यामुळेच की काय कॉफी पिणारा हा स्वतःला या सगळ्या उतरंडीत सगळ्यात वरती ठेवून बघत असतो. कॉफी ही जेवढी प्यायची गोष्ट आहे तेवढीच ती अनुभवायची गोष्ट आहे. कॉफी उकळताना तिचा जो घमघमाट पसरतो त्यानेच कॉफीकराला नशा चढायला लागते. भारतामध्ये खास करून दक्षिण भारतात कॉफीला ज्या काही मायेच्या हातांनी या पेल्यातून त्या पेल्यात फिरवतात, की कॉफीलाही भरून येतं आणि ती पेल्याच्या काठोकाठ येते. बाकीच्या भारतात इंस्टट कॉफीला मान असतो, तर दक्षिणेत कॉफीलाही डिग्री असते. जसा अनेक घरांमध्ये एखादी परंपरा असते, तशी अनेक घरांमध्ये कॉफीच्या प्रमाणाची, ताज्या दळून आणलेल्या कॉफी पावडरची, ठराविक दुकानाची परंपरा असते. घरातल्या एखाद्या माणसाप्रमाणे कॉफीचे भांड, पावडरचा डबा यांचा मान असतो. इंस्टट कॉफी या सुरु झाल्या ते रात्रीच्या जागरणांना सोबत करण्यासाठी, गप्पा रंगवत हॉटेलमध्ये अड्डा जमवण्यासाठी. कॉफीचे भक्त कॉफीसाठी काहीही करतील असे काही नाही नसतं. कॉफीचे मग रिचवत काम करणारे अनेक असतात, कॉफी ही तशी आब राखून असणारी असल्यामुळे तिला उगाच ग्रीन टी, लेमन टी सारखे फाटे फोडले जात नाहीत, कॉफीसाठी कॉफी पावडरही आवश्यकच असते. अगदी डीकॅफे पिणारे सुद्धा कॉफीसदृश्य, आणि सुवासाची पावडर घालूनच कॉफी करतात. जगभर जरी हिची मिजास जास्त असली, तरी भारतीय मनावर खरी भुरळ आहे ती चहाचीच.
जर तुम्ही इतर काही गटातले असाल म्हणजे दुध, किंवा काहीच न पिणारे तर तुम्हाला सतत तुमच्या अल्पसंख्याक असल्याची जाणीव करून दिली जात असते. मुळात इतर काही पिणारेसुध्दा अनेकदा छुपे चहाबाज किंवा कॉफीकर असतातच. फक्त त्यांना ठरवता येत नसतं आपण कोणत्या बाजूने जायचे म्हणून ते मधला मार्ग धरून असतात.
चीनमधून आलेल्या चहाने भारतात मूळ धरलं, आफ्रिकेतल्या कॉफीने जगभर हात पाय पसरवले, चहा असो वा कॉफी किंवा इतर काही संवादासाठी शब्दांबरोबर हे ही आवश्यकच आहेत. दररोज चहा प्यायल्याने अमके होते, तमके होते, कॉफीचे दुष्परिणाम , असे हजारो निष्कर्ष येत राहतात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत विसरलेही जातात. कारण चहा असो, व कॉफी किंवा इतर काही माणसांना जोवर बोलण्याचे , संवादाचे एक कारण देत आहेत तोवर आचंद्रसूर्य या जगतावर चहा आणि कॉफी अनभिषिक्त साम्राज्य करतच राहणार कारण च हाच काफी आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी.    

©मानसी होळेहोन्नुर
पूर्व प्रसिद्धी : झी दिशा 

No comments:

Post a Comment