Wednesday, July 11, 2018

ती आणि त्या ७


ती
अजून लग्न झाले नाही तर हा हाल आहे, लग्न झाल्यावर काय होईल कोणास ठाऊक. तरी बरे संकेत बाहेर असतो, म्हणजे रोज तोंडाला तोंड लागणार नाही. आता माझे लग्न आहे, तेव्हा मी मला काय आवडेल ते घ्यायला हवे की यांना आवडते ते? साड्या प्रकरण मला फारसे आवडतनाही आणि झेपतही नाही. आता झेपत नाही म्हणून आवडत नाही की मुळातच आवडत नाही मला माहित नाही. मुळात खरेदीला मला फक्त संकेत हवा होता, पण या त्याला घट्ट चिटकून आल्याच. उगाच खोटे खोटे हसत मी अरे वाः बरे झाले तुम्ही पण आलात म्हणले पण मनात मात्र तुम्ही कशाला असेच होते.
आता आल्या तर आल्या, स्वतःची, स्वतःच्या बहिणीची साडी निवडून शांत बसावे ना, पण नाही सतत मी माझे. यांच्या लग्नाची गोष्ट मी गेल्या चार महिन्यात पाच वेळा ऐकली आहे. त्यांच्या लग्नातून झालेली एकमेव चांगली गोष्ट म्हणजे संकेत. तसा त्याचा लहान भाऊ बरा आहे बाबा पण ठीक आहेत पण ही बाई माझ्या अगदी डोक्यात जाते. कधी कधी वाटते  कशाला हो म्हणाले या मुलाला. लग्न ठरल्यापासून जवळपास रोज फोन. बरे आता २ मिनिटांपेक्षा जास्त काय बोलणार मी, कशी आहे, काय खाल्ले यापेक्षा तिसरे वाक्य काय बोलायचे या बाईशी कळत नाही मला, पण ही मला तिच्या आयुष्याची कथा सांगणार, लेकाला काय आवडते, नवऱ्याला काय आवडते ते सांगणार, मग आमच्या घरात कसं हे मुळीच चालत नाही आवरा... कधी कधी तर घरी असताना फोन आला की मी सरळ आईकडेच देऊन टाकते, तिचा आणि माझा आवाज सारखाच आहे, मग नंतर आई आई बनून पण त्यांच्याशी गप्पा मारते. मला गप्पा मारायला आवडत नाही असे नाही, पण कोणाशी काय बोलावे हे माझ्या भावी सासू बाईंना कळत नाही त्याचा जास्त त्रास होतो.
आता मला आवडलेली साडी २५००० ची होती, बरं ही साडी आमच्याच कडची होती, तरी त्यांचे लगेच सुरु झाले, अग तू काही फार साड्या नेसत नाही मग कशाला इतकी महाग मोलाची साडी घेतेस, जरा कमीचीच घे की, पैशावरून बोलणे झाले की, रंगावर . तू गोरी तुला गडद रंग छान दिसेल, हा फारच हिरवट आहे, हे कॉम्बिनेशन संकेतला आवडत नाही, हो ना रे? बिचारे लेकरू सँडविच होऊन बसले होते. मग शेवटी मी त्याला मेसेज केला, आणि त्याच्या तोंडून मला आवडलेली साडी छान आहे हे वदवून घेतले तेव्हा सासुबाईंचा चेहरा पाहणे लायक होता, न राहवून त्य बोलून पण गेल्या, तूच म्हणतोस ना लाल रंग तुला आवडत नाही, त्याने काहीतरी कारण देऊन बोळवण केली.
आता माझे लग्न आहे, माझी आवड हौस मौज मला महत्वाची वाटणारच ना, एकदाच होणारी ही गोष्ट केले थोडे फार पैसे खर्च तर काय बिघडते. यांच्या आवडीच्या साड्या मी माझ्या लग्नासाठी का घेऊ? माझ्या लग्नासाठी अर्थात मी माझ्या आवडीच्याच साड्या घेणार, भले त्या मी नंतर घालेन की नाही, तो वेगळा प्रश्न असेल.


त्या
संकेत चे लग्न ठरले आणि  मलाच टेन्शन आले. तसे ते दोघेही बाहेरच राहतील, वर्ष दोन वर्षांनी काही दिवसांसाठी येतील पण तरीही घरात एक नवीन माणूस येणार म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलणारच ना.
मी घरातली मोठी सून त्यामुळे माझ्या सासुबाईंनी मला अक्षरशः प्रत्येक गोष्टीला तयार केली होती. लग्नानंतर साधा वरण भाताचा स्वैपाक यायचा मला, पण आता मात्र चारीठाव स्वैपाक करून वाढते. मला आपली लेकीची हौस होती, पण दोन्ही पोरगेच झाले, तेव्हाच ठरवले सुनेला अगदी मुलीसारखे वागवायचे. त्यामुळे संकेतचे लग्न ठरवताना पण मी मला आवडलेल्या मुलीच फक्त संकेत पर्यंत पोहोचवत होते, त्यातल्या त्यात ही स्नेहा मला हसरी छान वाटली होती, दोघांची पसंती झाली आणि मलाच जास्त आनंद झाला.
मग काय लग्नाच्या आधीच मी तिला जरा जरा आमच्या सगळ्यांच्या बद्दल माहिती दिली, म्हणजे नंतर तिला काही जड जायला नको. आमच्या घरातल्या लोकांच्या सवयी तिला माहिती असल्या तर तिला ही लोकं आपलीशी करायला मदत होईल म्हणून. ही बोलते फोनवर पण का कोणास ठाऊक बाई माझ्यासारखी मोकळी होऊन बोलत नाही. आमच्या सासूबाईंपुढे बोलायची आमची टाप नव्हती आता मीच स्वतःहून हिच्याशी बोलतीये तरी ही मोकळी होत नाही. या पोरींचा प्रॉब्लेम काय आहे कळत नाही.
आता साडी खरेदीची गोष्ट, संकेतला बोलावले तिने, त्याला काय कळते त्यातले, म्हणून मग मीच म्हणाले मी पण येते तुझ्याबरोबर. तर मला बघून एकदम म्हणाली, ‘तुम्ही पण’. सरप्राईझ ग, तसेही या ठोम्ब्याला काही कळत नाही साड्यामधले म्हणून मीच आले. आमच्या  नेहेमीच्या दुकानात जाऊ म्हणले तर तिने आधीच दुकान ठरवले होते, त्या दुकानातल्या साड्या जरा महाग होत्या, सांगीतले मी तिला तर लगेच चेहरा पाडून म्हणाली, लग्न एकदाच होते हो, झाला थोडा खर्च तर चालेल ना. आता ही फारशी काय साड्याच नेसत नाही मग कशाला घ्यायच्या महागमोलाच्या साड्या, पण नाही हौसेला मोल नाही म्हणतात तेच खरे, रंग तर काय उचलत होती, एक पण साडी आम्हाला दोघींना आवडत नव्हती, मला आवडली तर हिला नाही, आणि तिला आवडली तर मला नाही. शेवटी एका साडीवर संकेत म्हणाला, मस्त आहे घेऊन टाक. आणि मी माझ्या पोराकडे बघत राहिले, लाल रंग कधीच न आवडणारा माझा लेक, बायकोला चक्क लाल रंगाची हिरव्या काठाची साडी मस्त दिसेल तुला म्हणत होता.
लग्नानंतर मुले बदलतात बघितले होते, पण हा तर लग्नाआधीच बदलला होता. बरे आहे हे दोघे लग्नानंतर बाहेर असतील म्हणजे मला हे असे धक्के रोज रोज बसणार नाहीत, अधून मधून बसतील.
मानसी होळेहोन्नुर   

1 comment: