Wednesday, July 4, 2018

वळणाचे पाणी


सहावी अ च्या वर्गातल्या चिमण्या नुसत्या चिव चिव करत होत्या. हा वर्ग आख्ख्या शाळेत बडबडा म्हणून प्रसिद्ध होता. हर प्रकारे या वर्गाला समजावून, धमकावून, शिक्षा देऊन झाले होते. पण तरीही चिवचिवाट मस्ती काही कमी व्हायची नाही. त्यामुळे सगळे जुने अनुभवी शिक्षक त्यांचा अनुभव पणाला लावून हा वर्ग सांभाळायचे. अति हुशार मुलांचे पाणी जरा नीट वळवायची गरज होती.  

वर्गात कोणी शिक्षक यायला दोन मिनिटांचा उशीर झाला की संपले या चिमण्या आणि चिमणे बडबड करायला लागलेच म्हणून समजायचे.
‘अग आपल्या मराठीच्या पाटील बाई आता येणार नाहीत.’
‘त्यांना बाळ होणार आहे ना? मला माझ्या ताईने सांगितले’
‘मग आता आपल्याला मराठी कोण शिकवणार? काळे सर? नको बाबा. ते शिकवतात कमी ओरडतात जास्त.’
‘नाही नाही एक नवीन बाई येणार आहेत.  एकदम छान आहेत दिसायला, डिट्टो माधुरी, केस पण तसेच कुरळे आहेत. ‘
‘तुला कसे हे सगळे कळते ग?’
‘अग मी काल स्टाफ रूम मध्ये गेले होते तर तीच चर्चा चालली होती आपल्या बाकीच्या बाईमध्ये म्हणून मला कळले.’
एक चिमण्यांचा थवा त्यांच्या आकाशात विहरत होता.
‘अरे तू कालची मॅच पाहिलीस ना? अजय जाडेजा काय भारी खेळला ना?’
‘छोड रे चुकून काल चांगला खेळला तो, माझा दादा म्हणतो तो वशिल्याचे तट्टू आहे, पण म्हणजे काय ते मला कळलेच नाही.’
‘कोणी आले नाहीये वर्गावर तोवर चल विमान करू, कोणाचे लांब जाते बघू?’
‘ज्याचे लांब त्याला एक पेप्सीकोला मधल्या सुट्टीत.’
‘चालेल.’
चिमणेसुध्दा चिवचिवाट मागे नव्हते.
ठप ठप एकदम वर्गात डस्टर मारायचा आवाज आला.
जेमतेम २२, २३च्या आसपास असलेल वय,  उंच, कुरळ्या केसांची, साडी नव्हे तर चक्क पंजाबी ड्रेस घातलेली एक बाई वर्गावर येऊन थांबलेली होती, एक हलका मंद वास सुद्धा होता त्यांच्या येण्याबरोबर वर्गात पसरला होता.  

सगळा वर्ग एकदम फळ्याकडे बघायला लागला होता. त्याचबरोबर त्यांच्या टेबलवर त्यांचे स्वागत करणारे एक विमान पण.
‘मी उर्मिला तुमची नवीन मराठी टीचर. आणि हो मला हे विमान आवडले, ज्या कोणी केले आहे तो मला प्लीज शिकवेल का हे कसे करायचे’
तोवर शाळेत फक्त बाई आणि सर म्हणायचे असते, फार तर फार शिक्षक असे संबोधन होते, आणि यांनी आल्या आल्याच टीचर सांगितले. मस्ती करणाऱ्या मुलाला शिक्षा वगैरे सोडून विनंती हे पाणीच वेगळे होते.  

रंग गव्हाळ आणि गोराचा मधला होता, केस खरेच माधुरीसारखे कुरळे होते, डोळे अगदी मोठ्ठे पाणीदार होते, की काजळ लावून मोठे केले होते कोणास ठाऊक. हिरवा कुर्ता आणि गुलाबी रंगाची सलवार आणि ओढणी घेतली होती. ओढणी छान पिन अप केलेली होती. हसताना एका गालावर खळी पडायची. शाळेत तोवर सुंदर दिसणाऱ्या शिक्षिका नव्हत्या असे नाही पण त्या सगळ्या साडीमध्ये येणाऱ्या आई काकू टाईप वाटायच्या, या टीचर मात्र मोठी ताई असल्यासारख्या वाटल्या.  आवाज सुध्दा अगदी नाजूक पण गरजेच्या वेळी जोरात व्हायचा.
‘अय्या किती छान आहेत ना या बाई दिसायला.’
चिमण्यांची कुजबुज सुरु झाली.
‘अरे ही माधुरी दीक्षित तर चिडलीच नाही, उलट मला विमान शिकवा म्हणाली, आता काय करायचे.’
चिमणे काही मागे नव्हते.
बाईंनी कुठलीशी कविता शिकवायला सुरुवात केली, त्यांच्या आवाजात चालीवर म्हणताना वर्गातला प्रत्येक जण अगदी गुंगून गेला होता.  या आधी कोणी अशी चाळीत कविता शिकवली नव्हती असे नाही पण वयाचा, आवाजाचा की आणखीन कशाचा माहीत नाही पण वर्ग पूर्णपणे त्या नव्या शिक्षिकेला शरण गेला होता एवढे नक्की. धडे म्हणजे गोष्टीच असतात फक्त ते गोष्टी सारखे वाचून दाखवावे लागतात. आपली भाषा आपल्या ओळखीची असते पण त्यातले साहित्य नाही ही गोष्ट नव्याने समोर येत होती.

मराठी शिकवणाऱ्या या मॅमला चक्क इतिहास शिकवायला सुध्दा सांगीतले, आणि मुले खुश झाली या अजून एका विषयाला येणार म्हणून आणि बाकीचे शिक्षक आता यांचा इतिहास कसा करतात मुले बघू म्हणून खुश. पण इतिहास हा काही फक्त सन सनावळ्यामध्ये नसतो तो घटनांमध्ये असतो हेच त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि अनेकांचा इतिहास आवडता विषय झाला.

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात विश्वास, आदर याशिवाय मैत्रीचे ही नाते तयार होत होते. त्यांच्याशी गट्टी होऊन एका चिमणीने तर त्यांना चक्क तिची स्लॅम बुकच भरायला दिली त्यांना. त्यांनी पण तिचा मान राखत त्यातल्या बोबड्या बालिश प्रश्नांची उत्तरे दिली. मराठी हा विषय इतका रंजक असू शकतो हे सगळेच जण नव्याने शिकत होते. उर्मिला मॅम हो, त्यांना बाई म्हणून कसे चालेल, त्या मॉडर्न मॅम होत्या, शाळेत पंजाबी ड्रेस , गॉगल लावून येणाऱ्या सेंट मारून येणाऱ्या मॅम.

एक धरणग्रस्तांची कविता शिकवता शिकवता त्या त्यात इतक्या गुंगून गेल्या की वर्गातल्या सगळ्यांचे डोळे पाणावले. आजवर धरण म्हणजे मजा वाटणाऱ्या सगळ्यांना धरणाची खोली, त्याचे पायाचे दगड बोचले होते. अशाच एका फ्री पिरेडला त्यांनी त्यांची कविता म्हणून दाखवली आणि वर्गातल्या एका चिमणीने जाऊन त्यांना थेट विचारले, ,’ कविता कशी करतात?’
त्यावर त्यांनी हसून उत्तर दिले, ‘ मनात जे येतं ते कागदावर उतरवायचं,  कधी शब्द जुळून येतात तर कधी भावना व्यक्त होतात. लिहायची उर्मी सच्ची असेल तर त्याची कविता, कथा नक्कीच होते. आणि हो महत्वाचे म्हणजे स्वतःसाठी लिहायचं. शब्द म्हणजे दुसरे तिसरे काही नसतात आपलेच सखे सोबती असतात, त्यांच्याबरोबर बोलायला , खेळायला ,भांडायला यायले लागले की बास.’
ज्या शिक्षिकेच्या जागी त्या आल्या होत्या त्या शिक्षिका परत आल्या. शाळेत तात्पुरते आलेलं हे वादळ पण गेलं. पण जाताना काही चांगल्या आठवणी ठेवून गेलं.

नुसते एक अडलेलं पाणी त्यांनी वाहते केले होते असे नाही तर  ४०, ४५ जणांची एक तुकडी त्यांनी वळणावर आणून ठेवली होती. मुला मुलींच्या कोणत्याही प्रश्नांना नाही, नको चा पाढा न लावता त्यांनी उत्तरे दिली होती. शिक्षक कसे शिकवतात, किती वर्ष शिकवतात, यापेक्षा काय शिकवतात हे नेहेमीच लक्षात राहते. तो वर्ग, ती चिमणी त्या वळणावरून इतके पुढे गेले, की मागचे सारेंच धूसर झाले. आठवणी राहिल्या पण त्याही धुक्यात विरलेल्या. कदाचित ती चिमणी मीच असेन किंवा नसेन, कदाचित माझ्याच आयुष्यात असेच काही घडल असेल किंवा नसेलही. पण लिहायची उर्मी सच्ची असेल तर त्याचे साहित्य होते एवढे मात्र नक्की. 
  
मानसी होळेहोन्नुर

No comments:

Post a Comment