Wednesday, July 18, 2018

नहप्र, सप्र, अप्र

सार्वजनिक ठिकाणी बसून आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करणे ही म्हणलं तर एक कला आहे, म्हणले तर मनोरंजनाची संधी आहे. विमानतळावर बोर्डिंग पास घेणाऱ्यांमध्ये ओळखपत्र, तिकीटाची प्रिंट हातात घेऊन रांगेच्या पुढे पुढे वेगाने सरकू पाहणारे लोक हे साधारण उशिरा तरी आलेले असतात की नवहवाईप्रवासी तरी असतात. वेब चेक इन करून येणारे हे सराईत प्रवासी असतात. तर हे विमान माझ्यासाठी थांबेलच, मग मी दारे बंद करायच्या अर्धा मिनिट आधी जाऊन पोहोचलो तरी चालेल अशा आविर्भावात असणारे लोक हे अट्टल प्रवासी असतात.
नहप्र हे विमानतळावर त्यांच्या तिकीटावर लिहिलंय त्यापेक्षा अर्धा एक तास आधीच येतात. आपले सगळे सामान वजनमापात आहे ना हे दोन दोनदा बघतात. यांच्याकडे तिकिटाच्या दोन प्रती असतात. एक हरवली तर दुसरी असावी म्हणून. मी विमानाने प्रवास करतोय याचा एक जाज्वल्य अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर असतो. काऊटरवर ते साधारणपणे जरा विंडो सीट वगैरे मागतात. निर्धारित वेळेच्या तास दीड तास आधीच ते त्यांच्या गेटवर जाऊन बसतात. मग तिथेच असलेले एखादे वर्तमानपत्र किवा त्यांनी आणलेलं पुस्तक वाचायला घेत ते दर पाच मिनिटांनी आजूबाजूला नजर टाकत असतात. मध्येच एखादा फेरफटका विमानतळावरच्या दुकानामध्ये मारतात पण तिथल्या किंमती पाहून नकोच म्हणत परत त्यांच्या गेटवर येऊन बसतात. यांना शक्यतो नवीन लोकांशी बोलण्यात रस असतो. नवीन ओळखी काढायच्या असतात, त्यामुळे कोणाच्याही हातातले बोर्डिंग कार्डवरचा सीट नंबर शोधायच्या ते कायम प्रयत्नात असतात. जर हे नहप्र सहकुटुंब प्रवास करत असतील तर मात्र हे विमानतळ माझे घर या आवेशांत त्यांचे वागणे बोलणे चालले असते. विमानात गेल्यावरही आपण पैसे भरून तिकीट घेतले आहे त्यामुळे हे आपले खासगी विमान आहे अशी यांची उगाचच समजूत असते.
सप्र हे आठवड्यातले जास्त तास विमान प्रवासात किंवा विमानतळावर घालवत असल्याकारणामुळे त्यांना विमानतळांची माहिती तिथल्या कर्मचाऱ्याएवढीच असते. सिक्युरिटीचेक मध्ये तेच त्या कर्मचाऱ्याला बघून हसून विचारतात काल वेगळी ड्युटी होती का? त्यांचे हॉटेल्स, खाण्याचे/ पिण्याचे पदार्थ ठरलेले असतात, त्यामुळे अनेकदा त्यांना बघूनच तिथली लोकं बिल टाईप करायला घेतात. हे लोक कधीही चार्जिंग पॉईंट शोधत नाही कारण यांच्याकडे त्यांची पॉवर बँक नेहेमीच असते. विमानतळावर सुध्दा ते त्यांचे लॅपटॉप उघडून काम करत असतात. किंवा फोनवर कोणाशी तरी गंभीर चर्चा करत असतात. विमान किती मिनिट आधी उडते, आपण किती मिनिट आधी काउंटरवर असले पाहिजे याची त्यांची गणिते पक्की असतात, त्यामुळे त्यांचे विमान कधी चुकत नाही आणि वेळही वाया जात नाही. यांच्याकडे लाउंज अक्सेस असल्यामुळे हे शक्यतोवर बाहेरच्या जनतेत मिसळत नाहीत.
अप्र ही जमात पूर्णपणे वेगळीच असते, यात तुमचा अनुभव किती आहे यापेक्षा तुम्ही तुमचा अनुभव किती भासवू शकता हे दाखवणे जास्त महत्वाचे असते. म्हणजे  आपली बॅग २० किलोची आहे हे माहीत असले तरी काउंटरवर जाऊन वजन बघताना अरे यात हे ५ किलोचे सामान कोणी घातले असा भाव आणणे, जड सामानाचे पैसे देण्यास घासाघीस करणे. दोन चार एक्स्ट्राचे टॅग उचलणे. बोर्डिंग पास घेऊन जोवर आपल्या नावाची घोषणा होत नाही तोवर तिथल्याच एखाद्या दुकानात निवांत फिरणे असे अनेक प्रकार करतात. आपल्याला विमान प्रवासाचा अनुभव आहे आणि आपण कसे अनेक विमानतळावरची कॉफी प्यायलो आहोत हे त्यांच्या चेहऱ्यावरून ओघळत असते. त्यातही जर त्यांना एखादा बकरा मिळाला हे ऐकायला तर मग त्यांचा उत्साह कॉफीच्या फेसासारखं बाहेर सांडत असतो. आजवर त्यांची काही विमाने सायलेंट विमानतळावर चुकली असतात, आणि त्याबाबत त्यांनी फेबुवर, ट्विटर वर लिहलंही असते पण तरीही या प्रवासातही विमानात चढणाऱ्या शेवटच्या प्रवाशांपैकी ते एक असतात.
तसे बघायला गेले तर विमानतळ म्हणजे मेल्टिंग पॉट असतात, त्यांना काही स्वतःची ओळख संस्कृती नसते, त्यांना ओळख मिळत असते ती तिथे येणाऱ्या विमानांमुळे आणि प्रवाशांमुळे, अनेक नानाविध प्रकारचे लोक येतात जातात, विमानतळावर घटना घडतात, बिघडतात, ओळखी नव्याने होतात, नाती जुळतात, तुटतात, प्रवाशी कोणत्याही प्रकारचे असले तरी प्रवास महत्वाचा असतो. प्रवासाचे ठिकाण कधीच कायमस्वरूपी नसते, कारण आलेला प्रत्येकजण जाणार असतो, पण आपण तो येणे  आणि जाणे या मधला प्रवास कसा करतो यावर सगळा आनंद ठरलेला असतो. नहप्र, सप्र, अप्र हे तुमच्या आमच्यातच असतात. त्या सगळ्यांना माहीत असते, हा प्रवास आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने तो प्रवास केला पाहिजे, जर सगळ्यांनी एक सारखाच प्रवास केला तर माणसे आणि रोबोट यात काय फरक राहील.
मानसी होळेहोन्नूर 

No comments:

Post a Comment