Sunday, July 31, 2016

इनसाईड आऊट

त्या शाळेतला पहिलाच दिवस होता, बाबांच्या या अशा सारख्या बदल्यांना खरच ती आता कंटाळली होती. तसे बाबा ही बदली रद्द करायचा प्रयत्न करत होते, पण तसे काही झालं नाही, ती ८ वीत होती, बदलीचे शहर आधीच्या गावापेक्षा मोठं होतं जिल्ह्याचं गाव होतं, आजीचे गाव पण तिकडून तासभराच्या अंतरावर होतं, त्यामुळे हो नाही करता करता त्या गावात जायचं ठरलं. मग बँकेतल्याच लोकांच्या सल्ल्यानी घर आणि शाळा ठरवून टाकली. इकडचं घर अगदी मोकळं ढाकळ होतं, पुढे अंगण, मागे झाडं, जवळपास पाच, सहा वर्ष वर्ष कशी गेली कळलंच नव्हतं. त्या वर्षात ती, तिची बहिण झाडावर चढायला शिकल्या, पोहायला शिकल्याहोत्या कैऱ्या, चिंचा पाडण्यात तरबेज झाल्या होत्या. त्या गावात त्यांना खरा भारत, लोकं बघायला मिळत होती, शेती कशी करतात हे टीव्ही वर किंवा पुस्तकात वाचायची गरजच पडली नव्हती. निसर्गाचं शिक्षण घेत होत्या त्या. शाळेत पहिला नंबर तिचा ठरलेला होता, मग ती परीक्षा असो व स्पर्धा, पण मैदानावर मात्र ती खूप काही शिकत स्पर्धेच्या बाहेरच होती, ते सगळं तिला आवडत होतं, न आणि ण च्या शुद्ध भाषेच्या गुंत्यात न पडणारी मैत्री तिला खुणावत होती, कोणाच्याही घरून येणाऱ्या वासाबरोबर वानोळा ही यायचा, घराचा स्वैपाक फक्त एका घरापुरता नाही तर शेजार पाजारच्या साऱ्यांसाठी असायचा, हे ती बघत होती. आयुष्य शिकत होती. रात्रीचे दिवे, असो नसो, माणसं मात्र हाक मारल्यासरशी धावून येतात हे पाहत होती. आणि तिकडून एकदम काडेपेटीसारख्या बिल्डींगमध्ये राहायला गेल्यावर तिला रडूच कोसळलं. ह्या अशा घरात राहायचं? रांगोळी काढायला जागा नाही, फुलांसाठी जागा नाही. आपण परत आपल्या जुन्या घरी जाऊ, तिनी आणि तिच्या बहिणीनी एकच घोष लावला होता. तिथल्या मैत्रिणींची नावं काढत काढत रात्र कशी तरी काढली. सकाळी बाबांना तिनी जाऊन सांगितलं, तुम्ही सगळे रहा इथे, मी त्या गावात राहते माझ्या मैत्रिणीच्या घरी. आई नवीन घर लावता लावता आधीच वैतागली होती, तिला तिनी एक धपाटा घातला आणी परत तिच्या कामाला गेली. त्याच दिवशी तिच्या शाळेचा पहिला दिवस होता, नकोच वाटतं होतं सगळ. बाबांनी जवळ घेतलं, आणी समजावलं काहीतरी, मग म्हणाले, चाल एक चक्कर मारून येऊ स्कूटर वर. आणि मग तिला एका दुकानात नेऊन छान पेन, कंपास बॉक्स घेऊन दिला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आतापर्यंत झिरपत नव्हतं.
शाळेची मोठी इमारत बघूनच तिला दडपायला झालं, आपला वर्ग कसा ओळखायचा? शाळा घराजवळ होती म्हणून किमान रस्त्यात हरवायची तरी भीती नव्हती. कशी बशी विचारत शोधात ती वर्गात पोहोचली, आपल्यापेक्षा चटपटीत मुलं, मुली पाहून ती अजूनच बुजली, तशीच खाली मान घालून जो बाक रिकामा दिसला तिथं जाऊन बसली,  कोणी विचारलं तर जेम तेम पुटपुटत्या स्वरात नाव सांगायची. शिक्षकांपैकी काहींनी तिची दखल घेतली काहींनी विचारलंही नाही, तशीही शाळा सुरु होऊन दोन आठवडे झाले होतेच. तिला जुन्या शाळेची बचकभर आठवण आली, दुपारी एकटीच बसून डबा खाताना तिला भयंकर रडू कोसळत होतं. उत्तर माहीत असूनही द्यायचं नाही असा तिनी चंगच बांधला होता, कोणत्याही गोष्टीत भाग घ्यायचा नाही, विचारल्याशिवाय बोलायची नाही, इतर कोणाशी मैत्री तर बिलकुल नाहीच नाही, ती जशी नव्हती तशी ती व्हायचा प्रयत्न करत होती. उगाचच चिडत होती, आधी किती छान गायची इथे गाण्याच्या क्लास ला जायला पण नाही म्हणाली. छोट्या छोट्या गोष्टीवरून हिचं वाद घालणं, आईचे रागावणं, मग चिडणं, त्यावर उतारा म्हणून हिचं रडणं हा त्यांच्या घरातला रोजचाच कार्यक्रम होत चालला होता. बाबा मध्ये पडून सावरू बघत होते पण ती काही बधायला तयार नव्हती. तेरा, चौदा वर्षाच्या तिच्या वर्गातल्या मुली कशा छान केसांचे भंग पाडायच्या, शाम्पू, पिना, पावडर अशा कशाबद्दल बोलायच्या, पण तिला ते काही माहिती ही नव्हतं आणि त्याबद्दल बोलावसं वाटायचंही नाही. तिच्या लांब वेण्या नको वाटायच्या, गायला नको वाटायचं, सगळ्या जगावर रागवावस वाटायचं.
मग कधी तरी एका मोकळ्या तासाला त्या बाई त्यांच्या वर्गावर आल्या, त्या म्हणे मोठ्या वर्गाना शिकवायच्या. खांद्यापर्यंत रुळतील असे मोकळे सोडलेले कुरळे केस, त्यावर दोन छोट्या पिना, एका पिनेत गजरा माळलेला, आकाशी रंगाची साडी घट्ट चोपून बसवलेली, कपाळावर छोटीशी चंद्रकोर लावलेली. आणि तोंडभर हसू.  तिला त्यांच्याकडे बघतच बसावसं वाटलं. का कोणास ठाऊक तिला त्यांच्याशी नाळ जुळल्यासारखी वाटली. त्या दिवशी त्यांनी वर्गात कविता सांगायला सुरुवात केली, आणि तिच्याही न नकळत तिचा हात वर गेला,जवळ जवळ महिना दीड महिन्यांनी तिला वर्गात काही तरी बोलावसं वाटलं. या नव्या बाई शेतकऱ्यांची कैफियत सांगत होत्या कविता, कथा, अनुभव सारे अनुभव देत होत्या, तिनी एकदम हात वर करून बाई मी काही बोलू का?
आख्ख्या वर्गानं मागं वळून पाहिलं ही आता काय बोलणार, बाई इतक्या छान सांगताहेत आणी आता हिचं काय मधेच, सारा वर्ग तिला शिष्टाम्बिका म्हणायचा. बाईनी तिला बोलायला सांगितलं, मग ती त्यांचे आधीच गाव, तिथल्या मैत्रिणी, त्या कशा शेतात काम करायच्या, त्यांच्या वडिलांना कसा कधीच नीट मोबदला मिळायचा नाही, मग वर्गातल्या एका मुलीच्या वडिलांनी केलेली आत्महत्या, हे सगळं सांगताना तिचा सगळा बांध फुटला. आणि मग ती रडतच खाली बसली, बाईं तिच्यापर्यंत आल्या आणि त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला, त्या स्पर्शामुळे तिला अजूनच आश्वस्त वाटत होतं. त्या दिवशी पहिल्यांदा तिला मोकळ वाटलं. मग हळू हळू सगळंच गाड रस्त्यावर आलं, ३, ४ दिवसात कधी तरी तिला पहिलं न्हाण देखील आलं. आणि मग सगळाच गुंता सुटल्यासारखं वाटलं. ती गायला लागली होती, मैत्रिणी जमवायला लागली होती, कोशातून फुलपाखरासारखी बाहेर पडली होती.  हे गाव, घर , ही शाळा सगळं तिला आवडायला लागलं होतं.
खूप वर्षांनी मुलीसोबत इनसाईड आउट पिक्चर बघताना तिला वाटलं अरे ही तर माझीच गोष्ट आहे, यांना कशी कळली. मीच तर आहे ती मधेच हसणं, खुश होणं विसरलेली मुलगी. मीच तर होते ना अशी सगळ्या भावनांचा गुंताडा करून जगावर रुसलेली मुलगी. आउटसाईड काहीही असलं तरी इन सगळं एकच असतं, सगळ्यांची गोष्ट येऊन जाऊन एकच असते.
तुकाराम म्हणतात तेच खरं आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरू कोटी कोटी, परि अंती ब्रह्म एकले... !!!!!!



संदर्भ : इनसाईड आऊट 
https://en.wikipedia.org/wiki/Inside_Out_(2015_film)
     

No comments:

Post a Comment