Sunday, August 7, 2016

सहवेल



अनोळखी शहर, अनोळखी देश आणि आपण तिथे जाऊन भुतासारखं राहायचं. लेकीची अडचण नसती तर चुकुनही इकडे कधी आलो नसतो, फिरायला जाणं गोष्ट वेगळी, आणि हे असे काही महिन्यांसाठी राहायला येणं गोष्ट वेगळी. तसे इथं सारे काही मशिनाधारित. आयुष्याचेच एक मशीन होऊन जाते, त्यात वीकचा, विकेंड चा, लॉंग वीकेंडचा असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात . सगळ्यांचे जगणं एका साच्यातल्या गणपती सारखं वाटतं मला... काहींचा रंग वेगळा, कुठे उंदीर पिटुकला, कुठे उंदीर डावीकडे, कधी सोंड मध्ये कधी सोंड उजविअकडे, कधी हातात मोदक कधी लाडू बाकी हात पाय, भाव तोच. लेकीला सगळा अनुभव आहेच इथं राहण्याचा, तशी ती पहिलटकरीण त्यामुळे थोडे घाबरेल असा हिचा अंदाज, तर लेकीचं म्हणणं अग मी इथं क्लासेस ला जाऊन आलीये, मला माहिती आहे सगळं. मग आईपणातून आलेल्या अनुभवातून तिनी तिच्या हो ला हो म्हणलं.
३८ आठवड्यापर्यंत लेक जाणार होती कामाला. तशी ती अगदी आधी नाही पण तारखेच्या ३ आठवडे आधी आली होती. मग डोहाळजेवणाचा सोहळा देखील पार पडला. लेकीच्या नजरेत आई किती करतेस असं कौतुक तर हिच्या नजरेत बाई ग आई होणार तू याचं कौतुक. जावई कायम भलाच होता, असतो आणि राहणार, त्याच्या होणाऱ्या कौतुकाची आता त्यालाही सवय झाली होती. आईशी सतत भांडणारी मुलगी आता आईचं थोडं ऐकायला लागली पाहून तिला मनातल्या मनात हसायला यायचं. म्हणजे आपण रूढी परंपरा म्हणून सांगायचं आणि तिनी पहिले हच्या काहीही तुझं म्हणत ते मोडून काढायच मग इंटरनेटवर बघत त्यातलं विज्ञान, कारण समजून आपल्यालाच सांगायचं सगळं कसं शिस्तीत चाललं होतं. बाप आला नाही म्हणून रुसवे फुगवे काढून झाले, पण आई आल्याचं आनंदाला कर्तव्याची झाक होती.  
अगदी मनाला हज्जारदा समजावलं होतं तोंडातून कुठलाही शब्द काढायचा नाही, त्यांचे, घर, त्याचं मूल, त्याचं आयुष्य आहे. आपण फक्त काळजीवाहू! लहानपणापासून आपण कित्ती प्रयत्न केला होता, हिला समजून घ्यायचा. आपल्या आईनी जे केलं नाही ते आपण करायचा प्रयत्न केला होता. पण ही बया कायम बाबा एके बाबा. तिच्यासाठी सगळं आपण केलं तरी बाबा ची टेप कधी थांबायची नाही. सुरुवातीला वाटणारं कौतुक, नंतर त्रागा झालं, पण तिला त्याच्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. वयात येताना आपण अगदी जवळ घेऊन सगळं समजावलं तर हिनी खांद्यावर हात ठेवून, अग मला माहित आहे हे सगळं सांगून आपला सगळा फुगा फुस्स करून टाकला होता. शहाणी झाल्यावर, हो आई हाच शब्द वापरायची, त्यामुळे कधी आपण शहाणी होतोय असं वाटायचं तेव्हा, त्यानंतर तरी ही बाबा पार्टी सोडून आई पार्टी मधे येईल असं वाटलं होतं, पण तेव्हा तिला मैत्रिणी मिळाल्या होत्या.
पुस्तकं, सिनेमे पाहून तिला कायम त्यातल्या सारखी मैत्रीण आई व्हावंसं वाटायचं, पण मैत्रीण व्हायचा प्रयत्न करतानाही आई मध्ये मध्ये लुडबुड करायचीच, म्हणजे मग एखाद्या मुलाचे नाव ३, ४ दा आलं की त्याचा सगळा इतिहास विचारून व्हायचा, उशीर होणार म्हणल्यावर किती वाजतील, कोणाकडे, मध्येच एखादा चुकून लागलेला फोन यायचा, जरा चांगला कपडे केले तर का, केले आणि जरा गबाळा वेश असला की अग हे काय, प्रेमभंग झालाय का? तिच्यातली मैत्रीण किती वेळा भांडायची तिच्यातल्या आईशी, पण या सगळ्याचाच परिणाम एकच बाबा+मैत्र पार्टी नंबर १, आई पार्टी नंबर २. कॉलेज ला गेल्यावर , नोकरी करायला लागल्यावर तर आई पार्टी अजूनच रसातळाला जात होती. लग्नाच्या नुसत्या विषयानीदेखील फोन कट केला जायचा, मग एक दिवशी बाबा कडूनच आईला होणाऱ्या जावयाबद्दल कळाल. आईला वाईट वाटलं आपण पण आपल्या आई सारखंच झालो की काय, कडक, शिस्तीच्या! लेकीनं घाबरून आपल्याला न सांगता बाबाला आधी सांगावं?आईचं मन जरा खट्टूच झालं.आधी नाही पण किमान सोबत बसवून तरी सांगायचं होतं तिनी लेकीला कधीतरी खंत बोलून दाखवली. त्यावर ती फक्त हसली, हात हातात घेऊन म्हणाली, असं काही नाही गं, घरी आल्यावर बाबा पहिले दिसला म्हणून मी आधी त्याला सांगितलं. जावई मात्र लाखात एक शोधून काढला तिनं लेकीपेक्षा जास्त गुळपीठ जमायचं त्याच्याशी. आता निवांत वेळ असताना तिला जाणवत होत्या तिच्या आणि तिच्या आईच्या आयुष्यातलं सारखेपणतिच्या बाबांशी काही मैत्री नव्हती पण आईपेक्षा कांकणभर प्रेम बापावर जास्त केलं गेलं होतं. पोरींनी पण बरोबर तोच जनुक उचलला होता.
शेवटच्या दिवशी कामाला जातानाच लेकीचा चेहरा जरा मलूल वाटत होता, पोटही उतरलेलं दिसत होतं. पण कामावर जायचा तिचा हट्ट होता, शेवटी तोडगा म्हणून ती म्हणाली, मी पण येते तुझ्यासोबत, मी जवळपास च्या बागेत नाहीतर कुठेतरी बसून राहेन , मला काय इथं बसायच्या ऐवजी तिथं बसेन. हो नाही करता करता तयार झाली. आईपणाच्या म्हणून काही खास खुणा असतात, जोडलेल्या नाळेच्या काही खुणा अजूनही उदरात असतात, त्या सुप्तपणे जाणीव करून देत असतात लेकरांच्या खुशालीची. कसाबसा तिनी शेवटचा दिवस ढकलला, आणि खाली आल्याबरोबर आईला सांगितलं, आपण सरळ हॉस्पिटलमध्ये जाऊ. नवऱ्यालाही तिकडचं यायला सांगितलं.  
रस्त्यात आईनी तिचा, की तिनी आईचा हात घट्ट धरला होता कोणास ठाऊक. मग पुढचे काळ कळा सोसण्यात गेले. आईपणाच्या दारात पाउल टाकताना मात्र तिला तिच्या हक्काच्या मित्राची सोबत हवी होती. ती पिटुकली बाहुली घेऊन जावई बाहेर आला तेव्हा तिच्या अश्रुनी तिनी त्या बाळाला तीट लावली. पण ती आसुसली होती लेकीला भेटायला. हाच क्षण होता परत एकदा मैत्रीचा धागा बांधायचा, श्रांतलेल्या लेकीचा हात हातात घेऊन तिनी शब्दात मांडता न येणारं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचवलं होतं. आईपणाच्या धाग्यात दोघी आता गुंफल्या गेल्या होत्या. त्या धाग्यातला मैत्रीचा पदर आता तरी लेकीला कळावा म्हणून ओळखीचं जग सोडून धडपडत ती आली होती या अनोळखी लोकांमध्ये! आपल्याच पोटच्या गोळ्याला न कळलेली आपली मैत्री दाखवून द्यायला.

बाळंतपण नेटानी सुरु होतं, आजी नातीचं खास जग बसत होतं, लेकीशी मैत्री होता होता, नातीशी सह्वेल मात्र आपोआपच साधली जात होती. लेकही आईच्या भूमिकेत गेली होती आणि आता आईतली मैत्रीण तिला नव्यानं उलगडत होती. मैत्री ला वय नसतं, नातं नसतं, भाषा नसते, अपेक्षा नसतात, मैत्रीत नेहमीच सगळं आलबेल नसतं, मैत्रीत फक्त गोडवा नसतो, असं खूप सगळं नसूनही खूप काही असतं, सगळं काही असतं तेच बहुदा मैत्री असावं...!!!!

4 comments:

  1. Awesome Manasi,
    Easily one of the best..

    ReplyDelete
  2. Simply great Manasi....mast lihilayas

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद... पण मला तुमचं नाव नाही कळल...

      Delete
  3. Simply great Manasi....mast lihilayas

    ReplyDelete