Wednesday, August 31, 2016

नाळेचा प्रवास



लग्नासाठी अटी सांगताना तिनी स्पष्ट सांगितलं होतं, "मला एकाच गावतलं सासर नकोय!" आईला न सांगता कारण कळलं, पण बाबांना मात्र सांगूनही ते कारण पटत नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की लेक लांब नको, रोज बघता आलं पाहिजे. पण मुलीच्या हट्टापुढे ते ही शेवटी हो म्हणाले. अगदी, फोटो, पत्रिका, चहा-पोहे सारं काही साग्रसंगीत होऊन लग्न ठरलं. तो अगदी बाहेरच्या देशातला नाही, पण जरा पलीकडच्या पलीकडचा राज्यातला... भाषा त्यांचीच बोलणारा, पण जिथं जन्मला तिथला धागा जोडून ठेवलेला होता.
लग्नानंतर गावच नव्हे तर भाषा, संस्कृती बदलली होती. सुरुवातीच्या दिवसांत किती तरी वेळा असे प्रसंग आले, की तिला खरंच वाटलं, आपण घेतलेला हा निर्णय बरोबर होता ना...? आई वडिलांपासून, आपल्या गावापासून लांब राहणं, खरंच गरजेचं होतं का? ज्या ज्या वेळी हा विचार मनात यायचा तेव्हा लहानपणचा एक प्रसंग आठवायचा आणि ती स्वतःलाच समजवायची, 'नाही नाही... आपण जे केलंय ते बरोबरच आहे.'

तिचं आजोळ गावातच होतं. एक मामा, एक मावशी - त्याच गावात, एक आत्या, ती देखील त्याच गावात दिलेली होती. आत्या कधी निवांत राहायला यायची नाही, आणि तशीच आई पण आजीकडे कधी राहायला अशी जायची नाही. भेटणंसुद्धा अगदी ठरवून व्हायचं. मोकळा वेळ आहे, म्हणून उभ्या उभ्या भेटून जायची आई आजी आजोबांकडे; तसंच आत्याचं होतं. प्रत्येक घरात असतात तशा कुरबुरी त्यांच्या घरातही होत्या, पण म्हणून काही घरातल्या भांड्याला भांडं लागून त्यांचा ऑर्केस्ट्रा झाला नव्हता. सगळ्यांनी आपापल्या पदराखाली सारं काही झाकून ठेवलं होतं. आताशा पदरच नसतात, त्यामुळे नात्यातले काटे उघड झालेत इतकंच.
ती पाचवी-सहावीत असताना, कधीतरी अगदी ठरवून आई आजीकडे आणि आत्या आमच्या घरी राहायला गेल्या होत्या. दुपारचा स्वैपाक करून दोघी आपापल्या माहेरी गेल्या होत्या. पण नेमकं त्या दिवशी आत्याचा नवऱ्याचा छोटासा अपघात झाला आणि ती तिच्या घरी परत गेली आणि आई आमच्या घरी. आईला इकडची आजी काही म्हणाली नसती, पण जबाबदारी ओळखून तिची तीच धावली. त्यानंतर आत्यानी कधी तोंडातून शब्द काढला नाही आणि आईनी पण ! तिच्या मैत्रिणी माहेरपणाला आल्या की महिना-महिना राहून जायच्या, तेव्हा एखादी रेष हलायची, पण नंतर तर तिला ते ही सवयीचं झालं होतं. पुढे पुढे आईलाही वाईट वाटेनासं झालं होतं; सवयीचं झालं होतं. बाकीच्यांसारखं तिला वर्ष-वर्ष आईच्या हातचं खायला काही थांबावं लागायचं नाही. एखाद्या दिवशी स्वैपाकाचा कंटाळा यायचा आणि बरोबर त्या दिवशी सांगितल्यासारखा आईकडून डबा यायचा. गर्भात जुळलेली नाळ तुटली तरी गर्भात असतेच ना!

कधीतरी अशीच तिची एक शाळूती(शाळूसोबती?) खूप वर्षांनी भेटायला आली होती. जाताना ती तिच्या आईला सोबत घेऊन जाणार होती. आईला काही आठवडे स्वत:कडे ठेवून घेऊन तिचं माहेरपण करणार होती. खूप उत्साहानं ती सांगत होती, तिच्या आईनी कसं घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून माहेर तुटलं, मग सासरी सगळं चांगल होतं, सगळं व्यवस्थित झालं, पण तरीही आयतेपणाचं सुख कित्येक वर्षांत मिळालं नाही. एखाद दुसरा दिवस आराम मिळाला, पण त्यातही एक अपराधी भाव, गंड असायचा - अरे बापरे! आपण बसून खातोय. आईच्या  मैत्रिणीनी तिच्या आईला माहेरपणाला घेऊन जाणार म्हणाल्यावर आई पटकन बोलून गेली, "खरंच गं, मी कधी असा विचारच केला नव्हता." आणि मग एकदम खाली बघत डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली, "मला पण आवडेल हं असं करायला, पण बाकीचे काय म्हणतील.??" ती मैत्रीण जरा जगाला फाट्यावरच मारणारी होती... तीच काय, तिचं आख्खं घरच तसं होतं, त्यामुळे असं काही तिलाच सुचू शकत होतं. "तू काय बाई झाशीची राणीच आहेस, असं तूच करू शकतेस" म्हणत आईनी तो विषय तिथेच थांबवला, पण पुढचे काही दिवस प्रत्येक मैत्रिणीला ती हे अगदी आठवणीनं सांगायची.

लग्न होऊन घरात रुळेपर्यंत, माणसं कळेपर्यंत ५, ६ महिने गेले. मग काय सण, सुरु झाले, मग आईकडे काही ना काही निघत राहिलं, गडबडीत दोन वर्षं निघून गेली, मग चिमुकला जीव त्यांच्या आयुष्यात आला, आईपण आत्ता कुठं नीट समजायला लागलं होतं. तेव्हा नोकरीमुळे आईनीच तिच्याकडं येऊन बाळंतपण केलं होतं. आई होता होता अपेक्षा आणि प्रत्यक्ष या तारेवरच्या सर्कशीची मजा कळायला लागली होती. आई राहून गेली होती, पण आई म्हणून; 'लेक' म्हणून नाही. रुखरुख सलत होती तिच्या मनात.
मग कधीतरी जेव्हा तो सल खूपच डाचायला लागला, तेव्हा तिनी सरळ आईला फोन केला आणि सांगितलं 'सामान भर आणि माझ्याकडं ये. घरच्या सगळ्यांना मी सांगितलंय, तुझी तिकीट पण पाठवलीत, आणि हो तू एकटीच येतीयेस, बाबा मागाहून येतील.' आईला खरं तर कानकोंड होत होतं, लग्नानंतर अशी ती फारशी एकटी कुठं गेलीच नव्हती. लग्नाला गेली तर सोबत कोणी न कोणी असायचंच. उगाच लेकीचा हट्ट, आपल्याला जमेल की नाही, तिला रडायला येत होतं, पण कुठेतरी आत जीव सुखावला होता, असं कोणीतरी तिच्यासाठी खास काहीतरी करत होतं.

आई आली, त्या क्षणी तिनी आईला बजावून सांगितलं, "आई हे लेकीचं घर नाही, तर तुझं माहेर आहे! आजपासून तू निघेपर्यंत मी तुला सारं काही हातात देणार... तू मला देतेस तसं! तुला जेव्हा जे करायचं आहे ते तू कर. कोण काय म्हणतील, याचा बाऊ आता तरी करू नकोस. इतकी वर्षं मनात दाबून ठेवलेलं सगळं करून घे! जगून घे!" आणि मग शब्दाला जागत, तिनी आईला स्वैपाक घरात पाऊल टाकू दिलं नाही, खरेदीला नेऊन जीन्स घेऊन दिली, रस्त्यावरची पाणीपुरी स्पर्धा लावत खाल्ली, रात्री जागून पिक्चर बघितले. कॉलेजच्या मुली जे जे करतात ते ते सगळं करून पाहिलं.  मग तिनी सवाष्ण म्हणून आईला गरम गरम पुरणपोळी खायला घातली, त्या क्षणी तिला आईच्या जागी खरच एक छोटी दोन वेण्या घातलेली मुलगी दिसली. त्या दिवशी न जेवताच तिचं पोट भरलं होतं.

लेक व्हावी म्हणून आईनी नवस बोलला नव्हता, पण पहिला लेक झाल्यावर ती हिरमुसली होती, दुसरी लेक झाली तेव्हा आई खऱ्या अर्थानं खुश झाली होती. आज त्याच लेकीकडे माहेरपण घेताना तिला आयुष्य जगल्यासारखं वाटलं, लेकीलाच कळू शकतं आणि जमू शकतं, अशी गर्भात तुटलेली नाळ अशी परत जुळवून देणं; आईपणाचा उलटा प्रवास घडवून आणणं !!!!!


No comments:

Post a Comment