Thursday, April 11, 2019

पृथ्वी प्रदक्षिणा १


शेड्स ऑफ ग्रे
केस हा स्त्रियांचाच नव्हे तर पुरुषांचादेखील ‘सॉफ्ट कॉर्नर’ समजला जातो. त्यातही आपल्याकडे काळेभोर लांबसडक केस अद्यापही सौंदर्याचे मापक समजले जाते आणि पांढरे केस तर वृद्धपणाचे लक्षण समजले जाते. त्यामुळे केस पांढरे व्हायला लागल्याबरोबर हेअर डाय लावणे हे समाजसंमत समजले जाते. बाजारात रोज नवीन डाय येतो; पण हे काही फक्त आपल्या समाजाचे चित्र नाही, इंग्लंडमध्येसुद्धा हीच परिस्थिती आहे. फक्त तिथे थोडा बदल बघायला मिळत आहे. मागच्या वर्षी केलेल्या एका पाहणीत आढळले की, िपटरेस्टवरती ‘गोइंग ग्रे’ हा सर्च करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल ८९७ टक्क्यांची वाढ झाली होती. नैसर्गिकरीत्या केसांना पिकू द्यावे, उगाच त्यांच्या पांढरे होण्याच्या प्रक्रियेत डायचा अडसर घालू नये, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आपण स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारले तर त्याचा परिणाम आपलाच आत्मविश्वास वाढण्यात होतो, असे अनेक मानसशास्त्रज्ञांचे मत आहे. त्यातही पांढरे केस न दाखवण्याची जबरदस्ती ही स्त्रियांवर जास्त असते. पुरुष त्याच्या काळ्यापांढऱ्या केसांमध्ये जास्त ‘सेक्सी’ दिसतो, मात्र त्याच वयाची स्त्री काळ्यापांढऱ्या केसांमध्ये ‘ऑड वुमन आऊट’ दिसते, असा सामाजिक प्रवाद मानला जातो; पण आता या प्रवादालाच अनेक जणी मोडून काढत आहेत.
सारा हॅरिस या प्रख्यात ‘व्होग’ मासिकाच्या उपसंपादिकेने एक पोस्ट लिहून ते केस पांढरेच का ठेवत आहे हे सोशल मीडियावर टाकले होते. आज काही मॉडेल्सदेखील त्यांचे पांढरे केस अभिमानाने मिरवत आहेत. आम्ही जे आहोत ते आहोत, ते का लपवावे, असा सूर लावणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत आहे. सौंदर्याच्या नव्या परिभाषा येत आहेत. काळ्या दगडावरची पांढरी रेष उठून दिसते तसेच सॉल्ट अँड पेपर मस्त दिसतात, मग ते पुरुष असोत की स्त्रिया!
इथिओपियाची तंत्रज्ञ
बिटेलहेम डेसी ही इथिओपिया मधली अवघी १९ वर्षांची मुलगी आहे. इथिओपिया म्हणल्यावर कदाचित ती एखादी धावपटू नाही तर तत्सम खेळाडू असावी असा जर तुमचा अंदाज असेल तर तो साफ चुकीचा आहे. ही तरुणी चच्रेत आहे ते वेगळ्याच कारणाने. इथिओपियामधली ‘आयसीएलओजी’ या रोबोटिक लॅबोरेटरीमध्ये ती को-ऑर्डिनेटर म्हणून काम करते. अगदी सर्वसाधारण घरात जन्मलेल्या डेसीच्या नावावर चार सॉफ्टवेअर प्रोग्रामचे कॉपीराइट आहेत.
यातील एक तर मोबाइल अ‍ॅपचे आहे. या अ‍ॅपचा उपयोग इथिओपिअन सरकार नद्यांच्या पाणी व्यवस्थापनासाठी करते. या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? तर डेसी ९ वर्षांची असल्यापासून. तिच्या नवव्या वाढदिवसाच्या आधी तिच्या वडिलांनी तिला सांगितले की, तिला वाढदिवसाला काही घेऊन देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. तेव्हा डेसीने तिच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचा वापर करून पैसे कमवायला सुरुवात केली. ती लोकांना व्हिडीओ एडिट करून द्यायची, त्यात संगीत घालून द्यायची. या सगळ्या कामांतून तिला ९० डॉलर मिळाले होते. गेल्या दहा वर्षांत तिने खूप मोठा पल्ला गाठला आहे. २०१३ मध्ये सुरू झालेली ‘आयसीएलओजी’ ही इथिओपियामधली पहिली रोबोटिक लॅबोरेटरी आहे.  इथिओपियाने नुकतेच त्यांचे नवीन मुक्त धोरण जाहीर केले, त्यामुळे इथिओपिया या तंत्रज्ञान क्षेत्रात नवी मजल गाठणार हे नक्कीच. स्वत:च्या प्रगतीवर हुरळून न जाता, डेसीने
तिच्या देशातल्या मुलामुलींसाठी ‘सॉल्व इट’, ‘एनिवन कॅन कोड’ असे वेगवेगळे प्रोग्राम तयार केले आहेत, ज्याच्यायोगे शाळेतल्या मुलामुलींना नवीन शोध, माहिती सहज कळेल. त्यांना नवीन प्रयोगदेखील करता येतील.
अशाच एका उपक्रमाचा भाग म्हणून डेसीने ‘सोफिया स्कूल बस’ हा उपक्रम खास मुलींसाठी तयार केला आहे. या फिरत्या बसमध्ये रोबोट, थ्री डी पिंट्रर अशा अनेक गोष्टी असतील. मुली जर त्यांच्या गरजा बोलून दाखवत नसतील तर एक मुलगी म्हणून मीच त्या ओळखल्या पाहिजेत ना, म्हणून मी बस सुरू केली, असे  डेसी म्हणते. मुले खूप कल्पक असतात, नवीन काही शोधू शकतात, पण मुली समाजासाठी काही तरी भरीव करतात हे फक्त बोलण्यातूनच नव्हे तर वागण्यातूनही दाखवणारी डेसी इथिओपियाची धावपटूंचा, आफ्रिकेतला भूसीमाबद्ध (landlocked) देश ही ओळख बदलायला नक्कीच मदत करेल.
स्थलांतरित आशा
स्वीडन हा युरोपमधला तसा कोणाच्याही अध्यातमध्यात नसणारा देश. उत्तर ध्रुवाजवळ असल्याने इथे जवळपास वर्षभरच प्रतिकूल थंड हवामान असते. मात्र या थंड हवामानाचा इथल्या उद्योग व्यवसायावर काहीच फरक पडलेला दिसत नाही. ‘इलेक्ट्रोलक्स’, ‘आयकिया’, ‘अस्ट्रा झेंका’, ‘स्काइप’, ‘एरिकसन’ अशा अनेक महत्त्वाच्या कंपन्या याच देशातून सुरू झालेल्या आहेत. या देशाने आजवर अनेक विस्थापितांनादेखील सहज सामावून घेतले आहे. इराक, इराण, युगोस्लाविया (जेव्हा तो एक देश होता), सोमालिया, बोस्निया, हर्जेगोविना यांसारख्या अनेक युद्धग्रस्त देशांतल्या लोकांना या देशाने सामावून घेतले आहे. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे लीला अली एल्मी, स्वीडनमध्ये खासदार झालेली पहिली स्थलांतरित स्त्री.
अडीच वर्षांची असताना सोमालिया सोडून लीला एल्मी आईवडिलांसोबत स्वीडनमध्ये आली. आज अठ्ठावीस वर्षांनंतर ती इथे येणाऱ्या स्थलांतरितांसाठी दुभाषक, संवादकाचे काम करते. हे  काम करताना तिला स्थलांतरितांच्या प्रश्नांची जाणीव झाली. त्यामुळेच २०१८ मधली देशातली मध्यवर्ती निवडणूक लढवण्याचे तिने ठरवले. ही निवडणूक लढवताना तिने तिचे स्थलांतरित असणे, मुस्लीम असणे, स्त्री असणे या कोणत्याही मुद्दय़ाचा आधार घेण्याऐवजी शाळा, नोकरीच्या संधी, स्थलांतरितांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, अशा प्रत्यक्षातल्या मुद्दय़ांचा आधार घेतला.
स्वत: हिजाब बांधून स्वत:ची धार्मिक श्रद्धा उघडपणे मिरवणाऱ्या, पण त्याच वेळी त्याचा आपल्या कामावर परिणाम होऊ न देणाऱ्या लीला एल्मीकडे त्यामुळेच स्वीडनमधला एक मोठा समुदाय आशेने बघत आहे. आपला देश सोडून दुसऱ्या देशात राहणाऱ्या नागरिकांची दुसरी पिढी तयार होत आहे, ज्या पिढीने त्यांचा मूळ देश पाहिलाच नाही. त्यांना ही दुसरी संस्कृतीच जवळची वाटत असेल तर त्यात काहीच चूक नाही. त्यामुळेच लीला एल्मी म्हणते, स्थलांतरितांमुळे प्रश्न उभे राहिलेत, असे म्हणण्याऐवजी स्थलांतरितांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले तर प्रश्न उभे राहणार नाहीत. त्यामुळे  स्वीडनमध्ये स्थायिक झालेल्या विस्थापितांच्या या पिढीला धर्म, जात, वंश यापेक्षा स्थिर भविष्याची आस आहे हे सुखावह चित्र आहे.
अन्नपूर्णा मस्तान अम्मा
जगभरातल्या निवडक बातम्यांचा कानोसा घेतल्यावर ही शेवटची बातमी आपल्याच देशातली, आंध्र प्रदेशातली. १०७ वर्षांची एखादी बाई म्हटल्यावर डोळ्यासमोर येते, एखादी अंथरुणाला खिळलेली आज्जी; पण मस्तान अम्मा मात्र खूपच वेगळी होती. वयाच्या १०५ व्या वर्षी तिने नातवाच्या मदतीने यूटय़ूब चॅनेल सुरू केले. ही आज्जी कायम चुलीवर मोकळ्या हवेत स्वयंपाक करायची. मिक्सर, चाकू या सगळ्यापेक्षा तिने कायम हाताची नखे, विळी, खलबत्ता वापरला. चष्मा नाकापर्यंत ओघळलेली, कृश, रापलेला वर्ण, अशी ही आज्जी चुलीसमोर बसते तेव्हा जणू तिची समाधीच लागून जाते. टोमॅटो, बटाटा, आलं यांची सालं ही आजी नखाने अगदी सहज काढते. परिसरात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा भांडय़ासारखा वापर करते. म्हणजे काय? तर ही आज्जी किलगडाच्या आतला गर काढून त्यात केळ्याची पाने लावून आतमध्ये मस्त चिकन शिजवते. तसाच एक प्रयोग शहाळ्याच्या आत पदार्थ शिजवूनदेखील करते. अस्सल गावरान स्वयंपाक करणाऱ्या, मसाले, मीठ चिमटीच्या हिशोबाने टाकणाऱ्या या आज्जीने देशविदेशातल्या खवय्यांना वेड लावले होते.
त्यांच्या ‘कंट्री फुड्स’ या पेजला भेट दिली तर या आजीच्या चाहत्यांचे तिच्यावरचे प्रेम बघायला मिळेल. ही आजी अलीकडेच वारली. तिच्या देशविदेशातल्या नातवंडांना त्यामुळे अचानक पोरके झाल्यासारखे वाटले हेही खरे. अगदी सामान्य घरातली, केवळ स्वत:वर विश्वास ठेवून, ते ज्ञान जगापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणारी मस्तान अम्मा असामान्य ठरते. १०५ वर्षी सुरुवात करून केवळ दोन वर्षांत तिच्या चॅनेलला १२ लाख लोकांनी ‘सबस्क्राइब’ केले होते, तर तिचे व्हिडीओज् हा आलेख लिहीपर्यंत २० कोटी २१ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले होते. इंग्रजी बोलता न येणाऱ्या, नातवंडांना भरवण्यात आनंद मानणाऱ्या मस्तान अम्मा खरोखरच एक अन्नपूर्णा होत्या.

पृथ्वी प्रदक्षिणा ५ जानेवारी २०१९
चतुरंग लोकसत्ता 

No comments:

Post a Comment